Pandit Warade

Tragedy Classics Inspirational

4.0  

Pandit Warade

Tragedy Classics Inspirational

घुसमट-९ (मुकी बिचारी)

घुसमट-९ (मुकी बिचारी)

7 mins
199


घुसमट-९ (मुकी बिचारी)

  

   श्रमसाफल्य ही छोटेखानी इमारत एखाद्या नव्या नवरीगत सजून उभी होती. रंगीबेरंगी दिव्यांच्या माळा तिच्या अंगभर झगमगाट करत होत्या. माणसाची वर्दळ सुरू होती. हॉल मध्ये होम पेटवून तिथे अकरा पुरोहित वास्तुपुजा करत होते. ते म्हणत असलेल्या मंत्रांचा आणि 'स्वाsहा स्वाsहा' चा आवाज अधून मधून घुमत होता. दुसरीकडे अतिथींची लगबग सुरू होती. समोर अंगणात चटया अंथरून पाहुण्यांना जेवायला बसवले जात होते. यज्ञाकुंडा जवळ बसलेली यजमान जोडी मात्र विचारात गढून गेलेली दिसत होती. मागच्या सर्व घटना त्यांच्या डोळ्या समोरून एखाद्या चलचित्रा प्रमाणे सरकत होत्या.


   "अहो, ऐकताय का? आपलं छोटंसं घर बांधुया का एखादं?" पत्नीच्या या लडिवाळ प्रश्नानं दिगंबर एकदम दचकलाच होता.  


   घरभाड्याचे पैसे भरता भरता नाकी दम येणारा, एक अकुशल कामगार असणारा दिगंबर घराचे स्वप्नही पाहू शकत नव्हता. दररोज एकशे पन्नास रुपये मिळवणारा दिगंबर महिन्यात चाळीस पंचेचाळीस दिवस काम करायचा. तेव्हा कुठं सहा साडेसहा हजार रुपये महिन्या काठी हातात पडायचे. पंधराशे रुपये घरभाडे जायचे. उरलेल्यात दोन लेकरं आणि पत्नी संजनाचं पोट त्याला भरावं लागायचं. त्यातून कधी दवाखाना करावा लागल्यास त्याची तोंड मिळवणी करणे कठीण व्हायचं. अशा स्थितीत तो स्वतःच्या घराचा विचार करणारच कसा? तरी बरं पत्नी संजना अतिशय काटकसरी बाई. स्वतःच्या जेवणाकडे, कपड्यांकडे लक्ष न देता ती शक्य तितक्या कमी पैशात घर चालवायची आणि कधी तरी शे दोनशे रुपये दवाखाना किंवा अशा अवांतर खर्चासाठी ती दिगंबरलाही द्यायची. तिच्या अशा वागण्याचा दिगंबरला फार अभिमान वाटायचा. स्वतःला तो खूप भाग्यशाली समजायचा. 


   एकदा मुलगी आजारी पडली तेव्हा दवाखान्याचा खर्च भागवण्या साठी दिगंबरने मालकाकडे आगाऊ पगाराची मागणी केली. परंतु मालकाने ती फेटाळली. हताश झालेल्या दिगंबरला संजनाने दिलासा दिला. गल्लीतल्या एका सधन कुटुंबातल्या सुशीला बाई कडून व्याजाने रुपये दोन हजार काढून दिले. दोन रुपये शेकड्या प्रमाणे चार महिन्यात ते परत करायचे होते. व्याजाने पैसे काढणे याच्या तत्वात बसत नसतांनाही घ्यावे लागले. परिस्थितीच्या रेट्याने त्याला कर्जबाजारी बनायला भाग पाडले होते. दवाखान्याचे काम तर भागले, पण दिगंबर समोर दर महिन्याला परत फेडी साठी जास्तीचे काम करणे भाग झाले. तो जास्तीचे काम करायला लागला. दर महा सहाशे रुपये तो संजना जवळ देऊ लागला. तिसऱ्या महिन्यात मात्र घोळ झाला. दिगंबर कपनीच्या कामासाठी बाहेर आला होता. जवळ पैसे असल्या कारणाने सुशीला बाईचे पैसे देण्यासाठी तो घरी आला. संजना आणि सुशीलाबाई कुठे तरी बाहेर गेलेली होती. म्हणून त्याने ते सहाशे रुपये तिच्या नवऱ्याजवळ, सुभानराव जवळ दिले. 


   "कसले पैसे?" सुभानरावने विचारले.


   "तुमच्या पत्नीकडून व्याजाने घेतले होते." दिगंबरने उत्तर दिले.


   "अस्सं?"आश्चर्यचकित होत सुभानरावने विचारले.


   "हो. दोन महिन्यांपूर्वी माझी मुलगी आजारी होती तेव्हा घेतले होते." त्याने स्पष्टीकरण दिले.


   "अस्सं होय! ठीक आहे. मी सांगतो तिला. बसा ना. चहा घेऊ थोडा थोडा." सुभानराव म्हणाले.


   "नाही, नको! मला कामावर जायला पाहिजे लवकरच मालक रागावेल नाहीतर. कंपनीच्या कामानिमित्तच बाहेर आलेलो होतो. म्हटलं कामांत काम करून टाकावं." असं म्हणत त्याने ते पैसे दिले. 


   "बरं! बरं! अजून राहिलेत का काही पैसे अजून? असतील तर तेही माझ्या कडेच द्या हं!"

 

   "हो अजून एक हप्ता राहिलाय. पुढच्या महिन्यात मी आणून देईन. मात्र तेवढं सुशीला बाईंना सांगा हं!" लगेच तो तिथून निघून गेला. 


   दिगंबर निघून गेला पण शेजाऱ्याच्या घरात कलहाची ठिणगी टाकून गेला. सरळ मनाच्या दिगंबरला काय माहित की हे पैसे त्याच्याच पत्नीने त्या बाई जवळ ठेवायला दिले आहेत? किंवा त्या बाईने तिच्या नवऱ्याच्या माघारी ते पैसे व्याजाने आपल्याला दिले आहेत? तो निघून गेला. इकडे सुभानराव मात्र विचार करत बसले, 


   'आपण आपल्या लाडक्या पत्नीला हौस मौज म्हणून थोडे फार पैसे देतो. तर ती प्रत्येक वेळेला जास्तच मागत असते. आपल्या पैशावर ही स्वतःचे मोठेपण गाजवते तर? अरे व्वा! हा काय न्याय झाला? मी मरमर काम करायचं अन् मोठेपणा हिने मिरवायचा? येऊ दे घरी. दाखवतोच जरासा हिसका.'


   थोड्या वेळाने सुशीला आणि संजना घरी आल्या. दोघी आपापल्या कामाला लागल्या. सुभानरावने सुशीला बाईला आवाज दिला, 


   "सुशीला, जरा इकडं ये." आवाजात जरब होती. घाई घाईने सुशीला बैठकीत आली. 


   "काय म्हणता? काही हवंय का?" तिने विचारले. 


   "हो! एक उत्तर हवंय." सुभानराव आवाजात जरब दाखवतच बोलले.


   "उत्तर? कसलं उत्तर?" काहीच न समजल्या मुळे सुशीला बाईने विचारले.


   "दिगंबर आला होता. तुला काही पैसे द्यायचे म्हणत होता." सुभानरावच्या या उत्तरावर सुशीला बाई दचकलीच. 


   "कसले पैसे घेतेस त्याच्या कडून? कशासाठी देतो तो तुला पैसे? काय चाललं काय या घरात?" सुभानरावचा आवाज वाढायला लागला तशी सुशीला बाई बावरली, 'म्हणजे हा आपल्यावर संशय घेतो की काय?' स्वतःला सावरत सुशीला बाई नवऱ्याला म्हणाली,


   "अहो, ते होय? ते पैसे संजना बाईचेच आहेत. माझ्या कडे ठेवायला दिले होते. तुम्ही नवरे लोकं सहज पैसे देत नाहीत, अन् घरात काही छोटीमोठी अडचण आली तर घरातल्या बाईलाच निपटावी लागते. म्हणून आम्ही बायका असे व्यवहार करत असतो." सुशीलबाईचे स्पष्टीकरण.


   "म्हणजे हे पैसे माझ्याच खिशातून काढलेले आहेत म्हणा की?" सुभानराव हसत म्हणाले.


   "नाही हो. ते पैसे खरंच संजना बाईचेच आहेत. तुमचे, माझेही नाहीत." सुशीला बाई म्हणाली.


   "ते काही सांगू नकोस. मी दरमहा पैसे देतो. ते तू असे वापरतेस होय? या नंतर माझ्या कडे पैसे मागायचे नाही. तुला लागत असतील तर तुझ्या बापाकडून घेऊन यायचेस. समजलं?" 


  'सुभानरावला समजावणे कठीण आहे.' असा विचार करत सुशीला बाईने मौन राहणेच पसंत केले. 'आता संजना बाईच्या पैशाचे काय करावे? तिला आता काय सांगावे?' असा मोठा यक्षप्रश्न तिच्या समोर उभा राहिला होता. संध्याकाळी थोडासा निवांत वेळ काढून सुशीला बाईने संजनाची भेट घेतली. घडलेली हकीकत सविस्तरपणे सांगितली. 'आता हा आणि यापुढचा हप्ताही आपल्या हाती पडणार नाही. आपण जास्तच ओढाताण करायचा प्रयत्न केला, गवगवा केला तर माझा नवरा मलाच घराबाहेर काढायला कमी करणार नाही' हेही सांगितले. 


   दोन हजार रुपयांचे दोन हजार चारशे बनवायला निघालेली संजना आठशे रुपयांचा तोटा सहन करून बसली. पोटाला चिमटा घेऊन वाचवलेल्या आठशे रुपयांवर पाणी सोडतांना झालेल्या यातना तिच्या तिलाच माहीत. 


   या घटने पासून घ्यायला पाहिजे होता तो धडा संजनाने घेतलाच नाही. किंवा तिच्या स्वभावात बदल झालाच नाही असे म्हणायला काही हरकत नाही. सुशीलबाईच्या प्रकरणाची सारवासारव करून पुन्हा, 'ये रे माझ्या मागल्या' सुरूच राहिले. मात्र यावेळेस तिने थोडी सावधानता बाळगली, तिने आपल्या अतिविश्वासातल्या माणसांकडे पैसे जमा करायला सुरुवात केली.

तिने तिच्या बहिणीला आणि मेहुण्याला जवळ केले. दर महिन्याला थोडे थोडे करत ती पैसे जमा करत राहिली. बहिणीने अन् मेहुण्यानेही थोड्या फार पैशाला चाटच दिली. मग तिने ते पैसे तिथून काढले आणि सरळ आपल्या वडिलांकडे एक गाय घेऊन सांभाळायला दिली. भाऊ, वडील तिची गाय सांभाळू लागले. गायीची दुसरी गाय झाली, दोन बैल झाले. भाऊ, वडील कधी तरी थोडे फार धान्य, डाळी द्यायला लागले. ते कशातून देतात हे केवळ संजनालाच माहीत होते. ते काही फुकट देत नव्हते तर तिच्या गायीच्या उत्पन्नातून देत होते. परंतु दिगंबरला आपल्या परिस्थितीला हातभार लावणारे सासरे म्हणून त्यांचा अभिमान वाटू लागला. आणि अशातच संजनाला वाटले. आपल्या गायी पासून बरेच उत्पन्न वाढले आहे. गाय, तिची दुसरी गाय, बैल हे विकून आपण आपल्या घरा पुरते पैसे जमा करू शकतो. म्हणून तिने दिगंबर जवळ घराचा विषय काढला होता. 


   दिगंबरलाही घर बांधावे वाटत होते परंतु पैशाचे सोंग आणता येत नाही ना. म्हणून तो चूप बसत होता. पण आज जेव्हा संजनाने तो विषय काढला, त्याचीही स्वतःच्या घराची अंतरेच्छा प्रबळ झाली. त्याला खात्री होती, मागच्या वेळेस सारखा एखादा जण नक्कीच संजना करणार असेल. हिने नक्कीच कुठे तरी पैसे जमा करून ठेवले असतील. आणि म्हणूनच ती आपल्या जवळ विषय काढते आहे. त्यानेही त्या दृष्टीने विचार करायला सुरुवात केली. गेल्या पाच वर्षांपासून तो पर्मनंट झाला होता. त्याचा पगारही बऱ्यापैकी वाढला होता. त्यातून तोही संजनाकडून प्रेरणा घेऊन कंपनीतल्या सोसायटीत दरमहा ठराविक रक्कम जमा करायला लागला होता. 


   "अगं, पण आपल्या जवळ पैसे नाहीत. जेमतेम पोटापुरतं मिळतं, कस तरी भागतं. कसं करायचं?" 


   "अहो, तुम्ही कंपनीतून थोडे फार बघा, मी माझ्या बापाकडून आणते थोडे फार. होऊन जाईल कसं तरी." संजनाने उभारी दिली.


   'बापाकडून थोडेफार आणते' असं जेव्हा संजना म्हणाली, तेव्हा हिचेच पैसे बापाकडे असतील याची त्याला खात्री पटली होती. 


   त्यांच्या घराचे बांधकाम सुरू झाले. दिगंबरने कंपनीतल्या सोसायटीतून कर्ज काढले. त्याच्या काही मित्रांनीही त्याला मदत केली. घराचे ठोक काम बऱ्याच अंशी पूर्ण होत आले. फरशी, किचन ओटा, रॅक आणि असेच काही चिल्लर कामं बाकी राहिली. पैसे कमी पडू लागले, तेव्हा संजना बापाकडे गेली. मात्र बापाने अन् भावाने तिला पूर्णपणे उडवून लावले. 'पैसेच नाहीत कुठून द्यावे?' म्हणाले. 


   "मी काही भीक मागत नाही. माझ्या दोन्ही गायींचे, बैलाचे पैसे मला द्या. तुमचा एक पैसाही मला नको आहे." तिने रडत रडत बाप जवळ मागणी केली.


   "तू गाय घेऊन दिली हे कबूल आहे. पण तिला खर्च कमी येतो का? दरवर्षी चारापाणी, औषध, सांभाळणी किती खर्च करावा लागतो. म्हणून आम्ही आमच्या दावणीला जनावरं सांभाळत नव्हतो. तुला नाही म्हणता आले नाही. ती सांभाळून आम्हीच तोट्यात आलोय. उगाच तीनदा त्या गायीचा विषय काढू नकोस. तिचं काहीच मिळणार नाही. पाहिजे असेल तर तुझी गाय तू घेऊन जा." भावाने ठणकावून सांगितले. 


   भावाच्या या वक्तव्यावर तिला रडूच कोसळले. तिच्या डोळ्यातले अश्रू बघून बापाच्या हृदयात कालवा कालव झाली. परंतु मुलाच्या पुढं बापाला बोलता आलं नाही. तरीही बापाने मदत म्हणून थोडे पैसे द्यायचे कबूल केले, मात्र संजनाने ते नाकारले आणि रडत पडतच ती निघून आली. 'नवऱ्याला काय सांगावं?' तिला काही सुचत नव्हतं. मात्र दिगंबरला थोडीफार कल्पना होतीच. पैसा नात्यात बिघाड आणतो, स्वार्थ नाती गोती विसरायला लावतो. हे त्याने वाचले होते, जाणले होते. म्हणून त्याने सासरवाडीहून पैसे मिळण्याची आशा सोडून दिलेली होती. त्याच्या काही प्रेमळ मित्रांनी त्याला मदत केली. आणि आज ते घरकुल थाटात सजून उभे राहिले होते. नवऱ्याच्या प्रेमळ मित्रमंडळींच्या मदती मुळे संजना दिपून गेली होती. भाऊ आणि वडिलांचा रुक्ष व्यवहार मात्र तिला दुःख देत होता. अशा आनंद प्रसंगीही तिला ती आठवण बोचत होती.



Rate this content
Log in