रातराणी-एका आईची व्यथा...
रातराणी-एका आईची व्यथा...
तिन्हीसांज झालेली असते. जुई तुळसी वृंदावनपाशी उदबत्ती लावून आत येते. आक्की देवाजवळ बसलेली असते तिला घेवून बाहेर आली. हातात जपाची माळ घेवून आक्की आराम खुर्चीत जप करत बसते. काजव्याचा किर्रकिर्र आवाज सुरु होतो. रातराणीला आज खूपच फूल होती. केवड्याची धूप काडी लावून आक्कीला हात लावून सांगितले," मी बाहेर जावून येते. कुणाल दादाचा फोन आला तर सांग लग्नाला ये म्हणून. हा फोन इथेच ठेवते आणि जेवण इकडे जेवण झाकून ठेवले आहे माझी वाट पाहू नको. भूक लागली की जेवून घे. चावी मी घेवून जाते. " जुईच्या एवढ्या वाक्यांना आक्कीने ,'बरं बरं' म्हंटले आणि डोळे मिटून जपात गुंग आहोत असे दाखवले. दरवाजा बंद केल्याचा आवाज झाला. तसा आक्की हातातील माळ बाजूला ठेवून डोळे बंद करून विचारात बसते. कशातच मूड लागत नाही. कुणालचा आत्ता फोन यावा आणि मला शिकागोला घेवून जातो असे म्हणावे. गेले कित्येक दिवस हेच चाललंय. त्याचा विझा मिळाला कि घेवून जातो. पण हे फक्त निम्मित्तच. मुलगा सून आपल्यासाठी काहीच करू शकत नाही. का मी अशी म्हणून मला टाळतात. मी तिकडे गेले तर अडगळ होईन का त्यांना. जुईचे आता लग्न आहे ती चालली आहे सासरी. सगळे त्याला कळवले तरीही अजून मार्ग आपल्याल्या सापडत नाही.
जुईचा विचार करता सगळा भूतकाळ आता आक्कीला आठवतोय. जुईही खरी पाहता आक्कीची खरी मुलगी नाही. आक्की जिथे नोकरी करत होती स्टेनो म्हणून. तिकडच्या बस स्थानकाजवळ नेहमी प्रमाणे आली. बसची वाट पाहत उभी होती. कुणाल हा बारा वर्षाचा होता आणि नवरा केशव हा नेव्ही मध्ये असल्याने तो सहा सहा महिने शिप वर असायचा त्यामुळे कुणालची जबाबदारी सगळी आक्कीचीच होती. ही भिक मागत होती भुकेचा आव आणून आणि म्हणून आक्कीच्या पर्समध्ये डब्यात लाडू होता. तो तिने काढून या मुलीला दिला. आक्कीचे लक्ष नसताना तिने जावून तो दिव्याच्या पोल मागे टाकला. तिथे एका बस प्रवाशाने आक्कीला टोला मारला, "नको तिकडे दुनियादारी करायची नाही या भिकाऱ्यानाच जास्त ओकारी असते." आक्कीच्या डोक्यात जरा तिडीकच गेली. तिने तिला हाताला धरून रागे भरायला सुरुवात केली ," तुला नको हवे होते तर तसे सांगयाचेस नं. ते पण पैसे देवूनच आणतो नं आम्ही. तू भुकेचा आव आणलास म्हणून मी तुला ते दिले." यावर ही मुलगी म्हणजे यांच्या टोळीतील रिंकी जोरजोरात रडायला लागली," आक्की आक्की नको मारू मला. मला जाम भूक लागलेय पन आमचा दादा भाई फक्त पैसे घेवून य सांगतो. तो फक्त दुपारी आणि रात्री वडापाव खायला पैशे देतो." हिला भयानक काही सांगायचे आहे. आक्कीने तिचे सगळे ऐकायची तयारी दाखवली. यावर ती आणखी हुंदके द्यायला लागली. एक बस येवून मागून गेली. तरी आक्कीला या मुलीला सोडावेसे वाटले नाही. पुन्हा रडता रडता तिने तिचे सारे दु:ख आक्कीच्या डोळ्यात ओतले.
दादाभाईला आम्हाला खायला बंदी केली आहे जर पैशे आणले नाय तर जीवे मारण्याची धमकी देतो. एकदा असाच लाडू खावून गेलो आनी तोंडाला रवा चीटकला त्याने माझा ओठ आवळून काढला. दुसर्या दिवशी लाडू खावून पानी पिवून गेले तर फ्रोकी ओली दिसली म्हनून त्याने मला बेदम मारले. एकदा तहान लागलेली म्हनून गोळेवाल्याने उरलेले सरबत दिले. ओठ लाल लाल झालेले पाहून मला बेदम मारले. म्हनून मला पैशेच लागतात. आक्कीने तिला जवळ केले गोंजारले आणि आपण यावर तोडगा काढूत असे सांगून तिचे राहण्याचे ठिकाण विचारले. दुसर्या दिवशी स्त्री मुक्तीच्या महिला आणि पोलिस घेवून त्या दादा भाईला समज द्यायला गेली. पण कोणाचे धूप खातोय कुठे तो. उलटा आक्कीला उलटा बोलला की तुला एवढा पुळका असेल तर घेवून जा हिला. पोलिसांनी त्याला आठ दिवस जेल मध्ये ठेवले. आक्की ने घरी येवून केशवला फोन करून कळवले. आपल्या घरी आणूयात का तिला पण केशव नकोच म्हणाला त्या मुलीवरून नसते कोणते प्रकरण नको. आक्कीने केशवला विश्वासात घेवून असे काही होणार नाही असे सांगितले. केशवने त्याच्या वकील मित्राला फोन करून तिच्या सोबत राहा आणि सगळे काही ते रीतसर कर. केशवचे जोडून ठेवलेले मित्र नेहमी हाकेला उभे राहायचे. एकदाचे तिला त्या दादाभाईच्या कचाट्यातून सोडवले. आक्कीला मुलीची आवड खूप होती. पण केशवच्या सतत लांब राहण्याने ते शक्यच झाले नाही. तिने आदल्यादिवशीच जुईची वेल लावली होती. म्हणून हिचे नाव जुई ठेवले. आक्कीचे राहते घर तसे लहान होते कारण तिला बाग फार आवडे आणि एका कोपऱ्यात केशवने छोटे गॅरेज काढले होते तो आला की सहा महिने छोटे मोठे काम घेई. कुणाल तसा अबोल. जुईशी फारसा बोलत नसे. जुईला मात्र त्याला सारखे कुणाल दादा, कुणाल दादा हाक मारावीशी वाटे. कुणालला चित्र काढायला फार आवडे तो बागेत बसून छान छान चित्र काढी.हळू हळू आक्कीने जुईलाही बडबडगीते शिकवली. " गर गर फिरून दमला पंखा, एक होत झुरळ, या बाई या". विमला हि मागच्याच झोपडीत राहणारी नवरा मारतो म्हणून कुणाल सोबत इकडेच थांबायची. ती ही जवळ घ्यायची जुईला. पण रस्त्यावरचे झोपडे, काऊ, चिवू शिवाय जग नं बघितलेली हि मुलगी अर्थशून्य नजरेने बघत रहायची. हिला फोर्स करण्यात काहीच अर्थ नव्हता. तिला तिचा भूतकाळ वर्तमानकाळ स्थिरस्थावर व्हायला वेळ लागेल. एके दिवशी आळीतील सार्वजनिक पूजेचा तो दिवस. संध्याकाळी आक्की घराच्या दिशेला येताना पिंगे मास्तर भेटले," अगं कुणाल थेट शाळेतून येवून बसलाय. चित्र काढतोय. तू लवकर ये आणि त्याच्यासाठी चांगला शर्ट घेवून ये." आक्की ने स्मितहास्य करून हो म्हणत घराकडे आली तोच फाटकाकडे जुई परकर पोलक्यात विमालासह उभी. आक्कीला पाहून खूष. आक्कीने तिच्या छान दिसण्याचे कौतुक केले. पण मनात एक खंत होती की हिला आपण अजून आळी फिरवली नाही मग हि सगळ्यांमध्ये रमेल ना. तिकडे पाहिल्यावर पिंगे मास्तरांनी तिला जवळ घेतले. जमेल त्याच्याशी ओळख करून दिली. स्पर्धा काहीश्या घेण्यात आल्या. लहान मुलांचे अनुभव कथन सुरु झाले. कोणी सायकलवरून पडण्याचा अनुभव सांगितला तर कोणी आजीबरोबरची मस्ती. जुईने आपल्याला पण बोलायचे आहे असे सांगून पिंगे मास्तरांना स्टेजवर चढवायला सांगितले. जुई अगदी हावभाव करत," बसले होते ओटीवर खेळत होते भातुकली. तिकडून आला साधू म्हणाला,' भिक्षा वाड माई '. मी म्हंटले, 'माई नाही मी जुई'. बस्स एकाच टाळ्यांचा गडगडाट. कुणालने तर वर चढून जुईला जवळ घेतले. तेव्हापासून जुई अगदी सगळ्या आळीची लाडकी झाली. आक्की फारच धन्य झाली.
एके दिवशी उन्हाळी सुट्टीत केशव येणार होता म्हणून सुट्टी घेवून फेण्या, चिकवड्या बाहेर सुकत ठेवल्या होत्या. जुईला बाहेर लक्ष ठेवायला सांगितले. विमला मध्ये मध्ये येउन जात होती आणि जुई आपल्याला कुणाल दादासारखे चित्र काढता येते का ते पाहत गुंग होती. तेवढ्यात तिकडे माकड आले आणि दोन फेण्या चांगल्याच उचलून कुडुमकुडुम खात बसले. जुईने जोराचा टाहो फोडला. आक्की, विमला दोघी घाबरत बाहेर आल्या. पाहतो तो तर काय ते माकड पळून गेले. पण आपल्या फेण्या घेतल्या . आक्की यावर तिला गप्प करते," त्याच्या नशिबाचा दाणा आहे तो खावून गेला. त्याला तरी कोण देणार आपल्याशिवाय". आक्कीचे तत्त्व कळण्याएवढी जुईला समज आली नव्हती. ती अर्थशून्य होवून पाहत होती. विमला आक्कीची थट्टा करत आत गेली, " म्हातारपणची काठी आवडली हो मला." श्रावणातील एका रविवारी छानसे ऊन पडले होते. कुणाल चित्रकलेच्या परीक्षेला गेला होता. आक्कीने जुईला एका वाटीत शेव कुरमुरे कालवून दिले. तिला खात बस असे सांगितले. विमलाही मार्लेश्वर यात्रेला गेली होती. आपण ओल्या नारळाच्या करंजा करायच्या आहेत तेव्हा मी मागच्या वाण्याकडून नारळ घेवून येते. ती येताना ऊन पावसाची ती सर दोन मिनिटांची आली म्हणून ती थांबली. येताना फाटकातून पाहते तर काय जुई बाहेर ओटीवर येवून मांडीत डोके खुपसून रडत बसली होती. हातात कपडे वाळत घालायची काठी. फाटक तर बंद आहे. पाच मिनिटात काय झाले असेल एवढे.. मग आत कोण आले असेल, कोणी काय केले असेल का जुईला. भीतीने आक्कीचे पाय जमिनीवर पडेनात. पटकन तिला मांडीवर घेतले. तिला कवटाळले. आक्की आक्की," जोलाचा पाउश आला कुणाल दादाचा शत्त भिजला. माझा हातच नाय पोचला " आता मात्र आक्की अगदी फिदी फिदी हसायला लागली. जुई तिच्याकडे निरागस बघायला लागली. म्हणता म्हणता जुई शाळेत रमली कुणालची पण दहावी आली. एक दिवस केशवला आपल्या राहत्या खोलीत ड्रग्स सापडले म्हणून निलंबित केले तिथूनच येत असताना एका ट्रेन अपघातात केशवचा मृत्यू झाला. आक्कीची दोन मुलांकडे बघत अगदीच सावली कशी निघून आली याच्या विचारात ती आजारी पडली. हे सगळे झाले की कोणी केले. केशवच्या मित्रांनी आक्कीला सगळे फंड आणि पेपर सोडवण्यात मदत केली. सगळे तिच्याकडे आदराने पाहत म्हणून केशव निर्धास्त होता. केशवच्या आठवणीत ती झुरून गेली होती. रडून रडून तिने स्वतःला अबोल केले होते. एक दिवस संध्याकाळी तुळशीला दिवा लावला आणि रातराणीला न्याहाळून आत येताना ओटीवर ती धडपडली. जुईने तिला सावरले. डॉक्टर घरी आले आणि रातआंधळे पणाची लक्षणे असल्याची सांगितले. दुसर्या दिवशी कुणाल बरोबर जाऊन तपासणी केली. लगेच शस्त्रक्रिया केली पण ती यशस्वी झाली नाही. आक्कीला नोकरी सोडावी लागली. कुणालचे शिक्षण झाले तसा तो शिकागोला गेला. जाताना आपण दोन वर्षासाठीच जातो आहोत आपल्याला आर्ट शॉप इकडे येवून काढायचे आहे. तोपर्यंत जुई आहेच तुझ्यासोबत पण कसले काय हा तिकडे गेला तो तिकडची भारतीय किर्तीशी लग्न केले. विझ्झाच्या नावाने आक्कीला चुना लावत होता.
जुई मनापासून आक्कीची सेवा करी. बारावी नंतर तिने असे फाईन आर्ट्सला जाऊन घरगुती वस्तू विकणे पडदा, रुखवत, सोफ्ट टोय्स असे सगळे ती घरीच करी. तसेच तिने बाहेर आक्कीला नर्सरी काढायला सुचवले. आक्कीचा सकाळचा छान वेळ जाई. लोकही तिच्याकडून रोपं विकत घेत. दोघींच्या व्यवसायानिम्मित ओळखी छान वाढत गेल्या. बाहेरची कामे जूईच बघे. कुणालने तिला जाण्याच्या आधी बँक पासून सगळे व्यवहार दाखवून ठेवले होते. एके दिवशी रात्री जुई उशिरा परत आली आणि गप्प गप्प होती. रात्रीचे तिचे सगळे निरीक्षण आक्की करत होती. रात्री झोपायच्या खोलीत आक्कीच्या मांडीवर डोक ठेवून, "आक्की मेडिकल स्टोअर मधील आकाश मला आवडतो. आम्हाला लग्न करायचे आहे." आक्कीच्या शस्त्रक्रिये नंतर जुईचे सतत जाणे होई मेडिकल मध्ये. तिथेच हिची भेट झाली. तिने असे अचानक मला लग्न करायचे आहे असे सांगावे साधे विचारूही नये. ही कोणती पद्धत. या विचाराने सगळे आठवून आक्की खचली होती. जुई अंदाजाने तेविशीची असावी. तसे लग्नाचे वय पण नव्हते पण एखादे वर्ष थांबली असती तर. असे विचार करत बसली होती. आपल्या तरी डोक्यात स्वार्थी विचार का यावा असे एक मन सांगत होते. तर दुसरे मन जाऊदेत तिला आपण संपूर्णतः आंधळे झालो तर तिचे काय. कुणाल तिला काय सांभाळणार आहे. तो मलाच आशेवर ठेवून गेलाय. आतापर्यंत बरीच रात्र झाली होती न कुणालचा फोन न हिचा पत्ता. बर आता हिला विचारवं तरी कुठल्या नात्याने. तिने तर आपण परके असल्यासारखे नुसते आपल्या कानावर घातले आहे. आक्की तेव्हापासून तिच्या बरोबर औपाचारीकच बोलत होती. आक्कीने निवांत मागे टेकून एक मोठा श्वास घेतला आणि ठरवले. त्याला पण अडवायचे नाही आणि हिला पण नको. सरळ आपण आता आपले जमलेले पुंजी घेवून वृद्धाश्रमात जावे. तिथे सगळे समवयस्क आपल्याला भेटतील. जाईल आपला वेळ छान. दोघंही आपल्या आपल्या स्वप्नात सुखी राहोत. जुईच्या उद्याच कानावर घालून आपण आपला रस्ता धरावा. आक्कीच्या चेहऱ्यावर जरा तेज आल. एवढ्यात खट आवाज झाला. बहुधा घुबड आल बाहेरच्या ओटीवर रात्रीच येवून बसतं. त्याला रात्रीच दिसतं आणि आपल्याला सकाळच. काय विरोधाभास आहे. काजव्यांचा किरकिरर्र्र आवाज वाढत चालला होता. आपल्याला सकारात्मक निर्णयाने आक्कीला भूक लागली. तिने ताट झाकलेले उघडले. आज अळूचे फद्फद. सकाळी फुलं काढताना आक्कीने अळू आलेले पहिले. पण तिची इच्छा काही होईना कापायची. जुईने आपल्याला न विचारता अळू केले. पण छान केले होते. आक्की अगदी मनापासून जेवली. जुईची वाट पाहत खिडकीत चाचपडत येवून बसली. तिच्या दार उघडण्याचा आवाज झाला तशी पलंगावर जाऊन झोपली. पहाटे तिला चांगलीच लवकर जाग आली. पारिजातकाचा सडा उजेडल्याचे सांगत होता. आक्की उठून बसली. आता लवकरच आपली घुसमट थांबेल. केशवच्या फोटोकडे बघत ती कराग्रे वसते म्हंटले आणि अंघोळीला गेली. तुळशीला पाणी घालून. फुल परडीत घेवून देवघरात येवून बसली. अर्धी पूजा होते न होते तोच दार खणखणले. दारात आकाश पांढरा चाफा आणि सोनटका घेवून उभा. आक्कीला आश्चर्य वाटते, " आकाश तू एवढ्या सकाळी. सगळे ठीक आहे न. जुई आत आहे. तू आत ये न. ही फुल आणलीस होय. छान " आक्कीचा हा सूर ऐकून आकाश जरा निवळलाच. जुई आतून बाहेर चहा बिस्किटे घेवून येते. दोघं आक्की साठी थांबतात. आक्कीची पूजा होते तशी आक्की येते. टेबलाकडे बसते. जुई आक्कीला जवळ करते. " आक्की तुला इतकी निर्दयी आणि क्रूर वाटले का गं मी. सारखी गप्प गप्प राहते. माझ्याकडे आशेने बघत नाहीस. आपली बाहेरची रातराणी अशीच आहे पण घरातील रातराणी चालली या विचाराने तू कोमेजून गेलीस नं? अगं ज्या डोळस पणे तू मला इथे आणलस तिथून आंधळे पणाने तुला टाकून जाईन असे वाटले का? अग गेले कित्येक दिवस आम्ही तुझ्यासाठी फिरतो आहोत. चांगल्या डॉक्टरला तुझे पेपर दाखवून आम्ही तुझ्यासाठी शस्त्रक्रिया पाहतो आहोत आणि डॉक्टर मिळालेत सुद्धा. परळला आहे त्यांचे मोठे हॉस्पिटल. हो आणि ती जरी यशस्वी नाही झाली तरी आम्ही तुझे डोळे बनून तुझ्या बरोबरच राहणार आहोत. कुणाल दादा परत येईपर्यंत किंवा कायमचे. आकाश इथेच येणार आहे आपल्यासोबत. आमच्या घरी ते मान्य आहे. तुझी रात्र, तुझी सकाळ, तुझा श्वास, तुझी स्पंदन आम्हीच आक्की आम्हीच ." आपण कशावरून काय सूत गाठले होते जुईबद्दल आणि जुई आपल्यासाठी काय आहे हे तिने दाखवून दिले. आक्की दोघांना जवळ करून हुंदके देत रडत राहिली निशब्द........