sunil sawant

Others

2.6  

sunil sawant

Others

एक अनुभव असाही. . .

एक अनुभव असाही. . .

8 mins
106


पाऊस आपल्या संपूर्ण जीवनातील एक महत्वाचा घटक. आपल्या जगण्यासाठी आवश्यक असलेला निसर्गदुत. खरंतर मानवाला निसर्ग भरभरून देत असतो पण मानव स्वार्थापायी निसर्गावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याची किंमत मानवाला मोजावीच लागते. अशीच किंमत मुंबईकरांनी मोजलीय २६ जुलै २००५ या तारखेला. या पाऊसरुपी निसर्गाचं महाभयंकर रूप, न ऐकलेली, न कधी पाहीलेली ढगफुटी प्रत्यक्ष अनुभवली त्यादिवशी. इतकी वर्षं उलटली पण तो दिवस, त्या दिवसाच्या घटना, अनुभव तसाच्या तसा आठवतो.


मी त्यादिवशी नेहेमीप्रमाणेच सकाळी साडेनऊच्या सुमारास माझ्या ऑफिसला निघालो. त्यावेळी बिलकुल वाटलं नव्हतं की आजचा दिवस काही तरी भयानक बातमी घेऊन येणार आहे. म्युनिसिपल ऑफिसची जुजबी कामं आटोपून मी आमच्या बॅलॉर्ड इस्टेटच्या ऑफिसला पोहोचलो तेव्हा अंदाजे बारा वाजले होते, तिथंल वातावरण पुर्णपणे नॉर्मल होतं. एक-दीड वाजेपर्यंत आम्ही सर्वांचीच जेवणं आटोपली. इकडे उपनगरात पावसाने धुमाकूळ घातला होता. माझी पत्नी सकाळीच मी निघण्यापूर्वी तिच्या ऑफिसला निघाली होती. जातांना साडेचार वर्षाच्या मुलीला पार्ल्यातील डे केअर सेंटरला सोडलं होतं. तीचंही ऑफिस चर्चगेटला असल्याकारणानं तीलाही पावसाच्या थैमानाची माहीती नव्हती. येथे आम्ही सर्व सहकारी आपापलं काम करत होतो. दोन-अडीचच्या सुमारास काहींच्या घरून, मित्रमंडळींकडून मुंबई आणि उपनगरात भयानक पाऊस कोसळत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. पण आमच्याकडचं वातावरण पाहून ते खरं वाटतं नव्हतं. तरीही तीन साडेतीन वाजण्याच्या सुमारास मी माहीम येथे काम करणार्‍या माझ्या मित्राला जयराजनला त्याच्या मोबाइलवर फोन लावला.(त्यावेळी आतासारखे सर्वांकडे मोबाइल फोन नव्हते.) माझा ऑफिसचा नंबर बघून तो चमकला. " अरे, सावंत, तू साला उदरही है? अरे जल्दी निकल. इदर बारिशने पुरा हंगामा किया है. अबी ट्रेनबी बंद हो जायेगा इतना ट्रॅकमे पानी बर गया है. जल्दी निकल. " हे ऐकलं आणि मला जाणवलं काहीतरी गंभीर आणि भयानक घडलं होतं, घडत होतं. मी माझ्या सहकार्‍यांना त्वरित हे सांगितलं. मग त्यांचीही फोनाफोनी सुरू झाली. आणि असं समजलं की मुंबईची तुंबई झालीय. रस्तोरस्ती पाणी भरलंय. ट्रेन कधीही बंद होऊ शकतात. मी ताबडतोब पत्नीच्या ऑफीसमधे फोन लावला, तीला या गंभीर परिस्थितीबाबत सांगितलं, कसंही करून पार्ल्याला जावं लागणार आणि मी निघायचा प्रयत्न करतोय, असंही सांगितलं. माझ्या साहेबांना सांगून मी निघालो.


व्ही. टी. स्टेशनला पोहचलो तेव्हा प्रचंड गर्दी झाली होती. सर्वांच्याच चेहर्‍यावर प्रचंड टेन्शन होतं. सतत उद्घोषणा करून पावसाबद्दल सांगितलं जात होतं. गाड्यांचं वेळापत्रक पुर्णपणे कोलमडलं होतं पण अजूनही त्या बंद झाल्या नव्हत्या. मी धावतच प्लॅटफॉर्म नंबर २ला पोहचलो कारण इंडिकेटरवर अंधेरी गाडी लावल्याचं दाखवलं जात होतं. मला कसंही करून पार्ल्याला पोहोचायचं होतं. मुलीला ताब्यात घेऊन गोरेगांवला घरी पोहोचायचं होतं. गाडीत शिरलो आणि पाहीलं, गाडी तुडुंब भरली होती. लोकांच्या बोलण्यातून समजलं की गाडी बराचवेळ उभी आहे सुटेल की नाही याबाबत शंकाच आहे. बापरे! माझ्या अंगावर भीतीने सरसरून काटा आला. अंधेरी गाडी मिळाल्याचं समाधान विरून गेलं. आता पार्ल्यात कसं पोहोचणार? डे-केअर सेंटर साडेसहापर्यंत चालू असतं, तोपर्यंत नाही पोहचलो तर? मुलीचं कसं होणार? तीला कोण पहाणार? देवाचा धावा करीत गाडीत उभा राहीलो. चारपाच मिनिटांनंतर गाडी हलली आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पाऊस कोसळतच होता. सर्व खिडक्या बंद करून आम्ही उभे होतो. मधेमधे खिडकीजवळचा माणुस खिडकी किलकिली करून बाहेरचा अंदाज घेत होता. बाहेर पाऊस मुसळधार कोसळत होता. गाडी हळूहळू धावत होती. कदाचित रुळामधे पाणी भरलं असावं. आम्हांला काहीही अंदाज लागत नव्हता. पाऊणएक तासाने गाडी वांद्र्याला पोहचली. बरचसे लोक उतरून गेले. गाडी बर्‍यापैकी रिकामी झाली. पण तिथून गाडी हलेचना. मनात पुनः भिती दाटून आली. आम्ही डोकावून पाहीलं, गाडीतून खाली उतरून काय झालंय याची माहीती घेण्याचा प्रयत्न केला पण कारण समजत नव्हतं. काही सेकंदांनी गाडीचे पुर्ण दिवे मालवण्यात आले. झालं! याचा अर्थ गाडी पुढे जाणार नव्हती. स्टेशनवर बरीच माणसं होती. कदाचित दूर रहाणारी असतील. अशा भयानक परिस्थितीत घर गाठणं त्यांच्यासाठी अशक्य असणार. पाच वाजले होते. मी वांद्रे पश्चिमेला जाऊन पार्ल्यापर्यंत जाण्यासाठी काही वाहनव्यवस्था आहे क‍ा? याची चाचपणी सुरू केली. सुदैवाची गोष्ट एवढीच होती की पावसाचा जोर ओसरला होता. लोकांची तुरळक गर्दी होती. माणसं सैरभैर होऊन फिरत होती. मीही त्यांच्याबरोबर फिरत अंदाज घेऊ लागलो. लोकांच्या बोलण्यातून एवढं कळंलं की परिस्थिती फारच बिकट झाली होती. काहीही व्यवस्था होणार नव्हती. चालत जाणं हाच पर्याय होता. तासाभरापूर्वी ऑफीसमधे असतांना विचारही केला नव्हता एवढा भयानक प्रसंग आमच्या मुंबईने अनुभवला होता. सोसला होता. मी पुन्हा स्टेशनला आलो. सर्व लोकलव्यवस्था पुर्णपणे बंद झाली होती. आता एकच उपाय उरला होता, स्टेशनच्या पुर्व बाजुला जाऊन काहीतरी व्यवस्था पहाणे. मी पुलावरून पुर्वेकडे आलो. परिस्थिती तेवढीच वाईट होती जेवढी वांद्रे पश्चिमेला होती. स्टेशनला लागूनच असलेल्या वस्तीचं प्रचंड नुकसान झालं होतं. तिथली लोक आपला उघडयावर पडलेला फाटका संसार सावरण्याचा प्रयत्न करीत होते. नोकरदार लोकांचे लोंढे चालत चालत पश्चिम द्रुतगती मार्गाकडे सरकत होते. कदाचित हायवे असल्याकारणानं तिथून काहीतरी व्यवस्था होईल ही आशा मनात होती. मीही त्यांच्यात सामिल झालो. हायवेला आलो आणि तिकडची परिस्थिती पाहून छातीच दडपली. हायवेचा दोन्हीकडचा फुथपाथ आणि अर्ध्यापेक्षा जास्त रस्ता पाण्याखाली गेला होता. उरलेल्या रस्त्यातून, दुभाजकावरून लोक चालत निघाले होते. काय करावं? कसं पोहचावं पार्ल्याला? मला काहीही सुचेना. उगाच या बाजुला आलो, त्यापेक्षा पश्चिमेकडून चालत निघालो असतो तर बरं झालं असतं. कमीतकमी या तुंबलेल्या पाण्यातून तरी जावं लागलं नसतं, असं वाटून गेलं. पण वेळ निघून गेली होती.


काही मिनिटं वाट पाहून मीही त्या लोकांत सामील झालो. जमेल तशी वाट काढत माणसं चालत निघाली होती. कदाचित माझ्यासारखाच त्यांनाही प्रॉब्लेम असेल. तुंबलेल्या पाण्यातून आम्ही सर्वजण संभाळून जात होतो. बराच मोठा पल्ला गाठायचा होता मला. पाऊस पुन्हा सुरू झाला होता, जोराचा नव्हता पण भुरभुरत होता. त्यामुळे छत्री उघडणं भाग होतं. उघडी छत्री संभाळत चालणं अजून कठीण झालं होतं. वीस-पंचवीस मिनिटं चाललो असेन आणि खिशातला मोबाइल वाजू लागला. बॅग, छत्री संभाळत मोबाइल खिशातून काढणं म्हणजे मोठं जिकिरीचं काम झालं होतं. पण मोबाइलवर बोलणं तेवढंच आवश्यक होतं त्यामुळे कसाबसा मोबाइल काढला. पत्नीच्या मोठ्या बहिणीकडून दहीसरहून फोन होता. आमच्या काळजीपोटी त्यांनी फोन केला होता. बर्‍याच प्रयत्नांनंतर त्यांच्याकडून मला कॉल लागला होता. मी तसाच चालतचालतच माझी परिस्थिती त्यांना सांगितली. दरम्यान पाण्याखालच्या खड्ड्यात माझा पाय अडखळला आणि मोबाइल पाण्यात पडला. मी पटकन पकडायचा प्रयत्न केला पण तो पाण्याखाली गेला. मीही गुडघाभर पाण्यात जवळजवळ बसलोच तसा तो हाताला लागला. पटकन बाहेर काढून पाहीलं तर सुदैवानं तो बंद पडला नव्हता. मी त्यांच्याबरोबरचं बोलणं आटोपतं घेतलं. मोबाइल तीनचार वेळा चांगला झटकला आणि सरळ बॅगेत टाकला. पार्ल्यात पोहोचेपर्यंत बाहेर काढायचा नाही हे मनोमन ठरवून टाकलं, न जाणो पुन्हा पाण्यात पडायचा. चालत असतांना लोकांच्या बोलण्यातून ऐकलं की मोबाइलसेवा कोलमडलीय, चुकून फोन लागला तर लागतो नाहीतर लागतच नाहीये.


साडेसहाच्या सुमारास मी पार्ल्यात पोहचलो. डेकेअरच्या समोरच्या रस्त्यावरही पाणी भरलं होतं. तिथून मुलीला घेऊन गोरेगावला घरी कसं जायचं हा प्रश्न सतावायला लागला. खरंतर जवळजवळ सव्वा-दीड तास अथक चालत आल्याने तेही तुंबलेल्या पाण्यातून आणि भुरभुरणार्‍या पावसातून पाय दुखायला लागले होते, पण दुसरा कुठंलाच पर्याय नव्हता. पहिल्यांदा डेकेअर पोहोचून मुलीला ताब्यात तर घेऊया, मग पुढचं पुढे, असा विचार करून डेकेअरला निघालो. इतक्यात मोबाइल वाजला. मी घाईनेच बॅग उघडून मोबाइल काढला. पत्नीचा ऑफीसमधून फोन होता. स्पष्टपणे ऐकू येत नव्हतं पण एवढा अंदाज आला की ती तिकडेच थांबणार होती आणि ट्रेन चालू झाल्यावर निघणार होती. अंधार पडायला सुरुवात झाली होती. त्यातच चालताना जाणवलं की बर्‍याच इमारतीमधे काळोख दिसतो आहे. बापरे! म्हणजे इथे वीजही गेलीय की काय? डे-केअरच्या इमारतीत पोहचलो आणि मनातली भिती खरी ठरली. मावळतीच्या अंधुकशा उजेडाव्यतिरिक्त त्या तीन मजली इमारतीत पुर्णपणे काळोख पसरला होता. मी माझी मुलगी ज्या मजल्यावर असे त्या दुसर्‍या मजल्यावर गेलो. तिथल्या कर्मचारी महिलांनी मी आल्याचं मुलीला सांगितलं. ती मला येवून बिलगली. त्या सेंटरवर बरीच मुलंमुली होत्या. अगदी तान्ह्या बाळासह तेराचौदा वर्षाच्या मुलामुलीपर्यंत. त्यांचे पालक मुलांसाठी येऊच शकले नव्हते तर बर्‍याच जणांचे पालक तर संपर्कही साधू शकले नव्हते. त्यातील अगदी छोट्या मुलामुलींचे डोळे पालकांच्या वाटेकडे लागले होते, अंधुकशा प्रकाशातही त्या डोळयांतील व्याकुळता मला कुठे तरी आतून हेलावून गेली. बालकांच एक छोटंसं स्वताचं एक गोड गोंडस विश्व असतं. आईबाबा, आजीआजोबा, दादाताई आणि काही सवंगडी, बस्स. त्या जगाचा विस्तार हळूहळू होत असतो, त्याची सुरुवात शाळेने होते. आणि त्याव्यतिरिक्तही एक बाहेरचं जग असतं आणि त्या बाहेरच्या जगात काय उलथापालथ झालीय याची त्या बालकांना कल्पनाही नव्हती. त्या मुलांचे पालक येणार की नाही याबाबत कोणालाच सांगता येत नव्हतं. माझी मुलगी त्यामानाने नशीबवान होती. मी तरी तीच्यासोबत होतो. आता पुढच्या प्रयाणाच्या तयारीला लागायचं होतं. त्याच भयानक परिस्थितीतून मुलीला उचलून घेऊन जवळजवळ तेवढाच वेळ म्हणजे सव्वा ते दीड तास चालावं लागणार होतं. अंगात त्राण नव्हते. पण डे-केअरचे नियम होते. त्यांच्याही कर्मचारीवर्गाला त्यांच्या घरी, त्यांच्या मुलाबाळांकडे जायचं होतं. थोडीशी विश्रांती घ्यावी मग निघावं, म्हणून थोडासा बसलो. तिथल्या पर्यवेक्षिका, महिला कर्मचार्‍यांनी माझी विचारपूस केली. माझ्या मोबाइलवरून त्यांच्या घरी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, दूरसंचार सेवा कोलमडल्याने संपर्क झाला नाही. थोड्याच वेळाने बाहेरची परिस्थितीचा अंदाज घेऊन मुलं आणि जे पालक आले होते त्या सर्वांना तिथेच थांबवण्याचा निर्णय डेकेअरच्या पर्यवेक्षिका आणि महिला-कर्मचारीवर्गाने घेतला. मी मनोमन देवाचे आणि त्यांचे आभार मानले. आम्ही चारपाच पालक आपापल्या पाल्यासमवेत कोपर्‍यातल्या जागा पकडून बसलो. एव्हाना काळोखाचं साम्राज्य पसरलं होतं. मेणबत्त्या, दिवे पेटवण्यात आले. डासांची भुणभुण सुरू झाली. साडेसातच्या सुमारास उपलब्ध असलेल्या तांदुळ-डाळीमध्ये खिचडी बनवून सर्वांना थोडी थोडी वाढण्यात आली. केवळ पोटाला आधार हवा म्हणून सर्वानीच समजून तेवढीच घेतली. मुलाबाळांना मात्र पोटभर खिचडी मिळेल याची मात्र सगळ्यांनीच काळजी घेतली. जेवणं आटोपल्यानंतर सर्व आवराआवर करून, थोडावेळ टाईमपास करून सर्वजण झोपेच्या तयारीला लागले. डास-मच्छरच्या भुणभुण आणि चाव्यांनी कुणालाच झोप लागत नव्हती. पण तरीही सर्व झोपण्याचा प्रयत्न करत होते. आम्हांलाही मध्यरात्री कधीतरी झोप लागली. सकाळीसकाळीच जाग आली. मुलीलाही उठवलं. आता निघणं भागच होतं. पर्यवेक्षक आणि त्यांच्या मदतनीस बाईंचे आभार मानून आम्ही खाली आलो.


पत्नीशी बोलावं म्हणून मोबाइल पाहीला तर नेटवर्क नव्हतं. मोबाइल तसाच खिशात ठेवून हायवेच्या दिशेने निघालो. रस्त्यांवरचं पाणी ओसरलं होतं. अंदाजे तास दीड तास चालावं लागणार होतं त्यामुळे थोडावेळ मुलीला चालत न्यायचं आणि मधेमधे तीला उचलून घेऊन चालायचं असं ठरवलं. मुलीलाही तसं समजावून सांगितलं, तीनेही मान डोलावली. सातआठ मिनिटात आम्ही वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेला पोहचलो आणि सरळ अंधेरी फ्लायओव्हरवरून चालायला सुरवात केली. पुर्ण फ्लायओव्हरवरून फक्त आम्ही दोघंच चाललो होतो. ना कुठली गाडी, ना पादचारी. इतर दिवशी याच वेळेला गाड्यांची मोठी वर्दळ आम्ही पहात होतो. थोड्या वेळाने एक बाईकस्वार मागून येतांना दिसला. आमच्याकडे थांबून कुठं चाललात याची विचारणा केली. आम्ही बिंबीसार नगर असं सांगितलं, त्याने मागे बसायला सांगितलं आणि इस्माईल युसुफ कॉलेजपर्यंत सोडायची तयारी दाखवली. आमच्यासाठी तेही मोठे उपकारच होते त्या तरूणाचे. तो तरुण आपल्या पत्नीला शोधायला सकाळीसकाळीच बाहेर पडला होता. कामावर गेलेली ती घरी आली नव्हती, आणि तीचा संपर्कही होतं नव्हता. कुठंतरी चर्रss झालं मनातं. कालचं निसर्गाचं महातांडव अजून काय काय ऐकायला लावणार होतं कोण जाणे. आमचं ठिकाण येतांच आम्ही उतरलो. त्याचे मनापासून आभार मानले, त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला. पुढचं उरलेलं पंधरा मिनिटाचं अंतर चालण्यास सुरूवात केली. चालता चालता त्या तरूणाची आणि त्याच्या पत्नीची भेट होऊ दे असं देवाला मनोमन साकडं घातलं.


दोघंही घरी पोहचलो. दरवाजा उघडता उघडता आमचे प्रेमळ शेजारी आले, त्यांनी आस्थेनं विचारपूस केली. काल कुठं होता? कसे काय इथवर आलात? अशी काळजीयुक्त विचारणा केली. मी सर्वांशी बोलत दरवाजा उघडला. घरात शिरलो. फक्त एक रात्र घराबाहेर राहीलो होतो पण वाटलं खुप दिवसांनंतर घरात आलोय. इथलीही वीज बंद केली होती. नेहेमीप्रमाणे घरच्या कामाला सुरुवात केली. पहिल्यांदा दोघांनीही दात घासणे, आंघोळी इ. आटोपून घेतल्या. केरकचरा काढून देवासमोर दिवा लावला. मोठ्ठया संकटातून आम्ही सर्व सुरक्षित राहिलो होतो.


Rate this content
Log in