मैत्रेय (बालपणीची सुट्टी)
मैत्रेय (बालपणीची सुट्टी)
आपलं आयुष्य कितीतरी अतर्क्य गोष्टींनी भरलेलं असतं. सर्व प्रकारच्या भावभावना आपण अनुभवलेल्या असतात. बालपण श्रीमंतीत गेलं असेल वा खडतर असेल. सर्वांसाठीच तो सुखाचा काळ असतो. आपल्यावर मनापासून प्रेम करणारी, मायेनं जपणारी माणसं आपल्या जवळपास असतात. जसजसे आपण मोठे होत जातो, तसतसा आपल्यातला प्रौढपणा या निखळ आनंदापासून आपल्याला दूर घेऊन जातो. प्रौढत्व आनंदी नसतं असा याचा मुळीच अर्थ नाहीये, त्यावेळीही आपण आनंद मिळवतो पण तो मोजूनमापून, ठरवून, सर्वांचा विचार करून. बेधुंद होऊन, कसलीही चिंता न करता, कोणालाही न विचारता जो आनंद मिळवतो तो केवळ बालपणीच. आनंदाचे काही प्रसंग आठवायचे असतील तर आपल्याला बालपणातच डोकवावं लागतं. खासकरून डोळ्यासमोर ऊभा रहातो तो शाळेच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा काळ. अर्थातच आम्हीपण मनसोक्त घेतला तो आनंद. भरपूर खेळणं म्हणजे आनंद मिळवणं ही बालपणीची सोप्पीसरळ व्याख्या. वार्षिक परीक्षा संपली की आमच्या खेळांना ऊत यायचा. आम्ही सर्व मित्र सकाळी लवकर ऊठून क्रिकेटचे मैदान गाठायचो. साडेअकरा पर्यंत मनसोक्त खेळून घरी यायचो. मग वेगवेगळे कार्यक्रम असत. दुपारच्या जेवणाआधी एखादा पत्त्यांचा किंवा लुडो सारखा बैठा खेळ होऊन जाई किंवा सुट्टीत दिलेला अभ्यास केला जाई किंवा शेजारच्या काका-मामांनी खास आमच्यासाठी लायब्ररीमधून आणलेली पुस्तकं वाचली जात. माझे आई-बाबा धार्मिक प्रवृतीचे होते. त्यामुळे पोथ्या, ग्रंथ इ. साहित्यही भरपूर होतं. त्याचही वाचन होई. तिसरी-चौथीपर्यंत तर ते सर्व वाचून झालं होतं माझं. दुपारचं जेवण झालं की खो-खो, विटीदांडू, भोवरा, डबा-ऐसपैस हे खेळ तर संध्याकाळी नवा व्यापार, सापशिडी, कॅरम इ. बैठे खेळ खेळायचो किंवा वरळी गार्डन/चौपाटीला फिरून यायचो. त्यानंतर कोणाच्या घरी सर्व मित्र-मैत्रिणी जमून गप्पांचा फड रंगवायचो. त्यावेळेला आतासारखं टिव्ही किंवा इंटरनेट बोकांडी बसले नव्हते. कधीकधी कोणीतरी एखादा नवीन टाइमपास खेळ शोधून काढायचा आणि अजून धमाल यायची. अशीच आगळीवेगळी धमाल आली होती मी दुसरीच्या उन्हाळी सुट्टीत. ही सुट्टी आहे १९७३ सालची.
एका संध्याकाळी सुबोध, साई, मी, माझा भाऊ अनिल, शेजारचा अनिल, त्याचा मोठा भाऊ बाळा इ. जण अनिलच्याच घरी गप्पा मारत बसलो होतो. इतक्यात अनिलला एक नविन खेळ सुचला. त्यावेळेला आमच्या मराठी भाषेच्या पुस्तकांमध्ये एखादी नाटुकली म्हणून धडा असायचा. आम्ही मित्रमंडळीनी तिथल्याच एका पुस्तकातील नाटुकलीतील पात्र बनून अभिनय करायला सुरूवात केली. एकमेकांना अभिनय, संवादफेक शिकवायला लागलो, अगदी गंभीरपणे. आमची ही मजा अनिलच्या बाबांनी (तात्यांनी) सहजच पाहिली. त्यांना आमचा अभिनयाबाबतचा गंभीरपणा भावला. आम्हां सर्व मुलांवर त्यांची माया होती. त्यांच्या प्रेमळ स्वभावाने त्यांनी आम्हांलाही आपलेसे केलं होतं. तात्या स्वताच हरहुन्नरी कलावंत होते. ते उत्कृष्ट व्हायोलिन वादक होते. त्यांचा छोटा ऑर्केस्ट्राही होता. हौशी नाट्यमंडळांना ते संगीतही द्यायचे. आम्ही गंभीरपणे करीत असलेल्या गंमतीचं त्यांना कौतुक वाटलं. एखादं छोटंसं नाटक बसवा, असं त्यांनी आम्हांला सुचवलं. आम्ही मित्रमंडळीही खुष झालो. ही बातमी आमच्या इतर मित्रांना सांगितली. सर्वांनी मिळून कोणत्या प्रकारचं नाटक करायचं यावर चर्चा सुरू केली. आमच्या लोअर परेल विभागात बरीच सार्वजनिक उत्सव मंडळे होती. तेथे नाटकांचे प्रयोग होत, आम्ही कळत्या वयापासून ती पहात आलो होतो. त्यामुळे दोनतीन मुद्दयांवरच चर्चा संपली. १) दोन तासांचं नाटक आपल्याला झेपणार नाही त्याऐवजी एकांकिका करावी. २) एकांकिका ऐतिहासिक असावी शिवाय शिवाजीमहाराजांच्या जीवनातील घटनेवर असावी. ३) स्त्रीपात्रविरहित असावी कारण त्यावेळेला आमच्या चाळीतून स्त्री पात्र मिळणं कठीण होतं. त्यानुसार दोनतीन दिवसांतच आम्ही एक छोटीशी एकांकिका मिळवली. नावं होतं ' सं. स्वराज्याच्या वाटेवर '. छत्रपती शिवाजीमहाराजांच्या स्वराज्यसंघर्षावर आधारित होती. आग्र्याहून महाराजांनी सुटका करून घेतली आणि स्वराज्याकडे निघाले, दरम्यान शंभुराजांना मथुरेच्या एका ब्राह्मणाकडे ठेवले होते अशा प्रसंगावर एकांकिका बेतली होती. त्या एकांकिकेत आठदहा मुख्य पात्रं तर तीनचार अन्य पात्रं होती. संध्याकाळी तीचं रीतसर वाचन करण्यांत आलं. आम्हा सर्वांना आणि तात्यांनाही ती आवडली. " तुम्ही चांगली रिहर्सल करा, बघू मग. " असं आम्हांला सांगितलं. पण त्यांच्या बोलण्याचा गुढार्थ आम्हांला त्यावेळी कळला नव्हता. पण भुमिकेनुसार पात्र ठरवायची होती. आम्ही सर्व मित्रांनी तात्यांकडेचं त्याबद्दल गळ घातली. त्यांनी आमच्या इतर मित्रांना बोलवायला सांगितलं. आम्हा मित्रांची मिटिंग भरली. आम्ही तिघे भाऊ, अनिल आणि बाळा हे भाऊ, दिलीप, विवेक हे भाऊ, गणेश, नंदू, उमेश, साई, सुबोध, नवनाथ, इ. इ. सर्व हजर होते. प्रत्येकाला एकांकिकेत काम करायचं होतं, असंही नव्हतं. पण नाटकाची उत्सुकता सर्वांनाच होती आणि मैत्रीच्या आग्रहाखातर सर्व हजर होते. तात्यांनी आमच्या सर्वांशी विचारविनिमयानंतर भूमिका ठरवल्या. आम्ही तिघे भाऊ, तात्यांचे दोन मुलगे, एक पुतण्या आणि इतर दोनतीन कलाकार असा संच उभा राहिला. मी शंभुराजे, माझा मधला भाऊ मथुरेचा ब्राह्मण तर मोठा भाऊ सुधीर शिवरायांची भुमिका करणार असं ठरलं. शेजारच्या अनिलकडे तानाजी तर दिलीपकडे बहिर्जीची भुमिका आली. बाळा शेलारमामा करणार होता तर रामकृष्ण येसाजी करणार हे ठरलं. एकांकिकेच्या प्रती तयार करण्याचं काम इतर मित्रांनी स्वताहून आपल्याकडे घेतलं. त्यानंतर कलाकारांच्या पालकांकडे रितसर विचारणा केली गेली आणि नंतर सर्व मित्रांसह आमच्या तालमी सुरु झाल्या. कोणा ना कोणाच्या घरी जेव्हा वेळ मिळेल तशी तालीम होई. अगदीच नाहीतर अनिलच्या घरी होई. त्यावेळी तात्या आमच्याबरोबर सामिल होत. आम्हांला सुचना करीत. या नाटुकलीत सर्वांत वयानं मोठा बाळा चौदा वर्षाचा तर छोटा रामकृष्ण चार वर्षाचा होता. सर्वात खास आकर्षण रामकृष्णाचे संवाद होते. थोडेसे बोबडे पण खणखणीत आवाजातील संवाद. एकदोन आठवड्यानंतर तात्यांनी सहजच परिचयातल्या हौशी नाट्यमंडळाच्या एका संचालकाला बोलावून आमची रिहर्सल दाखवली. त्यांनाही आमची धडपड आवडली. त्यांनीही प्रोत्साहन दिले. एकांकिकेत काही नाट्यपदं होती. त्यातली काही वगळायची तर काही सादर करावीत असं तात्यांनी ठरवलं. त्यातलं एक पद माझं होतं. मग पुढचं काम सुरू झालं. तात्यांच्याच ऑर्केस्ट्रामधील गायककलावंत, वादकांनी नाट्यपदं बसवली. ती टेपरेकॉर्डरवर रेकॉर्ड केली गेली. आता तालमीमधे नाट्यपदंही गाऊ जाऊ लागली. एकांकिकेच्या शेवटी लढाईचा प्रसंग होता. त्याचीही तयारी होत होती. आमच्या आजूबाजूच्या सार्वजनिक उत्सवांमधील नाटकांच्या लढाया आम्हा सर्वांनाच माहीत होत्या. आम्ही त्याप्रमाणे स्टेप्स ठरवल्या. तलवारी म्हणून वेताच्या छड्या आणि ढाली म्हणून लहान लोखंडी पिंपांची झांकण उपयोगात येऊ लागली. माझी तर पुर्ण एकांकिकाच पाठ झाली. हळूहळू सर्वजण आपापलं काम, भुमिका चोखपणे करू लागले. संवाद तर पाठ झालेच होते, आता संवादफेकही उत्तम जमू लागली.
ह्
या सर्व तालीमप्रकारात बर्याच गंमतीजमंतीही होत होत्या. बाकी सर्व कलाकार तालीम गंभीरपणानं करत होते पण मुख्य खलनायक एक कोणीतरी खान होता, तो कलाकार नक्की होत नव्हता, सतत बदलत होता. कधी नंदू, कधी गणेश, तर कधी उमेश. जो हजर तो तालमीला उभा रहात असे. पण तिघांनाही त्या भूमिकेत रस नव्हताच. दुसरं असं की रामकृष्णा अजूनही शाळेत गेला नव्हता म्हणून त्याचे संवाद आम्ही त्याला ऐकवून ऐकवून पाठ करून घेतले होते. पण त्याला संवाद कधी संपला हे लक्षात रहात नसे. तो पुढचा संवाद सलग सुरू करे. मग त्याला दुसरा कोणीतरी खूण करी मग तो थांबे. नंतरनंतर त्याला संवाद बोलताना खूण करणार्या पात्राकडे लक्ष ठेव म्हणून सांगितलं गेलं. या एकांकिकेत दोनतीनच नाट्यपदं होती, रेकॉर्ड वाजताना आम्ही फक्त ओठ हलवायचे असं सांगितलं गेलं होतं तरीही उत्साहाच्या भरात आपल्या भसाड्या आवाजात भेसूर सूर लावणं होतं असे. मग दुसरा कोणीतरी दटावत असे. लढाईच्या प्रसंगात कुणाला तरी चुकून छडी इकडेतिकडे होऊन तीचा प्रसाद मिळे. अशा गंमतीजंमतीत तालमी सुरू होत्या.
तात्यांनी पुढच्या तयारीला सुरूवात केली होती. एकांकिका ऐतिहासिक असल्याने मेकप, ड्रेपरी, ढाली-तलवारी इ. सामान लागणार होते. त्यांनी धावपळ करून, ओळखी वापरुन बोलणी सुरू केली. हळूहळू चाळीतही आमच्या नाटकाबद्दल चर्चा सुरु झाली. शेजारची, इतर मजल्यांवरची मंडळी आम्हांला नाटकाविषयी विचारू लागली. खरंतर आम्ही याबाबत कुणाशीही बोलायचं नाही असं ठरवलं होतं पण आमची एकांकिका सादरीकरणापुर्वीच प्रसिद्ध झाली होती. अगदी शेजारच्या चाळीतले मित्रही आम्हांला विचारू लागले होते. मग आम्हीही जास्तच गंभीरपणे नाटकाविषयी त्यांना सांगायचो. तालमी सुरूच होत्या. हळूहळू सुट्टी संपत आली होती. एकांकिका कुठं सादर करायची हे काही ठरलं नव्हतं, आणि आम्हा लहान मित्रांना त्याबाबत काही वाटतंही नव्हतं. आमच्यातील मोठ्या मित्रांना आणि तात्यांना मात्र सादरीकरण लवकरात लवकर व्हावं अशी इच्छा होती.
तात्यांचे परिचयातले हौशी नाटक मंडळीतले बरेचजण तालमी पाहून गेले होते. सर्वांनाच आमचे प्रयत्न आवडले होते. आमचं कौतुकही केलं होतं. खरंतर मध्यमवर्गीय चाळ-संस्कृतीत नाटक-सिनेमाचे खेळ गणेशोत्सवापासून सुरू होत असत. आता तर जून सुरू झाला होता. शाळा सुरू झाल्या की पालक आम्हांला अभ्यासाकडे लक्ष द्यायला बजावणार होते व त्याचा तालमींवर परिणाम होणार होता. त्यात अनियमितता येणार होती. सर्व पालकांच्या दृष्टिकोणातून शाळा आणि अभ्यास महत्वाचा होता. नाटक, अभिनय, गाणं हे फक्त छंद म्हणून ठिक होतं. त्यामुळे सादरीकरण सुट्टी संपण्याअगोदरच होणं आवश्यक होतं. चाळीतच तात्पुरता स्टेज उभारून प्रयोग करणं आर्थिकदृष्ट्या केवळ अशक्य होतं, कारण नाटकाची ड्रेपरी, मेकप, पडदे, सामान, ढाल-तलवारी, स्पिकर, माईक इ. इ. याचाही खर्च होताच. खरंतर या सर्व खर्चिक गोष्टी त्यावेळी आम्हांला कळतही नव्हत्या. पण नाटक सादर व्हावं याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती.
शेवटी तात्यांनी आम्हां सर्वाना बोलावून एक निर्णय घेतला, जेथे आम्ही गंमत म्हणून पुस्तकातील नाटुकली सादर केली होती त्याच जागी नाटकाची रंगीत तालीम सादर करायची, म्हणजे त्यांच्याच खोलीत, येत्या शनिवारी रात्री, म्हणजे तीन दिवसांनंतर, सर्वांची जेवणं आटोपल्यावर.
आम्ही सगळे खुश झालो. त्यादिवशी तात्यांच्या ओळखीतल्या नाट्यमंडळींकडून ड्रेपरी आणली. आम्हा सर्वांना ती कलाकारनुरूप ठरवली गेली. सर्वांनी ते ड्रेस अंगावर चढवून पाहीले, कोणालाही ते बरोबर बसत नव्हते. महाराजांचा जिरेटोप, मावळी पगड्या डोक्यावर थोड्याशा सैलच बसत होत्या. माझा जिरेटोप तर आतून पॅकिंग टाकूनही बसत नव्हता. मी मान वळवली तरी जिरेटोप न वळता तसाच राही. पण दुसरे कुठंलेच पर्याय उपलब्ध नव्हते. त्यादिवशी ड्रेस चढवून आमची शेवटची तालीम झाली. दोन दिवसानंतर आमची जवळजवळ महिन्या-दिडमहिन्याची मेहनत आमच्या शेजार्यांना दिसणार होती. आम्ही, तात्या आणि त्यांचे सर्व कुटुंब, त्यांची मित्रमंडळी, शेजारी, सर्व उत्साहाने कामाला लागले.
१८ x १० चा हॉल व १५ x १० ची आतली खोली अशी त्या खोलीची रचना होती. हॉलच्या खोलीत ५ x १० च्या जागेत एकांकिका सादर होणार होती. उरलेल्या जागेत प्रेक्षक बसणार होते.
सादरीकरणाचा दिवस उजाडला. मुख्य खलनायकाची समस्या उद्भवली. आयत्यावेळी कोणीही कलाकार मिळेना. शेवटी ती भुमिका मी करावं असं ठरलं. (पुर्ण एकांकिका मला पाठ होती ना!) शंभुराजेंची भुमिका पहिली १०-१२ मिनिटं होती, आणि खानाची भुमिका शेवटची १०-१२ मिनिटं. मधल्या १५-२० मिनिटात ड्रेस बदलायचा आणि तयार व्हायचं ठरलं.
त्यादिवशी सर्वाचीच जेवणं लवकर आटोपली. आम्ही तात्यांच्या शेजारच्या खोलीत मेकअप आणि ड्रेसच्या तयारीला लागलो. नाट्यमंडळाचे खास मेकप आर्टिस्ट आले होते. तात्यांच्या खोलीत रंगमंच तयार होता. पार्श्वभागी खिडक्यांवर छानपैकी रंगीत चादरी टाकल्या होत्या. रंगमंच म्हणून जमिनीवर नक्षीदार जाजम अंथरलं होतं . मुख्य पडदा, विंगा, माइक, स्पिकर इ. गोष्टी नव्हत्याच, तशाही आमच्यासाठी त्या गौण होत्या. सर्वांची मेकप, ड्रेसिंग इ. ची तयारी पुर्ण झाली. पगड्या पातळ कपड्याने हनुवटीला बांधण्यात आल्या. मला मान वारंवार न वळवण्याची सुचना देण्यात आली. तात्यांनी येऊन सर्वजण तयार असल्याची खात्री केली आणि तिकडे जाऊन एकांकिका सादरीकरणाची उद्घोषणा केली. आम्ही सर्व कलावंत नांदीसाठी त्या अनोख्या रंगमंचावर जाऊन उभे राहीलो. रंगदेवतेची पुजा केली. एका उत्साही शेजार्याने मस्तपैकी गार्हाणं घातलं. नांदी सुरू झाली. ती सुरू असतांनाच मी हळुच प्रेक्षकांवर नजर फिरवली. पुर्ण खोली, खोली नव्हती आता ती, आमच्यासाठी ते भलंमोठ्ठं प्रेक्षागृह होतं, तुडुंब भरलं होतं ते. सर्वांच्या डोळयांतून कौतुक ओसंडत होतं. दिवसभर उघड्या अंगाने हुंदडणारी आपल्या शेजारची मुलं शिवाजीराजांचे नाटक सादर करतायत, हे त्या कौतुकात दिसत होतं. एकांकिका पार पडली. यथावकाश काही महिन्यानंतर ती आमच्या आजूबाजूला होणार्या सार्वजनिक उत्सवातही सादर झाली. (फक्त तेथे खानाची भुमिका मला करावी लागली नाही.) आम्हा सर्वांचेच तिथल्याही लोकांनी, प्रेक्षकांनी भरपूर कौतुक केलं.
त्यानंतर कितीतरी उन्हाळी सुट्टया आल्या नि गेल्या पण ती आगळीवेगळी सुट्टी कायमस्वरूपी लक्षात राहिली. या एकांकिकेमुळे कित्येकजण कैक वर्षे मला शंभूराजे ह्या नावाने हाक मारत होते.
ह्या एकांकिकेला कित्येक वर्षे लोटली. त्यानंतर जसजसे मोठे होतं गेलो तसतशी नाटक आणि त्यातील अभिनय, नाट्यलेखन, नेपथ्य याची समज हळूहळू येऊ लागली. त्यानंतर आतापर्यंत बर्याच सांस्कृतिक कार्यक्रमासाठी लेखन केलं, दिग्दर्शन केलं, नेपथ्य केलं. गरज असेल तर अभिनयही केला. पण हे सगळं हौसेपोटी केलं. तो सगळा प्रकार छंदाचा होता, आवडीचा होता. तो अजूनही तसाच आहे. बालपणी त्यावेळेला हौशी रंगभूमीच्या नाट्य मंडळांनी आम्हांला केलेली मदत अजूनही आठवणीत आहे. म्हणूनच हौशी कलाकार म्हणून त्यावेळेला मिळालेली उपाधी आमच्यासाठी भूषणावह होती, अजूनही आहे.