STORYMIRROR

Dr. Milind Bapat

Comedy

4.0  

Dr. Milind Bapat

Comedy

गण्यास पत्र भाग तीन

गण्यास पत्र भाग तीन

11 mins
206


प्रिय गण्या

गेल्या पत्रात माझ्या फिटनेस साठी तुझ्या वहिनीने कसे मला त्या उच्चभ्रू "वळवकर्स वर्कआऊट झोन" मध्ये कोंबले आणि अखेर मी कसा तोंडघशी पडलो याची इत्यंभूत माहिती कळवली होती. पण नवऱ्याला सुखाने लोळू देईल तर ती कसली बायको! 

त्या अनुभवातून मी सहीसलामत बाहेर पडून दोन दिवसही गेले नसतील तर हिने माझी रवानगी जवळजवळ प्राचीन म्हणता येईल अश्या "हनुमान व्यायामशाळा" येथे केली. व्यायामशाळा घरापासून जवळच होती. हिच्या येण्या जाण्याच्या रस्त्यावरच असल्याने मी कुठेही उकिरडे फुंकत बसणार नाही आणि तीला खात्री होती. महिना पाचशे रुपये शुल्कात नवऱ्याच्या मागे हे शुल्ककाष्ठ ... आपलं .. शुक्लकाष्ठ लावता येतंय तर सोडा कशाला असा साधा हिशोब त्या मागे होता.

"उठा हो, गजर होतोय!" असं म्हणूनही उठत नाही म्हटल्यावर हिने मला पलंगावरून ढकललेच. मी सुद्धा त्या धक्क्याने खडबडून जागा झालो. मी तयार होत असताना ही मात्र अर्धवट झोपेत होती आणि बिछान्यातूनच मला दमवजा सूचना देत होती. झटपट तयार होवून मी व्यायामशाळा गाठली.


थोड्याच वेळात लाकडी बांधकाम असलेल्या ऐशी एक वर्ष जुन्या आणि अशा एका जीर्ण वाड्यासमोर मी उभा होतो. लाकडी महिरप असलेल्या प्रवेशद्वारावर शेंदरी रंगामधली पाटी मी मोठ्याने वाचली "श्री हनुमान व्यायाम मंदिर". हिय्या करून आत शिरलो. लाकडी खांबांवर उभा असलेला एकमजली वाडा, समोर एक मोठेसे अंगण. सभोवताली खुरटी झुडपे आणि गवत. अंगणाच्या मध्यभागी लाल माती टाकलेला १५ गुणिले १५ फूट आकाराचा एक भाग होता. बहुधा कुस्तीचा आखाडा असावा. बलदंड शरीरयष्टी असलेला एक इसम ओसरीवर सूर्यनमस्कार घालत होता. त्याची तेलाने तुकतुकीत झालेली त्वचा कोवळ्या उन्हात चमकत होती. काही छोटेखानी चणीचे नवयुवक वजने उचलत होते. कुणी कुणाशी बोलत नव्हतं. माझ्या येण्याकडेही साऱ्यांनीच दुर्लक्ष केले. हा सगळा प्रकार फारच गंभीर दिसत होता. असल्या जुलूमापेक्षा बायकोचा शाब्दिक मार परवडला असेही वाटून गेले. पण आल्यापावली परत जायची हिंमत नव्हती म्हणून एकदाचा आत शिरलो. 


आतमध्ये दोन युवक शीर्षासन करीत होते. त्यांनी मला खालपासून वरपर्यंत पाहिले. मला पाहून दोघे इतके हसू लागले की त्यांचा तोल गेला. मी पुढे गेलो. माझ्या पाठीमागे "आयला कोन बी येऊ लागलंय आताशा. चांगलं बकरं गावलं मास्तरला" असं बोलून दोघे फिदीफिदी हसू लागले. मागे वळून त्यांच्याकडे पहात मी चालू लागलो. अचानक काहीतरी पायात आलं आणि धाडकन तोंडावर पडलो. पोट सावरत उठलो. माझा पाय एका अवजड अश्या शंकूकृती (conical) वस्तूला अडून मी सपशेल लोटांगण घातले होते. त्या लाकडी अवजाराला मुग्दल असे म्हणतात हे मला माहित होते. याला उचलून गरागरा फिरवताना मी काही पहेलवानाना चित्रपटात पाहिले होते. त्यावेळी तो पिसासारखा हलका असेलसे वाटत असे. पण मी जमीनदोस्त झाल्यावरही मुग्दल जागचा तसूभरही हलला नव्हता. किमान १० किलो वजन असेल असे वाटले. पुढे काय वाढून ठेवलंय याची मला कल्पना आली. माझ्या मागून माझी चेष्टा करणाऱ्या त्या तरुणांचा मला राग आला. मनातच मी त्यांचे नामकरण केले, अहिरावण आणि महिरावण. संधी मिळाल्यास याना धडा शिकवायचा हे मनाशी पक्के ठरवले.


"ओ , प्रभातफेरीला आलात काय? लक्ष कूठे आहे?" गौरवर्ण, धिप्पाड शरीर, मोठे कपाळ, किंचित पुढे आलेले पोट , कपाळावर गंध आणि चेहेऱ्यावर उग्र भाव, अश्या अवतारात एक काका वजा गृहस्थ, घाऱ्या डोळ्यांनी माझ्याकडे रोखून बघत उद्गारले 

"मला जिम जॉईन करायचं आहे". शर्टावर ची माती झटकत मी म्हटले.

"हं.. या." असे म्हणत त्यांनी कोपऱ्यातील एका टेबल कडे निर्देश केला आणि त्या दिशेने चालू लागले. 

"हे जिम नाही. ही व्यायाम शाळा आहे. भारतीय संस्कृतीतील व्यायाम आणि योग या शाश्वत विद्या शिकण्याची इच्छा असेल तरच येथे या. आम्ही कुठलेही पाश्चात्य उपकरण ठेवलेले नाही. भीम असो का महाबली हनुमान, कुठल्याही उपकरणाशिवाय उदंड शक्तिसमार्थ्य कमावले त्यांनी. नुसत्या बेडक्या फुगून पोरीबाळींवर इम्प्रेशन झाडायचं असेल तर जा कुठल्याही विनाशकारी आंग्ल संस्थेत."

 

त्यांच्या मागच्या भिंतीवरील द्रोणगिरी पर्वत उचलून उड्डाण करतानाच्या पावित्र्यातील श्री हनुमानाची तस्वीर होती. बहुधा हीच या व्यायामशाळेची इष्टदेवता. 

मी कोपऱ्यातल्या एका तुटक्या बेंच प्रेस कडे बघून अरे वा.. त्रेता युगातील वाटतं? असे काहीसे पुटपुटलो आणि छद्मीपणे हसलो. काकांनी माझ्याकडे एक जळजळीत दृष्टिक्षेप टाकला. पुराणकाळात विनोद सुद्धा बहुधा वर्ज्य असावेत असे म्हणून मी गप्प झालो.


काका खुर्चीवर बसले. मी त्यांच्या समोर बसलो. टेबलवर दोन नेम प्लेट्स होत्या. मी एका नेम प्लेट वर कोरलेले नाव मनातच वाचले "श्री. गंगाधरराव लिमये". आणखी एक नेम प्लेट होती त्यावरील नाव वाचायला जरा कठीण वाटले म्हणून मी ते मोठ्याने उच्चारले, "श्री भगेंद्र सिंह". 

"आपणच भगेंद्र का ?" मी विचारले. त्याबरोबर काका एकदम चवताळले. त्यानी ती नेम प्लेट उचलून दूर एका पोरसवदा इसमाकडे भिरकावली. "कुणा डुकरानं कोरीवकाम केलय! हजारदा सांगितलं नवीन करून घ्या म्हणून."

नंतर कळले की काकांना मदतनीस म्हणून श्री धर्मेंद्र सिंह नावाचे एक शिक्षक होते. त्यांच्या कडक स्वभावाचा प्रसाद मिळालेल्या एका विद्यार्थ्याने त्यांच्या नेमप्लेटवरील अक्षरांशी खेळ केला होता आणि नेमप्लेट वर धर्मेंद्रच्याजागी भगेंद्र या गुप्तरोगाला स्थान दिले होते. मी ज्यांच्याशी बोलत होतो ते मात्र श्री गंगाधर राव लिमये होते हे ही कळले.

"आमच्या व्यायाम मंदीरात शरीर कमवायचे तर व्यायामाचे परंपरागत प्रकार, कठोर योगाभ्यास आणि त्याच्या जोडीला काही आयुर्वेदिक औषधांचे सेवन अशा तीन गोष्टींचे सक्तीने पालन करावे लागेल."

"उद्या सकाळी सहा पासून प्रारंभ करा. महिन्याचे ५०० रुपये आगाऊ शुल्क शंभरच्या पाच नोटांच्या स्वरूपातच आणावे लागेल. पहिल्या दिवसापासूनच किमान दीड तास कठोर परिश्रम करून घेण्यात येतील. लघू अथवा दीर्घशंकेसाठी कुठलाही व्यत्यय आलेला चालणार नाही. या गोष्टी येण्यापूर्वीच घरी आटपून याव्यात. आमच्या व्यायाम शाळेत कुठलेही उपकरण विजेवर चालत नाही बरे! ट्रेडमिल, रोविंग, असले गल्लाभरू प्रकार आम्ही बाळगलेले नाहीत. एवढेच काय, तर आम्ही व्यायामशाळेत पंखे सुद्धा लावलेले नाहीत."

"पण मग घाम आला तर?" मी विचारता झालो.

"व्यायामाने शरीरात निर्माण झालेली ऊर्जा अशी कृत्रिमरीत्या थंड केल्यास आपल्या बल आणि वीर्याचा ऱ्हास होतो. फार उकाडा वाटल्यास शवासन करणे हेच उत्तम." इति काका. 


असे म्हणून काकांनी एका कागदावर गिचमिड अक्षरात काहीतरी खरडले, "हे सारे उद्या येताना घेऊन या. आजच बाजारातून खरेदी करा." असे म्हणत माझ्या हातात कागद कोंबला. शेवटी "बृहतबलारिष्ट" असे वाचल्यासरखे वाटले पण मोठ्याने वाचण्याच्या फंदात पडलो नाही. आयुर्वेदीकऔषधी सेवन काकांनी सांगितलेच होते. उद्या येताना सगळी घेऊन येऊ असे ठरवून मी निरोप घेतला.


घरी जाऊन आराम केला आणि दुपारी जवळच्याच एक्सप्रेस फार्मसी मध्ये गेलो. काउंटर वर एक थुलथुलीत म्हणता येईल अशी तरुणी बसली होती. जीन्स टीशर्ट आणि पिंगट स्ट्रेक केलेले केस असा संभार होता. एका हातात भ्रमणध्वनी घेऊन त्यात कसलेसे व्हिडिओ बघत होती. मधेच फोनवर "नो बेबी" "यु आर टू मच बेबी" असं कोणाशीतरी बोलत होती. सारखे बेबी बेबी म्हणत्ये म्हणजे बहुधा घरच्या एखाद्या छोट्या बाळाशी बोलत असेल असं मला वाटले. हल्ली बाळांना सुद्धा एवढं इंग्लिश कळतं हे पाहून मला माझ्या इंग्लिशची अधिकच लाज वाटू लागली. गिऱ्हाईक आला की ती त्याच्या हातातील कागदकडे जेमतेम एक तूच्छ नजर टाकायची आणि औषधाचे नाव घेत मागे मान वळवून, "रामुकाकाsss, पॅरा काढा 1 स्ट्रीप " असं मोठयाने ओरडायची आणि लागलीच पुन्हा मोबाईलला डोळे लावायची. लगेचच दुकानातील ज्येष्ठ कर्मचारी रामुकाका मागच्या काउंटरवरून एक पॅरासिटामॉल स्ट्रीप घेऊन धावत काउंटरपाशी हजर होत असत. त्यावर ती पुन्हा थोडी नजर उचलून पैसे घ्यायची आणि मधेच विडिओ बघत फिदीफिदी हसायची असा असभ्य प्रकार सुरू होता. 


माझा नंबर आला आणि मी हातातली चिठ्ठी तिच्या पुढ्यात धरली. त्याकडे एक क्षण बघून ती मागे वळून ओरडली... "रामुकाकाsss..,एक लंगोट काढा" आणि तिने पुन्हा आपले मोबाईल स्क्रीन मध्ये डोके घातले. दुकानात स्मशानशांतता पसरली. रामुकाकांचे शरीर कंप पावू लागले. त्यांच्या हातातून कफ सिरपची बाटली पडली. रिफ्लेक्स ऍक्शनने त्यांचे हात कमरेकडे जाऊ लागले. इथे काउंटर वरचे दोघे गिऱ्हाईक आपण ऐकण्यात काही चूक तर नाही केली ना? अश्या नजरेने एकमेकांकडे पाहून नंतर माझ्याकडे 'काय चावट माणसे असतात एकेक!' अश्या नजरेने पाहू लागले. रामुकाकांच्या मागे उभे असलेले दोन युवा मदतनीस फिसकन हसत कपाटाच्या मागे गेले आणि त्यांनी एकमेकांना जोरात टाळी दिली. 

"ओ रामुकाका एक लंगोट... लवकर काढा हो. फार कस्टमर आहेत .... बट.... बट वेट अ मिनट .... व्हॉट इज धिस लंगोट? इज इट सम आयुर्वेदिक स्टफ?" 

मी तर पार थिजलो होतो. मेल्याहून मेल्यासारखे होणे म्हणजे काय त्याचा अनुभव घेत मी मनातच लिमये काकांना शिव्यांच्या लाखोल्या वाहिल्या. 

एव्हाना रामुकाका जरा सावरले होते. ते धावत काउंटरपाशी आले. माझ्या हातातील कागद घेतला. त्यात दुसऱ्या क्रमांकावर लिहिलेले "बृहतबलारिष्ट" त्यांनी पटकन काढून दिले आणि मला म्हणाले. "तो एक नंबरवला आयटम ... मेन रोडवर चुन्नीलाल क्लॉथ अँड सारी सेंटरमध्ये मिळेल. मी पण तिथलेच वापरतो. ( हे शेवटचे वाक्य मात्र दबक्या

आवाजात).

हा भलता क्लॉथ कशाला हवाय या लिमये मास्तरला. "व्यायामशाळा अंतर्बाह्य देशी आहे म्हणून तिथे 'अंतर्वस्त्र सुद्धा देशी?" असा विचार करतच चुन्नीलाल क्लॉथ अँड सारी सेंटरमध्ये शिरलो. धोतर टोपी मधील एक गृहस्थ गिऱ्हाईकांची वाटच पाहत होते. मला सामोरे येऊन त्यांनी विचारले, "सूं करू तमारा माटे?."

मला पटकन कळेचना. मनात म्हटले तुला सू आली तर करून ये ना, माझ्या माटे (साठी) कशाला करतोस. तेवढ्यात एक मदतनीस ओरडला "काका, घाटीयो छे .. घाटीयो!" मग चुंन्नीलाल एकदम मराठीवर आले. 


मी जरा इकडे तिकडे पाहून म्हटलं, "ते... लॉइनक्लॉथ हवं होतं. "

काकांना काहीं कळले नव्हते हे लक्षात आले. काहीतरी टेबल क्लॉथ सदृश्य हवे असावे असे म्हणून त्यांनी मदतनीसाला. "जो आ साबने कयो कपडो जोइये. भारी वालो आपजे हां." असे म्हटले.

मी मुकाट्याने त्याच्याकडे गेलो. दबक्या आवाजात मला काय हवे ते सांगितले. ऐकल्यावर मदतनीस मोठ्याने मालकाकडे पाहून ओरडला " लंगोट जोइये छे एने". 

हे ऐकून साडीच्या काउंटरला घासाघीस करत असलेल्या दोन महिला गिऱ्हाईक दचकून उभ्या झाल्या. प्राणी संग्रहालयातून वाट चुकून रस्त्यावर आलेल्या एखाद्या गोरिला कडे बघावं, अशा नजरेनं त्या माझ्याकडे पाहू लागल्या.

"टेरीकॉटवालो आपु के जरा भारी वालो" पुन्हा मोठ्या आवाजात त्याने विचारले.

मी घाईघाईने दाखवलेला पहिलाच ऐवज फायनल करून तिथून तडक घरी आलो.


दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता उठून तयार झालो आणि पोहोचलो. लिमये काका माझी वाटच पाहत होते. त्यानी माझ्या हातातली पिशवी घेतली आणी ते वस्त्र बाहेर काढले. हॉलच्या मधोमध उभे राहून वस्त्र परिधान करण्याविषयी मार्गदर्शन करू लागले. हे अलौकिक वस्त्र म्हणजे सुदृढ शरीराचा पाया आहे असे ते सांगू लागले. बोलताना शुक्र, अंडकोष वगैरे संस्कृत शब्दांचा भडिमार चालू होता. काकांच्या या मार्गदर्शनाचा फार तपशील पत्रात लिहिणे योग्य होणार नाही. मात्र गण्या तू प्रत्यक्ष भेटशील तेव्हा मी याबद्दल अधिक सविस्तर सांगेन.


त्यानंतर लिमये काकांनी मला व्यायामशाळेच्या मागील बाजूस नेले. महाकाय देह, काळी कुळकुळीत कांती, पांढरे शुभ्र धोतर, कपाळाला गंध आणि उघडेबंब शरीर असा जामानिमा असलेल्या एका मध्यमवयीन गृहस्थांशी ओळख करून दिली. 

"हे गजोधरसिंग गज्जर. हे आपणास योगविद्या शिकवतील. किमान दोन महिने कठोर योगाभ्यास करून स्नायू बळकट झाल्यावर आणि शरीरास लवचिकता आल्यानंतरच मी व्यायामशाळेच्या अभ्यासक्रमास सुरुवात करवेन. तोपर्यंत तुम्ही येथील कुठल्याही वजनाला किंवा उपकरणांना हात लावायचा नाही हे नीट ध्यानात ठेवा!"

असे म्हणून लिमये मास्तर निघून गेले. आणि लागलीच माझा ताबा गजोधराने घेतला. 

"पहले आप एक कोने मे खडे रहना। आप कुछ दिन सिर्फ देखेंगे की हम कैसे सिखाते हैं" इति गजोधर.


"लेकीन योगा तो मेरे डावे हातका मळ है। बहुत सारा किताब है योगाका अपुनके पास। मैं डायरेक्ट चालू करेंगा। आप खाली बोलो क्या करनेका" 

मला शाळकरी मुलासारखे वागवल्याचा जरा रागच आला होता. गजोधराने माझ्याकडे ढुंकूनही न पाहता इतर विद्यार्थ्यांकडे मोर्चा वळवला. 

त्या विद्यार्थ्यांमध्ये अगोदर भेटलेले अहिरावण - महिरावण सुद्धा होते. 


"मय आया गुर्जी।" हाडाडलेला देह, रापलेली त्वचा, खुजा बांधा, हिटलर छाप मिशी आणि चेहेऱ्यावर ओसंडून वाहणारी अजिजी आणि अश्या अवतारात एक व्यक्ती गजोधर गुरुजींच्या दिशेने लंगडत आली. गुरुजींनी त्याच्याकडे पाहिले. जणू गुरू बृहस्पती आपल्याला दर्शन देत असल्याचे कृतकृत्य भाव त्याच्या चेहेऱ्यावर उमटले. 


मी प्रश्नार्थक मुद्रेने अहिरावणाकडे पाहिले. "हा भानुदास भुस्कुटे. अहिरावण म्हणाला. "गर्भश्रीमंत, पण तोंडावर सदैव उबग येईल एवढा नम्रपणा. अगदी भिकाऱ्याला पैसे टाकताना पण चेहेऱ्यावर किलोभर लाचार भाव आणणार. एकदा एका भिकाऱ्याला याने भीक दिली तर त्याने याच्याकडे पाहिले आणि 'तू तो मुझसेभी गयागुजरा लगता हैं' असं म्हणून आपलेच तबक याला दिले. वर 'तू भी कलसे आजा' म्हटले. पण याला एक खोड फार वाईट. मेन रोडवरून रोज स्कूटर वरून जायचा. वर्किंग वूमन हॉस्टेल समोरून जाताना मान वळवून वळवून मुलींना बघत राही. रस्त्याकडे दुर्लक्ष झाले. ठोकली स्कूटर समोरच्या एसयूव्हीला. मेंदूत रक्तस्त्राव झाला. सर्जरी करावी लागली. जीव वाचला पण मेंदूच्या इजेने अर्धांगवायू झाला. खूप उपचार झाले पण उजव्या हात पायात शक्ती आली नाही. 

पण आता या गजोधर मास्तरने त्याला गॅरंटी दिलीय म्हणे. भानुदास तू सहा महिन्यांत मॅरेथॉनमध्ये धावणार. बघच माझ्या योगविद्येचा चमत्कार."


अगदी तोंडावर आले होते "दुनिया झुकती हैं. झुकानेवाला चाहीये". पण एक जुना अनुभव आठवला आणि गप्प बसलो. एक जगद्विख्यात योग गुरू एकदा आमच्या शहरात आले होते. वशिला लावून लावून माझे बाबा त्यांना भेटायला गेले. बाबांनी आपल्या मधुमेह, रक्तदाब वगैरे व्याधी सांगितल्या. त्यावर एक डोळा बारीक करत महागुरू उद्गारले "डॉक्टरी इलाज विषसमान है। डॉक्टरोंकी दवाए पोयजन है। उन्हे तुरंत बंद करो। हमारे उत्पादन खरीदों । सारी व्याधी जडसे खत्म हो जायेगी." मी चांगलाच इंप्रेस झालो. काय हा आत्मविश्वास! 

मी त्यांना निष्पाप मनाने एक प्रश्न विचारला. "गुरुजी, आपकी दायी आँख अपनेआप छोटी बडी होती रहती हैं। आप भी अपना एकाध प्रोडक्ट क्यूँ नहीं ट्राय कर लेते?"


हे ऐकून गुरुंच्या श्र्वासाचा वेग वाढला. मला वाटलं बोलता बोलता एखादा प्राणायामाचा प्रकार करत असतील. मग त्यांनी सुस्थितीत असलेला आपला 'बाया डोळा' वापरून काहितरी इशारा केला. चार आडदांड इसम आले आणि त्यांनी मला उचलून सभागृहामागे नेले. मला यथेच्छ बुकलून काढले. महिनाभर डॉक्टरी इलाज केले तेव्हा कुठे हिंडूफिरु लागलो. त्यानंतर कानाला खडा लावला. कुणी म्हटले विज्ञान हे थोतांड आहे.... मी मान डोलवतो. कुणी म्हटले शनी पीडा शांत करून देतो ... मी म्हणतो सगळे नवग्रहच शांत करून टाका.


पुढील काही दिवस मी कोपऱ्यात उभा राहून फक्त पहात असे. गजोधरजी भानुदासकडून आसने करून घेत. मधेच अहिरावण माहिरावण गप्पा मारायला येत. त्यांनी एकदा अचानक माझी तारीफ सुरू केली. "काका तुम्ही कुठे जिम करत होते का? क्या बायसेप्स है भिडू!" मी लगेच त्यांना माझ्या वळवळकर जिम मधील बॉडी बिल्डिंग च्या अनुभवाबद्दल सांगितले. नाही म्हटले तरी मी मनातून थोडा फुशारलो. "वैसा मैं भी बहुत कमाया ... मतलब एकदम व्यायामपटूच था बोले तो"


"पण हे मुग्दल नाही जमणार तुम्हाला. मशीनवर बनवलेल्या बॉडी मध्ये काय दम नसतो" अहिरवणाने हिणवले. माझ्याने राहवेना. जवळ पडलेला दहा किलोचा मुग्दल दोन्ही हातांनी उचलून डोक्यावर ताणून धरला. आणि गोफण फिरवतात तसा गरगरा फिरवू लागलो. एक नजर मी त्या जोडगोळीकडे टाकून मिशीतल्या मिशीत हसलो. मुग्दल फिरण्याचा वेग वाढतच गेला. एकीकडे ते दोघे मला सांगायचा प्रयत्न करत होते. "असा नाही... असा नाही". पण आता उशीर झाला होता. मी मुग्दलला फिरवतोय की मुग्दल मला हेच कळेनासे झाले. वादळी वाऱ्याने सैरभैर फिरणाऱ्या वातकुक्कुटाप्रमाणे मी बेफाम फिरू लागलो, फडफडू लागलो. हाताला रग लागली. धरलं तर चावतय सोडलं तर पळतंय अश्या परिस्थिती मध्ये मी माझी पकड ढिली केली. मुग्दल माझ्या हातातून एखाद्या मिसाईलसारखा सुटला. मी गरगरत जमिनीवर पडलो. अहिरावण महिरावण माझ्या मदतीस आले. त्यांनी मला धरून उभे केले. मी डोळे उघडले मात्र, समोरचे दृश्य पाहून माझा थरकाप उडाला. भानुदास उताणा पडला होता. त्याच्या बोलण्यातील अजिजी नाहीशी झाली होती आणि त्या ऐवजी अर्वाच्य शिव्या प्रसवू लागल्या होत्या. गजोधर गुरुजींचे डोके भानुदासच्या पोटावर आणि पाय हवेत होते. गुरुजी याच्या पोटावर शीर्षासन का बरे करताहेत असा विचार मी करू लागलो. तोच काय घडले होते ते लक्षात आले. भानुदासला जमिनीवर उताणा झोपवून गुरुजी त्याच्या पायांना काटकोनात उचलून उत्तानपादासन करवत होते. दहा किलोच्या वेगवान मुग्दलरुपी क्षेपणास्त्राने आपल्या दहा पट वजनाच्या असलेल्या पाठमोऱ्या गुरुजींना बेसावध गाठले होते. त्यांच्या पार्श्वभागाचा बिनचूक वेध घेतला होता. यामुळे गुरुजींनी कोलांटीसदृश्य उड्डाण केले होते आणि पाण्यात सूर मारावा तसे त्यांचे डोके भानुदासच्या पोटात येऊन रुतले. योगिक अवस्थेत गुरूजी पोहोचले होते. सगळीकडे हलकल्लोळ माजला. गुरू शिष्यांचे हवेत फडफडणारे पाय असे काही गुंफले गेले होते की बाजूच्या व्यायामपटूंनी ते सोडवेपर्यंत भानुदासच्या तोंडून शिव्यांचा शब्दकोश रिता झाला होता. न्यूटनच्या गतीविषयक नियमांचे याहून उत्तम प्रात्यक्षिक काय असू शकेल असा विचार माझ्या मनात आला. लिमये काका धावत आले. त्यांनी हे सारेच पाहिले होते. तिरीमिरीतच त्यांनी माझा हात घट्ट आवळला. मला खेचुन भराभरा अगदी रस्त्यापर्यंत घेऊन आले. माझ्या हातात शंभर रुपयांच्या पाच नोटा कोंबल्या. "घ्या! हे आपले शुल्क परत. नोटा सुद्धा आपण मला दिल्या होत्यात त्याच आहेत. मळकट आणि जुन्या. यापुढे आपण यायची तसदी घेऊ नका" असे म्हणून ते आल्या पावली परत गेले. 

घरी गेल्यावर हिला काय काय सांगायचे याचा विचार करत मी रस्ता चालू लागलो.

गण्या, सदृढ शरीर कमावण्याच्या माझ्या या प्रवासात अनुभव अनेक मिळाले. खर्चही बराच झाला. म्हणावे तसे यश मात्र लाभले नाही. या पत्र प्रपंचामुळे माझे मन मात्र तुझ्याकडे मोकळे करता आले. 

बाकी सारे प्रत्यक्ष भेटीत बोलू.

कळावे लोभ असावा ही विनंती.


तुझा

बन्या


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy