उन्हातला गारवा
उन्हातला गारवा


उन्हातला गारवा दुपारचं रणरणतं डोक्यावर लागत होतं, आणि त्या तापलेल्या कडक उन्हात त्या दोघी बहिणी चालल्या होत्या. एक होती एस वाय ला दुसरी होती दहावीला. दोघींना पुढचे शिक्षण घेण्यासाठी वडिलांनी शहरांमध्ये पाठवले होते. दर महिन्याला ठरल्याप्रमाणे त्यांची ज्वारी गावावरून येणार होती. वडील 20 किलो ज्वारी पाठवायचे पैकी दहा किलो स्वतःसाठी ठेवायची आणि दहा किलो विकून, त्यातून लागणारा मीठ मसाला वगैरे या गोष्टी घ्यायच्या, किंवा रोख रक्कम घ्यायची. गावापेक्षा शहरांमध्ये व्यापारी ज्वारीला जरा चांगला भाव देत होते, गावाकडे वस्तूला वस्तू हा नियम होता. रोख कॅश कोणी देत नव्हते, आणि वडिलांना परिस्थितीमुळे कॅश पाठवणे शक्य नव्हते, मग त्यांनी हा उपाय केला होता. दर महिन्यात दहा किलो ज्वारी जास्त पाठवायची, की कुठला तरी दुकानदाराला विका आणि त्या येणाऱ्या पैशांमध्ये तुम्ही आपल्या बाकीच्या गोष्टींची गरज भागवा. त्यांच्या राहत्या ठिकाणापासून कमीत कमी अडीच तीन किलोमीटर वरती स्टॅन्ड होता. त्या एक वेळ चालत जायच्या आणि सामान परत घेऊन येताना रिक्षा करून आपल्या खोलीवर यायच्या. येताना सोबत ओझं असायचं त्यामुळे रिक्षा करावीच लागायची. तेवढ्यात धाकटीचे लक्ष समोरच्या आराम नावाच्या आईस्क्रीम पार्लर कडे गेलं . ए मायडे आपण आईस्क्रीम खाऊया ना गं. ती बहिणीला माई म्हणत असे, आणि माईचा अपभ्रंश माय डे. मंजे! तुला माहित आहे ना ?आपल्याला आईस्क्रीम परवडणारे नाही. अगं पण ऊन लागतं ना ग, आपण कधी अशा दुकानात जाऊन आईस्क्रीम खाणार? खाऊ खाऊ कधीतरी आपली पण वेळ येईल, पण आत्ता काही शक्य नाही. छोटीच तोंड एवढंस झालं , ते पण माईला पटेना, खरंच किती दिवस अशा गरीबीत काढायचे ? कधीतरी आपल्याला पण हौसमौज करावीशी वाटते ना! ती स्वतःशीच म्हणाली. मंजु ! बघ एक आयडिया आहे, जाताना आपण चालत गेलो तर, आपल्याला आईस्क्रीम मिळेल . चालेल चालेल ती एका पायावर तयार झाली. अगं नुसतं नाही २० किलो ज्वारी आणि रॉकेल पण घेऊन जायचं आहे. रॉकेलचा कॅन एका हातात घ्यावा लागेल. घरातलं रॉकेल संपत आलय, नाही तर जेवायला मिळणार नाही. चालेल ग मी घेईन ज्वारी तू घे कॅन मंजू आनंदाने म्हणाली. तशी अजून ती लहानच होती, त्यामुळे परिस्थितीच्या सटक्यातून देखील तिला अधून मधून असं काही कराव असं वाटायचं. छान छान कपडे घालावे, छान छान खाव प्यावं, सिनेमाला जावं, त्यामुळे आपल्याला आईस्क्रीम मिळणार या विचाराने तिला मनापासून आनंद झाला. त्यांची गावाकडून येणारी ठरलेली बस आली, त्यातून कंडक्टरला सांगून किंवा आठाने /रुपया देऊन ती 20 किलो ज्वारी पाठवली होती. ती दोघींनी उतरवून घेतली, नशीब! यावेळी दहा दहा किलोच्या दोन थैल्या होत्या. दोघींना पण त्या घेऊन जाणं सोपं गेलं असतं. प्रथम तिला आधी कॉलेजवर जायचं होतं फी भरायचा शेवटचा दिवस होता. त्या ज्वारीच्या थैल्यामध्ये 50 रुपये घालून पाठवलेले होते, ते कॉलेजला भरायचे होते . आधीच पत्रात सांगितल्यामुळे मोठीला ते माहित होतं, ती छोटीला म्हणाली आपल्याला आधी माझ्या कॉलेजवर जावं लागेल.मग दोघी ते ओझं घेऊन चालत चालत कॉलेज वरती पोहोचल्या, तिथे मोठीला हातात रॉकेलचा कॅन घेऊन कॉलेजमध्ये जाता येत नव्हतं. ती छोटीला म्हणाली मंजू! इथे कॅन घेऊन थांब ,छोटी भांडायला लागली मी नाही कॅन घेणार. मोठीला वाटत होतं मी कॉलेजमध्ये कॅन घेऊन कसं जाऊ. जेव्हा त्या दोघी कॉलेजच्या गेटच्या आत उभ्या होत्या. तेवढ्यात तिच्याच वर्गातल्या काही मुलींचा घोळका लायब्ररी मधून बाहेर पडला. त्यांच्या भारी भारी झुळझुळीत साड्या, पंजाबी ड्रेस, डोळ्याला गॉगल, त्यांचे लक्ष आपल्याकडे जाऊच नये असं मोठीला वाटत होतं. तेवढ्यात छोटी ओरडली आयो माय डे, ते बघ गॉगल वाल्या चालल्या आहेत, काय भारी साडी आहे ग त्यांची. छोटी नुकतीच दहावी करून अकरावीसाठी शहरात आली होती, दहावीपर्यंतचे शिक्षण एकदम खेडेगावात झाल्यामुळे तिला या सगळ्या गोष्टी नवीनच होत्या. तिच्या त्या मोठ्या आवाजाने सगळ्या ग्रुपचं लक्ष यांच्याकडे गेलं, डोक्यावर कसलं तरी बांधलेलं गाठोड, हातात रॉकेलचा कॅन, तिच्या त्या ध्यानाकडे बघून सगळ्या जणी फिदी फिदी हसू लागल्या. ए हळू बोल ना! कॉलेज आहे ,काय आपल्या शेतात ओरडते आहेस का?मग मोठी ने तिला एक धपाटा घातला, छोटी आपली पाठ चोळत उभी राहिली. मग तिने छोटीला कॉलेजच्या गेट बाहेरच उभी केली. तिच्याकडे कॅन दिला, आणि आपण शाळेत कॉलेजमध्ये जाऊन फी भरून आली. मग ऐन उन्हाच्या तडाख्यात दोघींनी दहा दहा किलो ची ज्वारीची बाचकी डोक्यावर घेतली, मोठी ने हातात कॅन घेतला आणि दोघी मजल दरमजल करीत चालू लागल्या. कॉलेजच्या बाहेर पडल्यावरती दोघी चालत होत्या , तर जो मुलगा तिला आवडायचा, ज्याच्यावर तिचा क्रश होता तो मोहन सायकल चालवत तिच्या समोरून आला. डोक्यावर बोचक, हातात रॉकेलचा कॅन, तिला आता भूमी मला पोटात घेईल तर बरं! असं वाटू लागलं. ती हातातला कॅन पटकन छोटीच्या हातात देत होती, आणि समोरून आलेल्या मुलाचा इशारा करत होती, पण छोटीला काही ते समजत नव्हतं ती काही हातात कॅन घ्यायला तयार नव्हती. मग मोठी ने खाली मान घातली आणि जसं आपलं कोणाकडेच लक्ष नाही, आपण कोणाला बघितलंच नाही अशा रीतीने पुढे निघाली. मोठी तशी स्कॉलर असल्यामुळे तिला आख्खे कॉलेज ओळखत होते. एकदम शांत सज्जन अभ्यासू मुलगी, असा तिचा लौकिक होता पण ही गरीबी आड येत होती. अजून कॉलेज कॅम्पस संपला नव्हता, थोडे पुढे जातात तर एक टारगट पोरांचा ग्रुप समोरून आला. तिच्या डोक्यावरचे बारदानाचे गाठोडे पाहून बिब घ्या बिब शिककाई आज आले उद्या मी येणार नाही औंदा लगीन करायचं हाय मला कोल्हापुरी नवरा हवा ग असा कोरस सुरू केला. आता तिने कोणाकडे लक्ष द्यायचे नाही असे ठरवले, आणि निमुटपणे पुढे चालू लागली. डोक्यावर ऊन तळपत होते अंगातून घामाच्या धारा लागल्या होत्या, मध्येच रस्त्यात थांबत, सावलीमध्ये उभे राहत, ज्वारीच्या बाचक्याचा खांदा बदलत, हाश हुश्य करीत दोघीच चालल्या होत्या, रस्त्याने चालताना त्यांना तहान लागली. रस्त्याच्या कडेला एक पाणपोई होती, कुणा तरी मातोश्री साहेबांच्या नावाने उघडलेली, मोठ्या आशेने दोघी पाण्यासाठी गेल्या, डोक्यावरचं ओझं सांभाळत नळ सोडला पण कोरडा ठक्क, थेंब भर पाणी नाही उन्हाळ्यात अशा अनेक पाणपोया लोकांची फसवणूक करतात. सुरुवातीला फक्त नावासाठी उघडतात नंतर मात्र कोणी त्याकडे ढुंकून पाहत नाही. त्यांच्या पायात पातळशा प्लास्टिकच्या चप्पल होत्या, डांबरी रस्ता चांगलाच तापलेला होता . चालताना चप्पल च्या मधून पण पायाला चटके बसत होते. चालण्याचा वेग पण आता मंद झाला होता कारण डोक्यावर ओझं आणि घामाच्या धारा, त्यातच एक स्कूटर छोटीच्या पार पायावरच आली, धक्का लागून, तिच्या डोक्यावरच ज्वारीचं बाचक तिच्या पायावर पडलं, त्याबरोबर छोटी आईईईईई करून मोठ्याने ओरडली. मोठी ने मागे बघितलं तर छोटीच्या पायावरती दहा किलोचा बाचक पडलं होतं, ती तशीच वाकून उभी होती स्कूटर वाला चांगला होता ,थांबला, सॉरी सॉरी म्हणायला लागला, अहो नुसतं सॉरी काय म्हणता? तिचा पाय दुखावला ना. मोठीला आपल्या डोक्यावरचं ओझं खाली ठेवून छोटीला सावरायचं होतं, तेवढ्यात पब्लिक जमा होऊ लागलं मग मात्र स्कूटर वाला काही मदत न करता पळून गेला. मग गर्दीतल्याच कोणीतरी पुन्हा छोटीच्या डोक्यावर तो बोजा ठेवला. आता त्यांची चाल अजूनच मंदावली कारण छोटी लंगडत चालत होती. ए माई आपण रिक्षा करूया, अगं आलं जवळ आता कशाला रिक्षा? एवढा अंतर तर आपण चाललो ना ! अग पण माझा पाय दुखतोय मंजू थोडी थांब आता बघ समोर दिसतंय एवढ्यात "आराम" येईलच. आपलं ठरलंय ना आज आईस्क्रीम खायचं आता थोड्या साठी रिक्षा नको. मग एवढ्या वेळ आपण काय मेहनत केली ती सगळी पाण्यात जाईल. छोटीला पण ते पटलं आणि ती पुन्हा तिच्या मागे पाय ओढत चालू लागली. अजून अर्धा तास चालल्यानंतर ते "आराम आईस्क्रीम पार्लर" खरोखर आलं आलं. जे त्यांच्या मनात घोळत होतं आणि डोळ्यापुढे दिसत होतं, दोघी पण अगदी झपाट्याने आत शिरल्या, आत बसल्यावर असं थंडगार वाटलं की आ हा हा हा स्वर्ग म्हणतात तो हाच असावा असं दोघींना वाटून गेलं. पार्लर वाले पण यांच्याकडे अचंभ्याने पाहत होते . कारण डोक्यावर ज्वारीची बोचकी, हातात रॉकेलचा कॅन, घामाने थबथबलेले चेहरे , पण डोळ्यात मात्र एक चमक, आज वेटर न येता काउंटर वरचा माणूस जवळ आला. काय ग पोरींनो कोणत आईस्क्रीम पाहिजे? आईस्क्रीम पाहिजे अग पण कोणता आईस्क्रीम पाहिजे इथे बरेच फ्लेवर आहेत . म्हणजे काय असतं? चॉकलेट आईस्क्रीम असतं , आंबा आईस्क्रीम असतं,गुलकंदाच असतं, पिस्ता, स्ट्रॉबेरी, अशी खूप प्रकारची आईस्क्रीम असतात तुम्हाला कोणतं पाहिजे. जे चांगलं आहे ते द्या छोटी म्हणाली, तशी ती लहानपणापासून बोल्ड होती. थांबा! थांबा? मोठी म्हणाले ती आधी रेट कार्ड पाहू लागली. सगळ्या किमती 10 रुपयाच्या पुढे 20 /25 /40 मग आपल्या बजेटमध्ये कोणतं बसेल हा विचार करून तिने पाच पाच रुपयाचे कप सांगितले. छोटीलाते कप नको होते तिला काचेच्या कपातले गोल गोल गोळे दिसत होते ते पाहिजे होते कागदी कपातला आईस्क्रीम तिला नको होतं. माय डे हे घे ना ग अग त्याची किंमत जास्त आहे. नको आपलं महिनाभराचं बजेट कोलमडून जाईल, आपलं दहा रुपयाचा आईस्क्रीम खाऊया आणि पुढे जाऊया ती हळूच छोटीला म्हणाली अगं आपण पहिल्यांदा तर आलोय ना! हो पण म्हणून काय झालं तू हट्ट करू नको नाहीतर ते पण आईस्क्रीम घेणार नाही दोघींमध्ये काहीतरी हळूहळू भांडण सुरू होतं. तो काउंटर वरचा माणूस हे हसून बघत होता, गालातल्या गालात हसत होता. दोन वेटर लांब उभे राहून हे गंमत पाहत होते. ऐन उन्हाची वेळ असल्यामुळे दुकानात फारसं गिर्हाईक नव्हतं. छोटी तुला कोणता आईस्क्रीम पाहिजे. काका मला ते काचेच्या कपामधलं स्ट्रॉबेरी वालं आईस्क्रीम पाहिजे. त्याची किंमत दहा रुपये होती. ठीक आहे तुम्हाला आवडते ते घ्या, तू पण घे ग बाळा तो मोठीला म्हणाला. तू काय करतेस मग तिने आपण इथे कॉलेजला असून वडिलांनी गावाकडून ज्वारी पाठवली आहे ती विकून महिन्याचा इतर सामानाचा बंदोबस्त करायचा आहे वगैरे सांगितले, तशा दोघी पण लहानच होत्या ही पंधरा वर्षाची ती 18 वर्षाची, अजून जगाचा आचपेच कळत नव्हता. आणि उगाच दुसऱ्याला सगळं खरं सांगू नये कोणी आपला गैरफायदा घेऊ शकत हेही कळत नव्हतं शिवाय तो काळ तसा चांगलाच होता. तो म्हणाला तुमच्या दोघींना आवडेल ते आईस्क्रीम घ्या आणि तू दहा रुपयाची ऑर्डर केली होती ना मग मला दहा रुपये द्या. मोठी संकोचाने नको नको म्हणत होती. छोटी ने मात्र स्ट्रॉबेरी ची ऑर्डर मगाशीच दिली होती, मग मोठी ने पण मँगो आईस्क्रीम ची ऑर्डर दिली. त्याने दोघींपुढे पण त्यांनी मागितलेली आईस्क्रीम दिली. त्या दोघी मन लावून आईस्क्रीम खात होत्या आणि काउंटर वरचा तो त्यांच्या डोळ्यातली चमक आणि चेहऱ्यावरचा आनंद पाहत होता.