sunil sawant

Inspirational

3.5  

sunil sawant

Inspirational

जीवन-रंग

जीवन-रंग

5 mins
243


प्रत्येकाचं आयुष्य वेगवेगळे असते. आपापल्या तर्‍हेने हरएक जण ते छानपैकी जगण्याचा प्रयत्न करीत असतो. ह्या आयुष्याला कोणी संगीताचे सप्तसुर म्हणतो तर काहीजण इंद्रधनुष्याचे रंग. ते सुर वा रंग म्हणजे जणू आपले स्वभावगुण असतात. . . किंवा आपल्याला मिळालेले अनुभव. जसा प्रत्येक रंग आपलं स्वताच एक वैशिष्ट्य दाखवतो तसेच आपण घेतलेले वा मिळालेले अनुभवसुद्धा. हे अनुभव प्रेरणदायी, दु:खदायक, त्रासदायक, सुखकारक, अपमानकारक, लाजिरवाणे अशा सर्व प्रकारचे असतात. स्वअस्तित्व दाखवत सर्व रंग एकमेकांसोबत एकत्र येतात तसं आपणही जेव्हा त्या प्रत्येक अनुभवातून योग्य बोध घेऊन वाटचाल करतो तेव्हांच जीवनात फुलतं सुंदरसं इंद्रधनुष्य. प्रेरणादायी, मनमोहक, आनंददायी.


माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात असे भरपूर अनुभव आलेत. अशा कित्येक बर्‍यावाईट घटनांचे साक्षीदार राहिलोय. पण काही गोष्टी, घटना हृदयावर, मेंदुवर कोरल्या जातात. १९७९ साल उजाडलं तेव्हां ते वर्ष अशाच काही घटना घेऊन आलं आहे असं मला बिल्कूल वाटलं नव्हतं. मी सातवीत होतो त्यावर्षी. लोअर परेलला एका तीन मजली चाळीत रहात होतो. पहिले तीनचार महिने नेहमीसारखेच पार पडले. गेली दोन वर्षे आई आजारपणामुळे बिछान्याला खिळून होती. तीचं आजारपण संभाळत बाबा आणि आम्ही चार भाऊ घर चालवत होतो. मावशी दर आठवड्याला येवून आईची विचारपूस करत होती. माझ्यावर तीचा विशेष जीव होता. आईच्या आजारपणाबरोबरच आमचीही काळजी होती तीला. दोघींच्या वयात जरा जास्त अंतर होतं. आई जणू तीची धाकटी बहिण नव्हती तर मुलगीच होती.


मी एप्रिलमध्ये वार्षिक परीक्षा पास होऊन सातवीतून आठवीत गेलो. चांगले मार्क मिळाल्याने सर्वांनी कौतुक केलं. माझा पुढचा भाऊ बारावीत गेला. दोन मोठे भाऊ आणि बाबा नियमितपणे कामाला जात होते. जुनच्या मध्याला शाळा, कॉलेजेस सुरू झाली. मी आणि माझा बारावीतला भाऊ दोघांचा अभ्यास आणि घरातील कामांचं रुटीन सुरू झालं. जुलै महिना संपत आला होता. एका संध्याकाळी आम्ही सर्व मित्र आपापले खेळ आटोपून घरी निघालो. नेहमीच्याच सवयीने मी घरी आलो. घरचं वातावरण आज जरा जास्त गंभीर होतं. बाबा आणि मोठे भाऊ आज घरीच होते. आईची तब्येत जास्तच बिघडलेली दिसत होती. मावशीने आईला आधार दिला होता. एक गावचा मामाही आला होता. त्याला गावठी औषधांचे चांगलं ज्ञान होतं. दुसरा भाऊ मामाने सांगितल्याप्रमाणे काहीतरी मुळी ऊगाळत होता. मी हातपाय धुवून एका बाजूला जाऊन बसलो. बहुतेक काय घडणार आहे याची सर्वांना जाणीव झाली होती. काही वेळातच तसंच घडलं. आईने मावशीच्या मांडीवर प्राण सोडला. मावशीने दु:खाने हंबरडा फोडला. शेजारीपाजारी जमा झाले. शेजारच्या काकी, मामी, वहिनींना अश्रू आवरेनात. माझ्या पुढचा भाऊ बारावीच्या टयुशन क्लासला गेला होता. मी कोपर्‍यात सर्व काही गमावल्यासारखा मान खाली करून बसलो होतो.


काळ कोणासाठीही थांबत नाही. काही दिवसांत आईचे सर्व अंत्यक्रियाविधी पार पडले. एक मोठा दु:खाचा आघात सहन करून आम्ही आमचं आयुष्याचं रुटीन सुरू केलं. आधीच्या दोन वर्षाच्या सवयीमुळे तेवढं कठीण नाही झालं. माझ्या शाळेत पहीली चाचणी परीक्षा झाली. बारावीतल्या भावाने पुन्हा क्लास आणि कॉलेजकडे लक्ष केंद्रीत केलं. सणवार सुरू झाले. मध्यमवर्गीय चाळकरी सर्व सण उत्साहाने साजरे करतात. पण आमच्या घरात वर्षभर दुखवटा होता. शेजारी मात्र त्यांच्या आनंदात आम्हांलाही सामिल करून घेत होते. त्यांच्या घरी बनलेलं गोडधोड आमच्याकडे न चुकता येई. पण बाकी सर्व सणांना सोडून बारावीतला भाऊ नवरात्रोत्सवाची वाट पहात होता. त्याचं एक खास कारण होतं.


आमच्या बाजूलाच ' लोअर परेल विभाग सार्वजनिक नवरात्रोत्सव ' साजरा व्हायचा. उत्सवाची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळातील. त्यामुळे उत्सवाला परंपरा होती, एक मान होता. त्या उत्सवानिमित्ताने विविध स्पर्धा घेतल्या जात. खेळांच्या स्पर्धाबरोबर बौद्धिक स्पर्धाही होत. त्यात सामान्य ज्ञान, स्मरण चाचणी, निबंध (विषय त्याचवेळी सांगितले जात), शुध्दलेखन हस्ताक्षर आणि सर्वांत महत्त्वाची वत्कृत्व (तयारी करण्यासाठी विषय अगोदर सांगितले जात.) अशा पाच स्पर्धा होत असत. प्रत्येक स्पर्धेतून पहिल्या तीन क्रमांकाचे विजेते घोषित केले जात. या सर्व बौद्धिक स्पर्धांमधे जास्तीत जास्त आणि वरचा क्रमांक मिळवणार्‍या स्पर्धकाला ' जय भवानी गौरव पारितोषिक ' देऊन सन्मानित केले जाई. पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा दोन गटात त्या स्पर्धा होत. विभागातले हुशार विद्यार्थी आवर्जून बौद्धिक स्पर्धांत भाग घेत. खरंतर त्याचवेळी शाळांमधून सहामाही परिक्षा घेतल्या जात. तरीही सहामाही परिक्षेचे पेपर देतानाही सर्व स्पर्धकांचे एकच लक्ष्य असायचं ' जय भवानी गौरव पारितोषिक '. ते लक्ष्य साधणं हे केवळ त्या विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर त्या कुटुंबासाठीसुध्दा अभिमानास्पद गोष्ट वाटे. त्या स्पर्धांमध्ये एक गंमत अशी होती की वत्कृत्व स्पर्धेत भाग घ्यावाच लागे नाहीतर ' जय भवानी गौरव पारितोषिकासाठी ' तो स्पर्धक अपात्र ठरत असे, मग भले इतर स्पर्धांमध्ये तो पहिल्या क्रमांकाचा विजेता असला तरीही. त्यामुळे वत्कृत्व स्पर्धेचीही तयारी जोरात चाले.


दोन वर्षांपूर्वीच माझ्याच बारावीतल्या भावाने, अनिलने, तो दहावीला असतांना ते पारितोषिक मिळवले होते. बर्‍याचदा ते पारितोषिक दहावीचेच विद्यार्थी जिंकीत असत किंवा क्वचित वेळी सातवीचे. मी, आम्हा चार भावांमध्ये सर्वांत धाकटा होतो. ते पारितोषिक मीही मिळवावे अशी अनिलची इच्छा होती. मी थोडा भिडस्त स्वभावाचा असल्याने तोच मला स्पर्धेसाठी तयार करी. गेल्यावर्षी मी सातवीला असतांना त्याने माझ्यावर खुप मेहनत घेतली होती. पण माझा दोनतीन स्पर्धेतचं नंबर आला होता, तोही दुसरा-तिसरा. यावर्षी आठवीला असल्याने पारितोषिक मिळण्याची शक्यता धूसर होती. शिवाय घरात अजूनही थोडंसं दु:खाचं वातावरण होतंच. शाळा, परीक्षा इ. चा अभ्यास नियमितपणे चालूच होता. नवरात्रोत्सव जवळ येऊ लागला तसा अनिलने स्पर्धांच्या तयारीविषयी बोलायला सुरूवात केली. बाबाही अनिलच्या बोलण्याला दुजोरा देत होते. मी सर्वांत धाकटा आणि आईचा लाडका असल्याने दु:खातून लवकर बाहेर पडावे म्हणून ते प्रयत्न करत होते. त्यानिमित्त घरचं वातावरण थोडंसं निवळेल, अशीही अपेक्षा त्यांना होती. हळूहळू अभ्यासाबरोबरच स्पर्धेची तयारी सुरू झाली. केवळ बौद्धिकच नव्हे तर इतरही शारिरीक स्पर्धांमध्ये मी भाग घ्यावा असं सुचवलं गेलं. नवरात्रोत्सवातील सर्व प्रकारच्या विविध स्पर्धांच्या तारखा जाहीर झाल्या. रात्री होणार्‍या मनोरंजनाच्या कार्यक्रमांची यादी जाहीर झाली. त्या कार्यक्रमांचीही उत्सुकता असायचीच. स्पर्धक पुन्हा तयारीला लागले. अनिलच्या जबरदस्तीमुळे मीही थोडी-थोडी तयारी सुरू केली. वत्कृत्व स्पर्धेसाठी भाषण त्यानेच लिहून दिले आणि पाठ व्हावे म्हणून त्यानेच तयारी करून घेतली. यथासांग सर्व स्पर्धा उत्तमरीत्या पार पडल्या. मीही बर्‍यापैकी प्रयत्न केले. लांब उडीत माझा दुसरा नंबर आला होता. पण बौद्धिक स्पर्धांचे क्रमांक नंतर कळणार होते. नवमीला बक्षिस-समारंभ होत असे. त्यापुर्वीच्या एखाद-दुसर्‍या रात्री मनोरंजन कार्यक्रमाच्या मध्यंतरात ' जय भवानी गौरव पारितोषिक ' विजेता आणि सर्व स्पर्धांचे विजेते जाहीर केले जात.


पुढे काय झालं असेल याचा अंदाज तुम्हांला आला असेलच. . .तर त्या वर्षी ' जय भवानी गौरव पारितोषिक ' मला जाहीर झालं होतं. आमच्या सर्वांसाठी अनपेक्षित, धक्कादायक होतं ते पण तेवढंच सुखदही होतं. मला चार बौद्धिक स्पर्धेची व एक शारिरीक स्पर्धेचं अशी एकूण पाच बक्षिसं मिळाली होती. हस्ताक्षर आणि निबंध यांत पहिला, सामान्य ज्ञान मधे दुसरा तर स्मरण चाचणीमध्ये तिसरा क्रमांक मिळाला होता. या सर्वांची गोळाबेरीज करून स्पर्धासमितीने मला सर्वोत्तम पारितोषिकासाठी निवडले होते.


खरंतर जीवनसंघर्ष करताना उत्सव, स्पर्धा, परीक्षा, मनोरंजन या सर्व गोष्टीत एक समतोल राखणे हे आम्हा चाळकरी लोकांसाठी नेहमीचंच आहे. मोठ्यात मोठ्या दु:खाला सर्वांनी मिळून ते सहनीय करणं आणि छोटया गोष्टीतलं सुख मनमोकळेपणाने इतरांसह साजरं करणं हेही चाळकरी संस्कार. लोअर परेल येथील एका सार्वजनिक उत्सवात मिळालेलं पारितोषिक फार मोठं होतं असंही नाही. पण याच चाळीतील संस्कारांमुळे, संस्कृतीमुळे आमच्यासाठी ते खास ठरलं होतं.


इंद्रधनुष्याचे एक वैशिष्ट्य आहे. लख्ख सूर्यप्रकाशात पावसाचा शिडकावा झाला तरच ते दिसतं. . .तसंच काहीसं त्यावर्षी झालं. अचानक काळ्याकुट्ट ढगांनी आभाळ भरून आलं, मेघगर्जनेसह पाऊसाची जोारदार सर कोसळली अन थोड्याच वेळाने आकाशाच्या एका कोनाड्यातून ढग विरळ होत जाऊन सुर्यकिरणांचा लहानसा कवडसा पडला. आणि त्यातून अलगद सप्तरंगी इंद्रधनुष्य फुलले. त्या इंद्रधनुष्याच्या अनेक रंगांसारखेच अनेक अनुभव त्या वर्षी मी अनुभवले. . .


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational