sunil sawant

Inspirational

3.5  

sunil sawant

Inspirational

आई

आई

4 mins
220


तसं पाहिलं तर आईचा सहवास मला खुपच कमी लाभला. महानगरपालिकेच्या शाळेत पाचवी पास होऊन मी सहावीला दादरच्या शारदाश्रम विद्यालयामध्ये प्रवेश घेतला. (१९७७ साली) प्रवेश घेण्यासाठीची सर्व धावपळ आईने आणि माझ्या दहावीत गेलेल्या भावाने, अनिलने केली. आदल्या रात्रीच नवीन शाळेच्या पहिल्या दिवसाची तयारी करून, जेवणखाण आटोपून झोपण्याच्या तयारीत होतो, इतक्यात आईला कसलातरी त्रास होऊ लागला. तोच त्रास तीच्या दीर्घ आजाराचं कारण ठरलं आणि तीने अंथरूण धरलं, आणि त्यानंतर दोन वर्षांनंतर ती आम्हा सर्वांना सोडून गेली.


सर्वात धाकटा आणि लहान असल्याने आई माझ्यावरच जास्त माया करत होती. मोठ्या तीन भावांवरही तीचे तेवढेच प्रेम होते. पण मी जास्त लाडका होतो. लोअर परेलला चाळीमध्ये दहा बाय पंधराच्या खोलीत आई, बाबा आणि आम्ही चार भाऊ रहात होतो. घरची परिस्थिती एकदम बेताची होती. कमी पगारात आई सगळं काटकसर करून आनंदाने भागवीत होती. स्वत: ती व्हर्नाक्युलर परिक्षा (१९४५च्या आसपास) पास असल्याने आमच्या सर्व भावंडांवर शिक्षणाचे संस्कार होणं स्वाभाविकच होतं. याशिवाय बाबा आणि आई दोघेही धार्मिक प्रवृत्तीचे असल्याने घरचं वातावरणही धार्मिक होतं. आई, बाबा सर्व व्रतवैकल्य, उपास मनोभावे करीत. त्यावेळचा आहार, पारणं अगदी शास्त्रोक्त पध्दतीने होई. आईच्या मृदु आणि प्रेमळ स्वभावामुळे आमच्या नातेवाईक मंडळींमध्येही ती सर्वांची आवडती होती.


आईच्या आजारपणापुर्वीच्या, माझ्या अन् आईच्या साडेदहा वर्षाच्या सहवासात असे काही मोजके प्रसंग घडलेत ते मला अजूनही आठवतायत. ते का आठवणीत राहीले हे नाही सांगता येत. त्या प्रसंगामध्ये फार विषेश काही घडलं आहे, असंही वाटत नाही. पण तरीही ते प्रसंग किंवा घटना मी विसरू शकलेलो नाहीये एवढं मात्र खरं. . . किंवा कदाचित त्यात आईची स्वभावरुपं दिसत असतील, किंवा माझ्या आणि आईच्यामधलं एक प्रेमाचं नातं त्यातून जाणवत असेल. काहीही असेल पण अजूनही ते प्रसंग आठवतात, हेच खरं.


प्रसंग पहिला :- माझं वय चार - पाच वर्षे. जेवणात माझे खुप नखरे चालायचे. ते संभाळताना आईला त्रास व्हायचा पण मी उपाशी राहू नये म्हणून बाबा - भाऊ यांचा रोष पत्करून तो त्रास ती सहन करायची. एकदा रात्री जेवताना मी पापडासाठी हट्ट धरला. पापडही आमच्याकडे जेवणात क्वचितच मिळे. ' घरात पापड नाया हा ' आईने सांगितलं. पण मला हवाच होता. सर्वांनी माझ्याकडे दुर्लक्ष करून आपापली जेवणं आटपली. आईने इतर भांडी गोळा करून मोरीत नेऊन घासायला घेतली. माझ्याकडे दुर्लक्ष होतेय बघून मी मोठ्याने रडायला सुरूवात केली. आई मोरीतूनच ओरडली. ' जेवचा न्हाया तर नको जेव, पण ताटासमोर बसान रडू नको, उठ थयना '. मीही रडतरडत रागाने उठून दरवाजाबाहेर गॅलरीत जाऊन बसलो. आईने सर्व कामे आटोपली. सर्वांनी झोपेची तयारी सुरू केली. माझं रडणं सुरूच होतं. आईने दिवे मालवून दरवाजा बंद केला. थोड्या वेळानंतर शेजारीही निजानीज झाली, मग मात्र मी घाबरलो. दरवाजा ठोठावला. पुढच्याच सेकंदाला दार उघडलं. आई दरवाज्याकडेच बसली होती. कदाचित मी एक सेकंद उशीर केला असता तर तीने अगोदर दरवाजा उघडला असता. मी एकदम आईला मिठी मारली. आईनेसुद्धा मला कुरवाळत मला समजावलं.


प्रसंग दुसरा :- साल १९७२. मी वरळी बि.डी.डी. चाळींकडच्या पालिकेच्या शाळेत पहिलीला होतो. त्यावेळी सवर्ण - दलित संघर्ष सुरू झाला. एका शनिवारी मी शाळेत गेलो असतांना त्या संघर्षाचे दंगलीत रुपांतर झालं. दंगलीचा आवाका वरळीच्या आसपास होता. लोअर परेलपर्यंतचा भाग सुरक्षित होता. इकडे शाळेच्या आवारांत पालकांनी गर्दी केली. एकंदर वातावरण पाहून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सोडायला सुरूवात केली. सर्व शाळा रिकामी झाली. मी आणि माझे दोन मित्र मंगेश आणि जगन्नाथ एवढेच उरलो. तिघे जवळपास रहात होतो म्हणून त्या दोघांच्या घरून कोणीतरी येऊन शाळेतून आम्हांला घेऊन जाई. पण त्यादिवशी कोणीही आलं नव्हतं. शिक्षकांनाही टेंशन आलं होतं. थोड्या वेळाने मंगेशची मोठी बहीण आली. आम्ही तिघेही तीच्यासोबत निघालो. तुफानी दगडफेकीमधून आडोसा घेत घेत आम्ही आपापल्या घरी पोहोचलो. घरी गेल्यावर पाहीलं तर आई मला आणायला गेली होती. आमची चुकामूक झाली होती. दिवसभर घरच्या कामाच्या रगाड्यात तीला आम्हांला शाळेतून आणण्यासाठी वेळच ऊरत नसे. पण त्यादिवशी दंगलीची बातमी ऐकून ती सर्व कामे सोडून शाळेकडे धावली होती, माझ्यासाठी. शेजार्‍यांनी तीला समजावलं होतं, ' थोडा वेळ थांब, सुनिल नेहमीसारखा येईल, नाहीतर कोणीतरी जाऊन त्याला आणेल.' पण माझ्यासाठी ती धास्तावली होती, कोणाचही न ऐकता शाळेकडे निघाली होती.


प्रसंग तिसरा :- शाळेच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही गंमतीत एक एकांकिका बसवली. तेव्हां मी तिसरीत होतो. आमच्या शेजारी बाईत कुटुंब होतं, त्यांच्याच घरी आम्ही मुलं हे प्रयोग/खेळ करायचो. 'स्वराज्याच्या वाटेवर' असं त्या ऐतिहासिक एकांकिकेच नाव होतं. एकदा अशीच गंभीरपणे रिहर्सल करत असतांना तात्यांनी (त्या घरचे मालक) ती पाहीली आणि त्यांना ती आवडलीही. आमची ही गंमत कुठंतरी सादर करण्यासाठी त्यांनी धावपळ सुरू केली. तात्यांच्या मेहनतीने आमच्याच विभागातल्या सार्वजनिक उत्सवांमधे एकांकिका सादर करायचं ठरलं. पहिला प्रयोग शेजारच्याच गणेशोत्सव मंडळात होता. आम्ही तीन भाऊ त्यात भुमिका करीत होतो. आईलाही त्याचा आनंद झाला होता. अख्खी चाळच आमची एकांकिका पहायला, आमचं कौतुक करायला आली होती. प्रयोग उत्तम झाला. सर्व कलाकारांच खुप कौतुक झालं. सर्वांत शेवटी प्रेक्षकांकडून रोख रखमांची बक्षिसं दिली जाऊ लागली. भुमिका साकारणार्‍याचं नाव पुकारून प्रेक्षकाचं नाव घेऊन पैसे दिले जात होते. बक्षिसासाठी माझं नाव पुकारलं गेलं आणि प्रेक्षकाच नाव ऐकून सगळेच चमकले. प्रेक्षकात बसलेली आईही त्याच्यावर थोडीशी चिडली कारण त्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्या कुटुंबाने घरचा एकमेव कर्ता पुरुष काही महिन्यापूर्वीच गमावला होता. उत्पनाचं साधन नसतांना त्यांच्या तरूण मुलाने अशी पैशांची उधळण करणं माझ्या आईला बिल्कूल आवडलं नव्हतं. तीच्या आजूबाजूला बसलेल्या शेजारच्या मंडळींसमोर तीने तो त्रागा व्यक्तही केला. मी इतकं सुंदर काम करूनही तिला त्यावेळी स्वतःच्या मुलाच्या कौतुकापेक्षा त्या कुटुंबाची विवंचना तीला दिसली होती.

हे असे काही प्रसंग आहेत ते मातृछत्र हरपल्यानंतरही तीच्या सहवासाची आठवण करून देत असतात.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational