Nagesh S Shewalkar

Comedy

3  

Nagesh S Shewalkar

Comedy

भेटूया... पाच वर्षांनी...!

भेटूया... पाच वर्षांनी...!

4 mins
144


       दुपारची वेळ होती. नानासाहेब वामकुक्षीची तयारी करत असताना पत्नीला म्हणाले,

"आज वामकुक्षी नाही तर चक्क ढाराढूर झोपणार आहे. काल दिवसभर टीव्हीसमोर बसून निवडणुकांचे निकाल बघत होतो. अंग नुसतं ठणकतंय, डोकं बधीर झालंय..."

"नाही तरी म्हणायला वामकुक्षी असते, तुम्ही चक्क तासभर तर कधी दोन घंटे आराम करीत असता तुमच्या घोरण्यामुळे मला एक क्षणभरही झोप लागत नाही अन म्हणे वामकुक्षी!..." पत्नी बोलत असताना अचानक शेजारच्या इमारतीमधून जोराची बोलणी ऐकायला येऊ लागली. नानासाहेबांनी बाल्कनीच्या खिडकीतून डोकावून पाहिले आणि त्यांच्याकडे पाहत असलेल्या पत्नीकडे बघून म्हणाले,

"बहुतेक निवडणुकीत पडलेल्या उमेदवारांचे कार्यकर्ते आलेले आहेत...."

"आता कशासाठी आले म्हणायचे? मतदान झाले, मतमोजणी झाली. संपला संबंध..."

"आता तसे होत नाही. कथा संबंध आता सुरू होतोय, कुणाला किती रक्कम दिली, त्यांची मतं आपल्याला मिळाली का नाही ह्याचे सर्वेक्षण होते आणि पैसे घेऊनही मतदान न केलेल्या मतदारांकडे हे कार्यकर्ते मतं देण्यासाठी दिलेली रक्कम परत मागायला आले आहेत."

"म्हणजे त्या इमारतीमधील लोकांनी चक्क मतं विकली होती? अहो,‌ अशी किती रक्कम दिली असणार नि दिलेली रक्कम का जन्मभर पुरणार आहे? इथे जन्मभर केलेली कमाई पुरत नाही.‌ काय बाई लोकं असतात. मतं विकणं म्हणजे प्रामाणिकपणा विकणं, लोकशाहीशी विश्वासघात करणं होय..."

"तुझं बरोबर आहे. आजकाल प्रामाणिकपणा, विश्वास ह्या गोष्टी कशाशी खातात हेच लोकांना माहिती नाही. मतं विकणं म्हणजे दुकानातून सामान खरेदी करण्यासारखे सोपे वाटते यांना..."

"त्यांचा लिलाव करून किती पैसे मिळाले असतील असे?"

"अगं ते काय किराणाचं दुकान आहे का? भावफलक लिहिल्याप्रमाणे मताची किंमत ठरवावी त्याप्रमाणे! घरात मतदार किती आहेत त्यानुसार सौदा होतो मतांचा!एका मतासाठी चक्क पन्नास हजार ते एक लाख रुपयांची बोली लागते."

"बाप रे! आपल्या इमारतीतील लोक प्रामाणिक आहेत म्हणून बरे नाही तर आपल्याही इमारतीच्या भिंती काळवंडल्या असत्या... "

"किती भोळी आहेस तू? अगं,‌ इमारतीच्या लोकांचे सोड,‌आपल्या शेजाऱ्यांनी किती हात धुऊन घेतले ते तुला ठाऊक आहे का?"

"म्हणजे? धुतल्या तांदुळाचा आव आणणारे,‌भ्रष्टाचाराविरूद्ध बेंबीच्या देठापासून ओरडणारांचे दाखवायचे दात वेगळेच आहेत का?"

"तर मग! नक्की माहिती नाही पण वाहत्या गंगेत त्यांनी केवळ हातच धुतले असे नाही तर चक्क आंघोळ केलीय... दारी आलेल्या गंगेत डुबक्या मारल्या आहेत..."

"दिसतं तसं नसतं म्हणतात याची प्रचिती अशावेळी येते. थांबा हं... घरात आईवडील, मुलगा, सून, सुनेचा भाऊ नि बहीण इथेच राहतात. मतदान केल्यानंतर तोंड काळे... चुकलं! अहो,‌ शाई लावलेली बोटं दाखवत सेल्फी टाकली होती. त्यावेळी त्या पोट्टीने असा चेहरा केला होता ना, मला तर किळसच येत होती आणि हो त्यांचा बारका लाडला मिळून सात जण..." म्हणत त्यांची पत्नी हाताच्या बोटावर त्या घरातील मतदार मोजत असताना नानासाहेब म्हणाले,

"वेडी का खुळी तू? अगं,तो मुलगा केवढा आणि त्याला मतदान कसे करता येईल?"

"अहो, आता काहीही होत आहे. मृत माणसाचे, बाहेर गावी गेलेल्या मतदारांचे मतदान होत असते. आणि परवा त्या तुमच्या लेखकमित्राने लहान मुलाने मतदान केल्याची कथा वर्तमानपत्रात टाकली होती...."

"अगं, तो एक छानसा विनोद होता..."

"मला कळतो विनोद ! आपण त्यांचे अभिनंदनही केले होते. पण त्या कथेतला विनोद अशा बेईमान कुटुंबाने वास्तवात आणला नसावा कशावरून?..."

"पॉइंट है बॉस! असेही होऊ शकते.‌ काल झाले नाही तरी आज-उद्या होऊ शकते..."

"माझ्या बोलण्यात नेहमीच पॉइंट असतो पण तुम्ही माझे बोलणे मान्य कराल तर ना..."

"ते जाऊ दे. तुला पुढील बातमी सांगू का... त्यांनी केवळ एकाच पक्षाकडून नाही तर चार पक्षाच्या उमेदवारांना स्वतःची मतं विकली आहेत. समजलं?"

"काय पण माणसं आहेत बाई. ही माणसं मतं नाही तर स्वतःचं इमान विकत असतात..." नानासाहेब बोलत असताना तो घोळका त्यांच्या दारासमोर येताच पत्नीने नानांकडे शंकायुक्त नजरेने पाहिले. तिची नजर जणू त्यांना विचारत होती,'अहो, तुम्हीपण?'

   नानांनी दार उघडले. समोर बघतात तर जिंकलेला उमेदवार हात जोडून उभा होता. ते पाहून नानासाहेब म्हणाले,

"अहो, निवडणुकीचा प्रचार झाला, मतदान झाले, तुम्ही भरघोस मतांनी निवडून आलात... मतं विकत घेऊन जिंकलात असं मी म्हणणार नाही. सालाबादप्रमाणे कुणी ईव्हीएमवर आक्षेप घेऊन न्यायालयाच्या माध्यमातून झालेली निवडणूक रद्द करून पुन्हा निवडणुकीचा आदेश तर दिला नाही ना?"

"अहो, किती पैसे वाटले हो तुम्ही? गेली ना ती रक्कम पाण्यात? आता पुन्हा वाटणार का पैसे? तसे असेल तर यावेळी आम्ही फुकटात मतदान करणार नाही. थांबा हो. तुमचा प्रामाणिकपणा कपाटात बंद करून ठेवा..."

"काकू, थांबा. तसे काही नाही. मी जिंकलोय. तुम्ही अमूल्य मतं माझ्या पदरात टाकून विजयी केल्याबद्दल धन्यवाद! आभारी आहे!! तुमची मतं खरेच बहुमोल, प्रामाणिक, सचोटीची आहेत आहेत. तुमच्या या वाक्याने माझे डोळे उघडले. तुमच्या सारखी माणसं आहेत म्हणून लोकशाही जिवंत आहे. इच्छा नसतानाही काही गोष्टी नाइलाजाने कराव्या लागतात.‌ ठीक आहे. बरंय, भेटूया पुन्हा पुढील निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी..." नानासाहेब त्याच्याकडे आश्चर्याने पाहत असताना तो पुढे म्हणाला, "काका, असं काय बघता? अहो, आपल्याकडे ती प्रथाच आहे ना, एकदा निवडून आले की, पुन्हा पुढल्या निवडणुकीपर्यंत मतदारांकडे फिरकायचे नाही ही. मी तरी आभार मानायला आलोय. तुम्ही एवढ्या निवडणुका पाहिल्या पण आत्तापर्यंत निवडून आलेला उमेदवार कधी आभार मानायला आलाय का? तेव्हा येतो पाच वर्षांनंतर.... मला पुन्हा तिकीट मिळाले तर? चला रे..." असे म्हणत तो घोळका निघून गेला...

   नानासाहेब विस्मयचकित होऊन तिकडे बघत राहिले...

              ००००


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy