दयाळू बाळू
दयाळू बाळू


दयाळू बाळू
फोन ठेवला आणि तडक निघालो. हॉस्पिटल रिक्षाने दहा मिनिटांवर होते. रिसेप्शनला विचारपूस केली “बळवंतराव दयाळ कुठल्या खोलीत असतील?” “पाचवा मजला, खोली क्र. तीन” रिसेप्शनिस्टने माहिती दिली.
खोलीत पोहोचलो. डोक्याला बँडेज, हातापायांना प्लॅस्टर, एक पाय धातूच्या तारेने तीस अंशात लटकवलेला, हातात सलाईनची नळी अश्या अवस्थेत बाळू उर्फ बळवंत दयाळ खाटेवर पहुडलेला होता. इंचभर पुढे आलेले दात त्याच्या चेहेऱ्यावरील हास्याला अधिकच सुशोभित करीत होते. इतक्या दुर्दैवी परिस्थितीत सुध्दा बळवंत उर्फ आमचा बाळू हसू कसा शकतो असे प्रश्नार्थक भाव चेहऱ्यावर घेऊन मी बाजूच्या खुर्चीवर बसलेल्या वहिनींकडे वळलो. विचारपूस करायला तोंड उघडतो त्या आधीच वहिनींनी बोलायला सुरू केले.
“कंटाळले बाई या माणसाला. त्या लांडग्याची पाळलेली कुत्री सुद्धा आपल्या मालकाला वाचवायच्या भानगडीत पडली नाहीत.पण आमचे हे सरसावले. कुणाला मदत करावी, कधी करावी, किती करावी याचा काही धरबंध नाही या माणसाला. आता मिळालं आडनाव दयाळ आपल्या नशिबानं. पण म्हणून काय अगदी दयेचा सागरच झालं पाहिजे का?” वाहिनींचा पारा चांगलाच चढलेला होता.
दत्ता लांडगे नावाच्या उर्मट, उद्धट आणि अतिशय आगाऊ अश्या आमच्या वाडीच्या नेत्याबद्दल उर्फ भाई बद्दल वहिनी बोलत होत्या. पण त्या अगोदर बाळू विषयी थोडंसं...
बाळू दयाळ माझा शाळासोबती. पुढे कॉलेजमध्ये सुध्दा आम्ही एकत्रच होतो. लहानपणापासूनच बाळू स्वभावाने अतिशय दयाळू. कधी एकदा एखाद्याला एखादी अडचण येते आणि आपण त्याला मदत करतो यासाठीच सदैव बाह्या सरसावून तयार. आपला जन्मच परोपकार करण्यासाठी झाला आहे आणि किमान दोनचार जणांना यथासांग उपकृत केल्याशिवाय आपला दिवस कारणी लागत नाही हा त्याचा विश्वास. कुणाला स्कूटर वरून लिफ्ट दे, कुणाचा गृहपाठ करून दे, कुणी जेवणाचा डबा विसरलं तर आपला सगळाच डबा त्याला दे, कुणाला औषधे आणून दे, कुणाला डॉक्टरकडे घेऊन जा, कुणा प्रेमी युगुलाच्या चिठ्ठ्या इकडून तिकडे नेऊन दे, रात्री जागून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना चहा नेऊन दे, अश्या विविध गोष्टी करत करत त्याचा पूर्ण दिवस संपत येई. बरं मदत करण्याची संधी आपणहून नाही चालून आली तर गडी अस्वस्थ होई. आम्ही कॉलेज मध्ये असताना तर तो कॉलेज समोरील कट्ट्यावर बसून येणाऱ्या जाणाऱ्याला निरखत असे. एखाद्याला काही अडचण आली असा संशय जरी आला तरी लगेच विचारपूस करून मदत करायला सुरुवात करे. एखाद्या दिवशी लोकांचा दिवस फारच निर्विघ्न गेला असे वाटले तर येणाऱ्या जाणाऱ्या मावश्यांचे दळण उचलून दे, एखाद्या वयोवृद्धास रस्ता क्रॉस करण्यास मदत कर अशी फुटकळ कामे करून का होईना, बळवंत आपल्या वाट्याचे समाधान ओरपून घेई.
एखादा दिवस अगदीच कोरडा गेला तर मात्र गडबड होत असे. एखाद्या दारुड्याला जसा अल्कोहोल विड्रॉवल येतो तसा बाळू कासावीस होत असे. हपापल्यासारखा सगळीकडे संधीच्या शोधात फिरत असे.
मला वाटत नववीत होतो आम्ही एकदा असं झालं. बाळूचा संपूर्ण आठवडा कोरडा गेला. कुणाचे तरी भले करण्यासाठी बाळू अगदी आतूर झाला होता. तेवढ्यात वर्गातील सोम्या आणि नाम्या ही भावंडे त्याला भेटायला आली. प्रत्येक वर्गात तीन तीन वर्षे घालवून निगरगट्ट झालेल्या या अवलादी, बेरकीपणात अव्वल होत्या. नाम्याने सूतोवाच केले.
“बाळू शेठ, यावेळी काही खरं दिसत नाही हो आमचं! बापानं दम भरलाय 'यावेळी पास नाही झालात तर घरात घेणार नाही म्हणून'. आणि आमचा बाप शब्दाचा जामच पक्का आहे"
बाळूच्या मनात विचारचक्र सुरू झाले. यांची काहीतरी मदत केलीच पाहिजे.
“मी काही करू शकतो का” त्याने पृच्छा केली.
“नाही म्हणजे आता पास व्हायचं तर थोड्या चिठ्या-चपाट्या बाळगाव्या लागणार नाही का” सोम्याने सुरुवात केली.
“म्हणजे कॉपी?? ” बाळू जवळजवळ ओरडलाच.
“रस्त्यावर राहावे लागेल रे आम्हाला बाळू. म्हटलं आता फक्त तूच समजून घेशील.”
“समजू शकतो मी. करा तुम्हाला जे योग्य वाटते ते” बाळू अनिच्छेनेच म्हणाला.
“म्हटलं नाही बाळू नक्की हो म्हणेल म्हणून.. थॅंक्यु बाळूशेठ” सोम्याने नाम्याकडे पाहून म्हटले.
“अरे पण मी काय करणार यात? बाळूने विचारले.”
“म्हणजे असं की चिठ्या तू बाळगायच्या. नेहेमी तू आमच्या पुढच्याच बाकावर असतोस. आम्ही विचारू तसे सांगत जायचे. नाही म्हणजे आमच्यावर पर्यवेक्षकांचा डोळा असतो रे ... हलकट साले. पण तुझ्यावर मात्र ते संशय घेणार नाहीत.”
सोम्याच्या बोलण्यात तथ्य होतं. पण आपण आजवर कधी स्वतःसाठी देखील असं कुकर्म केलं नाही मग इतका धोका पत्करून असं काम कसं बरं करावे? बाळू विचार करू लागला
मात्र परोपकाराची ही सुवर्णसंधी आयती चालून आली आहे. ती सोडणे योग्य होणार नाही असा विचार करून बाळूने होकार दिला.
गिचमीड अक्षरात लिहिलेल्या चिठ्ठ्या फुलशर्टची बाही कोपरापर्यंत दुमडून त्यात लपवयाच्या आणि मागणीप्रमाणे अलगद काढून मागे नाम्या सोम्याकडे द्यायच्या असा प्लॅन ठरला.
परीक्षा चालू झाली. मगितल्याप्रमाणे बाळू चिठ्ठ्या पास करत गेला. हर्षातिरेकाने त्याला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. आपल्या स्वतःच्या पेपरचे यात मातेरे होते आहे हे त्याच्या गावीही नव्हते.
म्हटल्याप्रमाणे खरोखरच सुपरवायझर ढमढेरे मास्तर, सोम्या नाम्यावर डोळा ठेऊन होते. त्या भागात काहीतरी घडतंय असा संशय त्यांना येत होता पण नक्की काही कळंत नव्हतं.
मागील बाकावरून जोड गोळी एखादा प्रश्न कुजबुजत विचारे. येत असेल तर बाळू उत्तर देई नाहीतर एखादी चिठ्ठी हळूच मागे सरकवत असे. पंधरा-वीस मिनिटं हा खेळ चालू होता.
नंतर वस्तुनिष्ठ प्रश्न सुरू झाले.
नाम्याने प्रश्न वाचला
“योग्य उत्तर निवडा...
युरेका..युरेका म्हणत बाथ टब मधून पळत सुटताना आर्किमिडीजने कोणते कपडे घातले होते?
पर्याय आहेत...
अ- झगा
ब- गंजीफ्रॉक
क - चड्डी
ड- काहीच नाही ”
प्रश्न वाचताना नाम्याने हसू कसेबसे दाबले.
बाळूने थंडपणे उत्तर दिले...
ड- काहीच नाही.
इतक्या वेळ हसू दाबून ठेवणाऱ्या नाम्या आणि सोम्याला फिसकन हसू आले.
“युरेका.... युरेका..” असा गडगडाटी आवाज आला. कोण बोलले म्हणून त्रिकुटाने आपल्या समोर पाहिले. ढमढेरे मास्तर विजयी मुद्रेने खुर्चीतून उठत होते. “युरेका म्हणजे ... सापडले . .. युरेका म्हणजे ... सापडले” म्हणत त्यांनी
तिघांना उठण्याची खूण केली आणि काठी घेऊनच समोर आले. “चला प्रिन्सिपॉल साहेबांच्या केबिन मध्ये. चांगली धिंड काढतो तुमची आर्किमिडीजच्या वेशात.”
“सर आम्ही काही केलेलं नाही. हवं तर झडती घ्या आम्हा तिघांची” नाम्या म्हणाला. सरांनी झडती घेतली. चिठ्ठ्यांची थप्पी बाळूकडे मिळाली. बाळूची उत्तरपत्रिका जेमतेमच भरलेली होती. ती जप्त केली. बाळूला प्रिन्सिपॉल साहेबांकडे नेण्यात आले. इतके होऊनही बाळूचे मन सुप्त समाधानाने भरून पावले होते.
एक वर्ष पुन्हा नववीत बसावे लागल्याचे कोणतेही दुःख न बाळगता, बाळू आपल्या स्वभावानुरूप घाऊक स्वरूपात परोपकार करतच राहिला.
काही वर्षे लोटली. आमच्या दोघांच्या अधेमधे भेटी होत होत्या. लग्न झाल्यावर सुद्धा बाळूचा स्वभाव काही बदलला नव्हता हे कळत होतं. त्यात हे लांडगे प्रकरण घडलं.
दत्ता लांडगे म्हणजे आमच्या वाडीचा दादा कम नेता. पांढऱ्या रंगाचा सफारी सूट, काळे बूट, तेलाने चोपडून बसवलेले केस, कपाळावर गंध, गळ्यात विविध आकाराच्या सोन्याच्या चेन, दहाही बोटांमध्ये हिरेजडीत आंगठ्या, जोडीला चेहेऱ्यावर सदैव उर्मट भाव आणि उद्धट वर्तणूक अस एक पॅकेज होतं. अतिशय अशक्त शरीराचा, हाडकुळा दत्ता चालताना मात्र छाती पुढे काढून चाले. तेव्हा त्याचा सफारी सूट हँगर वर टांगल्यासारखा दिसत असे. त्याच्या दोन्ही बाजूला दोन धष्टपुष्ट गडी त्याच्या संरक्षणा साठी सदैव तत्पर असत. त्याच्या मर्जीतील कंत्राटदार लोक दत्ता जाईल तेथे आधीच हजर होत. आणि मग तेथे त्यांच्या लाळघोटेपणाची स्पर्धा चालू होई.
लांडगेचा अवतार जेवढा बीभत्स होता त्यापेक्षा त्याचे उद्योग अधिकच घृणास्पद होते. सगळ्या खात्याचे अधिकारी त्याच्या खिशात होते. या साऱ्यातून त्याने बक्कळ पैसा कमावला होता हे ओघानेच आलं.
आमच्या वाडीच्या खालच्या अंगाला नदीकाठी स्मशानभूमीचं आधुनिकीकरण करण्याचं कंत्राट आपल्या मर्जीतील माणसाला मिळवून देऊन दत्ता लांडगेनं आपलंही उखळ पांढरं करून घेतलं होतं. त्याचं उदघाटन समाजकल्याण मंत्र्यांच्या हस्ते होणार होतं. दत्ताचा लांडगेचा सत्कार होणार होता. दरडोई पाच पाचशे रुपये मोजून आणि ट्रक भरभरून माणसं आणली होती. मोठं स्टेज उभारलं होतं. सामाजिक बांधिलकी मानणारा बाळू अश्या कार्यक्रमांना चुकवत नसे. मी सुद्धा होतो. ओळखीने आम्हाला बऱ्यापैकी पुढची रांग मिळाली होती.
मंत्रीमहोदयांचे भाषण संपलं आणि दत्ता लांडगेनी माईकचा ताबा घेतला. बाजूच्या कार्यकर्त्याला दोन शिव्या हासडून जर्दा आणायला सांगितला आणि मग आपले दोन शब्द सुरू केले.
भाषण करता करता दत्ता टाळ्यांसाठी थोडा पॉझ घेत असे. गर्दीत पसरलेले तत्पर कार्यकर्ते मधेच “आवं बाई जोरात वाजवा टाळ्या ..... पाच पाचशे घालू लागलोय बोडक्यावर तुमच्या” असं म्हणत जनतेला प्रेरणा देत होते.
आता लांडगेला चांगलेच स्फुरण चढले होते. तो उच्च रवात बोलू लागला “माझ्या कार्यकाळात बांधलेले हे स्मशान म्हणजे आपल्या वाडीचे वैभव आहे. मी आजवर रस्ते बांधले, दवाखाने बांधले, घरं बांधली आणि तुम्हा साऱ्यांचे जगणे सोपे केले. आता असं स्वच्छ , असं आधुनिक स्मशान बांधून आपणा साऱ्यांची मरण्याची सुद्धा उत्तम सोय केली आहे. एकदा का तुम्ही कुणा आप्ताला इथे आणलं की सुविधा पाहून तुम्हाला नक्की वाटेल की मरावं तर आपल्या वाडीतच आणि जळावं तर इकडेच. ते ही विनामूल्य! नाहीतर बंधू भगिनींनो पैशाशिवाय आपल्याला आज कोण उभा करतो? पण जर उद्या तुम्ही आडवे झालात तर मी इथे तुम्हाला फुकटात सेवा देणार हे वचन देतो.”
लांडगेच्या नसा तारवटल्या होत्या. उत्तेजित होवून तो बोलत होता. समोरून पाचशेवाल्यांच्या टाळ्या थांबत नव्हत्या. आणि अचानक लांडगे थांबला. त्याचा हात छातीकडे गेला. त्याचा चेहरा पांढराफटक पडला आणि कुणाला काही कळण्याच्या आत तो जागच्या जागीच कोसळला. हे काहीतर भयंकर घडत होतं. स्मशानाचे उदघाटन नुसते रिबीन कापून न करता आपल्यासाठीच बोनी करावी असा लांडगेचा प्लॅन आहे की काय? असा विचार माझ्या मनात डोकावला.
सर्वत्र हल्लकल्लोळ उडाला. मी बाळूशी बोलायला वळलो. पहातो तर काय
बाळू एखाद्या तीरासारखा सुसाट वेगाने स्टेजच्या दिशेने धावत निघाला होता. लांडगेच्या मदतीला धावण्याची संधी आयती चालून आली होती. नाहीं साधली तर तो बाळू कसला? मला तेवढ्यात आठवलं, आठवडाभरापूर्वीच बाळू सीपीआर [ कार्डियो प्लमनरी रिससीटेशन] शिकून आला होता. अचानक हृदय बंद पडून कोसळलेल्या माणसाला वाचवण्याचं हे तंत्र त्यानं चांगलंच घोटवलं होतं.
मी सुद्धा त्याच्या मागोमाग स्टेज वर चढलो.
एव्हाना गोंधळलेल्या टगेछाप कार्यकर्त्यांना बाळूने बाजूला सारून आडव्या झालेल्या लांडगेचा ताबा घेतला होता. पाय दोन्ही बाजूला सोडून बाळू चक्क लांडगेच्या पोटावर आरुढ झाला. आपले दोन्ही पंजे एकमेकात गुंतवून त्याने आपल्या शरीराचा पूर्ण भार लांडग्यांच्या छातीवर देऊन कार्डियाक मसाज करण्यास सुरू केले होते. आपल्या धन्याला हा आगंतुक माणूसच वाचवेल या आशेने कार्यकर्ते आ वासून हा कार्यक्रम पहात होते. साहेबांचे काही बरे वाईट झाले तर या महिन्याची दारू कशी सुटणार हा विचार त्यांना खाऊ लागला होता. जवळजवळ दहा मिनिटं बाळू संपूर्ण ताकदीनिशी कार्डियाक मसाज देत होता. एकदाची ॲम्बुलन्स आली आणि त्यातून बलदंड शरीराचे दोन पॅरामेडिक्स धावत आले.
त्यांनी साऱ्या प्रकारावर नजर टाकली.
पाहतात तो काय, लांडगे यांची बुब्बुळे खोबणीतून बाहेर येतील की काय अश्या अवस्थेत होती. त्यांचे ओठ हलत होते आणि ते काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते. त्यांचे हातही हलत होते. पण त्यात म्हणावे तसे त्राण नव्हते.
“उठ भ#@% ... जीवे मारशील त्याला” एक पॅरामेडिक ओरडला. पण बाळू काहीही ऐकण्याच्या अवस्थेत नव्हता. त्याला कर्तव्यबुद्धीने पछाडले होते. तो हाडकुळ्या लांडगेंची छाती करकर वाजेपर्यंत रगडत होता. दोघा पॅरामेडिक्सनी बाळूला दोन्ही बाजूंनी उचलले आणि बाजूला ढकलले. “तुझ्या बापानं केलंय सी.पी.आर. अश्या हलत्या डुलत्या माणसात? आधी नाडी तरी चेक केली होतीस का?”
“अरेच्या!” बाळूच्या डोक्यात प्रकाश पडला. “अचानक शुध्द हरपलेल्या प्रत्येक माणसाला काही हृदय बंद पडून कार्डियाक अरेस्ट झालेला नसतो. सी.पी. आर. चालू करण्याआधी व्यक्तीच्या कॅरोटीड या मानेच्या नाडीला स्पर्श करून हृदय नक्की बंद आहे ना याची खात्री करून नंतरच कार्डियाक मसाज सुरू केला जातो. शिकवलं होतं आपल्याला पण अति उत्साहात विसर पडला”
“दोन चार बरगड्या मोडल्या आहेत. बाकी अवयवांचे डॅमेज हॉस्पिटलला गेल्यावरच कळेल” पॅरामेडिक्स लांडगेला तपासत बोलले. एव्हाना स्ट्रेचर आले होते.
“अहो दहा मिनिटांनी एक आणखी ऍब्युलन्स पाठवा ” दोन धष्टपुष्ट कार्यकर्त्यांनी जाणाऱ्या मेडिक्सना आदेश दिला. “का बरं?” मेडिक्सने विचारले. “का म्हणजे ? अहो आता या बाळूसाहेबांना पण मसाज देऊया की! असे म्हणत त्यांनी बाळूचा ताबा घेतला. खाल्या मिठाला जागणाऱ्या त्यांच्या हातानी बाळूची कणिक तिंबायला घेतली. इतर कार्यकर्त्यांनी हात धुवून घेतले.
आणि अश्या प्रकारे बाळूची रवानगी रुग्णालयात झाली.
मी वाहिनींचा निरोप घेत होतो तेवढ्यात हॉस्पिटलची रिसेप्शनीस्ट खोलीत आली. हर्षभरीत आवाजात तिने बोलायला सुरुवात केली “लांडगेला प्रसाद दिल्याबद्दल बळवंतरावांसाठी साठी काही थँक यू नोट्स आणि फुले आली आहेत हॉस्पिटलमधे. अनेकांना दुखावलं होतं लांडगेनं दादागिरी करून. त्यातीलच काही पिडीत लोक शुभेच्छा द्यायला आले होते. आणि बाळूला मारहाण केल्याबद्दल हॉस्पिटलतर्फे मेडिकोलीगल केसदेखील नोंदवली आहे त्या लांडगेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध. बळवंतरावांचे हॉस्पिटलचे बिल भरण्याची तयारी एका स्वयंसेवी संस्थेने दाखवली आहे. लांडगेच्या अनेक उद्योगांमुळे होणाऱ्या पर्यावरणाच्या हानी विरुद्ध त्यांचा लढा सुरू आहे” हे ऐकून जखमेवर फुंकर मारल्यासारखं वाटलं.
आता थोडे दिवस हॉस्पिटलमध्ये काढून बाळू पुन्हा कामावर रुजू होईल. परोपकार, परहीतदक्षता, कणव, दयाबुद्धी, प्राणिप्रेम, मानवतावाद इत्यादींचा चालता बोलता पुतळा पुन्हा येरे माझ्या मागल्या म्हणत आपले लोकोपयोगी उद्योग चालूच ठेवेल यात मला तिळमात्र शंका नाही.
डॉ. मिलिंद बापट
डहाणू