सांस्कृतिक कार्यक्रम
सांस्कृतिक कार्यक्रम
अनुभव हा असा प्रकार आहे जो आपल्या नकळत आपल्याला बरंच काही शिकवून जातो. फार वेगवेगळ्या प्रकारचे असतात हे अनुभव. काही असे की जे कोणालाही येऊ नयेत अगदी वैर्याच्याही असं आपण इच्छितो तर काही वारंवार आठवून स्वताला नशीबवान समजतो.
काल रात्रीचा सांस्कृतिक मनोरंजनाचा कार्यक्रम उत्तमरीत्या पार पडला होता. प्रेक्षकांपासून कलाकारापर्यंत सर्वांनीच धमाल केली होती. कलाकार नवखे होते, अननुभवी होते, पण हौशी होते, प्रामाणिकपणे कला सादर केली होती. सहा वर्षाच्या मुलामुलीपासून साठ वर्षाच्या वृध्दापर्यंत सर्वांनी रंगमंचावर आपली कला सादर केली होती. गेले दहाबारा दिवस आमच्याबरोबर मुलामुलींनी केलेल्या मेहनतीचं, तालमीचं चीज झालं होतं, आणि यासर्व आनंदसोहळ्याचे श्रेय आम्हांला दिले जात होते. पण ते तितकं खरं नव्हतं. हा सोहळा आनंददायी व्हावा म्हणून आमच्या चाळीतील कुटुंबातील एका तरी सदस्याने प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष हातभार लावला होता.
पंचवीस वर्षांपूर्वी मिळालेला तो अनुभव आम्हा सर्व चाळकर्यांच्या स्मरणात अजून आहे. तो आनंददायी अनुभव येण्यापुर्वीचा पुर्ण घटनाक्रम मला अजूनही आठवतोय.
साल १९९६. मिटिंगसाठी सर्वजण वेळेवर जमले होते. निमित्त होतं वार्षिक सत्यनारायण पुजेची तारीख ठरवण्याचं. गेली दोन वर्षे इमारतीच्या रिपेअरिंग कामानिमित्त पुजा करता आली नव्हती. . .कारण पुजेच्या मंडपासाठी आवारात जागाच उरली नव्हती, बांधकाम सामानाने सगळी जागा व्यापली गेली होती. पण यावर्षी काम आटोपत आल्याने बर्यापैकी जागा झाली होती. चर्चा सुरू झाली. यापुर्वी जशी सत्यनारायण पुजा केली जात होती त्याच उत्साहाने साजरी करायचं ठरलं. पण काही तरूण आणि छोटया मुलांना त्याबरोबर काही स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमही व्हावेत असं वाटत होतं. पण त्याला कमिटीच्या पदाधिकारी मंडळींचा विरोध होता आणि त्याला कारणही तसेच होते. तळाला रहाणार्या लोकांमधे आणि इमारतीतील रहिवाशांमध्ये तीव्र वाद सुरू होते. दहापंधरा दिवसांत पोलीस स्टेशनची फेरी व्हायचीच. त्यामुळे कमिटी मेंबरना आणि चाळकरी रहिवाशांना अजून वाढीव मनस्ताप नको होता, शिवाय मुले रात्रंदिवस तालमी करून छानसा कार्यक्रम बसवणार आणि काही लोकांमुळे त्याचा विचका होणार आणि मुले निराश, हताश होणार, हे सर्वांना टाळायचं होतं. बरोबर २० दिवसांनंतर पुजा होणार होती. त्याच्या आदल्याच रात्री कार्यक्रम करायचा होता. कमिटीकडून परवागनी न मिळाल्याने बाळगोपाळ मंडळी निराश झाली होती. पण यावर मी म्हणजे सुनिल, अनिल (दोघे, एक माझा भाऊ आणि एक शेजारी), विद्याधर-प्रशांत हे भाऊ, बाळा, विजय, सचिन, पॉल, जितू, अळवणे, बंदरकर, इ. काका-दादा मंडळी काहीतरी उपाय नक्की शोधतील ही आशाही होती. दुसर्या दिवशीच बाळगोपाळ आपल्या दादांना आणि काकांना कार्यक्रम व्हायलाच हवा हे सांगण्यासाठी जमले.
आम्ही सर्व काका-दादांनी कार्यक्रम करूया असं तोंडभरून आश्वासन दिलं. शिवाय इतरही काही काकी-वहिनी मंडळीही आमच्या साथीला होतीच. त्याही मुलांना प्रोत्साहन देतच होते. आम्ही दादा-काका मंडळींनी पुढाकार घेऊन समिती अध्यक्षांना तात्यांना समजावून सांगितले. समस्या निर्माण झालीच तर त्याचं योग्य मार्गाने निराकरणही करू, कमिटीला त्रास होईल असं काहीही करणार नाही, असा शब्द दिला. तात्यांनाही माझ्यावर खुपच विश्चास होता तरीही इतर सभासदांशी बोलून सांगेन असं सांगितलं. पण या सर्व प्रकारात महत्त्वाचे दिवस जात होते. जेमतेम १८ दिवस बाकी होते. कमीतकमी दिडदोन तासाच्या कार्यक्रमासाठी तालिमही तेवढी हवी. दोन दिवसांनंतरही कमिटीकडून नक्की काय ते कळंलं नव्हतं. कमिटी सांगेपर्यंत वेळ होईल, आपण कार्यक्रमाच्या तयारीला लागायचं, असं सर्वानुमते ठरलं. मी, पॉल, कमलेश, भारतीवहिनी इतरांशी बोलून कार्यक्रमाची रुपरेषा ठरवतील आणि त्याप्रमाणे स्क्रिप्ट लिहिलं जाईल, भारतीवहिनी मुलींची डान्स कोरिओग्राफी, मुलींच्या कार्यक्रमांकडे पहातील तर अमोल छोट्यांची डान्स कोरिओग्राफी पहातील, स्पर्धा सचिन, जितु, अनिल, इ. इतरांशी बोलून ठरवतील, हे सर्वांनी मान्य केलं. स्टेजवर
काम करू इच्छिणार्यांची नावं घेण्याच काम सर्वांनीच आपापल्याकडे घेतलं. दोन दिवसांत स्पर्धा आणि तालमी सुरू करायच्याच होत्या. आता जेमतेम १५ दिवसच बाकी होते. दोन दिवसानंतर स्पर्धा सुरू झाल्या. स्क्रिप्ट फायनल झालं. नृत्ये, विविध विनोदी स्कीट, छोटीशी नाटिका, त्यात बक्षिससमारंभ, अशी रुपरेषा ठरली. सुत्रसंचालन, निवेदन या बाबी मी, भारतीवहिनी आणि विद्याधर करणार होतो. तालमी सुरू झाल्या. संयोजन, नियोजन आणि दिग्दर्शन यांची मुख्य जबाबदारी माझ्याकडे होती. हळूहळू रहिवाशांमध्ये उत्साह जाणवू लागला. कमिटी मेंबर्सचं टेंशन कमी झालं नव्हतं. आणि आमचंही दुसर्या कारणानं वाढलं होतं. तयारी चालू असतांना इतर समस्यांची जाणीव होऊ लागली होती.
पहिली समस्या, या कार्यक्रमासाठी, स्पर्धेतील बक्षिसांसाठी पैशांची गरज लागणार होती. (रिपेअरिंग कामासाठी बराच खर्च झाल्यामुळे कमिटीकडे फारसा फंड उरला नव्हता, तिथून फक्त पुजेसाठी पैसे मिळणार होते.) दुसरी समस्या, पोलीस परवानगी घेऊन ठेवणं आवश्यक होतं. तिसरी, सर्व रहिवाशी बसू शकतील अशा जागी स्टेज उभारणी करणे, तो सजवणे. कलाकारांचा मेकप आणि ड्रेपरी पहाणे. इ. इ. पुन्हा एकदा आम्ही सर्वजण एकत्र जमलो. चर्चा झाली. पैशांची जबाबदारी आम्हीच दादा-काकांनी उचलली. ऐपतीनुसार प्रत्येकाने पैसे द्यायचं ठरवलं. मेकपसाठी वहिनी-काकी आपापल्या मेकपसाहित्यासह मेकप करण्यासाठी तयार झाल्या. ड्रेपरीची जबाबदारी स्वताच उचलायची असं प्रत्येक कलाकाराने ठरवलं, अगदी शालेय मुलांनीसुद्धा. खाली उतरून स्टेजची जागा ठरवून तशा प्रकारचा स्टेज उभारण्याची आणि साउंड सिस्टमची ऑर्डर दिली गेली. कार्यक्रमाच्या पोलीस परवागनीसाठी तात्या आणि पदाधिकारी यांना विनंती करण्यांत आली. जसजसा कार्यक्रमाचा दिवस जवळ येऊ लागला तसं रहिवाशांमध्येही उत्साह संचारला. आतापर्यंत भितीपोटी किंवा काळजीपोटी मागे रहाणारेही आता कार्यक्रम चांगला व्हावा म्हणून पुढे येऊन पडेल ते काम करू लागले. तात्या आणि पदाधिकारीही पोलीस स्टेशनकडून कार्यक्रमाची रितसर परवानगी घेऊन आले. वैशिष्ट्य म्हणजे स्टेज उभारणी आणि साउंड सिस्टिम या दोनच गोष्टी बाहेरच्या एजन्सीकडून ठरवल्या गेल्या, बाकी सर्व गोष्टी हौशी चाळकरी रहिवाशांनीच मॅनेज केल्या. ठरलेल्या दिवशी योग्य वेळेला कार्यक्रम सुरू झाला, कलाकारांना प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. कार्यक्रम खुपच यशस्वी झाला. बाळगोपाळ मंडळीही खुश झाली होती. कलाकार, संयोजक तसेच कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून मेहनत करणार्या सर्वांचच प्रेक्षकांनी, रहिवाशांनी भरभरून कौतुक केलं.
खरंतर या सर्व यशामागे होते आमच्या तात्यांचे आशिर्वाद. त्यांच्यासारखा निस्पृह, प्रामाणिक, सतत चाळीच्याच भल्याचा विचार करणारा, त्यासाठी स्वताचं वय विसरून धावपळ करणारा माणूस, चाळकमिटीचा अध्यक्ष असणे हीच आम्हां तरूणांसाठी अभिमानास्पद गोष्ट होती. गेली काही वर्षे चाळीसाठी ते संघर्षरत होते. तसे ते उत्तम व्हायोलिनवादक होते. थोडंसं काहीतरी वेगळं, आनंददायी वातावरण चाळकऱ्यांइतकच त्यांच्यासाठीही गरजेच होतं. आमच्या कार्यक्रमात त्यांच्या व्हायोलिन वादनाचाही अंतर्भाव करण्यात आला. त्यांनी नेहमीप्रमाणेच उत्तमरीत्या सादर केलं.
त्यानंतर दरवर्षी सत्यनारायण महापुजेनिमित्त स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम करण्याची प्रथा सुरू झाली.
त्या एका गोड अनुभवाने आमच्या अख्ख्या चाळीच वातावरण बदललं. थोडीशी चिंता, भिती होतीच पण त्याचा सामना तरूण, मध्यमवयीन सर्वांनी सकारात्मक उर्जेने आणि दुप्पट जोमाने एकत्रपणे करायचा ठरवलं. कार्यक्रमाच्या कलावंत मंडळीमधली शालेय मुलंमुली, त्यांनाही स्टेज कॉन्फिडन्स आला. प्रत्येक वेळी माणसाला समज येण्यासाठी कटू अनुभवच घ्यावे लागतात, असं काही नाहीये. सर्वांनी मिळून एकत्रपणे निर्माण केलेली वा सादर केलेली एखादी कलाकृतीसुध्दा एक आनंदी अनुभव देते आणि आयुष्यभर तो अनुभव, आनंद आणि ऊर्जा देत रहातो. कालानुरूप काहीजण चाळ सोडून गेले तर काही . .
. . पण जेव्हा कधी चाळीमध्ये भेटीगाठी होतात तेव्हां त्या आनंदी अनुभवाची चर्चा होतेच.