STORYMIRROR

sunil sawant

Inspirational

4  

sunil sawant

Inspirational

स्वातंत्र्यलढ्यातील समिधा

स्वातंत्र्यलढ्यातील समिधा

2 mins
397

आपण यावर्षी भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतोय. या स्वातंत्र्यासाठी कित्येकांनी जीवाचं बलिदान दिलं, आयुष्य पणाला लावली. आपल्या सर्वस्वाची आहुती दिली त्या स्वातंत्र्यवेदीवर.

त्या महान स्वातंत्र्यलढ्याला सुरूवात झाली इ. स. १८५७ मध्ये. साध्या सैनिकाने सुरूवात केलेला संघर्ष एका महान ऐतिहासिक स्वातंत्र्ययुद्धापर्यंत जाऊन संपला.

१८५७चा स्वातंत्र्यलढा. भारतीय इतिहासातील एक सोनेरी पर्व. दुर्दैवाने हा लढा अयशस्वी झाला. या स्वातंत्र्यलढ्यात राजेमहाराजे, संस्थानिक, प्रजा, साधू, बैरागी या सर्वांचा सहभाग होता. . . आणि या प्रज्वलित अग्निकुंडात त्यावेळच्या स्रियांनीही स्व:ताच्या समिधा वाहिल्या. झाशीची राणी लक्ष्मीबाई, कित्तूरची राणी चेनम्मा, अयोध्या प्रांताची बेगम हजरतमल इ. महान वीरांगना सर्वानाच परिचित आहेत. पण छोट्याशा प्रांताच्या, छोटया संस्थानाच्या राण्यांनीही या लढ्यात ब्रिटिशांबरोबर संघर्ष केला. यात रामगडची गोंड राणी आणि झझ्झपुरची राणी आघाडीवर होत्या.

बहराइच जिल्ह्यातील छोटासा प्रांत झझ्झपुर, तिथल्या राणीने बाळासाहेब पेशव्यांना आपल्या प्रांतात आश्रय दिला, त्यांना तेथून पळून जाण्यास मदत केली. त्याचे परिणाम काय होणार याची तीला पुर्ण कल्पना होती पण पेशव्यांना वाचवले तरच स्वातंत्र्यलढा चालू राहील हे तीला कळले होते. इंग्रज तीच्या किल्ल्यावर चाल करून आले. सत्तर वर्षाच्या या वृध्द राणीने सैनिकी वेष धारण केला आणि इंग्रजांना प्रखर लढा दिला. पण शेवटी लढता लढता आपला देह ठेवला.

तशीच कथा आहे रामगड गोंड राणीची. गोंड संस्थान खालसा केल्याचं इंग्रजांनी जाहीर केलं आणि राणी पेटून उठली. शेवटच्या श्वासापर्यंत इंग्रजांशी लढत राहिली.

केवळ राण्यांनीच नव्हे तर त्यांच्या सहकारी, दासी, दरबारी महिलांनीही या लढ्यात आपले योगदान दिलं. कानपूर छावणीत अझीनन नावाच्या कलावंतीणीने वेगळीच कामगिरी बजावली. ती पुरुषी वेशात जखमी सैनिकांची सेवाशुश्रूषा करीत फिरे. ते करता करता सैनिकांसमोर देशभक्तीची, देशप्रेमाची भाषणे देई. तीच्या भाषणांनी सैनिकांना स्फुरण चढत असे.

लक्ष्मीबाई बरोबर सावलीसारख्या राहीलेल्या तीच्या सहकारीसुध्दा तेवढ्याच कौतुकास पात्र आहेत. त्यांनीदेखील जे योगदान स्वातंत्र्यलढ्यात दिले आहे त्याला तोड नाहीये. जेव्हा हा महासंग्राम राणी लक्ष्मीबाईच्या नेतृत्वाखाली शेवटच्या टप्प्यावर पोहचला होता तेव्हा तीच्या सहकारी महिला तीच्याबरोबर लढा देण्यांस उभ्या ठाकल्या. ललिता बक्षी तोफखाना प्रमुख होती. मोनुबाई हि फकिराचा वेष धारण करून शत्रुगोटात जाई. आपल्या अभिनयकौशल्याच्या जोरावर बित्तंबातमी काढून राणीपर्यंत पोहचवायची. झलकारी नावाची सहकारी किल्याची भगदाडे रातोरात बुजवून टाकत असे. काशी आणि सुंदर यातर राणीसोबत सावलीसारख्या राहिल्या. लढ्याच्या शेवटी राणीने इंग्रजांना चकवून पलायनाचा बेत केला तेव्हा काशीने राणीचा विधवेचा पेहराव केला आणि राणीने सवाष्ण बनून किल्यावरून यशस्वी पलायन केलं. सवाष्ण स्रीने विधवा बनणं हे त्यावेळी अघटित मानलं जाई, पण स्वामिनिष्ठा ही मोठी होती.

या अशा आणि कितीतरी अनामिक महिला, तरुणींनी १८५७च्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला. भले ते युध्द तो लढा अयशस्वी झाला असेल पण त्यांच्याच प्राणाहुतीमुळे, बलिदानामुळे पुढील क्रांतिकारकांना, स्वातंत्र्यसैनिकांना प्रेरणा मिळाली. . .आणि आपला भारत देश १९४७ साली गुलामगिरीतून मुक्त झाला. त्या सर्व महिलांना, समरवेदीवरच्या समिधांना कोटी कोटी प्रणाम. . .


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational