अज्ञात बेटावर - शेवटचा भाग
अज्ञात बेटावर - शेवटचा भाग
शेवट
इकडे नीना हेलिकॉप्टरमध्ये बसून निघाली होती. तिच्याकडे असलेल्या नकाशावरून ती पायलटला दिशा सांगत होती. इतक्यात दूरवर समुद्रात एका स्फोटाचा आवाज आला. एकावेळी अनेक बॉम्ब फुटावेत असा तो आवाज होता. तिने हेलिकॉप्टर त्या दिशेने घेण्यास सांगितले. स्फोटामुळे समुद्रात मोठाल्या लाटा निर्माण झाल्या होत्या. तुषार पोहत त्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होता. इतक्यात त्याला हेलिकॉप्टरचा आवाज आला. समुद्रवर लक्ष ठेवणाऱ्या नीनाला खालून कोणीतरी पोहताना दिसले. मग तिने मदतीसाठी शिडी सोडण्यास सांगितले. पायलटच्या सहकाऱ्याने हेलिकॉप्टर सुरक्षित अंतरावर गेल्यावर शिडी सोडली. तुषार कसाबसा त्या शिडीवर चढला.
दुसऱ्याच दिवशी प्रेस कॉन्फरन्स बोलावली गेली. सर्वांचे नातेवाईक आक्रोश करत होते. त्यांची तरुण मुलं त्या बेटाची शिकार ठरली होती. राजे सर सुन्न झाले होते. नीनाच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. मग तुषारने प्रोफेसरांनी लिहिलेली डायरी सर्वाना दाखवली. तो म्हणाला," प्रोफेसर गुप्ता अनेक वेळा त्या बेटावर येऊन गेले होते . त्यांनी इथल्या स्थानिक लोकांना खजिन्याचे आमिष दाखवून तिकडे नेले होते. त्या एलियन्सना प्रयोगासाठी ते माणसे पुरवत असत. ते माणसांना मारून त्यांचे अवयव कापून त्यांच्या ग्रहावर नेत असत. माणसेच नाही तर त्या बेटावर पक्षी, प्राणीच काय तर एकही कीडासुद्धा सापडला नाही. ते सगळे हे एलियन्स घेऊन गेले असावेत. फार पूर्वी आकाशातून देव येऊन या बेटावर विहार करत अशी एक दंतकथा आहे.
ते देव म्हणजेच हे परग्रहवासी असावेत. प्रोफेसर गुप्तांची आणि त्यांची एकदा भेट झाली व त्यांना माणसे द्यायचे यांनी कबुल केले. त्याच्या बदल्यात ते एलियन्स त्यांना अपूर्व असा वास्पतींचा खजिना दाखवणार होते. १५ माणसांचे बळी या प्रोफेसरांनी त्यांना दिले. त्याबदल्यात त्यांनी ती वास्पतींची दरी त्यांना दाखवली. हे बेट सगळ्यांनाच सापडणारे नाही. फक्त प्रोफेसरना त्याची नक्की दिशा माहिती होती. त्यामुळेच आम्ही तिकडे जाऊ शकलो. खरंतर हा अमूल्य वास्पतींचा खजिना आपल्या मानवांचा होता. पण त्या दुष्ट परग्रहवासीयांनी त्यावर कब्जा करून ठेवला होता. त्यांची कमजोरी प्रोफेसरना माहिती होती. जी या डायरीमुळे मलाही समजली. ती म्हणजे पाणी. म्हणूनच मी पाणी अंगावर टाकून त्यांना नष्ट केले. त्यांचे पृथ्वीवरील संपर्काचे साधनाही मी संपवले.
आता ते पृथ्वीवर येऊ शकणार नाहीत. माझे ही डायरी पुरावा म्हणून मी भारत सरकारच्या स्वाधीन करतो. मी मोबाईलमध्ये या सर्वांचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला होता पण दुर्दैवाने तो खराब झाला. डायरी मात्र पिशवीत ठेवल्याने वाचली. सगळे मित्र गेले याचे मला खूप दुःख आहे. तसेच त्यांचा अभिमानही आहे." असे बोलून डोळे पुसून तुषार खाली बसला.
सर्वांच्याच नातेवाईकांची झालेली हानी भरून निघणार नव्हती. त्याला कोणाचाच काही इलाज नव्हता. ते अज्ञात बेट आता पूणपणे नष्ट झाले होते. त्या अज्ञात बेटाबद्दल एक नवीन कथा जोडली गेली होती आणि ती पिढ्यानपिढ्या सांगितली जाणार होती.
समाप्त