sunil sawant

Tragedy

4.0  

sunil sawant

Tragedy

सखी...

सखी...

8 mins
260


शंतनू एकाग्र होऊन पोर्ट्रेट काढत होता. मंजिरी त्याच्यासमोर एक सुंदर पोज घेऊन बसली होती. मंजिरी रत्नपारखी, एका सुप्रसिद्ध उद्योगसमुहाची मालकिण होती. उद्योग यशस्वीपणे संभाळताना स्वतामधील रसिकताही तीने जिवंत ठेवली होती. उभरत्या कलावंताचा शोध घेऊन आपल्या उद्योगसमुहामार्फत प्रोत्साहन देण्याचं कार्य ती नित्यनेमाने करीत असे. अशाच प्रयत्नांमधून तीला शंतनूबद्दल कळलं होतं. शंतनू एक उदयोन्मुख चित्रकार होता. दोनतीन वर्षांपूर्वी कला विद्यापीठातून सुवर्ण पदक मिळवत त्याने पदवी घेतली होती. अजूनही त्याच्या कलेला हवा तसा वाव मिळाला नव्हता. पेंटिंगची एकदोन एक्जिबीशनही भरवली होती पण त्यातही विशेष कमाई नव्हती झाली. मंजिरी त्याला भेटली होती आणि त्याची कला पाहून मंजिरी त्याच्या कलेवर एकदम फिदा झाली होती. त्याची डाय हार्ड फॅन झाली होती. शंतनूकडून स्वताची बरीच पोर्ट्रेट बनवून घ्यायची असं तीने मनोमन ठरवलं होतं. आणि त्याप्रमाणे शंतनूने मंजिरीचं पोर्ट्रेट बनवण्याचं काम चालू केलं होतं.


दारावरची बेल वाजली अन शंतनू दरवाज्याकडे धावला, त्याने पटकन दार उघडले. दारात मंजिरी होती. तीला बघून त्याला मनातून आनंद झाला, पण तसं न दाखवता तो आतून पाणी घेऊन आला. मंजिरी आत येऊन बसली. शंतनूने दिलेले पाणी तीने बाजूला टिपॉयवर ठेवले. शंतनू आपल्या नेहेमीच्या जागेवर जाऊन बसला.

" कशी आहेस? सर्व ठीक आहे ना? " शंतनूने थोडंसं काळजीने विचारलं.

" का? तुला असं का वाटतं ? " मंजिरीने सहजपणे विचारलं.

" नाही त्यादिवशी. . . . त्यादिवशी तू गेलीस अन मला एकदम टेंशन आलं. " शंतनूच्या बोलण्यातून टेंशन जाणवत होतं.

" ओह. . .रत्नपारखींबद्दल तुला फारच कमी माहिती आहे रे, तुला वाटतं तसं काही नाहीये, त्यांना माझ्याबाबत कसलीही तक्रार नाहीये, माझ्यावर पुर्ण विश्वास आहे त्यांचा." मंजिरी मंदपणे स्मित करत बोलून गेली. शंतनूला हे अनपेक्षित होतं.


खरंतर तीनचार दिवसांपूर्वी मंजिरी आणि शंतनू त्याच्या रुमवर एकत्र असतांना अचानक रत्नपारखी आले होते. त्यांना त्यावेळेला पाहून शंतनू भितीने गारठला होता. पण रत्नपारखीसाहेब मात्र तसं काहीही न दाखवता शांतपणाने त्याला 'गुड नाईट' बोलून मंजिरीला घेऊन निघून गेले होते. त्यामुळे शंतनूची चिंता अजूनच वाढली होती. तत्पुर्वी गेले कित्येक दिवस मंजिरीशिवाय किंवा तीच्या आठवणीशिवाय त्याचा दिवस उगवला नव्हता आणि रात्र संपली नव्हती. पण गेल्या तीनचार त्याने मनात तीला भेटण्याची तीव्र इच्छा असूनदेखील तीला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला नव्हता. पण आज सकाळीच मंजिरीचाच फोन आला होता आणि जास्त काहीही न बोलता मी संध्याकाळी येतेय एवढंच ती बोलून तीने फोन कट केला होता. तेव्हांपासून तर शंतनूची अवस्था तर अधिक विचित्र झाली होती. आणि ठरलेल्या वेळी ती घरी आली होती.


" म्हणजे काहीही बोलणं झालं नाही तुमच्या दोघांत ? " शंतनूने विचारले.

" का ? काही जोरदार बाचाबाची, भांडण व्हायला हवं होतं ? " मंजिरीने विचारलं.

" नाही, नाही! " शंतनू सावरून बोलला, " तसं काही नाही. पण रत्नपारखी आले होते तेव्हां . . . "

" ओऽ. . .पण त्यांच्या वागण्यात तसं काही जाणवलं तुला ? राग, चिडचिड दिसली तुला? " मंजिरीचा प्रश्न.

" नाही. उलट शांतपणे गुड नाईट बोलून निघून गेले होते. .आणि म्हणूनच . .म्हणूनच, त्याबाबत अजूनही माझ्या मनात संभ्रम आहे. मला काहीही समजलेलं नाहीये." शंतनू अजूनही गोंधळलेला होता.

" काहीही संभ्रम बाळगू नकोस. रत्नपारखींना आपल्यातील संबंधांची कल्पना त्याच दिवशी आली होती ज्यादिवशी आमच्या बंगल्यात तु त्यांना नको त्या वेळी भेटला होतास. " मंजिरीने गौप्यस्फोट केला.

" काय्य? " शंतनू चमकला. " हे काय बोलतेयस तू ? "

" का ? एवढं आश्चर्य का वाटतंय तुला ? " मंजिरीची प्रतिक्रिया.

" अं. . .बरोबर आहे तुझं. . . .हे त्यावेळी माझ्या लक्षात यायला हवं होतं. मी त्यावेळी तसं वागायला नको होतं. चुकलंच माझं. थोडासा संयम राखायला हवा होता. त्यानंतरही मनात खुपवेळा विचार आले की माझं असं वागणं चुकीचं आहे. पण. . . " शंतनूचा अपराधी स्वर.

" पण ? पण काय ? आणि आताच हे बोलायच खास कारण ?. . . . हे बघ, येथे संयम राखायचं काम दोघांच होत. जर काही चुकीचं झालं असेल तर दोषी दोघेही आहोत. " मंजिरीचा शांतपणा.

" जर काही चुकीचं असेल तर, म्हणजे ? तुला म्हणायचंय काय ? " शंतनूची गोंधळलेली अवस्था.

" हे बघ शंतनू, ते क्षण आपल्या दोघांनाही हवे होते. we wanted to enjoy that moments, and we enjoyed. that's all. . . .हंत्यानंतर कदाचित काही गोष्टी आपण ठरवून केल्या असतील. पण पहिल्यांदा जे घडलं ते उत्स्फूर्त होतं. त्याबद्दल खंत का ? " मंजिरीचा स्वर शांत पण ठाम होता.

" तुझं म्हणणं खरं असेल. पण आपल्या आनंदामुळे कोणीतरी दुखावलं असेल आणि त्याला कारण मी असेन तर. . . .मी. . रत्नपारखीबद्दल विचार करतोय. त्यांचं वाईट वाटणं, चिडणं, ओरडणं चुकीचं नसतं ठरलं. कोणीही त्यांच्या जागी असता तर एवढा शांत नसता राहीला. " शंतनूने मत व्यक्त केलं.

" तू बोलतोयस ते खरंय. रत्नपारखींबाबत तुला वाटणंही साहजिक आहे कारण आपण ज्या समाजात रहातोय, संस्कृतीत वाढलो त्यात अशा गोष्टी


अनैतिक मानल्या जातात. स्त्रियांच्या बाबतींत तर नियम अगदी पुराणकाळापासून चालत आले आहेत. पण रत्नपारखी आणि मी, आमचे संबंध फार वेगळे आहेत. आम्ही आमची वैयक्तिक आयुष्यं जगण्याचा अधिकार एकमेकांना दिलाय. आम्ही आमच्या समंजसपणाने ती आयुष्य जगतोय. एकमेकांशी समजून घेणं हीच आमची प्राथमिकता आहे. .अंहं. . .असं चकित होऊ नकोस, मी माझ्या वागण्याचं उदात्तीकरण नाही करत किंवा इतरांनी तसं वागावं असंही सुचवायचही नाहीये मला. पण आम्ही दोघेही पतीपत्नी म्हणून, एका मुलाचे पालक म्हणून, आमच्या रत्नपारखी उद्योगसमुहाचे मालक म्हणून, सर्व भुमिका आणि कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडतोय. दोघेही त्यासाठी पुरेसा वेळ देतो, पैसा देतो. . .आणि सर्वात मुख्य म्हणजे एकमेकांवर मनापासून प्रेम करतो. अगदी निस्सीमपणे. . ." मंजिरी शांतपणाने बोलून गेली. शेवटच्या वाक्याने शंतनू चमकला.


" मग मी ? माझं काय ? माझ्यावर प्रेम नाहीये तुझं ? " शंतनूच्या स्वरात थोडासा संशय आणि बरीचशी निराशा दिसत होती.

" शंतनू, एक उत्तम कलावंत म्हणून मी तुझा मनापासून आदर करते. तुझ्या कलेची तर डाय हार्ड फॅन आहे. तुझ्या या कलेने मला तुझ्याकडे आकर्षित केलं आहे, " मंजिरीचं बोलणं सुरू होतं.

" म्हणजे माझ्यावर नाही तर माझ्या कलेवर तुझं प्रेम आहे. मग माझ्याबद्दल काय होतं ? " शंतनू दुखावला होता.

"शंतनू, तुम्ही पुरुष किती सहजपणाने निष्कर्ष काढून मोकळे होता ना ? " मंजिरी मंदपणे हसत म्हणाली. शंतनू तीच हसणं पाहून अधिकच गोंधळला. " अरे, कुठलीही स्त्री जेव्हा एखाद्या पुरुषावर मनापासून प्रेम करते तेव्हांच ती त्याला आपलं सर्वस्व देते. एक खरं आहे की आकर्षणाशिवाय आपलेपणा नाही आणि जर आपलेपणाच नसेल तर प्रेम कसं होईल ? बरोबर ना ?. . . . तसं पाहीलं तर प्रेमाची व्याख्या आतापर्यंत स्पष्टपणे कोणीतरी करू शकलाय का ?. . . माझ्यामते तर प्रेम आणि प्रेमाची व्याख्याही व्यक्तिसापेक्ष आहे. कुणाच्या त्यागात प्रेम आहे तर कुणाच्या उपभोगात. . . . मी एक विचारू ? तुझं माझ्यावर प्रेम आहे ? " मंजिरीने पटकन विचारलं.

" अं. .काय म्हणालीस ? " शंतनू दचकल्यासारख बोलला.

" एवढा का दचकलास ? मी एक साधासा प्रश्न विचारलाय." मंजिरीने मंदपणे हसत शंतनूकडे पाहीलं. शंतनू मान खाली घालून मंजिरीची नजर चुकवू लागला. " नाही ना उत्तर देता येत. माझ्याकडे आहे त्याचं उत्तर. मला तुझ्याबाबत सर्वकाही माहीत आहे. पण तु एक बरं केलंस, खोटं नाही बोललास. आणि तसंही पाहीलं तर पण प्रेम आणि सुख याचा काय संबंध? माझ्यामते तर प्रेम ही आंतरिक भावना आहे आणि सुख ही भौतिक, शारिरीक. मग मी तुझ्यावर प्रेम केलं काय किंवा नाही केलं काय, काही फरक पडतो ? आपण एकत्रपणे काही शारिरीक सुखाचे क्षण अनुभवले. यातच सर्व काही आलंय ? " मंजिरीने आपलं मत मांडलं.

" तुझ्या बाबत तु म्हणतेस ते खरंही असेल पण जसं रत्नपारखींबाबत माझं मन खातंय तसंच अजून एका व्यक्तिबाबतही मन थोडंसं खंतावत आहे. तु आताच उल्लेख केलास, त्याबाबतच. " शंतनूचा अपराधी स्वर कायम होता. " पण त्याला माझा नाइलाज होता. तूझ्या व्यक्तिमत्त्वाचं जबरदस्त गारुड माझ्यावर झालं होतं. खरंतर तु माझ्यापेक्षा वयानं मोठी आहेस. मी अविवाहित तरूण तर तु मध्यमवयीन विवाहीत. मी साधा मध्यमवर्गीय कलाकार तर तू यशस्वी उद्योजिका. पण तुझं व्यक्तित्वचं असं की मी तुझ्यासमोर खुजाच राहीन आयुष्यभर. . ."

" एवढा न्युनगंड का बाळगतोयस तू ? मी एक सांगू, तुझी कला हेच तुझं बलस्थान आहे. माझ्या सगळ्या बाबी त्यापुढे फिक्या पडतील. लोकांना अजूनही तुझा आणि तुझ्या कलेचा पुर्ण परिचय झालेला नाहीये. एकदा ते झालं की बघच तू. " मंजिरीच्या नजरेत कौतुक दिसत होतं.

" कदाचित तसं असेलही. पण तुझ्याकडून मला जे काही मिळतेय त्याची तुलनाच होऊ शकत नाही. तु एखाद्या परीसारखी माझ्या आयुष्यात आली आहेस. माझ्या सर्व इच्छा पुर्ण करण्यासाठी. . . .एखादी इच्छा सांगावी अन् जादुई छडी फिरवून तु पुर्ण करावी. . . सुंदर परीराणीसारखं तुझं बोलणं, तुझं हसणं, तुझं वागणं. . . त्याशिवाय एक व्यक्ती म्हणून तु़झं कर्तुत्व, तुझी कामाबाबतची वचनबद्धता आणि त्यासाठी झोकून द्यायची वृत्ती, त्याबाबतची समरसता, संयमित मुक्त जगणं, स्वताबरोबर दुसर्‍याला सुखात गुदमरून टाकणं. किती बोलू आणि किती सांगू . . . जेव्हापासून आपली भेट झालीय तेव्हांपासून ध्यानी, मनी, स्वप्नी केवळ तू आणि तूच दिसतेयस. तुझी सतत ओढ लागून रहाते. कधीकधी 'हे चुक आहे, शंतनू स्वताला सावर,' असं मनात विचार येतातं पण तु समोर आलीस हे सर्व विचार विरघळून जातात आणि उरते फक्त तुझा सहवास भरभरून मिळावा हि इच्छा. "

" तसं असेल तर शंतनू, आता हे सर्व काही थांबणार आहे. " मंजिरी सहजपणे म्हणाली.

शंतनूला पहिल्यांदा समजलंच नाही.

" मी बँगलोरला जातेय, बहुतेक कायमची." मंजिरी गंभीर झाली होती.

" हे काय बोलतेयस तु? " शंतनूला अविश्वासाने पहात बोलला.

" खरंतर गेले कित्येक दिवस मी आणि रत्नपारखी दोघेही बिझी होतो. गेले तीनचार दिवस जरा जास्त बिझी झालो होतो. आमच्या बिझनेस डेवलपमेंटबाबत धावपळ चालू होती. बँगलोरला प्रोजेक्ट सुरू होणार आहे. त्यासाठी बँगलोरला शिफ्ट होणे गरजेच आहे. आमच्या दोघांचा हा निर्णय आहे. मी उद्याच जाणारेय." मंजिरी पुढे बोलतच होती. शंतनू अजूनही सावरला नव्हता. तीच्याकडे अविश्वासाने पहात होता. त्याच्या डोळयांत अश्रु होते. तीच्या ते लक्षात आले. ती जवळ गेली.

" हे फार चुकीचं करतेस तू. फार वाईट केलंस तू, मंजिरी. " शंतनू लहान मुलासारखा रडत होता. " आणि हे असं काही करायचंच होतं तर तू माझ्या आयुष्यात तरी का आलीस ? मी कसा राहू शकतो तुझ्याशिवाय ? "

त्याचं दुखं बघून मंजिरीलाही वाईट वाटले. त्याच्या केसांतून बोटं फिरवत समजूत घालण्याचा प्रयत्न करू लागली.

" तू नको जाऊस, प्लीज. मंजिरी प्लीज." शंतनू गयावया करत म्हणाला.

" हे बघ शंतनू, ही वेळ आपल्या आयुष्यात कधीतरी येणारच होती. ती आज आलीय. आपल्या प्रत्येकाचं स्वताच आयुष्य असतं. ज्याच्याशी जोडलं गेलंय किंवा जोडलं जाणार आहे त्या आयुष्याचंही दायित्व असतं. प्रत्येकाच्या आयुष्यात एखादा सखा किंवा सखी काही काळापुरता येतात आणि आयुष्य लख्ख उजळवून जातात. आपलंही तसंच काहीसं झालंय. शंतनू, आयुष्यातील सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. काहीकाहींचं आपल्याला तीव्र आकर्षण असतं त्या मिळवण्यासाठी पराकोटीचे प्रयत्न केलेले असतात तरीही त्या हाती येत नाहीत. तर कधीकधी आपल्या अपेक्षेहूनही मोठ्या गोष्टी अत्यंत सहजपणे मिळतात. काही काळ काही गोष्टी आपल्या मनासारख्या होतात पण त्या कायमस्वरूपी असतातच असं नाही. त्यामुळे अशा गोष्टींबाबत आपण जास्त विचार करायचा नसतो, त्या अल्पायुषी असतात. आपल्या नजरेसमोर असतात, पण आपण तेथे पोहोचेपर्यंत त्या निघून गेलेल्या असतात. पण ज्या आपल्या हातात असतात, कायमस्वरूपी आपल्या असतात त्यांना प्रेमाने संभाळायच असतं. त्यांना निगुतीनं जोपासायचं असतं. जतन करायचं असतं. मलाही तुझी सतत आठवण येत राहील. . . पण. . . .पण आता निघायला हवं. " एवढं बोलून मंजिरी शांतपणाने उठली आणि दरवाजाकडे निघाली. शंतनू कितीतरी वेळ उघडया दरवाज्याकडे अश्रू भरल्या नजरेने पहात राहिला, ती पुन्हा येतेय का ते पहात...


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy