Pallavi Wagle-Samant

Others Tragedy

3  

Pallavi Wagle-Samant

Others Tragedy

नात - आजीची व्यथा

नात - आजीची व्यथा

12 mins
16.7K


पहाटेचा कावळ्यांच्या आवाजातच सुरुचीला जाग आली. अंघोळ करून तुळशीला पाणी घालून थेट अभ्यासाला बसली. दोन तास काहीसे वरवरचे वाचन केले. आजीचे शिवणकाम, विणकाम थोडे संथच होते. कारण त्याचे ने-आण करणं. कच्चा माल आणून देणे. गिऱ्हाईकांकडे पोहोचविणे ही सगळी कामे तीच करायची. आपला अभ्यास संभाळून. शेजारी तर अगदी मऊ सायीसारखे तिला आधार देत होतेच. नमस्कार करून शालान्त परीक्षेला जायला निघाली. चप्पल जरा वेडावत होतीच. तुटते की काय. देवाला मनातच साकडे घालत होती. माझ्या परीक्षेचा काळ चांगला जावो. उगीच काहीतरी फजिती व्हायला नको. आजी दही हातावर ठेवायला आली तेवढ्यात शेजारच्या शोभा काकू आल्याच, " सुरुची हे पेन घे ग आणि यानेच काय तो पेपर लिही . हॉल तिकिट आणि स्टेप्लर घे बरोबर. हे येतायत तुला सोडायला. बाईक वर नीट बस". शोभा काकूंचा बोलण्याचा ठेका नेहमी वरचा 'सा'. पण मायाळू तितक्याच. आजीच्या डोळ्यात अगदी पाणी भरून आले. नात म्हणता म्हणता दहावीला आली. शोभा काकूंनी हळूच डोळ्यांनी खुणावले, "आत्ताच नको. ती जाऊ देत".

केविलवाणा चेहरा करून सुरुची डोळ्यात पाणी आणून " आजी मी येते. जमेल तेवढा चांगला पेपर सोडवेन." एकीकडे बाईकवर बसली. सुरेश काका तर अगदी आपली मुलगीच जणू असे हसत हसत तिला घेऊन गेले. सगळी चाळ बाहेर बाहेर येऊन आजीची पाठ थोपटू लागली. आता आता मोठी होईल ही तुम्हाला सुखी ठेवेल सुरुची सदाशिव साने. आजीच्या डोळ्यात मात्र अश्रू. दिसत नाही म्हणून दारातच बसत गोधडीला टाके टाकत. येता जाता फेरीवाले हाक मारत. कधी पाणी लागले तरी आजी एक माठ बाहेर भरून ठेवायची. आज मात्र आजी नुसतीच वाटेला डोळा लावून बसली होती. शोभा काकू आवरून येऊन बसल्या. काहीतरी जुनी साडी फाडत होत्या. आजीला म्हणाल्या, " याचा एखादा छानसा गळा शोधून सुरूला वरचा टॉप शिवा म्हणजे खाली काहीही चालते हो. नाही तिला आता काही गणवेश चालणार नाही. असे काहीसे टॉपच शिवूत म्हणजे कॉलेजची देखील तयारी वेगळी नकोत". “असे होय मी ही आली की लगेच थोडी वामकुक्षी घेऊन कापायला घेतेच. माझ्याही काही साड्या आहेत त्याचेही काही होते का ते पाहते. आधीच सुचले असते तर”. एवढ्यात समोरून सुरुची अगदी गालाच्या पाकळ्या करून आलीच. पेपर छान गेला असं त्या कोपऱ्यावरच्या वाण्याला सांगतच आली. आजीने लगेच तिला पाठ थोपटून आत घेतले. आज सगळा सुरुच्या आवडीचा बेत होता भेंड्याची भाजी त्यावर दही आणि गोडं वरण भात. सुरु अगदी मिटक्या मारत जेवली. यात आजीच्या गोधडीचे , कामाचे काय ते विसरलीच. दोघी आराम करून काय त्या आपल्या आपल्या कामाला लागल्या. या चाळीत काय ते मायेची माणसे असतात पण सुखाचे काय पाण्याचा प्रश्न, कधी पावसाळ्यात पाणी भरते. तर कधी विजेचे प्रश्न. सुरुचीला बाहेरून पाणी आणून आजीला दारापर्यंत द्यावे लागे मग आजी आत भरायची. अभ्यासात तसा व्यत्यय येई. पण परीक्षेच्या काळात मात्र शेजाऱ्यांनी जी मदत केली त्याला काही तोडच नाही. शेवटचा पेपर असताना आजीने शोभा काकूंना सांगितले की, " आता हिला जरा जग म्हणजे काय असते, जगात काय असते ते कसे ओळखायचे ह्याची जाणीव करून द्या. आमच्या वेळी काळ वेगळा होता. हिला मी काहीतरी सांगणे आणि उगी हिने माझी बडबड म्हणून काना डोळा करणे किंवा मला घाबरून काहीसे लपवणे. मग मला नाही आवडायचे". यावर शोभा काकू अगदी मिस्किलपणे म्हणाल्या, " तुम्ही तशी तिची काळजी करू नकात. ती आताही जातेच काही सामान आणायला. जे काही घडते, असते ते ती आपल्याबरोबर व्यक्त करते. तसे नाजूक गोष्टी मी तिला समजावेनच. सोज्वळ आहे ती. हरहुन्नरी देखील होईल.

सुट्ट्या लागल्या. काहीसे चाळकरी गावाला गेले. या आजी नातीला काही गावच नव्हते. पण दर सुट्टीत सुरुची छंदवर्गाला जायची. पेंटिंग, इंग्लिश स्पिकिंग असे सगळे. जून पासून आपण शिकवणी घेवूत असे तिने वाण्याच्या दुकानात बोलता बोलता बोलून गेली. तिथेच जगताप म्हणून मागच्या इमारतीतून वाणसामानाची यादी घेऊन आले तेच तिला म्हणाले, "आमचा मुलगा आहे पहिलीत आहे. आणखीही काही मुले देवूत ये तू". सुरुची मनात खूष झाली. पण आपण आजी आणि शोभा काकुंशी बोलून निरोप देते असे अगदी समंजसपणे म्हणाली. आजीला आता दिसते कमी म्हणून आपला तेवढाच हातभार लागेल. हळूहळू आजीचे भार आपण कमी करुत. खूप शिकूत आणि स्थिरस्थावर होवूत मग काय तो पुढचा विचार करुत. शोभा काकूंना तिचा अभिमानच वाटला. सुट्ट्या संपल्या शालान्त परीक्षेचा निकालाचा दिवस आला.

सुरुची सकाळपासून गुमसुम होती. आजी एकटक सुरुच्या आई, वडिलांचा फोटो बघत बसली होती. शोभा काकू धीर द्यायला होत्याच. सात वर्षांपूर्वीचा तो दिवस आपला मुलगा, सून आणि सुरुची आठ वर्षाची असताना फिरायला गेले आणि एस.टी. घाटावर आदळून गाडीला अपघात झाला. काही जागीच ठार झाले काही जखमी. या तिघांना सरकारी इस्पितळात आणले परंतु जीव वाचला तो फक्त सुरुचीचा दहा तासात वडील तर पंधरा तासात आई वारली. पोरीला पोरकं केल नियतीने. रेवती आजींचा तर पूर्ण आधार मुळासकट गेला. मुलगा शाळेत कारकुनी करत होता. सुरुचीला शुद्ध आली तशी तिने आपण परळच्या चाळीतील रहिवासी आहोत एवढेच सांगता आले. पूर्व, पश्चिम असे तिला सांगता येत नव्हते पण शाळेचे नाव मात्र सांगितले त्यावरून हिचे घर पोलिसांनी शोधले आणि प्रेत आईच्या समोर. हा आठ वर्षाचा जीव कसा मोठा करुत या विचाराने आजी खचली होती. पण हे गुणी बाळ ना कधी हट्ट, ना कधी आईची आठवण ना कधी कंटाळा.शाळेतील बाई पण अगदी तिला कशात कमी पडू द्यायच्या नाही. शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यापासून ते अगदी जुन्या पुस्तकांचा संच स्वस्तात कुठे मिळेल असे मार्गदर्शन करायच्या. आजी सोडायला आणायला जाई. पण हळूहळू बाईचं नाक्यापर्यंत सोडा पुढे आपण घेऊन जाऊन तिला असे धीर द्यायच्या. आजीला तिची तसूभर काळजी नव्हती. शिकवणी लावायला वेगळी फी नव्हतीच. जे काही असेल ते तिने स्वतःच्या आकलनाने केले. जमेल तसे आजीबरोबर बसून ती टीप मारायलाही शिके. एके दिवशी सकाळी उठल्यावर तिला आपल्या चेहऱ्यावर फोड फोड आल्याचे हाताला लागले. ही पलंगावरूनच किंचाळली खाली आजी स्टोव्ह कडे बसून पोळ्या लाटत होती. शोभा काकू किंचाळी ऐकताच बाहेर आल्या. अजून तशी लहान आहे मग ही का ओरडली का खरंच तसे काही आहे हीचे वयात येण्याचे लक्षण. शोभा काकू आत जाईपर्यंत ना ना प्रश्न मनात घेऊन गेल्या. पाहते तर काय हिला कांजिण्याचे लक्षण. " काकू मला फोड फोड आले आता मी पण त्या महाभारतातील कुब्जासारखी दिसणार. मी शाळेत कशी जाऊ कालच बाईंनी गोष्ट सांगितली. आता मला सगळे चिडवणार". आजी आणि काकू अगदी पोट धरून हसल्या. " चल अग असे काही नाही. होशील तू बरी. ही उष्णता प्रत्येकाला येतेच येते. आम्ही नाक्यावर जाऊन बाईंना निरोप देऊन येवूत. तुला आता बाहेरचा वारा घेता येणार नाही. कर आराम मी काही बिरबलाच्या गोष्टी आणि परीकथा तुला देते त्या तू वाच म्हणजे तुझे मन रमेल. तुला काही पथ्याचेच खावे लागेल". एवढं सगळं हे मांजर शांतपणे ऐकून घेत होत काहीही ना घाबरता हो म्हणत तिला आजीने पुन्हा थोपवलेच. शोभा काकूंच्या मुलाची शुभमची शालान्त परीक्षा होती. काका काकू दोघे जाऊन त्याला सोडून आले. येताना. मेडिकल मधून निलगिरी आणि धूप काडी घेतली. उगी हिला विचित्र वाटायला नको. हिला घशाकडे जरा जास्तच झाल्या होत्या आतून तसे तिला गिळता येत नाही असे म्हणी. लगेच शेजारी एक एक जण तिला डाळिंबाचा रस, सफरचंदाचा रस, कुस्करलेले केले असे आणून देत आणि ती घुट घुट करत घेई. सातव्या दिवशी आजीने तिला कडक कडू निंबाचा पाला घालून अंघोळ घातली. शाळेत जायला लागली तसा बुडालेला अभ्यासही अगदी नेटाने करत होती. शाळेच्या आवाराजवळ कुल्फीवाल्याने तिला," ए छावी " अशी हाक मारल्यावर तिने लगेच गेटकडच्या शिपाई काकाला बोलावून हा मला चिडवतोय अशी तक्रार केली. तिच्या या बहाद्दुरीचे बाईंना फार कौतुक झाले. फेरीवाल्यांना मात्र शाळेजवळ उभे राहण्यास सक्त मनाई केली. तेव्हा आजी जरा घाबरलीच हिला काही नंतर कोणी केले तर पण काही नाही बाई म्हणाल्या नको काळजी. बालपण सरत गेले आणि ती यौवनात आलीही. कोणी काही चांगल्या गोष्टी सांगितल्या की ती निमूट ऐकून घेई कोणालाच उलटे बोलत नसे. मोठी झाल्यामुळे तिच्यात बराच बदल झाला. ती वेगळीच दिसायला लागली. शोभा काकू तर अगदी तिला नक्षत्राची चांदणी म्हणायच्या. गिरणीत एकदा दळण आणायला गेली तेव्हा जवळपासच्या एका फेरीवाल्याने तिला ' चांगली दिसतेस आज उद्या काय करतेस ?'. सुरुचीने लगेच गिरणीवाल्याला हाक मारली आणि याला बघा काय ते. मनात जरा घाबरतच घरी आली. पुन्हा त्याच तोंड बघणार नाही. आजीला काळजी वाटू लागली. हे वयच असं असत. कुठे जायचे म्हंटले की धीट होऊन बाहेर पडायची. आपल्या आईसारखीच हि सुरुची. आज शालान्त परीक्षेचा निकाल कळेल. आजीला न राहून मोठ्याने रडू आले. येताना तिने पेढे आई बाबांच्या फोटोला हार आणायला सांगितले होते. चाळीत तिला बघताच सगळ्यांनी घोळका केला. एकसष्ठ टक्के मिळाले. शोभा काकू तर अगदी छान छान करत आल्या. तिच्यासाठी पर्स आणि कॅल्क्युलेटर त्यांनी आणले होते ते दिले. आज येताना कॉलेजचा फॉर्म आणला होता. शुभमने तिला फॉर्म भरून दिला. आजीने पुरण केले होते. सुरुची मनसोक्त जेवली. कॉलेजला जायची तिची ओढ मोठी होती. आता कॉलेज आणि शिकवणी दोन्ही सुरु झाले. पावसाळा होताच.

अशाच एका मुसळधार पावसात चाळीत पाणी भरले थोडे फार घरातं शिरले. आजीला कपड्यांचे घेतलेली कामाचं दडपण आले. सुरुची इतक्यात घरी आली. आजीला पलंगावरच बस असे म्हणाली सगळे खाली असलेले सगळे सामान पलंगावर उचलून ठेवले. कागद पत्र, फाईल्स नीट जपून वर खुंटीला अडकवून ठेवल्या. रात्री पाऊस थांबला तसे दोघीनी घर आवरले. शोभा काकूने पिठलं, भात केला तसा या दोघीसाठीही केला. सुरुची भुकेली मटकन जेवली आणि झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळी जाता जाता मुनिसिपाल्टीमध्ये गेली. आपल्या एरियात औषध, फवारा मारा. खूप डास होतील नाहीतर. रोगराईला बळी पडतील इथेच. तशी तिची तक्रार नोंदवून माणसे आली देखील. चाळीत सगळ्यांना आश्चर्य वाटले. गणपतीत सुरुचीचा वाढदिवस असतो. या वेळेला पहिल्याच दिवशी आला. तिला मोदक आवडतात म्हणून आजीने मोदकांचा घाट घातला. तिची शिकवणीची मुलेही आली होती. ताई ताई आईने ही भेटवस्तू दिली आहे आणि त्यात एक छानसा ड्रेस आणि सेंटची बॉटल होती. सुरुचीला फार आनंद झाला. तिला सुवासिक फुले आवडत आता हे सुवासाने क्षण आपले आणि खुलून येतील. शोभा काकूंनीही तिला लहानसे घड्याळ घेतले. रोजच्या कपड्यांच्या कामात घरखर्च चाले. वरखर्च असा चालायला सुरुची जे शिकवणीचे पैसे मिळवत होती तेवढेच. सुखाच्या तिच्या कल्पना थोड्याच होत्या. ' गती आणि थांबा' यांना ती धरून होती. कॉलेजमध्ये ती तशी 'ग्रुपिझम' मध्ये नव्हतीच. कँटीनमध्ये जाऊन खर्च करा. सिनेमाला जा हे सगळं करायला पैसे ते कुठून यायचे. नोकरी करून मग काय ती आपली हौस मौज करायची. आयुष्य कसं वळण वळण घेत गेली हे आजी नातीला कळले देखील नाही. शुभमचे कॉलेज संपले त्यालाही नोकरी लागली. शोभा काकूंचे दयाळू आणि त्यांचे श्रद्धाळू मनाने पदरात यश घातले. शुभमने पहिल्या पगाराची 'अष्टविनायक' यात्रा घडवून आणली आजीला कुठेच जात येत नाही. घरी आल्यावर सत्यनारायणाची पूजा ठेवली. आजीला साडी घेतली. सुरुचीलाही साडी घेतली. तिचेही कॉलेज डेझ असतात त्यामुळे तिला जास्त आनंद झाला.शोभा काकूंकडे एक एल.आय.सी. एजंट आला. शुभमला एक पॉलिसी काढायची होती. त्याच्याच मित्र परिवारातील होता हा ओंकार. शोभा काकूने सुरुचीसाठीही काही पॉलिसी काढता येईल का ते विचारले. आजींना बोलावून घेतले. म्हणजे लग्नाला वेगळा खर्च, कर्ज नको काढायला. ओंकारने तसे काही पेपर्स दाखवलेही. सुरुची आली की तिला समजावूत. ती तशी तयारही झाली. पण लग्नाचा विषय काढून मात्र हळवी झाली. तिला आजी आणि शोभा काकूंव्यतिरिक्त जगच कळत नव्हते.

बारावी तिने चांगली पास केली. आजीचे अश्रू पुन्हा एकदा मौल्यवान केले.शिकवणीची मुले आली होती. त्यांचे पालकही आले होते. आजीने भज्यांचे पीठ कालवले, गोड शिरा केला. शोभा काकू मदतीला आल्याच होत्या. शिऱ्यात त्यांनी एक आंबा घातला. शुभमने तिला येताना मोत्याचा सेट आणला होता. ओंकारही होता बरोबर. सगळे तृप्त होऊन गेले. चांगल्या दिवशी आजी सुरुचीकडून आईबाबांच्या फोटोला हार घालून घेतेच. सुरुची नमस्कार करून खायला बसली. पण जरा डोळयात पाणीच होते. आता ही फी जरा जास्त आहे कसे जमेल. आता सकाळचे कॉलेज असेल ना मग दुपारची पण शिकवणी घेईन. आजीने बरं बरं म्हणत आवरून घेतले. दुपारची शिकवणी तिला शोभा काकूंनी मिळवून दिली. आजी आता फक्त विणकामाचं घेत होती. सुरुची येता जाता बाजारहाट, करायची दुपारी थोडी विश्रांती घेऊन शिकवण्या करायची. जगण्याचा खूप उत्साह होता तिच्यात. परिस्थितीशी तडजोड केली पण गांगरली नाही. देव देव फार करत नसे. सकाळ, संध्याकाळ नमस्कार करी. शिकवणी घ्यायला जायची त्या पाटील बंगल्यात त्या पाटील काकांची वाईट नजर तिच्यावर पडली. तिला ते जाणवले. तिच्या यायच्या आणि जायच्या वेळेत ते मुद्दाम गेटकडे उभे राहून झाडाची गुलाबाची फुले देणे, कधी अनंताची फुले देणे असे काहीसे करत. सुरुचीने पाटील काकींना सांगितले, " काकांना सांगा मी इथे शिकवणी घ्यायला येते तेव्हा उगीच माझ्या वाटेलI जाऊ नकात. माझ्या घरी नाही आवडणार". पाटील काकींना तिचा स्पष्टवक्तेपणा आवडलं पण बहुधा तिचे घरात काही चालत नसावे. शोभा काकूंना तिने सांगितले तसे शोभा काकूंनी एका ग्रंथालयात पुस्तकांची नोंदी असे एक काम होते. तिकडे तिला घेऊन गेल्या. तिकडे तिला 1-5 च्या वेळेचं काम मिळाले. पगार तीनशे रुपये. जवळ जवळ शिकवणी एवढेच. सुरुचीची आजीला आता जास्त काळजी वाटायला लागली. पण तिचा जो स्पष्टवक्तेपणा होता तो कॉलेजमध्ये सगळ्यांना आवडायचा. हळूहळू ती पथनाट्य, एकांकीका करू लागली. असेच एकदा सराव करताना एका मुलाने तिला तालमीसाठी खोटे सांगून बोलावून घेतले तिथेही सुरुची जिंकली ' कॉलेज कायमचे बंद करून टाकेन पुन्हा असा काही विचार केलास तर. तुझा श्रीमंती मोठेपणा तुझ्या घरी ठेव'. तावातावात निघून गेली. रात्री नरम नरमच होती. आजीने हात लावून बघितले थोडासा ताप वाटतो आहे. तिला गरम पाणी, तुळस घालून काढा दिला. दृष्ट काढली. खरपूस वास घेत शोभा काकू आल्या. 'हा तापच आहे ना की तुला काही दडपण आहे. आज अशी नरमलीस का ?' शोभा काकूंनी अचूक ओळखले पण आजीच्या समोर उगाच हा विषय नको म्हणून पांघरूण डोक्यावर घेऊन झोपली. शोभा काकू तिला झोप लागे पर्यंत थांबल्या. मध्यरात्री जाग आली तशी सुरुची ' मनापासून रडत होती. एखादा पुरुषाचा आधार सतत आपल्यासोबत असावा. घरी आजीबरोबर राहते म्हणून कोणी फायदा उचलतोय आपला. तर कोणी नराधम त्याची ओळख दाखवतोच. कसं आयुष्य जगावं हे कोड कधी सुटेल. याची तिला आता चिंता लागून राहिली.

सकाळी उठली तशी डोळे सुजले होते. शोभा काकू एकादशनी सांगायला निघाल्याच होत्या. तिच्या सोबतच गेल्या." हे बघ तुला आता जग कळतंय तेव्हा तू धीराने उभी राहा. पुढे मागे तुला पूर्णवेळ नोकरी, संसार सगळेच करायचे आहे. तेव्हा जगाला आपणच दाखवायचे की आपण कसे आहोत. म्हणजे जग आपल्या वाटेला जाणार नाही. आपल्याशी अंतर ठेवून चालेल".सुरुचीला पटले तिचा चेहरा टवटवीत झाला. काकूंबरोबर देवळात जायला वेळ नव्हता कारण कॉलेजची वेळ झाली होती. एकीकडे स्पर्धा परीक्षा, बँकेची परीक्षा तिचा अभ्यास चालू होताच. आता पुढच्या वर्षी कॉलेज संपणार आणि सुरुची कामाला लागणार. आजीचा आनंद गगनात मावेना. शुभमचे लग्न ठरले आणि त्याने त्याच रस्त्याला एका ब्लॉक बुक केला. आजीला मात्र आता शोभा काकू नाही कंटाळा येईल. सुरुचीने पण धक्काच घेतला. शुभमच्या लग्नात सगळ्यांनी धमाल उडवली. शोभा काकूंनी दुपारी काम झाले की सुरुची येईपर्यंत आमच्याकडे येऊन बसत जा असे सांगून निघाल्या. सुरुचीला ते पटले. तिने आजीला घर दाखवले आणि पाण्याच्या वेळेला आजी घरी यायची. शुभमने सुरुचीच्या नोकरीसाठी खटपट चालू केली. स्नेहाही तिची जीवश्च मैत्रीण झाली होती. तिच्या माहेरचे कोणी आले तर तिलाही तेवढेच आपुलकीने घ्यायचे. सुरुची पदवीधर झाली. बँकेची परीक्षाही दिली होती ती पास झाली. अभिमानाने तिने तिची भरारी शाळेतील बाईपासून ते अगदी गिरणीवाल्यापर्यंत पोहोचविली. तिला गणिती क्षेत्रात फारच रुची होती. तिला बँकेत कॉल आला. पण आजीसाठी तिने जवळच्या शाखेत बदली मागितली. शोभा काकूंनी तिला सांगितले,"माणसं पारख केल्याशिवाय आपलं खाजगी सांगू नकोस कुणाला आजूबाजूला. लोक ऐकून घेतील आणि त्यात आपलं काय फायदा निघतो का ते बघतील". सुरुची हसत हसत म्हणाली " नो टेन्शन काकू मी कामाशी मतलब ठेवेन".सुरुचीनेही आपल्या पहिल्या पगाराचे सगळ्यांना कपडे, लत्ते घेतले. नेमकी ओंकार आला होता त्याची महिन्यात ही अशी जुजबी भेट असते. त्याला शुभमकडे एक वोलेट होते ते त्याने पुढे गेले. आजची पार्टी शोभा काकूंकडे झाली. शोभा काकूंनी उडीद डाळीचे वडे, गुलाबजामचा बेत केला होता.

नोकरीत सुरुची रुळत होती. एके दिवशी पहाटे आजी उठायला गेली तेव्हा तापाने तिला उठताच येत नव्हते. शोभा काकूंना बोलावून घेतले शुभमही आला. स्नेहा तर इकडे थांबण्यापेक्षा हॉस्पिटलला घेऊन जाऊया. हा साधा ताप नसावा. आजीला दाखल केले लगेच निदान कळले की हा आजीला डेंगू झालाय. सुरुचीपूढे केवढे मोठे आभाळ कोसळले. निदान आपले लग्न पाहावे असे तिला सारखे वाटू लागले. वयानुसार डॉक्टरांचे म्हणणे होते उपचाराला प्रतिसाद फारसा काही चांगला नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे आजीने प्राण सोडला. सुरुचीला काय ते सुचेना. पुढे काय होईल. नशिबाने काय वाढले आहे समजेना.

कार्य आटोपून एक दिवस शोभा काकू आपल्याकडे घेऊन जात होत्या. ओंकार वाटेतच भेटला. " मी तुमच्याकडेच येत होतो. आईची वाट पाहतोय. आई पण येतेय". शोभा काकू थांबल्या आणि सगळॆ एकदम वर चढले. पाणी पिऊन झाल्यावर ओंकारने थेट विषयाला सुरुवात केली. " काकू मला सुरुची फार आवडते. मला तिच्याशी लग्न करायचे आहे. फक्त तिच्या परिस्थीला बघून मी हा सहानुभूतीचा आव आणत नाही. मला खरंच ती शिकत होती तेव्हापासून फार आवडत होती. पण तिच्या निर्भिडपणामुळे मी तिला कधीच विचारले नाही. खरं अंतर आहे आमच्यात सहा वर्षाचे पण मला चालेल ". यावर त्याची आई, " किती दिवस तुम्ही तिला मुलगी म्हणून सांभाळणार. आता आम्ही सांभाळूत आमची मुलगी म्हणून." शोभा काकूंना फार आनंद झाला. ओंकार चांगला मुलगा आहे. निर्व्यसनी आहे. सुरुचीने तर कधी विचार केला नव्हता एवढे सुख तिला नकळत सांगून आले. शुभम, स्नेहा इतक्यात आलेच. सगळं घर कसं आनंदाने उजळले. सुरुचीने फक्त आपल्याला रजिस्टर लग्न करायचे आहे एवढीच अट घातली. ओंकार सुरुचीला घेऊन भारत फिरायला गेला. आल्यावर हे कळले की आता आजीचे घर बिल्डर घेतोय आणि आजीच्या पश्चात सुरुचीला ही जागा मिळणार.


Rate this content
Log in