Pallavi Wagle-Samant

Others

2.8  

Pallavi Wagle-Samant

Others

श्लोक आजी-आजीचे प्रेम जाणून घे

श्लोक आजी-आजीचे प्रेम जाणून घे

12 mins
24.1K


संध्याकाळची वेळ आणि काऊ चिऊचे आवाज बऱ्यापैकी मोकळे झाले होते. नेहमीप्रमाणे आज गुरुवारचा बाजार भरला. जनी आजी दत्त दत्त करत दत्ताच्या देवळातून बाहेर पडल्या आणि बाजाराच्या दिशेने निघाल्या. आवारातून मुले बेचकी हातात घेऊन आवळे पाडत होती. एक आवळा जनी आजीच्या अंबाड्यात जाऊन अडकला. आजीने दिगंबरा दिगंबरा करत मुलांना," नेहमीचे हे माझ्या अवती भवती फिरकणं, टिंगल टवाळी करणं मला कळत नाही असे वाटले का तुम्हाला. पण मी मुळी दाद देणार नाही तुम्हाला. " मुले हसत हसत आजीला रस्ता देत पुढे गेली. आजीने बाजारात सफरचंदाचे भाव विचारले आणि घासघिस करायला सुरुवात केली. तयार झाला पण तो फेरीवाला. मग एका ठिकाणी गाळणे विचारले दिगंबरा दिगंबरा करत एक एक वस्तू घासाघीस करत घेत गेल्या.  नचिकेत आणि सोहम एकमेकांच्या हातात हात घालून बाजार फिरत होते. नचिकेतने आजीबद्दल सोहमला माहिती दिली. आजी आजोबा हे जवळच्याच आळीत राहतात. आजोबा पोस्टाचे पेन्शनर आहेत. त्यांना ऐकू थोडे कमी येते त्यामुळे बाहेरची बहुधा कामे त्याच करतात. व्यवहाराला रोखठोक. आपल्याला मूल बाळ नाही याचे कधीच वाईट वाटत नाही. आपल्या अंगणात फुल झाड लावून त्यांच्याशी गप्पा मारायच्या आणि विशेषतः श्लोक म्हणत म्हणत त्यांना हाताळायचे. त्याच्या दैनंदिनीत श्लोक फारच वेळा येत. त्यांना सगळे श्लोक आजी म्हणतात. सोहमला नचिकेतने दिलेल्या माहितीमुळे श्लोक आजीबद्दल जास्त कुतूहल वाटले.

दुसऱ्या दिवशी बाराच्या सुमाराला कावळ्याला दही भात ठेवायला आजोबा विहिरीजवळ आले. कावळे काव काव करत होते. वारा छान सुटला होता. तुळस अगदी आनंदाने आपल्या मंजिरीना हसवत होती. शेवग्याच्या शेंगा तर जणू खाली असलेल्या झाडांना चिडवत होत्या. फाटका पलीकडे उभा राहून सोहम हे सारे पाहत होता. तेवढ्यात मागून कुत्रा भुंकण्याचा आवाज आला आणि सोहम मोठ्याने रडत फाटकात शिरला. आजोबा त्याला जवळ करून,"कोण रे तू इथे कसा आलास तुला तहान लागली का ?  तुम्ही इथे खेळत आलात का ? तू एकटाच कसा? एवढे प्रश्न विचारे पर्यंत आजी बाहेर आल्या ओठावर दुर्गे दुर्गट भारी आरती होतीच. सोहम रडत रडत पाणी राहिला. हि मुलं बरेचदा खेळता खेळता तहान लागली की आत येतात म्हणून बाहेर एक माठ भरून ठेवलाच होता. आजीने पटकन पाणी देऊन त्याला गप्प केले. जरा घुश्श्यातच विचारले, " आता सांग तू इथे कसा आणि काय हवे आहे". सोहम म्हणाला, " मी तुम्हालाच भेटायला आलोय. मी इथे दूरवरच्या गावात राहतो. मला असे कळले की तुम्हाला सगळे श्लोक येतात म्हणून मी तुमच्याकडे श्लोक शिकायला येऊ इच्छितो. जगदंब! जगदंब! करत त्याची नीटपणे पारख करू लागल्या. हा खोटं तर बोलत नसेल ना किंवा कोणी म्हणून आत घुसायला तर येत नसेल. पण या अकरा वर्षाच्या मुलाला किती ते शहाणपण. " आजी मी आपला फक्त वेळच घेईन आणि मी घरून खाऊन पिऊन येईन तुम्ही काळजी नका करुत. मला फक्त पाणी द्या आणि तुमचा वेळ द्या. मला द्यायला तुमच्याकडे पैसे नाहीत. पण जे शक्य होईल ते नक्की देईन." त्याचा केविलवाणा चेहरा बघून आजी आजोबा खूष झाले. आपल्याकडे असे कोणी आले नव्हते याच्या निमित्ताने कोणी देवदूतच आला असे म्हणून त्याला अंगणात बसवले. "तू केव्हाही ये तुला वेळ मिळेल तसा  पण काही गैर केलेस तर मग मात्र आमच्याशी गाठ आहे." सोहमने डोळे पुसून डोळे बंद करून उरलेले ते पाणी मटकन पिऊन घेतले. आजी आत गेल्या. सोहमला झाडांची तशी ओळख नव्हती. गुलबक्षी छान डोलत होती. केळीचे लहानगे केळफूल मोठे होण्याचे स्वप्न बघत होते. उन्हाळा असल्यामुळे चांगलेच चटके बसत होते. पण या सावलीत मात्र आल्हाददायक वाटत होते. आजी बशीमधून एक सकाळ्च्यातील घावन घेऊन आल्या आणि बरोबर लसूण चटणी. सोहमने मान खाली नको म्हंटले खरे पण आजी काही ऐकायला तयार नव्हत्या. त्याला कुरवाळून एक घास भरावला. हि लसूण चटणी बहुधा पहिल्यांदाच खाल्ली असावी त्याला ती तिखट लागली तो हा हू करू लागला. आजोबांनी झाडावरचे पहाटे पडलेले रायवळ आंबे एका सुपात ठेवले होते ते त्याला धुवून दिले. पण ते कसे खातात हे हि त्याला माहित नव्हते. आजोबांनी चीक कसा पिळायचा पासून ते कसे चोखायचे हे त्याला दाखवले. आजोबांनी हात धरून त्याला अंगण दाखवले. विहीर दाखवली. तिकडे कावळे तृप्त जेवत होते. घर तसे पडीक होते. जुनाट आत स्वयंपाक घर, लहानसे देवघर आणि माजघर होते. सगळी जागा अंगणाने व्यापून घेतली होती. इतक्यात शेजारच्या सुमा काकू अळूची पाने विचारायला आल्या. आजोबांनी चार पाने काढून दहा रुपये घेतले. असे कोणी आले की आणि काही घेऊन गेले की तेवढाच घराला हातभार मिळतो. आजीची विचारपूस करून त्याही निघाल्या जाताना सोहमकडे पाहत पाहत गेल्या. सोहमही आपण आता निघतो आणि उद्यापासून वही, पेन्सिल घेऊन येतो असे म्हणून गेला. आजी, आजोबांनी अगदी निश्चिन्तपणे जेवून घेतले.

दुसऱ्या दिवशी नेमाने दुपारच्या प्रहरी आला. आजी त्याचीच वाट पाहत होत्या. नंतर त्याला तुला वेगवेगळया वेळी प्रार्थनेसाठी यावे लागेल असे सांगितले कारण सकाळची प्रार्थना, रात्रीची प्रार्थना ही वेगळी असते. सोहम अगदी खुशीत बरे म्हणाला. चार दिवस अगदी नेमाने सोहम येत गेला. 'कराग्रे वसते लक्ष्मी, वक्रतुंड, प्रारंभी विनती' आता सोहमला येऊ लागले. आजी जे काही करत ते सोहमलाही देत. सोहमला हि चव मात्र नवी नवी वाटे. पण तो आवडीने खाई. एक दिवस आजोबा सुकलेल्या नारळाच्या झावळीपासून खराटा बनवत बसले होते. सोहमही तिथे बसला तासायला पण तासताना सोहमला कापले गेले आणि सोहम रडू लागला. आजी लगेच आतून हळद घेऊन आल्या त्याला चेपली आणि तिथेच साखरपाणी देऊन मांडीवर घेतले. त्याचे अश्रू पुसले. बरे वाटले तसे तो निघून गेला. सोहम कधीही आला की घरामध्ये छोटे मोठे काही काम असेल तर करायचा. खूप दिवसात आजोबांनी बाहेरच्या जगात शिरकाव केला नव्हता. त्यांना ऐकू कमी येई त्यामुळे आजी बरेचदा एकट्याच जात. एके दिवशी सोहम हात धरून आजोबांना घेऊन गेला आणि दत्ताचे देऊळ, नदी फिरून आले. आजोबांनी सोहमला आणि स्वतःला ताडगोळे घेतले.

एके दिवशी तिन्हीसांजेला रामरक्षा म्हणता म्हणता सोहमच्या एकाएकी पोटात दुखू लागले. तो कळवळून रडू लागला. आजी, आजोबांनी त्याला झोपवले. ओवा पाणी दिले. पोटाला हिंग लावून शेकवले. काळे मीठ घालून ताक प्यायला दिले. गावात वैद्य तसे लांबच राहतात. सोहमचा घरचा पत्ता पण नव्हता. तसे घराचे नाव काढल्यावर तो उठून बसला. आता आपल्याला बरे वाटत आहे असे म्हणाला. दुपारी आजीने फणसाची भाजी केली होती. सोहमला ती आवडली पण बहुधा त्याला ती सोसली नसावी कारण त्याने ती पहिल्यांदाच खाल्ली. त्यात त्याने करवंद आणि जांभळं शेजारच्या कुलकर्णी आजींनी आणून दिली ती खाल्ली त्यावर पाणी प्यायला. आजोबांनी त्याला जवळ घेतले डोळेभर त्याला अगदी मुके घेतले. त्याला फाटकापर्यंत सोडले उद्या बरे वाटले तरच ये. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आजीला देऊळाजवळच हा भेटला दिगंबरा, दिगंबरा करत त्याला जवळ घेतले. दोघेही देऊळात गेले आजीने तिथेच बसून दत्ताचे वाहन गाय, गणपतीचे वाहन उंदीर असे एक एक गोष्टी सांगितले. सोहम हात धरून फाटकात शिरला. आजोबा तापलेल्या झाडांना, जमिनीवर पाणी शिंपडत होते. तेवढ्यात सुकलेला नारळ खाली पडला तो थेट सोहमच्या खांद्यावर. सोहम कळवळला आणि आजीने त्याला धरले. घरात जाऊन तेल, बाम चोळले. खांदा चांगलाच लाल झाला होता. सोहम आजोबांच्या मांडीवर शांतसा झोपला. एकीकडे दिवा लावून, तुळशी वृंदावनात जाऊन उदबत्ती लावून आजीने गुरगुट्या भात, तूप, मेतकूट, पोह्याचा भाजलेला पापड तयार केले. मग त्याला उठवून गरम गरम भरवले. एकीकडे 'भमिरूपी ' चे संस्कार त्याच्या कानापर्यंत पोहोचवत होती. पोट भरल्यावर, मायेचे चार हात खांद्याला लागल्यावर सोहमला तरतरी आली. बरे वाटले तस लगेच निघाला. तिसऱ्या दिवशी सोहम सकाळीच येऊन हजर. आजीने गरम गरम थालीपीठ केले होते. गेल्या गेल्या अथर्वशीर्ष म्हणून सोहम खायला बसला. आजोबाही फार खूष झाले त्याला थालीपिठावर लोण्याचा गोळा कसा पसरवून खायचा ते दाखवले. खाऊन दोघंही अंगणात येऊन बसले. आजी माजघरातून एक एक गोधडी बाहेर उन्हं द्यायला आणत होती.   थोडी कडधान्य, तिखट सगळे बाहेर आणून दोघांनाही राखण करायला सांगून आत गेली. पाऊस म्हणता म्हणता पडेल.  आजोबा एकीकडे सोहमला विष्णूच्या, पार्वतीच्या गोष्टी सांगू लागले. विष्णूच्या बेंबीतून कमळ बाहेर आले सोहम अगदी तल्लीनतेने ऐकत होता. कावळ्यांनी अगदी भर दुपारी जमाव करून कहर केला. त्यांना गप्प करण्यासाठी आजोबा आत दही भात आणायला गेले.  पण कावळे गोधडीवर चढल्यावर सोहमला फार वाईट वाटले म्हणून तो काठीने उभा राहून कावळ्यांना हा हा करत गेला तोच तिकडे धडपला आणि गुडघा फोडून घेतला. आजोबा पान घेऊन बाहेर आले. विहिरीपाशी ठेवले आणि पहिले सोहमला हात धरून आत घेतले.  थोडे खरचटले आजीने गार माठातील पाण्याने धुवून पुसले आणि त्यावर त्याला आयोडीन चोळले. सलग तीन दिवसाचे हे कसले शुक्लकाष्ट लागले मुलाच्या मागे देवघरात गेली आणि त्याच्यावरून तांदूळ ओवाळले.  आजोबा बाहेर थांबले राखण करत. हळूहळू सोहम बाहेर येऊन दुपारची वेळ झाली म्हणून वामकुक्षी घ्यायला पाठवले. सोहम बाहेरच होता. स्वतःशी विचार करत बसला होता. चिमण्या चिव चिव करत होत्या जणू काही त्याचीच विचारपूस करत होत्या. मैनेचे उगी आपले आंब्यावर बसून गाणे चालले होते. खारुताई तर चांगलीच केळीवरून आंब्यावर आणि मग बुंध्याकडे. सरडा आपला विसावा घेत होता. सोहम सगळे शांतपणे निरखत होता. संध्याकाळ झाली तशी आजी,"आपण जरा आज देऊळात जाऊन बाजाराला जाते आहे आले की तुझी दृष्ट काढते मग तू जा".सोहमला दृष्ट म्हणजे काय ते कळले नव्हते. मनात प्रश्न होता;आजीपुढे कोणतेही प्रश्न विचारावेत असे कधीही धाडस नव्हते. आजोबा एक एक करून गोधडी आत नेवून ठेवत होते तर सोहम एक एक बरणी आत नेवून ठेवत होते. दोघांनी मिळून वाळलेली पाने उचलली आणि एका ठिकाणी कंपोस्ट करायला ठेवली. आजोबांबरोबर राहून सोहमला झाडे, निगा, पर्यावरण कळले होते. रातराणी छान बहरली होती. बाग फुलली की आजोबांच्या चेहऱ्यावर तेज येत. आजी आल्या आल्या हात पाय धुवून देवघरात गेल्या. उदबत्ती लावली तुळशीवृन्दावनापाशी आणि सोहम आत जाऊन शुभंकरोती म्हणायला लागला. सोहमचे संस्कृत वर छान आकलन चालले होते. आजीने दृष्ट काढली. सोहमच्या डोळ्यात पाणी भरून आले.  लाल मिरची, मीठ, मोहोरी चांगलीच उधळली होती. आजोबांनी त्याला दृष्टीचा अर्थ सांगितला. ही एक पूर्वपार चाललेली श्रद्धा आहे आणि आम्ही ती मानतो. सोहम निघाला.

एके दिवशी भर दुपारी सोहम आणि आजोबा बाहेर बसले असता काही मुलं खेळता खेळता पाणी प्यायला आली श्लोक आजी, श्लोक आजी म्हणून हाक मारली. आजी खडीसाखर घेऊन बाहेर आल्या मुलं पाणी पिऊन खडीसाखर खातात. सोहमला आपल्या बरोबर खेळायला घेऊन जातात. सोहम आपण तिकडूनच निघूत असे सांगून निघतो. पुढे दोन दिवस सोहमचा काही पत्ताच नाही निरोप नाही. आजी आजोबांना चिंतेला सुगावा लागत नाही. अंगणातला चैतन्य हरवलं असे वाटत होते. झाडं काहीशी डोलत नव्हती का आपल्याला तसे वाटतंय आजोबांच्या मनात एक एक प्रश्न घालमेल करू लागले. आपल्याला द्यायला फी नाही म्हणून हा यायचा बंद झाला का? का कोणी याचे कान भरले. आजीच्या डोळ्याला काही डोळा नाही. मुलं पाणी प्यायला आली तेव्हा आजोबांनी विचारले,'अरे हा कुठे गेला काही सांगितले का तुम्हाला? आमच्याशीही कधी काही बोलला नाही. घरचे काही विचारले तर घरी सगळे आहेत पण मला बाहेर आवडते असे काहीसे म्हणायचा'. मुलंही आपल्याला काहीच माहित नाही असे म्हणून भेटला की नक्कीच निरोप देवूत म्हणत गेली. दुसऱ्या दिवशी आभाळ दाटून आले होते. वळीवाचा पाऊस पडावा असे वातावरण वाटत होते. आजी पोष्टाच्या कामानिमित्त बाहेर आल्या. सोहम तापाने फणफणला होता. नचिकेतचे बाबा आणि नचिकेत त्याला एका रिक्षेने डॉक्टरकडे घेऊन जात होते. आजीने रिक्षेत सोहमला पहिले आणि रिक्षा अडवली. सोहमला असे पाहून आजी जरा घाबरल्या. नचिकेतने आपण सोहम बरा झाल्यावर भेटायला येवूत असे सांगितले. आजीचा काही पाय हलेना पण घरी आजोबा वाट पाहत असतील म्हणून कसे बसे तिला पाठवून देतात.

 चार दिवस झाले तरीही सोहमचा पत्ता नाही. पुन्हा आजी त्याच वाटेला जाऊन सोहमचा शोध घेत एका 'संध्या' या एका फार्म हाऊसच्या घरावर झोपाळ्यावर नचिकेतला झोका देताना पहिले आणि गेटकडे आजीने जोरजोरात हाक मारली. तसा नचिकेत पुढे आला. त्याने आजीला आत घेतले. आजीने वेखंड, सुंठ पावडर येताना आणले होते. सोहम या फार्म हाउसचा छोटा मालक आहे. नचिकेतने हकीकत सांगायला घेतली. एकीकडे आजीला झोपाळ्यावर बसवले. आजीने सोहमचे डोके मांडीवर घेतले." याचे आई, बाबा घटस्फोटीत आहेत.  आई घटस्फोट घेऊन पॅरिसला आपल्या बॉसबरोबर निघून गेली. पुढे तिचे काही कळले नाही. तेव्हा सोहम पाच वर्षाचा होता. सोहमचे बाबा आणि सोहम मुंबईत राहतात. पण ते वरचेवर बाहेर असतात. त्यांचे काय चालले असते ते कधी कळतच नाही. सगळे नोकर चाकर याला संभाळतात. मी सुद्धा इथला माळीच आहे आणि माझे बाबा सुद्धा. त्यांचे आई वडील एका अपघातात वारले. गेल्या वर्षी हे फार्म हाऊस बांधले. आम्ही दोघे आणि निलाक्का येथे साफसफाई करायला येते. आता हा आहे म्हणून स्वयंपाकही करते. आम्हीही दोघे आता पूर्ण वेळ इथे थांबतो. याचे बाबा अधून मधून येतात. एवढ्या मोठया घरात हे सगळे असे आहे". आजी अगदी जागेच हतबल झाल्या. सोहमच्या डोळ्यात पाणी होते. अंगात ताप होताच. आजी काय म्हणतील या भीतीने तो आणखी कोमेजला. आजीने वेखंडाची पुडी सोडून त्याच्या डोक्यावर लावली. "शांत झोप लागली की तुला बरं वाटेल. आता आत जाऊन पड बरं. ही वेळ नाही आता फार चर्चा करायची. गुरुदेवदत्त! " असे म्हणत त्याला आत पाठवले. हे सगळे त्याने आधीच सांगितले असते तर बरं झालं असत असे नचिकेतला सांगून त्या तिथून निघाल्या. नचिकेतला हा तिचा टोला होता की काय स्वर काही कळेना. आजीने घरी पोहोचताच हात पाय धुतले. उन्हाने आजी लाल बुंद झाल्या होत्या. केसाचा अंबाडाही सुटत चालला होता. त्यावरील ते अनंताचे फूल पार काळपट झाले होते. कावळे विहिरीवर वाट पाहत होते. आजोबा कधी एकदाची आजी बोलू लागते याची वाट पाहत होतेच कावळ्याच्या निमित्ताने ते आत गेले. दही भात वाढून घेतला. आजीही आल्या त्यांच्या पाठोपाठ बाहेर. सगळी गोष्ट सोहमची सांगितली. सगळं अंगण जणू मुकं होऊन ऐकतं आहे इतकी शांतता. आजोबांचा तर प्रचंड गोंधळ उडाला. याच्यावर रागवावे की दया करावी काही समजत नव्हते. इथे येऊन त्याला नक्की काय साधायचे होते. श्लोक हे निमित्त होते! त्याचे मोठाले घर सोडून त्याला या झोपडीत काय तो रस ? त्याच्याकडे तर यापेक्षा मोठी बाग आहे.  हे सगळे प्रश्न रास्त होते. पण त्याला विचारावे तरीही का?  दोघं ही परिस्थितीची उकल सुटते का याची वाट पाहत होते. 

म्हणता म्हणता आठ दिवस गेले.   पावसाची चांगलीच चिन्ह दिसू लागली होती. कोकणातला पाऊस म्हणजे काय पाहायलाच नको.  आजोबा पडलेल्या झावळ्या एका बाजूला करून ठेवत होते. रोजच्या प्रमाणे कोकिळेचे कूजन चालू होते. आजी माठ भरायला बाहेरच होत्या. दिगंबरा दिगंबरा मुखी होतेच. नचिकेत आणि सोहमने फाटकातूनच "श्लोक आजी" अशी हाक मारली. आजी आजोबा जागीच स्तब्ध उभे. काय बोलावे, जवळ करावे काही सुचेना.   सोहमने वाकून आजी आजोबांना नमस्कार केला.  त्यांनी आशीवार्द दिला. पण काय बोलावे ते कळेना, सुचेना. सोहमने लगेच बोलायला सुरुवातच केली. " कणकवलीत येताना सारखे वाटत होते काही तरी वेगळा अनुभव माझ्या खिशात पडावा. मुंबईचे माझे जीवन म्हणजे एक एक तासाचा प्रवास मग शाळा मग क्लास मग काय ते घर असे आयुष्य सुट्टीच्या दिवशी काय तर एखादा व्हिडीओ गेम, नाहीतर एखादा सिनेमा. सगळं कृत्रिम आयुष्यात मला स्वतःशी संवाद साधण्यापलीकडचे जग कळत नव्हते. भाषेला कुठलासा तरी टेकू द्यायचा. शाळेत इंग्लिश, घरी नोकर, गाड्याबरोबर त्याची कुठलीशी प्रादेशिक भाषा हरवलो होतो मी या सगळ्यात. आई, बाबांनी ती कोळ्याचे जाळे विणावे तसे काहीसे माझे केले आहे. मी स्वतः ही वीण सोडवायचे ठरवले. इथे आलो नचिकेत माझा चांगलाच मित्र झाला. गाव फिरताना त्याने इथली ठिकाणे, शेत, मळा दाखवला आणि एकदा बाजाराला आलो तेव्हा तुझी माहिती दिली. मग मला वाटले की आजी आजोबा म्हणजे काय असते त्यांचा मायाळू हात, वात्सल्य सगळे मला रोज तासभर जरी सहवास लाभला तरी मला ही सुट्टी ताजीतवानी ठेवेल. इकडे आलो आणि तुम्ही तर सख्ख्यासारखेच झालात. मला काही खरी ओळख दाखवायचे धाडस होईना. सांगायचे होते सगळे तुला अगदी शेवटी सुट्टी संपता संपता मी जाताना. पण कोणताही कोडगेपणा, वेडेपणा कोणताही उद्देश यामागे नव्हता. आज हा बोलतो आहे तो केवळ तुमच्या सान्निध्यात राहून. मला एवढे मराठी नव्हते येत. देवाचे वेड होते. पण असा एवढा श्रद्धेचा अर्थ मला नव्हता माहित. अर्थ कसला हा भावार्थ. तुमच्या बरोबर राहून मी जे शिकलो ते सगळे मी रोज करेन. तुमचे थालीपीठ, घावणे,  गुरगुट्या भात याची मला कधीच माहिती नव्हती. फक्त पिझ्झा, सॅन्डविच, पास्ता हेच माझे खाणे. आमच्या बागेतील शोभेच्या झाडांपेक्षा तुमचे हे बोलके अंगण मला फार आवडले. इथली सगळी सृष्टी म्हणजे जणू तुमचे आयुष्यातील चैतन्य. तुम्हाला मूळ बाळ नसल्याची कधीच खंत नाही याचे मला सगळे उत्तर मिळाले. तुम्ही दोघे माझ्या जीवनाचे केंद्रबिंदू झालात. तुमचा आदर ठेवून मी घडेन. खूप मोठा होईन आणि या मातीला रुजुनच मोठा होईन. मी मोठा होईपर्यंत तुम्ही माझ्या राहा मला कधी विसरू नका. आज माझ्याकडे द्यायला काही पॉकेट मनी आणि शोभेची झाडे तेवढी आहेत. पण तुमच्याकडच्या या खऱ्या आयुष्याकडे पाहता याचे मोल काहीच नाही. मी मोठा झालो की तुम्ही माझ्याकडे काहीही मागा. मी नक्की देईन कोणतेही ऋण नाही तर माझे कर्तव्य आहे ते. आजी आजोबा मला माफ करा. आता मी लवकर मुंबईला जातोय. सुट्टी संपली पण माझी साठवण कधीच संपणार नाही. रोज सकाळी, संध्याकाळी मी श्लोक म्हणेन". यावर आजी आजोबांकडे रडण्यापलीकडे काहीच नव्हते. आळीतील मुलेही पाणी प्यायला म्हणून आली होती. त्यांनाही सोहमचे हे स्वर अगदी काळजाला भिडले. एक जण म्हणाला," आम्ही रोज येथे स्वार्थापोटी येतो आणि जातो तू तर शिकण्याच्या उद्देशाने आलास आणि आम्हाला शहाणपण देऊन गेला. आता दर सुट्टीत यायचे हा आणि आम्हीही येणार इथे आजी बरोबर श्लोक शिकायला. आजोबांबरोबर झाडाची सावली शिकायला. आणि तू ही आम्हाला मुंबईत बोलावं मग आम्ही तिकडे येवूत तुला भेटायला". आजी आजोबांनी जवळ घेऊन सोहमचे नुसते मुके मुके घेतले. " अरे तू दर सुट्टीत येच पण तुला इथे जास्त आवडत असेल तर इकडे तू स्थिरस्थावर हो. आम्ही आहोत तुझी काळजी घ्यायला" . आजी जाऊ नको असे प्रत्यक्ष नाही बोलल्या तरीही मनात मात्र होते. 

* पल्लवी वागळे-सामंत

 


Rate this content
Log in