Nagesh S Shewalkar

Comedy

4.0  

Nagesh S Shewalkar

Comedy

बिंग फुटलं!

बिंग फुटलं!

6 mins
239


     महिलांना महामंडळातर्फे अर्धे तिकीट प्रवास योजना जाहीर झाली आणि महिलांना आनंदाचे भरते आले. त्या निर्णयामुळे कमालीची आनंदित झालेली यशस्विनी पतीला म्हणाली,

"अरे, यश किती छान बातमी आहे ना आणि बघ ना आज रात्रीपासूनच ही योजना सुरू होत आहे."

"हो ना. पण तुला का आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत? जशी काय तू महामंडळाच्या बसने प्रवास करणार आहेस? नेहमी बसमंडळाचा प्रवास म्हटला की नाक मुरडत नकार घंटा वाजविणारी तू, बसने जायचे नाव काढले तरी ओकाऱ्या देणारी तू आणि म्हणे किती छान बातमी आहे. स्पेशल टॅक्सीने प्रवास करणारी तू आणि तुला ही बातमी आवडते म्हणजे आश्चर्यच आहे."

"ऐक ना, तुला एक गोष्ट सांगायची राहून गेली म्हणजे उद्या सकाळी सांगून आश्चर्याचा धक्का द्यावा म्हणून सांगितले नाही. काय झाले शिल्लक असलेल्या तीन सुट्ट्या मी मागितल्या साहेब मान्य करणार नाहीत याची खात्री होती. वर्ष संपत आलंय म्हटलं खडा टाकून पाहावा म्हणून अर्ज केला आणि आश्चर्य म्हणजे खडूस साहेबांनी लगेच मान्य केल्या. मी साहेबांकडे आश्चर्याने बघत असताना ते म्हणाले, असं बघतेस काय? विश्वास नाही बसत आह का? शिल्लक सुट्ट्या हा आपला हक्क असतो. महत्त्वाचे म्हणजे तू खूप काम करतेस, तुझ्याकडे पेंडिंग नसतेच. आताही मी बघितले तुझ्या हातावर किंवा हातावेगळी करण्यासाठी एकही पंजिका नाही. म्हणून मान्य केली. जा. एन्जॉय युवर सेल्फ..."

"अग, ही तर खूप मोठी पावती आहे. अधिकाऱ्याने अशी स्तुती करणं म्हणजे एक प्रकारचे बक्षीसच असते. अभी पार्टी बनती है, बॉस! अं..हं.. पार्टी तू नाही मी देणार..."

"अरे व्वा! हा डबल धमाका आहे तर साहेबांकडून सुट्टी नि पतिकडून पार्टी! ऐक ना, योगायोग किती छान आलाय ना. असे करते आज रात्री बारा वाजता आईकडे जाते..."

"फर्स्ट डे फर्स्ट शो? अगं, म्हणजे योजना बाराच्या ठोक्याला सुरु होईल नि मग बायकांचे जत्थेच्या जत्थे बसस्थानकावर येतील. तशी अनेक महिलांची पावलं बसस्थानकाची वाट चालू लागली असतील. बसमध्ये बसायला सोड पाय ठेवायला जागा मिळणार नाही तुला. "

"होय. ते सारे बरोबर आहे रे. बघ ना, सुट्टी दिलीच आहे तर जाऊ दे ना. किती वर्षे झाली मी निवांत अशी आईकडे गेलीच नाही रे. नेहमी आपलं शनिवारी सकाळी निघा आणि रविवारी सायंकाळी परत फिरा..."

"या चिमण्यांनो परत फिरा रे

या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे आपुल्या

जाहल्या तिन्ही सांजा...

असं असतं नेहमी. तू म्हणतो तसा बसचा प्रवास करणं जीवावर येतं माझ्या पण एखादे वेळी... जस्ट ए चेंज! काही हरकत नाही. शिवाय ती गर्दी, ती धक्काबुक्की, ती लोटलोटी आणि मग जागा मिळणे त्यातही एक थ्रील असते रे..."

"बाईसाहेब, ते थ्रील अंगावर येण्याची शक्यताही आहे बरे. कसे आहे, मी सोबत नसणार तेव्हा तुला एकटीला पाहून..."

"एकटी? अरे, बायकांचा लोंढा असेल लोंढा! इतक्या बायकांमध्ये असलेल्या एखाद- दुसऱ्या पुरुषाची काय बिशाद आहे? त्याला स्वतःलाच सांभाळता सांभाळता नाकीनऊ येतील. हे बघ आणि तू मला उगीच घाबरवू नकोस हं. आजची महिला अबला नसून सबला आहे. ओके. मी तयारीला लागते..." असे म्हणत यशस्विनी तयारीला लागली आणि यश तिची तयारी पाहत बसला...

     रात्री साडे अकराच्या सुमारास यश-यशस्वीनी दोघं बसस्थानकावर पोहोचले. पाहतात तर काय... तोबा गर्दी! तीही महिलांची! यशस्वीनी यशला म्हणाली,

"यश, तू घरी जायला हरकत नाही..."

"नाही. नाही. मी तुला बसमध्ये बसवूनच घरी जाईल. चल..." यश म्हणाला आणि ती दोघे प्लॅटफॉर्मवर आली. तिथं तुफान गर्दी होती. तितक्यात एक अनाउंसमेंट झाली. प्रचंड मोठा आवाज असल्याने बरोबर ऐकू येत नव्हता पण दोन तीन वेळा त्या चिरक्या आवाजाचा संदर्भ लागला. 'महिलांसाठी अर्धे तिकीट योजना संदर्भात अजून आदेश मिळाले नसल्यामुळे महिलांना या नवीन योजनेचा सध्या तरी लाभ मिळणार नाही...' ते ऐकून प्रचंड गोंधळ उडाला. बायकांनी वाहतूक नियंत्रक कक्षासमोर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आणि घोषणाबाजी करायला सुरुवात केली. उपस्थित असणाऱ्या पोलिसांची तोकडी तुकडी पाहण्याशिवाय आणि स्वतःची उपस्थिती दर्शविण्याशिवाय काहीही करु शकत नव्हती. योजनेचा लाभ घेण्यासाठी जमलेल्या वर्तमानपत्र, वाहिन्यांच्या प्रतिनिधींनी ताबडतोब आपापल्या वरिष्ठांना फोनवर माहिती दिली. सर्वत्र बातम्या दाखवण्यात येऊ लागल्या. बसस्थानकावरील महिलांचा गोंधळ वाढतच होता. बातम्यांची दखल शासनाने घेतली आणि ताबडतोब विविध माध्यमातून महामंडळाच्या अधिकाऱ्यांपर्यंत आदेश पाठविण्यात येताच लगोलग बसस्थानकावर तशा सूचना घोषणा घुमू लागल्या आणि महिलांच्या आनंदोत्सवाने बसस्थानक दुमदुमून गेले...

  भरपूर प्रतिक्षा केल्यानंतर एकदाची बस लागली... बस मागे मागे येत असताना अनेक महिलांनी बसमध्ये चढायला सुरुवात केली. बस प्लॅटफॉर्मवर थांबली नि इतर महिलांप्रमाणे यशस्विनीनेही धक्काबुक्की, रेटारेटी करत बसमध्ये प्रवेश केला. पाहते तर बसायला तर सोडा पण उभं राहायला ही जागा नव्हती. यशस्विनी अक्षरशः एका पायावर उभी राहिली. तशात काही उत्साही महिलांनी वाहक नि चालक यांचा शाल देऊन, हार घालून सत्कार केला. बस सुरू झाली आणि एक नवीनच प्रकार उघडकीस येऊ लागला. कुणाचे मंगळसूत्र, कुणाच्या बांगड्या, कुणाच्या अंगठ्या, कुणाचे कानातले तर कुणाची पर्स चोरट्यांनी पळविली होती. सर्वत्र हाहाकार माजला. तितक्यात अजून एक संसर्गजन्य रोग सुरू झाला. त्या रोगाची सुरुवात कुठून झाली, कुण्या बाईने केली समजायला मार्ग नव्हता पण तो आजार सर्वत्र पसरला आणि एकामागून एक अनेक बायका ओकत सुटल्या. बसमध्ये जिकडेतिकडे घाणी साम्राज्य पसरले. कर्मधर्मसंयोगाने यशस्वीनी उभी होती तो परिसर तसा स्वच्छ होता. त्या रोगाची लागण तिकडे सुरू झाली नव्हती.

   हातातील पर्स, बॅग सांभाळत उभ्या असलेल्या यशस्विनीच्या हाताला कुणी तरी स्पर्श केला. तिने पाहिले. तशी शेजारच्या आसनावर बसलेली ती तरुणी थोडं पुढे सरकत म्हणाली,

"बस. करुया ॲडजेस्ट..."

"थॅंक्यू..." म्हणत यशस्विनी तिच्या बाजूला टेकली. तिला जाणवले की, त्या तरूणीचा आवाज काहीसा वेगळा वाटला. परंतु मनातील शंका आत दाबत ती त्या तरुणीच्या बाजूला बसली. काही क्षणानंतर तिने बाजूला पाहिले. ती चाळीशी ओलांडलेली महिला होती. यशस्विनी बसली खरी पण तिला काही तरी वेगळे जाणवत होते. त्या तरुणीची चुळबूळ वेगळेच काहीतरी दर्शवत होती. कार्यालयात जाता-येता यशस्विनीला वेगवेगळ्या स्पर्शाची जाणीव होत असे... विशेषतः पुरुषी स्पर्शांचा तिला चांगलाच परिचय झाला होता. शेजारच्या तरुणीचा स्पर्श यशस्विनीला अस्वस्थ, बेचैन करत होता. अनेकदा तिला उठून उभे राहावे असे वाटत होते परंतु आपले काही तरी चुकतेय असे स्वतःला मनोमन बजावत यशस्विनी वारंवार सावरून बसू लागली. जागे अभावी चिकटून बसलेली असूनही त्या स्त्रीपासून अंतर राखण्याचा प्रयत्न करू लागली. काही क्षणातच त्या शेजारणीचा हात वेगळीकडेच सरकत असल्याचे जाणवताच यशस्विनीने दचकून तिच्याकडे पाहिले. तेव्हा तिच्या चेहऱ्यावर फुललेलं केविलवाणे, अगतिक हसू यशस्विनीला बेशरमपणाचे भासलं. तिला वाटलं उठून उभे राहावं पण दुसऱ्या क्षणी विचार आला, इतका दुरचा प्रवास तोही रात्रीचा महाकठीण! बसमधील दिव्याच्या प्रकाशात तरुणीचा चेहरा वेगळाच वाटला... म्हणजे ती तरूणी गोरीपान होती. नाकीडोळी देखणी होती.... तरीही का कोण जाणे यशस्विनीला ती सुकुमार तरुणासारखी वाटत होती! पुन्हा मनात शिरलेला विचार तिने अंगावर बसलेल्या किड्याप्रमाणे झटकून टाकला...

     बसमधील दिवे बंद झाले आणि... आणि... काही क्षणातच यशस्विनी जोरात ओरडली. तशी वाहकाने घंटी वाजवली चालकाने बसचा वेग कमी केला आणि दिवे लावले.

"कोण ओरडले... आता काय झाले? एक वेळ शंभर पुरुष प्रवासी परवडतील पण दहा बायका एकत्र आल्या म्हणजे... एकतर सगळी बस घाण करून टाकलीय आणि आता काय नवीन? बाथरूमला जायचे असेल तर अर्धा तास कळ सोसा. जेवण्यासाठी आपण थांबणार आहोत. तिथे घ्या उरकून..." असे म्हणत वाहकाची शोधक दृष्टी सर्वत्र फिरत असताना यशस्विनी म्हणाली,

"म.. म.. मी... ही तरुणी नाही आहे. हा.. हे.. दुष्ट पोट्ट आहे..."

"क... क... काय? कोण तरुणी नाही, तुम्ही की अजून कुणी?" वाहकासोबत अनेक आवाज आले. काही जण हसतही सुटले. सारे उठून तिकडे बघत असताना यशस्विनी म्हणाली,

"होय! अर्ध्या तिकिटाची सवलत मिळावी आणि मग एखाद्या तरुणीला जवळ बसवून मजाही मारता यावी म्हणून... ही... ही... तरुणी नाही तर मुलीच्या वेशातील पोट्टा आहे... वेगळेच चाळे करत आहे." असे म्हणत तिने त्याच्या डोक्यावरचा केसांचा टोप ओढला आणि त्या तरुणाचं स्वार्थी नि घाणेरडं बिंग फुटलं. बायकांनी त्याला हातात पडेल त्याने बदडायला सुरूवात केली. परंतु आपला मार त्यालाच बसतोय की इतर कुणाला याचीही कुणीच दक्षता घेतली नाही. दुसरीकडे बसमध्ये असणाऱ्या दोन- चार तरूणांनी आणि अनेक तरुणींनी ती धम्माल भ्रमणध्वनीवर चित्रित करायला सुरूवात केली. मात्र चालकाने बस थांबवून रस्त्याच्या दोन्ही बाजूला जंगल बघून त्या लांडग्याला उतरवून लावले...

     दुसरे दिवशी सकाळी यशस्वीनी ऑटो करून आईच्या घरी पोहोचली. दारावरची घंटी वाजवताच काही क्षणातच दार तिच्या भावाने उघडले. तिच्याकडे आश्चर्याने पाहणाऱ्या भावाला ती आनंदाने म्हणाली, "अरे, पाहतोय का? सरप्राईज! कसे वाटले?"

"तायडू, सरप्राईज छानच असते आणि आज तर माझ्यासाठी फारच उपयुक्त आहे. थँक्स..."

"थँक्स? कशासाठी? आई कुठे आहे? मला वाटले तीच दार उघडेल. बरे नाही का तिला?" आत येत यशस्वीनीने विचारले.

"ठणठणीत आहे म्हणून तर चार दिवस तीर्थयात्रेला गेली आहे... महामंडळाच्या अर्ध्या तिकिटाचा लाभ घ्यावा म्हणून..."

"आणि वहिनी?" यशस्वीनीने वेगळ्याच शंकेने विचारले.

"ती गेली उडत! म्हणजे तीही रात्रीच माहेरी गेलीय. आठवडाभर येणार नाही. बरे, झाले तू आलीस ते माझ्या खाण्यापिण्याचा प्रश्न मिटला..." भाऊ म्हणत असताना यशस्वीनी सोफ्यावर बसली... धाडकन!

                   ००००


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy