श्वानपुराण
श्वानपुराण
श्वानपुराण
करकचून ब्रेक दाबला. पण व्हायचे ते झालेच. माझ्या गाडीची ठोकर लागली आणि तो केकाटत रस्त्याच्या बाजूला जाऊन पडला. आर्त अश्या उच्च रवात तो विव्हळू लागला.
काही म्हणतोय की काय ? बहूधा आपल्याला विचारतो आहे "लक्ष कुठे असतं रे तुझं ड्रायव्हिंग करतेवेळी? किती लागलं मला!" मनात आले, जरा पाहूया किती लागलंय ते. पण खाली उतरलो आणि चावला बिवला तर? असूदे. नाहीतरी फारच प्रजावळ वाढली आहे यांची. कशाला रस्त्यावर यायला पाहिजे यांनी? असं मनात म्हटलं. माझी अपराधीपणाची टोचणी लगेच कमी झाली.
पण त्या विव्हळणाऱ्या कुत्र्याचे ओरडणे मनात घोळत होते, टेप फिरवल्यासारखे. ग्लानी येऊ लागली.
अचानक तोच कुत्रा माझ्या समोर दिसू लागला. माझ्या एवढाच उंच. आपले तोंड माझ्या तोंडाशी आणून त्याने मला हुंगले आणि चक्क मराठीत बोलू लागला.
”फक्त एक आठवडा काढ राजा. तुलाही कळू दे आम्हा श्वानांची सुखं दुःख. ”
मी चमकलो. पाहतो तर माझे रूपांतर एक चतुष्पादात झाले होते. एक सर्वसाधारण कुत्रा. चार पायांवर सराईतपणे उभा होतो. मी मागे वळून पाहिले. लाखो वर्षांच्या उत्क्रांतीमध्ये गळून पडलेले पुच्छ माझ्या पार्श्वभागी अचानक प्रकटले होते. माझ्या तोंडातून मध्ये मध्ये आपोआप गुरगुर आवाज येत होता. जवळचे आणि दूरचे असे असंख्य वास मला येऊ लागले होते. छोटया मोठ्या आवाजानेही माझे कान हलू लागले होते. आणि शाप असो किंवा संधी पण या कुत्र्याच्या म्हणण्यानुसार आपल्याला आठवडाभर श्वानरुपात वावरावे लागणार हे मी ओळखले.
"माझे नाव सिंघम. एका इमारतीच्या मागच्या गल्लीत मी राहतो. आणखीही बरेच भाईबंद आहेत तिकडे. तुला मी तिकडे घेऊन जातो. आता तू आमचा पाहुणा" तो वदला. मलाही या नव्या रूपात उपजीविका करण्यास हे बरे पडेल म्हणून मी लागलीच तयार झालो. तो लंगडत पुढे निघाला.
इमारत जुनाट होती. शांतिवन सोसायटी अशा पाटीवर कुण्या टवाळाने कोळश्याने "अ" लिहून त्याचे अशांतिकृपा केले होते. बिल्डरने सुरुवातीला लावलेल्या चुन्यावर दर पावसाळ्यात नव्या बुरशीची ओंगळ पुटे चढली होती. कीती कौशल्य असते या बिल्डर लोकांचे चुना लावण्यात. रहिवासी सुध्दा तोडीस तोड दिसत होते. दिवाबत्ती, देखभाल, स्वच्छता, सुरक्षितता असल्या भिकार व्यवस्थांवर इथल्या राहिवास्यांचा अजिबातच विश्वास दिसत नव्हता. भटके कुत्रे, उंदीर, घुशी, झुरळे इत्यादी मुक्या प्राण्यांना एकूण सारेच आकर्षक वाटेल याची राहिवस्यानी इतकी काळजी घेतलेली पाहून मला गदगदून आले.
मला पाहताच होते नव्हते ते सगळे चतुष्पाद गोळा झाले. सिंघम सौम्यपणे भुंकला. त्यांनी सुद्धा भुंकून प्रतिसाद दिला. अतिथी देवो भव सदृश्य काहीतरी म्हणत असावेत. तरीही प्रत्येकाने स्वतंत्रपणे मला आपुच्छमस्तक हुंगून आपली खात्री करून घेतली. माझ्याही घशातून बराच वेळ आपोआपच गुरगुर आवाज येत होता.
"हा सल्लू, हा क्रिश, ही क्रिती, हा आयुष, हा ब्रॅड.." एकेकाची ओळख करून देत सिंघम सांगत होता.
तेवढ्यात एका हाडकुळ्या कुत्र्याने अचानक तोंड आकाशाकडे फिरवले आणि हृदय पिळवटेल अश्या आर्त स्वरात "बु s s हू s s s s. बु s s हू s s s s " असे ओरडायला की रडायला आरंभ केला.
"हा हिमेश” सिंघमने माहिती पुरवली. अगदी लहान होता तेव्हा वरून कुणीतरी हिमेश रेशमियाचे "तेरा तेरा तेरा सुरूs sर" लावले होते. सुरू s s र ऐकू आले की हा तितक्याच कर्कश आवाजात "बु हू s s s" करू लागला. त्यामूळे हिमेश नाव मात्र मिळाले.
अचानक इतर कुत्रेही आता आपापल्या पट्टीत गळे काढू लागले. हार्मोनियमच्या अनेक सुरांवर एकदम बोटे ठेवून भाता जोरजोराने दाबला की येतो, तसा काहीसा आवाज येऊ लागला. हा कोलाहल बघून मी चक्रावलो. साऱ्या श्वानपरिवारच्या चेहेऱ्यावर विलक्षण धास्ती दिसत होती. माझा प्रश्नार्थक चेहरा पाहून सिंघम म्हणाला "दुसऱ्या मजल्यावर स्वरीतकुमार कोकीळ राहतो. आपल्या तालुका स्पर्धेत उपविजेता झाला होता. त्याच्या सगळ्या मित्रांनी त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवला. तेव्हापासून स्वतःला अरिजित सिंग समजतो. तो गाण्यासाठी आतल्या खोलीत आला की आम्हाला वास लागतो. आम्ही केवळ घ्राणेंद्रियाच्या सहाय्याने माणसांचे दृश्य अदृश्य कारभार जाणतो बरं का! तू ही प्रयत्न करून पहा.
मी ही थोडे आकाशाकडे डोळे लावून, नाक फेंदारून, प्रयत्न केला. पण मला स्वरीतकुमारांचा काही सुगावा लागेना. "तूझ्यातील मानवी चारित्र्य जाऊन तुला श्वानाधर्मात नैपुण्य प्राप्त व्हायला थोडा वेळ लागेल" सिंघमने मला समजावले.
अचानक गिटारीचे काही मंद्र सूर ऐकू येऊ लागले आणि त्यानंतर छप्परफाड आवाजात तार सप्तकातील "सा" लावून स्वरीत बुवांनी गाण्याची सुरुवात केली. पहिल्या मजल्यावरच्या काही राहिवास्यानी खिडकीत आपले तोंड दिसणार नाही अशा बेताने अलगद खिडक्या बंद केल्या हे मात्र माझ्या नजरेतून सुटले नाही.
भूकंप व्हायच्या वेळीस कुत्रे सैरभैर होतात असे ऐकले होते. इथेही येणाऱ्या अरिष्टाला सामोरे जाताना त्यांची चांगलीच त्रेधा उडाली होती. सगळे गुरगुर करू लागले. उगीचच दुसऱ्याचा चावा घेउ लागले. कुणी आपलीच शेपूट चावू लागले.
स्वरीतकुमारांनी सुरुवात सरगम गाऊन केली. फक्त त्यांनी लावलेल्या सा, रे, ग, म किंवा अगदी कुठल्याच स्वराचा संगीतातील सा रे ग म शी दुरान्वयनेही संबंध नव्हता. नंतर वरून आलाप सुरू झाले आणि इथे कुत्रेही विलाप करू लागले. बहुधा साऱ्यांना भुका लागल्या होत्या आणि त्यात हा जुलमी जलसा. कोणी तरी शिळेपाके देईल म्हणून इमारतीखाली थांबणे भाग होते. "भीक नको पण कुत्रा आवर" ही म्हण म्हणायची वेळ बिचाऱ्या या दुर्दैवी कुत्र्यांवरच आली होती. किमान अर्धा तास कुठल्या तरी गूढ आणि अगम्य रागातील तानांचा रतीब घालून झाला आणि कुमारांनी एकदम पाश्चिमात्य संगीताला हात घातला. त्यांचे वरच्या सप्तकातील कर्णकर्कश फॅल्सेटो आणि व्हायब्रेटो सुरू झाले आणि सारा श्वान समुदाय बिथरला. त्यांनीही अत्युच्च रवात अरण्यरुदन सुरू केले. आता ते तहान भूक विसरले होते. पूर्वी आमच्या गावात कुणी मेले की खास रडायला काही बायका येत. स्वरीतकुमार आणि माझे नवे सवंगडी यांची जुगलबंदी त्यास तोडीस तोड होती. हा कोलाहल ऐकून मात्र आता इमारतीतील जनता चांगलीच वैतागली. काहींनी खिडक्या उघडून "हॅड हॅड" ओरडायला सुरुवात केली. काहींनी या निमित्ताने स्वरीतकुमारांच्या घराकडे पाहूनही "हॅड हॅड" म्हणून घेतलं. जाणाऱ्या एक दोन मुलांनी आमच्याकडे दगड भिरकावले. एखाद्या महागड्या गाडीच्या खेटून उभे रहाणे हा साऱ्या कुत्रा जमातीच्या डावपेचांचा भाग असावा. मारलेले मोठाले दगड आम्हाला चुकवून आमच्या मागील एका फॉर्च्युनर गाडीला लागले. त्यामुळे तिन्ही लोक व्यापेल असा आवाज झाला आणि तो ऐकून आता सारेच रहिवासी आणि आसपासच्या इमारतीतील लोक खिडकीत आले. गाडीचे मालक, कंत्राटदार हपापशेठ हावरे खिडकीतून हातवारे करत शिव्या देऊ लागले. कंत्राटे मिळवण्यासाठी साहेब लोकांचे लांगुलचालन (चाटूगिरी असे वाचावे) करण्यात हपापशेठ प्रसिद्ध असल्याने, वीरश्री संचारल्याचा कितीही आव आणला तरी त्याना कुत्रं भीक घालेना. मुले हॅ... हॅ हसत तेथून निघून गेली.
अचानक कुत्रेमंडळीनी पवित्रा बदलला. अचानक त्यांचे भुंकणे पूर्णपणे थांबले. त्यांच्या माना ताठ झाल्या. ते भराभर असे छोटे छोटे श्वास घेऊ लागले. अश्या धापा टाकत असतानाच त्यांची शेपटी डोलू लागली होती. त्यांच्यात अचानक दिसू लागलेल्या या सत्प्रवृत्तीचे कारण लवकरच उघड झाले. समोरच्या रस्त्यावरून पांढऱ्या रंगाची एक मोहक अशी एक कुत्री नाकासमोर पहात जात होती. एकदा हळूच नजर वाकडी करून आपल्याला हवा तो प्रतिसाद मिळतोय याची तिने खात्री करून घेतली.
ही "अँजेलिना" सिंघमने माहिती पुरवली. या जमातीत बॉलीवूड काय पण हॉलिवूड स्टार्स पण तितकेच प्रसिद्ध आहेत हे पाहून यांच्या अभिरुचीचे कौतुक वाटले. अँजी निघून गेल्यावर काही कुत्रे तिच्या गेल्या दिशेने छाती काढून भुंकू लागले. पण आता उशीर झाला होता. संधी असताना बोटचेपेपणा करायचा आणि संधी गेल्यावर उत्साह दाखवायचा ही वृत्ती फक्त माणसांमध्येच आहे असे मी समजत होतो.
बाजूने एक मांजर जांभई देत देत आमच्याकडे तुच्छ नजरेने पाहत होते. मधेच जमिनीवरील एक बिस्किटाचा तुकडा चाटत होते. "ही क्लिओपॅट्रा,... महा माजोरडी आहे. मुद्दाम आपल्या समोर येऊन बिस्किटे खात असते. सोसायटीच्या सेक्रेटरींची मांजर आहे ना! कुणाची बिशाद नाही हिला हात लावायची.” सिंघमने माहिती पुरवली. क्लिओपॅट्राच्या मागे मागे एक गुबगुबीत असा बोका येताना दिसला.
"हा लिओनार्डो. सोसायटीभर फिरून फुकट खायचे आणि भाट्यांवर शाईन मारत फिरायचे एवढाच याचा उद्योग." सिंघमने माहिती पुरवली.
"या वाघाच्या मावशी -मावसोबाचे फुकटचे लाड होतात. पोट फुटेस्तोवर खायला मिळते. आमचे हाल मात्र कुत्रंही खात नाही"
तेवढ्यात बिल्डिंगमधील एका दुकानदाराने आपले दुकान बंद केले. आणि बाहेर येऊन बिस्किटाचे पुडे उघडले. सगळ्या श्वानसमुदायाने तेथे धाव ठोकली. दुकानदार एकेक बिस्कीट हवेत फेकत होता आणि एखादा कुत्रा हवेत उडी मारून ते तोंडात पकडत होता व खात होता. "हा मुकेसभाई. कुत्र्यांना काहीतरी खायला रोज आणतो. समोरून त्याचा नोकर या त्याच्या या प्रसंगाचा विडिओ करणार आणि इंस्टावर आणि एफबी वर टाकणार. खूप पॉप्युलर इन्फ्लुएन्सर आहे. भरपूर इनकम आहे त्यावर” सिंघम म्हणाला. असो बापडा इन्फ्लुएन्सर की काय. आपले पोट भरायला मदत तर करतो. असे मनात म्हणत मी ही चार दोन बिस्किटे खाऊन घेतली. "ए डोबा.. जरा सरखीरिते फोकस करजे . थोबडू बराबर आवू जोइये मारू" ( फोकस नीट कर मूर्खा.. माझे थोबाड नीट आले पाहिजे). मुकेसभाईने नोकराला खडसावले. "जेव्हू होय तेवुज आवे ने" असे काहीतरी नोकर पुतपुटताना मी मात्र ऎकले.
खाऊन झाले आणि सहज म्हणून जवळच्या चारचाकी जवळ चालत होतो. जणू प्रतिक्षिप्त क्रियेने पाय वर गेला. गाडीचे मागील टायर न्हाऊन निघाल्यावर साक्षात्कार झाला की हळूहळू का होईना आता आपणात आपल्या नव्या स्नेहीमंडळींचे थोडे फार गुण येऊ लागले आहेत.
पोटे भरल्यावर सामुदायिक विश्रांतीचा कार्यक्रम चालू झाला. आम्ही सगळेच इमारतींच्या बाजूच्या रस्त्यावर लवंडलो. सिंघम पोटतिडकीने मला सांगू लागला. "तुम्हा माणसे इतर प्राण्यांना किती हीन समजता. जणू आमचा जन्म तुमच्या फायद्यासाठीच झाला आहे. एकीकडे प्राण्यांवर प्रेम करा म्हणता आणि दुसरीकडे त्यांचे हाल करता. आम्हा कुत्र्यांवर तर तुम्ही इतक्या अपमानजनक म्हणी आणि वाक्प्रचार वापरता. आता हेच पहा ना
भीक नको पण कुत्रा आवर
कुत्रंही भीक घालेना
कुत्रा हाल खात नाही
तुला न मला घाल कुत्र्याला
कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच
अपनी गलीमे कुत्ता भी शेर
आंधळं दळतं कुत्रं पीठ खातं
अमुक अमक्याचा कुत्रा असणे
शोधूनही सापडत नाही एखादी स्तुतीपर म्हण.
इंग्रज लोक सुद्धा यात मागे नाहीत बरं,
स्लेप्ट लाईक अ डॉग, बीइंग अ लॅपडॉग, किंवा सिक अस अ डॉग, गॉन टू डॉग्स असली असंख्य उदाहरणे देता येतील. तुमचा तो धर्मेंद्र तर कुत्ते.... कमीने ने सुरुवात केल्याशिवाय एक डायलॉग बोलत नसे."
मी मात्र निरुत्तर होऊन पहुडलो. आपोआपच एक सौम्य असा मशीन थरथरल्यासार आवाज माझ्याच आतून येउ लागला आणि गुंगी येऊ लागली. झोप कधी लागली ते कळलेच नाही.
जमीनीला जोरदार हादरे बसु लागले आणि मी जोरजोरात भुंकू लागलो. "भिऊ नकोस" सिंघम म्हणाला."हा भूकंप नाही. आम्हाला भूकंप येणार हे बरेच अगोदर समजते. दांगट परिवाराच्या सुकन्या मिस. देवयानी येण्याची ही आगाऊ सूचना आहे. रोज संध्याकाळी सोसायटीत त्या ब्रिस्क वॉक घेतात. ते घेताना मोठमोठ्याने फोन वर बोलतात. जरा शांतपणा मिळू देत नाही आम्हाला.
"अरे हाssssड!" अश्या गर्जनेसह देवयानी मॅडमची एन्ट्री झाली. हाड हाड ऐकून सगळ्याच श्वानसमुदायाची पांगापांग झाली. धपाधप पावले टाकत आलेल्या त्या शे सव्वाशे किलोच्या कायेला खरं तर देवयानी ऐवजी दैत्ययानी हे नाव अधिक समर्पक झाले असते. चालताना दांगट बाईंचे लक्ष मोबाइलवर होते आणि इयरफोन लावून त्या कुणाशी तरी बोलत होत्या. हे हाड हूड आम्हा चतुष्पादांना उद्देशून नसून त्यांच्या बॉयफ्रेंड कम भावी नवऱ्याला होते हे लक्षात आले. अधे मधे चुकून त्याला त्या हनी, कधी स्वीटी वगैरेही म्हणत होत्या. "लग्नांनंतर हे असे आईच्या ताटा खालचे मांजर राहिलास तर मी तुला चांगला बदडून काढीन" वगैरे धमक्याही देत होत्या. दोन पायांच्या माणसांना कुणी हाड हूड केलं की कुत्रे मंडळींना भलताच आनंद होतो असे दिसले. दांगट बाईंच्या दांडग्या चालीने सारा आसमंत हादरत होता. तीस चाळीस पावसाळे पाहिलेल्या या जीर्ण इमारतीला अजून किती दिवस हे असले धक्के सहन होतील असा मी विचार करीत होतो.
एकूण शांतिवन सोसायटीचे नाव बदलून अशांतिवन करणारा तो टवाळ इसम किती द्रष्टा होता हे माझ्या लक्षात आले.
एव्हाना मी धारण केलेल्या नव्या रूपात चांगलाच रुळलो होतो. मध्ये मध्ये उगीचच गुरकावणे, विनाकारण रडणे विव्हळणे, कंटाळा येईपर्यंत भुंकणे, समोर दिसणाऱ्या सगळ्या गोष्टींचे वास घेणे इत्यादी गोष्टी सराईतासारख्या होत होत्या. दुरून येत असलेल्या माणसांचाही थोडाफार सुगावा लागू लागला होता.
अचानक माझे कान उभे राहिले. श्वास वाढला. शरीरात प्रचंड ऊर्जा खेळू लागली. इमारतीच्या मागे एक अंधारा रस्ता होता. वायुवेगाने मी त्या दिशेने मुसंडी मारली. तेथे अंधारात उभ्या असलेल्या इसमाच्या लुंगीला मी जबड्यात करकचून पकडले. तो लुंगी सोडवून पळायचा निकराने प्रयत्न करू लागला. माझे सगळेच सवंगडी आता भुंकू लागले होते. हा कोलाहल ऐकून आता सोसायटीतील मानवी प्रजाही तेथे जमली. मी एका फार मोठ्या समाजसेवकाच्या लुंगीला हात घातला .. आपलं... जबडा घातला होता. बाळूशेठ बिनकामे हा काही साधासुधा असामी नव्हे. स्वच्छ शहरासाठी काढलेले मोर्चे असोत, रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी केलेले आंदोलन असो, पैशास पासरी मेणबत्ती मार्च असो, बाळू शेठ नेहेमी फोटोसाठी पुढे. आमच्याच गल्लीत छापलेल्या आपल्याच भावाच्या वर्तमानपत्रात दर दोन दिवसाआड बाळू शेठचा फोटो असे. मी मात्र त्याला स्वतःच्या घरचा ओला कचरा गुपचूप सोसायटीच्या आवारात टाकताना रंगेहात पकडले होते. आता लुंगी फाटो वा माझा जबडा तुटो, मी सोडायला तयार नव्हतो. कुणीतरी माझ्या पेकटात काठी घातली आणि माझी पकड सैल झाली. बाळू शेठने धूम ठोकली.
आता मात्र मला राग आवरेना. मी पूर्ण ताकदीनिशी जोरजोरात भुंकू लागलो.
भो.... भोभो .... भोभोभोभो... भोभोभोभो
"अहो.. अहो... अहो उठा. नीट जागे व्हा. अहो असे काय बिछान्यात हातपाय झाडताय? आणि भो भो काय चाललंय? "बायकोने म्हटलेले हे सारे मला ऐकू येत होते. पण माझ्या श्वानरुपाशी मी फारच तादात्म्य पावलो होतो. शेवटी हिने माझ्या अंगावर लोटाभर पाणी टाकले. मी माझे ओले झालेले हात जिभेने चाटु लागलो. हळूहळू शुद्ध आली. काल रात्री घरी पोचता पोचता समोरच्याच रस्त्यावर एका कुत्र्याला माझ्या गाडीने उडवल्याचे मला स्मरले. खिडकीत गेलो. समोरील रस्त्यावर कुठेही अर्धमेला किंवा मृत कुत्रा पडलेला दिसला नाही. मला हायसे वाटले. त्यातून बायकोने समोर चिकन कटलेट आणि कॉफी असा ब्रेकफास्ट तयार ठेवल्याचे पाहून माझ्या सदसद्विवेकबुद्धीला लागलेली टोचणी कुठल्या कुठे पळून गेली. समोरच्या प्लेटचा वाफाळलेल्या कॉफी सहित एक छानसा फोटो हॅशटॅग ब्रेकफास्टऑनसंडे लिहून शेअर केला. आणि ते कुत्रे आणि त्यांची दुःख मनातून हद्दपार झाली.
डॉ. मिलिंद अ. बापट,
डहाणू
