मैत्रेय (घोळ-आंघोळ)
मैत्रेय (घोळ-आंघोळ)


किस्सा जुनाच, नव्वद - पंच्याण्णवातला, . . . .
रविवारची सकाळ, म्हणजे सकाळ संपून दुपार सुरू होण्याची वेळ. नुकतीच एक मॅच हरून आलेली आपली मंडळी टाईमपास करत बसली होती. थोड्याच वेळापुर्वी सर्व मंडळींनी मॅच हरण्यावर विवेचनात्मक वीररसपुर्ण चर्चा केली होती. त्या चर्चेदरम्यान सर्व मंडळींनी खेळातल्या चुका दाखवत दाखवत दुसर्याच्या मातापित्यांची आणि त्यांच्या नातेवाईकांची आस्थेने विचारपूस केली होती. त्या चर्चेचा शेवट झाला तो नेहमीप्रमाणेच ' पुढच्या मॅचमध्ये बघच तू. माझा असली काय गेम असतो ते. .' अशा पोकळ धमकीवजा, चॅलेंजवजा आश्वासनांनी. प्रत्यक्षात पुढच्याही मॅचमधे धमकी, चॅलेंज सर्व वजा होणार होतं आणि फक्त आश्वासन उरणार होतं.
त्यानंतर काहीजण निघून गेले होते. ज्यांच्या जेवणाला अजून वेळ होता ते संज्या(संजय), सुहास, पक्या(पंकज), सुमित, मह्या(महेश), मनोज टाइमपाससाठी कोणी ' मामा ' मिळतोय का ते शोधत होते. या ' मामा बनवणं ' प्रकारात मह्या, सुमित आणि सुहासने डॉक्टरेट मिळवली होती. सुमित तर महाअवली. या तिघांच्या सहवासात राहून बाकीचेही हळूहळू तयार होत होते.
मह्याने इकडचा तिकडचा अंदाज घेत नेहमीप्रमाणे गळा काढला. या मह्याचं गाणं म्हणजे मोठा प्रॉब्लेम होता. एकतर त्याला गाण्याचा गळा नव्हता, दुसरं असं की त्याच्या बोलण्यात ' र ' चा उच्चार ' ग ' असा व्हायचा. कधीकधी तर त्याच्या गाण्यात ' र ' असलेले शब्दच जास्त असायचे. तरीही तो आवडीन गाणं गायचा. आम्ही केवळ मित्र म्हणून कानावर होणारा अत्याचार सहन करायचो. तर त्याचं त्यादिवशीच गाणं होतं. ' इश्कमे हम तुम्हे क्या बतायेऽऽ, किस कदरऽ चोट खाये हूए हैऽऽ. .' काहीजण गाणं ऐकतोय असं दाखवत आपापसांत गप्पा मारू लागले. मह्याचं गाणं रंगात आलं आणि जितूचं आगमन झालं. तसा शांत स्वभावाचा जितू या मंडळीमध्ये क्वचितच असायचा. मह्याचा सुर टिपेला पोहचला होता, 'अाजही हमने बदले है कपडे, आजही हम नहाये हुए हैऽऽ. . .' का, कोण जाणे, पण ह्या ओळीवर जितूला मह्याची खेचावीशी वाटली आणि चेष्टेच्या सुरात तो म्हणाला, "काय महेश, काय आजच आंघोळ केलीस होय? . . .आणि बाकीचे दिवस गोळी घेतोस की काय?"
सगळी मंडळी एकदम सावध झाली. जितू मात्र आपण कशी महेशची खेचलीय, अशा अविर्भावात विजयीमुद्रेनं इतरांकडे पाहू लागला, पण मंडळी तर एकमेकांकडे आणि जितूकडे गंभीरपणे पहात होती. महेशचाही सुर थांबला होता.
संजयने हळूच तोंड उघडलं, " जितू, हे काय ऐकतोय मी? "
संजयचा एकंदर अविर्भाव पाहून जितू चपापला, हळूच दबकत उत्तरला, " का ? काय झालं ? "
सुहास एकदम गंभीरपणे म्हणाला, " तू मह्याला काय म्हणालास ? आंघोळ केलीस का ? आणि आज आंघोळ केलीस का ? तु आज आंघोळीबद्दल विचारलंस? आजच्या आंघोळीबद्दल. . ."
जितूने सुहासचे प्रश्न ऐकून मोठ्ठा सुस्कारा सोडला. हुश्श केलं आणि हसतच म्हणाला, " का ? म्हणजे तो आंघोळ करत नाही ? इऽऽ."
परत मंडळींनी एकमेकांशी नजरेचे इशारे केले. आता मनोजने उडी घेतली, " सिर्फ वोऽऽ ? म्हणजे तुम महेशके बारेमे बोल रहे हो, जानी? " आज मनोजमधे राजकुमार शिरला होता. " पर जानी, तु फक्त त्याच्याबद्दलच विचारतोयस. . .?"
" म्हणजे ? तुम्ही बाकीचेही आंघोळ नाही करीत ? " जितूच्या भाबड्या शंकेत आता कुचेष्टेचा सुर होता.
" फिर क्या जानी? " मनोजमधील राजकुमार ऐकायला तयार नव्हता. " बर्खुरदार, हम जवान लोग है. आपला रक्त कसा गरम राह्यला पायजे. नहानेसे ठंडा हो जाता है. जानी ! "
" काहीही थापा नको मारूस. चल ! असं असतं काय?" जितूने त्याला उडवून लावला.
संजय उवाच, " यात थापा काय ? च्यायला दरदिवशी कोण ती खीटखीट करीत बसेल ? पाणी घ्या. गरम करत ठेवा. मग वाट बघत बसा. तापलंय असं वाटलं की मग बादलीत ओतून घ्या. नुसती कटकट. मीपण नाही करत दरदिवशी आंघोळ."
" सही बात है, जानी! " बाजूने पुन्हा राजकुमारचा आवाज आला, " आंघोळीसाठी तर हमारा एकही उसुल है, आज करे सो कल कर, कल करे सो परसो, इतनी भी क्या जल्दी जब जीना है बरसो. ."
" वाहव्वा, क्या बात है, मनोज. सुभानल्ला " सर्व मंडळीनी एका सुरात मनोजला दाद दिली. जितू एकदम भांबावला मग स्वताला सावरत सुहासकडे वळत म्हणाला, " यांना वेड-बीड लागलं की काय? काय बडबडताहेत त्यांनाच माहीत. सुहास, तु सांग, तु आज आंघोळ केलीस ना? " सुहास खरं बोलेल याची खात्री जितूला होती.
सुहासचं उत्तर, " म्हणजे काय ? अर्थातच. नक्कीच आंघोळ केलीय मी आज." यावर जितूने पुन्हा मोठा सुस्कारा सोडला. " तसंही, गेल्या रविवारनंतर म्हणजे एवढ्या मोठ्या गॅपनंतर आज आंघोळ करायलाच हवी ना? " सुहासचा खुलासा. जितुला हे ऐकून काय बोलावं हे कळेना. सर्व मंडळी मान फिरवून खुसखुसत होती.
आता पक्याच्या काहीतरी लक्षात आलं, त्याने सुरूवात केली, " एक मिनिट, एक मिनिट. . . जितू आपल्याला विचारतोय. . . म्हणजे कळंलं का ? . . .म्हणजे तो बहुतेक दरदिवशी आंघोळ करतोय. " सर्वांनी दचकून मोठ्ठा 'आँऽ ' केला.
सुहास अविश्वासाने पहात, " जितू, काय म्हणतोय पक्या ? हे खरंय ? "
" मगऽ! खरंच आहे. " जितूचं बाणेदार उत्तर आणि वर त्याने पुस्तीही जोडली. " मला नाही आवडत घाणेरडं रहायला."
सर्वांनी पुन्हा मोठ्ठा 'आँऽ ' केला.
" किती हि पाण्याची नासाडी, जितू. आणि तू. . . तुझ्यासागख्या सज्जन मित्गाने असं कगावं ? आऽ. . असाच विचाग सग्वजण कगायला लागले तग, आऽ . . . तग इतगांना प्यायलाही पाणी मिळणाग नाही. ठाऊक आहे तुला. हि स्वार्थी वृत्ती आहे, जितू." हे बोलतांना मह्याने एकदम भावूक होण्याची अॅक्टींग केली होती. सगळे बळेबळेच गंभीर झाले होते आणि जितूकडे चोरट्या नजरेने बघत अंदाज घेत होते. जितू ह्यांची नाटकं पहात होता, पण ती बंद करावी असा एकही पुरावा सापडत नव्हता. आपण नकळतपणे ' मामा ' बनतोय हे त्याला उमगलं होतं आणि हि मंडळी तर दरदिवशी आंघोळ केल्यामुळे काय, कुठं, कशाकशा वैयक्तिकरीत्या आणि सामाजिकरीत्याही समस्या निर्माण होतात ते रंगवून रंगवून सांगत होती.
अचानक जितू कट्ट्याला लागूनच असलेल्या बाबुशेठच्या दुकानाकडे निघाला. तसं पाहीलं तर बाबुशेठ सर्वांपेक्षा वयानं बर्यापैकी मोठा पण सर्वांचा मित्र बनून रहायचा. जितूला तिकडे जाताना पाहून या सर्वांना समजलं की जितू त्यालाही आंघोळीबद्दलच विचारणार अाणि आतापर्यंता जमवलेला टाइमपासचा डाव फिस्कटणार. तरीही ' जितू, तु बाबुशेठला जाऊन विचार. तोपण सांगेल दरदिवशी आंघोळ करणं चुकीचं आहे ते.' असं सुहास मुद्दामच मोठ्या आवाजात म्हणाला. दोनतीन मिनिटात जितू निराश होऊन बाहेर आला. सुहासचं ओरडून बोललेलं बोलणं बहुधा कामी आलं होतं. बाबुभाईसुध्दा ह्यांच्या पार्टीत सामील झाला होता. सर्व मंडळी मनातून आनंदली होती.
" मग काय बोलले बाबुशेठ?" पक्याचा उत्साही प्रश्न.
" काय बोलणार? मी त्यांना विचारलं ' बाबूशेठ, आंघोळ नेहमी करायला हवी ना?' तर. . .हे शेठ साने गुरुजी बनले आणि त्यात पुन्हा अध्यात्मात शिरले." जितूचा त्रासिक चेहरा.
" म्हणजे " मह्याचा गंभीर सवाल.
" मला म्हणतात, जितू, आंघोळीने शरीरशुध्दी होते हे खरं रे, पण या मनाच काय करशील ? ते कशानं स्वच्छ करशील जितू ? तेही शुध्द नको का व्हायला ? नुसत्या देहशुध्दीने काय होणार ? चित्तही शुध्द व्हायला हवं. तरच जीवन शुध्द होईल. आपल्या तुकोबारायांनी म्हटलंच आहे, ' नाही निर्मळ जीवन, काय करील साबण' आता यावर मी काय बोलणार होतो." जितूच्या चेहर्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. सर्व मंडळी चेहर्यावर गांभीर्य ठेवून पण आतून खदखदून हसत होती. जितू मनातून चडफडत होता. कसंही करून या अतिशहाण्यांची जिरवायचीच, तीही आत्ताच. असं त्याने पक्कं ठरवलं होतं. पण कसं ते त्याला सुचत नव्हतं. सर्व मंडळी आता घरी निघायचं म्हणून उठली. जितूचा ' मामा ' केल्यामुळे बर्यापैकी टाइमपास झाला होता.
इतक्यात कोपर्यातल्या वळणावरून एक काका येतांना दिसले. जितूकडे आपला खरेपणा सिद्ध करण्याचा आता शेवटचा उपाय होता. त्याने या सर्वांना थांबवल आणि काकांच्या दिशेने निघाला. ते काका अनोळखी होते. आपला जमवून आणलेला खेळ शेवटच्या क्षणी फिसकटणार याची मंडळींना जाणीव झाली. सर्वजण थोडेसे निराश झाले. जितूने हिम्मत करून त्यांना विचारलं, " काका, नेहमी आंघोळ करणं चांगल ना? " काकांकडून काय उत्तर येतय, यासाठी सर्वांनी कान टवकारले. . . .
" आँ? काय म्हणालास? " काकांनी डोळे बारीक करत आपल्या कानाकडे हाताचा पंजा नेत विचारलं.
" बापरे! काकांना कमी ऐकू येतयं. " जितु पुटपटला. पण ह्या अतिशहाण्यांची खोड मोडायचीचं असं त्याने ठरवलंच होतं. अजून जवळ जात थोडंसं मोठ्या आवाजात पुन्हा विचारलं.
" अरे, हळू बोल. बहिरा नाहीये मी. " काका करवादले. " बर! आंघोळीच म्हणशील तर तुला असं वाटतं तर असेल चांगलं, पण माझं मत विचारशील तर कठीण आहे रे बाबा माझ्यासाठी. ती चंगळ मला नाही परवडायची रे, तूला परवडते तर तू कर हो. " काकांच उत्तर ऐकून मंडळींना एकदम हास्याचा उमाळा आला पण काकांसमोर नको म्हणून त्यांनी तो रोखून धरला. बळेबळेच गांभीर्याचा आव आणून मंडळी उभी राहिली.
काकांची पाठ वळली आणि मागून सर्व मंडळींनी आतापर्यंत रोखून धरलेला गांभीर्याचा फुगा फटकन फुटला. सर्वजण हसायला लागले. आता जितूलाही हसू यायला लागलं. . .
पण त्या काकांकडून असं उत्तर का आलं, याचं सर्वांनाच आश्चर्य वाटतं होतं. सर्वजण हसतहसत त्याचवर बोलत असतांनाच अजून एक आजोबा त्याच वळणावरून येताना दिसले. मंडळींनी पुन्हा जितूकडे पाहिलं, त्याने आता हसतच हात जोडत ' मी आता काहीही विचारणार नाही ' अशा अर्थी मान हलवली. आजोबा जवळ आले, क्षणभर थांबले आणि आमच्याकडे वळून म्हणाले, " मी नाही हो दरदिवशी आंघोळ करीत." त्यांच्या या वाक्याने अख्खा गृप अगदी जितूसकट ढगासारखा फुटला, हसताना फक्त एकमेकांवर पडायचंय राहीलं होतं. आजोबाही काहीही न कळल्यामुळे मंदपणे हसत निघून गेले. हा काय नवीन प्रकार घडला, याबाबत हसतहसत सर्वजण एकमेकांना विचारू लागले. . .आणि सुहासच्या लक्षात त्यामागचं कारण कळंलं आणि तो जास्तच हसू लागला. सुहासला कारण कळलंय हे इतरांनाही समजलं, ते त्याबाबत त्याला विचारायला पुढे झाले आणि त्याचवेळी कोपर्यातल्या वळणावरून सुमित येतांना दिसला आणि सर्व प्रकार सगळ्यांच्याच लक्षात आला.
आंघोळ प्रकारावरून जितूला ' मामा ' बनवायचं प्लान सुरू झाला आणि तेव्हांच सुमित हळूच सटकला. बाबूशेठच्या दुकानाला भेट देऊन कोपर्यातल्या वळणाच्यामागे लपून उभा राहीला होता. अर्थातच त्यामुळे त्याला इकडच्या धमाल गंमतीला मुकावं लागलं होतं पण इतरांना अगदी जितूसकट त्याने भरपूर हसवलं होतं. . . .
त्यानंतर कित्येक दिवस या प्रसंगाची आठवण काढून मंडळींना हसू आवरत नव्हतं. मनोमन सुमितच्या अवलीपणाचं कौतुकही करत होते. . .