Pandit Warade

Drama Romance

3.3  

Pandit Warade

Drama Romance

मी अनुभवलेला पाऊस

मी अनुभवलेला पाऊस

6 mins
255


   साधारण १९८०-८१ चा काळ असेल. पंकजचे नुकतेच म्हणजे शिक्षण सुरू असतांनाच लग्न झाले होते. नुकतेच म्हणजे तरी तीन वर्षे त्याच्या लग्नाला झालेले होते लग्नाला. पण उच्च शिक्षणाचे उच्च ध्येय समोर असल्या मुळे तीन वर्षांचे सक्तीचे ब्रह्मचर्य त्याने पाळले होते. तो काळ म्हणजे लग्नाच्या मुलामुलींचा विचार घेण्याचा काळ नव्हता. आई वडिलांना वाटले लग्न करून द्यावं तर द्यायचे करून लग्न. पहिली रात्र वगैरे या गोष्टी केवळ सिनेमातच. लग्न झाल्यावर सुद्धा घरात एकत्र येणे काय बोलणे सुद्धा कठीणच. पंकज थोडाच याला अपवाद असणार? आई वडिलांच्या उतार वयात झालेले शेंडेफळ म्हणजे पंकज. वडील लवकरच म्हातारे झालेले. त्यात त्यांना उतार वयातील आजारांनी ग्रासलेले. अशात जवळच्याच नात्यातले आलेले सोयरपण. त्यांना _'आपल्या डोळ्यासमोर पंकजचे लग्न व्हावे'_ असे वाटणे साहजिकच होते. त्यांच्या इच्छेखातर लग्न ठरवल्या गेले. पंकजला केवळ कॉलेजच्या उन्हाळी सुटीविषयी विचारणा झाली. त्याने सुटी कधी लागते ते सांगितले आणि त्या सुटीतला एक मुहूर्त काढला गेला. अशा पद्धतीने पंकजचे लग्न पार पडले आणि सुनंदाच्या रूपाने एक अडथळा त्याच्या शिक्षणाच्या मार्गात उभा राहिला. 


   शिक्षण घेत असतांना पत्नीचा अडसर ठरू नये म्हणून त्याने एक छोटीशी नोकरी स्वीकारली होती. तसेच सुनंदाच्या माहेरहून सुद्धा काळजी घेतली जात होती. शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांना एकत्र यायला जमणार नाही. याची पूर्ण काळजी घेतली जात होती. कधी काळी तो सुटीवर आलाच तर सुनंदाला माहेरी नेले जात होते.


  पंकजचे शिक्षण पूर्ण झाले. तो पदवीधर झाला. नोकरीमध्येही त्याला योग्य अशी बढती मिळाली. बढतीचा आनंद घेण्यासाठी त्याला आठ दिवसांची सुटी उपलब्ध करून देण्यात आली होती. म्हणून तो गावी आला होता. आल्यावर लगेच त्याला एक निरोप मिळाला, त्याच्या भावाच्या सासुरवाडीला आमरस जेवण्या साठी बोलावले होते. 'ठीक आहे सकाळी जातो.' असे त्याने सांगितले. आणि सर्वजण जेवायला बसणार एवढ्यात त्याचे सासरेबुवा तेथे आले. त्यांच्या सहित सर्वजण जेवायला बसले. रात्री उशिरा पर्यंत त्यांच्या गप्पा सुरु होत्या. सासरे बुवा आलेले असल्या मुळे पंकज सुनंदाला एकत्र यायला काय बोलायला सुद्धा एकांत वेळ मिळाला नाही. सकाळी उठल्यावर पंकज भावाच्या सासुरवाडीला जायला निघाला. चांगले वीस किलोमीटर जायचे होते, तेही पायीच. 


  पंकज सासुरवाडीला पोहोचला. खूप दिवसा नंतर आला म्हणून त्याचे जोरदार स्वागत झाले. आमरसाचा पाहुणचार झाला. थोडा वेळ गप्पा झाल्या. आराम झाला. आणि पंकजने परत जायचे सांगितले. सर्वांनी त्याला आजच्या दिवस थांबण्या साठी आग्रहपूर्वक विनंती केली. परंतु नाही, हो करता करता पंकज परत जाण्या साठी निघालाच. साधारणतः दुपारचे साडेतीन वाजले असतील. तासाभरात घरी जाता येईल असे गणित त्याच्या मनात होते. शेतात काम करायला गेलेल्या सुनंदा सोबत बोलायला तरी वेळ मिळेल या विचाराने तो झपाट्याने चालत होता. पाच सहा किलोमीटर चालला असेल नसेल तोच अचानकच वातावरणात बदल व्हायला लागला. चहूकडे अंधारून आलं. खूप वादळी वारा सुरू झाला. मोठ मोठ्या झाडांच्या लवचिक फांद्या जमिनीला टेकू लागल्या तर न वाकणाऱ्या कठीण फांद्या काडकाड मोडू लागल्या. चालणे कठीण झाले. एक पाऊल पुढे तर दोन पावले मागे असे व्हायला लागले. वाऱ्याच्या तुफाना बरोबरच निसर्गाचे संगीतही सुरू झाले. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या थयथयाटा सोबतच पावसाच्या टपोऱ्या थेंबांचे तांडव नृत्य सुरू झाले. अशा पावसात झाडा खाली थांबणे धोक्याचे असते, हे त्याने वडीलधाऱ्यां कडून ऐकलेले होते. त्यामुळे नि सुनंदाच्या भेटीच्या ओढीने तो सतत चालत होता. 


  तेवढ्यात समोरून एक वृद्ध स्त्री आणि एक किशोर वयीन मुलगा चालत येतांना दिसले. बहुतेक तिचा नातू असावा. तिच्या हातात छत्री असूनही जोराच्या वाऱ्या मुळे ती उघडलेली नव्हती. पंकज जवळ आल्यावर तिने त्याला थांबवले.


   "बाळा, एवढ्या पावसात कुठं जातूस? उलीसा थांब या झाडाखाली." ती पंकजला म्हणाली.  


  'अरे! ही तर आपली सखू आजी!' पंकज मनात म्हणाला. "सखू आजी कुठं चाललीस एवढ्या मोठ्या पावसात?" पंकजने विचारले. 


  "बाळा, माह्यराला चालले." सखू आजीचं उत्तर.


  "एवढ्या म्हातार पणात कशाला पाहिजे माहेर? गपगुमान आपल्या घरी रहायचं, खायचं प्यायचं अन् आराम करायचा."


  "आरं, मव्हा भाचा बिमार हाय. त्येला पाह्याला चालली व्हती पर ह्यो पाऊस कसा आडमुठ्यावणी करून राह्यलाय पाह्य बरं. कसं जाणं व्हईल त्ये व्हवो देव जाणे." असं म्हणत सखू आजीने वर आकाशाकडे बघून हात जोडले.


  "ही घ्या आजी छत्री. मी जातो आता." इति पंकज.


   "आरं, बाळा थांब उलीसा. एवढ्या पाण्यात नको जाऊ. त्यो काय असाच ऱ्हातो व्हय? व्हईल कमी." 


   वडीलधाऱ्या व्यक्तीचं ऐकलं पाहिजे म्हणून तो तसाच त्यांच्या अंगावर छत्री धरून उभा राहिला. बराच वेळ पाऊस सुरूच होता. पंकज अस्वस्थ होऊन पाऊस उघडण्याची वाट पहात होता. जीवाची तगमग होत होती. शेवटी न राहवून तो म्हणाला,


   "मला उशीर होतोय. मला आता गेलंच पाहिजे". उघडलेली छत्री सखू आजीच्या हातात देत पंकज म्हणाला आणि निघाला सुद्धा. सखू आजी आणि तिचा नातू सुद्धा त्यांच्या रस्त्याने निघाले. तोवर दिवस मावळतीला निघालेला होता. अंधार व्हायच्या आत घरी पोहचायला पाहीजे म्हणून पंकजने चालायची गती वाढवली होती. रस्त्याने पाणीच पाणी झालेले होते. पाऊस अजूनही सुरूच होता. चांगल्या रस्त्याने काही नाही पण पुढचा रस्ता खोल अशा पांदीचा होता. म्हणजे नालाच म्हणा की. त्या नाल्याला गुडघ्याच्या वर पाणी वाहत होते. तेवढ्या पाण्यातून जाणे भाग होते. पंकजने आपली लांब पॅन्ट मांड्या पर्यंत वर खोचून घेतली. पायातील बूट काढून हातात घेतला आणि त्या पाण्यातून चालायला लागला. 


  तो उन्हाळ्यातील पहिलाच वादळी पाऊस असल्या मुळे त्या पाण्यात आराट्या, बोराट्यांच्या काट्या वाहत येत होत्या. त्या पायाला अडकत होत्या परंतु तशाही स्थितीत पंकज चालतच होता. समोर एक मोठा ओढा लागला, तो फुल्ल भरून वाहत होता. आता थांबणेच भाग होते. तो विचार करू लागला की 'या ओढ्याच्या काठाने वरवर जाऊन पाहू जिथे पाणी कमी असेल तिथून जाऊ.' परंतु तेवढ्यात एक मोठे जुने लिंबाचे झाड मुळासकट, फांद्यासकट पाण्या बरोबर वहात येतांना दिसले. 'एवढा मोठा वृक्ष जिथे पाण्या बरोबर वहात आहे तिथे आपली काय कथा?' असा विचार करत तो तिथेच पाणी ओसरण्याची वाट बघत उभा राहिला. अंगावर ओले कपडे असल्यामुळे आणि वारा सुटलेला असल्यामुळे तो थंडीने चांगलाच कुडकूडला होता. थोड्याशा अंतरावर बैलाचा गोठा होता. तिथे बैलांसोबतच दहा बारा महिला आणि तीन चार तरुण थांबलेले होते. त्यातल्याच एका तरुणाने पंकजला तिकडे बोलावून घेतले. कपडे तर सर्वांचेच भिजलेले होते. पण पंकज जास्तच गारठला होता. त्या तरुणाने बैलांसमोरची उष्टावळ बाजूला घेऊन पेटवली आणि पंकजला शेकायला लावले. तोवर पाऊसही थांबला. एक दीड तासानंतर ओढ्याचे पाणी जरा कमी झाले. ते पाहून त्यातला एक तरुण पंकजला म्हणाला,


  "पाव्हनं, आम्ही या बायांना गावात सोडतो आन् आपल्या भाकऱ्या घेऊन येतो. तव्हर थांबा इथंच."


   "मी पण येतो तुमच्या सोबत. मलाही येऊ द्या." असं म्हणत तो ही त्यांच्या सोबत निघाला. ते सर्वजण गावात पोहोचले. तोवर पुन्हा पाऊस सुरू झालेला होता. पंकजने त्या सर्वांची सोबत सोडली अन् पुढच्या रस्त्याला चालायला लागला. पाऊस आणखी वाढला होता. अंधार खूप झाला होता. पाया खालचा रस्ता बिलकुल दिसत नव्हता. नेहमीचा रस्ता असल्यामुळे तो अंदाजानेच चालत होता. त्या गावापासून साधारण एक किलोमीटर तो आला असेल तेव्हा समोरून तीन अर्धनग्न अवस्थेतील गोसावी येत होते. ते अगदीच जवळ येई पर्यंत दिसले नाहीत. एकदम जवळ आल्या मुळे तो खूपच दचकला आणि घाबरलासुद्धा. 


  "बेटा, आगे का गांव अभी कितना दूर है?" त्यातील एका गोसाव्याने विचारले. 


  "बस एखादा किलोमीटर दूर होगा." तो उत्तरला. 


   "रस्ता तो दिखता नही है। क्या सभी रस्ता ऐसाही है?"


  "रस्ता अच्छा है। सिधा चले जाना. नही तो चलो वापीस मेरे साथ मेरे गांव." त्यांना रस्ता दाखवन तो म्हणाला.


   "हम गोसावी लोग एकवार गांव छोडा तो वापीस नही घुमते। आजही जाते राहते है।" एका गीसाव्याचे हे बोल त्याला खूप काही शिकवून गेले. माणसानंही आपल्या जीवनात ठरवलेल्या ध्येयमार्गावर सतत पुढे चालत रहायला पाहिजे. तो परत आपल्या रस्त्याने चालू लागला. त्याला त्याच्या गावात येई पर्यंत रात्र झाली होती. जवळपास रात्रीचे अकरा वाजले होते. सारा गाव सामसूम होता. घरी गेल्यावर आईने घर उघडले. तेवढ्यात त्याची मोठी बहीण आलेली होती. ती ही उठली. 


   "एवढ्या रात्री यायची काय गरज होती? एवढं काय काम खोळंबलं होतं इथं? थांबायचं ना तिथेच." मोठी बहीण म्हणाली. 


   तो काय उत्तर देणार? तो एवढ्या लगबगीनं कशा साठी आला ते थोडं सांगता येणार होतं? आईनं त्याला कपडे बदलायला लावले. तेवढ्यात सुनंदाही उठली. तिने पाणी गरम केले. त्याने गरम पाण्याने अंग पुसले. कपड्याने कोरडे केले. सुनंदाने त्याला जेवायला ताट वाढले. तो जेवण करत असतांना आई आणि सुनंदा दोघीही त्याच्या कडे बघत होत्या. आईची वात्सल्यपूर्ण नजर होती. तर सुनंदाचा चोरटा कटाक्ष खूप काही सांगून जात होता. तो एवढ्या लगबगीनं का आला? हे तिला कळले होते. परंतु बोलता येत नव्हते. तिचे डोळे मात्र सारं काही सांगत होते.

******


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama