Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!
Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!

SAMPADA DESHPANDE

Action Thriller

4.4  

SAMPADA DESHPANDE

Action Thriller

ती लाल खोली - अंतिम भाग

ती लाल खोली - अंतिम भाग

10 mins
1.1K


महादेवशास्त्रींचा वृत्तांत वाचताच आपल्या मनात निलयचे नाव का आले हे तुषार सांगू शकत नव्हता. तरीही त्याला खात्री होती की हाच तो आहे जो त्या ठराविक तिथीला ती लाल खोली उघडू शकेल. राजकुंडचे वर्णन केलेला भाग भारत आणि श्रीलंकेच्या मधला भाग असावा किंवा थोडासा तिरका जाऊन पुढे असणारा भाग असावा. हजारो वर्षांत जमिनीच्या उलथापालथीत भूभागात खूप बदल झाले होते. महादेवशास्त्री हुशार होते त्यांनी दिलेल्या खाणाखुणा आजही लागू पडतील ही त्याला आशा होती. मग त्याला बरोबर कोणाला घ्यायचे हा प्रश्न होता. तो माणूस विश्वासू हवा. महादेवशास्त्रींच्या सहकाऱ्यांनी ज्याप्रमाणे त्या बेटावरून पहिल्या वेळेस त्यांना परत आणलं तसाच त्यालाही परत आणणारा कोणीतरी साथीदार असायला हवा होता. त्यासाठी निलय हाच एक पर्याय होता. मग तुषारने त्याला विश्वासात घेऊन सर्व सांगितलं. हे दार फक्त निलयच उघडू शकतो हे वगळले. कारण क्युरिओसिटी किल्स द कॅट, या म्हणीप्रमाणे व्हायचं. निलय नको ते करून बसायचा आणि त्याच्याबरोबर सगळं जग धोक्यात आणायचा. तुषार सामानाची जमवाजमव करत होता. ते इथूनच गाडी घेऊन निघणार होते.

     

निघताना इतर सामानाबरोबर तुषारने एक मोठा आरसा घेतला होता. ३ दिवस प्रवास करून शेवटी महादेवशास्त्रींनी सांगितलेल्या गावाजवळ ते पोहोचले. नाविकांचा तो गाव आता अस्तित्वातही नव्हता. तिथे नुसतं ओसाड होतं. काही कोळ्यांच्या झोपड्या होत्या. तसा हा भाग जास्त वावराचा वाटत नव्हता. मग तुषारने एक नाव मिळवली. त्यात एक दिवसासाठी लागणारे अन्न-पाणी भरले. महादेवशास्त्रींच्या वृत्तांतानुसार त्या बेटावर आपल्या जगातील कोणतीच गोष्ट घेऊन जाऊ शकत नव्हतो त्यामुळे त्यांनी फक्त निलयची सोय होईल इतकेच सामान घेतले. काळोख पडल्यावर ते त्या ओसाड गावात फिरू लागले. तुषारला त्या वृद्ध माणसाच्या झोपडीची जागा शोधायची होती, ज्यांनी शास्त्रींना मदत केली होती. खरंतर तिथे काहीच नव्हते. नुसतं ओसाड नि खुरटी झुडपे, तुषार मात्र बारीक नजरेने शोधत होता. निलय कंटाळून तिथल्याच एका खडकावर बसला आणि तुषारचे डोळे चमकले. "हे बघ निलय" ! निलयला काहीच दिसत नव्हते. तुषार निलय बसलेल्या खडकाकडे पाहत होता. "अरे ! तू बसला आहेस ना? तो खडक नाहीय, ती फार जुनी गावाची वेस आहे. अशी वेस गावाच्या शेवटी असायची. म्हणजे त्या माणसाची झोपडी इथेच असणार." तुषार काही पावलं चालून एका ठिकाणी बोट दाखवत म्हणाला.  तुषारकडे काही आधुनिक उपकरणे होती. ती त्यांनी स्वतः बनवून घेतली होती. ती त्याला अनेकदा ऊपयोगी पडत. ती दिसायला छोटी मात्र खूप कामाची असत. अशाच एका उपकरणाने त्याने जमीन खोदायला सुरवात केली. त्या माणसाच्या झोपडीची जागा खोदून तुषारला काय मिळणार हे निलयला समजत नव्हते. इतक्या हजार वर्षांनंतर काय राहिले असेल शंकाच होती. तरीही तो बघत बसून राहिला. हळूहळू खड्डा मोठा होत होता. इतक्यात तुषारने जोरात हाक मारली, तसा तो धावत गेला. पाहतो तर काय! त्या जागी एका घराचे अवशेष होते. इतकंच नाही तर त्या झोपडीखाली छोटे तळघर होते त्याचे दार अजून शाबूत होते. जरा जोर देताच ते उघडले.


तुषारने मेणबत्ती पेटवली. ते खाली गेले. ती एक अगदीच छोटी खोली होती. त्यात जुने सामान होते. कपड्यांच्या तर चिंध्या झाल्या होत्या. जुने मासे पकडण्याचे गळ, जाळ्या असे सामान होते. मग तिथे भिंतीत एक कोनाडा होता. नीट पहिला नसता तर दिसलाच नसता. त्यात एक हस्तिदंती पेटी होती. ती घेऊन ते बाहेर आले व माती पूर्वीसारखी केली. ते घेऊन त्यांच्या नावेत आले. त्यात एक छोटी केबिन होती. ती अगदीच नावाला होती. तरीही डोक्यावर छत तर होतं. त्यांनी मेणबत्तीच्या उजेडात ती पेटी उघडली. आत काही लेख होते. ते अतिशय पातळ धातूच्या पत्र्यावर लिहिलेले होते. नीट पाहिल्यावर तो धातू चांदी आहे हे त्यांच्या लक्षात आले. तो लेख दुर्मिळ वाणीत होता. निलय दमून झोपून गेला. तुषार लेख वाचू लागला. त्या लेखात नरकद्वाराची माहिती होती. राजकुंडावर त्या द्वाराचे एक टोक होते. प्रथम त्या बेटावर जाऊन पुढील मंत्र ठराविक लयीत बोलले की ते द्वार उघडून त्यात अडकलेले जीव मोकळे होतील त्याच क्षणी दुसऱ्या टोकाचेही द्वार उघडेल आणि मग त्यांना कोणीही थांबवू शकणार नाही. विशिष्ट जन्म तिथीवर जन्मलेला राजलक्षणी, देखणा, निळे डोळे असलेला तरुण हे द्वार उघडू शकेल. राजकुंडावर असे रहस्य आहे की ज्यामुळे ते द्वार उघडताच क्षणी जर बंद केले तर पृथ्वी वाचू शकेल पुढील ५ हजार वर्षांसाठी. मग ते द्वार उघडण्यासाठी असलेला मंत्र होता. तुषारने परत परत तो लेख वाचून काढला. पुढे तो मंत्र व तो कसा वाचायचा याची माहिती होती. मग ते द्वार उघडणारा तरुण दुसरा तिसरा कोणी नसून निलयच आहे ही त्याची खात्री पटली. कारण निलय राजलक्षणी, देखणा आणि निळ्या डोळ्यांचा होता, म्हणूनच त्याला निलय हे नाव ठेवले होते. हा निलय नक्की महाराजांच्या वंशातील असावा ज्यामुळे त्याच्यात हे सर्व गुण आले. मग तुषार झोपला. तुषार गाढ झोपताच निलयने उठून ती पेटी उघडली व तो लेख वाचला. अंधारातही त्याचे निळे डोळे चमकत होते. त्याला त्या बेटावरचा खजिना हवा होता. ४ दिवसांपूर्वी जेव्हा तुषार सामान आणायला बाहेर गेला होता तेव्हा एक साधू आले होते त्यांचे नाव दुर्वासनाथ होते. त्यांनी निलयला राजकुंडावरील खजिन्याबद्दल सांगितले. जर त्यांनी राजकुंडावर जाऊन ते द्वार उघडले तर तो अपार संपत्तीचा मालक होईल. त्या द्वाराचे दुसरे टोक म्हणजे त्याच्या वाड्यातला दरवाजा होता. दुर्वासनाथांनी निलयला दुर्मिळवाणी कशी वाचायची हेही सांगितले होते. ही गोष्ट तो तुषारला सांगणार नव्हता. निलय तुषारच्या मागोमाग जाणार होता. एकदा का ते बेटावरील द्वार उघडले की मग त्यांना नावेची गरज भासणार नव्हती कारण ते तडक त्यांच्या तळबीडच्या वाड्यात निघणार होते.    


दुसऱ्या दिवशी सूर्योदय होताच ते पूर्वेकडे निघाले. तुषारकडे कंपास होता त्यामुळे चुकण्याची शक्यताच नव्हती. मधेच बारा वाजता त्यानी खाऊन घेतले. एक जण आराम करत होता तर दुसरा नाव चालवत होता. हळूहळू सूर्य मावळतीकडे झुकायला लागला. निलयने आरसा ठराविक कोनात ठेवला. मग दोघेही आरशाकडे पाहू लागले. तुषारने निलयला सूचना देऊन ठेवल्या होत्या. काही झालं तरी दुसऱ्या दिवशीच्या सूर्यास्ताला आरसा परत त्याच कोनात आला पाहिजे. निलय सगळ्याला हो म्हणत होता. परंतु त्याच्या मनात काही वेगळेच चालू होते. मग अचानक आरसा धूसर दिसू लागला. समोर पाहताच एक बेट नजरेसमोर साकार झाले. काय होणार हे माहित असूनही निसर्गाचा हा चमत्कार पाहून दोघेही अवाक झाले. तुषारने पोहण्याचे कपडे घालून उडी मारली व पोहत पोहत तो समोरील बेटाकडे निघाला. तो बेटापर्यंत पोहचताच निलयनेसुद्धा उडी मारली आणि बेटाकडे निघाला. निलय बेटावर पोहोचताच सूर्य पूर्ण मावळला. नीट अंधार पडेपर्यंत निलय इथेच थांबणार होता. आज रात्री १ वाजता दार उघडायचे होते. बाहेरच्या जगातील आणि या बेटावरील तिथी वेगळ्या होत्या. ही गोष्ट तुषारच्या लक्षात आली नव्हती. तो आपल्या हातात अजून वेळ आहे असेच समजत होता. तुषार त्या खडकाळ बेटावर उतरला. क्षणभर विश्रांती घेण्यासाठी थांबला. शास्त्रींनी वर्णन केल्याप्रमाणे तिथे खडकात कोरलेले भयानक चेहरे होते. ते पाहून तुषारच्या अंगावर काटा आला. हे बेट नक्की मानवनिर्मित नाही असे त्याला वाटले. शोधत शोधत तो निघाला. खूप वेळ शोधल्यावर त्याला ते द्वार सापडले. त्याने हाताने त्यावरची माती साफ केली. परंतु त्या द्वारावर फक्त शास्त्रींनी सांगितलेला लेखच होता. मग ते दार बंद करण्याचा मार्ग कुठे सापडेल? त्याला काही समजेना. इथे त्याच्या शक्तीही क्षीण झाल्यासारख्या वाटत होत्या. तो सारखं त्याच्या गुरूंचे स्मरण करत होता. चालत चालत तो दरवाजाच्या विरुद्ध दिशेने गेला तिथेही मोठे दगड होते. ते नीट झाडांच्या आकारात कापलेले होते. रात्र वाढत चालली होती. तो जीव तोडून शोधत होता. तिथे स्वच्छ चंद्रप्रकाश होता त्यामुळे त्याला नीट दिसत होते. चालत तो पुढे निघाला त्या दारापासून आता तो जरा अंतरावर आला होता. ती जागा वेगळीच होती. झाडांच्या आकाराचे दगड एका वर्तुळात उभे होते. तुषार वर्तुळाच्या आत जाऊ लागला, तशी जागा लहान लहान होत गेली. तो एखादा भुलभुलैय्या वाटत होता. आत जाताच तुषारला एक छोटेसे देऊळ दिसले, त्याने आत जाऊन पहिले तर त्यात विष्णूची मूर्ती होती. म्हणूनच या ठिकाणचे वातावरण वेगळे आणि पवित्र वाटत होते. तुषारने मूर्तीला मनोभावे नमस्कार केला आणि जगावर येऊ घातलेले हे संकट दूर करण्याची शक्ती दे, अशी प्रार्थना केली. मग त्याने आपला शोध चालू केला.  


थोड्याच वेळात त्याला जोरजोरात मंत्र पठणाचा आवाज येऊ लागला. काय होतंय हे लक्षात यायलापण काही वेळ गेला. मग तो धावतच त्या लाल खोलीच्या दरवाजाकडे निघाला. पाहतो तर काय निलय त्या दाराजवळ उभा राहून मंत्रपठण करत होता. तुषारला काय होतंय याचा अंदाज आला पण आता उशीर झाला होता. ते दार उघडायला सुरवात झाली होती. तुषारने निलयला आणून मोठी चूक केली होती. आता पश्चाताप करून काहीच उपयोग नव्हता. नक्कीच निलयला कोणीतरी भरीस पाडले असणार याची त्याला कल्पना आली. समोरचे दार हळूहळू उघडत होते. महादेवशास्त्रींना ते दार बंद करायचा मार्ग माहित झाला होता. तसाच तो तुषारलाही समजला होता. शास्त्री परत येऊ शकले नाहीत त्यांना आपला प्राणत्याग येथेच करावा लागला होता. त्यांना त्याची पर्वाही नव्हती. आपण इतके महान आहोत का? तुषारच्या मनात खळबळ माजली होती. "माझ्या बाळा! चल पुढे मी आहे तुझ्याबरोबर. आता माघार घेऊ नकोस. मी एक सामान्य मानव होतो तरीही मी आपल्या लोकांना वाचवणे महत्वाचे मानले. तुझ्यात तर अलौकिक शक्ती आहेत, तुझ्यासोबत तुझे गुरु आहेत. आता मागे वळून पाहू नको. लक्षावधी लोकांचे जीवन महत्वाचे की तुझे हा विचार कर." एक आवाज त्याच्या मनात घुमला. मनावर आलेले मळभ दूर सरले. तुषार युद्धासाठी तयार झाला. 

        

     मग तो धावतच दाराजवळ आला. आधी त्याने मंत्रपठण करणाऱ्या निलयला दारापासून दूर ढकलले नाहीतर पहिला बळी त्याचाच गेला असता, जसा महाराजांचा गेला होता. तो बेभान अवस्थेत होता. तुषारने ढकलताच तो बेशुद्ध झाला. तुषारला त्याच्याकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. मग तुषार दार आणि बाहेरचे जग यामध्ये स्वतः भिंत बनून उभा राहिला. तो विष्णूच्या देवळात गेला असताना त्याला विष्णू सहस्त्रनामानेच तो दरवाजा बंद होईल हे तेथे काढलेल्या चित्रावरून समजले. जिथे विष्णू-सहस्रनामाचा जप होतो तिथे स्वतः विष्णू असतो आणि तोच त्या दरवाजातून बाहेर पडणाऱ्या जीवांना थांबवू शकणार होता. तुषारने समोर पाहिले समोर साक्षात नरकलोक होता. खोलखोल आत जाणारा. सर्वत्र रक्ताच्या नद्या वाहात होत्या, त्यातून भयानक असे दिसणारे प्राणी फिरत होते. उकळत्या लाव्हारसाप्रमाणे सर्वत्र ते रक्त उसळत होते. काही प्राणी माणसांना बांधून त्यांना पेटत्या आगीत ढकलत होते तर काही त्यांना भक्षण करत होते. प्रचंड उष्णता त्या वातावरणात होती. जर आपण पृथ्वीला वाचवले नाही तर पृथ्वीची काय अवस्था होईल हे पाहून तो बेचैन झाला. त्याचा निश्चय अजून पक्का झाला आणि तो पाय रोवून उभा राहिला. 

    

त्याने मोठया आवाजात सुरवात केली "ओम, शुक्लबरंधर विष्णू शशिवर्णम चतुर्भुजं..." तो न थांबता अखंड बोलत होता. समोरच्या उष्णतेच्या झळा त्याला लागत होत्या. त्याच्यासमोर मानवसदृश प्रचंड जीव साकार होत होते. लवकरच ते त्याच्या जगात प्रवेश करणार होते. ते अत्यंत प्रचंड होते, त्यांचे रूप तुषारने विष्णुमंदिराच्या भिंतींवर काढलेल्या चित्रात पहिले होते, तरीही त्याचा थरकाप होत होता. त्याच ठिकाणी त्याला एक खंजीर मिळाला होता. तोही आता त्याच्याजवळ होता. तुषार अखंडपणे विष्णू सहस्त्रनाम जपत होता. त्याला ज्याप्रमाणे समोरचे जे जीव जाणवत होते त्याचप्रमाणे त्याला आपल्या सोबत असलेल्या शुभ शक्तीसुद्धा जाणवत होत्या. त्याचे गुरु, महादेवशास्त्रींचा आत्मा. त्यांनी आजपर्यंत केलेली तपश्चर्या पणाला लावली होती. तरीही तो थकला कारण त्याच्या मानवी शरीराला शेवटी मर्यादा होत्या. तो मनोमन श्रीविष्णूचा धावा करत होता. इकडे पाताळातून वर येणारे ते प्राणी जवळजवळ येत चालले होते. तुषार बेशुद्धीच्या कडेवर होता. आपली मर्यादा संपली हे त्याला समजत होते. मग जवळच्या खंजिराने त्याने दाराच्या बाहेर रेषा आखली इतक्यातच ते जीव दारापर्यंत येऊन पोहोचले. त्याच क्षणी तुषार कोसळला. कोसळताना त्याला आकाशातून एक शुभ्र प्रकाश त्या दारावर पडताना दिसला आणि ते द्वार बंद झाले. श्रीविष्णू त्याच्या मदतीला आले होते. वाईट वेळ सरली होती. एक सुंदर सकाळ झाली होती.


तुषारला निलयच्या हाकांचा आवाज येऊ लागला तेव्हा त्याने कष्टाने डोळे उघडले. दुपार झाली होती. "अरे! कधीपासून तुला हाक मारतोय घाबरवलंस ना मला." निलय काळजीने बोलत होता. तुषार उठून बसला. समोर त्याचा घाबरलेला निरागस मित्र निलय होता. ज्याच्यावर तो मनापासून प्रेम करत होता. रात्रीचे निलयचे मंत्रपठण करणारे रूप आठवून तुषारच्या अंगावर काटा आला. कोणत्या भयानक संकटाला त्याने आमंत्रण दिले होते! ही त्यालाही कल्पना नव्हती. तुषार उठल्यावर त्याने अपराधी चेहऱ्याने त्याची माफी मागितली. त्याला दुर्वासनाथानी कसं भरीस पाडलं हेही त्याने सांगितले. "पण एक सांग तुषार हे दुर्वासनाथ इतकी हजारो वर्षे कसे जिवंत राहिले?" निलय नि विचारले.

"निलय आपण जसे देवाचे भक्त आहोत तसे दुर्वासनाथसारखे लोक या वाईट शक्तींचे भक्त आहेत. या जगात चांगल्या आणि वाईट दोन्ही शक्ती आहेत. महाराजांना भेटलेला दुर्वासनाथ हा नसेलच. तेच नाव घेऊन ती परंपरा त्याचे शिष्य चालवत असतील. कोण जाणे!" "अरे मी तर नाव सोडून आलो आता आपण जाणार कसे ? मला वाटलं की हा दरवाजा उघडला की मला खजिना मिळेल मग आपण पलीकडे आपल्या वाड्याच्या लाल खोलीतून बाहेर निघू. मग नावेची काय गरज आहे? आता काय ते करायचे?" "हे बघ निलय आपल्याला देवच मार्ग दाखवेल. चल आपण जिथून या बेटावर प्रवेश केला तिथे जाऊन थांबू" दोघे निघाले. आता ते बेट तुषारला परकं वाटत नव्हतं. जाताना त्यांनी त्या प्रचंड दगडी पुतळ्यांकडे पहिले त्यांच्या चेहऱ्यावरचे क्रूर भाव त्याला आता मृदू झाल्यासारखे वाटत होते. ते काठावर येऊन थांबले समोर धुकं होतं. ना समुद्र ना बाहेरील जगातील काही खूण. तुषारने मनापासून श्रीविष्णूंना आळवले. इकडे त्यांची नाव तशीच उभी होती परंतु आरसा पडला होता. इतक्यात समुद्रात प्रचंड लाटा उसळू लागल्या खूप उंच आणि एका मोठ्या लाटेवर मावळतीच्या सूर्याचे किरण पडले. आणि ते बेटावर प्रतिबिंबित झाले. बेट बाहेरच्या जगासाठी साकार झाले त्याच क्षणी तुषार आणि निलयने पाण्यात उड्या मारल्या. ते पोहत नावेकडे निघाले. समुद्र काहीच झाले नाही असा शांत झाला. तुषारने पोहताना मागे वळून पाहिले बेट अदृश्य झाले होते. ते नावेवर आले. कपडे बदलून खाऊन घेतले. तो दार उघण्याचा मंत्र असलेली पेटी तुषारने खोल समुद्रात सोडून दिली. मग ते किनाऱ्याकडे निघाले.


ते वाड्यात आले आराम केला. दुसऱ्या दिवशी पहिले तर तो लाल दरवाजा तसाच होता. निलयचा प्रश्नर्थक चेहरा पाहून तुषार म्हणाला, "जगात काही गोष्टी अविनाशी आहेत. त्यातलाच हा एक दरवाजा. तो असाच राहणार." "मग तो परत उघडला जाण्याची शक्यता आहेच ना! काही हजार वर्षांनी का होईना?" निलय बोलला. "हो नक्कीच निलय तो परत उघण्याचे प्रयत्न होणारच. त्यावेळी हे थांबवायला आपण नसू. पण कोणीतरी असेलंच ना? दोन हजार वर्षांपूवी महादेवशास्त्री होते. आता मी आहे. नंतरही कोणीतरी येईलच." "आणि ते दार उडणारा निलयसुद्धा असेलच ना दोन हजार वर्षांनी!" निलय बोलला. दोघेही खूप हसले.


तुषार आणि निलय त्यांच्या कामात व्यस्त झाले. निलय हे सर्व विसरूनही गेला. पण तुषार नाही कारण त्याला विष्णू मंदिरातून भेट मिळालेला कंठा त्याच्या गळ्यात होता. तो त्याला ही जाणीव देत असे की पुन्हा जेव्हा या जगावर हे दार उघडण्याचे संकट येईल तेव्हा तुला परत यायचे आहे.


                               २००० वर्षांनंतर


झारा आणि झेन (पती - पत्नी) समुद्रावर फिरत असताना...

हे झेन बघ एक बॉक्स आलाय वाहात चल पाहू. (बॉक्स उघडून बघतात.) यात काहीतरी लिहिलंय सिल्वर फॉईलवर. कोणती लँग्वेज आहे माहित नाही.

"ही दुर्मिळ वाणी आहे. एक जुनी भाषा मी शिकवतो तुम्हाला वाचायला." एक साधू हात जोडून म्हणाला.

"नमस्कार मी दुर्वासनाथ. या लेखात एका मोठ्या खजिन्याचे रहस्य आहे." झेनचे निळे डोळे ही गोष्ट ऐकून चमकले...

समाप्त


Rate this content
Log in

More marathi story from SAMPADA DESHPANDE

Similar marathi story from Action