Nagesh S Shewalkar

Comedy

3  

Nagesh S Shewalkar

Comedy

दूध गेले ऊतू

दूध गेले ऊतू

10 mins
267


     त्यादिवशी सकाळी नेहमीप्रमाणे वर्तमानपत्र वाचत असताना एका बातमीने माझे लक्ष वेधले. बातमी वाचय असताना मी स्वयंपाकघराकडे पाहून आवाज दिला,

"अ..ग, ए... लवकर ये."

"असं ओरडायला काय झालं?" चहाचे कप घेऊन आलेल्या सौभाग्यवतीने विचारले.

"काय भयंकर बातमी आहे. ऐक. बायकोने तापायला ठेवलेल्या दुधावर लक्ष न दिल्यामुळे दूध ऊतू गेले. त्यामुळे चिडलेल्या, संतापलेल्या बायकोने स्वतःच्या नवऱ्याला चक्क दोन दिवस उपाशी ठेवले..." मी ती बातमी घाबरलेल्या अवस्थेत वाचत असताना बायको खळाळून हसत 'ऐकावे ते नवलच' असे म्हणत चहाचे रिकामे कप घेऊन आत गेली आणि माझ्या मनात विचारांनी गर्दी केली...

     तापायला ठेवलेल्या दुधावर नवऱ्याला लक्ष ठेवायला सांगितले की, दूध हमखास ऊतू जाणारच या गोष्टीची शंभर टक्के खात्री असतानाही बायका पुरुषांना दुधावर लक्ष ठेवायचे काम का सांगतात, हे तमाम नवरे मंडळींना सात जन्मातही न सुटलेला प्रश्न आहे, तसाच तो संशोधनाचा विषय आहे. दूध नेमके गॅसवर ठेवले न ठेवले, की बायकोला कोणते ना कोणते महत्त्वाचे काम आठवते. त्यांना कुणाचा तरी विशेषतः माहेरच्या माणसाचा, मैत्रिणीचा फोन येतो आणि मग त्यांना त्या कामगिरीवर जावेच लागते. जाताना ती नवऱ्याला बजावून सांगते,

'अहो, गॅसवर दूध तापायला ठेवलय. जरा लक्ष द्या हं. त्या टीव्हीवरच्या बातम्या पाहणे, वर्तमानपत्राचे वाचन आणि ते मोबाईलवर खेळणे बाजूला ठेवा. तुम्ही यापैकी कशात ना कशात गुंतून पडालात ना मग तुम्हाला कशाचे भान राहत नाही आणि मग दूध ऊतू जाते...' हे सारे ऐकणारा नवरा कपाळावर आठ्यांचे जाळे होईल तेवढे घट्ट करून रणांगणारुपी स्वयंपाक घरात जाण्यासाठी तयार होतो. त्यावेळी तो टीव्हीवर एखादे मसालेदार गाणे, चमचमीत बातम्या पाहण्यात गुंग असतो किंवा वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या एखाद्या घोटाळ्याचे चविष्ट चर्वण करत असतो. यापैकी कशातच रममाण झाला नसेल तर तो हातातील भ्रमणध्वनीवर आलेल्या संदेशांचे वाचन करून प्रत्येकाला तेवढ्याच उत्स्फूर्तपणे उत्तर देत असतो. अशावेळी आलेला बायकोचा संदेश शिरसावंद्य मानून उतरलेल्या चेहऱ्याने, थकलेल्या पावलांनी, मरगळलेल्या अवस्थेत स्वयंपाक घरात प्रवेश करतो. तिथे जन्मोजन्मीच्या शत्रुकडे अर्थात गॅसवरील दुधाकडे जळजळीत कटाक्ष टाकतो. त्यावेळी तापत असलेले दूध एखाद्या साधूने तपश्चर्येमध्ये शांतपणे लीन असावे, स्वतःभोवती घडणाऱ्या घडणाऱ्या घटनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावे त्याप्रमाणे शांत असते. नवऱ्याला कितीही घाई, गडबड असली तरी दूध वर येण्याची कोणतीही घाई करत नाही. एक मिनिट, दोन मिनिट, तीन...चार मिनिटे झाली तरी दूध निश्चल असते, स्थिर असते. दुधाकडे दृष्टी लावून बसलेल्या यजमानाच्या पायाला गोळे येतात, कधी कधी पायात त्राण नसल्याप्रमाणे त्याला धड उभेही राहता येत नाही. तापणाऱ्या दुधाकडे एक टक दृष्टी लावल्यामुळे डोळे नकळत पाण्याने भरून येतात. त्याची नजर कधी दुधावर, कधी हातातल्या भ्रमणध्वनीवर तर मधूनच बायकोच्या आगमनाकडे लागलेली असते. बायको आणि दूध दोघेही जणू त्याच्या सहनशीलतेचा अंत पाहतात. तितक्यात कधी त्याचा भ्रमणध्वनी बांग देतो तर कधी टीव्हीवर लागलेल्या त्याच्या आवडत्या गाण्याची धून कानावर पडते तर मध्येच दारावरची घंटी किणकिणते. तशाही परिस्थितीत तो दुधावर एक कटाक्ष टाकून स्वयंपाक घराबाहेर पडतो. काही क्षणात त्याची अर्धांगिनी स्वतःचे महत्त्वाचे काम उरकून आत येते. त्याचवेळी नवऱ्याला स्वयंपाक घराबाहेर आलेले पाहून तिचा पारा चढतो. ती तणतणत स्वयंपाक खोलीत जाते आणि नेमके तोपर्यंत शांत असलेले तापणारे दूध मालकिनीची चाहूल लागताच अनेक दिवसांच्या विरहाने पतीला पाहताच पत्नीच्या प्रेमभावना उफाळून याव्यात त्याप्रमाणे फसफस करत पातेल्याच्या बाहेर येत गॅसच्या ज्योतीचे चुंबन घेऊ पाहते. ते पाहताच बायकोच्या रागाचा पाराही दुधाच्या वेगापेक्षाही दुप्पट वेगाने वर चढतो. कसेबसे गॅसचे बटन बंद करून ती एखाद्या क्षेपणास्त्रापेक्षाही भयंकर वेगाने बाहेर येते आणि तिथे नवऱ्याला भ्रमणध्वनी, टीव्ही, वर्तमानपत्र यापैकी कुणाशी तरी सलगी करत असल्याचे पाहून तिच्या तळपायाची आग मस्तकात शिरते. नंतर सुरु होते, नवऱ्याची हजेरी, खरडपट्टी झाडाझडती आणि बरेच काही...

    अशा अनेक 'दुधायण' प्रसंगांचा अयशस्वी सामना केलेल्या पुरुषांना 'वेंधळा, अर्धवटराव, कामचुकार...' अशा विविध पदव्या समारंभपूर्वक म्हणजे शिव्यांच्या सांग्रसंगतीत बहाल केल्या जातात. काही गोष्टी जाणतेपणी तर बऱ्याच वेळा अनेक गोष्टी अजाणतेपणी घडत असतात. परवाच घडलेला एक प्रसंग ऐकवतो...

    त्यादिवशी सायंकाळी चार वाजत असताना जीवनचे माझ्या मित्राचे आगमन झाले. नेहमी हसतमुख असणारा जीवन काहीसा उदास वाटत होता. आमचा नुकताच चहा घेऊन झाला होता. जीवन माझ्या शेजारी सोफ्यावर बसला. माझी बायको आमच्या चहाचे कप उचलत म्हणाली,

"भाऊजी, बसा. चहा आणते."

"वहिनी, नको. घेऊनच आलोय. खूप झाला चहा..." जीवन सांगत असताना ही आत गेली. मला मात्र जीवनचा स्वर विशेषतः 'खूप झाला चहा...' हे शब्द वेगळे वाटले म्हणून मी विचारले,

"का रे, काय झाले? अस उदास का आहेस?"

"काही नाही. कुठे काय? विशेष काही नाही."

"विशेष काही नाही म्हणजे काही तरी आहे..." मी बोलत असताना माझा भ्रमणध्वनी वाजला. त्यावर रेखावहिनीचे म्हणजे जीवनाच्या पत्नीचे नाव पाहून मला वेगळीच शंका आली. 'काही तरी घडलय आज...' असे मनातल्या मनात म्हणत जीवनला काहीही न समजू देता मी बाहेर आलो. भ्रमणध्वनी उचलताच तिकडून रेखावहिनींचा चिंतातूर आवाज आला,

"भाऊजी, आमचे 'हे' आलेत का हो तिकडे? दुपारपासून कुठे गेलेत नि काय नाही. सांगूनही गेले नाहीत हो. मोबाईलही घरीच आहे. मला खूप काळजी वाटते हो. आलेत का हो तिथे?"

"वहिनी, शांत व्हा. टेंशन घेऊ नका. जीवन आत्ताच इथे आलाय. मी बोलतो त्याच्याशी. ठेवतो..." असे म्हणत मी आत आलो. मी जीवनला काही बोलण्यापूर्वीच माझी बायको हातात पातेले घेऊन येत म्हणाली,

"अहो, शेजारच्या कुंदाताईंचे पातेले देऊन येते. खूप दिवसांपासून आपल्याकडेच आहे. महत्त्वाचे म्हणजे दूध तापायला ठेवले आहे. दक्ष होऊन लक्ष द्या बरे. नाही तर भाऊजींसोबत तुमच्या गप्पांचा फड रंगेल आणि तिकडे माझे दूध... म्हणजे तापायला ठेवलेले दूध ऊतू जाईल..." असे मला बजावत बायको घराबाहेर पडली.

"हेच ते. दुधाचे रामायण... दुधायण घडले आमच्या घरी...सकाळीच..." जीवन तावातावाने म्हणाला.

"म्हणजे? काय झाले?" मी विचारले.

"काय होणार? या बायका घरातील हज्जार कामे करतील परंतु अतिशय कंटाळवाणे आणि जोखमीचे असलेले काम म्हणजे तापणाऱ्या दुधावर लक्ष ठेवायला नवऱ्याला सांगतील. हे करताना त्यांना काय आनंद मिळतो ते त्यांनाच माहिती. आज सकाळचीच गोष्ट..." वैतागलेला जीवन शून्यात दृष्टी लावून सांगू लागला...

     सकाळचे आठ वाजत होते. जीवन-रेखा यांचा चहा झाला होता. कपबश्या उचलत रेखा म्हणाली, "अहो, मी स्नानाला जातेय. गॅसवर दूध तापायला ठेवलेय. तिकडे लक्ष ठेवा ना प्लीज!"

"बरे. बरे. ठेवतो लक्ष. तू जा..."म्हणत जीवनने शेजारच्या टी-पॉयवर ठेवलेला भ्रमणध्वनी उचललेला पाहताच रेखा चिडून म्हणाली,

"हेच ते. तुम्हाला कोणते काम सांगावे आणि निश्चिंत राहावे असे या जन्मात तरी घडणार नाही. अहो, तुम्ही इथे या डबड्यावर खेळत बसलात ना तर दूधाचे सोडा पण मलाही विसरून जाल..."

"होते असे कधी कधी. रेखा, तुला सांगतो, माझा रमेश नावाचा मित्र आहे ना, तो गडबडीत कघ नाही स्वतःच्या बायकोलाच बसस्थानकावर सोडून निघून आला होता. बायको सोबत आहे हे तो चक्क विसरला..."

"तुमचाच मित्र तो. अगोदर उठा. तो मोबाईल बाजूला ठेवा आणि गॅसच्या ओट्याजवळ उभे राहून दुधावर लक्ष ठेवा..." रेखा तसे निर्वाणीचे बजावत असताना जीवन कण्हत, कुंथत उठत असल्याचे पाहून रेखा पुन्हा कडाडली,"कपाळावरचे आठ्यांचे जाळे थोडे कमी करा. दहा टनांचे ओझे उचलायला सांगितल्याप्रमाणे चेहरा करु नका. दुधावर लक्ष ठेवण्याचे एकदम सोपे काम सांगितले आहे. जा लवकर..."

    जीवन स्वयंपाक घरात पोहोचल्याची खात्री होताच रेखाने न्हाणीघराचे दार बंद केले. जीवन गॅसच्या ओट्याजवळ पोहोचला. त्याने पातेल्याकडे पाहिले. कसलाही आवाज नाही, कोणतीही खळखळ नाही, पातेल्याच्या बाहेर येण्यासाठी कुठलीही कसरत न करता दूध एकदम शांत होते, जणू पाळण्यात शांतपणे झोपलेले मुल! आठ-दहा सेकंद जीवन त्या दुधाकडे टक लावून बघत असताना त्याच्या खिशातील भ्रमणध्वनीने संदेश प्राप्त झाल्याची सूचना दिली. जीवनने हलकेच खिशातून मोबाईल काढला. संदेश त्याच्या एका जवळच्या मित्राने पाठवला होता. 'आलेला संदेश वाचावा की दुधाकडे लक्ष ठेवावे' या द्विधा मनःस्थितीत असताना त्याच्या मनाने 'संदेश' वाचावा असा कौल दिला. संदेश वाचायला सुरुवात करण्यापूर्वी त्याने दुधाकडे पाहिले. परंतु दूध 'जैसे थे' स्थिर होते. लवकर वर येण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नसल्याचे पाहून आनंदलेल्या जीवनने संदेश पेटारा उघडला. तो संदेश म्हणजे जणू एक लेखच होता. तो भला मोठा लेख वाचत असताना बराच वेळ गेला. मध्येच त्याला कशाची तरी चाहूल लागली. त्याला वाटले, रेखाच आलीय. त्याने दचकून पाठीमागे पाहिले. तिथे रेखा नसल्याचे पाहून त्याचा जीव भांड्यात पडला. त्याने तापणाऱ्या दुधाकडे पाहिले आणि दुसऱ्याच क्षणी त्याची पाचावर धारण बसली. काही क्षणांपूर्वी शांत असलेले दूध पातेल्याच्या बाहेर धावत होते. 'काय करावे?' असे मनाशीच विचारत जीवनने इकडे तिकडे पाहिले. परंतु ओट्यावर कुठेही चिमटा किंवा साधे फडकेही दिसत नव्हते. 'पातले कसे उतरून ठेवू? हाताने खाली काढून ठेवू तर हातांची बोटे भाजतील.'जीवन प्रश्नांच्या वावटळीत गरगरत असताना एक मन म्हणाले,

'अरे, काळजी करू नको. पातेले उतरून ठेवायची गरज नाही. रेखाने, 'दूध ऊतू जाईल तिकडे लक्ष ठेवा.' असे सांगितले आहे. पातेले उतरून ठेवा किंवा गॅस बंद करा हे सांगितले. तेव्हा दूध ऊतू कसे जातेय याकडेच बघ...' यावर दुसरे मन काही बोलण्यापूर्वीच न्हाणीघराचा दरवाजा उघडला आणि पाठोपाठ आवाज आला,

"अहो, तापलय का हो दूध? ऊतू तर गेले नाही ना?"

"दूध तापलय. ऊतू पण जातेय..."

"काय? अहो, ही काय मस्करी करण्याची वेळ आहे का?..." असे विचारत रेखा स्वयंपाक घरात आली. गॅसवर असणारे दूध ऊतू जातेय हे पाहताच तिच्या रागाचा पारा सातव्या आसमानावर पोहोचला...

"अरे, बाप रे! मग..." मी मध्येच जीवनला थांबवून विचारले.

"मग काय? माझ्या सात पिढ्यांचा उद्धार करताना रेखा मला नाही नाही ते बोलली रे..."

"अच्छा! म्हणून साहेबांच्या चेहऱ्यावर असे बारा वाजलेत वाटते. जीवन, शांत हो. सगळ्याच नवऱ्यांच्या जीवनात असे प्रसंग येतात. ऊतू जाणारे दूध आणि त्या घरातला नवरा हे समीकरण सर्वत्र आढळते. नवऱ्याच्या साक्षीने, त्याच्या वेंधळेपणामुळे दूध ऊतू गेले नाही असे घर क्वचितच सापडेल. " मी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला.

"म्हणजे? तूही अशा प्रसंगातून गेलास?" जीवनने विचारले

"अनेकदा गेलोयः शेवटी मी माझ्या बायकोचा नवराच की! आता सगळ्यांची सवय झालीय. ऊतू जाणारे दूध आणि नंतर अंगावर येणारे शब्दास्त्र या एकाच नाण्याच्या दोन बाजू! कातडे एवढे निर्जीव झालेय ना की, शब्दरुपी जळजळीत निखारे अंगावर पडले ना तरी त्याची धग जाणवत नाही. तमाम नवरे मंडळीच्या दृष्टीने 'दुधाकडे लक्ष ठेवले' हे वाक्य म्हणजे जणू शापच! ज्या कुण्या नवऱ्यांना उकळत्या दुधाचा आणि त्यानंतर पत्नीच्या तांडवाचा सामना करावा लागला नाही ते नवरे खरेच भाग्यवान! काही दिवसांपूर्वीच माझ्या घरी घडलेला प्रसंग ऐकवतो..." असे म्हणत मी 'ती' घटना जीवनला जशीच्या तशी ऐकवली...

     सकाळची वेळ होती. मी चहा घेत वर्तमानपत्र चाळत असताना शेजारी बसलेली सौभाग्यवती म्हणाली,

"अहो... अ..हो.."

"हूं..."

"थोडे ऐका ना. त्या पेपरातून डोके बाजूला काढा ना..."

"काढले. डोके बाजूला काढले! आता कुठे ठेवू डोके?"

"पुरे झाला हो बाष्कळपणा! मी स्नानाला जातेय. गॅसवर दूध तापायला ठेवलेय. लक्ष ठेवा. पेपर बाजूला ठेवा. दूध तापेपर्यंत नो मोबाईल! नो टीव्ही! चला. उठा जा. दूध तपले की, गॅस बंद करा."

"ओके. मॅडम, बंदा हाजीर है। चल रे भोपळ्या दूध ऊतू घालूया..." मी असे म्हणत असताना हसत हसत दोघेही आपापल्या कामगिरीवर निघालो. स्वयंपाक घरात पोहोचताच मी अगोदर दुधाकडे बघितले. त्याची ती शांतमग्न अवस्थाही पाहिली. नेहमीच्या अनुभवातून पक्के ठाऊक होते की, दुधाला त्या समाधीस्थ अवस्थेतून पातेल्याच्या बाहेर पडायला पंधरा मिनिटे नक्कीच लागतील. तोवर आपण पाच मिनिटात मंदिरात जाऊन हनुमानाचे दर्शन घेऊन येऊया. 'नेक काम मे देरी क्यूं?' याप्रमाणे मी कपडे बदलत असताना माझ्या लक्षात आले की, बायकोने काही तरी बंद करायला सांगितले आहे. 'काय बरे? हां मी तिला तुझे स्नान होईपर्यंत मारोतीचे दर्शन घेऊन येतो असे सांगितले असणार. तेव्हा ती म्हणाली असणार की, घरात कुणी नाही तेव्हा दाराची कडी लावून जा. दाराची कडी? कोणत्या दाराची? स्वयंपाक घराला दारच नाही. शयनगृहाची बाहेरच्या बाजूची कडी लागतच नाही. अरे, हां... न्हाणीघराची कडी लावायला सांगितली असणार. नक्कीच...'असे बडबडत मी न्हाणीघराची कडी लावून देवदर्शनासाठी बाहेर पडलो. काही क्षणातच मंदिरात पोहोचलो. हनुमंताचे मनोभावे दर्शन घेतले. हात मूर्तीकडे बघत असताना जाणवले की, का कोण जाणे आज मारोतीराया माझ्याकडेपाहून हसतोय परंतु आपल्या मनाचा भ्रम समजून मी बाहेर पडलो. घराकडे निघालो. माझ्या घराच्या अगदी जवळ म्हणजे हाकेच्या अंतरावर राहणारे शेजारी दारात उभे होते. नमस्कार झाला. दोन-चार शब्दांची देवाणघेवाण चालू असतानाच एका माजी मंत्र्यांने केलेला करोडो रुपयांचा घोटाळा बाहेर आल्याच्या प्रकरणावर आमची चर्चा रंगली. किती वेळ गेला ते समजले नाही. तितक्यात त्यांचा भ्रमणध्वनी वाजला आणि ते गृहस्थ घरात गेले. मी घरी आलो.आल्याबरोबर एका करपट वासाने माझे स्वागत केले. नाकात तो वास शिरत असतानाच मनात एकदम बाँबस्फोट झाल्याप्रमाणे एक विचार लख्खकन चमकला,

'अरे, बाप रे! गॅसवर दूध...' असे मनातच चित्कारत मी स्वयंपाक घरात शिरलो. पाहतो तर काय, दुधासह पातेल्याचाही जणू कोळसा झाला होता. तत्क्षणी माझा चेहराही बहुतेक काळा ठिक्कर पडला असावा. स्वयंपाक घर गरगर फिरत असल्याची जाणीव झाली. हातपाय लटपटत होते. चेहरा घामाने डबडबला. श्वास नाकातून खाली उतरत नव्हता. डोके फटफटू लागले. 'बाप रे! काय झाले हे?' असे पुटपुटत मी कसा तरी गॅस बंद केला. पातेले खाली उतरून ठेवावे म्हणून दोन्ही हातांनी पातेले धरले न धरले तोच हातांची बोटे अशी भाजली ना की विचारु नये. बोटांवर तोंडाने फुंकर घालत डबडबल्या डोळ्यांनी मी दिवाणखान्याकडे निघालो. तितक्यात कुणी तरी दार बडवत असल्याचा आवाज कानात शिरला. बैठकीचे दार सताड उघडत होते. मग ? दुसऱ्याच क्षणी विजेचा फार मोठा शॉक बसल्याप्रमाणे मी बधीर झालेल्या अवस्थेत मी पुटपुटलो,

'मारोतीराया, वाचव रे बाबा. बायकोला न्हाणीघरात कोंडून तुझ्या दर्शनाला आलो होतो. बाप रे! देवा, म्हणून तर तुझ्या चेहऱ्यावर हसू फुलले नव्हते...' मी धावत जाऊन दार काढले. 'पुढे काय वाढून ठेवलेय? काय होईल? आलीया भोगासी असावे सादर!' याप्रमाणे येणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी मनाची तयारी करत असताना एखाद्या चवताळलेल्या वाघिणीप्रमाणे बायको बाहेर आली. मी स्वतःचे कान पडल्याच्या अवस्थेत सोफ्यावर येऊन बसलो. माझी तशी स्थिती पाहून बायकोला वेगळीच शंका आली. संतापाने थरथरत असताना तिने स्वतःला सावरले. राग गिळत विचारले,

"अहो, काय झाले? एवढे का थरथर कापताय? चेहरा घामाने का डबडबलाय? काही त्रास होतोय का? डॉक्टरला बोलावू का? ..." काळजीयुक्त स्वरात विचारत बायको जवळ आली. माझ्या कपाळावर, गळ्यावर, हातावर हात ठेवून तिने साडीच्या पदराने माझ्या कपाळावरचा घाम पुसला. त्यावेळी मी तिच्यामध्ये दडून बसलेली अनंत काळाची माता अनुभवत होतो. स्वतःला सावरत मी म्हणालो,

"अग, काही नाही. तू स्नानाला गेली होतीस. दूध वर यायला बराच वेळ लागेल म्हणून मी मारोतीच्या दर्शनाला गेलो. येताना आपल्या शेजारचे अण्णा भेटले. बराच वेळ आम्ही बोलत बसलो. इकडे सारे दूध जळून गेले आणि त..त..तू न्हाणीघरात अडकलीस..."

"असू द्या. होते एखादे वेळी. दूध करपले तर करपले. मी काही क्षण न्हाणीघरात अडकले तर काय झाले? मला तेवढाच निवांत वेळ मिळाला..." मी सारे तपशीलवार सांगत असताना जीवनने मध्येच मला थांबवून आश्चर्याने विचारले,

"काय? एवढे सारे होऊनही वहिनी एवढ्या शांत?"

"कसे आहे, केवढीही कोपीष्ट, संतापी बायको असली ना तरी ती शेवटी बायको असते. तिला स्वतःच्या मंगळसुत्राची पर्यायाने नवऱ्याची अत्यंत काळजी असते. मी आधीच रक्तदाबाने आजारी! घडलेल्या प्रकाराने आधीच हायपर झालो होतो. तेव्हा आपण काही बोललो तर नवऱ्याची आधीच बिघडलेली तब्येत जास्तच बिघडेल या काळजीने तिने सारे संयमाने घेतले..."

"वाचलास मित्रा, वाचलास! वहिनींच्या जागी रेखा असती तर ना तिने काय केले असते या विचाराने माझ्या अंगावर काटा येऊ लागलाय..."

"सोड यार! अरे, बहुतांशी नवऱ्यांच्या संसारात 'ऊतू जाणारे दूध' हा शत्रू असतोच असतो..." मी जीवनला समजावत असताना माझ्या सौभाग्यवतीचे आगमन झाले. घरात पाय ठेवल्याबरोबर तिने विचारले,

"अहो, तापले ना दूध? ऊतू नाही ना घातले? नाही म्हटलं, जीवनभाऊजी आले म्हटल्यावर गप्पांना ऊत आला असेल ना?..." असे म्हणत बायको स्वयंपाक घरात गेली... पुढील प्रसंग स्वतःच्या डोळ्यांनी पाहणे नको या विचाराने जीवनने काढता पाय घेतला. माझे दोन्ही हात आपोआप माझ्या डोक्यावर गेले. परंतु टक्कल असलेल्या डोक्यावर उपटण्यासाठी हातात केस येतीलच कुठून?

         ००००


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy