Milind Bapat

Comedy

4.5  

Milind Bapat

Comedy

गण्यास पत्र -भाग दोन

गण्यास पत्र -भाग दोन

13 mins
1.9K


प्रिय गण्या,

या वेळेस मला पत्र लिहिण्यास उशीर झाला. त्याबद्दल क्षमस्व. माझ्या चालण्याच्या व्यायामाचे निघालेले धिंडवडे आणि त्यानंतर हिने धारण केलेला रुद्रावतार याबद्दल मी गेल्या वेळेस लिहिलंच होतं. 


आपल्यासारखी माणसं वाढदिवसाला किंवा नववर्ष सुरू होताना काही तरी निश्चय करतात. “मी माझे वजन कमी करेन”, “मी दारू सोडेन”, “मी रोज लवकर उठेन" “मी शक्यतो शिव्या देणे कमी करेन” वगैरे. त्याचं पुढे व्हायचं तेच होतं. पण तुझी वहिनी मात्र त्यागाची मूर्ती आहे बरं का! चुकून म्हणून कधी स्वतःसाठी संकल्प सोडत नाही. दर महिन्याच्या एक तारखेला ती माझ्यासाठी संकल्प सोडते. “आज पासून याना रोज पहाटे चालायला पाठवीन", “आजपासून यांचं गोड खाणं बंद म्हणजे बंद", किंवा, “चकाट्या पिटायला येणाऱ्या यांच्या मित्रांना आल्यापावली हाकलून लावीन” वगैरे. तसाच तिने एक संकल्प सोडला. 

“उद्यापासून यांनी रोज जिमला जायचं". माझे मत बित घ्यायच्या भानगडीत न पडता तिने सरळ 3 महिन्याचे पैसे भरले आणि पावती आणून माझ्या हातात कोंबली. पावती वरील आकडा पाहून मला फेफरं यायची वेळ आली. 

“इथं कोपऱ्यावर नवीन जिम निघालंय, ‛वळवळकर्स वर्कआउट झोन’. उद्यापासून रोज सकाळी तिथं जायचं!”

“अगं तीन महिन्याचे दहा हजार? खिसा हलका झाल्यामुळे तेवढं वजन लगेच कमी होईल. आणि तेही वळवळ न करता ! हे हे हे” मी आपला तिला हसवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. पण रेल्वेच्या तिकीट काउंटरवर आपण "दोन अंधेरी द्या" म्हटलं की समोरचा राधेश्याम त्रिपाठी वगैरे नावाचा माणूस जसा साळसूदपणे मराठी न कळल्याचा आव आणतो आणि मख्ख चेहेऱ्याने आपल्याकडे बघतो, अगदी तसंच तिने माझ्याकडे पाहिलं.

“चांगलं दोन हज्जार कन्सेशन दिलंय वळवळकरांनी! आणि आवर्जून म्हणालेत, “पाठवा काकांना उद्यापासून. मी जातीने लक्ष देतो. नाही महिनाभरात 10 किलो उतरवलं तर नाव नाही लावणार वळवळकर.” 

“तसंही कुठे लावण्यासारखं नाव आहे ते? पावसाळ्यात अंगणात निघणारी गांडुळं आठवतात. हे हे हे” मी आपला हिला हसवण्याचा पुन्हा एक केविलवाणा प्रयत्न केला. बाकी दहा हजार घेऊन हा वळवळ्या आपल्याला दर महिना दहा किलोने हलके करणार हे ऐकून माझ्या डोळ्यासमोर रक्त शोषून घेणारी जळू वळवळताना दिसू लागली.

“हाफ पॅन्ट आणि टी शर्ट काढून ठेवा उद्या घालायला. मी सकाळी सहाचा गजर लावते. लगेच उठायचं. एक मिनिट वाट पाहीन, नाहीतर सरळ बादलीभर पाणी ओतीन अंगावर.” चेहेऱ्यावर चुकूनही स्मितरेषा न येऊ देता ती करारीपणे उद्गारली. मला थंड पाण्याच्या स्पर्शाच्या कल्पनेनेच शहारे आले. 


बाकी गण्या, कन्सेशनची जी संकल्पना बायकांना भावते त्याचे आकलन तुला मला या जन्मात होणे शक्य नाही. तीन हजाराचा ड्रेस किंवा साडी पसंत करायची. घासाघीस करून ती अडीच हजारात घ्यायची. मग पाचशे रुपये वाचवले म्हणून तेवढ्या किमतीचा एक टॉप घेऊ पाहायचा. पण आवडणारा टॉप नेमका दोन हजाराचा निघायचा. मग तो पंधराशेला ठरवायचा. असं करून मुळात हजारच्या लायकीची साडी आणि पाचशेच्या लायकीचा टॉप असा पंधराशेचा ऐवज चार हजारात घरी आणायचा. वर दुकानदाराने दोनशे रुपयाचे फक्त महिनाभरच चालणारे डिस्काउंट कुपन द्यायचे. आणि ते वाया जाऊ नये म्हणून येत्या आठवड्यात पुन्हा तेथे खरेदीला जायचे. नवीन कपडे परिधान करायला मिळण्याच्या आनंदापेक्षा कितीतरी पट आंनद या बायकांना आपण डिस्काउंट मिळवल्याचा होतो. त्यांच्या आनंदात आपला आनंद मानणे यातच आपले भले असते हे सार्वकालिक सत्य तू सदैव लक्षात ठेवावेस. लग्न करण्याचा दुर्दैवी विचार कधी तुझ्या मनात आलाच, तर तुला माझे हे विचारच तारून नेतील ह्याची तुला पुन्हा एकदाआठवण करून देतो.

असो. 

रात्र तळमळत काढली कारण पहाट वैऱ्याची होती. स्वातंत्र्य सैनिक म्हणून आपण अंदमानच्या तुरुंगात जेरबंद आहोत. दिवसभर कोलू फिरवून आपले पाय रक्ताळले आहेत आणि “टूम ब्लडी इंडियन बहुत आलसी होता... टूमको हंटर मंगता!” असं ओरडत एक बॉब क्रॅस्टो सदृश्य जेलर माझ्या पाठीवर चाबकाने फटके मारतो आहे असं स्वप्न पडल्याचं अंधुक आठवतंय. घड्याळाचा अलार्म वाजला मात्र, ढुंगणाला सुई टोचल्यासारखा ताडकन उठलो आणि टी शर्ट व हाफ पॅन्ट घालून तयार झालो. मोठ्या लोकांमध्ये वावरायचं तर हल्ली हाफ पॅन्ट लागते. फुल पॅन्ट डाउन मार्केट धरतात हे पूर्वीच हिने सांगितलं होतं. असल्या हाय फाय जागी एकट्याने जायचं म्हटल्यावर माझ्या मध्यमवर्गीय हृदयावर कोण दडपण आलं होतं म्हणून सांगू! पण असं काही बायकोला सांगायची हिम्मत नव्हती म्हणून काढता पाय घेतला. जिम मध्ये कुणीतरी ओळखीचं भेटुदे अशी मनोमन प्रार्थना करीत मी एकदाचा वळवळकर यांच्या अत्याधुनिक व्यायामशाळेत, सॉरी जिम्नॅशियममधे प्रविष्ट झालो. 


वातावरण भलतंच थंड होतं. कुडकुडायला होईल एवढा एसी ठेवला तरच धनाढ्य लोकांची मर्जी राखता येते हे तत्व या वळवळ्यानं बरोब्बर आत्मसात केलेलं लक्षात आलं. कुणीही मागण्याअगोदर आधी खिशातून पावती हातात काढून ठेवली (पुन्हा मध्यमवर्गीय संस्कार) आणि रिसेप्शन डेस्कच्या दिशेने जाऊ लागलो.

"पछी आटला पैसा साना लेवो छो?" ( मग एवढे पैसे कसले घेताय?). जमेल तेवढा उर्मटपणा गोळा करून, रिसेप्शन डेस्कला पोट टेकून एक माणूस गुजरातीत पृच्छा करत होता. मला त्याची पाठ दिसत असली तरी त्याचे पोट शरीरापेक्षा किमान दोन फूट पुढे आले असावे असा अंदाज मी लावला. हात लांब करून डेस्कवरच्या कागदावर त्याने सही केली. त्याच्या चोहोबाजूंनी फुगलेल्या देहावरून आणि आक्रमक वृत्तीवरून एव्हाना मी त्याला ओळखले होते. मला कुणीतरी ओळखीचे भेटले तर माझा जिम मधील वेळ सुसह्य होईल अशी आशा माझ्या मनात होतीच. पण माझा शाळेतील वर्गमित्र सुमेध कचोरिया असा अचानक भेटेल असे अजिबात वाटले नव्हते.


सुमेध कचोरियाचे वडील रणछोडदास यांचे एक छोटेसे कचोरी आणि फरसाणचे वडिलोपार्जित दुकान होते. सकाळ संध्याकाळ खमंग कांदा कचोरीच्या वासाने येणारे जाणारे अनेक लोक त्याचा आस्वाद घेत असत. धंद्यात चांगलीच बरकत होऊ लागली. सुमेधही सकाळ संध्याकाळ एक दोन कचोऱ्या फस्त करू लागला. जसे इन्शुरन्स कंपन्या एजंटचे कमिशन काढण्यासाठी ग्राहकाने भरलेला प्रिमियमच गिळंकृत करतात आणि ग्राहकाला "जिंदगीके साथच काय, जिंदगी के बाद भी" ते कळत नाही, तसेच हळूहळू कचोरिया यांच्या दुकानातील कचोऱ्यांची संख्या आटू लागली. दरम्यान सुमेध “दिन दुना, रात चौगुना” फुगू लागला. वडिलांना कमाई का आटली हे काही कळेना. देहावरील बाळसे वाढले आणि आम्ही सुमेधचे बारसे केले. आम्हा मित्रांसाठी सुमेधचा "सुमो" झाला. 


‛जिम जॉईन करून एक महिना झाला तरी वजन एक ग्रॅम सुद्धा कमी झाले नाही. मग कसले पैसे घेता तुम्ही?’ असा त्याचा रास्त आक्षेप होता. रिसेप्शनिस्ट अत्यंत नम्र भाषेत त्याला समजावण्याचा प्रयत्न करीत होती. तिच्याकडे लक्ष जाताच माझे पाय लटपटायला लागले. मला पुराणविषयक कादंबऱ्यांतील अप्सरांचे वर्णन आठवू लागले. अरेबियन नाईटस मधील शहरयारच्या जनानखान्यातील लावण्यवतींचे वर्णन आठवू लागले. माझ्या कल्पनेतील समस्त सौंदर्यवतींना व्हि.आर.एस. घ्यायला लावेल अशी रूपवान स्त्री माझ्यासमोर उभी होती. नेम प्लेट वर जेनी लुझार्डो ठळकपणे लिहिलेलं दिसत होतं. नितळ त्वचा, चेहेऱ्याच्या दोन्ही बाजूला खांद्यावर रुळणारे केस. टपोरे निळसर घारे डोळे, धारदार नाक, सडसडीत बांधा आणि सरासरीहून जास्त उंची हे मुद्दल जणू पुरेसे नव्हते की काय म्हणून आय लायनर, आय शॅडो, गालांवर फिकट गुलाबी ब्लश, केसांना एका बाजूला जांभळा रंग असे व्याजही चढवले होते. स्त्रीशी आणि तेही इतक्या सुंदर स्त्रीशी उद्धटपणे वागणाऱ्या सुमोचा मला थोडा रागच आला. 

सुमो आरडाओरडा करत असताना तिच्या चेहेऱ्यावर अतिशय नम्र आणि शांत भाव होते. एकवेळ सौंदर्य आणि बुद्धिमत्ता यांचा मिलाफ एखादया स्त्रीमध्ये आढळून येईल. पण सौंदर्य आणि नम्रपणा दोन्ही एकदम? पहावे ते नवलच म्हणून मी तिच्याकडे मोर्चा वळवला. 


तेवढ्यात सुमो बुलडोझरसारखा अचानक वळला आणि मॅनेजरच्या केबिनकडे जाऊ लागला. आता जेनिशी इंग्लिश मध्ये बोलायची मी मनातच तयारी करू लागलो. आय जॉईन फॉर थ्री मंथ.... हियर .... रिसिप्ट... असं काहीतरी बोलून तिच्यासमोर पावती ठेवायची असं ठरवलं.

जमेल तेवढा आत्मविश्वास गोळा करून मी डेस्क वर पावती ठेवली आणि चेहेऱ्यावर स्मित हास्य आणायचा प्रयत्न केला. “मॅडम...मॅडम...” मी पुढे काही बोलायच्या आतच जेनी वस्सकन खेकसली “आता तुमचं काय? You guys eat like pigs and expect miracles here”. 

तिचा कर्कश्श आणि घोगरा आवाज ऐकून मी फूटभर मागे सरकलो. इंद्राच्या दरबारात ‛उर्वशी’ मादक नृत्य करते आहे आणि डबिंग आर्टिस्ट म्हणून विंगेमधून तिला ‛हिडिंबा’ साथ देत आहे असं दृश्य क्षणभर माझ्या डोळ्यासमोर आलं. घरी आपल्या बायकोशी भांडण झाले की आमचा बॉस ऑफिसमध्ये आम्हा कर्मचाऱ्यांवर राग काढत असे. तसं सुमोच्या सुमार आरग्यूमेंट्सपुढे बेसुमार संयम दाखवणारी बाई आता आपला राग माझ्यावर काढत होती. अर्थात मला याची सवय होती. लग्नाच्या पंक्तीत जेवण करताना वाढपी माझ्या पर्यंत येईतोवर त्याच्या जवळचं श्रीखंड संपलेलं असतं आणि उरलेली पोळी चटणीला लावून खावी लागते असा माझा लहानपणापासूनचा अनुभव आहे. अर्थात जेनी मॅडम भलत्याच सुंदर असल्याने मला तिच्या या असल्या वागण्याचा त्रास अपेक्षेपेक्षा जरा कमीच झाला. हो ना! उगीच खोटं कशाला सांगू?


पावती तपासून मॅडमने माझी एक फाईल बनवली आणि विकी नावाच्या एका विशी बाविशीच्या जिम ट्रेनरला माझी केस सोपवली. दोघांनी मिळून माझे वजन करून घेतले. माझ्या ५ फूट ५ इंच उंचीला ८० किलो म्हणजे ओव्हरवेट गणले जाते असे कळले. पण सुमो कचोरीया समोर मला माझ्या वजनाचे अप्रूप वाटेनासे झाले. विकी ट्रेनरने मला आपादमस्तक न्याहाळले आणि माझं सगळं वजन माझं पोट आणि पार्श्वभागी गोळा झालं असल्याबद्दल काहीतरी टिप्पणी केली आणि त्यावर जेनी मानेला झटका देऊन हसत हसत काउंटर कडे निघून गेली. शाळेत असताना ‛मुडदूस’ रोगाचं वर्णन आमच्या विज्ञानाच्या पुस्तकात होतं, “हातापायाच्या काड्या आणि पोटाचा नगारा”. धडा वाचताना बाईंनी हे वाक्य वाचलं की सगळी मुलं वळून माझ्याकडे पहात आणि फिदीफिदी हसत. इतकी वर्षे कमावलेल्या पोटाला वळवळकर किती आत घालू शकेल याबद्दल मला जरा शंकाच होती.


माझ्यात आणि विकी मध्ये किमान दोन पिढ्यांचं अंतर असावं असा माझा अंदाज होता. फारशी वाट न बघता त्याने व्यायामाची महिनाभराची योजना, माझ्याकडून असलेल्या अपेक्षा, येऊ शकणाऱ्या अडचणी आणि अपेक्षित ध्येयपूर्ती याबद्दल पंधरा मिनिटे बोलूया असं म्हटलं. अर्थात हे सगळं हिंग्लिश मध्ये. 

“लेट्स डू सम वॉर्म अप” विकी म्हणाला. कठीण व्यायाम करण्याअगोदर शरीराला हलके व्यायाम आणि स्ट्रेचिंग केलं म्हणजे मासपेशींना इजा होत नाही असा हेतू या वॉर्म अप व्यायामाचा असतो असं कळलं. त्यासाठी आम्ही टमी व्हायब्रेटर नावाच्या एका मशीन जवळ गेलो. मशीनच्या प्लॅटफॉर्मवर उभा राहिलो आणि मशीनचा कापडसदृश्य पट्टा मागून कमरेभोवती अडकवला. मशीन चालू करताच पट्टा थरथरू लागला. माझं सारं अंग कसं कंप पाऊ लागलं. हाडं, स्नायू, मास, त्वचा, मेद अश्या साऱ्या उतींमधून विलक्षण आनंददायी कंपनं संचार करू लागली. सुटलेलं पोट विविध दिशांनी ओंगळपणे उड्या मारू लागलं. शरीराच्या इतर संवेदना, ताण, घाम, स्पर्श आता जाणवेनाश्या झाल्या. रोज तासभर एवढाच एक प्रकार करू आणि घरी जाऊ असं तीव्रतेने वाटू लागलं. तेवढ्यात कुठूनतरी विकी परत आला आणि “बस हो गया काका! पाच मिनट हो गया” असं म्हणत त्याने स्टॉप बटन दाबलं.

“ओ काका, चड्डी उपर करो!” पाहतो तर, आधीच थोडी सैल असलेली माझी बरमुडा थरथरत माझ्या पायापर्यंत जाऊन विसावली होती. मी घाईघाईनं तिला तिच्या मूळ स्थानकापर्यंत चढवलं. थोडं ओशाळल्यागत आजूबाजूला कुणी पाहिलं तर नाही ना म्हणून नजर फिरवू लागलो. इतका वेळ माझ्या लक्षात न आलेली गोष्ट समोर दिसताच मात्र माझी भंबेरी उडाली. माझ्या समोर संपूर्ण पारदर्शक काचेचं भलं मोठं पार्टिशन होतं आणि त्यापलीकडे जिमचा खास बायकांसाठी असलेला लेडी झोन होता. तीन चार बायका रोविंग, ट्रेडमिल, वजन उचलणे ई व्यायाम करत होत्या. एवढ्या बायका समोर असून आपल्याला अजून कश्या दिसल्या नाहीत हा प्रश्न मला सतावू लागला. 


“नो वरीज काका! आपके उमरवाले लोगमे लेडीज लोगको जरा भी इंटरेस्ट नही रेहता." काही गरज नसताना विकीनं माहिती पुरवली. “और आप टकले भी है और मोटे भी...हे हे हे मतलब नो टेन्शन!” असं म्हणाला आणि लाईन ऑफ कंट्रोल सोडून इंचभर पुढे आलेली आपली सुपर-साईझ दंतपंक्ती दाखवत हे हे हे करत हसू लागला. क्षणभर वाटलं की वायब्रेटर बेल्ट याच्या गळ्याभोवती बांधावा आणि द्यावा हाय मोड वर लावून. पण माझी पुढची सारी प्रगती या आगाऊ इसमावर अवलंबून असल्याने मी चेहेऱ्यावर कसनुसं स्मित आणण्याचा प्रयत्न केला. 


जख्ख म्हाताऱ्यानाही म्हातारं म्हटलेलं नाही आवडत. आणि मी दिसायला साठीचा असलो तरी वयाने फक्त अठ्ठेचाळीसचा होतो. मध्यंतरी डब्ल्यू एच ओ नी म्हटल्याचं आठवलं की आता पासष्ट वर्षांपर्यंत माणसांना तरुण समजण्यात यावं. पण नाही नाही म्हणता अखेर माझ्या डाव्या बाजूला असलेल्या भिंतभर आकाराच्या आरश्याकडे माझी नजर गेलीच. डोक्यावरच्या केसांची अगदीच ‛गेलेली केस’ झालेली, नोटबंदीनंतर ज्या वेगानं लोकांनी काळ्याचे पांढरे केले नसतील त्या वेगानं माझ्या मिश्यांच्या केसांनी स्वतःला पटापट पांढरे केल्याचं माझ्या लक्षात आलं. माझ्या हनुवटीला खाली एक जुळी बहीण आली होती. पोट अगदी सुमो कचोरीयाच्या तोडीचं नसलं तरी चारही बाजूनी छान गरगरीत दिसत होतं. 


यानंतर विकीने मला बसायला एक स्टूल दिले आणि डंबेल्स हातात दिले. पहातो तर फक्त 2 किलोचे. बायसेप्स, डेल्टोईड वगैरे स्नायूंची नावे बोलत पद्धत समजावून दिली. कल मशीनपर "ग्लूट" मारेंगे असंही म्हणाला. 

“उधरका स्नायू ग्लुटग्लूटीत, आय मीन गुटगुटीत होता है इसलीये उसको ग्लूट बोलते है क्या?” असा कोटियुक्त विनोद मी करून पाहिला. पण तो विकीच्या डोक्यावरून गेला. मी उजव्या हाताचं कोपर उजव्या मांडीवर ठेवलं. त्याच हातात डंबेल्स धरले आणि बायसेप्स करू लागलो. “विकिभाई, ये तो मेरे डावे हातका मळ है, मेरेको पाच किलो देना.” असं मी म्हटलं. तो छद्मीपणे हसला. “ज्यादा मत फुदको. इसका सौ बार करो, कल हाथसे पिछवाडा धोनेको आपको जान पर आयेगा.” पुन्हा दात दाखवून हसला. 

“पर ये तो मेरा उजवा हात है. तुम नया जनरेशन उजवा हात वापरते हो क्या?” मी काउंटर पंच केला.

“बायेंका भी करनेका है” असं म्हणून तो फेरफटका मारायला निघून गेला. इतर मेम्बर्सना मार्गदर्शन करणं आणि त्याबरोबर भिरभिरत्या नजरेने लेडी झोन कडे पाहणं अश्या दुहेरी उद्देशानं तो फिरायला गेला हे माझ्या नजरेतून सुटलं नाही.

पहिल्या दिवशी सुमो कचोरियाशी उडत उडत भेट झाली. ट्रेडमिल वर सावकाश चालत चालत, धापा टाकताना मला तो दिसला. जुजबी बोलायला म्हणून मी तेथे गेलो. “अरे बन्या! व्हॉट ए प्लेझंट सरप्राईज!”. म्हणत त्याने ट्रेडमिल बंद केली. “निमित्तच हवं होतं जाड्याला” मी मनातच म्हटलं. बाकी आपल्यापेक्षा जाड्या माणसाला भेटून आपल्याला जसं आपण बारीक झाल्यासारखं वाटतं, तसं खरंखुरं बारीक होऊनही वाटत नाही. 

“खाली पैसा कमाववा बेसेला छे साला!” (फक्त पैसे कमावण्यासाठीच बसलेत). अजूनही सुमोचा जिम मॅनेजमेंटवरील राग काही कमी झाला नव्हता. 

मी काही दिवस नियमित जिमला गेल्यावर, सुमोचा जिममधल्या तासभरातील एकूण वावर मला लवकरच लक्षात आला. जिम मध्ये आल्यावर तो चेंजिंग रूम मध्ये कपडे बदलायला जाई. तेथे पंधरा मिनिटे तो येणाऱ्या प्रत्येकाशी स्मॉल टॉक्स करत बसे. नंतर त्याची स्वारी मेन्स झोन मध्ये येई. तेथे व्यायाम करण्यात मग्न असलेल्या आणि सुमोपेक्षा कितीतरी पट फिट असलेल्या व्यायामपटुंच्याकडे तो आपला मोहरा वळवे. मग एखाद्याच्या पोटावर शिल्लक असली थोडी चरबी हातात पकडे आणि “आ ओछु नी थाय तो कई फायदो नथी” (ही चरबी कमी नाही झाली तर काही उपयोग नाही). असं म्हणून त्याला डिवचत असे. मग आणखी एखाद्या होतकरू बॉडी बिल्डरला जाता जाता “तारा अंडर आर्म्स पर जरा सारू काम करजे. चमडी तो पेंड्युलम जेवी हले छे. तने तो कोई उभु नि करे कॉम्पिटीशनमा” (तुझ्या काखेतली चामडी एखाद्या लंबकाप्रमाणे हलत्ये. तुला स्पर्धेत कुणी उभाही करणार नाही) असं म्हणून त्याचा अवसानघात करीत असे. मधेच ट्रेडमिल करणाऱ्या एखाद्याला “तारो स्पीड जोईने लागे सालो बैलगाडीथी दिल्ली जवा मांगे छे” ( तुझा वेग पाहून वाटतंय जणू बैलगाडीत बसून चालला दिल्लीला). अजून अर्धा तास वेळेचा अपव्यय करून झाला की तो ट्रेनरला पकडे. “ओके, चालो मेहनत करो मारा उप्पर. छोकरियोने जोवानो पगार नथी आपता तमने!” ( चला करा माझ्यावर मेहनत. मुलीना बघण्याचे पैसे नाही देत तुम्हाला) अशी एक वस्तुस्थितीदर्शक टिप्पणी करून त्याची ट्रेनर सहित व्यायामाला सुरुवात होई. 

सुमोकडून व्यायाम करून घेताना ट्रेनरलाच सुमोच्या दुप्पट घाम येत असे. नशिबाने सुमो माझ्या नादाला फारसा लागत नसे.

असो.

एकंदर लवकरच वॉर्म अप, ट्रेडमिल, डंबेल्स, रोविंग, बेंच प्रेस असा माझा क्रम काही दिवस नियमित चालू झाला. पण दहा ते पंधरा मिनिटातच अंगातील त्राण गेल्यासारखे वाटू लागे. एक दिवस विकीची नजर चुकवून ट्रेडमिल मिनीटभरातच बंद केली. त्यानं दुरून पाहिलं आणि मला गाठलं. “उमर ज्यादा होने पर स्टॅमिना बढानेका डीफिकल्ट रेहता है”. पुन्हा एकदा विकी माझ्या वयावर घसरला. “कितनी उमर है सरआपकी ?”

“अठ्ठेचाळीस” मी चरफडत उत्तरलो.

“ओह! दॅट इज ओल्ड!" म्हणत “मेरेसे तो बहुत पहले आप बोर्न हुवे हो"

“हां, मेरा जनम हुवा तो मेरे आसपास डायनोसोर खेलते बागडते रेहते थे.” 

यातील उपरोधाचा विकीवर काहीही परिणाम झाला नाही. त्याने मुद्द्याला हात घातला.

“हमारे जिम का रिसर्च प्रॉडक्ट है वळवळकर्स प्रोटीन शेक. रोज सवेरे कूल डाऊन होनेके बाद इधर पीनेका और घर जानेका. एकदम स्टॅमिना आ जायेगा.” 

आता जिवाचं जिम करायचंच तर होऊन जाऊदे काय तो खर्च म्हणून दीडशे रुपये रोजीचा तो द्रव मी रोज पिऊ लागलो.”तात्पर्य असं की नाईलाजाने का होईना पण एकदा पत्करलेला फिटनेसचा मार्ग मी चिकाटीने पकडून ठेवला.


असेच चार आठवडे गेले. एक दोन आठवड्यातच जाणवलं की झोप छान लागू लागली, एकंदर शरीर हलकं वाटू लागलं, दिवसभरात फक्त तीनच वेळा नियंत्रित भूक लागू लागली. दहाहजार कारणी लागणार अशी चिन्हे दिसू लागली (आकडा मात्र काही विसरवत नाही!). बायको सुद्धा अधे मधे मला स्वीट डिश वाढू लागली. क्वचित प्रसंगी तिने माझ्याकडे कौतुकाच्या नजरेने पाहिल्याचाही मला भास झाला. माझ्यावर तिचे उठसुठ डोळे वटारणं बंद झाल्यासारखेही मला वाटू लागले. ढुंकूनही माझ्याकडे न बघणाऱ्या शेजारणीकडूनही एखादा दृष्टिक्षेप पदरी पडू लागला. 

दुसरा महिना सुरू झाला आणि मला थोडं थकल्यासारखं वाटू लागलं. पहिल्या पंधरा दिवसातच आणखी पाच किलोने मी हलका झालो. सगळ्याच पॅन्ट कमरेत तीन चार इंच कमी कराव्या लागल्या. ट्रेडमिल करता करता थोडं छातीत धडधडू लागलं. रात्री झोपेत पायात गोळे येऊ लागले आणि घाम येण्याचं प्रमाण वाढलं.

विकीला मी हे सांगितलं. त्याने “ये नाटक रेहेता ही है सबका. जरा फायदा नही हुआ के कंटाला करनेका. थोडा वर्क आउट सेशन टफ करेंगे.” हे ऐकून माझे धाबे दणाणले आणि मी आमच्या फॅमिली डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली.


डॉ. प्रफुल सबनीस हुशार आणि प्रथितयश होता. माझा शाळेतील वर्गमित्र होता. त्याने मला तपासून काही चाचण्या सांगितल्या आणि रिपोर्ट घेऊन बोलावले. 

“जस्ट व्हॉट आय थॉट. युवर थायरॉईड लेव्हल्स आर थ्रू द रुफ” लागोपाठ दोन इंग्रजी वाक्य आली की मी बावचळतो. शेवटचा शब्द रुफ ऐकून पटकन छताकडे माझी नजर गेली. हे पाहून त्याच्या डोळ्यात करुणा दाटून आली. “ओह! देअर सीम्स टू बी अ लॉट ऑफ मेंटल डीरेंजमेंट. मेंदूच्या आकलनशक्तीचा ऱ्हास झालेला दिसतोय थायरॉईडने”

“मेंदूचं काही नवीन नाही हो डॉक्टर. ते डीरेंजमेंट का काय यांचं नेहेमीचंच. बाकीचं काय ते बोला.” माझ्या बौद्धिक योग्यतेवर अधिकारवाणीने टिप्पणी करीत हिने डॉ. प्रफुल्लला ट्रॅकवर आणलं. “तरी बरं हे थायरॉईड निघालं. नाहीतर मला ही सगळी यांची नाटकं वाटत होती.” हे शेपुटही तिनं आवर्जून जोडलं.

तर्जनी आणि आंगठ्यामध्ये हनुवटी अलगद पकडून आणि डोळे किंचित किलकिले करून डॉ. प्रफुल्लने गहन विचारात बुडाल्याची पोझ घेतली. या पोझची हा रोज सकाळी आरशासमोर प्रॅक्टिस करत असावा असं क्षणभर मला वाटलं. प्रफुल्लचा बाप पूर्वी प्रायोगिक नाटकं बसवायचा. चांगले संस्कार केलेत पोरावर असा मी विचार केला. 

मनसोक्त ओव्हर ऍकटिंग झाल्यावर त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि तोंड उघडले “हं... अ बिट स्ट्रेंज” 

“आता येतोस मुद्द्यावर का देऊ दोन रट्टे” मी वदलो पण अर्थातच मनातल्या मनात.

“काही पावडर किंवा हेल्थ ड्रिंक वगैरे तर घेत नाही ना?” इती डॉकटर. 

मग जिम मध्ये मी घेत असलेल्या दीडशे रुपये ग्लासवाल्या ड्रिंकची त्याला माहिती दिली” 

“ओके, सो दॅट इज द कलप्रीट.” डॉक्टरांनी ते पेय ताबडतोब बंद करायला सांगितलं आणि महिन्याने टेस्ट पुन्हा करून पाहू असे सांगितले.

घरी आल्यावर हिने माझी जी काही हजेरी घेतली तुला सांगू गण्या. तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण त्या हेल्थ ड्रिंक बद्दल हिला सांगायचे विसरलो होतो. नवऱ्याला बळजबरीने हाय फाय जिमला पाठवून आपणच तोंडघशी पडलो म्हणून स्वतःवर आलेला राग नवऱ्यावर नाही काढायचा तर मग कुणावर? 

“नाही पचत काहींना एवढ्या पॉश सुविधा. या क्षणापासून जिम बंद. आता तब्येत सुधारू दे तुमची. नंतर हवं तर जवळच्या हनुमान व्यायामशाळेत जा. तुमच्यासारख्या लोकांना तेच बरं."

"तुमच्यासारख्या" या शब्दात दडलेला विस्तारित अर्थ तुमच्यासारख्या नेभळट किंवा तुमच्यासारखा शामळू असा होत होता हे मला समजत होतं. 

बाकी "व्यायामशाळा" या डाऊनमार्केट नावामुळे तेथे फी नाममात्र असेल एवढं तरी समाधान सध्या दिवस काढायला पुरेसं आहे.

पुढील पत्री काय ते कळवेनच तुला. 

कळावे,

तुझा

बन्या


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy