Nagesh S Shewalkar

Comedy

4  

Nagesh S Shewalkar

Comedy

दुसरी बायको

दुसरी बायको

7 mins
484


       दुसरी बायको...

    बायको नसली की, नवऱ्याची कशी फजिती होते आणि मग पतीने शोधलेल्या मार्गामुळे कसा विनोद घडतो ते सारे सुजयने अनुभवले आहे....

  त्या दिवशी सुजय कार्यालयातून परतल्यावर हातपाय धुऊन सोफ्यावर बसला. येतानाच बाहेरून चहा पिऊन आला होता. परंतु मुख्य प्रश्न होता स्वयंपाकाचा! गेले आठ दिवस सकाळ- सायंकाळ स्वयंपाक करताना सुजय कंटाळला होता. त्यादिवशी त्याची स्वयंपाक करण्याची सोडा परंतु स्वयंपाक घराकडे बघण्याचीही इच्छा होत नव्हती. हातातील वर्तमानपत्र बाजूला ठेवून तो मनाशीच पुटपुटलो,

'च्यामारी! ही बायको म्हणजे ना, 'असता वळंबा नसता खोळंबा' असे असते. आठ दिवस झाले बायकोला माहेरी जाऊन पण घरात पाय ठेवल्यावर एक क्षणही असा गेला नाही जेव्हा तिची आठवण झाली नाही. तिकडे माहेरी भावजयीला राबराब राबवून स्वतःच्या जीभेचे चोचले पुरवून घेते आणि मला चिडवायचे म्हणून फोनवरील सर्व माध्यमांवर खमंग चर्चा करते. इकडे नवरा खिचडी नाही तर अर्धवट भाजलेल्या पोळ्या खातोय याचे तिला काही सोयर सुतक नाही. बस! स्वतःचे कोडकौतुक झाले, घरकामातून आराम मिळाला की संपले सारे! काय पण बायको आहे. बरे, जायचे तर एक- दोन दिवसांसाठी जावे ना पण नाही. एकदा गेली की, पंधरा- वीस दिवस डेरा टाकून बसते. इकडे नवऱ्याचे खाण्याचे हाल झाले तरी बेहत्तर! खाऊन पिऊन होताच वजन वाढवून परत येते. इथे माझी शरीरप्रकृती रोडावते. वर पुन्हा हसत म्हणते, काय हो,माझा विरह सहन झाला नाही वाटतं, रोड झालात म्हणून विचारते हो. हे विचारणे काळजीपोटी म्हणावे की जखमेवर मीठ चोळावे असे असावे? काय डोके फोडावे. पण एक मात्र खात्रीपूर्वक, अनुभवातून सांगतो, बाईशिवाय घराला घरपण नाही. स्वयंपाकाचे सोडा पण दोन दिवस घराला झाडूने स्पर्श केला नाही. जिकडे तिकडे धूळ नि कचरा दिसतोय. स्वच्छतेचे भारी वेड तिला. जेवायला, झोपायला उशीर झाला तरी चालेल पण घर चकाचक असलेच पाहिजे. स्वयंपाक करतानाही अगोदर माझा विचार. मला काय आवडते, काय चालत नाही हा तक्ता पाठ असल्याप्रमाणे माझ्या आवडीचा  प्रपंच करावा नेटका नि आवडता तो बायकोनेच! माझ्यासारख्या ऐऱ्यागबाळ्याचे ते काम नाही. आठ दिवसात नाकीनऊ आले आहेत. जीव मेटाकुटीला आला आहे. काही तरी अर्धवट शिजवून पोटाची आग शांत करावी लागेल नाही तर रात्रभर बायकोचा विरह आणि भुकेपोटी जागरण! दोन्ही त्रास सहन करावे लागतील. चला. आज आपणही मस्तपैकी हॉटेलमध्ये जाऊन जेऊया. एक नवीन हॉटेल निघाले आहे. काय नाव... नावात काय आहे, बायको खाऊ घालते किंवा तिच्यापेक्षा उत्तम खायला मिळाले म्हणजे झाले...' असे पुटपुटत सुजय घरातून बाहेर पडला. तसे ते हॉटेल घरापासून दूर नव्हते पण स्कुटीवर जायचा कंटाळा आला म्हणून सुजय ऑटोने निघाला. हॉटेलमध्ये पोहोचताच तिथली स्वच्छता, सुंदर परिसर त्याला भावला. जेवणही दर्जेदार आणि चवदार होते. भरपेट खाऊन सुजयने घरापर्यंतचा प्रवास पायी चालत केला. दार उघडून त्याने घरात प्रवेश केल्याबरोबर भ्रमणध्वनी वाजला. त्यावरील नाव पाहताच सुजय पुटपुटपुटला,

'आला. बाईसाहेबांचा फोन आला. आता प्रश्नावलींचा सामना करावा लागेल. दिवसभर काय केले ह्याचे कंटाळवाणे वर्णन करावे लागेल आणि तिचा आजच्या जेवणाचा मेनू ऐकावाच लागेल...'

"बोला. पत्नीदेवी, बोला? आज वहिनींकडून कोणती मेजवानी झोडली?"

"मेजवानी? तुम्हाला काय वाटते, मी इथे मेजवानी झोडायला आलीय..."

"मग कशासाठी? तुझ्या दररोजच्या पोस्ट काय दर्शवितात? खाऊनपिऊन शरीराने सुटून येशील..."

"एवढे काही खात नाही हं. उगीच काही तरी बोलू नका. आणि मी ज्या पदार्थांचे फोटो टाकते ना ते कुणाची तरी जलन व्हावी, कुणाला तरी माझा राग यावा यासाठी टाकत नाही हो..."

"माझा जळफळाट व्हावा म्हणून टाकतेस पण खातेस तर नक्कीच ना?"

"अहो, आजचे माझे स्टेटस पाहिले नाही का?"

"स्टेटस? कोणत्या स्टेटसबद्दल बोलतेस तू? दर मिनिटाला एक याप्रमाणे स्टेटस टाकतेस आणि पाहिले का म्हणून विचारतेस? कोणते आणि केव्हा टाकलेस तू स्टेटस? कशाबद्दल टाकलेस त्याचा थोडा क्लू देशील का?"

"अहो, आज दादाने की नाही बाहेर हॉटेलमध्ये जेवायला नेले होते आम्हाला?"

"का? तुझ्यासाठी विविध पदार्थ करुन वहिनी आजारी पडल्या की काय? असे तर झाले नाही ना की, तुला खायला घालताना किराणा सामान तर संपले नाही ना?"

"तसे नाही हो. तुमचं आपलं काही तरीच. तुम्हाला सांगू का, मी येणार म्हटले की, वहिनी दादाला त्यांना चार महिने पुरेल असा किराणा भरायला लावते..."

"बाप्पो रे, पण तू तो चार महिन्याचा किराणा पंधरा दिवसात फस्त करतेस की काय?"  

"बाई गं बाई! मी एवढी खादाड वाटले का तुम्हाला? बरे, एक सांगा, तुमचा आजचा मेनू काय आहे?"

"आपले हात जगन्नाथ! पण आज मीही बाहेरच जेवून आलोय..."

"काय अप्पल पोटी आहात हो. मी घरी असताना कधी हॉटेलमध्ये जेवायला जायचा विचार तुमच्या मनात येत नाही. कधीतरी खूप मागे लागले तर हॉटलचे जेवण नशिबी असते. कोणत्या हॉटेलमध्ये जाऊन आलात हो?"

"हॉटेलमध्ये नव्हतो गेलो... म्हणजे..."

"काय? हॉटेलमध्ये जेवायला गेला नव्हता तर मग कुणाकडे? कोणत्या पाहुण्याकडे किंवा मित्राकडे बारसे... तेरसे असा काही कार्यक्रम होता का?"

"नाही. ना मित्राकडे गेलो होतो, ना नातेवाईकाकडे गेलो होतो, ना परिचिताकडे..."

"म्हणजे? मग कुणाकडे गेला होता?"

"आता कसे आणि काय सांगू तुला? उगीच तुला सांगितले असे आता वाटू लागले आहे..."

"म्हणजे याचा अर्थ असा की, तुम्ही मला बऱ्याच गोष्टी सांगत नाहीत ना? खरे सांगा, कुणाकडे हादडून आलात?"

"म... म.. मी दुसरी बायको..."

"क.. क... काय? दुसरी बायको? मग पहिली कोण? अशा किती बायका आहेत? म्हणून तुम्ही माहेरी जायची कोणतीही आडकाठी न करता लगोलग परवानगी देता... आनंदाने..."

"अग..."

"एक शब्द बोलू नका. थांबा. मला इथे थांबताच येणार नाही. येतेच मी तिकडे आता..."

"ए... ए... ऐक तर खरे..." सुजय बोलत असताना बायकोने पलीकडून फोन बंद केला... नंतर सुजयने अनेकदा फोन लावला पण ना बायको फोन उचलत होती ना मेहुणा फोन उचलत होता. दुसऱ्या क्षणी सुजयच्या मनात विचार आला,

'आता संतापाचा उद्रेक झाला असेल आता काही झाले तरी बायको फोन उचलणार नाही आणि कदाचित भावालाही तशी सक्त तंबी दिली असेल. येईल सकाळी तिचा फोन. मग काढता येईल समजूत.' असे पुटपुटत सुजयने डोळे मिटले आणि काय आश्चर्य तशा परिस्थितीत त्याला चक्क झोप लागली...

   सकाळी सकाळी सुजयचा फोन वाजला त्याला जाग आली. डोळे चोळत त्याने फोनवरील नाव पाहिले. बायकोचे नाव दिसताच त्याला हसू आले नि तो स्वतःलाच म्हणाला,

'वाटलेच होते मला, आला भल्या पहाटेच बायकोचा फोन. चला. आता ऐकून घ्यावे लागेल. तितक्यात दारावरचा घंटी निनादली.

'अरे, बाप रे! इतक्या सकाळी कुणाचे काय काम अडले असेल...' असे बडबडत सुजयने दार उघडले आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसला. तो कधी हातातील फोनकडे, कधी दाराकडे आणि मधूनच दारात उभे असलेल्या बायकोकडे, मेहुण्याकडे आणि तिच्या भावजयीकडे बघत असताना एखादी तोफ कानावर धडधडावी तशी बायको कडाडली,

"सरका दारातून. पाहू द्या आत कोण आहे ते..."असे म्हणत बायको सुजयला बाजूला ढकलून दणदण पावले आपटत घरात शिरली. सुजयने प्रश्नार्थक नजरेने मेहुण्याकडे पाहिले तेव्हा त्याच्या डोळ्यात प्रचंड घृणा दिसताच त्याने त्याच्या पत्नीकडे पाहिले पण तिने झटक्याने मान हलवत नवऱ्याच्या मागोमाग घरात प्रवेश केला. 

    घराचा कोपरा न कोपरा फिरुन आल्यावर बायकोने संतापाने विचारले,

"खरे सांगा, कोण होते रात्री तुमच्यासोबत?"

"माझ्यासोबत? कोण? कुठे?"

"कोण म्हणजे? त... त... मला तर तो शब्द उच्चारावाही वाटत नाही. आणि तुम्हाला..."

"अग पण, झाले तरी काय?"

"सुजय, तिला काय विचारताय? रात्री तुम्ही जेवण कुणाकडे..."

"ते होय! दुसरी बायको..."

"किती निर्लज्जपणे बोलतायहो. दुसरी बायको म्हणताना काहीच कसे वाटत नाही. मनाचे सोडा, बायकोचे सोडा पण उद्या जनाला समजले तर समाज काय म्हणेल? किती छीः थू होईल हा तरी विचार केला का? परिचित, नातेवाईक, मित्रमंडळी आपल्याकडे एक आदर्श जोडपे म्हणून बघत असताना ही काय अवदसा आठवली तुम्हाला..." बायको बोलत असताना तिचा धागा पकडून वहिनी म्हणाली,

"अवदसा आठवली नाही तर एका अवदसेनं पछाडलय यांना. काय करुन बसलात भाऊजी हे?"

"सुजय, खरे सांगा, हे कधीपासून सुरू आहे? कोण आहे ती?"

"सारे काही सांगतो. एकूणएक गैरसमज दूर करतो..."

"म्हणजे खरे आहे तर! दादा, ऐकलेस ना? आता काय हे गैरसमज दूर करणार? दादा, मला यांच्याशी कुठलेही संबंध ठेवायचे नाहीत. मला घटस्फोट हवाय."

"अग, पण..."

"एक शब्द बोलू नका. मला तुमच्याशी बोलायची मुळीच इच्छा नाही..."

"दादा, हे बघा. आत्ता आठ वाजत आहेत. आपण सारे अकरा वाजता बाहेर जाऊ. एकदा भेटून घ्या. मी कुठे जेवलो? कोण आहे ती? सारे गैरसमज एका क्षणात दूर होतील. एक संधी तर..."सुजय बोलत असताना बायको कडाडली,

"काही भेटायचे नाही ना बघायचे नाही."

"थांब थोडे. तो काय म्हणतो ते पाहायला काय हरकत आहे? ठीक आहे, सुजय. पहिली आणि शेवटची संधी तुम्हाला..." दादा बोलत असताना बायकोने काही बोलण्याचा प्रयत्न केला पण तिला दादाने हाताच्या इशाऱ्याने थांबवले. तशी ती अनिच्छेने काही न बोलता पण तणतणत आत गेली... पाठोपाठ दादा नि वहिनीही...

   बैठकीत सुजय एकटाच बसला होता. अधूनमधून आत बघत होता आणि सोबतच घड्याळही बघत होता. त्याच्या मनात विचारांची त्सुनामी होत होती,

'काय झाले? काय करायला गेलो नि काय होऊन बसले? हे तर काहीच्या काही झाले? असे काही होईल, बायको या स्तराला जाईल असे स्वप्नातही वाटले नव्हते. दुसरी बायको...' 

    तिकडे बायकोच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. ते पाहून वहिनीलाही अश्रू आवरत नव्हते. दादाची परिस्थिती अवघड झाली होती. कुणाला समजावे? कसे समजावे? हा प्रश्न होता. ते तिघेही कधी एकमेकांकडे पाहत होते तर कधी घड्याळाकडे बघत होते...

    बरोबर अकरा वाजता सुजयची बायको तिच्या भाऊ- भावजयीसह बाहेर आली परंतु बैठकीत सुजय नव्हता. कुणी त्याला स्वयंपाक घरात पाहिले, कुणी आंघोळ करतोय का म्हणून न्हाणीघरात बघितले परंतु कुठेही सुजयचा पत्ता नव्हता.

"बघितलेस दादा, गेले ना पळून? तुला सांगते नक्कीच त्या चांडाळणीकडे गेले असणार..."

"अग, थांब. इथेच कुठे गेला असणार. येईल एवढ्यात..." दादा बोलत असताना बाहेर ऑटो थांबल्याचा आवाज आला आणि पाठोपाठ आत आलेला सुजय म्हणाला,

"चला. ऑटो आणलाय..." सुजयच्या मागोमाग सारे ऑटोत बसले. काही क्षणात ऑटो थांबला. सारे खाली उतरले. ऑटोचे पैसे देऊन सुजय पत्नीकडे बघत म्हणाला, "तुला दुसरी बायको बघायची आहे ना? बघ ती. तुझ्या स्वागतासाठी उभी आहे..." असे म्हणत सुजयने बोटाने दाखवलेल्या दिशेने सर्वांनी बघितले आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. सुजयच्या अर्धांगिनीने सुजयकडे पाहिले आणि तिने अविश्वासाने विचारले,

"म्हणजे?"

"म्हणजे काय? हीच ती... दुसरी बायको. काल इथेच आलो होतो जेवायला..." 

"काय बाई लोकांची डोके चालतात. 'दुसरी बायको' हे नाव हॉटेलला देऊन चांगलाच गोंधळ माजवला की." वहिनी म्हणाली आणि सारे हसत असताना सुजय म्हणाला,

"चला आता आत... जेवायला.... 'दुसरी बायको' या हॉटेलमध्ये..." आणि पत्नीचा हात धरून हसत सारे दुसरी बायको या हॉटेलमध्ये शिरले...



Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy