sunil sawant

Tragedy

4  

sunil sawant

Tragedy

एक अनावृत पत्र

एक अनावृत पत्र

4 mins
301


परममित्र रमेश,

अजूनही ती घटना विसरता येत नाहीये ज्या दिवशी तू आमच्यातून निघून गेलास. कोणाशीही काहीही न बोलता, न सांगता, अगदी अचानकपणे. . . .

तशी आपल्या दोघांची भेट पहिल्यांदा झाली तीही अचानकच. . . पाहिल्याक्षणी आकर्षित व्हावं, असं तुझंही व्यक्तिमत्त्व नव्हतं आणि माझंही. केवळ योगायोगाने आपली भेट झाली. पण त्यावेळेला साध्याशा, स्वच्छ पेहेरावात तसाच साधा, सरळ, स्वच्छ मनाचा मित्र तुझ्या रुपाने मला मिळाला.

    'बाळकूम'. ठाणे शहराला लागूनच छोटंसं गाववजा शहर अथवा शहरवजा गाव.. तिथल्याच साईटवर आपल्या मैत्रीची सुरूवात झाली. नंतर कळंलं की आपण कॉलेजमध्येही एकाचवेळेस होतो. पण त्यावेळेला ओळख नव्हती झाली. एकमेकांशी मोकळेपणाने बोलणं सुरू झालं. तूझं खडतर परिस्थितीतलं शिक्षण, नंतर नोकरीची वणवण, तू ठाण्याच्या बहिणीकडे रहात होतास त्या कुटुंबाची जबाबदारी, गावाकडची आई, लहान भाऊ यांची काळजी, इ.इ.. पण पैशाच्या जबरदस्त तंगीतही तू न डगमगता सर्व गोष्टींशी खंबीरपणे लढत होतास तेही त्रागा किंवा तक्रार न करता. मुळात तुझा स्वभावच मितभाषी. एकदा मी तुला त्याबाबत विचारलंही होतं, तू तुझ्या स्वभावाला जागून म्हणालास,' सुनिल, मी उत्तम श्रोता आहे. मला बोलण्यापेक्षा ऐकायला आवडत.' एक मोठा विचार सांगून गेलास तू. अगदी निरागसतेने.

       बर्‍याचदा संध्याकाळी कामावरून आलो की कपडे बदलून माझ्या मित्रांबरोबर (मह्या, किशोर, सुजीत, राजेश, विनायक, इ. इ. जे नंतर तुझेही मित्र झाले.) तलावपाळीला भटकणं हा आपला कार्यक्रम असे. महिन्यातून कधीतरी एखादा सिनेमा तर कधीतरी नाटकाला जात असू. त्यात कधीतरी प्रताप टॉकिजला तसले पिक्चर बघण्याचाही प्लान व्हायचा. त्यानंतर मित्रांबरोबर पाहीलेल्या नाटक/ सिनेमावर मस्तपैकी चर्चा केली जाई. तसं पाहीलं तर आपल्या गृपमध्ये चर्चा करण्यासाठी कुठंलाच विषय वर्ज्य नव्हता. कधीतरी सर्व मित्रमंडळी खरेदीसाठी निघत. तशी काही मोठी खरदी नसायचीच, कुणासाठी एखादी बर्मुडा चड्डी घ्यायची असायची आणि त्यासाठीसुद्धा अख्खा मित्रांचा जथ्था दुकानात शिरे. ठाण्यातील अर्धी दुकान फिरल्यानंतर ती खरेदी होई. मग कुठंच्यातरी फेमस वडापाववाल्याकडून वडापावची खादाडी होई आणि त्यादिवशीची कार्यसिद्धी पुर्ण होई. अशाप्रकारे आपण सर्वजण आपलं लाईफ एन्जॉय करण्याचा प्रयत्न करत होतो. . .

       नंतर ४/५ वर्षाचा काळ गेला. दोघांनी बर्‍याच नोकर्‍या बदलल्या. मला 'मुंबई पोर्ट ट्रस्ट' येथे तर तूला 'अजमेरा' या बडया बिल्डरकडे नोकरी लागली. मी पुन्हा लोअर परेलला रहायला गेलो. भेटीगाठी फोनपुरत्या मर्यादित झाल्या. फोनवर बोलतांना मधेमधे कॉलेजमधील, ठाण्यातील मित्रांच्या आठवणी निघायच्या. त्यावेळच्या गंमती आठवून मनमोकळं हसायचो.

       पुढे तुझं लग्न झालं. डोंबिवलीला फ्लॅट घेऊन सुखाचा संसार सुरू झाला. नंतर माझंही लग्न ठरलं, तू आवर्जून सपत्नीक हजर होतास. घरी येण्याचं अगत्याचं आमंत्रण दिलंस. मीही तुझ्या घरी आलो होतो. बर्‍याच काळानंतर आपण बाजूबाजूला बसून जेवणाचा, गप्पांचा आनंद लुटला. दोन/तीन महिन्यानंतर तोच प्रसंग माझ्या घरी साजरा झाला. दुर्दैवाची गोष्ट की त्यानंतर सर्वजण मिळून एकत्र जेवणाचा योग पुन्हा आला नाही. दरम्यान तू कल्याणला रहायला गेलास. संवाद होत होता. आस्थेने एकमेकांची विचारपूस होत होती. दोघांनाही दोन दोन मुली. त्यांच्याबद्दलही कौतुकमिश्रीत विचारपूस व्हायची. पण कित्येक वेळा एकमेकांशी बोलूनही एकमेकांकडे जाऊन भेटायचा योग आलाच नाही.

       नंतर तू 'रोहन गृप'मध्ये नोकरीला लागलास. तुला आर्थिकदृष्ट्या बर्‍यापैकी स्थैर्य आलं. उशिराने का होईना पण आता खर्‍या सुखाच्या आयुष्याला सुरूवात झाली होती. तुझ्याशी बोलतांना ते जाणवायचं आणि मलाही एक गोड आनंद देऊन जायचं. या सगळ्या आनंदात तुला सिगारेटच जीवघेणं व्यसन कधी लागलं हे समजलंच नाही.

       काही वर्षांपूर्वी तू मला GPB कट्टा या कॉलेज मित्रांच्या whatsapp गृपमध्ये आणलंस. मग काय! पुन्हा कॉलेजच्या दोस्तांचे, त्यांच्याबरोबर गप्पांचे फड रंगू लागले. तुझ्याबरोबर अवि, विजु, रामू, वासू, राजा, प्रशांत, सुनिल(रसाळ) हे आणि अजुन अशा कितीतरी तुझ्या खास मित्रांबरोबर माझ्याही गप्पा सुरू झाल्या. मस्करी, वादविवाद, नुसती धमाल चालू होती. पण तू आता फक्त श्रोता राहिला नव्हतास. एक उत्तम लेखक झाला होतास. तुझे विचार, ज्ञान शांतपणे, ठामपणाने मांडायचास.(योगेश तर तुझा जबरदस्त चाहता होता.) पण वादविवाद वाढल्यास तू बरोबर असूनसुद्धा मित्रांच्या प्रेमासाठी माफी मागून मोकळा व्हायचास. पोस्ट करताना अजूनएक तुझा वेगळेपणा जाणवायचा. प्रत्येक पोस्टला आवर्जून उत्तर द्यायचास. पोस्ट कोणाचीही असो, गंभीर असो, मजेशीर असो, राजकीय असो वा साधीशी. तूझं उत्तर असायचेच.

त्यानंतर काही महिन्यानंतर तुझ्या आणि सुनिल रसाळच्या प्रयत्नाने कट्ट्याच्या नाशिकच्या G2Gला हजर राहिलो. आणि एक अविस्मरणीय आनंदी सायंकाळ/रात्र आयुष्याच्या खात्यात जमा झाली.


पण. . . .पण तू आम्हांला सोडून गेलास. . . कायमचा. . .


GPB कट्ट्यावरच्या सर्वांच जगणं चालूच राहिल. कट्ट्यावर मजा-मस्करी, वादविवाद चालूच राहतील. पण कुठंतरी तूझी ठाम मतं, तुझ्या उत्तर-पोस्ट दिसत रहातील. यापुढेही G2G होत रहातील. त्याच्या रात्री जागवल्या जातील. मैत्रीच्या नशेमध्ये मित्रांचं बहकणंही होत राहिल. पण त्या G2Gला मित्रांबरोबर चिअर्स करीत विनोदांना, गाण्यांना दाद देणारा तू कुठंल्यातरी कोपर्‍यात उभा असशील.

       

तू गेलास अकाली, अचानकच. . . जसा अचानक माझ्या आयुष्यात आला होतास तसाच. पण तुझी आठवण सतत आम्हांला होत राहील.


तुझा मित्र

सुनिल 


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy