Gajendra Dhavlapurikar

Tragedy Inspirational


2  

Gajendra Dhavlapurikar

Tragedy Inspirational


खरच स्त्री अबला असते का?

खरच स्त्री अबला असते का?

13 mins 3.0K 13 mins 3.0K

एक अतिशय गरीब कुटुंबातील अठरा विश्व दारिद्र्यात जन्माला असेल मुलगा. काय त्याच स्वप्न असणार? जशी इतर लहान मुलं शाळेत जातात तसं त्यालाही जायचं असतं. पण इतरांसारखं पाटी, दप्पर, पेन्सिल, नवा ड्रेस, पायात चप्पल नसली तरी चालेल कारण बाकीची मुलं ही अनवाणीच शाळेत जातात. ही माफक अपेक्षाही पुरी होत नाही तरी तो शाळेत जातो कारण शाळा त्याच्या राहत्या घराच्या झोपडी जवळ असते म्हणून...

  बापाला एक हात नाही. तो शाळेत आला की, त्याला बापाच्या नावावरून चिडवणारी मुलं. मग त्याच्या संताप. मुलांमध्ये हणा-मारी. शाळेत तक्रारी पालकांची ओरड पण, चूक कोणाची हे माहीत झालं की, तक्रार करणारे पालक मूग गिळून बसत.

   आई पहाटे चारला जात्यावर दळण दळायची हा मुलगा सकाळी रडत रडत आईच्या मांडीवर झोपी जाई. आई दळण-कांडन भाकरी-कालवण करून, सकाळीच दिवस उगवल्या बरोबर कामावर जाई. 

  बापाल एक हात नाही म्हणजे काम करता येत नाही. लहान असताना मुलांना काही गोष्टी समजत नाही म्हणून बापा बरोबर जनावरांसोबत हिंडायांची आवड, पण एकदा कळू लाग आणि बाप आपला काहीच काम करीत नाही. फक्त रोज सकाळ-संध्याकाळ आईला मर-झोड करतो हेच ही मुलं पाहतात म्हणून आई बद्दल सहानुभूती आणि बापा बद्दल अनादर...

  वय लहान म्हणून प्रतिकार नाही, पण वय वाढल्यावर एक दिवस बाप आईला कारण नसताना मारीत आहे हे लक्षात आल्यावर बापालाच शव्या देऊ हैराण केलं. बाप त्याचा पाठलाग करतो पण तो शेजारील चुलत्याच्या घरचा आश्रय घेतो. लोक त्याच्या बापाला खरी -खोटी सुनावतात. 

  बापाचं अचानक मन परिवर्तन होत. त्या दिवसांपासून घरात भांडण, तंटे, मार झोड बंद, मुलगा विचार करू लागतो. एवढा रागीट बाप अचानक परिवर्तन कसं झालं. मग घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींनी सांगितलं की, एक हात नसल्यामुळे लहानपणापासून लहान मोठी त्याला चिडवतात, चेष्टा करतात. एक विनोदाचं व्यासपीठ म्हणून लोकांनी त्याचा वापर केला. सततच्या अपमानाची सल वाढत गेली. तंटे बखेडे सूरी झाले. बरोबरीच्या मुला-मुलींची लग्न झाली. याना कोणी मुलगी देईना. नाना भानगडी केल्यावर एक स्थळ आलं, त्यात मुलगी वयांन लहान पुन्हा अडचण. बायको मिळाली पण ती अशी-बापाकडे. त्या आणण्यासाठी अनेक उपद्याव्याप म्हणून अशी खुनशी वृत्ती झाली होती अनेक गोष्टी वर वर कळत नाहीत माणसाच्या अंतरंगात डोकवावे लागते तेंव्हा काही कळतं.

"खरचं स्त्री अबला असते?"

  सकाळची वेळ होती. बाहेर अंधारून आलं होतं. पावसाची रिप रिप सुरू होती.बाहेर फिरायला जायचं होतं पण, पाऊस थांबत नव्हता. बरेच दिवस उन्हाच्या उकडयानं हैराण झालो होतो, अन आता दोन दिवस हा घरांच्या छप्पर, पत्र्यांवर, झाडयांच्या शेंड्यावर आणि रस्त्याच्या कचऱ्यावर, भेगाळलेल्या जमिनीवर, नदीच्या पारावर उनाड पोरांसारखा धिंगाणा घालीत होता. तेंव्हा तुळशीला पाणी घालता घालता बायको म्हणाली काय ओ ...हा पाऊस.....

   आज म्हटलं लेकीकड जाईल तर, म्हण गाड्या बंद....म्हणून मी मध्येच तीच वाक्य तोडीत म्हटलं आता पडतोय तर पडू दे की, तू ही बस की जरा निवांत. त्याचं काम चालू झालंय तर, तू सुट्टी घे ना....नाही तरी तुझा आपलं सारखं ...सकाळी उठल्या पासून...... रात्री बारा एक वाजे पर्यंत....नुसतं राबतच असतेस की! .....हे मी, आज एकदम कसं काय म्हणालो. हे माझं मलाच कळलं नाही. खर म्हणजे या अगोदर मला हे का सुचलं नाही. खरचं आपण स्त्रीच्या मनाचा आणि तिच्या कष्टाचा कधी एवढा विचार करतो का? का बरं आपण हा विचार करीत नाही. कसा करणार आपला पुरुषी अहंकार आडवा येतो ना.

  बाहेर पाऊस थांबायचं नाव घेईना, आता माझ्या मनातील आलेलं काही मला स्वस्थ बसू देईना. मी अंगा वरची गोधडी बाजूला केली. हातात मोबाईल घेतला थोडा काळोख होता म्हणून मोबाईलच्या लख्ख प्रकाशा मूळ डोळे दिपू लागले तरी तसाच हाताच्या मुठी करून डोळे चोळून घेतले. अन चिप चिपे डोळे मिचकवीत लिखाणासाठी मी नेहमी वापरत असलेलं सदर उघडलं.... जस आठवत गेलं तस लिहीत गेलो.

  पन्नास -साठ वर्षे काळ मागे सरकला. आणि एक पहाटेच साखर झोपेचं चित्र नजरेत तरळू लागलं. तीन रंगीत तुकडे जोडलेल लुगडं नेसलेली, गवताच्या गंजी वजा घरात राहणारी, सकाळी दिवस उगवण्याच्या आत विहिरीवरून ओढून पाणी शेंदणारी माझी आई रोज पहाटे बरोबर चारच्या ठोक्याला उठायची. घरात घड्याळ नव्हतं पण, जेंव्हा मला कळायला लागलं तेंव्हा हळू हळू लक्ष्यात येऊ लागलं की, आई बरोबर पहाटेचे चार वाजले की, वहिनीला साद घालून म्हणायची सकू.........असा तार सप्तकातला लांब सूर लावायची असं एक दोन वेळा म्हणून पुन्हा गोधडीत गप्पगार पडायची. हे सर्व मला कळू लागले तेंव्हा कळलं की, या रे बाप रे आईची सकू..... ही पहाटेची साद म्हणजे बरोबर पहाटेचे चार वाजले म्हणून समजा....हे तर मी, लहान होतो दोन-तीन वर्षांचा तेंव्हापासून पहात होतो. ऐकत होतो. 

  आई रात्रीच्या काळोखात बरोबर पहाटे चार वाजता नियमित उठायची. रात्री उशाला ठेवली काडेपेटी तशीच अंधारात चाचपडत असायची. काडेपेटी सापडली की, मग चिमणी शोधण्याची (चिमणी म्हणजे त्याकाळी लाईट नसल्यामुळे लोक बाटलीत कापडाच्या चिंधीची दोरी वळून वात करीत, ती रॉकेल मध्ये भिजवून बाटलीच्या बुचला भोक पाडून त्यातनू वर काढीत आणि बाटलीत रॉकेल भरून झाल्यावर नंतर वात पेटवीत) अन चिमणी पेटविली की, मग जो काही उजेड म्हणा नाही तर प्रकाश तो पडायचा आणि त्या मिणमिणत्या प्रकाशात सुपात ज्वारी नाही तर बाजरीचं पायली भर दाणे घेऊन, फाटलेलं दारिद्र्य लपवित तीन चिंध्याच्या पटकूरण झाकीत, जात्यावर दळायला बसायची...अन जात्याच्या खुंट्याला हात लावायच्या अगोदर दुनियाभरच्या नद्यांची आणि देवा दिकांची नावं घेऊन झाली की, जात्यावर पहिले दोन तीन वेढे भर भर फिरवायची आणि मग गायनाच्या मैफिलीत गायकाने जसा आलाप घ्यावा तसं उंच सुरात म्हणायाची...

पहाटेच्या गं पहारी, वारा वाही झुळू झुळू।

देवाजीचं नाव घेई, माझी लाडाची गं म्हाळू।।

कसा नाचत डुलत, वासुदेव येई दरी।

मोठं करील भाकीत, रामाच्या गं परी।।

नदी किनारी बैसला गं, माझा गोकुळचा हरी।

पाव वाजवतो कान्हा, माझा किसन मुरारी।।

शाळा न शिकलेली माय माझी, तिला हे सर्व येतं कसं.

म्हाळू म्हणजे माझी बहिण पण गाण्यात कसं चपल्लख बसावी की, अस वाटावं कोणी तरी ते लिहिलं अससव पण नाही रोज येऊ नवं गाणं ऐकू येई..... हे एक कोड होत...... तिच्या गाण्यात देव, धर्म, लेकीबाळी, भाऊ हे आवर्जून असणारच बघा...

माझा गं बंधू राया, कसा चाल गं ऐटीत।

शेला पागोटे उडवत, चाले गावात डुलत।।

माझा गं भाऊराया, त्याची वाघावाणी छाती।

त्याला दुरून पाहून गं वाटे, दुष्मणाला भीती।।

असे भावाबद्दल अत्यन्त प्रेम जिव्हाळा भरलेली गाणी सहज ओठावर येत असत.

   या ओळी कानावर पडल्या की, माझं शरीर आपोआप गद गदायला लागायचं. का? कुणास ठाऊक पण, आज कधी कधी अशी जुनी गाणी कोणी ऐकू आली की, मन सुन्न होतं. मग ती जात्यावरची म्हणा नाहीतर लग्नाच्या मांडवात. गावाकडे लगीन घरापुढे पूर्वी लोक मांडव घालीत आता घालतात पण, तेवढी मजा येत नाही. चार लाकडी मेढी रोवून, त्यावर आडवी समांतर सरळ लाकडी काठ्या अंथरतात. त्याच्यावर विविध झाडांच्या फांद्या टाकून मांडव झाकतात. आपापल्या गावातील किंवा शिवारातील ज्यांच्याकडे बैलगाडी आहे अश्या शेतकऱ्याला तो मांडव झाकण्यासाठी विविध झाडांच्या फांद्या तोडून आणण्यासाठी बोलावले जाते. आता या तोडलेल्या झाडांच्या फांदया सुद्धा विशिष्ट झाडांच्याच असतात. उदा.आंबा, उंबर, जांभूळ आणि सोबत केळीचे खांब. आता अलिकडे हे बरच कमी झालं आहे. लगीन घरी नातेवाईक मंडळी हे सर्व स्वखुशने वाजत गाजत लेझीम खेळत घेऊन येतात, आणि मांडवाच्या दारी हा सर्व लवा जमा आला की, लग्न घरातील स्त्रीया त्यांना औक्षण करतात. लग्न घरातील मालक त्यांचा यथोचित मान सन्मान करून, त्यांच्या बैलांची पूजा करतात. याच वेळी लग्न घरातील चार-सहा बायका एकत्र येऊन या लग्नाच्या मांडवात, मांडव डहाळ्याचे वेळी ताला-सुरात काही गाणी गातात ती ऐकू आली की, मला पुन्हा गट काळ आठवतो. डोळ्यात पाणी येतं मला रडायला होत. का? ते अजून समजलं नाही. उलट ही गाणी तशी मनाला उत्साह देणारी पण, मला ती रडवतात. असो

सांगायचं मुद्दा असा की, एवढ्या भल्या पहाटे आई उठायची दळण दळायची तिच्या त्या जात्यावरच्या ओवीन मी जगा होई आणि हे भलं मोठं भोकाड पसरत असे. दळण दळता दळताच ती हाताने खुणवायची. लहान होतो म्हणून, पहिल्यांदा कळायचं नाही. मग आई तसाच हात पुढं करून, माझं अंथरून पुढं ओढायांची अन माझं डोकं तिच्या मांडीवर घेऊन एक हातानं हळू हळू थोपटीत असे. या तिच्या उबदार हाताच्या थोपटण्याने मी, हुंदके देत पुन्हा कधी झोपी जाई, हे माझं मला कळायचं नाही. नंतर कळू लागल्यावर, तिच्या जात्याचा आवाज आला की, मी ही तिच्या इशाऱ्यावर नुसार तसाच गोधडी सकट, सरकत सरकत जावून नेहमी प्रमाणे झोपी जात असे. मी झोपी गेल्यावर कधी तीच कधी दळण दळून होई हे कळायच नाही. तीच दळण झालं की, जात्या भोवतालंच पीठ भरून घेई, जात्याच पाळ साफ करून, मग ती चूल पेटवायला सुरवात करायची. तो पर्यंत पूर्व क्षितिजावर लाली पसरलेली असायची.

  चूल पेटवनं म्हणजे आताच्या गॅस पेटवण्यासारखं नव्हतं. कधी कधी पावसात भिजलेली ओली लाकडी लवकर पेट घेत नाहीत. सादळलेली कडेपटीतली कडी तिचा लावलेले गुल उडून जाऊन गुळगुळीत होई पण, ठिणगी पडायची नाही. आणि थोडस पेटवून पुन्हा चूल जर विझली तर, घरात हे धुराच साम्राज्य पसरत असे. मग सकाळी सकाळी वडील मंडळींची झोप मोड झाली म्हणून ओरड सुरू, लहानच तर काय विचारायला नको. त्यांना दोन धपाटे घालून गप्प करता येत पण, वडीलधाऱ्या माणसांची तोंड कोण गप्प करणार? गप्प गुमान ऐकून घेत आपलं काम करीत राहायचं बोलायचं नाही. पूर्वीच्या वडीलधाऱ्या मंडळींना पुन्हा उलट उत्तर चालत नसे. म्हणून तोंड दाबून मुक्याचा मार म्हणतात तस्स गप्प राहून आपलं काम उरकून पुढील कामाला निघून जायचं. 

   विझलेली चूल कशी तरी फुंकणींन फुंकून फुंकून पेटवायची. चुलीवर तवा टाकून तो तापू लागला की, मग भाकरीचं पीठ मळायला घेई. ते परातीत नाही तर, काठवटीत हाताने गोल भाकर थापून झाल्यावर तव्यावर भाजायची. पूर्वी या मातीच्या चुलीला एक जोड चूल असे तिला आऊल शेगडी म्हणत. या अवलावर मातीच्या मडक्यात कालवण शिजायला टाकलं जाई, म्हणजे भाकरी तयार होत असताना, पलिकडे अवलावर कालवण किंवा आमटी शिजत असे. यासाठी या बाईला किती तरी वेळ उठ बस करावी लागत असते. हे सर ती बिन बोभाटा करीत असते. तरी वेळेत जर जेवण तयार झालं नाही तर, मग तिच्या माहेरची सर्व मंडळी शिव्यांच्या रूपाने आई समोर हात जोडून उभी असतं. 

  हे मला कळू लागल्यावर मी, अनेक वेळा आईला रडताना पाहिले आहे. शेतात कामाला गेली की, कधी तरी मध्येच तिला काही तरी आठवण होई आणि ती हुंदके देऊन रडत रडतच शेतातील काम करीत असे पण, कुणाला काहीच सांगत नसे. बरं ती सांगणार कोणाला? सांगून काय उपयोग. कोणी एकणारं तर हवं ना? त्यावेळी सर्व बायकांची हीच तर दुःख होती. घरोघरी मातीच्या चुली अशी गत. सांगणार कोण? अन कोणाला? आपलं दुःख, सुख मनातल्या ठेवायचं आणि हसत मुखाने आलेल्या प्रसंगासला सामोर जात, आलेला दिवस ढकलत जीवन जगायचं. आई-बापाला सांगायचं तर, ते म्हणणार हे असंच असतं बाई. संसार म्हटलं की, सुख-दुःख ही येणारच. लगीन झालं की, नवऱ्याचं घर कितीही संकट अली तरी सोडायचं नाही. आई-बापाच्या नावासाठी तिथंच राहायचं आणि तिथंच कुढत जगायचं. नवऱ्यानं मारलं आणि पावसानं झोडलं तर कुणाला सांगणार....

  असे ते दिवस होते तरी, माणसं कडू वाटणारा संसार, सुद्धा, आनंदाने सुखाचा करून मनातल्या मनात गोड मानीत आणि मनात कुढत संसाररूपी गाडा ओढत होती. त्यातही उद्याचा दिवस चांगला येईल सुखानं म्हणून जगत होती. 

 हे सारं बायका किती आनंदानं करतात. सकाळी चार वाजता उठल्यापासून दिवसभर शेतात राबून नाही तर दुसऱ्याच्या शेतात काम करून आल्यावर पुन्हा संध्याकाळी मुला-माणसांचं करता करता जेवण तयार करणं, झाड-लोट, भांडी-कुंडी घासून ती धुवून पुसून परत मांडणीत लावण, कपडे धुणे, वाळू घालून सुकल्यावर पुन्हा घड्या घालून व्यवस्थित ठेवणं, मुलामाणसांची आणि स्वतःची अंथरून घालणं आणि सकाळी पुन्हा ती काढून घडी घालून ठेवणं, ही सारी काम मशीनच्या वेगान करणारी माझी आई मला आठवते तेंव्हा, आता मला कळत की, घरातल्या बाईला किती काम पडतं. तरी ते ती विना तक्रार आनंदाने एक पै चा मोबदला न घेता करते. तरी घरातली बिन कामाची माणसं पुन्हा वर तोंड करून तिलाच प्रश्न विचारतात. त्यांच्या अंगातल्या मळकट बंडी, टोपी, टॉवेल पासून ते ढुंगणाच्या धोतराचा सोग्या पर्यंत सर्व पुरुष मंडळींच्या हाती डायव्ही तरी, एक दिवस जर धोतर लवकर सापडलं नाही तर किती गहजब करतात, ओरडतात याच दुःख होत. कधी कधी अस वाटतं की,...

  या हो वाटतं काय मी, असं वाटतं या कल्पनेत कळायला लागल्यावर रमलो नाही. घरचं आठरा विश्व दारिद्र्य होत. त्यात बापाचं रोज नको नको ती कारण काढून आईला मारण, शव्या शाप देणं हे माझ्या आता सहनशक्ती बाहेर गेलं होत. मोठे भाऊ-बहीण होते पण तेही गप्प असे. मोठा भाऊ तर, मामाच्या घरी पळून जाई मी, मात्र तिच्या पदराच्या आड लुडबुडत राही. नात्याच्या सर्व मंडळींना माझ्या बापानं कधी तरी, थोड्या फार प्रमाणात प्रसाद दिला होता. त्यामुळे कोणीच मध्यस्थी करीत नसतं. मुळात आमच्या बापाला एक हात नव्हता. मग काम कसं करणार. म्हणून रानात जनावर चरायला घेऊन जाणे आणि संध्याकाळी गोठ्यात आणून घालणे. हे साध्य सरळ काम त्यांना दिल जाई, पण तेही सरळ करतील तर ना. गुर बांधून झाली की, दिवस भर ज्या ज्या जनावरने त्रास दिला त्याचा तोंडावर काठीने मारणे. हा त्यांचा रोजच उधोग असे. मग दुसऱ्या दिवशी ते जनावर यांच्या वाऱ्यालाही उभं राहतं नसे. आता काय त्याचा राग घरातल्या माणसांवर निघे. घरातलं माणूस कोण? तर आमची आई हक्कन शिव्या शाप ऐकून घेणारी ती एकटीच बापाला सापडे, आणि ती जर काही समजून सांगू लागली की, लगेच तिलाच मारझोड सुरू...मग कोण कशाला जाईल मध्ये. कधी कधी तर जनावर रक्तबंबाळ होत. असं सारं मी, रोज अनुभवत होतो. मनात असूनही लोक लाजेसाठी गप्प होतो. लोक म्हणतील बघा पोटच्या पोरानं बापावर हात उगारला. 

  आता मला चांगलं कळत होतं. दिवे लागणीची वेळ होण्याला अजून अवकाश होता. गोठ्यात गुरं बांधून आम्ही बाहेर येत होतो. आई सुपात ज्वारी घेऊन दारा जवळ उजेडात पाखडीत होती. त्या सुपातले ज्वारीचे काही दाणे पाखडताना खाली जमिनीवर पडले होते. दिवसभर शेतात काम करून ती दमून भागून आली तरी, तीच रोजच काम ती करीत होती. आता ज्वारीचे दाणे जमिनीवर पडलेले आमच्या बापाने पाहिले आणि काय झाले कुणास ठाऊक, ते आईवर ओरडू लागले. दिसत नाही का? डोळे फुटले का? फुकट गिळायला मिळतं. नीट काम करायला नको. आई गप्पच होती. 

  आता ते सुपातून उडालेले सांडलेले दाणे. बरं ती ते तसच टाकून जर निघून गेली असती तर, आपण समजू शकतो की, आईने चूक केली. सांडलेले परत भरले किंवा उचलले नाही, पण तीच काम सुरू आहे ना. मग एवढं रागावणं कशासाठी? बरं दोन दाणे उचलून सुपात टाकायची दानत नाही. मुळात स्वतः चार पैसे कमवायचे नाहीत. मग ही माणसं एवढं आकांड-तांडव का करतात बरं? मला काहीच कळले नाही. त्यात आई म्हणाली माझं पाखडून झालं की, भरते.

  बस्स जणू ते आई कधी बोलते याचीच ते वाट पहात असावेत. म्हणजे आज रानात गुरांनी भरपूर सतावलेले असणार हे समजून घ्यावे, पण आईला हे कळणार कसं. तिने शब्द उच्चारताच एखाद्या शत्रू सैन्याने तुटून पडसाद तसा आमचा बाप अंगात बारा हत्तीचं बळ आल्यागत लगेच गुरांना मारण्यासाठी जी काठी हातात होती तिनेच ते आईला मारू लागला. अचानक के झालं म्हणून घरातले बाकीची मंडळी घाबरून बाहेर पळाली. मी, अंगणात उभा होतो. हे रोजच होत, पण आज तर , मी प्रत्येक्षात पहात होतो. आरोपी आणि गुन्हेगार मला माहीत होते. माझा संताप अनावर झाला. हातात मारण्यासारखं काही नव्हतं. म्हणून बापाला मोठं-मोठ्याने शिव्या देऊ लागलो. मग बापाच्या सर्व सात पिढ्यांचा उद्धार करून झाला. बापाचे सर्व पितर रस्त्यावर आल्यावर घरातून बाहेर पळलेल्या मंडळींना माझ्या संरक्षणाची जाणीव झाली असावी. ही मंडळी पुन्हा जवळ आली आणि मला पळून जाण्यासाठी इशारे करू लागली. पण माझं तोंड काही बंद होईना.....

  आता बापानं आईला मारण बंद केलं होतं. त्याची चाल माझ्या लक्षत आली. तो माझ्यावर मोर्च्या वळवणार तोच मी, धूम ठोकली थेट मोठ्या चलत्याच्या घरात. मी, आता येताच माझ्या चुलत भावांन आतून कडी लावली. आमचा बाप माझा बाप चुलत्याच्या दरवाजाला लाथा मारून मला शिव्या देऊ लागला. हा फुकटचा तमाशा बघायला आजूबाजूचे लोक जमले होते. होते सर्व नात्याचे पण बाप आमचा कसा आहे सर्व जणू होते, तरी लोक म्हणाले या रे आप्पा!! आता पोरं मोठी झाली तरी, त्यांच्या समोर तू त्यांच्या असला गुरावांनी काही कारण नसताना मारतो. हे रोज ते बघतात आम्ही बघतो. असं कीती दिवस चालायचं आम्ही एक ऐकून घेतलं म्हणून सर्वच कस काय तुझं ऐकून घेतील. आताची पोरं नाही ऐकणार आप्पा!!! बरं त्याने दुसरी काठी घेऊन तुझं डोकं फोडलं असत मग? झाली पोलीस केस. म्हणजे हे पोरगं आता तू काय लई तिर मारला असतास का? राग तुला येतो. तसा त्याला आला असलं ना. आता आमच्या घराला लाथ मारून आमचं दार तोडणार आहेस का? का? या पोराला मारणार आहेस? तुझं पोर आहेत तू काय ते कर, आणि चुलत भावाने दरवाजा उघडला......

   बापाच्या हातातली काठी गळून पडली. बाप आल्या पावली माघारी फिरला, पण या प्रसंगानंतर आमच्या बापानं पुन्हा आमच्या आईवरच काय घरातल्या कोणाशी माणसावर हात उगारला नाही, आणि मला ही काही चार बोटं लावली नाहीत. तस मला कधी लहान असतानाही मारलं नाही की, वाईट-वंगाळ बोलला नाही, पण त्याला काही त्रास झाला की, तो सर्व राग आईवर काढीत असे. अमच्यासारखच आईला कळत नव्हतं की हा माणूस दुसऱ्याचा राग आपल्यावर का काढतो. पण आता सर्व कसं छान सुरू होत. 

  आता तर आमचा बाप कुणाच्या घरी काही झगडा झाला तर, कुठं सासू-सुनेचं, बाप-लेकाच पटलं नाही तर, अभिमान सांगायचा, भांडण-तंटा करून काही होत नाय. उगा डोक्यात राग आपल्याच घराची इज्जत जाती. लोक बी हसत्यात आणि अब्रू बी जाती. माझ्या पोरानं मला माणूस बनवलं नाही तर मी हैवान झालो हुतो. 

  मी नंतर विचार केला की या माणसात एकदम कसा बदल झाला. उलट आणखी क्रूर, खुनशी बनायला पाहिजे ना? तस काहीच झालं नाही. आणि मग लक्षात आलं. यांना एक हात नाही, म्हंटल्यावर कोणीही लहानपणापासून त्यांचे मित्र मंडळी आणि आता मोठी माणसं यांची टिंगल टवाळी करीत असायची हे त्यांना कुणाकडून तरी कळत असे. मग त्यातून वाद-विवाद, भांडणं, होती. त्यात स्वतःला काही काम करत येत नाही म्हणून घरच्या नाते मंडळींची हेटाळणी, असं समजलं की, घरातल्या सर्व लहान थोरांची लग्न झाली, पण, यांना कोणी मुलगी देईना. ना करतेपणाची छाप त्यांच्या मनावर कोरली होती. म्हणून ते कधी कधी बैराग्या सारखी वस्त्र परिधान करून वैराण जंगलातून एकटेच हिंडत असे दऱ्या-खोऱ्यातील मंदिर धुंडाळून पुन्हा आपल्या घरी येई. माणसाला लहानपानापासून घरात किंमत नसेल तर, ते माणसात माणसासारख राहणार कसं. म्हणून आपल्या पेक्षा कमी शक्तीच्या माणसाला ते त्रास देतं की, त्याला ते प्रतिकार करणार नाही आणि अशी वस्तू म्हणजे स्वतःचीच बायको. लोक म्हणतात पोरगा बिघडला मग काय त्याच लग्न करा म्हणजे सुधारेल. आणि लग्नास नंतर नाही सुधारला तर, तुझ्यामुळे आमचा पोरगा बिघडला हे सांगायला घरचे तयारच असतात. म्हणजे मुळातच यांचा मुलगा दारुड्या असतो आणि लग्न झाल्यावर तुझ्यामुळे आमचा पोरगा दारुड्या झाला असे म्हणतात. याला चोराच्या उलट्या बोंबा असं म्हणतात. एवढ्या यातना सहन करून ती बाई आपली संसाराची नौका तरते तरी, लोकात मान सन्मान पुरुष जातीचाच होतो. आई-बापाच्या नावासाठी आपल्याला न शोभणाऱ्या धटिंगणाबरोबर संसाराचा सारीपाट मांडायचा आणि तो यशस्वी करून दाखविण्याचे धाडस फक्त अन फक्त एक स्त्रीच करु शकते. मग ती अबला कशी असेल. ही गोष्ट तर ५०/६० वर्षांपूर्वीची आहे. या अगोदर किती भयाण वास्तव असेल, काही कल्पना करता येते. आणि आजही पहा जिथे दारिद्र्य, दुष्काळ आणि कर्ज बाजारी लोक आहेत त्यांच्या बायका आत्महत्या नाही करीत. म्हणजे स्रियांपेक्षा पुरुष कमकुवत आहे. बाईत जगण्याची हिम्मत असते. तिला फक्त प्रेमाची अन चांगल्या विचारी माणसाच्या सोबतीची गरज आहे.


Rate this content
Log in

More marathi story from Gajendra Dhavlapurikar

Similar marathi story from Tragedy