नंदिनी
नंदिनी
पावसाळा निम्यावर आला तरी अडगेवाडीत पावसाचा एक थेंब पडला नव्हता. आभाळ यायचे आणि तोंड दाखवून निघून जायचे. मंदिरात देवाला अभिषेक घातला, यज्ञाचं आयोजन केलं, बकरा कापला, पण पाऊस काही पडेना.
“कोणीतरी सिताराम अप्पांना बोलवा. त्यांच्या नंदीबैलाला विचारू आपण, पाऊस पडणार हाय का न्हाई.” – ग्रामसभेत भास्करमामांनी सुचवलं.
“व्हय, व्हय. मागच्या वेळेस त्या फावड्याची म्हातारी आजारी होती, तवा नंदीला विचारलं होतं, म्हातारी बरी होणार का म्हणून. नंदीनी हो म्हणून मान हलवली आणि म्हातारी पुढच्या दोनच दिवसांत बरी झाली.” – उस्मान
“व्हय, व्हय, बोलवा नंदीला.” – गावकऱ्यांनी उस्मान आणि भास्करमामाच्या सुरात सूर मिळवला.
“बाल्या, बाल्याच हाय न्हवं? व्हय की. बाल्या, ए बाल्या.” – सिताराम आप्पांचा मुलगा तिथंच बाजूला असलेल्या वडाच्या झाडाखाली दारू पियून पडला होता. पांडू न्हावीने त्याला बघितलं आणि उठवायचा प्रयत्न करू लागला.
“बाल्या इथच हाय व्हय? उठवा त्याला आणि पाठवा त्याच्या बाला आणि बैलाला आणायला.” सरपंचांनी आदेश सोडला.
“बाल्या, ए बालाजी. उठ की.” – भास्करमामांनी आवाज दिला. पण बाल्या काही उठायचं नाव घेईना.
“असा न्हाई उठायचा ह्यो. बाल्या, हे घे १०० मिली मारणार का? दारू, दारू.” – पांडू न्हाव्याच्या तोंडून दारू हा शब्द ऐकताच बाल्या खाडकन जागा झाला.
“कुठंय दारू? व्हेर इज दारू? उगीच बोलता खोटं आणि उठवता नॉनसेन्स!” – बाल्या
“ए भुसनाळ्या, देतो दारू. आधी पळत-पळत घरी जायचं आणि तुझ्या बापाला आणि नंदीबैलाला घेउन ५ मिनटात इथं हजर व्हायचं.” – सरपंच म्हणाले.
“दारू पायजे न्हवं? मग पळ लवकर घराकडं.” भास्करमामांनी बाल्याला दारूचं आमिष दाखवून घरी पाठवलं.
बाल्या घरी जाऊन बघतो तर सिताराम अप्पा दारातच दारू पियून पडले होते.
“या. काय नशीब हाय माझं! पोरगं गावात कुठंभी दारू पियून पडतंय आणि नवरा दारात.” – आईनी बाल्याचं स्वागत केलं.
“शट अप! गिऱ्हाईक आणायला गेलतो. आप्पा, ए आप्पा. उठ.गिऱ्हाईक आणलय. आप्पा, गुड मॉर्निंग.”
बराच वेळ प्रयत्न करूनही आप्पा उठायचं नाव घेत नव्हते.
“आप्पा, दारू पेणार का? वढणार का २० ची?”
जसा पोरगा, तसा बाप. दारूचं नाव ऐकताच सिताराम आप्पा जागे झाले.
“कुठंय दारू? तुझी आई पादली मडक्यात. चेष्टा करतो व्हय माझी.”
“चेष्टा न्हाई आप्पा. सरपंचांनी बोलवलंय बैलाला घेऊन. तिथं आल्यावर दारू देतो म्हणालेत. आई शप्पथ!” – बाल्यानी दोन्ही हाताच्या दोन-दोन बोटांनी स्वतःचा गळा पकडत शप्पथ खाल्ली.
बाल्याला आणि सरपंचांना चार शिव्या हासडत आप्पा उठले. त्यांनी नंदीबैलाचा कासरा सोडला. बाल्या आणि आप्पा नंदीला घेउन ग्रामसभेकडे निघाले.
“आयला, कळतच न्हाईये. आप्पा आणि बाल्या नंदीला घेऊन यायल्यात का नंदी त्या दोघांना.” – उस्मान समोरून अडखळत येणाऱ्या बाल्या आणि आप्पांना बघून म्हणाला. त्या दोघांना बघून इतर गावकरीपण हसू लागले. हसणारच. दोघं नंदीला धरून चालत होते. आप्पा तोल जाउन डावीकडे जायचे, नंदी त्यांना ओढत-ओढत मध्यभागी घेउन यायचा. मग बाल्या तोल जाउन उजवीकडे जायचा. नंदी त्याला ओढत-ओढत मध्यभागी आणायचा. हे चालूच होतं. अखेर कसं-बसं ते ग्रामसभेपर्यंत पोचले.
“कसं का येईनात, पोचले हे नशीब.” – भास्करमामा
“हम्म, चला, पटकन विचारा नंदीला आणि बघा काय म्हणतंय.’’ – सरपंच
“सांग नंदीदेवा सांग, सरपंच दारू पाजतील का?” – बाल्यानी हे विचारताच सरपंचांनी त्याच्या पाठीत जोरात बुक्की मारली.
“तुझ्या आयला तुझ्या, तुला हे विचारायला सांगितलंय व्हय रं? पाऊस पडणार काय इचार ह्या आठवड्यात.” – सरपंच
“आता मला काय म्हाईत? इचारतो, नो प्रॉब्लम. नंदी देवा, नंदी देवा, सांग ह्या आठवड्यात पाऊस पडणार काय?” – बाल्यानी हे विचारताच नंदिनी होकारार्थी मान हलवली आणि गावकरी खुश झाले.
“चला, एक नंबर काम झालं. आता जरा बरं वाटतंय.” सरपंचांनी बाल्याच्या हातात ५० रुपये टेकवले.
“ओन्ली पन्नास? तीन जणांची मजुरी फक्त पन्नास?” – बाल्या
“तीन? तिसरा कोण?” – भास्करमामा
“मी, आप्पा आणि नंदी.” – बाल्या
“तू प्रश्न इचारलास, नंदिनी मान हलवली, आप्पांनी काय केलं?” –सरपंच म्हणाले.
“जाऊ द्या सोडा. तुमच्या खात्यावर मांडतो. जमल तवा द्या.” – एवढं बोलून बाल्या तिथून निघाला. आप्पा बैलाला घेउन त्याच्या मागे चालू लागले, अर्थातच, तोल सांभाळत.
“हे बेणं मार खातंय एक दिवस, बद्द्या मार.” सरपंच चिडले होते.
“जाऊ द्या ओ सरपंच. बेवड्याचं काय घ्यायचं मनावर? या आठवड्यात पाऊस पडणार हाय हे जास्त महत्वाचं.” भास्करमामा
नंदीचं म्हणणं खरं ठरलं. त्या आठवड्यात अडगेवाडीत पाऊस पडला. खुश होऊन सरपंचांनी सिताराम आप्पांना आणखी १०० रुपये दिले.
“गावात पाऊस पडलाय, मग माझा गलास का सुक्का हाय? ए बाल्या, वत की दारू.” सिताराम आप्पा आणि बाल्या गुत्थ्यावर दारू पीत बसले होते. बाल्यानी बाटली उचलली आणि दोघांच्या ग्लासात थोडी-थोडी ओतली.
“आप्पा, एक सांगा, प्रश्न मी इचारला, नंदिनी मान हलवली, तुम्ही काय केलं? व्हाट डू डू?” – चकण्याला ठेवलेलं लिंबाचं लोणचं चाटत बाल्या म्हणाला.
“तुला न्हाई कळायचं ते. तू कसं तुझ्या बायकोच्या मनाप्रमाणं वागतो, तसाच हा नंदी पण माझ्या मनाप्रमाणं वागतो.” – आप्पा
“आपण नसतो घाबरत बायकोला आप्पा. घरात आपला शब्द म्हणजे शेवटचा शब्द, नॉनसेन्स! काय बाबुराव? काय एकटाच बसलाय पीत, ये ना इकडं.” बाल्याची नजर एका कोपऱ्यात दारू पीत बसलेल्या बाबुराववर गेली.
“अय बाब्या, ये ना, बस आमच्याबरोबर. ये रे, न्हाई सांगत तुझ्या बा ला.” – आप्पांनी बोलावल्यावर बाबुराव त्यांच्या बाकावर येऊन बसला.
“आयुष्य झाट झालंय बघा आप्पा.” – बाबुराव ग्लासात टँगो ओतत म्हणाला.
“का रं बाब्या, काय झालं? गुत्थ्यावर उधारी लई झाली का काय?” – आप्पांनी बाबुरावच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं.
“बायकोला दिवस गेलेत.” – बाबुराव
“अर्रे वाह! एक नंबर भावा, एक नंबर!” बाल्यानी अभिनंदन करण्यासाठी हात पुढे केला. मनात नसतानाही बाबुरावनी हात मिळवला.
“ह्याची दुसरी बायको चौथ्यांदा पोटुशी झाली. न्हाईतर तू.” – आप्पा
“न्हाईतर मी म्हणजे? मला व्हा म्हणता का पोटुशी आता?” – बाल्या
“फुकनीच्या, चार वर्ष झाले तुझ्या लग्नाला. अजून पाळणा हलला न्हाई घरात.” आप्पांनी बाल्याला डोक्यात एक चापट हाणली. बाल्या काहीच बोलला नाही.
“च्यायला, पहिलीला मुलगा होईना म्हणून दुसरं लग्न केलं, तर हिलाभी ३ मुलीच झाल्या. आता चौथ्यांदा दिवस गेलेत. ह्यावेळी पण मुलगी झाली तर ...” बाबुरावनी रागाच्या भरात आक्खा ग्लास घश्यात मोकळा केला.
“काय करणार लेका पोरगं घेऊन? पोरगं आमच्या बाल्यासारखं निघालं तर? त्यापेक्षा देव देतंय ते गोड मानून घ्यायचं.” – आप्पांनी बाबूची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.
“तुम्हीभी काय इषय घेउन बसलाय राव? पाऊस पडलाय राव गावात. खुश व्हा अन प्या की दारू.” – बाल्या सगळ्यांच्या ग्लासात थोडी-थोडी दारू ओतत म्हणाला.
ते तिघे त्या रात्री मनसोक्त दारू प्यायले.
“नमस्कार, मी नंदी. आप्पांचा नंदी बैल. ओळखलं? त्या रात्री मी आप्पा आणि बाल्याबरोबरच होतो. त्या रात्री, आप्पा, बाल्या आणि त्यांचा एक मित्र भरपूर प्यायले. तिथून निघताना मी बाल्याबरोबर चालत होतो, आणि आप्पा आमच्या पुढं चालत होते. बाल्याचा चालता चालता तोल जात होता. पण त्याने मला धरलं असल्यामुळे, मी त्याचा तोल जाताच त्याला सावरत होतो. पण पुढे आप्पांना सांभाळणारं कोणीच नव्हतं. निम्मं अंतर पार झालं असेल. आप्पांचा तोल गेला आणि त्यांचं डोकं एका दगडावर आपटलं. बराच मार लागला. त्यांच्या डोक्यातून रक्त वाहू लागलं. बाल्यानी त्यांना कसं-बसं माझ्या पाठीवर टाकलं आणि त्यांना घरी घेऊन आला. वैद्यांना बोलावलं. उपचार सुरु झाले. आज त्या घटनेला ७ दिवस झाले. पण आप्पांना अजून शुध्द आली नाही. आज दुपारची गोष्ट – “
“काय करावं कळंना. आठवडा झाला, अजून भी ह्यांना शुध्द न्हाई.” – बाल्या
“हत्तीच्या आयला! आपल्या डोक्यात कसं काय आलं न्हाई हे?” – मध्येच भास्करमामा म्हणाले.
“काय ओ? काय झालं?” – इक्बाल
“नंदी बैलाला इचारुया की, आप्पा कधी बरे होणार हाय्त म्हणून.” – भास्करमामा
“व्हय, व्हय.” – तिथं जमलेल्या सर्वांनी भास्करमामाच्या सुरात सूर मिळवला.
“व्हय की. डोक्यातच न्हाई आलं आपल्या हे. बाल्या, चाल बाहेर, इचारू नंदीला.” – सरपंच म्हणाले. सर्व गावकरी उठून बाहेर गोठ्याकडे आले.
“नंदी देवा, नंदी देवा, सांग बाबा, आप्पा शुद्धीत येतील का?” – बाल्या
“आज ना उद्या ही मंडळी माझ्याकडे येउन मला आप्पांबद्दल विचारणार हे मला माहित होतं. बाल्यानी मला ३-४ वेळा विचारलं, पण मी काहीच बोललो नाही. मला नव्हतं माहित, आप्पा शुद्धीवर येणार का नाही. येणार नाहीत म्हणालो असतो तर त्यांचा हिरमोड झाला असता. शुद्धीवर येणार म्हणालो असतो, आणि आप्पा शुद्धीवर आले नसते तर मी खोटा पडलो असतो, आणि खोटा पडण्यापेक्षा, मला त्यांना खोटी आशा दाखवायची नव्हती. मी काहीच बोललो नाही. मी काहीच बोलेना म्हंटल्यावर बाल्याला राग आला. त्याने जवळ पडलेलं दांडकं उचललं आणि मला बडवायला सुरवात केली. मी गप्प मार खात राहिलो. भास्करमामांनी बाल्याला अडवलं आणि त्याच्या हातातून दांडकं काढून घेतलं.
“त्या बिचाऱ्या जीवाला कशाला मारतोय्स? आप्पा असल्याशिवाय हा कधी काही बोललाय काय? सोड त्याला, आपण आप्पांना तालुक्याच्या दवाखान्यात टाकू. होतील बरे. “ – भास्करमामा
“भास्करमामांचं बरोबर होतं. आप्पा आल्याशिवाय मी काहीच बोलत नव्हतो, बोलू शकत नव्हतो. मला काय म्हाईत, गावात पाऊस कधी पडणार, पक्या पास होणार का न्हाई, फावड्याची म्हातारी बरी होणार का न्हाई. हो म्हणायचं असेल तेव्हा आप्पा माझी दावण खालच्या बाजूला ओढायचे, माझी मान खाली जायची, लोकांना वाटायचं मी हो म्हणालो. नाही म्हणायचं असेल तेव्हा दावण हळूच उजव्या किंवा डाव्या बाजूला ओढायचे, लोकांना वाटायचं, नाही म्हणालो.
“बरं झालं आपण तुझ्या बा ला तालुक्याच्या दवाखान्यात टाकलं. हिथं ह्यांचं काही खरं नव्हतं बघ. ह्यांना काही झालं असतं तर माझं कसं झालं असतं रेssss, मी कोणाकडं बघून जगले असते रेsss ....” – बाल्याच्या आईनी हंबरडा फोडला.
‘’ कशाला रडती उगच आता? झालेत नव्हं बरे आप्पा आता. बस गप.” बाल्या आईवर खेकसला. आई गप्प झाली.
“बाल्या, ए बाल्या, पाज ना जरा असली तर?” – आप्पांनी बाल्याला दारू मागितली.
“दारू पायजे बघ मुडद्याला. मरणाच्या दारातून परत आला तरी मस्ती जात्या का बघ म्हाताऱ्याची.” बाल्याच्या आईनी रागाच्या भरात लाटणं उचललं आणि आप्पांच्या दिशेने फेकलं. नशीब, तिचा नेम चुकला. लाटणं भिंतीवर आपटून बाल्याच्या डोक्यात पडलं.
“ए आई, अक्कल हाय का तुला? आत्ताच स्मशानाच्या दारातनं आणलाय म्हाताऱ्याला. परत पाठवती का काय? ऑफ होईल ना म्हातारं.” – बाल्या
‘च्यायला तुझ्या. नवऱ्याला हाणती व्हय? द्यू काय ठ्यून एक कानाखाली.” आपांनी तेच लाटणं पुन्हा बाल्याच्या आईवर उगारलं.
“आप्पा, शांत व्हा बघा तुम्ही. घ्या, औषध प्या.” – बाल्यानी औषधाची बाटली पुढं केली.
“अजिबात पेणार न्हाई औषध.” आप्पांनी नकार दिला.
“प्या ओ आप्पा, बरं वाटल तुम्हाला.” बाल्यानी बाटलीचं टोपण उघडलं आणि आप्पांच्या नाकासमोर बाटली धरली. दारूचा वास येताच आप्पांनी बाटली तोंडाला लावली आणि एका मिनिटात मोकळी केली.
“आत्ता जरा बरं वाटतंय बघ.” – बाल्याकडे बघत आप्पांनी डोळा मारला.
आप्पा बरे होऊन महिना उलटला. पण आप्पांना मनासारखं गिऱ्हाईक भेटत नव्हतं. तसं म्हणायला, ते रोज गावातून नंदी घेऊन फिरायचे. कधी कोणी २-३ रुपय द्यायचं, तर कधी नंदीला भाकरी खाऊ घालायचं. परिक्षा पास होणार का, गोरी बायको भेटणार का, अश्या फालतू प्रश्नांचे फारफारतर १० रुपये मिळायचे. पण तेवढ्यावर कुठं भागतय? एखादं मोठं गिऱ्हाईक मिळावं म्हणून आप्पा वाट बघत होते. आणि शेवटी तो दिवस आला.
“आप्पा, ए आप्पा.” – भास्करमामा दारात उभं राहून आप्पांना बोलवत होते.
“काय रे भास्कर?” – आज कधी नव्हे ते आप्पा शुध्दीत होते.
“चल तुझ्या नंदीला घेऊन. बाबुरावच्या घरी जायचंय.” – भास्करमामा
“का रे? काय झालं?” – बाबुरावने नंदीबैल घेऊन आपल्याला का बोलावलं असेल याचा आप्पांना अंदाज होता. त्यांनी उगीच औपचारिकता म्हणून विचारलं.
“ते मला न्हाई माहित. त्याने निरोप द्यायला सांगितला, मी दिला.” – भास्करमामा
“तू हो पुढं. मी येतो.” – आप्पा गोठ्याकडे वळत म्हणाले.
“मी चाललोय सरपंचांच्या घरी. तू ये जाऊन.” एवढं बोलून भास्करमामा निघाले.
“चला, बरं झालं. बऱ्याच दिवसांनी आज चांगलं गिऱ्हाईक मिळालं. दारूची जुळणी झाली.” मनातल्या मनात म्हणत आप्पांनी नंदीचा कासरा सोडला आणि त्याला घेऊन बाबुरावच्या दिशेने निघाले.
“काय रे बाब्या, काय झालं?” – आप्पांनी बाबुरावला विचारलं.
“तुम्हाला तर सगळं माहीतच हाय आप्पा. आधीच तीन पोरी हाय्त दुसऱ्या बायकोपासून. आता परत चौथ्यांदा पोरगी झाली तर ... तुम्ही इचारा की तुमच्या नंदीला, पोरगी होणार का पोरगा.” – बाबुराव म्हणाला.
“ते इचारतो. पण मला एक सांग. पोरगी झाली तर काय करणार?” – आप्पांना रहावलं नाही.
“पाडायची, आणि काय.” – बाबुराव ठामपणे म्हणाला.
“हे ऐकून मला धक्काच बसला. आज माझ्या फक्त हो किंवा नाही म्हणण्यावर एक निष्पाप जीव जगणार का मरणार हे ठरणार होतं. मला घाम फुटला. काय करावं हे सुचेना. उगाच आपण नंदीबैलाच्या जातीला जन्माला आलो असं वाटू लागलं.एका क्षणापुरतं वाटलं आपण इथून पळून जावं आणि या संकटातून मुक्त व्हावं. मी काही करणार इतक्यात – “
“सांग नंदीदेवा, बाबुरावला यावेळी पोरगा होणार का?” – हा प्रश्न विचारताना आप्पांनी माझी दावण उजवीकडे ओढली होती. म्हणजे मला नाही म्हणायचं होतं. पण आप्पांनी असं का केलं असेल? पोरगं होणार असं मी म्हणालो असतो तर बाबुराव खुश झाला असता. त्याने आप्पांना भरपूर पैसे दिले असते. नाही म्हणून आप्पांना काय मिळणार? हम्म, आप्पा आणि बाबुराव रोज गुत्थ्यावर बसतात. आज जर मी म्हणालो मुलगा होणार, आणि उद्या मुलगी झाली तर आपली फसवणूक केली म्हणून बाबुराव रोज आप्पांना ऐकवणार असा विचार आप्पांनी केला असेल. मला मान उजवीकडे, आणि मग डावीकडे हलवायची होती. आप्पांनी सांगितल्याप्रमाणे मला नाही म्हणायचं होतं. आप्पांनी वाट बघून आणखी एकदा उजवीकडे हिसका दिला, मी मान खाली घातली. हो, मी हो म्हणालो, पोरगा होणार म्हणालो आणि बाबुराव जागेवर उधळला. त्याने पटकन खिश्यातून हाताला लागतील तेवढ्या नोटा काढून आप्पांच्या हातात ठेवल्या. पण आप्पांचं लक्ष त्या नोटांकडे नव्हतं. ते आ वासून माझ्याकडे बघत होते. त्या दिवशी पहिल्यांदा मी त्यांनी सांगितलेलं ऐकलं नव्हतं. ते मला घेऊन घरी परतले.”
काही महिन्यांनी बाबुरावला मुलगी झाली. बाबुरावचा राग अनावर झाला. अंधार पडताच त्याने मुलीला उचललं आणि गावाच्या वेशीच्या बाहेर टाकून दिलं.
आयुष्यात पहिल्यांदा त्या रात्री, बाल्या दारूच्या नावानी नाही तर एका तान्हुल्या बाळाच्या रडण्याच्या आवाजाने उठला. त्याने तिला घरी आणलं आणि स्वतः ची पोर म्हणून वाढवलं. कसा का होईना, बाल्याच्या घरातला पाळणा हलला.
त्या मुलीचं नाव आप्पांनी ठेवलं, नंदिनी.