SHARVARI SHIRKE

Horror Thriller

4.7  

SHARVARI SHIRKE

Horror Thriller

इंटर्न

इंटर्न

6 mins
2K


त्या दिवशी अनिकेत काहीसा अस्वस्थ होता. त्याच्या मनाची घालमेल तशी साहजिकच होती – कंपनीत आज त्याचा पहिला दिवस होता! इंटर्नशिप या प्रकाराबद्दल तर त्याने बरंच ऐकलं होतं पण प्रत्यक्षात ‘नोकरी’ ही संकल्पना त्याच्यासाठी नवीनच होती. ती काचेची दहा मजली इमारत त्याने एकदाच निरखून पाहिली आणि दाराच्या दिशेने चालू लागला प्रवेश करून रिसेप्शनला चौकशी केली तेव्हा एक देखणा तरूण त्याच्या जवळ आला. तो कंपनीचाच कर्मचारी असावा, असे त्याच्या वेषभूषेवरून अनिकेतला वाटले. हात पुढे करत तो अनिकेतला म्हणाला, “Hello. I am Aditya. You are Aniket, right?” “Yes.” “Come, let me show you your cabin.” त्याने अनिकेतला त्याची केबिन दाखवली आणि अय्यर, स्वामी, भिडे, गांधी व इतरांशी ओळखही करून दिली. त्याचे काम समजावून दिले आणि तो निघून गेला.


   संध्याकाळी सात कधी वाजले अनिकेतला कळलंच नाही. सगळे घरी निघून गेले होते. त्याने घड्याळाकडे एक नजर टाकली आणि बाहेर आला. सकाळी त्या आदित्यने आपल्याला ही बाजू दाखवलीच नाही, असं म्हणत तो वरच्या मजल्यावर उजव्या बाजूला गेला. तिथे एकच केबिन होती व दारावर ‘एच. एस दंडवते’ नाव होतं. त्याची उत्सुकता वाढली, पण उशीर झाला होता म्हणून तो निघाला. 

 

  अनिकेत रूमवर आला तेव्हा समीर आणि विनीत आय. पी. एल पाहत बसले होते. “बैंगलौर हरणार बघ.”, समीर म्हणाला. “ए सम्या, कमी समजू नको आर. सी. बी ला. कशी दे दना दन ठोकेल बघ पुढे पुढे. अरे अनिकेत! ये ये बस. आपली आर. सी. बी बघ कसली फॉर्म ला येणारे आता.” विनीत अनिकेतच्या खांद्याभोवती हात टाकून बोलत होता. समीर गादीवरून उठत म्हणाला, “काय मग, कशी आहे कंपनी?” “अरे, जब्बर आहे एकदम!”, अनिकेत सांगत होता. त्याचं बोलणं अर्ध्यातून कापत विनीत म्हणाला, “अरे तो उमेश आहे ना, त्याच्या ग्रुप नी म्हणे काल ड्रग्स आणलेले.” आता तिघंही एकमेकांकडे बघू लागले.


शेवटी समीर बोलला, “विन्या बघ की मग काहीतरी जुगाड होत असेल तर.” अनिकेत ताडकन उभा राहिला, “ए अरे, काय जुगाड? कसला जुगाड? डोकं फिरलंय का तुमचं? मी या सगळ्यात नाही पडणार.”, हे सगळं ऐकून तो बावचळला. विन्या त्याला समजवत म्हणाला, “अरे येड्या, एवढा काय चिढतोस? पाप थोडी करतोय आपण, एकदा ट्राय करायला काय जातंय? काय म्हणतोस समीर?” समीर त्याला पुन्हा खाली बसवत म्हणाला, “थंड घे रे. काही नसतं होत. फक्त हे सगळं बोलू नकोस कुठे.” “आणि विनीत, आपल्याला तर हवीय बरं का ती ‘जादूची पावडर’. पण तू आणणार कुठून?” तसा विनीत म्हणाला, “टेन्शन नको ले रे. मैं करेगा सब इंतज़ाम!” आता त्यांचं पक्क ठरलं, शनिवारी, म्हणजे परवा रात्री बसायचं.

 

  सकाळी अनिकेत ऑफिसमध्ये पोचून कामाला लागला. दुपारपर्यंत तो कामात मग्न होता. पण एक फाईल अशी होती जिचं काय करावं हे त्याला कळंत नव्हतं. तो उठला व आदित्यला शोधू लागला, पण तो कुठेच दिसत नव्हता. त्याला आठवलं की त्या वरच्या केबिन मध्ये काल कोणीच नव्हतं. त्या केबिनविषयी त्याला एवढी उत्सुकता का वाटत होती हे त्यालाही कळंत नव्हते. खेचला गेल्यासारखा तो वरच्या मजल्यावर आला. डोकावून पाहिलं तर आत एक शांत चर्येचा मध्यमवयीन माणूस बसला होता. अनिकेतने दार अर्धे उघडले व “Sir, may I come in?” असे विचारले. तशी त्यांची चर्या वर झाली व ते गंभीरपणे “Yes.” म्हणाले. तो मग आत आला आणि म्हणाला, “ सर मी अनिकेत, नवीन इंटर्न, कालंच जॉइन झालो.” अनिकेतचे स्मित पाहून तेही मंद हसले. म्हणाले, “Come, sit. काम व्यवस्थित होतंय ना? काही अडचण असेल तर येत जा. तुमच्यासारख्या यूथला मार्ग दाखवणं हे मी माझं कर्तव्य समजतो.”


दंडवते सरांच्या बोलण्यात त्याला एक विलक्षण स्थिरता वाटली. डोळे जरा थकल्यासारखे वाटत होते पण आवाजात खणखणीतपणा होता. असं गूढ़ व्यक्तिमत्त्व त्याने आधी पाहिलं नव्हतं. मग भानावर येत, सगळे विचार झटकत तो म्हणाला, “ हो सर. ही फाईल थोडी किचकट आहे. हिचं काय करू काही कळंत नाहीय.”, अनिकेत म्हणाला. दंडवते सरांनी त्याला सगळं समजवून दिलं आणि तो त्यांचे आभार मानून आपल्या टेबलवर आला आणि पुन्हा कामात मग्न झाला. आज कंपनीतून रूमवर येताना त्याला आधार सापडल्यासारखं वाटत होतं. खूप मोकळं वाटलं त्याला दंडवते सरांशी बोलून. 

   

शनिवार आला. आज तिघं बसणार होते. अनिकेत कामावरून आला. तेव्हा फक्त समीर रूमवर होता. अनिकेतने विनीत कुठे आहे असे विचारले तर समीर म्हणाला, “ साहेब गेलेत ‘इंतज़ाम’ करायला.” थोड्या वेळाने विनीत रागारागात स्वतःशीच काहीतरी बडबड करत आला. समीरने त्याला विचारले, “काय रे? आणलंस की नाही?” यावर तो म्हणाला, “अर्धवट डोक्याचा आहे तो उम्या. मला म्हटला तुमची ऑर्डर सांगायलाच विसरलो. आता थांबा पुढच्या शनिवारपर्यंत.” अनिकेत उद्गारला, “म्हणजे एक आख्खा आठवडा?” वैतागलेला विनीत म्हणाला, “हो!” “शॅs...” म्हणत समीरही निराश झाला.

   

सकाळी अनिकेत नेहमीप्रमाणेच कामावर गेला. त्याचा आता कामात रस वाढला होता. कुठे काही अडलंच तर दंडवते सर होतेच. दोन दिवसात त्याचं presentation होतं त्यामुळे तो गोंधळला होता. सरांच्या केबिनमध्ये डोकावून पाहिलं पण कोणीच नव्हतं. तेवढ्यात ते मागून आले व म्हणाले, “काय रे अनिकेत, काही काम होतं का?” तो दचकला, मग भानावर येत त्याने presentation बद्दल सांगितलं. सरांनी त्याला presentationचे मुद्दे थोडक्यात समजवले.

   

हा आठवडा खूप लवकर गेला. शनिवार आला. सकाळी समीरला घरून फोन आला आणि त्याला ताबडतोब गावाला बोलावले होते. त्यामुळे आजचाही त्यांचा बसण्याचा प्लॅन तोंडावर पडला होता. हे ऐकून विनीत तर सम्यावर जाम संतापला. पण जे होत होतं, ते टाळणं शक्य नव्हतं म्हणून त्यांनी पुढच्या शनिवारी बसायचं ठरवलं.

   

“पाच-सहा दिवसात परत येतो” असं म्हणून गेलेला समीर गावावरून परत आला तेव्हा तो आणि विनीत उमेशकडून पावडर घेऊन आले. अनिकेत संध्याकाळी रूमवर आला तसा समीर म्हणाला, “आज रात्री आपण बसणारंच! हो ना अन्या?” “हो रे बाबा”, अनिकेत म्हणाला. तिघंही खूश होते. पण अर्ध्या तासातंच अनिकेतला कॉल आला. मोबाईलच्या स्क्रीनवर दंडवते सरांचं नाव होतं. सरांनी त्याला तातडीने त्यांच्या घरी बोलावलं होतं आणि त्याला जाणं भाग होतं. आता विनीतला राग अनावर झाला. तो बडबडायला लागला, “च्यायला किती नाटकं तुमची! खूप झालं आता. व्हिस्की गेली चुलीत. तुमच्यासोबत राहण्यात अर्थच नाहीय.” अनिकेत त्याला थांबवत, शांत करत म्हणाला, “मला फक्त अर्धा तास दे. मी लगेच परत येतो. सरांनी हा पत्ता पाठवलाय घरचा. मी असा जातो आणि असा येतो.” “ठीक आहे. पण तू जर नाही आलास ना, तर मी हा माल असाच्या असा जाळून टाकीन. मग सगळंच बाद होईल.”, विनीत जरा शांत होत म्हणाला.


    अनिकेत निघाला. पाठवलेला पत्ता त्याने वाचला. जेव्हा तो त्या भागात पोचला, तेव्हा त्याला कळलं की त्या नावाचा रस्ता कुठेच नव्हता. तो पत्ता अस्तित्वातच नव्हता. पत्ता पुन्हा वाचायला गेला तर पाहिलं की त्याला दुपारनंतर कोणाचा कॉल किंवा मेसेज काहीच आलं नव्हतं. त्याला घाम फुटला. तो आता बिथरला होता. तो रूमवरून निघाल्याला आता दोन तास झाले होते. तशा मनःस्थितीतंच तो रूमवर आला. विनीत समीरवर बार काढून रागारागात कुठेतरी निघून गेला होता. झोप तर त्याची कधीच उडाली होती. रात्रभर नुसता छताकडे टक लावून बघत होता. सकाळी ऑफिसमध्ये पोहचताच धावत दंडवतेंच्या केबिनकडे गेला. आत कोणीच नव्हते. मागून पुन्हा कोणीतरी बोललं, पण ते दंडवते नव्हते. तो आदित्य होता. अनिकेतचा असा भेदरलेला चेहरा पाहून त्याने विचारलं, “काय झालं तुला?” “दंडवते सर कुठे आहेत?”, त्याने उलटा प्रश्न केला. आदित्य स्तब्ध झाला. “तू का विचारत आहेस?” असे म्हटल्यावर अनिकेत उत्तरला, “त्यांनी मला काल रात्री बोलावले होते.”


    आदित्य आता पांढरा पडला होता. आपल्या थरथरत्या हाताने त्याने अनिकेतचा हात पकडला, त्याला नेऊन बसवलं व सांगू लागला, “दंडवते होते. चार वर्षांपूर्वी होते ते. पण आता नाहीत. त्यांचं हक्काचं आयुष्य हिरावून घेतलं त्यांच्या स्वतःच्या वीस वर्षांच्या मुलाने. व्यसन होतं त्याला ड्रग्सचं. त्याचा स्वतःवरही ताबा उरला नव्हता. हाताबाहेर गेला होता तो, म्हणून त्यांनी त्याला खोलीत बंद करून ठेवलं. तो उन्मादाच्या स्थितीत कडी तोडून बाहेर आला आणि रागा-संतापात बॅटने दंडवतेंना इतकं मारलं की त्यांनी तिथेच प्राण त्यागले.” अनिकेतचे सगळे प्रश्न आता संपले होते. 


Rate this content
Log in

More marathi story from SHARVARI SHIRKE

Similar marathi story from Horror