Milind Bapat

Others

4.0  

Milind Bapat

Others

आमचे आप्पा

आमचे आप्पा

5 mins
136



“डॉक्टर ..हील दायसेल्फ़” असं म्हणत, दिलखुलास हसत कोण आत आलं? …मी डोळे उघडले, फ़्लु ने बेजार झालेल्या अंगातील रसरस झटकून दाराकडे पाहीले, तर आमचे आप्पा हातामध्ये एक रसरशीत नारिंगी पपई घेउन आत येत होते. त्यांच्या उत्साहाचा संसर्ग आणि पपईचा मधूर वास माझी मनस्थिती बदलायला पुरेसा होता.


   आमचे आप्पा म्हणजे माझे आजोबा. माझ्या आईचे वडील,- श्री. गणेश रामचंद्र अमृते. आजन्म घोलवड गावचे रहिवासी. पंचक्रोशीत आप्पा अमृते म्हणूनच प्रसिद्ध. गांधीजींच्या प्रभावामुळे पाळलेलं खादीचं व्रत दिसणारा पोषाख, सदरा, पांढरी विजार, स्वच्छ: पांढरी गांधी टोपी. गौर वर्ण, बुटका बांधा, सडसडीत शरीरयष्टी आणि तरुणालाही लाजवेल असा विलक्षण चपळपणा. माझी चौकशी करून झाल्यावर आई बाबांची चौकशी करायला पसार झाले. त्यांचा तो दिनक्रमच होता म्हणाना.


   माझे वडील नोकरी व्यवसायानिमित्त माझ्या आईच्या घोलवड याच गावी स्थायिक झाल्यामुळे, आम्हाला सुरुवातीपासूनच आमच्या आजोळच्या मंडळींचा व विशेषत: आजी आजोबांचा मायेचा सहवास लाभला.


आप्पा हे आठ भावंडांपैकी एक. शिक्षण आणि हुशारीत इतरांपेक्षा उजवे. ज्या काळी गरीबी हे अप्रुप नसून एक सार्वभौम सत्य होतं, त्या स्वातंत्र्यपूर्वकालात घोलवड येथे त्यांचा जन्म झाला. आचार्य भिसे, चित्रे गुरुजी यांच्या संस्काराखाली बोर्डी व आसपासच्या भागातील जनता नवसाक्षर होत होती आणि समाजकारणासाठी पेटून उठत होती, त्या काळात त्यांचं शिक्षण झालं. बी ए, बी एडहोउन बोर्डीच्याच एस पी एच हायस्कूल मध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले. हिंदी भाषेत त्यांना विशेष प्राविण्य. सम्पूर्ण भारतात एकोपा निर्माण करण्यासाठी हिंदीचा वापर वाढणे आवश्यक आहे असे ते मानत. महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेतर्फ़े त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित करण्यात आली. मराठी भाषेवर प्रभुत्व होतेच, पण इंग्रजी, संस्कृत, गुजराती, उर्दू या भाषांचा अभ्यासही होता.


भूगोल व विज्ञान या विषयांची आवड होती. पण आप्पा सर्वत्र ओळखले जात त्यांच्या सामाजिक बांधिलकीसाठी.



   ज्यावेळी सारा भारत देश इंग्रजांविरुद्ध पेटून उठला होता, त्यावेळी आप्पांसारखा संवेदनाशील माणूस स्वस्थ बसणं शक्यच नव्हतं. राजवटीविरूद्ध कट केल्याचा आरोप झाला आणि तेही अनेकांबरोबर तुरूंगात गेले. स्वातंत्र्य मिळाल्यावर अर्थातच सरकारने त्यांचा आवर्जून सन्मान केला. स्वातंत्र्य मिळालं म्हणजे काम संपलं असं मानणाऱ्यांपैकी ते नव्हते. समाजाच्या उन्नतीसाठी सदैव झटतं राहिले. घोलवड गावच्या विकासची अनेक कामे त्यांनी स्वत: सरपन्च असताना पार पाडली.


   त्यांनी आपल्या तीनही मुलांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी काही कमी पडू दिलं नाही. काटकसरीचं बाळकडू त्यावेळी सर्वांनाच मिळालेलं. स्वत:च्या गरजा कमी करून इतरांच्या मुलांच्या शिक्षणासाठी योग्यवेळी स्वत:हून पैश्याची मदत करणे हा त्यांचा जणू धर्मच होता. यामधे जातपात, हिशेब पाळणे, परतफ़ेडीची अपेक्षा या गोष्टींना थारा नव्हता. केलेल्या मदतीचं सोनं झालेलं पाहून त्यांना आनंद होई. माझी आजी ती सौ कालिन्दी हिने याच मुल्यांना वाहून घेतले आणी एक परोपकारी सहजीवन व्यतीत केले. इतरांचे रहाणीमान पाहून आपले खर्च करण्याची त्यावेळी रीतच नव्हती. या त्यांच्या गूणांमुळे दोघेही आम्हाला इश्वरस्वरूप होते.


   आप्पा शारीरीकदृष्ट्या कणखर आणि काटक होते. तहान- भूक यांची तमा न बाळगता कित्येक मैल चालण्याची त्यांची तयारी असे. शाळेत नोकरी करताना सायकल वापरत. ती सायकलही म्हणे पुण्याला शिकत असताना तिथे घेतली आणि नंतर तिथून घोलवडपर्यंत चालवत आणली. मात्र त्याबरोबरच बदलते जग स्वीकारण्याचीही त्यांची तयारी होती. गावातील पहिल्या रेडीयो सेट्स पैकी एक त्यांच्या घरी होता आणि बातमीपत्र ऐकायला रोज सारं गाव अंगणात जमत असे हे ऐकून आम्हाला मौज वाटॆ.

    शाळेतून निवृत्त झाले आणि कोसबाड हिल येथे अनुताई वाघ यांच्या संस्थेच्या कामाला त्यांनी वाहून घेतलं. पुढील अनेक वर्षे बालसेविकांना प्रशिक्षण देण्याचं काम केलं. वयाची पंच्याहत्तरी उलटल्यावर उर्वरित आयुष्यात अनेक सेवाभावी संस्था व आश्रमशाळांच्या हिशेब तपासणीची तसेच गावातील मंदिरांच्या वार्षिक ताळेबन्द बनवण्याची कामे विनामूल्य केली. नास्तिक माणसाने देवळाचे हिशेब ठेवणे हा बहुतेक त्यांच्या कर्मयोगाचा भाग असावा. या कामांसाठी मुम्बई/ पुणे/ नाशिक ई ठिकाणी ते ST बस , आगगाडी व मुम्बई लोकलनेही वयाच्या नव्वदी पर्यंतअगदी लीलया प्रवास करीत. यात त्यांना सोबत असे त्यांच्या थर्मास मधल्या कॉफीची. तेवढच एक व्यसन. 

    संगीत हा त्यांचा प्राण होता. शास्त्रीय संगीताची विलक्षण आवड आणि समज होती. अधेमधे बासरी वाजवत. घरातील संगीतमय वातावरणात माझे मामा बासरी व पेटी आणि माझी आई गायन कलेत पारंगत झाले. आता तो वारसा आप्पांची पंतवंडे चालवत आहेत. 


    एकदा आप्पा आमच्या घरी राहायला आले होते. रात्री दोन वाजता कुणीतरी जोरात दरवाजा ठोठावला. बाबांनी दरवाजा उघडला. बाहेर चार माणसे तलवार पारजत उभी होती. एका इसमावर त्यांनी तलवारीचे वार करून त्याला जबर जखमी केले होते. त्याला उपचारसाठी आणले होते. दारुच्या नशेमध्ये ते खूप हिंसक हालचाली करीत होते. आम्हा मुलांची भीतीने गाळण उडाली होती. आप्पा मात्र शांतपणे त्या माणसांकडे गेले. हात धरून त्यांना तलवारी खाली करायला सांगितलं. बाबांनी उपचार चालु केले. संकटाचा सामना धीरोदत्तपणे कसा करावा. बिकट परिस्थितीतही समोरच्या व्यक्तीला आपली बाजू शांततेने कशी पटवून द्यावी ह्या गोष्टींचा धडा आप्पा अणि बाबांनी घालून दिला. तो प्रसंग माझ्या जन्मभर स्मरणात राहील.


    देवावर विश्वास नसतानाही दर शनिवारी आप्पा उपास करायचे. गमतीने म्हणायचे कि मला साबुदाण्याची खिचडी खायला मिळावी म्हणून मी उपवास करतो. त्या खिचडीची चव अजूनही जिभेवर रेंगाळतेय. प्रत्येक गोष्टीची चव घ्यायची त्यांना विलक्षण आवड. “ आज माझा उपास आहे..टेबलवर काही पदार्थ ठेउ नका (मी चुकून खाइन) अशी अनाउंसमेंट करतच ते आमच्या घरी पाउल टाकित. घरी कोंग्रेस कार्यकर्त्यांची मीटिंग असली कि भाजलेल्या पोह्यांचा चिवडा आणि रसना सरबत स्वतः करून सर्वांना देत. स्वतःच्या खिशाला चाट लावून समाजकारण करायचे दिवस ते. खिसे भरण्याचे दिवस बळावले आणि अप्पांसारखी मंडळी धान्यातल्या खड्यासारखी बाजूला काढली गेली.


    आजी गेली आणि आप्पा थोडे खचले. नव्वदी जवळ आली होती पण तसा आजार काहीच नव्हता. पुढील काही वर्षं काम करीत अणि थोडफार टीव्ही पाहण्यात जात होती. “आप्पान्ना आताशा भूक लागेनाशी झालिये आणि खंगलेले दिसताहेत" माझा भाऊ डॉ. मकरंद सांगत होता “काविळही दिसते आहे". 

    मी घोलवडला गेलो. आप्पांजवळ बसलो. तपासण्यासाठी पोटावर हात ठेवला. हाताला एक गाठ लागत होती. “सी ए हेड ऑफ पॅनक्रीयास नसुदे रे देवा" एवढा एक विचार मनात आला. यथासांग निदान झालं. माझे आई बाबा अमेरिकेला होते. ते येइपर्यंत तग धरला आणि अखेरीस प्रकृती अधिकच खालावली. जन्मभर जोडलेली अनेक माणसे भेटायला येत. “आप्पा काळजी करू नका. तो सारं पहातोय. तो सारं सांभाळून घेईल " असं कुणीतरी म्हटलं यावर तत्काळ “ कुठे आहे तो? ....दाखव मला" असं प्रत्युत्तर केवळ एक हाडाचा नास्तिकच देऊ जाणे. मी मी म्हणणारे लोकही मृत्युसमयी ईश्वरच्या नावे आणाभाका घेताना आपण पहातो. आप्पा जीवन समरसून जगले आणि मृत्युलाही थेट नजर देऊन भिडले.


  दिवसेंदिवस जग अधिकाधिक व्यवहारवादी, स्वार्थी, असहिष्णु, हिंसक आणि आत्मकेंद्री होत आहे. त्याच्या रेटयाखाली कधीतरी आपल्याला आपल्या मूल्यांचा विसर पडतो. आपणही अजाणतेपणाने या प्रवाहाचा बळी होवू पहातो. त्यावेळी आठवण होते ती आजी-आप्पा आणि आई- बाबांनी स्वतःच्या वर्तनातून घालून दिलेल्या धड्यांची आणि पाय आपसुकच जमिनीवर येतात. भीती हद्दपार होते आणि रहातं एक सुंदर प्रवाही जीवन...“डॉक्टर ....हील दायसेल्फ " म्हणत मार्गक्रमण करण्यासाठी.


डॉ. मिलिंद बापट

डहाणू


Rate this content
Log in