Nagesh S Shewalkar

Comedy

3  

Nagesh S Shewalkar

Comedy

म्हाताऱ्यांचे माहेर

म्हाताऱ्यांचे माहेर

13 mins
233


  घरात सासू-सून यांची चालत असलेली लगबग, बाहेर जाण्यासाठी सुरू असलेली तयारी धोंडोपंत बारकाईने, कौतुकाने पाहत होते. विशेषतः वयाची साठी पार केलेल्या पत्नीची नटण्याची, मुरडण्याची हौस पाहून ते मनोमन रोमांचित होत होते. लग्न झाल्यापासून बायकोची ती हौस जशास तशी होती. बाहेर जायचे प्रसंग कमी येत असले तरीही जेव्हा केव्हा संधी मिळेल तेव्हा ती स्वतःची पुरेपूर हौस भागवून घेत. जेव्हा जेव्हा ती तशी सजून-धजून, तयार होऊन धोंडोपंत यांच्यासमोर येई तेव्हा ते भान हरपून, डोळ्यांची पापणी न लववता तिच्याकडे बघतच राहत...

"अहो, मी आणि नताशा थोडं बाहेर जाऊन येतो..."

"थोडं म्हणजे?..." धोंडोपंतांना पूर्ण बोलू न देता पत्नी म्हणाली,

"काळजी करू नका. जेवायच्या वेळेला आम्ही परत येऊ..."

"अगं, पण..."

"माहिती आहे, तुमचा पण- बीन... चारच्या ठोक्याला तुम्हाला चहा पाहिजे. तुम्हाला चहा पाजवून जावे लागेल. नाही तर दोन दोन मिनिटांनी फोन कराल... कधी येणार? किती वेळ लावणार..."

"अगं, आत्ता तर तीन वाजत आहेत. इतक्या लवकर चहा म्हणजे... पुन्हा चहा चार वाजता चहासाठी जीव कासावीस होईल ग..."

"ठीक आहे. मग असे करू या, आत्ताचा चहा रद्द..."

"म्हणजे? असं करू नकोस गं. तू येईपर्यंत एक वेळेस पाणी नसले तरीही चालेल पण..."

"माहिती आहे... मग असे करा, चार वाजता कोपऱ्यापर्यंत जाऊन चहा पिऊन या... दिवसातून एकदा तरी जाताच की तिथे..."

"नको. नको. तो काय चहा असतो? त्यापेक्षा चार ऐवजी तीन वाजता प्यालेला बरा..." असं म्हणत बायको खोलीच्या बाहेर गेलेली पाहून दोन्ही हातांच्या मुठी आवळून हात उंचावून ओरडले,

"व्वाह रे व्वाह! नशीब जोरावर आहे. चार वाजता बायकोने केलेला नि पाच वाजता पुन्हा कोपऱ्यावरचा चहा... हैट रे धोंड्या.. मज्जा..." 

  काही क्षणानंतर चहा घेऊन आलेली पत्नी म्हणाली,"घ्या. आणि आम्ही येईपर्यंत शांत बसायचे. काही गडबड करायची नाही..."

"मला काय तू छोटं बाळ समजतेस का गं? सारख्या सूचना करत राहतेस ते?"

"बाळ नाही पण धोंडोपंत,एखादे बाळ तरी चांगले वागेल. घरी कुणी नाही किंवा घरात सारे झोपलेत असे पाहून फ्रीजमध्ये काय आहे, कपाटात काय आहे हे पाहणे, एखादे दिवशी घरात काही चांगला पदार्थ केलेला पाहून इकडेतिकडे बघत हळूच त्या पदार्थावर ताव मारायचा. आज निक्षून सांगतेय, आज जर तुम्ही असं काही खाल्लं किंवा फ्रीजमधील काही प्याले तर पुढच्या वेळी मी बाहेर जाईन तेव्हा तुम्हाला की नाही..."

"म्हणजे? काय करशील?"

"बाहेर जाताना डे केअरमध्ये ठेवून जात जाईन..."

"आता हे काय भलतंच? डे केअर हे काय नवीन सोंग आहे?"

"सोंग नाही तर तुमच्यासारख्या इब्लिस म्हाताऱ्यांची सोय आहे..."

"सरळसरळ वृद्धाश्रम म्हण की.."

"नाही... नाही. वृद्धाश्रम हा बऱ्याच मोठ्या कालावधीसाठी असतो. डे केअर म्हणजे सांभाळ दिवस... काही तास किंवा एका दिवसाचा कालावधी असतो..."

"वहॉं जाओ, खाओ- पिओ ऐश करो असे असते तिथे बाबा..." तिथे येत धोंडोपंत यांची सून नताशा म्हणाली.

"असे असेल तर मग आत्ताच सोड ना..."

"अहो, उतावीळ महाशय, थोडं सबुरीने घ्या. खाओ- पिओ म्हटलं की झाले तयार. पुन्हा सांगते. शांत बसा. पुस्तक वाचा. टीव्ही पहा. पण खाय..."

"खाय खाय करायला मी खादाड खाऊ नाही म्हटलं. एक कर ना, वृद्धाश्रम नको वाटत असेल तर केअर सेंटरमध्ये कायमचं सोड..."

"नको. तुम्हाला काय धाड भरलीय. चांगले धडधाकट आहात की. केअर सेंटरमध्ये सोडलं तर तिथल्या रुग्णांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या तब्येती तुम्ही बिघडवाल... येतो आम्ही. दार लावून घ्या..." असं म्हणत पत्नी आणि पाठोपाठ नताशा दोघी निघून गेल्यावर धोंडोपंतांनी दार लावले आणि लहान मुलांप्रमाणे दोन्ही हात उंचावून आनंदाने ओरडले,"हैश्या रे हैश्या... आत्ताच चहा घेतलाय. थोड्या वेळाने जीभेचे चोचले पुरवू या..."  

   अत्यंत आनंदाने धोंडोपंत सोफ्यावर बसले. हातातील भ्रमणध्वनी चालू करून टीव्ही लावला. आवडती गाणी पाहत बसले. भ्रमणध्वनीवरील संदेश, व्हिडीओ पाहत असताना एका बातमीने त्यांचे लक्ष वेधले. बातमी वाचत असताना त्यांना आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. शिर्षकच मुळात आकर्षक होत, 'महाताऱ्यांचे माहेर!' (महातारे म्हणजे म्हातारे) तुम्हाला स्वतःला वेळ द्यायचा असेल, आरामाची आवश्यकता वाटत असेल, खरेदीला जायचे असेल, एक दिवस मित्र/ मैत्रिणींसोबत मस्त हुंदडायचे असेल, कोणत्या कार्यक्रमाला जायचे असेल किंवा ज्येष्ठांच्या कटकटीपासून काही क्षणांची मुक्तता हवी असेल, किंवा म्हाताऱ्या माणसाला घरी एकट्याला सोडून जायला भीती वाटत असेल तर काळजी करू नका. आम्ही जसे बालकांसाठी 'डे केअर' असतात त्याप्रमाणे 'महाताऱ्यांचे माहेर' सुरु केले आहे. आपल्या घरातील वृद्ध व्यक्तीला बिनधास्तपणे इथे आमच्याकडे माहेरी सोडा आणि त्यांची कोणतीही काळजी न करता अगदी मोकळेपणाने हवं तिथं जाऊन या. ज्येष्ठांना सांभाळण्यासाठी माफक शुल्क आकारण्यात येईल. तेव्हा तीही काळजी नको. शिवाय या काळात त्यांची खाण्यापिण्याची काळजी घेऊन व्यवस्थित निगा घेतली जाईल...' संदेश वाचून धोंडोपंत यांनी तो संदेश जतन केला आणि पुटपुटले,

'अच्छा! असे आहे का? हा संदेश वाचून बायकोबाई एवढी धमकी देत आहेत का? ठीक आहे, एखादे वेळी जाऊन पाहायला काही हरकत आहे नाही. शिवाय खाणेपिणे आहे म्हणतात तर मग चंगळच आहे की. घेऊया एक अनुभव...' असे म्हणत असताना धोंडोपंतांना अचानक काही तरी आठवले नि ते पुन्हा आनंदाने पुटपुटले, 'चला. बऱ्याच दिवसांनी घरी एकटाच आहे तर स्वातंत्र्य साजरे करू या...' 

   ते घाईघाईने स्वयंपाक घरात पोहोचले. त्यांनी ओट्यावर ठेवलेली भांडी उघडून पाहिली परंतु त्यांना इच्छित पदार्थ सापडला नाही. 'अरे, दुपारच्या जेवणात असलेली बासुंदी संपली की काय? केली तर बरीच होती. अरे, हो, आठवले! माझे डोके आजकाल चालत नाही. बासुंदी फ्रीजमध्ये ठेवली असणार. तिथे आईस्क्रीम, कुल्फी असे बरेच काही असणार...' मनातल्या मनात असे म्हणत धोंडोपंतांनी फ्रीज उघडण्याचा प्रयत्न केला पण त्याला कुलूप लावलेले समजताच त्यांचा पारा चढला, 'काय पण बायको आहे, तोंडचा घास हिरावून घेतेय. हे सारे खाऊन काय मी मरणार आहे? अरे, आत्ता जाताना मला 'चांगले धडधाकट आहात' असे म्हणाली नि अशी बेईमानी! नाही! नाही!! हे सहन करायचे नाही. चांगला खडसवणार आहे मी. करून करून काय करील तर पुन्हा बाहेर जाताना मला तिथे 'माहेरी' सोडीन. सोडले तर सोडले...' तितक्यात त्यांना आठवले की, मागे एकदा त्यांची मुलगी, जावई आणि चार वर्षाची नात जुई आली असताना जुई एखाद्या मोराप्रमाणे घरभर थुईथुई नाचून गोंधळ घालू लागली. एक- दोन वेळा तिने फ्रीजही उघडला. ते पाहून नताशाने फ्रीजला कुलूप लावले आणि 'किल्ली हरवली' असे सांगून ती लपवून ठेवली होती. परंतु नंतर रंगलेल्या दिलखुलास गप्पांच्या ओघात किल्ली कुठे ठेवली हे ती विसरून गेली. चार वाजत असताना चहाची वेळ झाली परंतु किल्ली सापडत नाही हे पाहून धोंडोपंतांनी चमच्याने ते कुलूप काढले. ते आठवताच धोंडोपंत आनंदातिशयाने पुन्हा फ्रीजजवळ एक चमचा घेऊन गेले आणि काही क्षणात फ्रीज उघडले. 'बायकोबाई, हम भी कुछ कम नही। तुम शेर हो तो हम दीडशेर है।' असे हलक्या आवाजात म्हणत त्यांनी फ्रीजमध्ये ठेवलेल्या एक- एक पदार्थांचे भांडे बाहेर काढले. बासुंदी दुपारीच खाल्लीय तेव्हा आईस्क्रीम खाऊया. या विचाराने त्यांनी आईस्क्रीमच्या डब्यातून चांगले वाटीभर आईस्क्रीम बाहेर काढले. बासुंदी आत ठेवावी या हेतूने पातेले उचलत असताना घरात असलेल्या नीरव शांततेचा भंग करणारा आवाज आला. वास्तविक तो आवाज फ्रीज बराच वेळ उघडा राहिल्यामुळे सावध करणारी घंटी होती पण धोंडोपंत अचानक आलेल्या त्या आवाजाने एवढे घाबरले की, हातात घेतलेल्या पातेल्यातील सारी बासुंदी स्वयंपाक घरात सर्वत्र पसरली... दुसऱ्या क्षणी स्वयंपाक घर गरगरतेय की काय या अवस्थेत धोंडोपंत कपाळावर हात लावून खाली बसले. बायको घरी आल्यावर काय होईल हे त्यांच्या डोळ्यासमोर फेर धरून नाचत होते. काही क्षण जाताच 'आलीया भोगासी असावे सादर, केलीया गुन्ह्याची शिक्षा भोगाया तयार' या अवस्थेत त्यांनी स्वच्छता अभियान सुरू केले परंतु ते कार्य त्यांना नीट जमत नव्हते पण करणे तर भाग होते. त्यांनी नेटाने स्वच्छता करायला सुरुवात केली. बराच वेळ अथक परिश्रमाने त्यांनी सारे स्वच्छ केले पण कितीही घास घास घासले तरीही मलईचा चिकटपणा जात नव्हता. शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांनी पुन्हा पाणी टाकून पुसून काढले आणि आईस्क्रीम खावे म्हणून ती वाटी घेतली पण पाहतात तर काय बासुंदी प्रकरणात आईस्क्रीमचे पाणी झाले होते परंतु सोफ्यावर बसून त्यांनी ते पाणी पिऊन टाकले नि ती वाटी घासून स्वच्छ करून ठेवावी म्हणून ते पुन्हा स्वयंपाक घरात गेले न

गेले की ओल्या नि चिकट फरशीवर त्यांचा पाय घसरला. पडता पडता स्वतःला सावरल्यामुळे धोंडोपंत मोठ्या अपघातातून सावरले. कशी तरी वाटी स्वच्छ करून ते परत सोफ्यावर येऊन बसले. भ्रमणध्वनीकडे पाहवत नव्हते, टीव्ही लावायची इच्छा होत नव्हती. अशा अवस्थेत ते बसून राहिले. किती वेळ गेला ते कळले नाही परंतु दारावरची घंटी वाजली आणि ते भानावर आले...

   दार उघडून ते खाली मान घालून परत मागे फिरले. तसे सासू-सूनेने एकमेकींकडे पाहिले आणि साशंक नजरेने दोघी आत येईपर्यंत धोंडोपंत उतरलेल्या चेहऱ्याने सोफ्यावर बसले होते ते पाहून बायकोच्या मनात चर्र झालं. तिने काळजीने विचारले, 

"काय झाले हो? काही दुखतंय का?" पंतांनी नकारात्मक मान हलविल्याचे पाहून नताशाने विचारले,

"बाबा, सांगा ना, काय झाले. आम्ही जाताना तर एकदम छान होतात आणि..." तोवर साशंकतेने स्वयंपाक घरात गेलेली पत्नी ओरडली,

"असा पराक्रम केलाय म्हणून मूग गिळून बसलात ना?..."

"काय झाले आई?" असे विचारत नताशाही स्वयंपाक घरात लगबगीने जात असताना पंतांप्रमाणे तिचाही पाय घसरला पण तीही सावरल्याचे पाहून तिच्या सासूने गॅसच्या ओट्याकडे इशारा केला. तिथे सर्वत्र उडालेली परंतु पंतांना न दिसलेली बासुंदी पाहताच नताशाच्या लक्षात सारा प्रकार आला. पुढे आणखी महाभारत घडू नये म्हणून नताशा हलकेच म्हणाली,

"आई, जाऊ द्या. त्यांचा चेहरा चूक झाल्याचे सांगत आहे. होते कधीकधी असे. उगीच बाबांना बोलू नका..."

   दोघीही काही घडले नाही अशा अवस्थेत बाहेर आल्या. धोंडोपंतांचा चेहरा पाहताच पत्नीला हसू आवरलं नाही आणि त्या हसत सुटल्या. ते पाहून नताशालाही हसे आवरणे कठीण गेली आणि तीही हसायला लागली. त्या दोघींकडे आधी आश्चर्याने पाहणारे पंतही नंतर त्या हास्यस्फोटात सामील झाले.

"काय हे पंत? या वयात हा असा उनाडपणा शोभतो का? अहो, त्या सांडलेल्या बासुंदीवरून आत्ता नताशाचा पाय घसरला होता...."

"माझाही घसरला होता पण थोडक्यात बचावलो. नताशा, तुला लागले तर नाही ना?"

"नाही, बाबा... चला. आत्ता सर्वांसाठी मस्त कॉफी करते. तुमचे चिरंजीव पोहोचतील इतक्यात..." असे म्हणत नताशा आत गेली नि दारावरची घंटी वाजली. पंतांनी दार उघडले. दारात त्यांचा मुलगा उमेश उभा होता. तो आत आला. हातपाय धुऊन परत आला. नताशाने सर्वांना कॉफी दिली. कॉफी घेताना नताशाने हसतहसत पंतांचा पराक्रम सांगताच उमेशला हसे आवरले नाही...

   आठ दिवसानंतरची गोष्ट. नताशाच्या वहिनीचा डोहळे जेवणाचा कार्यक्रम होता. तिथे नताशा आणि तिच्या सासूला जाणे आवश्यक होते. उमेश कंपनीच्या कामासाठी बाहेर गेला होता. बायकांच्या कार्यक्रमात जाणे पंतांना आवडत नव्हते म्हणून त्यांनी जायला नकार दिला.

"नताशा, मला यायलाच हवे का? ह्यांना एकट्याला घरी ठेवायला नको..."

"आई, अहो, तुम्हाला आग्रहाने बोलवले आहे. कारण डोहळे जेवणाची गाणी तुमच्याशिवाय कुणाला येत नाहीत..."

"ही गाणी म्हणणार? चांगले आहे, त्यांना सांग की स्वयंपाक जास्त करू नका कारण हिचा आवाज ऐकून सारा हॉल रिकामा होईल..." पंत म्हणाले आणि सर्वांचे गडगडाटी हास्य एकमेकात मिसळून गेले. तितक्यात नताशा अचानक म्हणाली,

"आई, आयडिया! आपण बाबांना माहेर घरी ठेवले तर?"

"अरे, छानच की! मी तर ती व्यवस्था विसरूनही गेले होते. काय म्हणता पंत? तिथे तरी राहाल ना नीट?"

"राहीन की. या चार भिंतीपासून आणि तुझ्या करड्या शिस्तीपासून निवांत राहता येईल..." पंत हसत म्हणाले नि पुन्हा तिथे हास्याचा मळा फुलला...

   "नताशा, आपल्याला किती वेळ लागेल तिकडे?"

"आई, घरी येण्यासाठी सायंकाळच होईल. आपण उद्या सकाळी नऊ वाजता निघून बाबांना तिथे सोडून रात्री येताना बाबांना घेऊन आठपर्यंत घरी येऊ.‌ मी थोड्या वेळाने महाताऱ्यांचे माहेर घरी फोन करून सारी चौकशी करते आणि मग ठरवू..."

"काही नको आता ठरवायचे? आपल्याला तिथे कार्यक्रमाचा निवांत, मनमुराद आनंद लुटता येईल. शिवाय एकदा पाहू तर खरे कसे आहे तिथले वातावरण? का हो, आठ-दहा तास राहाल ना तिथे?"

"राहीन की..." पंत म्हणाले खरे पण त्यांचा आवाज बरेच काही सांगत होता...

  दुपारी नताशाने फोन लावून व्यवस्थित, सखोल चौकशी केली. त्यांच्या आवश्यक त्या सूचना लिहून ठेवल्या. नंतर सासूच्या मदतीने पंतांची बॅग तयार करून ठेवली.

   दुसरे दिवशी सकाळी साडेआठ वाजता नताशाने कार काढली. सारे जण महाताऱ्यांचे माहेर घराकडे निघाले पण बाहेर पडताना नेहमी हसतमुख, आनंदी असणारे पंत बरेच उदास,बेचैन दिसत असल्याचे दोघींनाही जाणवत होते. पहिल्यांदा शाळेत जाणारं मूल जसं रडत नाही पण त्याचा चेहरा मात्र रडवेला होतो, तसेच काहीसे पंतांचे झाले होते.

   काही क्षणात कार इच्छित स्थळी पोहोचली. तो एक टुमदार बंगला होता. सभोवताली आकर्षक बाग तयार केली होती. बागेत अनेक जेष्ठ (महातारे) फिरत होते, गप्पा मारत होते. पंत आणि त्या दोघी कार्यालयात पोहोचल्या.‌ कागदपत्रं देताच लगोलग कागदपत्रांची तपासणी झाली आणि व्यवस्थापिका म्हणाल्या,

"पंत, सुस्वागतम! हे परिचय पत्र गळ्यात घाला आणि हे कार्ड तुम्ही जवळ ठेवा. सायंकाळी पंतांना न्यायला याल तेव्हा हे कार्ड नसेल तर पंतांना आम्ही कुणाच्याही सुपुर्द करणार नाही..."

"बाईसाहेब, मी काही कुक्कुलं बाळ नाही. मला न्यायला जो कुणी येईल त्याला मी ओळखेलच ना? शिवाय मी सायंकाळी एकटाही जाऊ शकतो..."

"नाही, पंत, नाही! असे होणार नाही. तुम्हाला एकट्याला आम्ही मुळीच सोडणार नाही. रस्त्याने जाताना दुर्दैवाने काही विपरित घटना घडली तर... आता दुसरी बाजू... कसं आहे, ह्या वयात विस्मरण, स्मृतिभ्रंश अशा घटना होतात. अशा स्थितीत कुणी नको त्या व्यक्तिसोबत गेले तर..."

"बरोबर आहे तुमचे. बाबा, आम्ही आल्याशिवाय कुणासोबत किंवा एकटे जाऊ नका. येतो आम्ही..." असे म्हणत नताशा सासूसोबत निघाली.

"या. पंत, या. तुम्हाला आराम करायचा असेल तर हॉलमध्ये करू शकता किंवा बागेत फिरू शकता..."

"का? मला स्वतंत्र खोली, टिव्ही असलेली..."

"नाही. असं काही स्वतंत्र मिळणार नाही. या..." असं म्हणत व्यवस्थापिकेने पंतांची बॅग शिपायाला घ्यायला सांगितली. एका मोठ्या हॉलमध्ये ते पोहोचले. तिथे अगोदरच आठ-दहा व्यक्ती पहुडलेल्या होत्या. एका पलंगावर पंतांची बॅग ठेवून शिपाई निघून गेला. व्यवस्थापिका पुन्हा सूचना देत निघून गेल्यावर पंत दोन क्षण उपस्थितांचे निरीक्षण करून खिडकीजवळ उभं राहिले. तिथलं दृश्य पाहून ते मनात म्हणाले,

'व्वा! परिसर तर आकर्षक, मनमोहक आहे. आणि हे काय इथे महिलाही दिसत आहेत...' तितक्यात त्यांचे लक्ष एका महिलेने वेधले. तिच्या हालचाली, शरीराला देत असलेले झटके, मानेचे हेलकावे, डोळ्यांची उघडझाप ते सारे पंतांना ओळखीचे वाटले. तितक्यात वीज चमकावी तसं ते म्हणाले,'अरे, ही तर मिताली दिसतेय. कॉलेजमध्ये सोबत होती. पण तीच असेल का कारण कितीतरी वर्षांनी ती दिसतेय... चला. बागेत जाऊन बघूया...'

   धोंडोपंत लगबगीने बागेत पोहोचले. त्या महिलांपासून काही अंतरावर पुरुषही बसले होते. पंत बायकांकडे बघत विशेषतः मितालीचे निरीक्षण करत पुरुषांकडे निघाले तशी त्यांची खातरी पटली की, ती मितालीच आहे. ते तिच्यापासून काही पावलं दूर जातात न जातात तोच किंचाळल्यागत् एक आवाज आला,

"कोण? तू धोंड्या आय मीन तुम्ही धोंडोपंत ना?"

"मिताली, ओळखले मला? मी तुला खिडकीतून पाहिले आणि ओळखले म्हणून इथे आलो. पण तू इथं कशी?"

"तू तिथे मी म्हणजे जसा तू तशीच मी इथे. मुलाला नि सुनेला दिवसभर कुठे तरी बीचवर भटकायला जायचं आहे. अरे, मी तशी ठणठणीत आहे. बघ ना, बॉडी कशी फिट अँड स्वीट आहे.

हो ना? पण त्यांना वाटते, त्यांच्या अपरोक्ष मला काही झाले, झटका- बिटका आला आणि डुकरे किंवा कुणी या वयात छेड काढली तर जन्मभर त्यांच्या विशेषतः सुनेच्या नावाने लोक शंख करतील..."

"तू मात्र बदलायची नाहीस. भटकणे काय, छेड काय, फिट काय, शंख काय..."

"अरे, मी जन्मभर वेळोवेळी असा शंख वाजवते ना, म्हणून तग धरून आहे आणि म्हणूनच यमदूतही आसपास फिरकत नाही..."

"आणि तुझे मिस्टर..."

आकाशाकडे बघत किरण म्हणाली,"ते उडत कावळे! गेले उडत! तुझी बायको..."

"नाही. ती नाही गेली उडत पण माझ्या मानगुटीवर बसलेली आहे... कायमची. आज सुनेच्या माहेरी बायकांचा कार्यक्रम आहे. माझी पीडा नको म्हणून पीडित असल्याप्रमाणे इथे सोडले. खरेतर निघताना विचार केला, त्या दोघी मला सोडून गेल्या की, इथे शंभर-पन्नास रूपये देऊन सटकावे. मस्तपैकी त्या 'उनाड दिवस' सिनेमातील अशोक सराफ प्रमाणे उनाडक्या कराव्यात पण इथले कडक नियम पाहता इथेच कुटाळक्या कराव्या लागतील या विचाराने हिरमुसला होऊन खिडकीजवळ आलो नि एकदम शीत पाण्याची लहर यावी तसेच झाले... तू दिसलीस..."

"अरे, तुला पाहताच मलाही खूप आनंद झाला. अरे, कडक नियम वगैरे काही नाही. पाच-पन्नास रूपये दिले की, कुणी न्यायला येईपर्यंत मस्त बाहेर जाऊन मज्जा करता येते. मला महिन्यातून दोन -तीन वेळा इथे सोडतात. सुरूवातीला तू म्हणतोस तशा कुटाळक्या करत बसे पण नंतर भ्रष्टाचाराला प्रसन्न करून घेतले आणि दिवसभर हॉटेलिंग, सिनेमा, खाणेपिणे करून बिंग फुटायच्या आत वेळेवर इथे परत येते..."

"खरेच की... का उगाच फुशारक्या मारतेस... कॉलेजमध्ये मारत होती तशा..."

"नाही रे. खरे सांगतेय. तुला पाहायचे का? बाहेर चल. धम्माल मस्ती करू..."

"नको. नको. माझी बायको महासंशयी आहे. कदाचित वेळेपूर्वीच इथे येईल नि मग..."

"भित्रा रे भित्रा! तुझा स्वभाव आहे तसाच आहे. कॉलेजमध्ये ही कुण्या मुलीची डाळ शिजू दिली..."

"म्हणजे?"

"अरे, इतर मुली तर मुली पण मीही तुझ्यावर..."

"माय गॉड! हे तर मला कधीच समजले नाही..."

"आता तरी कुठे समजतंय... म्हणजे आजपर्यंत ते तुला समजलेच नाही. बरे, जेवणाची ऑर्डर द्यावी लागेल..."

"का? यांच्या नियमानुसार जे शिजेल ते खावे लागेल ना?"

"नाही रे. नियमाला अपवाद...चल. तुला पाहिलं आणि कावळे काव काव करायला लागले पण पुढच्या वेळी सोडणार नाही हं. अगली बार बाहेर जायचं हं..." मानिनी हसत म्हणाली. तसे धोंडोपंत हसतच तिच्या मागोमाग निघाले...

 मानिनीने पंतांची आवड विचारली. तसे पंत म्हणाले,

"तुझी आवड ती माझी निवड..."

"चांगलं ड ला ड जोडतोस की..."

"ध चा मा करण्यापेक्षा ड जोडलेले बरे..." पंत म्हणाले तसे मानिनी खळाळून हसली. तेव्हा तिच्या चेहऱ्यावर पसरलेली लाली नि खट्याळ भाव पंत भान हरपून पाहत राहिले...

   कितीतरी वर्षांनी पंतांनी आवडते असे मनसोक्त जेवण केले अगदी भरपेट! घरीही तसाच एक नंबर स्वयंपाक होत असे पण जेवण मात्र बायकोच्या करड्या नजरेखाली तोलून मापून करावे लागे. नजर चुकवून एखादा घास खाल्ला किंवा बायको झोपल्याचे पाहून थोडं काही खाल्लं आणि नंतर ढेकर आला, पित्त वाढलं की बायकोचा कटाक्ष म्हणजे जणू कठोर शिक्षा! असे काही झाले नाही तरीही बायको आराम झाला की, फ्रीज उघडून पाहायची आणि तत्क्षणी पंतांची चोरी पकडली जायची...

   जेवण झाल्यानंतर मानिनीने एक गोळी पंतांना देत म्हणाली, "लगेच ही गोळी गिळून टाक. ढेकर येणार नाही की एसिडीटी होणार नाही..."

"कोणती गोळी आहे गं. नाव सांग..."

"व्हाट्सअप करते की..."

"व्हाट्सअप? अगं पण नंबर..."

"काय हे पंत? आता आपण नंबर घ्यायचे का नको? बायको संशय घेईल का?" मानिनीने हसत विचारले. 

"हो... म्हणजे नाही... म्हणजे तिला कशाला सांगायचे?"

"तेही बरोबर आहे म्हणा... तिला कशाला सांगायचे... हो ना..." असे म्हणत मानिनी हसत सुटली...

   दोघेही दिवसभर निवांतपणे एका वटवृक्षाखाली गप्पा मारत बसले. रात्रीचे आठ वाजत होते. चंद्राचा शीतल प्रकाश आणि गारवा वेगळेच संकेत देत असताना शिपाई तिथे येऊन म्हणाला,

"दोघांनाही न्यायला आले आहेत. बोलवले आहे..." 

  दोघे एकामागोमाग एक कार्यालयात पोहोचले. एकानंतर एक दोघांच्याही सुटकेची कार्यवाही पूर्ण झाली. दोन्ही कुटुंब बाहेर पडत असताना मानिनी म्हणाली,

"पंत, ओळख करून देते. हा माझा मुलगा आणि ही सून... तू करून देतोस ना ओळख तुझ्या बायकोची..."

"हो... हो... ही माझी पत्नी आणि ही सून..."

  सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला. तशी मानिनी म्हणाली,

"पंत, पुन्हा भेटू... आपल्या घरी... महाताऱ्यांच्या माहेर घरी..." 

   दोघांच्याही कार निघाल्या. कार थोडी पुढे जाताच मानिनीची सून म्हणाली,"आई, तुमच्या मित्राची पत्नी जिवंत आहे. नाही तर.."

"नाही तर काय त्याच्याशी माझे लग्न लावून दिले असते..." मानिनी म्हणाली आणि हास्याची कारंजी फुलली.

   दुसरीकडे नताशा कार चालवत असताना सौ.पंत एकदम शांत होत्या. चेहरा रागाने लालबुंद झाला होता... कुणी काही बोलत नव्हते. तितक्यात पंत म्हणाले,

"नताशा, कार मागे घेता येईल का ग?"

"का हो, बाबा? काही विसरलात का?"

"हो ना. गडबडीत मानिनीचा नंबर घ्यायचा विसरला ग..." पंतांचे बोलणे पूर्ण होण्याच्या आधी त्यांची पत्नी कडाडली,

"काही नको. नंबर- बिंबर! दिवसभर केलात तेवढा नंबरीपणा बस झाला..." ते ऐकताना धोंडोपंतांचे गडगडाटी हास्य ऐकून नताशा मंदमंद हसत असताना पंतांची पत्नीही जोरजोरात हसायला लागली आणि ताण निवळला...

            ००००


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy