STORYMIRROR

Dr. Milind Bapat

Comedy

4  

Dr. Milind Bapat

Comedy

बिबळ्या आला रे आला...

बिबळ्या आला रे आला...

9 mins
0


रस्त्यावरच्या धूळीचे लोट अंगावर घेत घेत एस. टी. बोरगावच्या स्टॉपवर एकदाची पोहोचली.  खडखडाट  बंद झाल्यामुळे प्रवासी दचकून  जागे झाले. एका कुटुंबाच्या मागोमाग मी ही उतरलो. हिवाळ्याच्या पानगळीमुळे समोरचे वृक्ष अगदीच बोडके झाले होते. त्यामुळे जेमतेम पाव मैलावर असलेले बोरगाव स्पष्ट दिसत होते. बाबल्या पिसाळ कुठे राहतो विचारताच एका शाळकरी पोराने मला दोन मिनिटातच एका घरासमोर आणून सोडले.

दाराला बाहेरून कडी होती. “बसा काका तुम्ही ओसरीवरच, येतीलच पिसाळकाका येवढ्यात. हागणदारीचा टाइम हाय त्येंचा” असं म्हणून फिदीफिदी हसत, घसरणारी चड्डी चढवत तो पळाला. 

मी ओसरीवर बसलो. हल्ली बरीच गावे हागणदारी मुक्त झाली आहेत. त्यामुळे येथे उजळ माथ्याने हागणदारी चालू असल्याचे कळल्यावर मात्र थोडे आश्चर्य वाटले. 

बाबल्या माझा कॉलेजमित्र. डिग्री अर्धवट सोडून आता घरची शेती बघेन म्हणून गावी परत आला.  शिकत असताना पुण्याला आम्ही एकाच खोलीत रहात होतो.

ग्रामीण भागातील समाजकारणावरील माझ्या आगामी प्रबंधाची तयारी चालू होती. त्यानिमित्ताने थोडे खेड्यात रहाणे होईल आणि थोडा विरंगुळा म्हणून, चांगला महिनाभरासाठी त्याच्याकडे रहायला आलो होतो. (खरं तर माझ्या पुण्यातल्या घरी टेबल खुर्चीवर बसून  मी असे अनेक प्रबंध पाडले आहेत. कुठेही प्रत्यक्ष न जाता. असो.) त्याचे आई वडील काही दिवस बाहेरगावी गेले असल्याने गडी एकटा होता. जुन्या दिवसांची उजळणी होईल आणि गावची मजाही अनुभवता येईल असा विचार होता. मला फार वेळ थांबायला लागले नाही. हातात टमरेल घेतलेली बाबल्याची बटुमूर्ती शीळ वाजवत माझ्यासमोर प्रकटली. 

त्याची गळाभेट घ्यायला मी पुढे होतोच, तोच, 'एवढ्याश्या टमरेलातले पाणी प्रातर्विधीला कसे बरे पुरवले असेल गड्यानी?' असा विचार आला आणि  मिठी मारायचा विचार रहित केला.

घरात गेलो. चहा न्याहारी करून राहिलेला बराचसा दिवस मी छान झोप काढली. श्रम परिहारानंतर आम्ही दोघांनी गावात फेरफटका मारला. पारावर बाबल्याच्या मित्र मंडळींबरोबर निवांत गप्पा मारल्या. भेटलेल्या प्रत्येकाने निघताना आवर्जून, “घेऊन या बरं का सायबाना सकाळच्याला” असं बाबल्याला म्हटलं. मी कोड्यात पडलो. त्यानंतर आम्ही घरी परतलो.

“एवढ्या सगळ्यांकडे एकदम उद्याच कसं जायचं न्याहारीला? एकेक दिवस जाऊ जमेल तसं.” मी म्हटलं

“खुळा आहेस की काय? न्याहारी कुठली? सकाळी लवकर उठून सगळे एकत्र जातात हागणदारीला. त्यासाठी बोलवत होते.” बाबल्या म्हणाला. “सकाळी झुंजु  मुंजु झाल्यावर निघू. उशीर झाला तर बाया बापड्या यायचा टाइम होतो”

माझ्या डोक्यात प्रकाश पडला. आयुष्यात पहिल्यांदाच उघड्यावर प्रातर्विधी करण्याचा थरारक अनुभव आपल्यासमोर वाढून ठेवला आहे . त्यातून  बाबल्या आणि मित्रमंडळीनी घरची मुंज असल्यासारखे आपल्याला आग्रहाचे आमंत्रण केले आहे. आता आपली सुटका नाही.

माझी जाम टरकली. काही तरी करून आपण हे टाळले पाहिजे असे वाटू लागले. घरात संडास नाही हे दिसतंच होते. जाम म्हणजे जाम जायचंच नाही या मंडळींबरोबर हागणदारीला. धरूनच ठेवायची लहान पोरांसारखी. असं मनात आलं. पण असं किती वेळ रहाता येईल? पोट म्हणजे काय गोदाम आहे की भाक्रा नांगल धरण? 

फार पूर्वी कमल हासन अभिनित पुष्पक नावाचा एक चित्रपट आला होता. त्यात, एका खोक्यात मलविसर्जन करून त्याची विल्हेवाट लावण्याचा पोट धरून हसवणारा प्रसंग होता. तसा काही प्रकार आपल्याला जमेल का? आणि उघडकीस आले तर ? किती हसे होईल आपले? 

का सरळ निघून जावे पुन्हा  पुण्याला? छे छे.. गावातल्या समाजकारणावर भल्या मोठ्या नावांचे प्रबंध लिहायचे आणि प्रत्यक्ष अनुभव घ्यायची वेळ आली तर पळ काढायचा असा दुटप्पीपणा मला नाही शोभणार. असे विचार करण्यात बराच वेळ गेला.

संध्याकाळी जवळच्या जय हनुमान खानावळीत दोघे जेवायला गेलो. उद्या हगवण लागली तर हागणदारीच्या वाऱ्या कराव्या लागतील या भीतीने मी मर्यादा पाळूनच थोडा भाजीभात जेवलो. बाबल्याने मात्र कोंबडी जणू आपली जन्मजन्मांतरीची वैरीण असल्यासारखे चिकन मसाल्याचे ताट ओरपुन ओरपुन साफ केले. मधेच गडी खिशातून चपटी बाटली काढून घोटही घेत होता. 

परत आलो.  दोघेही बिछान्यावर आडवे पडलो. गप्पा मारू लागलो. खेड्यातील अन्नपाण्याचे दुर्भिक्ष कमी करण्यासाठी सरकारने काय काय केले पाहिजे, या विषयावर बाबल्याने निरूपण चालू केले. थोड्याच वेळापूर्वी बाबल्याने किमान चार जणांचे अन्न पाणी एकट्यानेच फस्त केले याची त्याला आठवण करून द्यावी असे मनात वाटले. दोघेही झोपी गेलो. रात्री बाबल्या सतत कुशी बदलत पोटावरून हात फिरवत होता.

पहाटे बाबल्याने झोपेतून उठवले आणि सरळ हातात एक टमरेल दिले. “बापाचा आहे माझ्या. सध्या तू वापर. आणि आता निघू लवकर. गर्दी झाली हागणदारीला की काय पण प्रायव्हसी नाय रहात बघ.

“म्हणजे भर उघड्यावर विधी करणाऱ्यांना पण प्रायव्हसी वगैरे लागते?” मला हसू आले. 

आम्ही चालू लागलो. आम्ही तडक पारावर गेलो. मंडळी वाट पहातच होती. बाबल्याने ओळखी करून दिल्या. "हे तात्या तुंबडे... इथले माजी सरपंच". मळकट धोतर, कधीतरी पांढरा असावा असा संशय येणारा मांजरपाटाचा खिसावाला गंजीफ्रॉक, झुपकेदार पांढऱ्याशुभ्र मिश्या आणि सिंपल हार्मोनिक मोशन चे नियम पाळत हलणारे अवाढव्य पोट अश्या त्या साठी पलीकडच्या देहाला मी नमस्कार केला. "रामराम!" ते म्हणाले. त्यांच्याच बरोबर लेंगा सदरा घातलेल्या व्यक्तीने  "मी तुपे मास्तर" म्हणून स्वतःच ओळख करून दिली. आणखी एक काळभोर हवालदार साध्या वेशात आले होते. तेवढ्यात टीशर्ट आणि ट्रॅकपॅन्ट घालून एक तरुण हजर झाला. त्याच्या येण्याआधीच त्याच्या परफ्यूमचा वास माझ्या नाकपुड्यात घुसला होता. "हाय... आय ॲम प्रद्युम्न साठे... बीई.. आय टी फ्रॉम बॉम्बे" त्याने घोषणा केली.

"पदू म्हणतात त्याला. फायनलचे विषय राहिलेत म्हणून गावी आलंय रिकामटेकडं. भा#&खाऊच्या घरात इंग्लिश शौचालय आहे, अगदी पंखा लावलेला संडास, ... याची ...?#₹@&.. थंड करायला. पण खाज जात नाही मवाल्याची!"

तात्यांनी लगेच माहिती पुरवली. एकुण देहबोलीवरून तात्या आणि प्रद्युम्न यांच्यामध्ये फारसे सख्य नव्हते असे दिसले.

मी शिक्षणक्षेत्रातील असल्याचे कळल्याने मास्तरांनी माझी मुलाखत घ्यायला चालू केली.

"काय मग प्राध्यापक साहेब, कुठल्या विषयावर प्रबंध लिहिताय?... नाही म्हणजे जरा तात्यांना कळेल असे सांगा बरंका" असे म्हणून स्वतःवरच खूष होऊन एकदा माझ्याकडे आणि नंतर तात्यांकडे बघितले.

“खेड्यामधील सामाजिक उतरंडीमागील भौगोलिक आणि राजकीय घटक यांचा अन्योन्य संबंध आणि त्याचा शहरी संस्कृतीच्या परिप्रेक्षातून वस्तुनिष्ठ उहापोह” मी उत्तरलो.

मास्तरांनी आवंढा गिळला. आणि एकदम विषयच बदलला.

"चला आता, फार उशीर नको ... आमच्या  प्राथमिक विभागाच्या शिक्षिका सुमित्राबाई सातच्या ठोक्याला जातात.  त्या अगोदर आपण आपलं परत आलेलं बरं" मास्तर वदले आणि त्यांनी एकदम जीभ चावली.

"का हो मास्तर, शाळेतली पोर बी देईनात एवढं लक्ष देताय की बाईंकडे" हवालदार उद्गारले. सगळीकडे हशा पिकला. 

सगळे चालू लागलो. रस्त्याच्या कडेला एक मोठा बोर्ड होता. "हागणदारी युक्त गाव". वाचून मी विचारले, "आल्यापासून मला प्रश्न पडला होता. हल्ली सगळी प्रगतिशील गावे हागणदारी मुक्त झाली आहेत. मग आपल्याच गावात अजून हागणदारी कशी सुरू राहिली?"

आता तात्या पुढे सरसावले. नवीन माणूस हा प्रश्न विचारणार हे अपेक्षितच असावे.

"अहो, माझ्या सरपंचकीत मी केलं होतं बोरगाव हागणदारी मुक्त. पण काही करावं आणि सारंच वंगाळ व्हावं असं झालं." तात्यांना इतरांनी ही माना हलवून अनुमोदन दिले. 

अहो प्रत्येक जण नियमाने आपापल्या घरात नाहीतर ग्रामपंचायतीच्या संडासात नेमानं जाऊ लागला. पण सगळ्यांनाच चुकल्या चुकल्या सारखं वाटू लागलं. पूर्वी गावात भांडण झालं तर पोलिसाआधी आम्हाला बातमी लागत होती. कुणी बाई गरोदर राहिली तर तिच्याबी आधी आम्हाला कळत होतं. कुणी जमिनीचा सौदा ठरवला तर व्यवहार होण्याआधी वार्ता समद्या गावाला कळत होती. झालंच तर कुणाच्या पोरीचं कुणाबरोबर झेंगाट आहे, कळलंच आम्हाला. कुणी नवी गाडी घेतली अन् बायकोआधी त्यावर शेजारणीला फिरवून आणलं, वार्ता लागलीच म्हणा आम्हाला. या काळभोर हवालदारानं सायबाच्या साथीनं केस दाबायचे किती खाल्ले ही आणि अश्या अनेक बातम्या वाऱ्यासारख्या पसरत होत्या की. हागणदारी बंद झाल्यापासून लोकं एकमेकांपासून दूर गेले. माणसा-माणसातला संवाद संपला." तात्यांनी डोळे पुसले 

"तेव्हा सर्वांना कळलं ... हागणदारी हाच गावाचा श्वास होता आणि खास लोकाग्रहास्तव आम्ही ही प्रथा पुन्हा सुरू केली.

"च्या मारी... कशाचे काय फायदे असतील कुणी सांगावे रे बाबा" म्हणत मी कपाळावर हात मारला.

"असं सेन्सॉर करून सांगताय हो तात्या" प्रद्युम्न बोलू लागला "अहो ती नाचणारी मैनावती शेजारच्या गावच्या राहुल्याबरोबर पळून गेली. आणि तुम्हा लोकांना महिनाभरानं कळलं. केवढा तो पोटशूळ झाला या तुम्हा सर्वांना. बाकी हागणदारी मुळे गावाच्या बातम्या व्हॉट्सॲप पेक्षा फास्टात जात होत्या हे मात्र खरं. नो एन्क्रिप्शन नो नथिंग. आणि हो, अजून एक म्हणजे ती सरकारनी फुकटात बांधून दिलेली शौचालयं झाली रिकामी. या तात्याच्या चिरंजीवानं त्याचं गोदाम बनवलंय. शेतमाल ठेवतो. बाप तसा बेटा म्हणा."

तात्या, मास्तर आणि हवालदार एकदम थंड झाले आणि बराच वेळ कुणी काहीच बोलेना. मैनावतीचा  उल्लेख सर्वांना फारच वर्मी लागला होता बहुधा.

"आरं बाबांनो ... एक व्हिडिओ फिरतोय रं सगळीकडं" तात्यांनी नव्या विषयाला हात घातला "बिबळ्या येतोय म्हणे गावात रोज रात्रीचा. अंधाराचा फायदा घेऊन हल्ला करतो म्हणे. जरा उशिरानंच जाऊ उद्यापासून. चांगलं ऊन निघाल्यावर"

"ओ तात्या. प्रद्युम्न म्हणाला, "एक नाही चांगले चार बिबळे फिरताहेत तालुक्यात. हागणदारी आहे गावच्या खालच्या अंगाला. बाजूला लागून रान. येईल की बिबळ्या दिवसाढवळ्या उन्हाचा आणि म्हणेल , अरे वा! तात्यांच्या तुकतुकीत .....कांतीवर किती छान ऊन पडलंय. पण आत्ता तर चांगला दिवस उजाडलाय. आता काय बरं करायचं? जाऊ दे. सोडून देऊ आजला."

तात्या चरकले. पण धीर गोळा करून बोलू लागले. "न्हाई म्हंजे तुमी शहरात शिकून आलेली मानसं, म्हणून जरा इचारतो. ते बिबट्या का बिबळ्या मला चावलं तर मला ती रेबीज का काय त्याची इंजेक्शन घ्यावी लागतील काहो? लई भ्या वाटतं हो मला सुईचं!"

मास्तर तात्यांकडे करुणामय दृष्टीने पाहू लागले. "तात्या तो काय कुत्रा आहे का चावायला,... डायरेक्ट फाडतो की तो  तुम्हाला! सुईचे काय घेऊन बसलाय?"

"टाके मारत असतील का हो? फाडलेल्या जागी?" तात्यांची अजून एक शंका.

"मारतील की!... छान टाके मारून शिवतील हो तुमची चामडी. शव विछेदनानंतर  असेच बरे उघडे ठेवतील फाटलेले चामडे. पण त्यात काय घाबरायचे तात्या? अहो जराही दुखणार नाही हो. मी सांगतो ना तुम्हाला"

हे भयंकर उत्तर ऐकून तात्यांच्या कपाळावर घर्मबिंदू जमा झाले. ते रामरक्षा पुटपुटत चालू लागले."

बाबल्या आणि प्रद्युम्न पोट धरून हसू लागले.

"तात्या... अहो तात्या" बाबल्या म्हणाला "ते बिबळ्याचे व्हिडिओ सगळे बोगस होते बघा. मी आणि प्रद्युम्नने नेट वरून डाउनलोड केले आणि केले तुमच्या ग्रूपवर व्हायरल! वाटलंच होत तुमची झोप उडणार. बिबळ्या वगैरे काही नाही आणि आपल्या हागणदारीला धोका तर अजिबात नाही"

हे ऐकून तात्यांनी शिव्या देत देत त्या दोघांच्या दिशेने हवेत लाथ झाडली आणि गुडघ्यात कळ आली म्हणून मग लंगडत चालू लागले"

"हळू हो तात्या... नाही म्हणजे पडलात तर टमरेलातले पाणी सांडेल. मग कोरड्यानेच आटपा सगळं" प्रद्युम्न म्हणाला.

अखेर एकदाचे सगळे इच्छित ठिकाणी पोहोचले. अजूनही वातावरण धूसर होते. जवळच उंबराचे एक मोठे झाड होते. छोटी मोठी टेकाडे आणि बोरी बाभळीची झाडे याचा आडोसा घेऊन

सगळे लगेच उद्देश्यपूर्तीच्या मागे लागले. कार्यभाग साधला की साऱ्यांनी   उंबरापाशी यायचे हा प्रघात होता असे कळले. मी एका मोठ्या कातळामागे स्थिरावलो. बाबल्या मात्र थोडा दूर झुडुपांमागे गेला. 

कामे झाली आणि दहा पंधरा मिनिटात तुपे मास्तर, प्रद्युम्न, हवालदार काळभोर आणि मी असे एकेक करत उंबरापाशी परत येऊ लागलो. तेवढ्यात मागून तात्या गुढगे धरून धापा टाकत येत "थांबा! थांबा!" म्हणत होते असे दिसले. आम्ही त्यांच्या दिशेने गेलो"

"लई मोठा आवाज येतोय झुडुपामागं. डरकाळीच म्हणा ना!" तात्या थरथरत होते. 

मला हसू आले. "अहो बाबल्या गेलाय झुडपामागे. मर्दानं आख्खी कोंबडी हादडलीय रात्रीला. मसाल्यासकट. रात्रभर पोटाला तडस लागली होती. थोडाफार आवाज तर यायचाच" मी हसत हसत म्हणालो.

"तुम्हाला काय नवीन आहे होय हे तात्या?" प्रद्युम्नने टोला लगावला.

आता सगळेच खो खो हसू लागले.

तात्यांच्या समाधानासाठी आम्ही एकत्रच झुडपाकडे गेलो. पाय उंच करून पलिकडे पाहिले.

समोर, आमच्या डाव्या बाजूला बाबल्या आपले काम आटोपून जागीच थरथरत उभा होता. विस्फारलेल्या डोळ्यांनी तो कशाकडे पाहतोय हे पहायला आम्ही उजवीकडे नजर फिरवली आणि भीतीने आमची गाळण उडाली. बाबल्यापासून साधारण चाळीस पन्नास फुटावर, आमच्या उजवीकडे एक धष्टपुष्ट बिबळ्या बाबल्यावर नजर रोखून होता. 

आम्ही आलटून पालटून एकदा डावीकडे एकदा उजवीकडे पहात होतो. एकदा बाबल्या एकदा बिबळ्या... पुन्हा बाबल्या नंतर पुन्हा बिबळ्या. 

बिबळ्याचे सारे सर्वेक्षण करून झाले. आणि आता तो बाबल्याच्या दिशेने मुसंडी मारणार हे दिसत होते.

"बाबल्या.... त्यो मोठा दगूड हाय तिथं... त्यावर उभा रहा... फॉरेस्ट सायबानी शिकवलंय" आमची बोबडी वळलेली असताना तात्यांना वाचा फुटली. 

मी तात्यांचे तोंड दाबले. पण उशीर झाला होता. रामसेच्या हॉरर पिक्चरमध्ये झाँबी लोक करतात तशी मान वाकडी करून बिबळ्याने आमच्याकडे रोखून पाहिले. सगळेच जण थरथरू लागलो. तरी बरे आमचे मलमूत्रविसर्जन आधीच आटोपले होते. 

पण बिबळ्याने पुन्हा आपले लक्ष बाबल्यावर केंद्रित केले आणि पुढच्याच क्षणी तो बंदुकीच्या गोळीसारखा सुसाट सुटला आणि बाबल्याच्या दिशेने धावू लागला. 

त्यानंतर पुढे जे काही झाले ते पाहून माझा मेंदू बधीर झाला. धावणारा बिबळ्या धूळ उडवत काही क्षणातच बाबल्यापासून 10 फुटावर पोचला. आणि त्याने जणू करकचून ब्रेकच मारला. तरी त्याच्या वजनामुळे घसरत तो बाबल्यापासून पाच फुटावर येऊन थांबला. पण आता त्याला बाबल्याकडे पाहण्यात काहीही स्वारस्य नव्हते. 

त्याने नाक फेंदारले. त्याच्या मिश्या विस्फारल्या गेल्या. काहीतरी वास घेत असल्यासारखी कृती करू लागला. आकाशाकडे तोंड करून, वास घेत तो स्वतःभोवतीच गोल गोल फिरू लागला. त्याच्या तोंडातून थोडा फेस आला. हां हां म्हणता त्याचे त्राण गेले. थोड्याच वेळात तो संथ श्वास घेत निपचित पडला. 

उत्क्रांतीशास्त्रात मी वाचले होते की हिंस्त्र प्राणी जवळ आले की त्यांना पाहून दुबळ्या प्राण्यांचे नुसत्या भीतीनेच विष्ठा विसर्जन होते. आणि आधी आकर्षक वाटलेले भक्ष हिंस्त्र प्राण्यांना अचानक नकोसे होते. यामुळे दुबळ्या प्राण्यांचा मात्र जीव वाचतो.

कुठल्या का तत्वाने होईना, पण बाबल्याचा आणि त्याच्यामुळे आमचा जीव वाचला होता. पण आम्हाला पुढे बाबल्याच्या  दिशेने जायचा धीर होत नव्हता. आम्हाला त्या वासाचा प्रसाद घ्यायची हिंमत नव्हती.

आम्ही सगळ्यांनी धूम ठोकली. आम्ही पुढे आणि आमच्या मागे चड्डी सावरत बाबल्या. धावता धावता मास्तर ओरडत होते... "बाबल्या, मुर्खा अंतर ठेवून धाव.  आम्हास मूर्च्छित करू नकोस.

दुसऱ्याच दिवशी तात्याच्या पोराने सार्वजनिक शौचालयात साठवलेला शेतमाल काढून टाकला. ते वापरास योग्य केले. आणि बिबळ्याच्या कृपेने बोरगावमधील हागणदारी बंद झाली ती कायमचीच. 

( ही कथा काल्पनिक असून यातील कुठलेही पात्र, प्रसंग आणि स्थळ यांचा वस्तुस्थितीशी काही संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. यात कुठल्याही चतुष्पाद प्राण्याचा अपमान करण्याचा हेतू नसून लेखक स्वतःला प्राणीप्रेमी म्हणवतात.)


डॉ. मिलिंद अ. बापट 

डहाणू 


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy