वैशाख वणवा
वैशाख वणवा


वैशाख वणवा ग्रीष्माचा दाह काय वाळल्या तृणा राखेला जाळी काय अग्नी तो पुन्हा अशा काव्यपंक्ती कुठेतरी ऐकल्या आहेत, खरे तर चैत्र वैशाख वसंत ऋतू येतो पण अंगाची कायली मात्र ग्रीष्म ऋतू प्रमाणे होते . आता आपला विषय आहे वैशाख वणवा. काय होतं हवा प्रचंड कोरडी होते, उष्ण होते, गरम हवा गहू लागते आणि अंगाची पार काहीली होते. आता नव्या पिढीला काहीली हा शब्द देखील ठाऊक नसेल. कारण त्यांनी ते बघितलेलेच नाही. गुळाच्या गुऱ्हाळामध्ये तो रस काहीली मध्ये तापवला, नाही नाही उकळला जातो. काहील तापली उकळी फुटली लय जण हपापली पण त्या वैशाख वणव्यात देखील तुम्हाला थंडावा मिळावा, सुगंध मिळावा, याची देखील निसर्गानेच सोय केलेली आहे. याच दिवसात गुलमोहर, नीलमोहर, फुलतात जणू काही निसर्गाने तुमच्यासाठी फुलांच्या पायघड्या घातलेल्या असतात. मी जेव्हा मालवणी ला जात होते तेव्हा बस मधून उतरून कामाच्या जागी हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत गुलमोहर, नीलमोहर, आणि बहावा सगळ्यांचीच झाडे होती. अजून रस्त्यावर झाडू मारणारे आलेले नसल्यामुळे खरोखरी रस्त्यावरती निळ्या पिवळ्या लाल फुलांची पखरण व्हायची, अगदी गच्च सडा पडलेला असायचा. असं वाटायचं की खरंच आपल्यासाठी कोणीतरी पायघड्या घातल्या आहेत. सोनेरी सुगंधी बहावा याच दिवसात फुलतो सोने पे सुहागा हा जो वाक्प्रचार आहे ना तो बहावा खरा करतो. बहाव्याच्या झाडाखालून जाताना, सुगंध तर येतोच पण वरून पिवळ्या सोन फुलांचा तुमच्यावरती वर्षाव होतो. कधी कोणी केले नसेल एवढे कौतुक तुमचे निसर्ग करतो. याच कालावधीमध्ये कलिंगड, चिबुड, टरबूज , करवंदे, द्राक्षे, संत्री ,जांभळे, अशी पाणीदार फळ येतात. शिवाय "अमृता तेही पैजा जिंके" असा तो सोनेरी केसरी रसदार फळांचा राजा आंबा येतो. याच कालावधीमध्ये चैत्रागौरीचे आगमन हळदी कुंकू कैरी डाळ आणि पन्हं, वाहवा जिभेची चंगळ. याच कालावधीमध्ये लग्न मुंजी साखरपुडे पाहुण्यांची रेलचेल नातेवाईकांची गाठ भेट, शिवाय कुठेतरी फिरायला जाण, मुलांच्या सुट्ट्या असल्यामुळे सर्व कुटुंबाला एकत्रित राहायला मिळणं, एकमेकांच्या सहवासाचा आनंद मिळणं, आनंद घेणं, असं खूप काही मिळतं. मग आपण फक्त वैशाख घातल्या त्या रणरणत्या उन्हाचा किंवा काहीही चा विचार का करावा? बाकीचे सारे जीवनात येणारे सुगंधी अमृत कण, वेचावे ,उपभोगावे, आणि मनाच्या पेटीत बकुळीच्या फुलापरी बंद करून ठेवावे. आठवणी येतील तेव्हा बाहेर काढून सुगंध घ्यावा आणि पुन्हा मनाच्या कप्प्यात बंद करून ठेवावा. ©® Please share with name