मैत्रेय ( पत्र-प्रपंच )
मैत्रेय ( पत्र-प्रपंच )
हि कथा १९८४-८५ च्या आसपासची. विशीतील तरुण चाळकरी मित्रांची. तेव्हा लोकांची मनोरंजन आणि आनंद मिळवण्यासाठीची साधने मर्यादित होती. हॉटेलात मिसळ-पाव, पियुष किंवा आईसक्रिम हादडणे हीच मोठी पार्टी असायची. तेव्हा दुरदर्शन रंगीत तर झाला होता पण चाळीतील सर्वसामान्य लोकांसाठी कृष्णधवल स्वरुपातच होता. ही कथा आहे तेव्हाची. . .
त्यावेळेला दर सोमवारी दुरदर्शनवर रात्री दहाला डिटेक्टिव सिरियल प्रक्षेपित होई. पहिल्या भागात रहस्यमयरित्या झालेला खुन दाखवला जाई आणि खुनी कोण ते पुढच्या भागात म्हणजे पुढच्या सोमवारी दाखवले जाई. पहिल्या भागाच्या शेवटीशेवटी, खुनी ओळखून त्याचं नाव लिहून आमच्याकडे पाठवा, असं प्रेक्षकांना आवाहन केले जाई आणि पाठवणार्याला मालिकेच्या निर्मात्यांकडून भेटवस्तू दिली जाईल अशी जाहिरात केली जात असे.
पहिला एपिसोड पाहील्यावर दुसर्या दिवशी संध्याकाळी गृपमधल्या तमाम मंडळींच्या शरीरात इन्स्पेक्टर झुंजारराव, धनंजय, काळा पहाड, बॅ. अमर विश्चास इ. इ. चे आत्मे प्रवेश करीत. खुनी कोण असेल यावर विवेचनात्मक चर्चासत्र सादर होई. मुद्दयांवर मुद्दे मांडले जात, आणि शेवटी एखाद-दोन नावांवर संशय व्यक्त होई. कधीकधी एखादं नाव ठामपणे निश्चित होई आणि मग पोस्ट कार्डाद्वारे उत्तर पाठवायच्या बाता केल्या जात. पण कोणीही तेवढी तसदी घेत नसे आणि गुपचूपपणे दुसर्या आठवड्याच्या एपिसोडची वाट पाहिली जाई.
अशाच संध्याकाळी कॅरम खेळतांना गप्पांही चालू होत्या. सुजयने खबर आणली की आज मंगेशच्या घरी आंतरदेशीय पत्र आलंय. बहुतेक मंग्याला (मंगेश) बक्षिस लागलं आहे. सर्वांनी सुजयला उडवून लावले, कारण मंगेशने खुनी ओळखून उत्तर पाठवलं आहे, असं कोणाच्याही ऐकण्यात नव्हतं. पण सुजय बक्षिसाचं पत्र आल्याचं ठामपणाने सांगत होता. सुजयकडे असल्या बातम्या काढण्याची मास्टरी आहे, हे सर्व मंडळींना माहिती होतं. त्यामुळे सर्वांनी त्याच्यावर तात्पुरता विश्चास ठेवला आणि मंगेशच्या येण्याची वाट पाहू लागले. थोड्या वेळाने मंग्या आला आणि पत्राबाबत आल्याआल्याच त्याने खुलासा करून टाकला. सुजयचा अंदाज खरा निघाला. मंगेशला बक्षिसच लागलं होतं. याचा अर्थ मंगेशने गुपचूप उत्तर पाठवलं होतं. सर्वांना नवलही वाटलं आणि आनंदही झाला. मंगेशने गुपचूप पोस्ट कार्ड पाठवलं म्हणून नवल आणि बक्षिस मिळालं म्हणून आनंद. सर्वांनी मंगेशचं अभिनंदन केलं आणि पार्टीची मागणी केली. मंगेशनेही आनंदाने होकार दिला. शनिवारी दुपारी १२ वाजता बक्षिस नेण्यासाठी निर्मात्याच्या ऑफिसमध्ये बोलावलं होतं. तसं ऑफिस जास्त लांब नव्हतं पण मंगेशला दांडी मारावी लागणार होती. मंगेश नोकरीबाबत फारच काटेकोर होता. तो सहसा सुट्टी घेत नसे पण आता घ्यावी लागणार होती.
ठरल्या दिवशी मंगेश निर्मात्याच्या ऑफिसमध्ये पोहचला. आपल्याकडंचं पत्र तिथल्या रिसेप्शन काउंटरला दाखवलं.
तिकडे मंग्या गेला आणि त्याच दुपारी इकडे गप्पांचा फड जमला. या चौकडीशिवाय प्रकाश, राजू, दिपक, जितू आणि इतरही हजर होते. सर्वजण केलेला प्रकार आठवून मनसोक्त हसत होते. हा मामा बनवण्याचा प्लान नेहमीप्रमाणे सुहास आणि सुजय यांचा होता. मंगेशने खुनी ओळखून निर्मात्याच्या ऑफिसला पोस्ट कार्ड टाकल्याची गोष्ट दिपक ( मंग्याचा सर्वात जवळचा मित्र ) सुहास आणि सुजयसमोर सहजच बोलून गेला आणि विसरूनही गेला. बास्स! एवढीच संधी दोघांना पुरेशी होती. संध्याकाळी दोघांनी प्लान आखायला सुरूवात केली. सर्वांत पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंगेशने ओळखलेला खुनी आणि एपिसोडमधला खुनी एकच असणं आवश्यक होतं. ते सोमवारी कळणार होतं. त्यानंतर मंग्याला बक्षिस मिळाल्याच पत्र मिळणारं होतं. गुरुवार/शुक्रवारपर्यंत मंगेशला पत्र मिळणं गरजेच होतं म्हणजे शनिवारी मंगेशचा 'मामा' होणार होता. याची सर्व तयारी त्यापुर्वीच करावी लागणार होती. . . प्लानचा पहिला भाग सुरू झाला. नितीन, रामनाथ (रामु) या दोघांनाही त्यात सामिल केलं गेलं. सुजयने आंतरदेशीय पत्र आणून नितीनला दिलं. त्याचा भाऊ बँकेत टायपिस्ट कम क्लार्क होता. त्याने ते इंग्लिशमध्ये टाईप करून आणलं. त्यांच्यात फक्त रामनाथच इंग्लिश माध्यमात शिकलेला होता. त्याने त्या पत्रावर फर्राटेदार सही केली. नकली पत्र तयार झालं. सोमवारच्या एपिसोडमध्ये मंगेशने लिहून पाठवलेलाच खुनी असल्याचं दाखवलं गेलं आणि प्लानच्या दुसर्या भागाला मुर्तस्वरुप देण्याच काम सुरू झालं. पत्र घेऊन सुहास निर्मात्याच्या ऑफिसजवळच्या पोस्टात गेला आणि त्याने ते पत्रपेटीत टाकलं. दोनतीन दिवसांत मंगेशच्या घरी पोहोचेल याची काळजी घेण्यात आली. फक्त दिप्याला या सगळ्यापासून लांब ठेवण्यात आलं. आणि या सर्व उचापतींचं फळ म्हणजे मंग्या मस्तपैकी ' मामा ' बनला होता. सर्वजण पुर्ण कहाणी आठवून आठवून हसत होते. सर्वांच्या डोकॅलिटीला सलाम करीत दिपकही त्यांच्या हसण्यात सामिल झाला होता. 'अरे किती हसाल? पुरे करा.' रामनाथ गंभीरपणे म्हणाला. सर्व रामुकडे पाहू लागताच रामुने पुस्ती जोडली, 'अरे संध्याकाळी मंग्याचा प्रचंड चिडलेला चेहरा पाहून अजून हसायचं आहे.' पुन्हा सर्व हास्यकल्लोळात बुडून गेले.
एव्हाना ही सुरस आणि विनोदी कथा कट्ट्याच्या सर्व मित्रांना कळली होती. पुढील धमाल बघण्यासाठी संध्याकाळी सर्व कट्टा फुल झाला होता. कॅरमही चालू होता. पण सर्व लक्ष मंगेशच्या येण्याकडेच होतं. नेहमीप्रमाणे मंग्या आला. पण चेहर्यावर चिडल्याचे भाव नव्हते तर निराशेचे होते. राजुने कॅरम खेळण्यासाठी त्याला जागा दिली. गप्पा सुरूच होत्या. मंगेशचा स्ट्राईकर आज जबरदस्त चालत होता. सटासट सोंगट्या मारत होता आणि बोर्ड फिनिश करत होता. कोणीतरी मुद्दामच पत्राचा, बक्षिसाचा विषय काढला. " कसलं बक्षिस! आणि कसलं काय! " मंगेशची खेळताखेळता प्रतिक्रिया. सर्वांना मनातून हसू यायला लागलं होतं. "अरे, मी तिकडे त्यांच्या वेळेला बरोबर पोहोचलो. तर माझ्यासारखेच अजून सातआठ जण ऑफिसमधे हजर." मंग्याची कॉमेंट्री सुरु झाली. इकडे सुहास, सुजय गँग चक्रावली. त्यांच्या मनात चलबिचल सुरू झाली, 'च्यायला हे काय झालं! मंग्या हे काय बोलतोय.' एकमेकांना नजरेने विचारू लागले. पण प्रत्येकाच्या चेहर्यावर भलमोठं प्रश्नचिन्ह.
"मग आम्हां सर्वांना अलिशान केबिनमधे घेऊन गेले. आमचं मस्तपैकी स्वागत केलं. एकदम भारीवालं ज्युस आणि फ्रुट-सलाड आमच्यासमोर ठेवलं. मग मॅनेजर आला. ज्युस आणि फ्रुट-सलाड घेत घेत आम्ही आणि मॅनेजरने मस्तपैकी गप्पा मारल्या. सर्वांनी सिरियलचं लेखन, दिग्दर्शन, पात्रे इ. बाबत गप्पा मारल्या. त्याच्या बोलण्यातून कळंलं की प्रेक्षकांकडून जवळपास तीनचार हजार पोस्ट कार्ड येतात. यावेळी त्यातील जवळपास साडेसातशे पत्र अचुक उत्तराची होती. पुढे तो म्हणाला, 'त्यातील दहाजणांना आम्ही इथं बोलावून बोलावून घेतलंय. नियमाप्रमाणे तीनच बक्षिसं देणार आहोत. पण दहाहीजणांच कौतुक मात्र नक्कीच करणार आहोत. सर्वांना आमच्या कंपनीकडून स्पेशल लंच दिला जाईल.' त्यानंतर लकी ड्रा काढून तीनही विजेते घोषित केले जातील. काय सांगू मित्रांनो, काय धमाल आलीय तिकडे. जबरदस्त जेवण होतं यार. शब्द कमी पडतायत वर्णन करायला. हसत खेळत लंच पार पडला आणि मग सर्वांसमक्ष लकी ड्रा काढला गेला. साल! आमचं नशीब इथं मागं पडलं. पहिल्या तिघांत नाही आलो. पण तरीही त्यांनी फुल ना फुलाची पाकळी म्हणून आम्हांला खरेदी वाऊचर दिलंय. पण आपल्याला तसलं काय आवडत नाही." मंग्याने कथा संपवली. सर्व मंडळी अवाक झाली होती. मंग्याने त्यांच्या अपेक्षित आनंदावर बर्फगार पाणी ओतलं होतं. सर्वजणांचे चेहरे काळेठिक्कर पडले होते. मंगेश बोलतोय ते खरं असेल तर आपण पाठवलं ते पत्र कुठं गेलं? आणि दुसरं पत्र त्याला कधी मिळालं? आणि त्याबाबत आपल्याला कसं नाही कळंलं? मोठं प्रश्नचिन्ह सर्वांसमोर उभं होतं. मंगेशच्या चेहर्यावरचे निरागस भाव पाहून तो खोटं बोलत असेल असं वाटत नव्हतं. पण काहीतरी मोठीच गडबड झाली होती. मंगेश तिकडच्या कार्यक्रमाचं, लंचचं रसभरित वर्णन करीत होता. पत्र पाठवायला ज्यांनी सुचवलं त्यांचे वारंवार आभार मानत होता. बोलता- बोलता त्याने खरेदी वाऊचर काढून दाखवले. शंभर रुपयाचे व्हाउचर होतं ते. (१९८५ सालचे शंभर रुपये. ) सर्व मंडळींचे डोळे पांढरे झाले.
" अरे हो, अजून एक गंमत सांगायची राहिली. मला बक्षिस मिळाल्याचं अजून एक पत्र मिळालं होतं. पण ते नकली पत्र असल्याचं माझ्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांना मी त्यांच्याकडूनच आलेलं पत्र दाखवलं. खरंतर तेही पत्र घेऊन गेलो होतो. इकडचा तिकडचा विषय काढून त्या मॅनेजरला त्याबाबत आडून विचारलंसुद्धा. तर त्याने अशाप्रकारे बर्याच लोकांना फसवलं गेल्याचं सांगितलं. आमच्या ऑफिसमधून त्याची रितसर तक्रार पोलीसांकडे नोंदवली आहे, असंही सांगितलं. आणि आम्हां कोणाला अशी पत्र मिळाली असतील तर आमच्या ऑफिसला आणून देण्याची विनंतीही केली. म्हणजे पोलीसांना कारवाई करणं सोप जाईल. तसं पाहीलं तर कधीकधी जवळपासचीच मंडळी असले प्रकार करतात. पण पोलीस काय ते बघून घेतील. . . मी त्यावेळी नाही दिले ते पत्र, पण सोमवारी कामावर जातांना ते द्यायचं विचार करतोय. " एवढं बोलून मंग्या 'माझं एक अर्जंट काम आहे' असं सांगून निघून गेला.
पोलीस, कारवाई, वगैरे शब्द ऐकल्यावर सर्व मंडळीची दातखीळ बसली. कट्ट्याच्या इतर मित्रांनी पाय लावून पळ काढला. नितीनला आणि रामुला तर कापरं भरल. नितीनच्या भावाने टाइप केलेल्या लेटरवर रामुने खोटी सही केली होती. कॅरमचा खेळ सोडून 'आता काय करायचं? ' यावर दबकत चर्चा सुरू झाली. सुजय महाअवली होता पण वयानेही सर्वांत लहान होता. त्याचीही तंतरली होती. बाकीचे त्याला धीर देत होते पण मनातून तेही घाबरले होते. तरीही मंगेश थापा मारतोय असं सुहास, राजुला वाटत होतं. नितीन आणि सुजयला सगळं खरं वाटत होतं. रामनाथ, प्रकाशला तर काहीच समजत नव्हतं. इतक्यात दिपक उर्फ दिप्याचं आगमन झालं. जुजबी बोलणं झाल्यावर त्याला आडूनआडून विचारलं गेलं. पण त्याची, मंगेशची भेटच झाली नव्हती त्यामुळे त्याला यातलं काहीही माहिती नव्हतं. शेवटी गँगने शरणगती पत्करली आणि मंगेशने सांगितलेली कथा अथपासून इतीपर्यंत ऐकवली. ऐकल्यानंतर दिपकनेही डोळे विस्फारले.
" बापरे! मोठा लोच्या झालाय म्हणजे. काय करणार तुम्ही आता? " दिपकची विचारणा.
" पण मंग्या बोलतो ते खरं कशावरून?" सुहासची शंका.
"हेही बरोबर. पण. . . पण यातलं १० टक्के जरी खरं असेल तर. . .खासकरून पोलीस चौकशीचं. तर??? आणि एक गोष्ट आपण नाही विसरू शकत, . . .ते पत्र. अत्यंत महत्त्वाचा पुरावा. जो अजून मंगेशकडे आहे." दिपकच्या शरीरात इन्स्पेक्टर झुंजाररावाचा आत्मा शिरला होता. त्याच्या मुद्देसूद निवेदनाने तो धीर देतोय की घाबरवतोय तेच या मंडळींना कळत नव्हतं.
" बरं ! निर्मात्याचा पत्ता तर खरा होता ना? तो तर एपिसोडच्या शेवटी दाखवतात त्यामुळे सगळ्यांनाच माहीत आहे. तुम्ही तुमच्या पत्रावर तोच पत्ता लिहिला होता ना? मंगेश तिकडे तर नक्कीच गेला असणार. बरोबर? " दिपकची सुहास, नितिनला विचारणा. सर्वांनीच होकारार्थी मान हलवली.
" पण असंही होऊ शकतं ना, की ते नकली पत्र बघून ऑफिसवाले हसले असतील आणि मंग्याला निघून जाण्यास सांगितलं असेल. " रामुचा आशावाद.
" बरोबर, आपणांस हेच तर हवं होत." प्रकाशने री ओढली.
" आणि त्या पचक्यामुळे मंग्या भयानक चिडेल आणि संध्याकाळी आपण चौकशीच्या निमित्ताने अजून भडकवू, असाच तर आपला प्लान होता." सुजयला कंठ फुटला.
" कदाचित रामू आता बोलला तसं झालंही असेल, ऑफिसवाल्यांनी मंगेशला पिटाळून लावलेही असेल. पण त्या नकली पत्राचं काय? एकतर ते मंगेशकडे आहे किंवा ऑफिसवाल्यांकडे. मंगेश त्यांना समजावून, पटवून पोलीस तक्रार करायला लावू शकतो किंवा स्वताही करू शकतो ना?" दिपकच्या विवेचनावर आज नुसत्या झुंजाररावाचा नव्हे तर बॅ. अमर विश्चासचा आत्माही त्याच्या शरीरात शिरलाय असं वाटत होतं.
" पण त्याला माहित आहे ना अशा चेष्टामस्करी तर आपण नेहमीच करतो ते. " राजुची आशादायक विनवणी.
" पण ह्या प्रकारात तुम्ही आहात हे त्याला कुठं माहितेय." दिपकमधला बॅ. अमर विश्चास बोलला.
" मग आम्ही आता काय करावं, असं तुला वाटतं. " सुजयचा धीर सुटत चालला होता.
" मंग्याशीच बोलून बघा." दिपकचा सल्ला.
" मग काय उपयोग? एवढ्या सगळ्या प्लानची मातीच होणार. " सुहास अजूनही तयार नव्हता.
" मी बाबा माझा सल्ला दिला. बाकी तुमची मर्जी. " दिपकने निर्वाणीचं सांगितलं.
काही मिनिटं शांततेत गेली. गँगमध्ये एकमेकांशी नेत्रपल्लवी झाली. एकेकजण उभे राहीले आणि त्यांनी दिपकला घेरलं आणि डोळे बारीक करून एकेकाने विचारणा सुरू केली.
" क्या दिपकभाय, ये तेराही दिमाग है ना? " रामू.
" तिकडे मंगेशलाही शिकवून आलायस ना?" नितीन.
" आम्हांला जळवण्यासाठी किंवा घाबरवण्यासाठी तुच हि कथा रचलीस ना? " सुजय
" पण काहीही म्हण, तुझ्या स्क्रिप्टवर मंगेशची आणि आता तुझी ऍक्टींग आणि संवादफेक जबरदस्त होती." सुहासचं प्रांजळ मत.
या सर्व सरबत्तीनंतर दिपकलाही हसू फुटलं. नेमकी तीच वेळ साधून मंगेशही आला. सर्व गँगने मंगेशला नेमकं काय घडलं ते विचारलं, त्याचबरोबर एक जोरदार पार्टीही कबूल करून टाकली.
मंगेशने खरंखरं काय ते सांगायला सुरूवात केली. " अरे, तुम्ही जे प्लान केलं तेच मला अनुभवावं लागलं. निर्मात्याच्या ऑफिसमध्ये तर कोणी विचारलंही नाही. लंच आणि गप्पा दुरच राहील्या. शेवटी रखवालदाराने पत्र पाहून ते नकली असल्याचं सांगितलं आणि कोणीतरी तुमची मस्करी केल्याचंही सांगितलं. त्यावेळेला भयंकर चिडलो होतो मी. पण कोणावर? दुसर्यांचा 'मामा करणं' आपल्या गँगची खासियत. इथं आपणच मामा बनलो होतो. आणि तुम्ही यामागे असाल, अशी पुसटशीही शंका मनात नाही आली. घरी येताना रस्त्यात दिपक दिसला. मी बक्षिसासाठी गेलो होतो ते त्याला कळंलं होतं. मी प्रचंड रागात आहे, हेही त्याला कळंलं. पहिल्यांदा माझा राग शांत केला त्याने. ह्यामागचे सुत्रधार दाखवून देईन पण तु त्यांना काहीही बोलणार नाहीस, असं प्रॉमीस कर, असंही विनवलं. मी नाखुशीनेच तयार झालो. मग दिपकने हा प्लान तयार केला. कसा वाटला प्लान? आणि खासकरून माझी ऍक्टींग. . . "
"जबरदस्त!" मंडळी एकासुरात ओरडली. झाल्या प्रकाराबाबत मंडळींनी मनापासून माफी मागितली. पण मंग्याने माफ करण्यास स्पष्ट नकार दिला आणि सांगितलं, " अरे यार, दोस्तीत एवढं तर चालतं ना. पण पार्टी मात्र मी घेणारच, तेही मी सांगेन त्या हॉटेलात."
" कबूल, एकदम कबूल. " पुन्हा सर्व ओरडले.
मंगेशच्या 'मामा प्रकरणाला' अनवधानानं कारणीभूत ठरलेला दिपकच होता.
दुपारी आमच्या सैतानी मेंदुचं कौतुक करून आमच्याबरोबर हास्यकल्लोळात सामिल होणाराही दिपकच होता.
मंगेशच्या रागाला आवर घालून गँगला संरक्षण देणारा दिपकच होता आणि त्यानंतर प्लान करून गँगला घाबरवणाराही दिपकच होता.
ह्या सर्व प्रकरणाचा शेवट सगळ्यांनाच संभाळून त्याने उत्तमरीत्या केला होता. दुसर्या दिवशी मोठ्या रेस्तराँमध्ये आईसक्रिम हादडताना सर्वांनीच मनापासून दिप्याच्या डोक्यालिटीच कौतुक केलं.....