पाडवा गोड झाला
पाडवा गोड झाला
पाडवा गोड झाला तो म्हणाला राणी तुला आज काय हवं? माझ्यातर्फे, आणि तिला आश्चर्याचा धक्का बसला. कारण एवढ्या वर्षात त्याने कधी विचारलंच नव्हतं, तुला काय हवं? गृहीतच धरलं होतं त्याने तिला, सरप्राईज वगैरे देणे हे त्याच्या कधी हिशोबात बसत नव्हतं. काय हवं ते सांग आपण घेऊन येऊ, तेही बरोबरच असायचं, आणि तिला आयुष्यभर त्याने कधीतरी सरप्राईज द्यावे हीच अपेक्षा. मग तिनेही कधी आग्रह धरला नव्हता ,आणि त्यानेही कधी आग्रह धरून खास पाडवा म्हणून तिच्यासाठी वेगळं काही आणलं नव्हतं. पण आता मात्र अगदी संसाराचा गुळांबा, मोरांबा, लोणचं, तेही मुरलेलं असं काय म्हणाल ते झालं होतं. ती म्हणाली राजा मला तुझ्याकडून खरंच कधी काही नकोच होतं, फक्त कोणत्या वेळी मला काय हवं हे तू माझ्या मनातलं ओळखावस आणि मला न मागता द्यावस हीच माझी मोठी अपेक्षा होती. मग अगदी ती छोटीशी गोष्ट किंवा कृति का असेना. तो म्हणाला मी असाच आहे ग! नाही मी मनकवडा, नाही मला ओळखता येत कधी मनातलं, पण तू तरी कधी स्वतःहून का मागितलं नाहीस ती म्हणाली, तू देशील याची खात्री नव्हती, मग उगाचच माझे शब्द कशाला वाया घालवू? कारण तू काहीतरी खुसपट काढणार, माझी खिल्ली उडवणार, खरंतर गोष्ट छोटी होती, पण एकमेकांशी नीट संवाद न साधल्याने ही हातातून निसटली होती. आता काय हवं या वयात ?सारं काही आहे दागिने आहेत साड्या आहेत, सारं काही आहे काही मागाव असं काहीच नाही, पण निसटलेले क्षण पुन्हा येत नाहीत एवढे लक्षात ठेव. ती हसली ,तोही हसला कारण आता भांडण्याच वय नव्हतं. आणि पाडवा गोड झाला **********"*****" ""*"" "" ""
