डेली
डेली


॥॥ डेली ॥॥
सकाळचे नऊ वाजत होते. शहरापासून जवळ असलेल्या नाक्यावर जाणे-येणे करणारांची गर्दी झाली होती. त्यांच्यामध्ये रोज म्हणजे 'डेली' जाऊन येणारांची संख्या जास्त होती. महामंडळाच्या वाहनांमध्ये ज्याप्रमाणे 'स्टाफ' हा परवलीचा असतो त्याचप्रमाणे खाजगी वाहनांमधून प्रवास करताना डेली या शब्दाला फार मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्या गर्दीमध्ये चाकरमानी होते, व्यापारी होते, शेतकरीही होते. त्यादिवशी दररोजच्या मानाने अधिक गर्दी झाली होती.
"आज काय आहे, भरपूर गर्दी झाली आहे ." एका प्रवाशाने नेहमीच्या दुसऱ्या प्रवाशाला विचारले.
"आज आमची ७९५ गेलीच नाही हो..." शेजारी उभ्या असणाऱ्याने सांगितले. दररोज प्रवास करणारांना खाजगी बसचे क्रमांकही पाठ झाले होते.
"बाप रे! ८९८ ची वेळ झाली की." दुसरा एक प्रवासी म्हणाला. त्या गर्दीमध्ये पुरुषांप्रमाणे अनेक महिलाही होत्या. महिलांमध्ये शिक्षिकांचे प्रमाण जास्त होते. तितक्यात एका ऑटोतून उतरत गडबडीने आलेल्या मिस भांडे या शिक्षिकेने दुसऱ्या शिक्षिकेला विचारले,
"नवाची बस गेली का हो?"
"अहो, अजून पावणे नऊचीच यायची आहे..." ती शिक्षिका सांगत असताना एक ट्रॅव्हल्स येताना दिसली आणि अनेक प्रवाशांचा जीव भांड्यात पडला. ट्रॅव्हल जवळ येताच ती थांबण्याची वाट न पाहताच अनेकांनी आत चढण्यासाठी घाई सुरु केली. पुरुषांनी स्त्रीचा विचार केला नाही की, महिलांनाही मागेपुढे पुरुष आहेत हे लक्षात घेतले नाही. एकमेकांना ढकलत सारेच आत चढण्यासाठी धडपडत होते. त्या ठासून भरलेल्या बसमध्ये इतरांसोबत मिस भांडेंनीही प्रवेश केला. आसन मिळण्याची तर शक्यता नव्हतीच परंतु व्यवस्थित उभे राहण्याची मारामार होती. एका पायावर उभे राहणे हा काय प्रकार असतो तो अशावेळी समजतो.प्रत्येक आसनावर दोन काय चार चार प्रवासी बसले होते. अर्थात ही सारी व्यवस्था म्हणा ऍडजस्टमेंट म्हणा पुरुषांनीच केली होती. एखादा अपवाद वगळता एकाच बाकावर बसलेल्या दोन स्त्रीयांनी शेजारी उभ्या असलेल्या लेकुरवाळ्या बाईलाही जागा दिली नव्हती. अशा गर्दीमध्ये आंबट शौकीनांचे चांगलेच फावते, त्यांना स्पर्श सुखाची पर्वणी लाभते. तितक्यात मिस भांडे यांचा भ्रमणध्वनी वाजला. अनेक कसरती करत तिने पर्समधून भ्रमणध्वनी काढला. त्यावरील नाव पाहून ती म्हणाली,
"हॉलो,आई, काय म्हणतेस?"
"अग, निघालीस का?"
"हो. निघालेय ग...." भांडे बोलत असताना विस्कटलेल्या अवस्थेतील वाहक म्हणजे एक पोरगा स्त्री असो की, पुरुष असो प्रत्येकाला मागच्या बाजूला एकमेकांच्या अंगावर दाबत भांडेजवळ आला. भांडे ज्या गावी उतरणार होती त्या गावासाठी महामंडळाचे दर पन्नास रुपये होते. इतर प्रवाशांकडून खाजगी वाहनवाले पस्तीस रुपये घेत असत परंतु रोजच्या प्रवाशांकडून मात्र केवळ वीस रुपये घेत असत. भांडेंनी पोराकडे वीस रुपये दिले. मुलगा नवीन असल्यामुळे तो काही बोलण्यापूर्वीच भांडे 'डेली' एवढेच म्हणाली. तो परवलीचा शब्द ऐकून तो मुलगाही चुपचाप पुढे सरकला. तिकडे भ्रमणध्वनी सुरू असल्यामुळे तिच्या आईने तो डेली शब्द ऐकला परंतु तिला काहीही अर्थबोध झाला नाही. न राहवून आईने विचारले,
"का ग तब्येत बरी नाही का? दम लागलेला दिसतोय..."
"अग, जरा धावपळ झाली आहे. बरे ठेवते. सायंकाळी बोलते..."
"बरे.." म्हणत तिच्या आईनेही फोन बंद केला. आई विचाराविचारात सोफ्यावर बसली आणि तिथे मिस्टर भांडेंचे आगमन झाले.
"झाले का कन्यारत्नाशी बोलून? तुमचे हे मोबाइल पुराण अतिच झालय हं.दिवसातून दहा वेळा बोलतेस तिच्याशी....."
"हो. बोलते. तरी बरे आहे, ती माझ्या मोबाईलचे बील भरते ते. काय हो, तुमचे बंधुराज आणि वहिनीसाहेब दिवसातून शंभर फोन करतात ....तेही मुलाला. माझी तर मुलगी आहे..."
"करा. करा. माझे काय जातेय. पाहिजे तेवढे बोला..."
"ते जाऊ द्या हो. आज शीतल जरा दमल्याप्रमाणे वाटत होती."
"अग, जाणे-येणे करणे का सोपे आहे? शिवाय संध्याकाळी शिकवणी घेते. झालेच तर रात्री बारा वाजेपर्यंत टीव्ही पाहते. थकणारच की."
"अहो, ती मेडिकलवर गोळी घेत होती."
"वाढले असेल पित्त! धावपळ, जागरण, आचरबचर...काय ते फास्टफूड...."
"अहो, ती डेलीची गोळी घेत होती..."
"असेल. पित्त प्रकोप जास्त वाढला असेल म्हणून डॉक्टरांनी किंवा औषधदुकानदाराने पाच सात दिवस रोज गोळी घ्यायला सांगितली असेल."
"डेली म्हणजे रोज नाही हो..."
"कमाल आहे! आम्हाला पाचव्या वर्गाला इंग्रजी शिकवायला असलेल्या मारकुट्या मास्तरांनी बडवून बडवून डेली म्हणजे रोज असे घोकंपट्टी करायला लावून डोक्यात फिट्ट बसवलय.."
"आता कसे सांगू तुम्हाला? मी म्हणतेय ती डेली नावाची गोळी आहे हो..."
"अच्छा! तुला सांगू का, आजकाल रोज सतराशे साठ गोळ्या बाजारात येत असतात. असेल एखादी नवीन गोळी...पित्ताची!"
"अहो, तुमचे हे एकच एक पित्त पित्त ऐकून माझेच पित्त खवळतय...."
"त्यात नवीन ते काय? माझ्याबाबतीत तर ते नेहमीच खवळलेले असते. बरे, एक सांग, डेली हा काय प्रकार आहे?"
"मी शितलशी बोलत असताना ती कदाचित औषधीच्या दुकानात होती आणि तिने चक्क डेली गोळी मागितली हो. ही गोळी की नाही गर्भधारणा होऊ नये म्हणून वापरतात."
"मग प्रश्नच मिटला की. शितलचे अजून लग्नच झाले नाही तर तिला त्या गोळ्यांची गरजच नाही."
"मी तेच तर म्हणतेय. म्हणजे म्हणूनच मला काळजी वाटतेय की तिला या गोळ्या कशासाठी?"
"हात्तीच्या! तू की नाही बस! अग, ती शहरातून खेड्यात जाणे येणे करते. आजकाल जाहिराती पाहून खेड्यातील बायकाही गर्भनिरोधक गोळ्या सर्रास वापरतात. एखाद्या बाईने शितलीला आणायला सांगितल्या असतील.... घरातील व्यक्तींच्या नकळत."
"ते झाले हो. पण अशी गोळी मागताना तिच्या आवाजात जरासुद्धा संकोच नव्हता. उलट झेंडूबॉम्ब मागावा अशा सराइतपणे ती गोळी मागत होती. एक कुमारिका इतक्या धीटपणे डेलीची गोळी मागतेय याचा अर्थ काय? तुमच्या लक्षात एक गोष्ट आली किंवा नाही ते मला ठाऊक नाही परंतु या दोन- तीन महिन्यात तिच्या वागण्यात बराच फरक पडलाय. ते टाइट..स्लीवलेस ब्लाउज काय..शिक्षकी पेशाला शोभणार नाहीत असे कपडे ती आजकाल घालते आहे हो..."
"हे बघ, असा कशाचा संबंध कशाला लावू नकोस. उगीच टेंशन घेऊ नको. दुपारी तिचा फोन आला म्हणजे सविस्तर विचार. जास्तच तळमळ होत असेल तर तिला तासाभराने पुन्हा फोन कर. बरे चल. आटोप. मला अगोदरच उशीर झालाय...." असे म्हणत भांडे आत गेले. तशा सौ. भांडे उठल्या. त्यांनी नवऱ्याचा डबा, पाण्याची बाटली तयार ठेवली. परंतु ते काम करताना रोजचा उत्साह नव्हता. काही वेळात बाहेर आलेल्या भांडेंच्या लक्षात पत्नीची अवस्था आली. ते हलकेच म्हणाले,
"असे कर. लगेच शितलला फोन करून सविस्तर चर्चा कर. तुझ्या मनातील शंका काढून टाक. मी खात्रीने सांगतो, तुला वाटते तसे काही नाही. आपले, विशेषतः तुझे संस्कार एवढे तकलादू नाहीत. व्यवस्थित जेवण कर. शितलशी बोलणे झाल्यावर मला फोन कर. येतो मी...." असे समजावून सांगत भांडे घराबाहेर पडले.......
बेचैन अवस्थेत भांडे सोफ्यावर टेकल्या. राहून राहून त्यांच्या मनात एक विचार येत होता,
'शितलने डेली का घेतली असावी? आपल्यापासून दूर एकटीच राहते. सोबत कुणी नाही शिवाय अलीकडे तिचे राहणीमान बदलतेय. तिचा पाय तर वाकडा पडला नसेल? तिला कुणी नादी लावले, फसवले तर नसेल? तशी शितल हुशार आहे पण फार भोळी आहे. पटकन कुणावरही विश्वास ठेवते. हे वय तसे चंचल असते. घरी असली म्हणजे घरातील लोकांचे लक्ष असते. एखाद्या शिक्षकाच्या प्रेमात तर पडली नसेल ना? शेजारी कोण राहते, कुणाला बोलते? काही काही माहिती नाही. पण मी असा वाइट विचार का करते? शितलचे बाबा म्हणाले तसे माझे संस्कार एवढे तकलादू नाहीत. पाहुण्यांमध्ये आमच्या वागणुकीचा, संस्काराचा एक आदर्श असताना शितल अशी कशी वागेल? संस्कार, धर्म, चालीरीती याविरोधात ती जाणारच नाही. कोण असेल तो? जातीतला तर असेल ना? शितलच्या योग्यतेचा तर असेल ना? सर्वत्र नाचक्की तर होणार नाही ना? आज आमचा उदोउदो करणारा हा समाज, सोयरेधायरे, परिचित उद्या तोंडावर थुंकायला मागेपुढे पाहणार नाहीत. कोणती अवदसा आठवली माझ्या शितलीला?
नोकरी लागल्याबरोबर तिला उजवायला हवी होती पण तिला पुढे शिकायचे होते. खरे तर तिला नोकरी लागल्यावर तिला एकटीला ठेवायलाच नको होते. तिच्यासोबत राहायला पाहिजे होते. तिथे जाऊन राहायचे तर तिच्या वडिलांची काय व्यवस्था करणार? या साहेबांना तर कधी पिण्याचे पाणी स्वतःच्या हाताने घ्यायला जमत नाही तर स्वयंपाकाची गोष्टच दूर. बाहेरचे खाणेही ह्यांच्या पचनी पडत नाही. मन मारून, ह्रदयावर धोंडा ठेवून शितलीला दूर नोकरीच्या गावी राहण्याची परवानगी दिली आणि नेमकी हीच गोष्ट तिच्या पथ्यावर पडली नसेल ना? तिला मिळालेल्या स्वातंत्र्याचा तिने गैरफायदा तर घेतला नाही? देवा, परमेश्वरा माझी भीती खोटी ठरु दे रे बाबा. तुझे उपकार कधीच विसरणार नाही. विचारावे का फोन करून? असे सरळ सरळ विचारणे योग्य आहे का? काय हरकत आहे? मी आई आहे तिची....'
सौ. भांडे यांनी लगोलग भ्रमणध्वनी उचलला. त्यातला 'स्पीड डायल-३' हा क्रमांक जुळवला. तिकड 'संपर्क क्षेत्र से बाहर...' अशी धून सातत्याने ऐकू येत होती. अनेकदा तेच तेच ऐकून चिडलेल्या शितलच्या आईने हातातला भ्रमणध्वनी सोफ्यावर दाणकन आपटला आणि स्वतःलाच म्हणाल्या, 'हा फोन म्हणजे असून अडचण नसून खोळंबा! आपल्याला गरज असेल, अत्यंत महत्त्वाचे काम असेल त्यावेळी हा नेमका दगा देतो. फोन लागत नाही याचा अर्थ शितल शाळेवर नाही का? कुणासोबत गेली तर नसेल? डेलीची गोळी....छे! मी असा भलताच विचार का करते? सध्या सगळीकडे मोबाईलच्या रेंजची बोंबाबोंब चाललीय म्हणून लागत नसेल. लागेल थोड्या वेळाने....' असे बडबडत भांडेबाईंनी समोर पडलेले वर्तमानपत्र उचलले. बातम्या वाचण्यातही त्यांचे मन लागत नव्हते. तितक्यात त्यांचे लक्ष एका बातमीवर गेले. बातमीचा मथळा वाचून त्यांना प्रचंड धक्का बसला. शितल ज्या शहरात राहत होती त्याच शहरातील ती बातमी होती. शितलच्या आईने ती बातमी दोन-तीन वेळा वाचली. त्यांना वाटले, 'ही बातमी खरी असेल का? या या चक्रव्यूहात तर माझी शितल अडकली नसेल ना? हे देवा, काय वाचतेय हे मी? देवा, असे काही नसू दे रे. माझी शितल या प्रकरणापासून दूर असू दे रे बाप्पा. काय झाले बाई, आजच्या या पोरींना आणि बायकांना? घरापासून, कुटुंबापासून शिक्षण नोकरीच्या निमित्ताने दूर राहायचे म्हणजे काय सारी बंधने झुगारून द्यायची? बेमालूमपणे बेलगाम वागायचे? काय करु आता....' असे स्वतःशीच बोलत त्यांनी मोबाइल उचलून त्यांनी नवऱ्याचा क्रमांक जुळवला. तिकडून आवाज आला,
"हां. बोल काय झाले? बोलली का शितलशी?"
"अहो, ते जाऊ द्या. इथे एक नवीनच प्रॉब्लेम झालाय?"
"आता काय झाले?"
"तुम्ही आजचा पेपर वाचलात का?"
"हो. वाचला. काय विशेष?"
"ती बातमी वाचली का?"
"कोणती? वर्तमानपत्रात शेकडो बातम्या असतात. तू नेमक्या कोणत्या बातमीविषयी बोलतेस?"
"अहो, शितल राहते त्या गावची केवढी मोठी बातमी आलीय म्हणता."
"वाचल्याचे आठवत नाही बुवा."
"त्या गावात म्हणे, दररोज डेलीच्या हजारो गोळ्या विकल्या जातात..."
"अजूनही तुझ्या डोक्यातून डेलीचे भूत गेलेच नाही का?"
"कसे जाईल? तुम्ही एवढे कसे शांत बसू शकता हो?"
"ती बातमी काय आहे ते सांगशील का?"
"अहो, वर्तमानपत्रात छापून आलेय की, त्या शहरात शिकणाऱ्या महाविद्यालयीन मुली, नोकरीच्या निमित्ताने राहणाऱ्या विवाहित महिलासुद्धा जास्त पैसा मिळावा म्हणून लपूनछपून देहविक्रय करतात म्हणे. मजाही होते आणि त्या संबंधाची सजा मिळू नये म्हणून डेलीसारख्या गर्भनिरोधक गोळ्या वापरतात. बातमीदाराने एका दुकानदाराची मुलाखतही छापली आहे..."
"हे बघ. अशा बातम्या केवळ वर्तमानपत्राचा खप वाढावा म्हणून आलेल्या असतात..."
"असे कसे म्हणता? आपली शितल तर...."
"थांब. आवर स्वतःला. माझा माझ्या शितलवर पूर्ण विश्वास आहे. शितल अशी वागूच शकत नाही."
"अहो, पण...."
"मी तुला शितलीला फोन करायला सांगितला होता. केलास का?"
"सारखा नॉट रिचेबल येत आहे."
"लागेल. थोड्या वेळाने लागेल. बरे ठीक आहे. मी दुपारची रजा टाकून येतो. तिच्याशी बोलतो. फोन लागलाच नाही तर सायंकाळी आपण प्रत्यक्ष जाऊन भेटूया."
"ठीक आहे. लवकर या." असे म्हणत शितलच्या आईने फोन बंद केला आणि ताबडतोब शितलला फोन लावला.पण पहिले पाढे पंचावन्न. तितक्यात त्यांचा लँडलाइन फोन वाजला. शितलच्या आईने फोन उचलताच तिकडून आवाज आला,
"आई, मी वासंती बोलतेय. काय झाले, तुमचा मोबाइल सारखा व्यस्त येतोय. कुणाशी बोलत होता का?" सुनेचा आवाज येताच त्यांना बराच धीर आला.
"अग, ह्यांना बोलत होते?"
"बाबांना? यावेळी? सारे ठीक आहे ना? पण तुमचा आवाज...."
"वासंती, अग, शितलला...."
"काय झाले? ती बरी आहे ना? रात्री तर आम्ही खूप वेळ बोललो. मला काही बोलली नाही..."
"मी सकाळी नेहमीप्रमाणे तिला फोन लावला. तेव्हा ती मेडिकलच्या दुकानातून बोलत होती."
"मेडिकल? मला काहीच कशी बोलली नाही."
"कोणत्या तोंडाने सांगेल ती?"
"आई, नक्की काय झाले?"
"अग, शितल डेलीची गोळी घेत होती."
"डेली? का?"
"वासंती, ही गोळी केव्हा घेतात ते तुला माहिती आहे ना?"
"आई, नाही. मुळीच नाही. मला तसे काही असेल असे वाटत नाही. शितल अशी वागूच शकत नाही. काही तरी गैरसमज होतो आहे. आई, तिला..."
"अग, पंचवीस वेळा फोन केला पण लागतच नाही."
"आई, शांत व्हा बरे. मी लगेच तिच्याशी बोलते. तुम्ही जेवलात का? आधी शांतपणे जेवण करा. एक नक्की तुम्ही म्हणता तसे काहीही नाही. अगदी शंभर टक्के. ठेवते आता..." म्हणत वासंतीने फोन बंद केला आणि शितलची आई डोळे मिटून सोफ्यावर बसून राहिल्या. किती वेळ गेला ते समजले नाही. दारावरची घंटी वाजली आणि त्या भानावर आल्या. त्यांनी दार उघडले. दारात पतीला पाहताच त्यांना भडभडून आलेः त्या सर्रकन मागे वळल्या. सोफ्यावर पडलेल्या वर्तमानपत्रातील बातमीचे पान त्यांनी नवऱ्याच्या हातात दिले. भांडे सोफ्यावर बसून ती बातमी वाचत असताना शितलच्या आईचा भ्रमणध्वनी वाजला. त्यावर शितलचे नाव पाहून त्यांचा चेहरा उजळला. त्या पुटपुटल्या,'आला कार्टीचा फोन..' फोन उचलून त्या म्हणाल्या,
"बोला. शितलमॅडम, बोला. सकाळपासून पंचवीस फोन केले..."
"अग, पण का? माझा फोन स्विच ऑफ होता."
"का? कुणासोबत होतीस?"
"आई, काय झाले? असे का विचारतेस? सकाळी बसमध्ये खूप गर्दी होती म्हणून सांगायचे राहून गेले. अग, आज आमचे केंद्र संमेलन होते. नवीन साहेब आले होते. ते कडक आहेत म्हणून मोबाइल बंद करून ठेवावा लागला. आत्ताच साहेब गेले लगेच तुला फोन लावला. तू का फोन करीत होती?"
"काय चालले आहे तुझे? ही लक्षणे..." सौ. भांडे बोलत असताना भांडेंनी तो मोबाइल घेतला. तो लाउड करून त्यांनी विचारले,
"शितल बेटा, सारे ठीक आहे ना?"
"बाबा, तुम्ही घरी कसे काय? काय झाले? सारे व्यवस्थित आहे ना? आई, तशी का बोलत होती?"
"शितल, तू सकाळी मेडिकलवर गेली होती? कोणत्या गोळ्या घेतल्या?"
"मेडिकलवर मी? गोळ्या?"
"खरे सांग. तू औषधाच्या दुकानात गेली नाहीस ?"
"नाही ग..."
"मग तू डेलीची गोळी कुठून घेतलीस?"
"डेलीची गोळी? आई, हा काय प्रकार आहे?"
"अजून मलाच विचारतेस? अग, सकाळी फोनवर बोलताना तू.....डेली...असे म्हणाली ना?"
"फोनवर? डेली? हां...हां.... आई, अग, बसमध्ये भरपूर गर्दी होती. शिवाय तो पोरगा नवीन होता. दररोज जा -ये करणारास फक्त वीस रुपये द्यावे लागतात. त्यास डेली म्हणजे 'रोजचा प्रवासी' असे सांगावे लागते....."
"शितल, तुझ्या याच डेली या शब्दानेच सारा घोळ केला. त्यातच तू राहतेस त्या शहरातील बातमीने तेल टाकले. तुझ्या आईला वाटले..." असे म्हणत भांडेंनी झाला प्रकार थोडक्यात शितलला सांगितला. तो ऐकून शितल तक्रारीच्या आवाजात म्हणाली,
"आई, काय हे? हेच ओळखले मला? तुझा तुझ्या मुलीवर .....त्यापेक्षा स्वतःच्या संस्कारावर विश्वास नाही का ग? अशी ग कशी आई तू?"
"मी आहे ती अशी आहे. तुम्ही आजकालची पोरं थोडे स्पष्ट बोलत जा बाई.'रोज जाणे येणे करणारी' असे त्या पोराला स्पष्ट सांगता येत नाही? काय तर म्हणे डेली! जाऊ दे आता. संध्याकाळी बोलूया. अजून जेवले नाही मी. तुझ्या बाबांनी डबा खाल्लाच नसेल. ठेवते." म्हणत शितलच्या आईने फोन बंद केला आणि पतीकडे न पाहता स्वयंपाक घराकडे निघाल्याचे पाहून भांडेंनी विचारले,
"अहो, भांडेबाई, हे डेली काय असते ग? आणू का? तू घेशील का?"
ते ऐकून नवऱ्याला अंगठा दाखवत त्या स्वयंपाकासाठी सज्ज झाल्या.........