Dr. Milind Bapat

Comedy

4.5  

Dr. Milind Bapat

Comedy

श्रीयुत खंडेराव खडसे यांचे मुतखडे

श्रीयुत खंडेराव खडसे यांचे मुतखडे

7 mins
327


"वो क्या है, मूत्रमार्गमे दगड बनके उसका दाब मूत्रपिंडपर आ गया है। अभी अंथरूण पकडके बैठा हुं। थोडा वय क्या हुवा एकेक व्याधी लगने लगी ." खंडेराव आपल्या काळीज हादरवणाऱ्या हिंदीत फोनवरून जोरजोराने पलीकडच्या व्यक्तीला सांगत होते.

खंडेराव खडसे म्हणजे आमच्या शाळेचे मराठीचे एक ज्येष्ठ शिक्षक. अंगकाठी शिक्षकापेक्षा एखाद्या मल्लाला साजेशी. खणखणीत आवाज, आकडेबाज मिश्या, दहा मजली हास्य आणि कमालीचे भोळेपण यामुळे शाळेत शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये कमालीचे प्रिय. सारे त्यांना खंडूकाका म्हणत. आजन्म ब्रह्मचारी राहिलेले काका शाळेच्याच आवारातील एका निवासस्थानात आपला नोकर बांके बिहारी याच्या सोबत रहात. गेली वीस वर्षे बांके त्यांना हवं नको ते बघणे, स्वयंपाक, बागकाम, इ. कामे करत होता. त्याच्याशी गप्पा मारणं हाच एक विरंगुळा काकांना होता.

सेवानिवृत्ती जवळ आल्यामुळे आता थोड्याफार व्याधी सुरू झाल्याच होत्या. त्यात डाव्या बाजूच्या मूत्रमार्गातील एका मुतखड्याचे निमित्त झाले आणि काकांना पाठीपासून ओटीपोटापर्यंत विलक्षण वेदना होऊ लागल्या.

सुट्टी घेऊन खंडूकाका अंथरुणावर झोपून राहिले. बांके त्यांच्या सगळ्या गोष्टी हातातल्या हातात देऊ लागला. रोज रात्री तीनदा उठून बाथरूमला जाणारे काका रात्रभरात एकदाही गेले नाहीत. सकाळी सवयीप्रमाणे गेले. पण लघवीचे टिपूसही बाहेर येईना. दीर्घश्वसन करणे, लहान मुलांना काढतात तसा "शू s s" आवाज काढणे, नळ चालू करणे वगैरे जनमान्य क्लृप्त्या वापरून झाल्या. तेव्हा कुठे चार दोन लालसर थेंब निघाले आणि हे काही तरी वेगळे आहे याची काकांना जाणीव झाली.

बिछान्यावर आडवे पडत काकांनी बांकेला ओरडूनच सांगितले "आज वर्गावर जाता येणार नाही म्हणून सांग! अडली रे बहुधा लघवी!"

बांकेने त्वरित ऑफिसमध्ये जाऊन निरोप दिला. दरम्यान काकांनी आपले स्नेही आणि हिंदीचे शिक्षक गिरीजाप्रसाद शर्मा याना वरील फोन केला, आणि शर्माजींच्या भाषेत म्हणायचे तर "अपनी पीडादायी हिंदीमे" वरील वर्तमान कथित केला.

बातमी वाऱ्यासारखी पसरली सगळ्या शाळेवर. आता दुपारच्या सुट्टीत सल्ले देणाऱ्या लोकांची रांग लागणार हे ओळखून काकांनी बरोब्बर त्याच वेळची सोनोग्राफीची आणि आपले डॉक्टर मित्र डॉ. स.दा. पोटभरे यांची अपॉइंटमेंट घेऊन ठेवली.

तेवढ्यात बांके ओरडतच आत आला "शालिनी मॅडम आल्या, शालिनी मॅडम आल्या!"

हे ऐकून खंडूकाका एकदम उठून बसले. दुखणारे पोटही त्यानी आत ओढून घेतले. चेहेऱ्यावर हास्य आणायचा केविलवाणा प्रयत्न ते करू लागले. बांकेने धावत आत जाऊन आपल्या उघड्या अंगावर टीशर्ट चढवला.

शाळेतील कार्यालयात हेडक्लार्क असल्या तरी शालिनी शृंगारपुरे यांचा शाळाभर राबता होता. कुठल्याही वर्गात किंवा अगदी हेड सरांच्या केबिन मध्ये सुद्धा त्या बेधडक प्रवेश करत. चेहेऱ्यावर ढगांसारख्या झुलणाऱ्या बटा एक झटक्याने मागे सारीत त्या टीचर्स रूम मध्ये प्रवेश करत तेव्हा संस्कृतच्या कुलकर्णी मास्तरांना "मेघदूत" आठवे.

एकदा हेड सरांच्या केबिन मध्ये त्यांनी असाच प्रवेश केला. त्यावेळी सर, संस्था चालिका श्रीमती ललिता पवार मॅडमना अंतर्गत शाळा तपासणीसाठी विनंतीवजा पत्र लिहीत होते. शालिनी शृंगारपुरेंच्या शृंगार रसाने ओतप्रोत अश्या डौलदार चालीकडे पहात सर मंत्रमुग्ध झाले असावेत. I eagerly await inspection by an esteemed personality like you च्या ऐवजी सरानी , I eagerly await infection by an esteemed personality like you असे लिहिले.

ललिता मॅडमनी त्यानंतर काढलेली खरडपट्टी हेडसरांनी कशी मान खाली घालुन ऐकली याबद्दल नंतर शाळाभर चर्चा झाली.

खंडूकाका तर बोलून चालून ब्रम्हचारी! आधीच स्त्रियांचे कोण ते अप्रूप. शालिनी मॅडम दार उघडून काकांच्या दिशेने ऐटीत चालत आल्या आणि सरळ जाऊन बसल्या ते त्यांच्या बाजूला. काकांना घाम फुटला. ते मनातल्या मनात मारुतीस्तोत्र म्हणू लागले.

सगळी शालीनता सोडून शालिनी ताईंनी प्रश्न केला, "असा कसा अचानक झाला हो मुतखडा? काही कळलंच नाही हो आम्हाला"

आता मूत्रपिंड आमचे, खडा आमचा, अडलेले पाणी आमचे, तर बाईंना कसं बरं कळावं? पण "आमच्या कळा आपल्याला कळवायला आम्हाला जमलेच नाही. पण आपली कळकळ पाहून मन भरून आले" काकांनी थोड्या कोट्या करून धैर्य एकवटण्याचा प्रयत्न केला.

"चला, सुरू झाला तुमचा वात्रटपणा!" मॅडमने लाडाने खंडूकाकांच्या मांडीवर एक चापट मारली. काकांच्या ओटीपोटापासून पाठीपर्यंत एक तिडीक गेली.

एवढ्या वेळ बांके, काकांकडे मोठ्या असूयेने पहात होता. आपल्याही नशिबात एखादा खडा यायला काय हरकत होती, असा स्वार्थी विचारही त्याच्या मनात डोकावून गेला.

त्याच्याकडे ढुंकूनही न पाहता, मॅडम थोड्या वेळाने निघाल्या. "काही लागलं तर कळवा बरं का?" एक लाडिक दृष्टिक्षेप टाकून जाता जाता म्हणाल्या.

दुपार झाली. बांकेने काका प्राचीन काळापासून वापरत असलेली लॅमरेटा स्कूटर काढली. काकांना मागच्या सीट वर बसवले आणि दोघेही डॉक्टर पोटभरे यांच्याकडे जायला निघाले. दहा मिनिटे चाललेल्या स्कूटरच्या खडखडाटाने काकांच्या खड्याला चांगलेच दणके दिले. दवाखान्यात पोचताच काका शॉक ट्रीटमेंट मिळाल्यासारखे आडवे झाले.

डॉक्टर पोटभरेंनी काकांना तपासले आणि लगेच सोनोग्राफी करायचा सल्ला दिला.

डॉ. अशोक तिरसिंगराव शहाणे नावाजलेले सोनोलॉजिस्ट होते. ( स्टाफ त्यांना अति शहाणे म्हणत). त्यांनी डाव्या मूत्रनलिके मध्ये मुतखडा अडकला आहे असे निदान केले. डॉ. पोटभरे यांनी खंडूकाकांना ऍडमिट करून घेतले. "काका, तुम्हाला ट्रीटमेंट चालू करूया. समजा, उद्यापर्यंत नीट लघवी होऊ लागली तर ठीक. नाहीतर शस्त्रक्रिया करवून लघवीच्या मार्गातील अडथळा दूर करावा लागेल."

एक कनिष्ठ डॉक्टर आणि दोन परिचारिका यांनी काकांच्या हाताला सलाईन लावले. सलाईनची बाटली स्टँडला लटकवून आणखी काही बाटल्या कपाटात ठेवल्या. हे सारे बांके बिहारी बारकाईने पहात होता. ते पाहून हेड नर्स म्हणाली, "काही लागले तर बेल वाजवून आम्हाला बोलवायचे. तुम्ही सलाईनला हात लावून किंवा स्पीड कमी जास्त करून पेशंटची वाट लावायची नाही. क्या समझा?"

"समझ गया. हम खुद होकर कुछ वाट नही लगानेका. जो भी वाट लगानेका वो तुम लोग ही लगायेगा" बांके उत्तरला. हा माणूस ओव्हर स्मार्ट आहे का शुद्ध बावळट याबद्दल काही निष्कर्ष न निघाल्याने निरुत्तर होऊन नर्स तिथून इतरत्र निघून गेल्या.

"टोल सुरू झाला रे नारायणा" खंडूकाका उद्गारले.

"क्या टोल ? कौनसा टोल ?" बांके ने पृच्छा केली.

"जसा मुंबईला जाताना आपण रस्त्यात टोल भरतो तसे वर जाण्याआधी रस्त्यात हॉस्पिटल लागते. इथले टोल भरल्याशिवाय वरती नो एन्ट्री बरं का." खंडूकाकानी ब्लॅक कॉमेडीचा एक फुटकळ प्रयत्न केला. अर्थात नेहेमीप्रमाणे तो बांकेच्या डोक्यावरून गेला.

थोड्याच वेळात काका घोरू लागले.

तेवढ्यात एक नर्स एक निमुळत्या तोंडाचे सफेद भांडे घेऊन आली. "ये भांडा टॉयलेटमे रखती हुं. पिशाब उसके अंदरही करनेका. संडासमे नही करनेका। ठीक है? रातको मै आ कर मेजरमेन्ट करूंगी।"

काका झोपल्याचे पाहून तिने एक दृष्टिक्षेप बांके कडे टाकला आणि त्याने मान डोलावली.

थोड्याच वेळात बांके निद्रादेवीच्या आधीन झाला. दर 3 तासांनी एखादी नर्स येई. काकांची नाडी, तापमान, नोंदवून घेई, एक चक्कर टॉयलेटमध्ये मारून पुन्हा नर्सिंग स्टेशनला निघून जाई.

सकाळी आठच्या सुमारास दोघांना जाग आली.

"अरे बांके, हा पोटभरे फार महागडा आहे. ऑपरेशन लागल्यास एखाद्या धर्मदाय रुग्णालयात करावे म्हणतो." काका म्हणाले.

"कितनी कंजूसी करोगे काकाजी? वो हमारे ताऊजीने ऐसेही करवाया पैसे बचाने हेतू. ऑपरेशन तो हो गया लेकीन पिशाब है जो रुकने का नामही नहीं लेती. पुरे दिन टीप टीप बरसा पानी" म्हणून बांके स्वतःच्याच विनोदावर हसला आणि मोहरा चित्रपटातील गाणे खर्जात गुणगुणत रविना टंडनच्या बाहुपाशात पोचला.

आता डॉक्टर यायची वेळ झाली.

पोटभरे डॉक्टरांचा राऊंड म्हणजे जत्राच असायची. हेड नर्स, दोन कनिष्ठ डॉक्टर, तीन कनिष्ठ नर्सेस असा लवाजमा असे.

"हॅलो मिस्टर खंडेराव! हाऊ आर यू?" डॉक्टरांनी त्यांच्या अनुनासिक आवाजात आणि घोटवलेल्या ॲक्सेन्टमध्ये काकांना विचारले. काका अर्धवट झोपेत होते ते जागे झाले.

तेवढ्यात एका चुणचुणीत कनिष्ठ डॉक्टरने "सर ही लुक्स वॉटर लॉग्ड. युरीन आउटपुट झालेले वाटत नाही" असे म्हटले.

डॉ. पोटभरेंच्या चेहेऱ्यावर संताप दिसू लागला. "व्हाय आर यू टॉकिंग लाईक स्टुपिड व्हेन आय ॲम देअर" डॉक्टरांनी त्याला रागाने बाजूला केले.

"सिस्टर, युरीन बघा बरं किती झालीय" डॉक्टरांनी ऑर्डर सोडली.

हेड नर्सने आउटपुट रेकॉर्ड काढला आणि रकान्यातील आकडे मोजू लागली.

"अठराशे मिलिलिटर झाली आहे सर." तेवढयात एक नर्स टॉयलेट मधून लघवीचे भांडे घेऊन आली. आणि यात जवळजवळ 200 मिलिलिटर आणखी आहे. म्हणजे दोन लिटर लघवी झाली रात्रभरात" नर्स उत्साहाने म्हणाली.

"वंडरफुल. जस्ट वंडरफुल !" पोटभरेंच्या चेहरा आनंदाने फुलून गेला.

"दॅट्स व्हाय पीपल क्रेव्ह टू बी ट्रीटेड बाय डॉ. स. दा. पोटभरे. दे बेग दॅट आय, डॉ.पोटभरे हँडल देअर केस." आपल्या दवाखान्यात येऊन लोक रांगा लावतात याचा कोण अभिमान डॉक्टरांच्या देहबोलीतून ओसंडून वाहत होता.

यानंतर त्यांनी आपला मोर्चा खंडूकाकांकडे वळवला.

"काका, शस्त्रक्रिया टाळली बरं का आपण! आता करा किती लघवी करायची ती" डॉ. खदखदा हसत हसत म्हणाले.

आधीच बुचकळ्यात पडलेल्या काकांचा चेहरा आणखीच कोड्यात पडला.

"काय मस्करी लावलीय सगळ्यांनी? काका उद्वेगाने म्हणाले. "रात्रभरात एकदाही झाली नाही मला लघवीला. पोटात आणि पाठीत अधिकच कळा येताहेत"

"होतं असं काका. अनेक माणसे रात्री दोन तीन वेळा उठतात आणि जाऊन येतात. पण सकाळी उठल्यावर त्यांना काही आठवत नाही." इति डॉक्टर पोटभरे.

" काय रे बांके, काकांना स्वप्नात चालायची सवय तर नाही ना?" डॉक्टरांनी आता आपला मोर्चा बांके बिहारी कडे वळवला."

"सपना भलेही देखते होंगे। पर जगह पर सोकर। चलते वलते नही है"

नाही म्हणायला झोपल्या जागी छानसे स्वप्न पाहिले होते आजही काकांनी. काका शालिनी मॅडमना घेऊन महाबळेश्वरला गेले होते. तिथे रेस्टॉरंटमध्ये बसून दोघात एक पिझ्झा खाल्ला. शेवटचा तुकडा मॅडमनी घ्या हो घ्या हो म्हणत काकांना भरवला होता आणि तेवढ्यात डॉ. पोटभरेंनी राऊंड साठी येऊन त्यांच्या स्वप्नील प्रणयात बाधा आणली होती. पण स्वप्नात चालणे आणि वरून त्यात मूत्र विसर्जन करणे मात्र त्यांच्या नित्यक्रमात बसतच नव्हते.

"काका तो एक बार भी नही गये रातको" बांके छातीठोकपणे सांगत होता."

"अरे मग रात्रीच्या सिस्टरनी काय खोटे लिहीले आहे का? चार वेळा भांडे मोजून रिकामे केले. एवढी लघवी काय आपोआप आली? आता डॉक्टर पोटभरेंनी चढ्या आवाजात विचारले.

"वो तो हम किये है।" बांके उद्गारला. रातभर सारी पिशाब हम बडे ध्यानपूर्वक उस लंबी चोंच वाले बरतनमे किये है। बडी सावधानीसे काम लिया है।"

डॉक्टरांच्या रागाला पारावार उरला नाही. त्यांनी काहीतरी विचारण्याचा प्रयत्न केला. पण रागाने त्यांच्या तोंडून शब्दच फुटेना. नुसतीच हवा बाहेर येऊ लागली. शेवटी सगळा जोर लावून त्यांनी विचारले, "ऐसा क्यूँ किया तुने? अकल गिरवी रखी हैं क्या?" डॉक्टरांचा चेहेरा लालबुंद झाला होता.

बांके गोंधळलेल्या स्वरात म्हणाला, "वो सिस्टर बोली मुझे, सारा पिशाब भांडेमे करनेका. संडासके पॉटमे नही करनेका. मुझे लगा टॉयलेटके पॉटमे कोई मिस्टिक होगा."

"मिस्टेक तेरे दिमागमे है।" डॉक्टर चांगलेच भडकले. असिस्टंट डॉक्टर आणि रात्रीच्या ऑन ड्युटी नर्सला केबिन मध्ये बोलावून चांगलेच फैलावर घ्यायचे त्यांनी ठरवले.

"इंफॉर्म युरोसर्जन अर्जंटली. अँड पोस्ट हीम फॉर सर्जरी ऍट द अरलीएस्ट. कीप हीम नील बाय माऊथ फॉर सिक्स अवर्स (खाणे पिणे बंद करा)." असे म्हणून निघाले आणि दरवाज्यातून पुन्हा वळले आणि म्हणाले "हीम म्हणजे खंडूकाका अँड नॉट धिस एम्टी हेडेड ल्युनाटिक."

आणि एक दीर्घ श्वास घेऊन डॉ. पोटभरे आपल्या ओपीडीच्या दिशेने चालू लागले.

[ या कथेतील सारी पात्रे काल्पनिक आहेत. त्यांचे कुणाही जिवंत अथवा मृत व्यक्तीशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.]


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy