SAMPADA DESHPANDE

Horror Thriller

4.0  

SAMPADA DESHPANDE

Horror Thriller

चकवा

चकवा

8 mins
321


रोहित गाडी चालवून दमला होता. त्याने डावीकडे पाहिले तर तोच 'मोहितेवाडी' गावाच्या नावाचा दगड त्याला दहाव्यांदा दिसला. गेले चार तास तो एकाच वर्तुळात फिरत होता. काय करावे कळत नव्हते. लहानपणी मनोरंजनासाठी म्हणून ऐकलेल्या गोष्टी त्याला आठवल्या. याला ‘चकवा’ म्हणतात हे त्याने ऐकले होते. “आता तर गाडीचे पेट्रोल सुद्धा संपत आले असेल. “ तो स्वतःशीच बोलत होता. चकव्यात अडकलेली माणसे परत येत नाहीत, असे त्याचे आजोबा सांगायचे. “काय होत असेल त्या माणसांच?” असा गमतीने विचार त्याच्या मनात येत असे पण आता तो स्वतः या परिस्थितीत अडकला होता. रोहित च्या मित्राने राकेशनी त्याला या भागात स्वस्त प्लॉटस् मिळतात, हॉटेल व्यवसायाला चांगला वाव आहे, असे सांगितले आणि त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवून आपण ते बघायला निघालो. राकेशही बरोबर येणार होता पण ऐनवेळी त्याला काही काम निघालं म्हणून तो आला नाही, की मुद्दाम आला नाही? या विचाराने रोहितला धक्का बसला. राकेश त्याचा मित्रच नाही तर बिझनेस पार्टनर सुद्धा होता. जर रोहितला काही झालं तर सगळ्या बिझनेसचा राकेश मालक होणार होता. आपल्या हे कसं लक्षात आलं नाही? राकेशने हे जाणीवपूर्वक केले असेल का? अशा अनेक विचारांनी त्याच्या मनात काहूर माजवले. वेळ निघून गेली होती, आता नशिबाला दोष लावून उपयोग नव्हता. काही झाले तरिही तो सुटकेचा प्रयत्न करत रहाणार होता. शेवटपर्यंत आशा सोडणार नव्हता. इतक्यात त्याला दूरवर एक दिवा लुकलुकताना दिसला. तो दिव्याच्या दिशेने गाडी चालवू लागला. डोळ्याची पापणीही न लवता तो जात होता न जाणो डोळ्याची पापणी लवती आणि दिवा दिसेनासा झाला तर! आता तो कच्च्या रस्त्यावर आला होता. एक मोठा वाडा दृष्टिपथात आला. त्याने आपले अराध्य दैवत दत्तगुरुंचे आभार मानले. वाडा दुमजली दिसत होता. समोर मोठं अंगण होतं. त्याने रस्त्यावरच गाडी उभी केली आणि तो आवारातून चालत वाड्याच्या दरवाजाकडे निघाला. मनात दोन परस्पर विरोधी भावना येत होत्या. एका बाजूला आसरा मिळाल्याचा आनंद होता, तर दुसरीकडे एक अनामिक भिती मनात दाटून येत होती की ही जागा अतिशय धोक्याची आहे. पुढे जाऊच नये. तरी तो पुढे गेलाच. रात्रीचे बारा वाजले असावेत. तो तिथी वगैरे बघत नसे, आजचा काळोख बघून अमावास्या असावी असा अंदाज त्याने केला. आता रोहित वाड्याच्या दरवाजात उभा होता. त्याने परत एकदा दत्तगुरूंचे स्मरण केले आणि दार वाजवले. दार उघडेपर्यंत तो अस्वस्थपणे गळ्यातल्या लॉकेटशी चाळा करत होता. येताना त्याच्याकडे रस्त्यात एका वृद्ध माणसाने लिफ्ट मागितली होती. ते दत्तमंदिराचे पुजारी आहेत हे ऐकल्यावर रोहितने त्यांना त्या देवळापर्यंत सोडले व स्वतः सुद्धा दर्शन घेतले. निघताना वृद्ध पुजारीबाबांनी त्यांची मदत केली म्हणून रोहितच्या गळ्यात ते लॉकेट घातले होते. ते त्याचे संकटातून रक्षण करेल असे ते म्हणाले. अचानक त्याच्या हाताला चटका बसला. लॉकेट तापले होते. तो दचकला. इतका वेळ ते गळ्यात असूनही आपल्याला चटका बसला नाही आणि आताच का? नक्की इकडे धोका आहे. जावे का परत? असा विचार करून तो मागे फिरणार इतक्यात दार उघडले गेले.

दार उघडणारा माणूस उंच धिप्पाड होता, त्याने जवळजवळ संपूर्ण दरवाजा आडवला होता. त्याचे डोळे लालसर होते. रोहितला त्याला पाहून एखाद्या जंगली श्वापदाची आठवण झाली. त्याच्या अंगावर सरसरून काटा आला. धीर करून तो त्याला म्हणाला, “मी रस्ता चुकलोय, आजची रात्र मी तुमच्याकडे थांबू का? सकाळ होताच निघून जाईन. कृपया मला आजची रात्र आसरा द्या. “तो माणूस काहीच बोलला नाही. चेहऱ्यावरून तो अगदी जुन्या काळातल्या जमीनदारासारखा वाटत होता. रोहित ने हळूच घरात डोकावून पाहिले आणि त्याला धक्काच बसला. कारण घराच्या हॉलमध्ये जवळजवळ वीस-पंचवीस माणसे उभी होती आणि तीही एकदम शांत. त्याला एकदम दुकानात असणाऱ्या निर्जीव पुतळ्यांची आठवण झाली.  ते असेच असतात. या माणसांचं बसणं आणि ती शांतता विचित्र वाटत होती. वाड्याच्या आत त्याने जे पाहिलं ते काय होतं? रोहितला त्या दृश्यातला अनैसर्गिकपणा जाणवू लागला. तो माणूस सारखा त्याच्या मागे बघत होता शेवटी त्यानी विचारलं, “तुमच्या बरोबर कोणी आहे का? “रोहित ने मागे वळून पाहिलं आणि तो म्हणाला,”नाही हो मी एकटाच तर आहे. प्लीज मला घरात घ्या. ‘पण तो माणूस काही केल्या दारातून बाजूला होत नव्हता. तो परत परत रोहितला तुमच्याबरोबर कोणी नाही ना असेच विचारत होता. शेवटी रोहित वैतागला आणि म्हणाला, ‘अहो! मी एकटाच आहे दिसत नाही का तुम्हाला? मला जर घरात घ्यायचं नसेल तर तसे स्पष्ट सांगा ना! “असं बोलून रोहित ताडताड पावले टाकत गाडी जवळ गेला आणि रागाने गाडी स्टार्ट केली. वाड्याच्या आवाराच्या बाहेर येताच त्याच्या गळ्यातलं लॉकेट थंड झालं. परत त्याला धक्का बसला. नक्कीच वाड्याचा परिसर धोक्याचा असणार. धोका अजूनही टळला नव्हता. पूर्ण मोहितेवाडीच धोक्याचं होतं. काही करुन इथून बाहेर पडायला हवं. त्याने विचार केला. तो सरळ निघाला. आपण कोणत्या रस्त्याने इथपर्यंत आलो हेही त्याला आठवत नव्हतं. तरीही प्रयत्न करायचं त्यानी ठरवलं. पुन्हा एकदा दत्तगुरूंचे स्मरण करुन त्याच रस्त्याने पुढे निघाला. आता जवळजवळ पहाटेचे चार वाजत आले होते. इतक्यात त्याला समोर रस्ता दिसला तो अनोळखी वाटत होता, कारण रोहित कालपासून या रस्त्यावरून गेलाच नव्हता. शेवटी एकदाचा ज्या फाट्यावरून तो आत शिरलेला तो फाटा त्याला दिसला. आपण मोठ्या संकटातून सुटलोय याची त्याला जाणीव झाली त्याने निश्वास सोडला आणि तो पुढे आला. त्याने मागे वळून पाहिले तर तो ज्या रस्त्याने आला तो रस्ताच नाहिसा झाला होता. एवढ्यात त्याला चहाची एक टपरी दिसली. हायवे असल्यामुळे तो टपरीवाला पहाटे पहाटेच टपरी उघडत असावा. रोहितने गाडी थांबवून त्याच्याजवळ एक कप चहा मागितला. कोणीच गिऱ्हाईक नसल्याने तो टपरीवाला रोहित बरोबर बसून गप्पा मारू लागला. “कुठून आला म्हणायचं? “ रोहित ने त्याला रात्री घडलेली सर्व हकीकत सांगितली. तो डोळे विस्फारुन ऐकतच राहिला. “साहेब काय सांगताय तुम्ही मोहितेवाडीच्या चकव्यातून बाहेर पडला? असे बाहेर पडलेले बहुतेक आजपर्यंतचे तुम्ही पहिलेच असाल.” रोहितला बाहेर पडल्याचा आनंद होताच आणि मोहितेवाडीचा चकवा काय आहे हे त्याला ऐकायची उत्सुकता होती.

तो टपरीवाला म्हणाला, “साहेब खरं खोटं माहीत नाही पिढ्यान पिढ्या ऐकलेल्या गोष्टी आहेत. पूर्वी मोहितेवाडी अतिशय सुखी आणि संपन्न असं छोटसं टुमदार गाव होतं. त्या गावचे जमीनदार रावसाहेब म्हणजे देवमाणूस. एक दिवस अचानक त्यांना अपघातात मृत्यू आला. संपूर्ण गाव दु:खी झाले. त्यानंतर त्यांचा मुलगा राणा याच्या हातात सत्ता आली. त्यांचे वडील अतिशय सालस आणि गोड माणूस दत्तगुरूंचे भक्त पण हा राणा अगदी सैतान. गावातल्या लोकांच्या जमिनी जबरदस्तीने स्वतःच्या नावावर करून घेतल्या, लोकांच्या घरातले दाग दागिने पैसा अडका सगळं आपल्या हवेलीत आणून ठेवलं. जे जमिनींचे मालक होते त्यांना त्यांच्यात जमिनीत गडी म्हणून राबायला लावलं. त्यांचा छळ केला. गावातल्या मुलीबाळींवर याची वंगाळ नजर. लोक त्यांच्या अत्याचाराला कंटाळून गेले होते. त्याच्या वडिलांनाही त्यानेच मारलं असावं अशी शंका लोकांना होती. त्या गावात एक सुंदर दत्तमंदिर होतं. त्या गावातले देवळाचे पुजारी होते राघोपंत. त्यांच्या मुलीवर या राणाची नजर पडली. सुमित्रा अतिशय सुंदर होती. राणानी तिला आपलंसं करण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु तिच्यावर राघोपंतांचे संस्कार होते, राणाचा दुष्टपणा तिला चांगलाच माहीत होता. त्यामुळे ती काही केल्या त्याला बधली नाही. दाग दागिन्यांचा सत्तेचा, जमीनजुमल्याचा तिला मोह नव्हता. शेवटी ती ऐकत नाही असे पाहिल्यावर राणा ने तिला जबरदस्ती उचलून आणण्यासाठी माणसे पाठवली. राघोपंतांना ही गोष्ट कळली ते घाईघाईने घराकडे निघाले पण फार उशीर झाला होता ती माणसे आलेली पाहताच सुमित्राने स्वतःला जाळून घेतले होते. राघोपंतांच्या हाती फक्त तिची राखच आली. राघोपंतांनी चिडून जाऊन राणाला शाप दिला, “की ज्या सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर तू इतरांवर अत्याचार केलेस त्या सत्तेमध्येच तू अडकून पडशील. हा तुझा वाडाच तुझ्यासाठी स्मशान बनेल. आज पासून ही मोहितेवाडी एक मोठा चकवा बनेल. दहा वर्षांनी येणाऱ्या ठराविक अमावस्येच्या रात्री हे गाव सामान्य लोकांसाठी प्रकट होईल. जे दुर्दैवी जीव असतील फक्त तेच ह्या चकव्यात अडकतील आणि तुझे गुलाम होतील. परंतु जे दत्तभक्त असतील त्यांना हा रस्ता दिसणारही नाही किंवा अडकले तरी या चकव्यातून सुखरूप बाहेर पडतील. त्यांचे रक्षण मी स्वतः करीन. तू इथेच तडफडून मरशील. “असा शाप दिला. हळूहळू मोहितेवाडी ओस पडू लागली. सर्व लोकं ते गाव सोडून निघून गेले. राघोपंतही देवळातली दत्ताची मुर्ती घेऊन कुठेतरी निघून गेले.ते ओसाड गाव सामान्य लोकांच्या नजरेसाठी नाहीसे झाले. फक्त अमावस्येच्या रात्री ती पण दर अमावस्येला नाही काही ठराविक दिवशीच मोहितेवाडी सामान्य माणसासाठी प्रकट होते. राणाचा नाश करणं राघोपंताना शक्य नव्हतं कारण त्याच्यामागे वाईट शक्ती होत्या. राणाने आपला आत्मा त्यांना देऊन हे मृत्यूनंतरचं आयुष्य स्विकारलं होतं. पण साहेब ही कथा आहे माझा तर काय विश्वास नाही माझा बाप आजा ही गोष्ट सांगायचा. आता तुम्ही बोललात त्याच्यावरून नक्कीच तुम्ही राणाच्या हवेली पर्यंत गेलात. पण आश्चर्य आहे की तुम्ही आत कसे गेला नाहीत?” रोहित यावर म्हणाला, “अरे त्या माणसाच्या अडून मी आत मध्ये डोकवून पाहिलं खरं ठीक अनेक माणसं अगदी स्तब्ध पुतळ्याप्रमाणे बसलेली होती. साहेब ही तीच माणसं असणार जी चकव्यात सापडली होती ती प्राण आणि आपले गुलाम करून ठेवलं होतं पण मला अजून कळत नाही की तुम्ही चकव्यातून वाचलात कसे? “ही दत्त महाराजांची कृपा रोहित म्हणाला त्यांनीच मला वेळीच सावध केलं आणि या चकव्यातून बाहेर काढलं. “मग रोहितने त्याला आपल्या लॉकेटचा किस्सा सांगितला.”अहो त्या राणाला तुमच्या मागे कोणीतरी दिसत होतं म्हणजे राघोपंत महाराज असणार बघा म्हणून तर त्यांनी तुम्हाला घरात घेतलं नाही. एकदा का तुम्ही त्या घरात गेला असता की तुम्ही पण आतल्या माणसांप्रमाणे त्याचे गुलाम होऊन पडला असतात. दत्त महाराजांनी तुमच्यावर खरच खूप मोठी कृपा केली त्यांचे आभारच मानायला हवेत. “रोहित हसत म्हणाला, “हो रे बाबा चल आता मी निघतो”. मुंबईच्या वाटेवर विचार करत होता की राणाला आपल्या मागे नक्की कोण दिसलं? आपल्यालाही आपल्यामागे काहीतरी पवित्र शक्ती असल्याचं जाणवत होतं. ते पुजारीबाबा ! नक्कीच ते राघोपंत असणार. जसा त्यांच्या शापातून राणा मुक्त झाला नाही तसेच तेही स्वतःच्या शापातून मुक्त झाले नाहीत. चकव्यात अडकलेल्या दत्तभक्तांच्या रक्षणासाठी ते अजूनही आहेत. रोहितने त्यांचे मनापासून आभार मानले. 

परतीच्या रस्त्यावर तो अजून एक विचार करत होता की राकेशने आपल्याला अशा ठिकाणी का पाठवलं बरं? मोहितेवाडीच्या जवळच राकेशचं गाव होतं म्हणजे त्याला ही कथा नक्कीच माहीत असणार. याचा अर्थ त्याने आपल्याला मुद्दामुनच पाठवलं. मरण्यासाठी. व्यवसायाची पार्टनरशिप हा तर एक मुद्दा होताच. राकेश मेहनती होता फक्त पैशासाठी तो असं करेल मला तरी पटत नाही. रोहित आपल्या बंगल्याच्या जवळ आला त्यानी लॅच उघडलं आणि आत जाऊन बघतो तर काय त्याच्या बेडरूममध्ये त्याची पत्नी आणि राकेश शांतपणे झोपले होते. रोहितला खूप मोठा धक्का बसला. यासाठी राकेशनी आपल्याला मारण्याचा प्रयत्न केला.आपल्या जिवलग मित्राने? रोहितला धक्का सहन होत नव्हता. त्याला कळतच नव्हतं की काल लागलेल्या चकव्याचा धक्का मोठा होता की आत्ता खऱ्या आयुष्यात झालेल्या चकव्याचा? त्याने शांतपणे मनाशी एक निर्णय घेतला. तो ते दोघे उठेपर्यंत तिथेच बसून राहिला. राकेश आणि रीनाला रोहित जिवंत परत आलेला पाहून मोठा धक्का बसला. त्याने दोघांना समोर बसवले आणि धोक्याचा जाब विचारला. तेव्हा त्या दोघांनी ते कॉलेजमध्ये असल्यापासून एकमेकांवर प्रेम करायचे. पण रीनाच्या घरुन त्यांच्या नात्याला विरोध होता. तिला नाईलाजाने रोहित बरोबर लग्न करावे लागले. रोहित हसून म्हणाला, “एकदा माझ्याशी बोलून बघायचं राकेश. मित्र मानत होतो तुला. अरे शत्रूलाही कोणी देत नाही इतकं भयंकर मरण तू मला देत होतास.” राकेश आणि रीना पाया पडून रडू लागले. रोहित मरणाच्या दारातून परत आला होता. त्याला ही गोष्ट अगदीच दुय्यम वाटत होती. राकेश आणि रीना तो आता काय शिक्षा देईल या कल्पनेनी घाबरले होते. त्यांच्याकडे बघत तो शांतपणे म्हणाला, “ मी रीनाला माझ्या विवाहबंधनातून कायमचं मोकळं करत आहे.तसंच राकेश आजपासून आपली पार्टनरशीप संपली. तुला किंवा रीनाला माझ्या संपत्तीतलं काहीच मिळणार नाही.फक्त याच अटीवर मी तुम्हांला जिवंत सोडत आहे.मी वकीलांशी बोललो आहे. थोड्याच वेळात तुम्ही आणि मी मोकळे होवू. रीना आणि रोहितचा घटस्फोट झाला. राकेशलाही त्याने शहर सोडून जाण्यास सांगितले. तो मोकळा झाला होता. मोहितेवाडीच्या चकव्याप्रमाणेच आयुष्यातल्या ह्या चकव्याला त्याने अगदी सहजपणे पार केलं होतं. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror