माझी धाडसी गगनभरारी
माझी धाडसी गगनभरारी
साधारण एक वर्षापूर्वी सहकुटुंब युरोप टूरला जाण्याचा योग आला. मुंबई ते लंडन विमान प्रवासाने आमच्या टूरची सुरवात होणार होती. बाकी जमिनीवर स्वतःला मी अगदी निधड्या छातीचा वीर समजत असलो आणि वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात आपण जणू ढाण्या वाघ आहोत अशा अविर्भावात वागत असलो तरी विमानप्रवासाचे नाव काढले की माझे पाय लटपटू लागतात. टूर चे बुकिंग मिळणार नाही ही आशा मावळल्यावर व्हिसा तर नक्कीच मिळणार नाही अशी मी खात्री बाळगून होतो. पण फिरंग्यांच्या कृपेने तो ही लगेच मंजूर झाला. हा लांब पल्ल्याचा विमानप्रवास अपरिहार्य असल्याने आता आपले कसे होणार याची चिंता मला सतावू लागली. बरं स्वतः डॉक्टर असल्याने आणि आणि प्रवासात साथीला असलेल्या भावी पिढीला आदर्शवत वाटेल अश्या वागणुकीचे आपल्यावर ओझे असल्याने, आपली भीती गुप्त ठेवणे हे अत्यंत जिकीरीचे आव्हान माझ्यासमोर होते.
विमानात बसल्यावर भीतीवर ताबा कसा मिळवावा, विवेकनिष्ठ विचार कसे करावेत, स्वतःला शिथिल कसे करावे, श्वसन कसे आटोक्यात आणावे, लक्ष भीतीपासून दूर कसे न्यावे... एक ना दोन अश्या ढिगांनी क्लृप्त्या वाचून आणि अभ्यासून झाल्या पण विमानतळा च्या प्रवेशद्वारापाशी आलो आणि धडधड करून हृदयाने आपले अस्तित्व दाखवून दिले.
घामेजल्या हातांनी चेक इन केले आणि anticipatory anxiety म्हणजे काय याचा वस्तुपाठ मिळाला. कसेबसे सगळे सोपस्कार पार पाडून विमानाची शिडी चढलो आणि आतमध्ये प्रवेश केला.
केबिन आणि चालक दलाच्या साऱ्या स्त्री पुरुष सदस्यांनी अगदी अदबीने केलेल्या भल्या मोठ्या हास्याला मी प्रयत्नपूर्वक कसेनुसे हसून उत्तर दिले आणि पॅसेजमध्ये शिरलो. आमची आसने विमानाच्या मध्यावर होती व किमान पाच मिनिटांची पायपीट तर नक्की होती. त्यात एक जास्त सारण भरलेल्या करंजीसारखी फुगलेली बॅग आणि सहज दोन तिकिटे फाडावीत एवढ्या शरीराची एक बाई पॅसेजमध्ये अडकल्या आणि आम्ही १५ मिनिटांनी आमच्या आरक्षित स्थानी पोहोचलो. मध्यमवर्गीय मानसिकतेप्रमाणे आसनांचे क्रमांक पुन्हा पुन्हा खात्री करून घेतले. सामानासाठी डोक्यावरचे फ्लॅप्स उघडले तर अगोदरच तेथे अनेक बॅगा विसावल्या होत्या. कशाबशा दोन बॅगा तेथे राहिल्या. इतर बॅगा जमतील लोकांच्या डोक्यावरील स्लॉट मध्ये जागा धुंडाळून ठेवल्या. तरीही १ बॅग ठेवायला जागा कमी पडत होती. एका कुणाच्या तरी आडव्या ठेवलेल्या लॅपटॉप बॅगला उभे केले आणि तयार झालेल्या जागेत माझी बॅग घुसवली. तेवढ्यात मागून फर्ड्या ब्रिटिश ऍक्सेंटमध्ये आवाज आला “Don't move my bag”. जनरल डायरचा एखादा खापर पणतू माझ्यावर परंपरागत राग काढतोय कि काय असा विचार करून मी मागे वळलो. पाहतो तर पंचविशीच्या एका भारतीय तरुणाचा राग मी ओढवून घेतल्याच कळले. "Move aside" म्हणत त्याने माझी बॅग माझ्या हातात दिली आणि स्वतःची लॅपटॉप बॅग पुन्हा सरळ करून फ्लॅप बंद केला. मी माझं आवडीचं माघार घेण्याचं काम केलं. आपला हा अपमान आसपासच्या स्त्रीवर्गाच्या लक्षात तर आला नाही ना याची मी आसपास नजर फिरवून खात्री करून घेतली आणि माझी बॅग माझ्या आसनाखाली ठेवली. आसनस्थ झालो आणि अजून फारशी भीती वाटत नाहीये हे स्वतःला लक्षात आणून दिलं. ही भयकंपित होण्यापुर्वीची शांतता तर नाहीना असा नकारात्मक विचार मात्र नको नको म्हणत असताही डोकावलाच.
काही अत्यंत बिझी माणसे अजूनही धावत पळत विमानात येतच होती. पार्लरमध्ये मनसोक्त दिवस घालवल्याने उशिरा पोहोचलेली एक गौरांगना धडपडत पॅसेजवेमध्ये घूसली. आपली बॅग ठेवण्यासाठी आमच्या डोक्यावरच्या समान ठेवण्याचे फ्लॅप्स उघडून खुडबुड करू लागली. पार्लरचे ४- ६ तास सत्कारणी लागल्याचं अगदी उघड दिसत होतं. केसांचे विविध रंगांनी केलेले इंद्रधनुष्य, भुवया, पापण्या, डोळे, गाल, ओठ... अगदी सगळीकडे वारेमाप रंगरंगोटी करून हिच्या ब्युटीशियनने निसर्गदत्त रंगांचे समूळ उच्चाटन केले होते. हे सारे केवढ्यात झालं असेल असा हिशोब मी मनात मांडतोय तेवढ्यात जे काही घडले ते पाहून आश्चर्य, संताप, अचंभा, क्रोध, मत्सर, हेवा, अशा अनेक भावनांचा एकदम उद्रेक होवू लागला. आणि त्या भावना दाबण्याची पराकाष्ठा करता करता माझी भीतीचे भाव मात्र कुठेच लुप्त झाले.
मघाच्या त्या "अंग्रेज की औलाद " टाईप तरुणाने वरचे एक झाकण उघडले आणि स्वतःची लॅपटॅॅाप बॅग आडव्याची उभी केली आणि झालेल्या जागेत अगदी अदबीने त्या सुंदरीची हॅंडबॅग ठेवून झाकण अलगदपणे बंद केले . " त्यात काय एवढे" अश्या थाटात तो तिच्याकडे पाहू लागला. अपेक्षेप्रमाणे आता ती त्याच्याकडे एक कृतज्ञतापूर्वक तिरपा कटाक्ष टाकणार, त्यावर थोड्या पापण्यांच्या हालचाली आणि मानेच्या झटक्याची फोडणी देणार आणि आणि तो तरुण आणि आणि जवळच्या ४ रांगा घायाळ होणार अशी त्याच्याप्रमाणेच मलाही वाटले. वर्षानुवर्ष ध्यानधारणा करून, मानसोपचार घेऊन, भक्तिमार्ग अनुसरूनही जो व्यक्तिमत्व बदल लोकांना जमत नाही तो केवळ एका स्त्रीदर्शनाने साध्य झाल्याचे पाहून स्त्रीशक्तीवरील माझा विश्वास वृद्धिंगत झाला. पण ज्या मादक कटाक्षासाठी तो उत्सुक होता तो तर दूरच, पण साधे थॅॅंक- यू ही न म्हणता ती आधुनिक मदनिका त्याच्याकडे पाठ फिरवून आपल्या जागी जाऊन बसली. माझ्या आसपासच्या सगळ्या बायकांनी आपापल्या नवऱ्यांंकडे त्यांचे घरगुती तिरपे कटाक्ष टाकून हुश्शऽ केल्याचे माझ्या लक्षात आले. प्रवाश्यांच्या सहानुभूतीपूर्ण नजरा झेलीत तो तरुण आपल्या स्थानी जाऊन बसला. मोबाईल वापरण्याचे निमित्त करून त्या आडून अधे मधे तिच्याकडे मोठ्या आशेने पहात असताना मी त्याला पकडले. मलाही त्याची कीव आली. आपण एकदा म्हणावे ......“पलऽट " आणि आणि तिने झटक्यात मान फिरवून त्याला नजर द्यावी असेही मला वाटले. त्याची व माझीही अपेक्षापूर्ती नशिबात नव्हती.
बऱ्याच वेळेपासून न जाणवलेली भीतीची भावना आता जागृत होऊ लागली होती.
मी देशांतार्गत अनेक उड्डाणे केली असली तरी त्यात भीती वाढेपर्यंत उतरण्याची वेळ होत असे. यावेळी मात्र प्रकार आंतरराष्ट्रीय, म्हणजे भीती वाटायला आणि त्यावर मी सखोल वाचन करून अभ्यासलेल्या क्लृप्त्या वापरायला मनसोक्त वेळ होता. विमानाचे इंजिन चालू झाले. लवकरच विमान वेग पकडू लागले. आता लवकरच आपला धरणीमातेशी असलेला संबंध तुटणार आणि आपलं आयुष्य हे पायलटची कार्यक्षमता, त्याचे व्यक्तीगत जीवनातील प्रश्न, त्याची मानसिक स्थिती, कंट्रोल रूम, संदेशवहन यंत्रणा, उपग्रह, हवामान, विमानाच्या रेषेत उडणारे पक्षी व इतर विमाने, झालेच तर गल्लोगल्ली फोफावलेल्या अतिरेकी संघटना, बर्म्युडा त्रिकोणासारख्या अतर्क्य गोष्टी, विमानाचे इंजिन आणि इतर अवयवांची परिस्थिती अश्या असंख्य गोष्टींवर अवलंबून असणार हे लक्षात आलं. "मी दोर कापले आहेत आता जिंकू किंवा मरू" हा तानाजी पडल्यानंतरचा सूर्याजीचा डायलॉग आठवला आणि मनाचा हिय्या केला.
कितीही निग्रह केला तरी सुधीर मोघ्यांनी म्हटल्याप्रमाणे "मन गरगरते आवर्त, मन रानभूल, मन चकवा" हेच खरं. विमानाने हवेत झेप घेतल्यावर हातांना दरदरून घाम फुटला आणि छातीत धडधड होऊ लागली. पटकन उजव्या हाताने मी बायकोचा हात धरला. ४- ५ मिनिटात धडधड थोडी कमी झाली. एक मोठा श्वास घेतला आणि अचानक मला लक्षात आले कि बायको तर आपल्या डावीकडे बसली आहे. उजव्या हातात पकडलेला तो मऊ मुलायम हात मी क्षणार्धात सोडला. हो, तेव्हा #metoo नसले म्हणून काय झाले? मी एक सज्जन माणूस असल्याचे माझ्या ओळखीतील सगळ्यांचेच मत होते. त्या बिचाऱ्या बाईने मला इतक्या वेळ हात धरु दिला होता.. अगदी न झिडकारता आणि हिडीस फिडीस न करता. “I am sorry.. I apologize" असं वाक्य जुुळवत मी उजवीकडे वळलो आणि दिलगिरी व्यक्त केली. पोनी बांंधलेेेल्या, कानात प्रत्येकी ३ रिंगा घातलेल्या, निळ्या डोळ्यांच्या त्या स्त्रीची त्वचा इतकी तलम होती की चेहऱ्याच्या आठ ते दहा निळसर रक्तवाहिन्या स्पष्ट दिसत होत्या. वेळप्रसंगी हव्या तेवढ्या आयव्ही लाइन्स हिला लावताना आपल्याला जराही त्रास पडणार नाही असा एक डॉक्टरी विचारही माझ्या मनात आला. त्यात तिने लाजून अशी काही मान वेळावली माझा हार्ट रेट हे SVT रेंजमध्ये जाऊ लागला. मात्र लक्ष तिच्या हनुवटी कडे गेले आणि तिच्या गौरवर्णामुळे पटकन नजरेस न आलेली तांबूस रंगाची बोकड दाढी आता मला दिसली आणि ती स्त्री नसून एक स्त्रीवैशिष्ट्ययुक्त पुरुष आहे हे अंतिम आणि तितकेच कटू सत्य मला थोबाडीत मारल्यासारखे दिसू लागले. आता माझ्या सगळ्या अंगाला दरदरून घाम फुटला. या सगळ्या गडबडीत विमानाची भीती लुप्त झाली खरी पण त्या इसमाच्या लाजण्या- मुरकण्याचे मात्र टेन्शन येऊ लागले. परदेशातील स्त्री-पुरुष समानतेबद्दल ऐकले होते पण शारीरिक समानतेचा असा एक वेगळाच धडा खुर्चीत बसल्या बसल्या घेत मी शक्य होईल तेवढं डावीकडे सरकलो.
एव्हाना विमानाने चांगलीच उंची गाठली होती आणि ते स्थिरावू लागलं होतं. आता हवाईसुंदऱ्या मात्र अस्थिर होऊ लागल्या. काहीतरी खाऊ-पिऊ घालायची तयारी सुरू झाल
ी. विमानाच्या डोक्याकडून एक आणि शेपटाकडील एक अशा दोन फूड ट्रॉलीज घेऊन हवाईसुंदऱ्या येऊ लागल्या. इंग्रजीत इयर टू इयर म्हणतात असं हास्य एका सेकंदाला द्यायचे आणि लगेच ते आवरते घेऊन प्रवाशाची बोलायचे. पुन्हा पुढच्याशी तेच. एकूण प्रवासी 400 धरले तर हे असं मिथ्या- हास्य किती वेळा करावा लागत असेल याचा महिन्याचा हिशोब मी मांडू लागलो. त्याला बाराने गुणुन वर्षाचा हिशोब काढणार तोच... “हाऊ डू यु डू सर?.. व्हॉट कॅन आय सर्व्ह यू?". लाल कपड्यातली नखशिखांत आंग्लभाषिक दिसणारीे एक ललना मला विचारती झाली. आली का पंचाईत... आपले “इट इज अ कॅट दॅट इज अ रॅट" वाले इंग्रजी हिच्या पचनी पडेल का? संभाषण टाळण्याचा उत्तम उपाय म्हणजे इतर प्रवाश्यांच्या प्लेट मध्ये पहायचे आणि तेच पदार्थ मागवायचे. पण मला पास्ता/ मकॅरोनी/ स्पघेटी यातला आणि मफिन आणि केक यातला फरक पाहूनही कळत नसल्याने तीही गोची झाली. बायकोला अर्थातच मला मदत करण्याची आयती संधी सोडायची नव्हती. नवऱ्याला फार विचार करू न देता त्याच्यासाठी खाण्यापिण्याच्या आणि परिधान करण्याच्या वस्तू परस्पर ठरवून पुन्हा त्या नवऱ्याला आवडल्याच पाहिजेत असा अट्टाहास केवळ लग्नाची बायकोच करू जाणे.
मी एका प्रवाश्याकडे टोमॅटो ज्यूस पहिला आणि लगेच ऑर्डर दिली... “टोमॅटो ज्यूस अँज वेल प्लिज". एअर होस्टेस ने चेहेरा रुक्ष ठेवून म्हटले “पार्डन?". “ टोमॅटो” हाताने टोमॅटोचा आकार दाखवत मी मोठयाने म्हटले .. “टोमॅटो ज्यूस".
“ओह यु वॉन्ठ ठमेटो ज्यूस". तिने माझ्या हातात टेट्रापॅक टिकवले आणि अत्यंत गंभीर आवाजात ती उद्गारली.. “इट्स ठमेटो, नॉट टोमॅटो". तिचा चेहेरा यावेळी अगदी स्मित विरहित होता. मेडिकल करियर मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत ढिगाने इंग्रजी वाचन करूनही, मराठमोळ्या खेड्यात वाढलेल्या मला टोमॅटो, टमाटर, टामोटी, टाम्बोटी, टमाटे, अशी विविध नावे परिचीत होती परंतु त्याचा खरा उच्चार ठमेटो आहे हे तिने ज्या कोरडेपणाने आणि अजिबात गरज नसताना सांगितले त्यातून रेसिझम ... रेसिझम म्हणजे काय याची एक चुणूक मिळाली.
ट्रॉल्यांनी मार्ग अडवलेला असतानाच एक दोन जणांना नैसर्गिक विधीची आठवण झाली. होस्टेसेसनी त्यांच्या विनंतीला भीक न घालता त्यांना दामटवुन पुन्हा जागेवर बसवले. विसर्जन विधी जरी सृष्टीनियमाने करावेच लागत असले तरी अडवणूक झाली कि ते जरा जास्तच जोरात साद घालतात हेच खरं. मी ही त्याला अपवाद नव्हतो. आता मला खरी लागली त्याहीपेक्षा अर्जंट लागल्यासारखे वाटू लागले आणि घाम आणि धडधडीने आपले अस्तित्व दाखवून दिले. पण हवाई सुंदऱ्याना विनंती करून अपमान करून घेण्यापेक्षा आपल्या स्वयंचलित आणि ऐच्छिक स्फींक्टरवर भरोसा ठेवण्याचा निर्णय घेतला.
हवाई सुंदऱ्या मधेच काही वस्तू विकू लागल्या. कुत्र्याच्या गळ्यात घालण्याचा डिझायनर पट्टा, बुटांना लावायचे चमचम करणारे एलइडी दिवे, मेमरी कार्ड, फोनच्या ऍक्सेसरीज, डोळ्याना झाकून थंडावा देणारे आयपॅड सदृश्य आईसपॅक अश्या अनेक असंबद्ध गोष्टी हसून हसून प्रवाश्यांच्या माथी मारत होत्या. वस्तूंच्या किमती पाहून माझे डोळेच फिरले. विमान 30 हजार फुटांवरून उडत असेल तर 30 गुणिले जमिनीवरची किंमत असा एकंदर हिशोब मला लागला. असो.
माझा एक मित्र विमान कंपनीत मेडिकल पॅनलवर आहे. सततच्या हसण्याने केबिन स्टाफचे Rizorius आणि Depressor anguli oris हे चेहेऱ्याचे स्नायू कसे आकुंचित होतात आणि क्रॉनिक ( दीर्घकालीन) गालदुखी कशी जडते आणि यावर त्याचे आंतरराष्ट्रीय प्रकाशनांमध्ये प्रबंध प्रकाशित झाले आहेत, हे तो मोठ्या अभिमानाने सगळीकडे सांगत असतो. या गालदुखीवर विविध प्रकारचे मसाज करण्यात तो पारंगत आहे. वरून त्याबद्दल त्याला बक्कळ पैसे मिळतात हे कळल्यावर मला माझ्या जुलाब उलटी प्रॅक्टिसची फारच लाज वाटली होती. असो.
एकदाच्या ट्रॉल्या पार्किंगमध्ये गेल्या आणि मी टॉयलेटच्या दिशेने धाव घेतली. पण माझी सीट विमानाच्या मध्यावर होती त्यामुळे मी पोहोचेपर्यंत चार जण अगोदरच रांगेत उभे होते आणि एका नशीबवान प्रवाशाने आपला कार्यक्रम बहुधा चालुही केला होता. मी मोठा होईपर्यंत विमान फक्त गच्चीवरून पाहिले होते. त्यात बसायचा योग लग्नानंतर आला. लहानपणापासूनच भीती वाटे कि विमानात लोकांनी विसर्जित केलेला माल आपल्या डोक्यावर तर पडणार नाही ना? असो. तर रांगेत पहिल्या क्रमांकावर एक ब्रिटिश बाई उभी होती. आपल्यावर दीडशे वर्षे राज्य केलेल्या माणसांचे वंशज आपल्याबरोबर चाळीच्या संडासासमोर असते तशी रांग लावून उभे आहेत हे पाहून माझ्या मनाला गुदगुल्या झाल्या. तिचे कान आतून येणारा प्रत्येक आवाज टिपत होते आणि आतील माणसाच्या प्रगतीवर लक्ष ठेवून होते हे कळायला मला वेळ लागला नाही. रेल्वे स्टेशनच्या संडासात कुणी दोन मिनिटांहुन जास्त वेळ घेतला तरी बाहेरचे लोक दरवाजा ठोठावतात आणि वरून “ चल भजिया तलना बंद कर और बाहर निकल" असले विनोदी डायलॉग्ज मारतात. इथे विमानात मात्र सगळं अगदी सुसंस्कृत. आतल्या माणसाचा चुकून डोळा लागला तरी कुणी दार वाजवत नाही. रांगेत एक गुजराती इसम भेटला. परदेशात त्याच्या मालकीची चार मोटेल्स आहे असे त्याने न विचारताच सांगितले. प्रत्येक भारतभेटीनंतर परत जाताना एखादे गरीब दाम्पत्य स्वतःबरोबर विदेशात नेतो व त्यांना कसे मोटेल्समध्ये हाऊस किपिंगला ठेवतो आणि त्यामुळे त्या कुटुंबास कसा रोजगार मिळतो हेही आवर्जून सांगत होता. भारतीय लोकांना कसे नीट सरकार निवडता येत नाही म्हणून देश अधोगतीला लागला आहे. तसेच गुजरात कसा बाकीच्या प्रांतांपेक्षा प्रगत आहे आणि गेल्या १५ -२० वर्षाच्या एकहाती शासनामुळे लोकांचे राहणीमान कसे अत्युच्च झाले आहे हे ही ऐकवले. मला राहवेना म्हणून मी अखेर विचारले.. “ मी पण ऐकून आहे की गुजरातेत एवढी अफाट प्रगती झालेली दिसते कि गरीब कुटुंब बघायला म्युझियममध्येच जावे लागते. पण मग तुम्ही प्रत्येक फेरीत हे जे गरीब दाम्पत्य नेता ते शोधण्यासाठी तुम्हाला किती कष्ट पडत असतील नाही?” या माझ्या प्रश्नावर त्याने आपला पडलेला चेहेरा दूर फिरवला आणि तोही आतल्या आवाजावर लक्ष केंद्रित करू लागला. बाकी तिरकस प्रश्न विचारायचे आणि समोरचा गारद झाला कि असुरी आनंदाची ढेकर द्यायची हा तर माझा बालपणापासूनचा छंद.
माझा कार्यक्रमही एकदाचा आटोपला. या नंतर माझ्या लक्षात आले कि आता आपली धडधड आटोक्यात आहे आणि कितीतरी वेळात आपल्याला भीती वाटल्याचे जाणवलेले नाही. मी पुन्हा आसनस्थ झालो आणि निद्रादेवीच्या आधीन झालो.
जाग आली तेव्हा विमानात गजबजाट होता. आता लंडन फार दूर नाही हे माझ्या लक्षात आले. केबिन स्टाफच्या चेहेऱ्यावरील आस्था आणि हास्याचे भाव जाऊन आता दडपण कमी होऊन येणारे शिथिल भाव दिसू लागले होते. त्या साऱ्या प्रवाशांना पट्टा बांधण्याचा आणि सीट सरळ करण्याच्या सुचना देत होत्या. माझा पट्टा मात्र अगोदरच लावलेला होता. विमानांच्या भाऊगर्दीमध्ये जर उतरण्यासाठी रनवे मिळाला नाही तर काय, हे नेहेमी उतरण्यावेळचे टेन्शन पुन्हा जाणवू लागले. वेळ आल्यास हीथ्रो ऐवजी गॅट्विकला उतरवता येईल या पर्यायाचा विचार वैमानिकाच्या आधी मीच करून ठेवला होता. पण तेथेही भिरभिरावे लागले आणि पेट्रोल संपले तर... असा अखेरचा नकारात्मक विचार मनात येतो तोच विमान वेगाने उतरणीला लागल्याचे जाणवले आणि जीव भांड्यात पडला.
विमाना अलगदपणे जमिनीवर उतरले आणि मी सुटकेचा निश्वास टाकला.
विमान आता थोडी गती कमी करत टर्मिनसकडे येऊ लागले आणि अनेक भारतीय प्रवाशांनी उद्घोषणेची वाट न पाहता मोबाईल संभाषण चालू केले. काहींनी तर सामान काढून पॅसेजही अडवला. या सगळ्याकडे आंग्लभाषिक प्रवासी मात्र स्थितप्रज्ञ, कुत्सित, विस्मित अशा विविध नजरांनी पाहत होते. त्यांचे हे कुतूहल पाहून, भारतातील सगळ्या रस्त्यांवर रोज दिसणारी वाहनांची चढाओढ, रेल्वेच्या टपावर आणि दरवाज्यात लटकण्याचे आमच्या जनतेचे कसब, नियमित होणाऱ्या भारत बंदच्या दिवशी रंगणारे गल्ली क्रिकेट, रस्ते आणि कान बंद पाडणाऱ्या डी जे युक्त मिरवणुका, ड्राय डे च्या आदल्या दिवशीची दारू दुकानांसमोरची रांग, इत्यादी गोष्टी दाखवण्याचे एक थीम बेस्ड टुरिस्ट पॅकेज बनवावे आणि यांची नियमित भारत दर्शन टूर आयोजित करावी असा एक स्वार्थी विचार मनाला स्पर्शून गेला. पण नेहेमीप्रमाणे ऐनवेळी देशाभिमान जागृत झाला आणि प्लॅन रद्द केला.
एकदाचे विमान नियोजित स्थळी थांबले. आम्ही उतरण्याच्या रांगेत उभे राहिलो. प्रवास फारसा भीतीदायक न होता बऱ्यार्पैकी मनोरंजक झाल्याने आता माझी छाती वीतभर फुगली होती. आपणच जणू विमान चालवत भारताहून इकडे आणल्याचा अविर्भावात मी शिडी उतरलो. बालपणापासून मला ज्याची केवळ ऐकून आणि वाचून माहिती होती त्या शेक्सपिअरच्या आणि चर्चिलच्या, लॉर्ड माऊंटबॅटनच्या आणि क्वीन व्हिक्टोरियाच्या, थँचर आणि टेरेसा मेच्या आंग्लभूमीवर माझे पाय रोवले.