Nagesh S Shewalkar

Comedy

3  

Nagesh S Shewalkar

Comedy

दाम से का जान से

दाम से का जान से

12 mins
127


     सकाळची आठ-साडेआठची वेळ होती. गावाच्या नाक्यावर असलेल्या त्या कळकट हॉटेलमध्ये गावातील बरेच लोक भजे, खिचडी,पोहे अशा नानाविध पदार्थासोबत चहाचा आस्वाद घेताना हॉटेलमध्ये असलेल्या दोन वर्तमानपत्रांच्या पाना-पानांचे वाचन करीत होते. काही लोक त्यांतील बातम्यांवर चर्चा करीत होते. त्यात राजकारण, कर्जमाफी, क्रिकेट, सिनेमा इत्यादी बाबीवर वाद-संवाद घडत होते.

    सदोबा, विठोबा आणि पांडोबा हे बेकार नि टुकार त्रिकुट हॉटेलबाहेर असलेल्या बाकड्यावर बसून होते. आशाळभूत नजरेने इतरांच्या हातातल्या वर्तमानपत्रांकडे पाहताना ते आपणास कधी मिळेल याची वाट पाहात होते. तिघेही बेकार असल्यामुळे चहा-फराळ ही गोष्ट त्यांच्या 'बस की बात' नव्हती परंतु बिचारे तिघेही न चुकता दररोज सकाळी तिथे येत असत. मिळेल तसं वर्तमानपत्राचं एक एक पान घेऊन वाचत आणि त्यावर चर्चाही करत. 'इंतजार का फल मीठा होता है।' या उक्तीप्रमाणे तब्बल तासाभराच्या प्रतिक्षेनंतर एक पान रिकामे दिसताच विठोबाने त्यावर झडप घालून ते घेतले. तिघांचे हात त्या वर्तमानपत्रास लागले. तिघेही डोळे फाडून त्या पानावरील बातम्यांवर नजर फिरवू लागले. त्यासाठी पेपरची ओढाताण करताना ते पान फाटू नये याची काळजी घेत होते.

"अरे, वाचली का रे ही बातमी?" हर्षवायू झाल्याप्रमाणे अचानक पांडोबाने विचारले.

"काय? कोणती?"

"अरे, दामसे बंधूचा नवीन सिनेमा आलाय."

"हत्तीच्या! त्यात एवढा कसला आनंद?"

"अरे, हा सिनेमा म्हणे एकदम हॉरर आहे."

"त्यात काय नवल? हॉरर सिनेमा काढावा तो दामसेंनीच! तीच तर त्यांची ओळख, खासियत आहे."

"ते झालं रे पण त्यांनी एक ऑफर दिलीय."

"ऑफर? कोणती?"

"जो कुणी त्यांचा नवा 'जान से' हा सिनेमा मध्यरात्री बारा ते तीन या वेळेत एकटा पाहिल..."

"काय? एकटा? घरी सिडीवर?"

"नाही रे. थिएटरमध्ये..."

"बाऽप रे, बाऽप! हॉरर सिनेमा? थिएटरात? एकट्याने पाहायचा? नाही रे बाबा! ऐकूनच माझं अंग थरथरतेय."

"अरे, बक्षिसाची रक्कम ऐकशील तर आनंदाचे उड्या मारशील."

"पांड्या, काय आहे रे बक्षीस?"

"पंचवीस कोटी...."

"क..क..प..पं.च..वी..स."म्हणत विठोबा खाली कोसळता-कोसळता वाचला.

"खरेच का रे?"सदोबाने विचारले.

"का रे, काय झालं?" एका व्यक्तिने विचारले.

"काय बातमी आहे रे?" दुसऱ्याने प्रश्न केला.

"काही नाही हो काका. सिनेमाची बातमी आहे."

"एखाद्या हिरोनीचा नागडा फोटो आला असेल. म्हणूनच लाळ गाळीत पाहताहेत.'

"काही तरी काम करा रे."

"मायबापाच्या जीवावर तुकडे मोडून हे असं डोळे फाडून नंगे फोटो पाहणं सोडा रे." हॉटेलमध्ये बसलेले लोक त्या तिघांना हिणवत असताना तिघांनी एकमेकांना नेत्रपल्लवी केली. पेपरचे ते पान गुंडाळून घेत त्यांनी तिथून काढता पाय घेतला आणि तिघेही गावाबाहेर असलेल्या शाळेच्या मैदानात आले.

"खरेच का रे तशी बातमी आहे?" सदोबाने विचारले तसे विठोबाने पांडोबाच्या हातातून पान हिसकावून घेतले. ती बातमी तिघांनाच ऐकू जाईल अशा आवाजात वाचायला सुरूवात केली. बातमी ऐकून सदोबा म्हणाला,

"खरेच डेअरिंग को किमत है। कोई माई का लाल?"

"कुणी का? तुझ्यात नाही हिंमत?"

"नाही बुवा! रात्री बारानंतर संडास आली तरी आपण घराबाहेर पडत नाही. तेवढ्या मोठ्या अंधारात एकटा आणि तोही भूताचा सिनेमा पाहू? छे! मला तरी शक्य नाही."

"मलाही जमायंच नाही रे बाबा. आपण सगळ्याच प्रकारचे सिनेमा पाहिले पण अशी हिंमत? असं कर ना पांड्या, तू का नाही करीत धाडस?"

"खरेच की. पांडोबा, तू अशा डेयरिंगच्या अनेक पैजा जिंकल्या आहेस."

"मागे एकदा रात्री बारा वाजता एकटा गावातून इथे शाळेपर्यंत चालत आला होतास आणि चहाच्या कपाची शर्यंत जिंकला होतास."

"शिवाय आम्ही मित्रांनी हरबऱ्याच्या झाडावर चढवला नि तू कुस्त्यांच्या दंगलीत भाग घेवून दोघा-तिघांना आस्मान दाखवून पैज जिंकला होतास की"

"पांड्या, सार गाव तुला डेयरिंगबाज पांड्या म्हणून ओळखतय. ते सिध्द कर. पांडोबा हीच आणि हीच संधी आहे. तिचे सोने कर. स्वत:चे, गावाचे आणि आमचे नाव रोशन कर. नाही. मुळीच नाही. तुला पंचवीस कोटी मिळाले तर आम्ही त्यात वाटेकरी होणार नाहीत. मात्र मनाप्रमाणे पार्टी मात्र नक्कीच घेणार! चल तर..."

"पांडोबा, खरेच तयारीला लाग. पुढे काय करायचे आहे?"

"इथे एक संपर्कासाठी नंबर दिलाय."

"मग ठीक आहे. पांडा, हा घे माझा मोबाईल. बोल त्यांच्याशी. शुभस्य शीघ्रम!"

मित्रांच्या आग्रहाखातर पांडोबाने तो क्रमांक जुळवला. खूप वेळ प्रयत्न करावा लागला शेवटी एकदा दामसेंची घंटी वाजली.

"मी पांडोबा बोलतोय. मला दामसे साहेबांशी बोलायचे आहे."

"बोला. मीच बोलतोय."

"साहेब, वर्तमानपत्रातील 'जान से' चित्रपटाबद्दलचे आपले आव्हान मी वाचले."

"मग सिनेमा पाहणार? एकट्याने?"

"विचार करतोय."

"ठीक आहे. आधी इतर अटी ऐका आणि मग निर्णय घ्या. पहिली अट, सिनेमा एकट्याने पाहावा लागेल. सिनेमा रात्री बारानंतर पाहावा लागेल. शहराची आणि टॉकीजची निवड तुम्हांस करावी लागेल. त्याचा खर्च आम्ही देवू. सिनेमागृहात तुम्हाला सोबत काहीही नेता येणार नाही. नशापाणी करून सिनेमा पाहता येणार नाही. तुम्हास काही त्रास झाला, कुठली शारीरिक हानी झाली तर त्यास आम्ही जबाबदार असणार नाहीत. प्रसंगी आणि दुर्दैवाने जीवीत्वाची जबाबदारीही तुमचीच असेल. अगोदर रीतसर बाँडपेपरवर करारपत्र केले जाईल. हे करारपत्र आणि पंचवीस कोटींचा धनादेश तुम्ही ज्या रात्री सिनेमा पाहणार त्या रात्री तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांचेकडे देण्यात येईल. करारपत्रावर आमची, तुमची, तुम्ही विवाहित असाल तर पत्नी व अपत्यांची, तुमच्या आई वडिलांची स्वाक्षरी असेल. तुम्हास काही शंका?"

"आपण सारे सविस्तर सांगितलंय. शंका नाही परंतु सिनेमा सुरू झाल्यानंतर कुणी ही मला डिस्टर्ब करू नये. माझे काय झाले? मी काय करतोय? अशा उत्सुकतेपोटी लाईट लावणे, दार उघडून पाहणे अशा गोष्टी करू नये. बारा वाजता सुरू झालेला सिनेमा संपताच पुन्हा डबल रिपीट करावा लागेल. म्हणजे मी रात्री बारा वाजता थिएटरात शिरल्यानंतर सकाळी सहा वाजताच बाहेर येईन. एकदा का मी खुर्चीवर बसलो, की रात्रभर बसून राहीन. बारा ते तीन हा सिनेमा संपल्यानंतर माझी इच्छा झाल्यास मी केव्हाही बाहेर येईन. त्यावर तुमचा आक्षेप असण्याचे कारण नाही. मी आतमध्ये असेपर्यंत तुम्हास, वर्तमानपत्रवाल्यास आणि वाहिनीवाल्यांना फोटो, शुटींग करता येणार नाही."

"वा! भई, वा! तुम आदमी हिम्मतवाले लगते हो। तुमच्याही अटी आम्हाला मान्य आहेत. तुम्हाला तुमच्या म्हणण्याप्रमाणे दोन शो दाखविण्यात येतील. मात्र इनाम एकाच शोचे म्हणजे पंचवीस कोटी असेल, ठीक आहे. आमचा पत्ता लिहून घ्या आणि परवा दुपारी भेटायला या." असे सांगून दामसेंनी फोन ठेवला.

"अरे...अरे... पांड्या, हे-हे-तू काय केलं?"

"अरे, पांडा, आम्ही तुझी गंमत करीत होतो."

"पुन्हा एकदा विचार कर बाबा."

तू करायला जाशील एक, होईल दुसरेच आणि त्यामागे आमचाच हात आहे, आम्हीच तुला प्रेरित केलं..."

"असं कांहीही होणार नाही. बघा तर. मी-मी पंचवीस कोटींचा मालक होईल..."

"तेंव्हा आपल्या मित्रांना विसरू नकोस..."

"सध्या ही गोष्ट आपल्या तिघातच ठेवा. अगदी कुणाच्याही घरीसुध्दा कळायला नको."

"ठीक आहे."

      नोकरीच्या कामाचे निमित्त सांगून दुसरेच दिवशी पांडोबा मुंबईला निघाला. तेंव्हा त्याचे इष्टमित्र त्याला निरोप द्यायला बस स्टँडवर हजर होते. ठरलेल्या दिवशी, ठरलेल्यावेळी पांडोबा विनासायास निर्माता दामसेंच्यासमोर हजर होता. परिचय होताच त्याच्याकडे आश्चर्याने पाहात दामसे म्हणाले,

"वा रे मेरे गबरू जवान! या वयात तू करू पाहणाऱ्या धाडसाला माझा सलाम. फोनवर सर्व गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. का पुन्हा चर्चा करायची?"

"नाही. गरज नाही. मी सांगितलेल्या गोष्टी.."

"मान्य आहेत. दोन्ही बाजुंच्या अटी असलेले हे आपले करारपत्र, अंतिम करारपत्र ठरलेल्या दिवशी तुमच्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर होईल..."म्हणत दामसेंनी करारपत्र पांडोबाकडे दिले. पांडोबाने ते काळजीपूर्वक वाचले. त्यात दिनांक, वेळ, थिएटर, गाव व दोघांमध्ये झालेल्या तोंडी चर्चेचे करारात रूपांतर केलेले होते. पांडोबाने त्या दोन्ही प्रतींवर स्वाक्षऱ्या केल्या. नंतर दामसे यांनी स्वाक्षऱ्या करून एक प्रत पांडोबाकडे दिली. त्यावेळी फोटोही घेण्यात आले, शुटिंगही झाले...

      त्याच रात्री मुंबईहून निघालेला पांडोबा दुसऱ्या दिवशी सकाळी-सकाळी गावी पोहचला. त्याच्यामध्ये आणि दामसे यांच्यामध्ये झालेला करार विविध वाहिन्यांच्या माध्यमातून संपूर्ण राज्यासह त्याच्या गावी, घरी पोहचला होता. तो गावाच्या थांब्यावर उतरला तेव्हा जणू सारा गाव त्याच्या स्वागताला हजर असल्याप्रमाणे जमा झाला होता. त्यात सदोबा, विठोबा आणि पांडोबाचे आईवडिलही होते. वाहिन्यांनी तो करार वारंवार दाखवितांना जान से चित्रपटातील अनेक भयानक प्रसंगाचे रवंथही केले होते. ते पाहन मी-मी म्हणणारांचे कपडे ओले झाले. अनेकांनी भीतीमुळे दूरदर्शन संच बंद केले होते. कैकांची बोबडी वळली होती. ते प्रसंग पाहून पांडोबाचे कुटुंबही भयभीत झाले होते. त्याच्या आईने रडूनरडून आकाशपाताळ एक केले होते. पांडोबा बसमधून उतरलेला दिसताच त्याच्या मातेने त्याला अगोदर कवटाळले. त्याच्या कपाळाची, गालांची मुके घेत ती म्हणाली,

"प-प- पांडा, ही काय अवदसा आठवली रे बाळा? आपण काय ऊपाशी आहोत का रे? चटणी भाकरी खाऊन सुखात होतो ना? चल. चल. अगोदर तो कोण दामसे नावाचा यमदूत आहे ना, त्याला फोन कर आणि सांग, म्हणावं तुझा पैसा तुला लखलाभ. आम्हाला तो हरामाचा पैसा नको."

"पोरा, असं का केलस रे? अगोदर आम्हाला विचारावं तर खरे. नोकरीचे खोटे कारण सांगून मुंबईला धडकलास आणि भलतेच करून बसलास." त्याचे वडील म्हणाले.

"एकुलत एक पोरग नि अस जीवाशी खेळतय."

"काय पण डेअरिंग म्हणावी."

"बघा ना. बरोबर मिसुरडं फुटल नाही तर अशी हिंमत?"

"एक सांगू का, असेच धाडसी पोट्टे पुढे जातात हो."

"ते मात्र आहे. तीन तास बसून पंचवीस कोटी..."

"तीन तास? एकटं? अंधारात? तेवढ्या मोठ्या टॉकीजमध्ये? समोर भयानक सिनेमा, स्मशान शांतता असताना? शक्यच नाही."

"मनात आणले ना तर अशक्य काहीच नाही."

"पाच मिनिटात ओरडत बाहेर येईल बघा."

"कदाचित खुर्चीतच बेशुद्ध पडेल.."

"ओरडत बाहेर आलं, बेशुध्द झालं तर एक वेळ ठीक आहे. पण भीतीने गाळण उडाली नि झाला हार्ट फेल..."

"शुभ बोल रे नाच्या! आपल्याला काय घेणं-देणं."

"एक झाल मात्र... त्याचं होईल काहीही पण काल रात्रीपासून त्याचे आणि त्याच्यामुळे आपल्या गावाचे नाव मात्र जगभर झालेय."

"हे मात्र झालय." एक ना अनेक. व्यक्ती तितके बोल!

     पांडोबा कुटुंबासह, मित्रांसोबत घराकडे निघाला. एक-एक पांगले. दोन्ही मित्र त्याच्याजवळ थोडा वेळ थांबून घरी गेले. जेवतानाही त्याच्या आईवडिलांनी भरपूर समजावले. परंतु पांडोबा निश्चयापासून तसूभरही ढळला नाही. जेवण होताच तो पलंगावर पडला. क्षण-दोन क्षणात त्याला झोपही लागली. मध्येच केंव्हा तरी कशाच्या तरी आवाजाने त्याला जाग आली. डोळे न उघडता त्याने अंदाज घेतला. त्याच्या दोन्ही बहिणी पोहचल्या होत्या.

“आई, पांड्या कुठाय?"

"तो बघ, दोन घास खाऊन झोपलाय."

"बाबा, मला एक सांगा, तुम्ही त्याला परवानगी कशी दिली?"

"त्याने आम्हाला विचारलेच कुठे? सगळं परस्पर ठरवून मोकळा झालाय. नोकरी शोधायला जातो असा बहाणा करून गेला. आम्हालाही टि.व्ही.वरच समजले."

"लहानपणापासूनच विचित्र आहे पोरं..." म्हणत त्याची बहीण पलंगाजवळ गेली त्याच्या केसावरून हात फिरवत म्हणाली, "आई, तुला आठवते का ग, पांडा तिसऱ्या वर्गात शिकत असताना, शाळेतून येताना कुणी तरी माणूस विस्तवावरून चालताना पाहून आला. दुपारी आपण सारे जेवत असल्याचं बघून चुलीतल्या जळत्या लाकडाचे निखारे अंगणात पसरवून त्यावरून पळत गेलं..."

"आणि भाजल्यामुळे आठ दिवस घरात बसून होतं."

"ते-ते... मास्तर..."

"ताई, अग आठवते ग. मित्रा- मित्रांच्या शर्यतीत या गाढवाने चक्क मास्तरांच्याच कानाखाली आवाज काढला. मग निसतरता-निसतरता बाबांच्या नाकीनऊ आले."

"अग पण त्यातून काही शिकलं का? हे नवीन सोंग जीवावर बेतलं म्हणजे?"

"काही बेतणार नाही, काही नाही. मीही शर्यत जिंकणार म्हणजे जिंकणारच."

"म्हणजे? तुझा बेत बदलला नाही?" बाबांनी विचारले.

"नाही! आणि बदलणारही नाही. तुम्हाला माझ्या मरणाची भीती वाटतेय ना तर मग ऐका, तुम्ही जर मला हा सिनेमा पाहू दिला नाही ना...तर...तर मी माझ्या जीवाचं..."

"नाऽही. असं काही भलतसलत बोलू नको रे..."

   दुसऱ्या दिवसापासून 'ए' वाहिनीपासून ते 'झेड' वाहिनीवाले सारे एकेकाने येऊन पांडोबाला तेच तेच प्रश्न विचारत होते.

"पांडोबा, अभिनंदन! एवढ्या लहानवयात एवढ मोठ्ठ धाडस?"

"प्रयत्न करायचं ठरवलय."

"यामागे स्फूर्ती कुणाची?"

"तशी कुणाचीच नाही. लहानपणापासूनच इतरांपेक्षा काही वेगळं करण्याचा स्वभाव आहे माझा."

"पण डायरेक्ट असे धाडस?"

"वर्तमानपत्रात जाहिरात वाचली आणि दुसऱ्याच क्षणी वाटलं, अरे, हे धाडस आपण करू शकतो."

"का पंचवीस कोटीचा मोह झाला?"

"पैशाचा मोह कुणाला नाही हो! मॅडम, बघा तुमच्या कानातलं खाली पडलंय..." पांडोबा म्हणाला तशी ती पोरगी हातातला माईक सोडून खाली वाकली. तसा पांडोबा पुढे म्हणाला, "बघा, मॅडम याला म्हणतात मोह. कानात नसणाऱ्या सोन्याच्या मोहात तुम्ही पडलात त्यावेळी हेही विसरलात की, तुमच्या कानाच्या पाळ्यांना छिद्रच नाही..." ती बाई लाजेने पाणी-पाणी होत मुलाखत अर्धवट सोडून पळाली...

     सत्कार स्वीकारत, मुलाखत देत अखेर त्या दिव्याचा दिवस उजाडला. अगोदरच्या रात्री तो नेहमीप्रमाणे शांत झोपला. घरी वीस-पंचवीस पाहुणे मुक्कामी होते. प्रत्येक जण आपापल्या परीने पांडोबास त्या कृत्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करीत होता. परंतु त्याने कुणाचीही डाळ शिजू दिली नाही. जमलेली सारी मंडळी त्याच्यासोबत शहरात येणार होती त्यामुळे पांडोबाच्या वडिलांनी एक ट्रॅव्हल बस ठरवली. जाण्यापूर्वी ग्रामपंचायतीच्यावतीने पांडोबाचा सत्कार केला. गावातले सारे आबालवृध्द त्याला निरोप द्यायला जमले होते. सर्वांचा निरोप घेवून पांडोबा सहकुटुंब-नातलगासह बसमध्ये बसला आणि बसने शहराकडे प्रयाण केले. दोन तासांच्या प्रवासानंतर त्यांची बस दामसेंनी व्यवस्था केलेल्या हॉटेलमध्ये शिरली. तिथे हॉटेलतर्फे, दामसे यांनी पांडोबाचा सत्कार केला. सर्वच वाहिन्यांनी लगोलग 'लाईव' सुरू केले. बरोबर पाच वाजता दामसे, पांडोबा, पांडोबाचे वकील, आई-वडील आणि दोन्ही बहिणी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले. तिथे रीतसर अंतिम करारपत्रावर सर्वांच्या स्वाक्षऱ्या झाल्या. करारपत्र आणि पंचवीस कोटींचा धनादेश जिल्हाधिकारी यांचेकडे जमा करण्यात आला. बरोबर रात्रीच्या अकरा वाजता पांडोबा त्या लवाजम्यासह थिएटरमध्ये पोहचला. तिथेही प्रेक्षकांची प्रचंड गर्दी होती. अनेकांनी पुष्पहाराने पांडोबाचे स्वागत केले. अकरा-वाजून पन्नास मिनिटांनी पांडोबाने सर्वांसोबत चहा घेतला. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. मोठ्या माणसांचे चरण स्पर्श करून, समवयस्क, मित्रांशी हस्तांदोलन करून तो टॉकीजमध्ये शिरला. टॉकीजचे मालक, दामसे पांडोबासोबत निघाले. शेवटच्या क्षणी त्या दोघांना करंगळी दाखवत तो स्वच्छतागृहात गेला. फ्रेश होवून दोन मिनिटात तो परत आला.

"यंग मॅन, अनेक शुभेच्छा! बघ, शेवटची संधी आहे. परत फिर." दामसे म्हणाले. पण स्मितहास्य करीत व त्यांना 'विजयाची 'दोन बोटे दाखवत तो आत शिरला. पाच-सहा मिनिटे 'न्यूज रिल' झाले पांडोबाच्या सूचनेवरून राष्ट्रगीत झाले. अंधार झाला, काळाकुट्ट नि घनघोर! दुसऱ्याच क्षणी सुरू झाला, बहुचर्चित, महाभयानक 'जान से' हा चित्रपट...

     सिनेमागृहाबाहेर बघ्यांची प्रचंड गर्दी होती. ज्या दारातून पांडोबा भीतिमुळे चित्रपट अर्धवट सोडून कोणत्याही क्षणी बाहेर येण्याची शक्यता होती. त्या दिशेने कॅमेरे सरसावून पत्रकार बसले होते. भीतिने गारठलेला, बोबडी वळलेला पांडोबा कधी बाहेर येतो आणि त्याचा तो चेहरा कधी आपल्या प्रेक्षकांना आधी दाखवितो अशा अगतिक अवस्थेत ते पांडोबाच्या प्रतिक्षेत होते तर दुसरीकडे प्रत्येक वाहिनी पांडोबा हॉटेलमधून बाहेर पडल्यापासून ते सिनेमागृहात जाण्यापर्यंतचे तेच-तेच चित्रीकरण सातत्याने दाखवित होते. शिवाय सिनेमा गृहाबाहेर चिंताक्रांत असलेल्या पांडोबाच्या आईवडिलांची, बहिणींची, मित्रांच्या आणि तिथे उपस्थित असलेल्या पांडोबाला न ओळखणाऱ्या प्रेक्षकांच्या त्याच-त्याच मुलाखती शेकडो वेळा दाखविणे चालू होते...

     शेवटी रात्रीचे तीन वाजले. पहिला शो संपला. पांडोबा ज्या अर्थी बाहेर आला नाही त्या अर्थी तो जिंकला असे समजून जल्लोष केला.त्याच्या जीवित्वाची आलेली पुसटशी शंका सर्वांनी अगदी वाहिनीवाल्यांनी दाबून टाकली. वाहिनीवाले, अनेक प्रेक्षक पांडोबाची भेट घेण्यासाठी गडबड करू लागले. परंतु प्रवेशव्दारावर मोठ्या दर्जाचा पोलीस अधिकारी आणि काही हत्यारबंद पोलीस त्यांच्या प्रयत्नास दाद वा परवानगी देत नव्हते तिकडे वाहिनीवाल्यानी मात्र पांडोबा जिंकल्याचा जणू यज्ञ सुरू केला. विविध क्षणचित्रे, त्याच मुलाखतींची पुन्हा आवर्तने सुरू झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वा सहा वाजता स्वत: जिल्हाधिकारी, तज्ञ डॉक्टर यांच्यासह दामसे सिनेमागृहात पोहचले. आतले सारे लाईट प्रकाशमान झाले होते. आत शिरल्याबरोबर सर्वांची शोधक नजर एका खुर्चीवर स्थिरावली. त्या खुर्चीवर पांडोबा मागे मान टेकवून बसलेला दिसताच डॉक्टर त्याच्याजवळ पोहचले. त्याच्या नाकासमोर,कपाळावर हात ठेवून त्यांनी पांडोबाची नाडी तपासली आणि ते ओरडले,

"साहेब... साहेब..."

"काय झालं?" वेगळ्याच शंकेने सर्वांनी विचारले.

"सर-सर...ही इज....ऑल राईट!"

"काऽय?" काय असे विचारत दामसेंनी पांडोबाला गदगदा हलवले. कांही क्षणात पांडोबाने डोळे उघडले. ती गर्दी पाहून दुसऱ्याच क्षणी तो म्हणाला, "बाप रे! काय भयानक नि भयावह सिनेमा आहे हो. पण मी जिंकलो..."

"हो-होय, यंग मॅन! यु हॅव डन ईट! अभिनंदन!" तिथे उपस्थित सर्वांनी त्याचे अभिनंदन केले. तितक्यात त्याला काही तरी आठवले. सर्वांना बाजूला सारत तो पळत बाहेर आला. आई-बाबा-बहिणींच्या पाया पडला...

      काही वेळात त्याच सिनेमागृहात पांडोबाचा भव्य सत्कार करून त्याला तो पंचवीस कोटी रूपयांचा धनादेश देण्यात आला. अनेकांची भाषणे झाली. त्या सिनेमागृहाचा चालक म्हणाला,

"या आगळ्यावेगळ्या पैजेमुळे पांडोबा साहेबांसोबत माझ्याही टॉकिजचे नाव सर्वत्र झाले. त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो, की मी लगेच हा शो पुन्हा टाकतोय. सर्वांनी अगदी पांडोबानेही तो पाहावा..." काही मिनिटातच पुन्हा तो शो सुरू झाला. त्या चित्रपटातील एका पेक्षा एक भयानक दृश्ये पाहून अनेकांना कापरे भरले. भीतिने अंगावर काटा आला. बोबडी वळली. तितक्यात

"ना ही. नाऽ ही. हा सिनेमा मी पाहू शकत नाही...."असे ओरडत एक युवक पळतच सिनेमागृहाच्या बाहेर पडला... तो पांडोबा होता. त्याच्या मागोमाग सारे बाहेर पडले. शो बंद पडला. भीतिने थरथरणाऱ्या पांडोबाने तिथे जमलेल्या सर्वांचा निरोप घेऊन बसमध्ये प्रवेश केला.

    बसने शहर सोडताच विठोबाने विचारले, "खरेच काल रात्री तुला भीती नाही वाटली रे? आत्ताच वाटली कशी?"

"पूर्ण सिनेमा पाहायला किंवा भीती वाटायला मी काल रात्री जागाच कुठे होतो?"

"म्हणजे? तू झोपला होतास?"

"होय. एकदम गाढ!"

"पण....दामसे..आणि इतर..."

"त्यांना काय कळणार? शिवाय करारपत्रांमध्ये झोपायचे नाही अशी अट होती काय? नाही."

"पण अशा महाहॉरर सिनेमाची आत्ता वाटली तशी भीती वाटायची सोडून तू चक्क झोपलास कसा? म्हणजे तुला झोप लागलीच कशी?"

"हे बघा, अगदी शेवटच्या क्षणी बाथरूमला जायची दामसेंकडून परवानगी घेवून स्वच्छतागृहात गेलो. सोबत पटकन झोप लागेल अशी एक जालीम गोळी होती. शर्टच्या शिवणावळीत लपवलेली ती गोळी तिथेच गिळली. आत गेलो. न्यूज रिलनंतर माझ्याच सूचनेवरून राष्ट्रगीत लागले. ते ऐकताना माझ्या शरीरात वेगळाच उत्साह संचारला. भारत मातेचा जयजयकार करून मी खुर्चीवर बसलो. त्याक्षणी लावलेला डोळा आज सकाळी सकाळीच उघडला... मात्र आत्ता सिनेमा पाहताना जाम घाबरलो रे. काय भयानक सिनेमा आहे रे..." म्हणत पांडोबाने धनादेशावरील पंचवीस कोटी' ही अक्षरी रक्कम वाचताना पंचवीसच्या अंकापुढील शून्याची संख्या मोजली...

                                                          


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy