पेरीन-स्त्रीचे एकटेपण सुखावते
पेरीन-स्त्रीचे एकटेपण सुखावते
पेरीन
"आज एक अर्जंट ऑपरेशन आहे पेरीन थोडं थांबावं लागेल" डॉक्टर पालांडे बोलत पुढे गेले. पेरीन हातामधील ट्रे खाली ठेवून ऑपरेशन टीमला सज्ज करायला गेली. चार वाजता पेरीन परिचारिकेची सुटायची वेळ होती. पण तीन वाजताच वरून ऑर्डर आली म्हंटल्यावर वरिष्ठ पेरीनला थांबावे लागे. पेरीन अतिशय मितभाषी पण मनमिळाऊ होती. तिच्या हाताखालच्यांशीसुद्धा ती नेहमी नम्रपणे राही. माणूस हा आधी नशिबाचा गुलाम असतो मग नशीब त्याच्या पाठीशी राहते असे ती सगळ्यांना सांगे. तिची एकच इच्छा असे की सुखाचे आणि दुःखाचे धागे समान असोत. पेरीन हि पारशी असली तरी ती मराठी शाळेत शिकली होती. तिचे वडील पुनीत एक कँटीन चालवत तिथे बरीच लोकवस्ती मराठी होती. पण ते फार लवकरच फुफुसाच्या दुखण्याने वारले. पेरीन दहा वर्षांची होती. मग हे कँटीन आई पूर्वीत चालवी. सकाळी पेरीनला शाळेत सोडायला जाई. ती थेट कँटीनमध्ये येई. ती तिथे चार नोकर ठेवले होते. त्यातील दोघे साफसफाई आणि एकजण पाव, बिस्किटे, अन्य सामान आणायला बाजारात जात आणि एकीकडे ती चवथ्याजवळ कॅंटीनमध्ये गर्दी सुरु होईल. चहा करायला घे. गरम गरम भजी बाहेर आणून ठेव. असे सांगून बाहेर येई. घरातील कामाला एक बाई होती शामली . आई तिला शामी म्हणत असे आणि पेरीन तिला शामी मावशी. ती दुपारी पेरीनला शाळेतून घेऊन येई ती रात्री आठ वाजता आई घरी परतेपर्यंत तशी हि लोकवस्ती बरी नव्हती म्हणून शेजारी पालेजा कुटुंबीयांनी तिला रात्री आठ वाजता दुकान बंदच करायला सांगितले होते. ते तिची नेहमी आपल्या बहिणीसारखी काळजी घेत. जवळ जवळ सात वर्षे तिची आयुष्याची गाडी चांगली चालली होती. पण पेरीन दहावीला आली तशी आईचे गुडघे खूप दुखू लागले. संधिवाताचे लक्षण दिसत होते. मग एवढ्या लहान वयात पेरीनला काय काम द्यायचे तसा तिलाही काही रस नव्हताच हे दुकान सांभाळण्यात. मग ओळखीतून हे कँटीन पांडे याने घेतले. त्याच पैशात आईचे ऑपरेशन केले. थोडे पेरीनच्या नावावर ठेवून दिले. एका गुडघ्याचे ऑपरेशन तेवढे यशस्वी झाले नव्हते म्हणून आता चाकाची खुर्ची लागली. उपचाराच्या निमित्ताने तिचे सतत हॉस्पिटलमध्ये येणे जाणे झाले त्यामुळे तिलाही परिचारिका व्हावे असे वाटले. मग तिने प्रशिक्षण घेऊन त्याच ' करुणा ' हॉस्पिटलमध्ये गेली वीस वर्षे काम करत होती. पेरीन खूप बुटकी होती त्यामुळे तिचे लग्न जमवताना खूप समस्या आल्या. हळूहळू तिने लग्नाचा विचार सोडून दिला. आई अशी जागेवर. पालेजा कुटुंब पण खूप खटपट करत असत पण हिला यश कशात येत नसे. आईची सत्तरी आली. पेरीनची चाळीशी आली होती. पण पेरीन आपल्या कामात खूप खुश होती. कोणतीही ड्युटी करावी लागली तरी शामीला बरोबर ठेवून ती येई. शामीची पण आता पासष्टी आली होती पण छोट्यामोठ्या कुरकुरी पेरीनच बऱ्या करी. ती आईला सोडायला काही तयार नव्हती. पेरीनच्या वेळा बघून ती हजर राही.
डॉक्टर पालांडे आले आणि सगळ्यांना सूचना देऊ लागले. या व्यक्तीचे ऑपरेशन हे अपेंडिक्सचे आहे तो उभाही राहू शकत नाही म्हणून मला हे आत्ताच करावे लागेल. अर्धा तास लागेल. काय करायचे ते पेरीनला माहीतच होते. तसे ऑपरेशन सुरु झाले. पेरीन आज आईला घेऊन समुद्रावर जाणार होती शामी तिला हॉस्पिटलजवळ घेऊन येणार होती. तिने बाहेर गार्डकडे निरोप ठेवला होता. तसे गार्डने त्या दोघीना बागेत थांबण्याची सूचना दिली. त्यांच्यासाठी चहा पाणी बघितले. वीतभर अपेंडिक्स डॉक्टरच्या कातरीत सापडला. मग झाले एकदाचे ऑपरेशन. पुढच्या सूचना देऊन पेरीन निघाली. आईला खाली बघून आनंद झाला. आपली मुलगी किती लोकांचे प्राण वाचवते. पण हिचीच कोणाला दया आली नाही. मनातले प्रश्न मनात ठेवून तिघेही समुद्राच्या वाटेला निघाले. आईला बर्फाचा गोळा खूप आवडतो तिने तो मागितला. अचानक नुकतेच जन्म झालेल्या मुलाचा आवाज आला. गोळेवाला म्हणाला, " दो बजेसे बच्चा यहा पडा है उठाएगा कोन इकडे तिकडे पहिले तर एका दगडा पाठीमागे हे मुलं होते. पेरीनने हे मुलं उचलले कोण आहे कुठून आले याचा विचार न करता ती थेट हॉस्पिटलमध्ये त्याला घेऊन गेली. शामी आणि आई घरी गेल्या. हॉस्पिटलने रीतसर तक्रार पोलिसात करून त्या लहानग्या मुलाला उपचार सुरु केले. त्याच्या दुधाची व्यवस्था केली. पोलिसांनी जाहिरात देऊन सुद्धा या मुलाला कोणी घ्यायला आले नाही. शेवटी हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर दीक्षित यांनी या मुलाचा विचार एका आश्रमात पाठविण्याचा केला. पण पेरीनला काही हा विचार पटला नाही. तिने न राहून मुलाला आपल्याकडे आणले. तसे वकील करून कागदपत्र तयार केले. आता आई तिच्यावर रुसून बसली. "याचे आपण काय करणार. याला कोणाचे नाव लावणार नकोच ती भानगड उचल त्याला". त्याच दिवशी पतेती होती म्हणून पेरीन म्हणाली,"असेल आपल्या अग्यारीतूनच हा मला निरोप आला असे समज. जे होईल ते होईल मी तयार आहे सामोरे जायला". या दहा दिवसाच्या मुलाचे नाव तिने सागर ठेवले. सागर तसा अंगाने लवकर भरला. पेरीन त्याचे डोस, औषध वेळेत करून घेई. शामीला सागर आपला नातूच वाटे. त्याचे अंघोळ पाणी केले की मगच आईला हवं नको ते पाही. शामीने आता हॉस्पिटलमध्ये एकच वेळ जायचे ठरवले. शामीच्या वयानुसार तब्येतीच्या तक्रारी सुरु होत्या. डॉक्टर पालांडेंशी बोलून तिने आपण आता आठ ते चार येवूत. ऑपरेशन असेल तेव्हा आपण जरूर थांबूत किंवा वेळेचा विचार करुत. डॉक्टर पालांडेंनीही तिला तसे समजून घेतले. त्या मुलाचे ज्या दिवशी कागदपत्र केले तोच त्याचा जन्मदिवस आणि वाढदिवस म्हणून साजरा करायचा असे ठरवले. सागर हळूहळू रांगायला लागला. शामी त्याला पूर्ण घर मोकळे करून देई. मग तो फिरत राही. एकदा हॉस्पिटलचा स्टाफ घरी आला. खूप दिवसात आईला भेटले नव्हते मग सागरची पण भेट होईल. काही ना काही खेळणी घेऊन आले. सागरशी खेळत बसले. आई बसून काही स्वयपांक करेल अशाच उंचीचा ओटा करून घेतला होता. आईने सगळ्यांसाठी चहा आणि बटाटा पॅटीस करून ठेवले होते. हा सागर यांना खायला देईच ना. हात मारून त्यांना हलवत राही. याचा असा खोडकरपणा आईचे मन वळवून गेला. हळूहळू आई पण यांच्यात रमू लागली. पेरीन सुट्टीच्या दिवशी त्याला चौपाटीवर फिरायला घेऊन जाई. फुगा त्याला खूप आवडे पण फुटताना मात्र खूप घाबरे. वर्षाचा वाढदिवस पेरीनने घरीच केला. शेजारची मंडळी आणि स्टाफ असे मिळून आले. सागर पेरीनला माई अशी हाक मारे. त्याला शामी शिकवी. सगळे खेळत खेळत त्याची करमणूक करत होते. सागरला हळूहळू दात येऊ लागले होते. त्यामुळे तो सगळ्याच वस्तू चावायला, तोंडात घालायला पाही.
सागरच्या वाढदिवसानंतर दोन दिवसांनीच एकाएकी शामीची सून यमुना घरी आली. सकाळी पेरीनची निघण्याची वेळ आणि तिची येण्याची वेळ "आयला हृदयविकाराचा झटका आला हाय". पेरीनने तिला ताबडतोब आपल्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. आपल्या सागरला कोण सांभाळणार याची भीती होतीच पण यमुना मात्र आपण दिवसभर इथे थांबूत असा धीर देऊन गेली. शामीचा मुलगा आणि तिचा अठरा वर्षाचा नातू दिवसभर हॉस्पिटलमध्ये थांबले. पण तिन्हीसांजेला शामी गेली. आईचा आधार गेला. शामी या जगात नाही हेच विश्वसनीय नव्हते. दुसऱ्या दिवशी पेरीन घरीच राहिली. आता सागरला सांभाळायला कोणी मिळतंय का ते पाहण्यासाठी. आपल्या वाडीत तिने सांगून ठेवले होते. आपल्या हॉस्पिटलमध्ये पण त्याच्यासाठी काय सोय होते का ते ती पाहत होती. रात्रीचे आठ वाजायला आले आणि दारावर ठकठक झाले. यमुना दारात उभी होती. सागरला काल हिला पाहिल्याचे आठवत होते म्हणून तो आणखी पुढे धावत गेला. " आपण येवूत उद्यापासून सांभाळायला काय नको इकडे तिकडे शोधूत". पेरीनला आणि आईला धीर आला. यमुना दोन ठिकाणी स्वयपांकाचे काम करत होती. पण दोन रस्ते इकडे तिकडे जाण्यापेक्षा आपण इकडेच येवूत असे सांगून ती गेली. म्हणता म्हणता सागर शाळेत जाऊ लागला. यमुना आणि त्याचे छान जुळत होते. तिला जे कळत नाही तेही तो तिला पुस्तकातून समजावी. पेरीनची आई मधुमेहाच्या वाढत्या प्रमाणामुळे जगातून गेली. सागरला तेवढेसे कळत नव्हते. पण दादी दादी नेहमी करत असे. सागर आहे म्हणून पेरीनचे आयुष्य आता एकटे नव्हते. सागर यमुनाला सांगून गुपचूप आपल्या माईच्या हॉस्पिटलमध्ये जाई. मग सगळे स्टाफ त्याला खेळवत. पेरीन ऑपरेशनमध्ये असेल तर बाहेर येत नसे. पण हा तोपर्यंत थांबून राही. सगळे पेशंट पण येता जाता त्याच्याशी गप्पा करत. सागरला अभ्यास फारसा आवडत नसे. पण अभ्यासाची पुस्तके आणि त्याच्यावरील चित्र हि हुबेहूब तो काढू पाही. सुट्टीच्या दिवशी हा कुठे कुठे फिरायला जाई. तेच घरी येऊन तो आठवून तसेच्या तसे चित्र काढी. शाळेतील स्पर्धेतही तो भाग घेई. त्यात त्याने पेरीनचे छान चित्र काढले. शाळेत हळूहळू लोक त्याला विचारात बाबा कोण आहेत? ते काय करतात? तू माईचे नाव का लावतोस? मग हा सांगे ते "कुठेतरी असतात. येतील तेव्हा येतील". पेरीन सागर सज्ञान होईपर्यंत काहीच सांगणार नव्हती. तसे तिने वाडीत आणि यमुनाला पण सांगून ठेवले होते. सागरच्या दहाव्या वाढदिवसाला तिने त्याला कॅमेरा घेऊन दिला. सागर सुबक चित्र टिपे. मावळता सूर्य, टिपूर चांदणं, आपली शाळा, माईचे हॉस्पिटल, बाग याचे चित्र त्याने टिपले होते. लहान वयातील त्याची कला पाहून सगळी वाडी भारावून गेली. आता यमुना पण सासू झाली होती. साठी आलेली यमुना आता यायला कुरकुर करे. मग सागर एकटा घरी राही. शाळेनंतर लगेच क्लास मग तो घरी येई. जेवून झोपे तोपर्यंत पेरीन येई. सागरचे सोळावे वर्षे आले. दहावीचे वर्ष आले. सागर अभ्यास मनापासून करे. पण परीक्षेच्या वेळी याचा फार गोंधळ उडे. कितीदा त्याला आठवत असे पण ते लिहावे कसे ते कळत नसे. पेरीन त्याला अनेक पद्धती वापरून शिकवे. सागर कधीच कोणत्या गोष्टीसाठी हट्ट करत नसे. पेरीनच त्याला घेऊन देई. कपडे, बुद्धीबळ, अनेक प्रकारचे बूट घेऊन देई. सागरच्या खाण्यापिण्याच्या आवडी वेगळ्या होत्या. त्याला मराठमोळे पदार्थ अळूवडी, शिरा, उपमा असे आवडायचे. पेरीन पारशी खास करून मांसाहारी स्वयंपाक करी पण त्याला ते आवडत नसे. पेरीनला कळून होतेच की आपल्या वंशातून तर नाही आला. तो कुठून आला किंवा कसा आला हे सागरला सांगणे तेवढे गरजेचे वाटत नव्हते. कारण दोघांची अशी जोडी जमली होती की दोघांना भूतकाळाचा विसर पडला होता.
दहावीची परीक्षा झाली तशी पेरीन पंधरा दिवसाची रजा काढून उत्तरभारत फिरायला गेली. सागरने मनसोक्त सिमला आणि मनालीची दृश्य टिपली. गुलबर्ग, लेह, लडाख हे तर त्याच्यासाठी अविस्मरणीय ठरले. परतीच्या वाटेला सागर पुन्हा पुन्हा यायचे तर इकडेच. आपल्याकडे तर फक्त समुद्र पण इकडे तर हवा, थंडावा, आणि राहणीमान खूप छान. घरी आल्यावर त्याने सगळी दृश्ये मोठी करून भिंती सजवल्या. म्हणता म्हणता निकाल लागला. सागर बासष्ट टक्क्यांनी पास झाला. पेरीनने अग्यारीमध्ये, हॉस्पिटल आणि वाडीमध्ये पेढे वाटले. सगळा स्टाफ घरी येऊन बक्षीस देऊन गेला. पुढील दोन महिन्यात पेरीन निवृत्त होणार होती म्हणून तिने सगळा साज नंतर करायचा ठरवले होते. मोठी पार्टी आणि सागरला फोटो काढण्याची संधी. सागरला अजून दोन वर्षे शिकवून मगच पुढे काही करायचे ठरवायचे होते. कॉलेज सुरु झाले होते. मुलांच्या पावसाळी सहली झाल्या. पेरीनचा आज शेवटचा दिवस होता. तो युनिफॉर्म, ती कातर, हातमोजे, कापूस या सगळ्यापासून आता दूर जाणार होते. वयानुसार तिचेही पायदुखी, डोकेदुखी होतीच पण नोकरी पूर्ण करायचीच होती. आता स्वतःला वेळ देणे हे सागरने तिला आधीच सांगितले होते. सागर आपल्या मित्रांना घेऊन हॉस्पिटलच्या बागेपाशी आला तिथेच सोहळा केला. खाणे पिणे झाले पेरीनचे भाषण झाले आणि तिने सगळ्यांचा निरोप घेतला. पहिल्याच दिवशी सागरने सुट्टी घेऊन माईला मुंबई दर्शन घडवून आणले. तिथले चित्र टिपण्यात सागरला आनंद होताच पण पेरीनला बदलते जग. मोठ्याल्या इमारती आणि खाण्याचे स्टोल्स यात आनंद मिळाला. परतताना तशी दमलीच होती. पण सागरसाठी खिचडी करण्याइतकी ताकद ठेवली होती. हळूहळू तिने सागर कॉलेजला गेला की बाहेरचे उपक्रम सुरु केले. कधी ग्रंथालय, कधी ज्येष्ठ नागरिक संघटना, कधी स्त्री मुक्ती केंद्र, एकदा तर सुट्टीत आश्रमात सागरला घेऊन गेली. सहा महिने सुरळीत दिनचर्या सुरु झाली.
अचानक एकदा सागरला ताप भरला. पेरीनने औषधे दिली पण ताप काही उतरेना म्हणून आपल्याच हॉस्पिटलच्या लोकांना बोलावून घेतले आणि दाखल केले. डेंग्यूचा ताप आहे असे निदान निघाले. यानंतर दिवसभर पेरीन त्याच्या जवळ अहोरात्र बसली. आपल्या स्टाफनेदेखील खूप सहकार्य केले. पण तब्येत काही सुधारत नव्हती. आतापर्यंत पेरीनने खूप जणांना मरणाच्या दारातून बाहेर काढले. आता हिच्याच बाबीत काय हि परीक्षा लिहिली होती. आठ दिवस झाले आणि सागरने अखेरचा श्वास सोडला. पेरीनला खूप मोठा धक्का बसला. ती हलत नव्हती, बोलत नव्हती, रडत सुद्धा नव्हती. कुठून तरी यमुनाला कळले तशी ती आली आणि पेरीनला घेऊन गेली. वाडीतील लोक आणि स्टाफ यांनीच सागरचे अंत्यविधी केले. पेरीन घरी जाऊन सुद्धा एकटक त्या चित्राकडे डोळे लावून बसली होती. कुठून तिच्या दूरदूरच्या नात्यातील काही भावंड आली. थोडे दिवस तिच्याबरोबर राहिली पण पेरीनची मनःस्थिती पूर्णतः खालावली होती. हळूहळू तिच्यातील संवेदना कमी झाल्या होत्या. हि भावंड प्रत्येकजण आपल्याकडे महिना महिना ठेवून घेऊ म्हणून ठरवून घेऊन गेली पण कुठेच तिला बरे वाटत नव्हते. पेरीन आपल्याच विश्वात होती. हे राहते वडिलोपार्जित घर सागरच्या नावावर करून ठेवले होते. आपल्या कमाईचा अर्धा हिस्सा हॉस्पिटल ट्रस्ट आणि अर्धा त्याचा हे सगळे तिने एका फाईलमध्ये लिहून ठेवले होते. पण सागर अठरा वर्षाचा व्हायच्या आधीच गेला. आता पेरीनला जगाचे भान नाही. सगळं कसे गुंतागुंतीचे होऊन बसले होते. पेरीनची प्रकृती दिवसेंदिवस खालावली. सागरला जाऊन आठ महिने झाले. तोच दिवस घेऊन पेरीनने देखील जगाचा निरोप घेतला. पेरीन आपल्यात नाही याचा कोणालाच विश्वास बसत नव्हता.