गण्यास पत्र
गण्यास पत्र


प्रिय गण्या,
स.न.
महिन्याला एक पत्र लिहायचा क्रम आता कितीही कालबाह्य झाला असला तरी सोडवत नाही. आपण अगदी शाळेपासूनचे मित्र. मी सरधोपट मार्गाने शिक्षण, नोकरी, लग्न इ. गोष्टी केल्या. पण "सुख म्हणजे नक्की काय असतं? काय पुण्य असलं की ते... घरबसल्या मिळतं?" असा गहन प्रश्न पडला की मला तुझा सडाफटिंग स्वभाव आणि जीवनशैली आठवते. लग्न न केल्याने माणूस तुझ्यासारखा सुखी होत असेल हे अगोदर लक्षातच आलं नाही. लग्नसंस्था नावाचं कारस्थान कुणा कुटिल माणसानं शोधून काढलं असेल कुणास ठाउक. त्याला पुढील शंभर जन्म सुख न मिळो अशी माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. सोशल मीडियावर चित्र विचित्र सेल्फी टाकणारी, आठवड्याला किमान सातवेळा मॉलला जाऊन खरेदी करणारी आणि पुढच्या आठवड्यात पुन्हा त्यातल्या काही वस्तू परत करण्यासाठी आणखी सात वेळा नवऱ्याला धाडणारी, कजाग आणि भांडखोर बायको त्याला प्रत्येक जन्मी मिळो असा माझा शाप आहे. आम्ही डोळ्यात प्राण आणून ज्याची वाट पाहत वर्षामागून वर्ष ढकलतोय ते “अच्छे दिन” तुला घरबसल्या लाभत आहेत हे पाहून कधीकधी असूया वाटते. बाकी लग्न करून सुखाचा शोध घेणं म्हणजे वाळवंटात मासेमारीला जाण्यासारखं आहे तुला हे त्या वयातच कळलं. तू हवं तेव्हा, वाट्टेल ते खातोस, सूर्य डोक्यावर येईपर्यंत झोपतोस, गाडी चालवताना रस्त्यावरच्या तमाम प्रजेला मनसोक्त शिव्या देतोस, कुठेही पचकन थुंकतोस, अगदी ओकेपर्यंत पितोस. तुला मोबाईलची हिस्टरी डिलिट करावी लागत नाही. जुने फोटो अल्बम काढून त्यातले मैत्रिणींचे फोटो तू तासनतास न्याहाळतोस (लिहितानाही डोळ्यात पाणी आलं बघ). उद्या तू डुकरासारखं चिखलात लोळत पडलास तरीही मला तुझ्या त्या स्वातंत्र्याचा हेवाच वाटेल. (डुक्कर हा माझ्यालेखी फार आदरणीय प्राणी आहे. त्याचा बेदरकार आणि निगरगट्ट स्वभाव आणि उकिरड्यावर खुलणारं सौंदर्य यापलीकडे झुंडीचं बळ वापरण्याची त्याची ताकद अफलातून आहे. गल्लोगलीच्या समाजसेवक मंडळींनी त्याचा सखोल अभ्यास करावा. याबद्दल अधिक विवेचन पुन्हा कधीतरी).
सगळं जग नेहमी आईने केलेल्या संस्काराची महती गात असतं. पण कसे बोलावे, कसे चालावे, काय खावे, त्याही अगोदर, मुळात खावे की नाही, कुठला शर्ट घालावा, कुठल्या मित्राबरोबर किती वेळ कुठल्या विषयांवर गप्पा माराव्यात, इतर स्त्रियांशी कसे वागावे या अशा व्यापक विषयांवर आपल्यावर खरे संस्कार करते ती बायकोच. निदान तीन ते चार मुलांवर संस्कार करण्याची प्रत्येक स्त्रीची क्षमता असते पण ‘हम दो हमारा एक’च्या या जमान्यात त्या क्षमतेचा पुरेसा वापर होत नाही. ती खदखदणारी शक्ती मग नवऱ्याच्या दिशेने आक्रमण करते आणि वारेमाप संस्कार करीत सुटते असा माझा एक खाजगी असा सिद्धान्त आहे. असो. गेल्या दोन महिन्यांपासून माझी बायको सतत एकच टुमणं लावून बसली होती. तुम्ही मुळी अगदीच अनफिट आहात. तुम्ही दररोज व्यायाम करायला लागा. तसं शरीर सुदृढ आणि निरोगी असावं हे मी तत्वत: मान्य करतो. “हेल्थ इज वेल्थ” असं कुणीतरी म्हटलंच आहे. कुणी म्हटलंय हे माहीत नसलं तरी हल्ली पंचाईत होत नाही. नाना पाटेकर, रतन टाटा, विकास आमटे, नांगरे पाटील, गेला बाजार रॉबर्ट मुगाबे यापैकी कुणाच्याही नावावर आयुष्याचं तत्त्वज्ञान खपवायची सोय उपलब्ध आहे. असो.
त्याचं असं झालं. एका रविवारी हिनं फर्मान काढलं. “आज हॉलचा पंखा साफ करा.” झालं! मी एका हातात फडकं घेऊन स्टुलावर चढलो आणि दिखाऊ तत्परतेनं पंख्याच्या पात्या पुसू लागलो. त्यात मी वामनमूर्ती. जमतील तेवढे पाय उंच करून मी काम चालू केले. पण माझ्या तूंदिलतनू देहाचा तोल गेला आणि मी उताणा जमिनीवर आदळलो. पाठीचं धिरडं होणं या वाक्प्रचाराचा अर्थ चांगलाच लक्षात आला. बायको आतून धावत बाहेर आली ती ओरडतच. “काडीचा फिटनेस नाही मेला अंगात. शरीराचे नुसते मेले चोचले करा... पण व्यायाम म्हणून करू नका!” मी डोक्यामागे दाबत अजिजीनं म्हटलं.....“अगं, जरा लागलंय कुठे कुठे ते तरी पाहा.” पण तिने काही हेका सोडला नाही. “ते काही नाही. उद्यापासून तुम्ही पहाटे वॉकिंगला जाणार आहात.” यातल्या “पहाटे” या शब्दाने माझ्या अंगावर काटा आला. वॉकिंगपेक्षा वेकिंग शब्दाची मला जन्मतःच ऍलर्जी आहे. सूर्योदय हा मी फक्त चित्रामध्ये आणि कवितांमध्येच अनुभवलेला असल्याने आता ही ब्याद कशी टाळावी याचा मी विचार करू लागलो. यापूर्वीही अनेकदा हिने मला व्यायाम करण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला होता. पण मी त्यातून धूर्तपणे पळवाट काढून विषय टाळण्यात यशस्वी झालो होतो. कधी टीव्हीवर उघड्या अंगाने वावरणारा एखादा नायक दाखवून ती म्हणे - “पाहा काय बॉडी कमावलीय या हृतिक रोशनने.” यावर.. “अगं, त्याचेच पैसे मिळतात त्याला” किंवा, “यांचं अभिनयातील तोकडेपण झाकायला ही अशी बॉडी कामाला येते.” अशी फाजील टिप्पणी करून वर “हल्ली या क्षेत्रात नुसती शोबाजी झाली आहे. अभिनयकला सोडून नुसत्या दिखाऊ बाबींना महत्त्व देतात. सगळा साला अमेरिकन कॅपिटॅलिझमचा छुपा अजेंडा! आधी एखाद्याला हिरो बनवायचं आणि मग त्याच्याकडून आपली उत्पादनं खपवायची” वगैरे वैचारिक मुक्ताफळे तोडली की तिचा आग्रह तात्पुरता बंद होई. मला घाबरवलं तर मी नक्की तिचं म्हणणं गंभीरपणे घेईन असं तिला वाटे.
मधेच ती मला सांगे अमकीच्या नवऱ्याला चाळीशीत हार्ट अटॅक आला, तमक्याचं वजन कमी होईना म्हणून शस्त्रक्रिया करून जठर लहान केलं, कुणाची तरी रक्तशर्करा कशी औषधाने कमीच होत नाहीये. पण काहीबाही उत्तरं देऊन मी वेळ मारून नेत असे. एकदा एक गडी, गॅस सिलिंडरची डिलिव्हरी द्यायला आला. भरलेला सिलिंडर खांद्यावर ठेऊन तो लीलया दोन मजले चढला होता. तो सिलिंडर त्याने अलगद हॉलमध्ये ठेवला. साधं घामाचं टिपूस दिसत नव्हतं त्याच्या कपाळावर. तो सिलिंडर नुसता सरकवत मी स्वयंपाकघरात नेला आणि मी धापा टाकू लागलो. माझा चढलेला श्वास ऐकून बायको आत आली.. “त्या गड्याला पाहिलंत? एवढी मेहनत करूनही दमला नाही... आणि तुम्ही!" पण माझं उत्तर तयार होतं. “अगं, माझ्यासारख्या बुद्धिमान माणसाचं ऐंशी टक्के रक्त मेंदू घेतो. मी त्या गड्यासारखी अंगमेहनत केली तर माझा मेंदूच चालेनासा होईल! प्रत्येकजण आपापली गुणवैशिष्ट्य जाणून काम करतो.” तात्पुरती तिची बोलती बंद झाली. मात्र आता या पंखा प्रकरणानंतरचा हिचा रुद्रावतार पाहून मात्र आपली सुटका नाही हे जाणवले. अखेरीस मी शरणागती पत्करली आणि नववर्षच्या पहिल्या दिवसापासून दररोज पहाटे चालण्याचा व्यायाम सुरू करायचे ठरले.
गण्या, आपल्या वर्गातला तो प्रदीप देशमाने तुला आठवत असेलच. आपण त्याला पद्या म्हणायचो, नाही का? दहावीला सगळा वर्ग अभ्यासात बुडालेला आणि हा मात्र मुलींच्या ओळीत पहिल्या बाकावर बसणाऱ्या सुरुची वैशंपायनवर अँगल लावून बसायचा. त्यानं एकदा तिला प्रेमपत्र लिहिलं होतं पण ते नेमकं वर्गात कुणाच्या तरी हाती पडलं आणि भर वर्गात त्या पत्राचं जाहीर वाचनही झालं होतं. पण पठ्ठ्या काही सुधारला नाही. शेवटी व्हायचं तेच झालं. माझ्या लहान भावाबरोबर त्याने पुन्हा एकदा दहावी दिली आणि आमच्या सगळ्यात धाकट्या भावाबरोबर शेवटी एकदाचा उत्तीर्ण झाला. प्रदीप आता एक यशस्वी बांधकाम व्यावसायिक आणि समाजसेवक आहे, त्यामुळे त्याला फॉर्च्युनरमध्येच फिरावं लागतं. चरबीचे थर वितळवण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणून तो रोज चालण्याचा व्यायाम करायला सकाळी काही मित्रमंडळी बरोबर जातो हे कळलं. मी ठरवून टाकलं की बायकोकडून आपल्या माथी इतर कुठले अघोरी व्यायाम मारले जाण्याआधीच आपण हा तुलनेने सोपा वॉकिंगचा व्यायाम चालू करावा. मी पुढच्याच दिवशी सकाळी सहा वाजता प्रदीपच्या वॉकिंग ग्रुपमध्ये दाखल झालो आणि कामाला लागलो. बाकी प्रदिपची स्थूल देहयष्टी आणि पोटाचा नगारा पाहून मला माझ्या शरीराबद्दल वाटत असलेली थोडीफार लाजही नाहीशी झाली. एवढे दिवस नियमित वॉकिंग करूनही हा नग इतका लठ्ठ कसा हे मात्र कोडंच होतं.
प्रदीपने कुठलासा फिटनेस बेल्ट लावला होता. त्यात कॅलरी, अंतर, वेग, पावले अशा बऱ्याच निरुपयोगी गोष्टी दिसत असत. दर थोड्या अंतरावर तो स्मार्टफोन काढून त्यात कसलेसे आकडे पाही. पण गण्या.. आपण दमलो की नाही हे ठरवायला हल्ली या कॅलरी का मोजव्या लागतात हे काही कळलं नाही. बरोबरच्या सवंगड्यांमध्ये एक आयुर्वेदिक डॉक्टरही होते. साठीकडे झुकलेले पण सुदृढ बांध्याचे हे डॉक्टर योगशास्त्रात पारंगत होते हे त्यांच्या बोलण्यातून कळले. मला भेटल्या भेटल्या त्यांनी म्हटले... “मी तुम्हाला योगासनेसुद्धा शिकवीन. अस्से वजन कमी होईल. लोकं तुम्हाला ओळखेनाशी होतील. नुसतं चालून स्वस्थ होता येत नाही. पतंजलीसारख्यांनी काय गांजा पिऊन योगसुत्रे लिहिली?” या बोनस शिकवणीचा विचार करून मला दरदरून घाम फुटला. इतर दोघे सदस्य मात्र तरुण होते. मनोज आणि मयंक. ते प्रदीपच्या इमारतीत राहत असं कळलं. त्यांचं चालण्याबरोबर एकीकडे काहीतरी कुजबूज करत खिदळणं चालूच असे. समोरून एखादा तरुणींचा जत्था आला की त्यांचे पाय थिजून जात. त्यातून एखादी जाणीवपूर्वक कटाक्ष टाके, आणि त्यांना पूर्णच घायाळ करे.
जवळजवळ ४५ मिनिटे रोज असे चालणे नेमाने चालू झाले. डॉक्टरसाहेब मध्येच एखाद्या योगासनाने कसा वायू सरतो, एखादे आसन कसे बद्धकोष्ठतेचा नायनाट करतं याबद्दल माहिती देत. एकंदर, मलावरोध ही डॉक्टरांच्या खास मर्जीतली व्याधी असावी कारण त्याचा उल्लेख ते सातत्याने करीत. पित्तशामक, वातहारक, रक्तवर्धक, कफकारक, कफहारक, मलासारक, शुक्रवर्धक, बलवर्धक, असे जडजंबाळ आयुर्वेदिक शब्द वापरून त्यांनी मला नामोहरम केले होते. याशिवाय पंडुरोग, राजयक्ष्मा, अग्निमांद्य, संधिवात, मधुमेह इत्यादी महाभयंकर रोगांची भुतावळही होतीच. मध्यमवयीन स्त्रियांचा एक घोळका एकदा समोरून आला. टुरिस्ट असाव्यात. सामोरे आल्यावर आम्ही तोंडदेखलं स्माईल केलं. त्याही हसल्या. पाहतो तर काय, प्रदीपचं पोट एकदम दिसेनासं झालं होतं. एवढा अवाढव्य ऐवज हातोडा मरल्यासारखा चपटा कसा झाला हे निरखून पाहतो तो काय, साऱ्या शक्तिनिशी त्याने ते आत ओढून घेतले होते. पाहुण्या नजरेआड झाल्यावरच त्याने एकदाचा श्वास घेतला आणि धापा टाकत उरलेलं वॉकिंग संपवलं.
गण्या, तुला एक सल्ला दिल्याशिवाय राहवत नाही पण तू जर कधी चालण्याचा व्यायाम करू लागलास (देव करो अन् ही वेळ तुझ्यावर न येवो), तर भलेही हळू चाल किंवा वेगाने, दहा मिनिटे चाल अथवा दोन तास, मौन बाळगून चाल किंवा थोडे बोलत चाल पण एक पथ्य जरूर पाळ .. राजकारणावर अजिबात म्हणून बोलू नकोस. ज्या चेवाने सारे सवंगडी त्या चर्चेत सहभागी होतील की चालणे दूर.. दुपारचे जेवणसुद्धा टळेल. एकदा आमच्या बरोबरच्या ग्रुपमध्ये एका धंद्यात फटका खाल्लेल्या गृहस्थाने “बहुत बुरे दिन चल रहे हैं" म्हटलं, तर लगेच दोघांनी त्याच्याशी वाद घालायला सुरुवात केली.. “सगळीकडे अच्छे दिन असताना तुम्हाला काय धाड भरलीय?” चालणं राहिलं बाजूला, दोन तट पडले आणि मुष्टियुद्ध, कुस्ती, कराटे असे सगळे खेळ एकदम चालू झाले. मनोज आणि मयंक तसे हरहुन्नरी स्वभावचे होते परंतु आपल्याबरोबर ज्येष्ठ लोकही आहेत याची त्यांना थोडीही जाणीव नसे. रोज भेटणाऱ्या इतर गटांमधील वॉकर्सना त्यांनी पशुपक्ष्यांची नावे दिली होती. कुणाला हीप्पो, कुणाला शहामृग, कुणाला विंचू तर कुणाला हत्ती. एका ताडमाड उंच पुढे वाकलेल्या इसमाला ते गोरीला म्हणत. प्रत्येक वेळेस व्यक्ती पाठमोरी झाली की जोरजोरात हसत. मला या दुकलीच्या वाह्यातपणाचा जरा रागच आला.
गण्या तुला आठवत असेलच आपण कॉलेजमध्ये असताना किती सज्जन होतो. घाण घाण शिव्या देऊ पण कुणा मोठ्या माणसाला ऐकू येऊ देत नसू. मोठ्यांना मान देणं कुणी आपल्याकडून शिकावं. आपण या प्रदीपच्याच घरी व्हीसीआरवर व्हिडिओ कॅसेट लावून मस्त मस्त पिक्चर पहायचो, पण त्याचे आई-वडील घरी नसतील तेव्हाच. फुक फुक सिगरेटी फुंकु पण विक्सची गोळी चघळल्याशिवाय घरी पाऊल टाकत नसू. या आजच्या पिढीला मोठ्यांचा मान ठेवणं काय कळणार? असो. तर गण्या, हा शरीर संपदेच्या श्रीमंतीकडे नेणारा हा प्रातःकालीन दिनक्रम अव्याहतपणे सुरू होता. आपले वजन दहा-पंधरा किलोने कमी झाले आहे. आपल्याकडे ढुंकूनही न पाहणारी शेजारीण मंत्रमुग्ध होवून आपल्याकडे पाहत आहे, एखादी हास्याची लकेर तिच्याकडून आपल्या वाट्यास येत आहे. आपल्या पँट कंबरेला घट्ट करण्यासाठी टेलरकडे देण्यात येत आहेत, आपल्या ताटात आपण उत्साहाने घेतलेला गोड पदार्थ सरळ बाजूला काढून ठेवणारी पत्नी, स्वतः खात असलेली चॉकलेट्सही अधूनमधून आपल्याला देत आहे अशी स्वप्ने पडू लागली.
मात्र एकेदिवशी अघटीत घडले. सर्वात पुढे डॉक्टर, त्यानंतर पंचवीसेक फुटांवर मयंक-मनोज जोडी, नंतर मी आणि शेवटी फिट-बेल्ट सांभाळत प्रदीप असे चालत होतो. एका बेवारशी कुत्र्याने (चतुष्पाद बरं का... तसे माझ्या ओळखीत काही द्विपाद कुत्रेही आहेत) बहुधा हे पाहून प्रेरणा घेतली आणि तोही डॉक्टरांच्या मागे चालू लागला. कुत्रा दिसला की हात शिवशिवणारे काही लोकं असतात. मयंक त्यापैकी होता. त्याने उचलला एक दगड आणि दिला कुत्र्याच्या दिशेने भिरकावून. कुत्रा घाबरला, बिथरला आणि धावत डॉक्टरांना मागून जाऊन आदळला. आणखीनच घाबरून त्याने डॉक्टरांच्या कमरेखाली नको तेथे कडकडून चावा घेतला आणि पोबारा केला. डॉक्टर कळवळले. संस्कृतला तात्पुरती रजा देऊन शुद्ध देशी शिव्या त्यांच्या ओठातून पाझरू लागल्या. त्यांनी चालणे थांबवले. आम्ही त्यांना धीर द्यायला पुढे सरसावलो. एक हात त्यांनी मागच्या भागास दाबून धरला आणि दुसऱ्या हाताने फोन उचलून कुणाशी तरी रागारागाने बोलू लागले. "श्वानदंश!.... पार्श्वभाग!... रुधिर.. ”असं काही तरी ऐकू आलं. आम्ही डॉक्टराना घरी सोडण्याची व्यवस्था करू लागलो. मनोज आणि मयंक मात्र हसू दाबत “इंजेक्शन.... उरलेल्या पार्श्वभागावर.... हे हे हे" असं काहीतरी बोलल्याचं निसटतं ऐकल्याचा भास झाला. डॉक्टर धारातीर्थी पडले पण आपण लढतच राहायचं हा माझा निर्धार होता. न लढून सांगतो कुणाला.
काही दिवस सगळे मनासारखे सुरु होते आणि तो दिवस आला. आमचं वॉकिंग जेथे संपे तेथे आम्ही आमच्या गाड्या पार्क केलेल्या असत. एका चतुर आणि कावेबाज इसमाने आमच्या परतण्याच्या वेळी तेथे वडापावची गाडी लावायला सुरुवात केली. रिकामे पोट आणि दमणूक यामुळे नेमके त्यावेळी पोटात कावळे ओरडत असत. मेनका, उर्वशी, तिलोत्तमा वगैरे अप्सरा पूर्वी ऋषी मुनींच्या तपश्चर्या लीलया भंग करीत. तसाच परिणाम आमच्यावर त्या वड्याच्या अदभुत सुगंधाने झाला. वॉकिंग नंतर लगेचच काही खाऊ नका असं डॉक्टरांनी अनेकदा सांगितलं होतं. (त्यांच्याच शब्दात.... पदभ्रमण पश्चात अन्न ग्रहण किमान एका घटिकेनंतर करावे ). आधी प्रदीपची विकेट पडली. मलाही भरीस पाडून एके दिवशी त्याने वडापावची ऑर्डर दिली. “अरे, हा बिचारा इतक्या दूर उत्तर प्रदेशच्या खेड्यातून येतो. आपल्या महाराष्ट्राची पाककृती शिकतो. आपल्याला इतक्या प्रेमानं हिंदी बोलत बोलत खाऊ घालतो. आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं? ते काही नाही. भैयाजी दोन प्लेट वडापाव देना..ताजा ताजा तळके देना और मिरचीवाला चटणी जरा जास्तच टाको." नाही म्हणायला मलाही मोह झाला होताच. त्या दिवसानंतर जेवढ्या जोमाने आम्ही चालत असू त्याहूनही दुप्पट जोमाने रोज चार चार प्लेट फस्त करू लागलो.
दोन महिन्यांनी कुठल्याशा मामुली तापासाठी फॅमिली डॉक्टरकडे गेलो होतो. माझं वजन चांगलं तीन किलो जास्त भरलं. बायकोने तेथेच एकदम उलटतपासणी सुरू केली. “मेलं चालायला जाता की लोळायला? वजन वाढलंच कसं म्हणते मी?” नाईलाजास्तव तिला आमच्या नव्या दिनक्रमाची माहिती द्यावी लागली. (तुला सांगतो गण्या, या बायका रौद्ररूप धारण करून, डोळे वटारून जेव्हा पृच्छा करतात तेव्हा सत्य ओठांवर आल्याशिवाय राहत नाही. अर्थात तुला काय ठाऊक असणार म्हणा.) नवरा रोज ४ प्लेट वडापाव हाणून येतो हे ऐकून तिच्या अंगाचा तिळपापड झाला. “ते काही नाही ... उद्यापासून वॉकिंग बंद म्हणजे बंद!” मी चेहेऱ्यावर जणू एका फार मोठ्या कर्तव्याला मुकत असल्यासारखे दुःखी भाव आणले खरे पण आतून आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. माझा आनंद फार काळ टिकला नाही. दुसऱ्याच दिवशी हिने माझ्या हातात एक पावती दिली आणि म्हणाली, “कोपऱ्यावरच्या जिमचे 3 महिन्याचे आगाऊ पैसे भरले आहेत. उद्यापासून रोज तिथे जायचं. घर जवळच आहे. व्यायाम झाला की कुठेही शेण न खाता तडक घरी यायचं...” तर गण्या, या नव्या प्रसंगाला सामोरे जायच्या विचाराने मन सुन्न झाले आहे. थरथरत्या हातांनी मी हे पत्र तुला लिहितो आहे. तुझी खुशाली कळवावीस. बाकी हे जिम काय त्रांगडं आहे हे आता लवकरच कळेल. त्याबद्दल पुढील पत्री. कळावे लोभ असावा ही विनंती.
तुझा,बन्या.