भेदरलेला सरडा
भेदरलेला सरडा
भेदरलेला सरडा 🦎
त्यादिवशी रस्त्याला भरपूर ट्रॅफिक होती. आम्ही दोघे स्कूटर वरून, नाशिक ठाणे हायवे वरून येत होतो.
ट्राफिक म्हणजे एवढी की मुंगी शिरायला वाव नाही, प्रत्येक गाडी दुसऱ्याच्या पाठीला पार नाक लावून उभी,
उष्णता ,गर्मी, धुर, धुळ, अगदीच जीव नकोसा झाला होता त्यात थोडी जरी गॅप मिळाली की समोरचा आपली गाडी रेटायला बघे, आणि अशा ट्रॅफिक मध्ये मला एक सरडा दिसला, कुठून कसा त्या ट्राफिक मध्ये आला कोणास ठाऊक शिवाय अगदी एवढ्या गर्मीत त्याला रोड क्रॉस करायची काय गरज होती, पण असो मुक्या जीवाला थोडंच कळतंय ते. आपल्यासारख्या कान डोळे सर्व पंचंद्रिये आणि बुद्धी शाबूत असणाऱ्या माणसाला कळलं पाहिजे.
भय भूक आणि मैथुन हे सर्वच प्राणीमात्रांना समजते, त्यातही मोठ्या प्राण्यांच्या चेहऱ्याचे भाव त्यांचा राग, प्रेम, घाबरणे सारं काही आपल्याला स्पष्टपणे दिसतं.
आपल्या घरातला कुत्रा किंवा आपल्या गोठ्यातले पाळीव प्राणी आपण गेल्यावर आनंद व्यक्त करतात, भूक लागल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव असतात, घाबरल्याचा केविलवाना भाव त्यांच्या डोळ्यात दिसतो पण त्या इवल्याशा सरड्याच्या इवल्याच्या चेहऱ्यावर मला तो भेदरलेला भाव दिसत होता. की यातून आता मी सलामत बाहेर पडत नाही. इतक्या ट्रॅफिक मध्ये मी उतरून काहीच करू शकत नव्हते, आणि काही त्याला उचलून बाजूला देखील ठेवता येणे शक्य नव्हते . निश्चितच टू व्हीलर वाले कोणी बघून कदाचित थांबतील पण मोठ्या गाड्यांना तो दिसणारच नव्हता आणि कोणत्यातरी गाडीच्या खाली तो निश्चित येणार होता.
या गोष्टीला बरेच दिवस झाले काय दोन वर्ष तीन वर्षे ही झाली असती पण त्याच्या चेहऱ्यावरती ते भेदरलेले भाव आजही मला स्पष्टपणे दिसतात.
आणि असं वाटतं माणसाने थोडं सजग राहावं सजगपणे जगावं. आणि आपल्या इतकाच जगण्याचा हक्क इतर प्राणीमात्रांना आहे एवढा विचार करावा
©®
**"*****"""""****"""
