sunil sawant

Others

4.0  

sunil sawant

Others

रंगवेडी

रंगवेडी

5 mins
258


रेवती खिडकीतून बाहेर पहात होती. होळी-धुळवड चार दिवसांवर आली होती. थोड्या दूरच्या मैदानात काही मुलं होळीसाठी खड्डा खोदण्याचं काम करत होती. तीला तिच्या लहाणपणीचा काळ आठवला. धुळवडीला ती सकाळीसकाळीच उठायची. त्यादिवशी ती एकदम खुशीत असायची. उत्साहाने रंग खेळायची. सर्वांकडून रंग लावून घ्यायची. सर्व शेजारच्या मित्र-मैत्रीणींना, दादा-काकांना रंग लावायची. लाडाने हळूच आईलादेखील रंग लावायची. आई तिच्यासाठी रंग लावून घ्यायची पण बाबांना कळायच्या अगोदर तो धुवून टाकायची. तीचं घर तसं सनातनी विचारांच. तिकडे परंपरागत पध्दतीने होळी साजरी व्हायची. पावित्र्य राखून, धार्मिक भावना संभाळून. रंग खेळायला स्रियांना परवानगी नव्हती. बाबाही त्यासाठीच स्वता रंग नाही खेळायचे. ही जसजशी मोठी झाली तसं हिचंही रंग खेळणं बंद झालं. खरंतर ही रंग-वेडी होती. कळायला लागल्यापासूनच हिला रंगांची आवड होती. त्यामुळेच तीची रंगसंगतीची समजही जबरदस्त होती. चित्रकलेची अावड होती. छान रांगोळया काढायची. कपड्यांवर नक्षीकाम करायची. चित्रांमधली, नक्षीकामातील, रांगोळयामधली रंगसंगती अप्रतिम असे. सर्वजण मनापासून कौतुक करीत. साड्यांची, ड्रेसेसची निवड करायला बहुतेकजणी हिला घेऊन जात. ही अगदी योग्य पध्दतीने त्यांना शोभेलशा रंगसंगतीच्या साड्या, ड्रेसेस पसंत करीत असे. पण तीच्या आनंदास खरा बहर येई तो धुळवडीच्या दिवशी. लह‍ाणपणी मनसोक्त रंग खेळली होती, आता रंग खेळू शकत नसल्याकारणाने ती खिडकीतून ती रंगाची उधळण पाही, ती रंगांची सरमिसळ, त्याची गंमत पहाण्यात रंगून जात असे.


नंतर काय झाले माहीत नाही पण कशामुळे तरी तीची रंगांविषयीची आसक्ती कमी होत गेली. चित्रांमधली रंगसंगती गेली आणि पेन्सिल, चारकोलने तीची चित्रे बनू लागली. रांगोळया काळ्या, पांढरट, राखाडी रंगाने रंगू लागल्या. अर्थातच त्यातही तीच्यातील कला उठून दिसायची. सजावट, कपडे, सगळ्यांच गोष्टीत ती मोनोक्रोमॅटीक झाली. कोणाच्याही लक्षात तीच्यातील हा बदल आला नसला तरी आईला कळंलं होतं. या रंग-वेडीचं रंगापासून दूर जाणं तीला आवडलं नव्हतं. आईने मुद्दामहून तीच्या ह्या चित्रांची टिंगलही उडवली, तीला आडूनआडून रंगसंगतीबाबत सुचवलं पण रेवतीने तीला दाद दिली नाही. शेवटी एकदा स्पष्टपणे विचारलंही, रेवतीने तीच्या गोड स्वभावाला धरून तीची समजूत काढली. पण आईचं समाधान नव्हतं झालं.

योग्य वेळी तीचं लग्न झालं. सासर श्रीमंत होतं. सासरच्या मंडळींना ती, तीचा स्वभाव, तीची कला, सर्वच आवडलं. तशी ती मंडळी पुढारलेल्या विचारांची होती. त्यांच्याकडे स्त्रियांच्या मतांनाही तेवढीच किंमत होती, मान होता. सासरी पहिली होळी-धुळवड साजरी होणार होती. घरात सर्वांची चर्चा सुरू झाली. सुनबाईची पहिली होळी असल्याकारणानं नातेवाईकांना बोलावणी गेली. पाहूणेमंडळींच्या येण्याने वाडा भरायला सुरू झाला. हि थोडीशी उदास होती. तिला धुळवड खेळायची नव्हती, रंग लावून घ्यायचे नव्हते. पण हे सांगायचं कोणाला आणि कसं, ते कळतं नव्हतं. विचारलं तर कारण कसं सांगणार? काहीच कळतं नव्हतं. शिवाय आपल्या रंग खेळण्याच्या अनिच्छेमूळे एवढ्या सार्‍यांच्या उत्साहाचा विचका तर होणार नाही ना? अशी तीला भिती वाटत होती. शेवटी दोनतीन दिवस अगोदर हिने नवर्‍याला म्हणजे राजेशला सांगून टाकलं.


त्याने थोडंसं आश्चर्य दाखवलं पण कारण नाही विचारलं. आई-पप्पांशी बोलेन, तुझ्या इच्छेचा मान राखला जाईल असं आश्वासन दिलं. तीला हायसं वाटलं. पण त्याने कारण विचारायला हवं होतं असं तीला मनात वाटून गेलं. दुसर्‍या दिवशी सकाळीच त्याने तीच्या रंग न खेळण्याविषयी सर्वांना सांगून टाकलं. घरची मंडळी थोडीशी नाराज झाली पण तीच्या रंग न खेळण्याच्या मताला सर्वांनी मान्यत‍ा दिली. घरातलं उत्साही वातावरण थोडंसं कोमेजलं पण उत्सवाच्या तयारीत मात्र कुठलीही कमतरता आली नाही. होळीचा दिवस उजाडला. सर्वजण आपापल्यापरीने सण साजरा व्हावा म्हणून धावपळ करीत होते. रेवतीही तेवढ्यांच उत्साहाने सर्वांबरोबर काम करीत होती. रात्री होलिकादहनाचा कार्यक्रम साग्रसंगीतपणे पार पडला. जेवणखाण, गप्पागोष्टी, कविता-गाणी इ. चा कार्यक्रम मध्यरात्रीपर्यंत रंगला. आईने उद्या धुळवड खेळण्यासाठी लवकर उठायची आठवण केली तेव्हां सर्व झोपण्याच्या तयारीला लागले.


रेवतीला बराच वेळ झोप लागत नव्हती. ती चुळबुळत होती. राजेशने बेडलँप लावला, तीच्याजवळ सरकत तीला प्रेमानं विचारलं, " काय झालं रेवती? झोप येत नाहीये का? " ती काही न बोलता त्याला बिलगली. राजेश समजला की तीला काहीतरी बोलायचे आहे. तिच्या केसांतून बोटं फिरवत म्हणाला, " रेवू, तू नाही सांगितलंस तर कसं कळणार ? "

"मी रंग का नाही खेळणार, हे तुम्ही कोणीही विचारलं नाही. " तीने थोडंसं उदास होत विचारलं.

"अगं बर्‍याच जणांना रंग खेळायला नाही आवडत, माझ्या नात्यात असे कितीतरी जण आहेत त्यांना नाही आवडत." तो सहज म्हणाला. " आणि आमच्याकडे प्रत्येकाच्या मताचा आणि इच्छेचा मान राखला जातो. हे तुला माहिती आहेच. . . . तुला काही सांगायचं आहे का? "

"मला वाटलं होतं की तुम्हीतरी विचाराल म्हणून. . ." ती अजूनही उदास होती.

राजेश नीट उठून बसला. तीलाही समोर बसवले. तीची हनुवटी वर उचलून तिच्या डोळयांत पहात म्हणाला, " रेवू, तुला त्याचं कारण विचारण्यापुर्वी मी काही बोलू? " तीच्या नजरेतील उदासी आता कमी झाली. तीने मानेनेच होकार दिला.

"हे बघ रेवू, मला पुर्णपणे माहिती आहे, केवळ तुला रंग खेळण्याबाबत प्रॉब्लेम नाहीये, तर तुला रंगांपासूनच लांब रहायचं आहे, तुला डोळयांसमोर रंग नकोयत, . . सध्यातरी. पण एक सांग, भले तुझ्या सर्व कलांतून रंगांना वजा करण्याचा तुझा प्रयत्न असेल. पण आपण रंगांपासून खरंच लांब राहू शकतो? या आपल्या छोटयाशा आयुष्यातून आपण रंग वगळू शकतो? . . .


जेव्हा आपला पहाण्याचा कार्यक्रम झाला. तुझ्या माझ्या लग्नाची बोलणी सुरू झाली तेव्हांपासून मला काही गोष्टी कळत गेल्या. आपलं एकमेकांना भेटणं झालं. आवडीनिवडी कळल्या. त्याचवेळी तुझी पहिल्यापासूनची चित्रकला पाहीली. तेव्हांच मला कळलं होतं, जाणवलं होतं. तुला रंगांबद्दल विरक्ती निर्माण झालीय. . .त्याचं कारण???. . .ते मला कधी ना कधी कळंलंचं असतं. पण. . . मलाही तुझ्याशी याबाबत बोलायचं होतं. रेवू, तू एक उत्तम कलावंत आहेस, अशी कलावंत जीचा रंगांशी, रंगसंगतीशी संबंध येतो. त्यामुळे रंगांचं महत्त्व तुझ्यापेक्षा अजून कोण चांगल्याप्रकारे जाणून असेल. मी आता जे काही बोलतोय, माझ्यापुर्वीही तुला कोणी ना कोणी समजावून सांगितलं असेलच. पण त्यावेळेला तुझ्या मनाचा निग्रह पक्का होता, मन ऐकायला तयार नव्हतं. बरोबर ना? प्रत्येकाच्या आयुष्यात अशी वेळ येते किंवा काहीतरी घडतं ज्यावेळेला आपली सर्वात आनंद देणारी गोष्ट आपल्याला नकोशी वाटते. खरंतर हे तात्पुरतं किंवा थोड्या काळापुरता असतं पण आपला इगो त्याला परत स्विकारायला तयार होत नाही. . .कारण ती अनिच्छा आपणच आपल्या लोकांना आक्रसताळेपणे पटवून दिलेली असते. मग काय होतं माहिती आहे? " राजेशने तिचे नाजूक हात आपल्या हातात घेत हसतच विचारलं. . .रेवती क‍ाहीही न बोलता फक्त त्याच्या डोळयांत पहात होती. मध्यरात्रीच्या कृत्रिम मंद प्रकाशातही इंद्रधनुष्य फुललं होतं त्याच्या डोळयांत. जणू सांगत होतं. ' वेडीच आहेस तू. रंगवेडी. माझ्या या सप्तरंगापासून किती अजून काळ दूर रहाणार आहेस? स्वतःला आणि आम्हांला किती दिवस अशी कोंडून ठेवणार आहेस?. . .मुक्त कर दोघांनाही. मनसोक्त उधळू देत आम्हांला तुझ्या हस्ते. . .आम्हा रंगाच्या धारा बरसू देत तुझ्या अंगप्रत्यंगावर. . .' असा विचार येताच रेवती खुदकन हसली आणि राजेशच्या हाताच्या तळव्यांत आपला चेहरा लपवला. होलीदहनाच्या वेळचा गुलाल अजूनही त्याच्या हाताला होता, तो सहजपणे तीच्या गालावर उमटला. राजेशने हसतच तिचा चेहरा वर केला. दोघेही एकमेकांकडे पाहून मोकळेपणाने हसले. ती त्याला घट्ट बिलगली. भर मध्यरात्री दोघांवर अदृश्य रंग बरसत होते. उद्याची धुळवड रेवतीसाठी अविस्मरणीय ठरणार होती. विविध रंगांची बरसात होणार होती तिच्यावर...


Rate this content
Log in