हायवे NH160
हायवे NH160


हायवे NH160....
आपल्याला तर माहीत आहेच की कोरोना काळात सगळ्यांचे किती हाल झालेले ते.
जश्या कोरोना केसेस कमी होऊन नुकतीच अनलाँकींगची प्रक्रिया सुरू झाली, तसं जीवन पुन्हा पूर्ववत सुरळीत चालू व्हायची चिन्ह दिसत होती.
गव्हर्नमेंट गाईडलाईन्स निघाल्या आणि सर्व पर्यटन स्थळ पुन्हा आधिसारखी चालू झाली.
जवळ जवळ ७-८ महिन्यांच्या मोठ्या बंदिवासा नंतर कुठे बाहेर मनसोक्त फिरण्याचा योग चालून आलेला.
ही संधी दवडून नव्हती चालणार.
आम्ही सगळे जणं मिळून बाहेर जायचा प्लॅन करत होतो.
आणि अखेर एक दिवस ठरलाच.
त्या दिवसात मुख्यतः दिवेआगर व कोकणातील खूप सारे बीच पर्यटन दृष्टीने खूप प्रसिद्ध झाले होते.
आमच्या जवळपास आम्ही न बघितलेला असा दिवेआगर बीच होता.
आपणही इकडेच प्लॅन बनवायला हवं असं आम्ही सगळ्यांनी ठरवलं.
मी माझी मोठी ताई, तिचा नवरा आम्ही त्यांना भाऊ म्हणत असू आणि माझी छोटी ताई असे चौघ जणं.
शनिवारी सकाळी जाऊन रविवारी घरी असं दोन दिवसांचा बेत ठरला.
खरं तर शनिवार - रविवार हे दोन दिवस दिवेआगरला राहून
रविवारी संध्याकाळी घरी यायचं ठरलेलं, पण पुरेसा वेळ मिळाल्याने प्लॅन मध्ये थोडा बदल झाला. व दिवेआगर सोबत जवळ असलेला हरिहरेश्वर मंदिर आणि बीच सुद्धा बघण्याचं ठरलं.
शनिवारी दिवेआगर मनसोक्त फिरून रविवारी सकाळी हरिहरेश्वरला निघायचं होतं, पण काही कारणास्तव थोडा उशीर झाला मग दुपारचं जेवण करूनच हरिहरेश्वरला जायला निघालो.
वास्तविक हा अंतर दीड तासांचा आहे, आम्हाला पोहोचायलाच चांगली संध्याकाळ झालेली.
कधीकधी प्लॅनिंग मॅनेजमेंट मध्ये गडबड झाल्यावर पुढच्या सगळ्या प्रवासाचा बट्ट्याबोळ होऊन जातो,
आमच्या बाबतीत देखील तसेच होताना दिसत होतं.
सुरुवातीला रविवारी संध्याकाळी घरी येण्याच्या बेतात होतो, पण आता रविवारच्या संध्याकाळी आम्ही अजून हरिहरेश्वरलाच होतो.
पण एवढ्यातही निभावलं नाही, हरिहरेश्वरला दर्शनासाठीची गर्दी, त्यात खरेदी आणि नंतर समुद्रकिनारी फिरण्यामध्ये गेलेला वेळ ह्या सर्वांमध्ये आमचा आता चांगलाच वेळ गेलेला.
एव्हाना रात्रीचे ९ वाजत आलेले, आता लवकर घरी निघायलाच हवं.
घरी कळवलं तेव्हा तिकडून देखील बराच ओरडा मिळाला.
वास्तविक पाहता आम्ही दिवेआगर वरून हरिहरेश्वरला यायला श्रीवर्धन रोडने आलेलो, पण आता जाताना हा रस्ता खूप दूरचा झाला असता.
आता हरिहरेश्वर पासून पनवेलला जाण्यास दोन रस्ते होते, एक म्हणजे माणगाव मार्गे जिकडून आम्ही जाणार होतो, आणि दुसरा रोहा घाट मार्गे.
निघता निघता ९ वाजलेले, आम्ही इकडूनच जेऊन निघायचं असं ठरवलं. ह्याला दोन कारणं होती, एक म्हणजे पुढे हॉटेल मिळेल की नाही ह्याचा भरवसा नाही आणि दुसरं म्हणजे एकदा जेऊन घेतलं, की सलग कुठेही न थांबता जाता येईल घरी.
रात्रीचं जेवण करून साधारण १० च्या सुमारास आम्ही घरी जायला निघालो.
तसा हरिहरेश्वर ते पनवेल असा ४ तासांचा एकूण प्रवास होता पण मध्ये ट्रॅफिक वैगेरे मुळे आम्ही ५ तास लागतील असं पकडून चालत होतो.
आम्ही म्हसळा- माणगाव मार्गे जाणार होतो, तो रस्ता देखील सोईचा होता.
गाडी मीच चालवत होतो, बाजूला भाऊ, आणि पाठीमागे दोघी ताई.
ताईने आधीच गाडी हळू चालवण्याबाबत बजावलं होतं.
मी देखील नॉर्मल स्पीड वर कोणतीही घाई न करता गाडी चालवत होतो.
तासाभरात आम्ही म्हसळाला पोहोचलो, पण म्हसळाच्या "टी" पॉईंटला ("टी" पॉईंट=जिकडे तीन रस्ते एकत्र येऊन मिळतात) पोलिसांची नाकाबंदी दिसली.
आधी तर आम्ही चक्रावूनच गेलो, कारण ज्या रस्त्याने आम्हाला जायचं होतं, नेमकं तिथेच पोलीसांनी नाकाबंदी केलेली.
जवळ जाऊन नक्की प्रॉब्लेम काय आहे हे त्यांना विचारल्यावर त्यांनी सांगितलं की ह्या रस्त्यावर पुढे एका ट्रक आणि बसचा मोठा अपघात झाला आहे, परिणामी इकडून मुंबईला जाणाऱ्या सर्व गाड्या रोहा रोडने पाठवण्यात येणार आहेत, तुम्हाला ही तेथूनच जावे लागेल.
झालं कल्याण, आधीच जायला इतका उशीर झालेला, त्यात आता हा चांगल्या रस्त्यावर अपघात.
रोहा रोड देखील चांगलाच होता पण तो रस्ता पडला घाटमार्ग आणि रात्रीच्या प्रहरी घाटमार्गे जाणे हे मला पटणारे नव्हते.
गेली ६ वर्ष मला ड्रायव्हिंगचा अनुभव होता, आणि ह्या वर्षांमध्ये एक अनुभवी ड्राइवर म्हणून मी सुद्धा कधी रात्री-अपरात्री ड्रायव्हिंग करण्याची जोखीम उचलली नव्हती.
पण आता दैवयोगाने नशिबात पहिल्यांदाच ही वेळ आलेली.
मी त्वरित मॅप चेंज केला आणि रोहा रोडला गाडी वळवली.
कोणाच्याच मोबाईलला नेटवर्क नव्हता पण नशीब बलवत्तर म्हणून मी ऑफलाईन मॅप घरातून निघतानाच डाउनलोड केलेला.
म्हसळा रोडच्या सर्व गाड्या ह्या रोह्याच्या रस्त्याने वळवल्या मुळे थोडी फार रहदारी होती, पण थोडेच वेळ.
जसं आम्ही घाट माथ्याच्या जवळ जाऊ लागलो, तसं रहदारी एकाएकी नाहीशी झालीशी वाटली.
मी गाडीचा वेग जरा कमी केला आणि सावधानता बाळगून घाट चढू लागलो, घाटात गाड्यांची रहदारी नसल्यामुळे गाडी चालवायला एवढे कष्ट पडत नव्हते.
एव्हाना रात्रीचे १ वाजत आलेले, गाडी वळणांमागून वळणे घेत होती. समोरचा रस्ता काळोखाच्या अजगर विळख्यात गुडूप झालेला, गाडीच्या हेडलाईटचा प्रकाश देखील दूरपर्यंत पोहोचत नव्हता. पण मनात भीती आणून स्वतःच मनोधैर्य खचवण्यात अर्थ नव्हता. गाडीमध्ये कोणीच झोपले नव्हते.
जेव्हा माणूस त्याचे सामान्य आयुष्य जगत असतो, तेव्हा त्याला हजार चूका करण्याची जणू मुभा असते, कारण त्या चुकांनी त्याचा तेवढा नुकसान होत नाही, हा निसर्गनियम आहे, की आणखी काही देव जाणे, पण जेव्हा तोच मनुष्य अडचणीत असतो, सर्व बाजूने खचलेला असतो किंवा निरुपाय असतो, तेव्हा त्याने केलेली एक छोटी चूक सुद्धा त्याच्या विनाशाला कारणीभूत ठरत असते. ही म्हण माझ्यासाठी खरी ठरेल असे तेव्हा कधीच वाटले नव्हते.
घाटाच्या वळणावर मी संथ गतीने गाडी चालवत होतो, पन जसा वळणाचा रस्ता संपून सरळ रस्ता लागला, तेव्हाच मी ती छोटी चूक केली मी गाडीचा वेग थोडा वाढवला, पण हा वेग मला फार काळ टिकवून ठेवता आला नाही, कारण जसा मी गाडीचा वेग वाढवला, तसा एकाएकी अचानक गाडीच्या मध्ये बाजूच्या जंगला मधून एक प्राणी, माझ्या माहितीप्रमाणे एक माकडच आमच्या गाडीच्या मध्ये आला.
गाडी वेगाने असल्या कारणाने मला अर्जंट ब्रेक मारणे भाग होते, ते माकड गाडीच्या इतके जवळ आलेले, की मला गिअर कमी करून ब्रेक मारण्याएवढा पण वेळ मिळाला नाही आणि मी गिअर कमी न करताच ब्रेक मारला.
आणि जे नको व्हायला हवं तेच झालं, गाडी भर रस्त्यात बंद पडली. त्या माकडाला काही झालं नाही, ते बाजूच्या जंगलात जाऊन दिसेनासे झाले.
पण आमची गाडी बंद पाडून गेला.
जशी गाडी बंद पडली, तसं पहिल्यांदाच हा घाट चढल्यापासून त्या रस्त्याचा थरराकपणा जाणवला.
समो
रचा रस्ता जो अजुनपर्यंत गाडीच्या हेडलाईट मुळे तग धरून राहिलेला, तो देखील एखाद्या उंदराला अजगराने गिळंकृत करावा तसा अंधारामध्ये गुडूप झाला.
मनाची भीती मनामध्येच ठेवली आणि इग्नीशन चालू केला, गाडीने करंट पकडला, पण गाडी चालू झाली नाही, पुन्हा एकदा प्रयत्न केला, पुन्हा तेच.
गाडीमध्ये कोणताही फौल्ट नव्हता, कुठे दूरच्या प्रवासाला जाताना मी नेहमी गाडीची नियमित सर्व्हिसिंग करून घेतो.
ह्यावेळी देखील तीन दिवसांआधिच सर्व्हिसिंग करून आणलेली.
खूप प्रयत्न केले, पण सगळे अयशस्वी.
ताईंना चिंता वाटू लागली.
बॅटरीचा काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो, मी बाकीच्यांना बोललो तुम्ही गाडीतच बसा, मी उतरून बघतो काय प्रॉब्लेम झालाय ते.
मी मोबाईलची टॉर्च चालू करून खाली उतरलो, माझ्यासोबत भाऊ पण उतरले.
त्यांनी टॉर्च धारली, मी गाडीचं बोनेट उघडून पाहू लागलो.
गाडी बंद पडून पुन्हा चालू झाली नाही म्हणून जेवढा आश्चर्यचकित नव्हतो झालो, तेवढा बोनेट उघडून झालेलो, कारण गाडीमध्ये कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नव्हता.
मग गाडी बंद पडण्याचं काहिच कारण नाही.
मी बोनेट बंद करून गाडीत बसलो आणि पुन्हा गाडी चालू करण्याचा प्रयत्न केला, पण ह्यावेळी मात्र करंट देखील पास झाला नाही.
डोक्याचा नुसता संताप होत होता, पण तितक्यात मला आठवलं की कधी कधी बोनेटच्या कार्बोरेटर मध्ये पाणी न टाकल्यामुळे देखील असा प्रॉब्लेम होतो.
मी गाडीमध्ये पाणी शोधायला लागलो, एक बाटली होती, पण ती पुरेशी नव्हती.
अश्या घाट मार्गी थांबून कोणत्या गाडी येण्याची वाट पाहण्यात मूर्खपणा होता.
मी भाऊंना ताई जवळ थांबून आणि कोणती गाडी येते का हे पाहायला गाडी जवळच थांबवून स्वतः कुठे पाणी मिळतंय का हे पाहायला गेलो.
सोबत २ बाटल्या घेतल्या.
जंगल बाहेरून जसं वाटत होतं तसेच आतमधूनही होते, एकदम घनदाट.
रातकिड्यांची किरकिर आणि माझ्याच पायाखाली चिरडल्या जाणाऱ्या सुक्या पानांच्या आवाजाखेरीज अजून कोणताही आवाज नव्हता.
मी लगबगीने कुठे कोणता घर किंवा तलाव दिसतंय का हे बघायला लागलो, नशिबाने मला काही अंतरावर एक छोटं तळे दिसलं, मी मनोमनी खुश झालो.
दोन्ही बाटल्या भरून त्यात पाणी घेतले आणि परतिच्या वाटेला जाणारच होतो, की तळ्याच्या काठी एक झोपडीवजा घर दिसले, बाहेर एक छोटा बल्ब लावलेला, त्यामुळेच ते घर माझ्या नजरेपासून लपु शकले नाही.
त्या बल्बच्याच प्रकाशात मला त्या घरात एक पुसटशी हालचाल दिसली.
एवढ्या घनदाट जंगलात, एकाकी असे हे घर. मनाला काही पटत नव्हते.
पण मनात त्याचवेळी एक अजून विचार थैमान घालत होता.
जर ह्या पाण्यानेही गाडी चालु झाली नाही तर?
जर कदाचित ह्या घरात आजची रात्र आसरा घ्यावा लागला तर?
मला मान्य आहे, एक अनुभवी चालक असूनही हे विचार एकदम पोरसट आणि व्यर्थ असे होते.
अश्या आडमार्गी जंगलात थांबणे म्हणजे स्वतःच्या मृत्यूचे आमंत्रण स्वतःहूनच देने.
पण त्या एकाकी घरात कोण आहेत हे पाहण्याचा मोह मला त्यावेळी आवरला नाही आणि लागलीच मी त्या घराकडे वळलो.
झोपडीवजा असे ते एक रूमचे घर, वरती पत्र्याचा छप्पर, समोर जुना लाकडी दरवाजा आणि त्याच्या डाव्या बाजूला लोखंडी गजाची खिडकी.
दरवाजा लावला होता, पण खिडकी थोडीफार उघडी होती.
मी खिडकीतून आतमध्ये कोणाला कळणार नाही इतक्या सावकाश आणि सावधपणे डोकावून बघितले.
जसं आतमधील दृश्य बघितलं, तसं एक नाही दोन नाही तब्बल पाच सेकंद माझ्या काळजाचे ठोके चुकले.
माझ्या आयुष्यातला सगळ्यात भयानक दृश्य, इतके की माझी किंचाळी निघाल्या वाचून राहिली नाही.
आतमध्ये एक साधारण माझ्या पेक्षाही उंच जवळ जवळ ८ फूट उंचीची बाई केस पूर्ण मोकळे सोडून जमिनीवर बसली होती.
तिची उंची कशी कळली?
ती समोर पाय सोडून बसलेली, तरी पूर्ण घर तिच्या पायाने व्यापलेलं, आणि तिचे पाय थेट समोरच्या जळत्या चुलीत भाजून निघत होते.
जशी माझी किंचाळी निघाली, तसं तिची क्रोधाने भरलेली नजर माझ्यावर रोखली गेली, आता तिथे थांबून स्वतःच्या मृत्यूला आमंत्रण देण्यात अर्थ नव्हता, मी तसाच मागे वळलो, आणि जीव मुठीत धरून धावायला लागलो.
धावण्याची शक्ती माझ्यात उरली नव्हती, डोळ्यातून पाणी यायला लागलेले, तरी वाट सुटेल तिकडे धावत होतो.
हृदय तर तेव्हा बंद पडायला आले, जेव्हा मी धावता धावता एकदाच मागे वळून बघितले, ती दरवाजा तोडून मोठी किंचाळी देत चार पायांवर एखाद्या प्राण्या सारखी माझा पाठलाग करायला लागली.
माझ्या पायातले त्राण निघून जायची वेळ.
देवाचं नाव घ्यायला तोंड जसे काय मुके असल्यासारखे त..त..प..प करत होते.
त्यावेळी माझ्या पळण्याचा वेग किती असेल देव जाणे, कारण देवच माझा त्यावेळी तारणहार होता.
आज ज्या हरिहरेश्वरच्या मंदिरात पाया पडून आलेलो, तोच शंकर देव माझ्या मदतीला आला असेल.
धावता धावता मला समोरचा मुख्य रस्ता आणि त्याला लागून आलेली आमची गाडी दिसली.
गाडी दिसल्यावर मला अजूनच चेव चढला.
मी पटकन रस्त्यावर आलो, सगळे माझीच वाट बघत होते.
एव्हाना आमच्या गाडीच्या बरोबरीला अजून एक गाडी आलेली.
मला असं घाबरून वाघ पाठी लागल्या सारखं पळताना पाहून त्यांनी असंख्य प्रश्न विचारले, मला ते प्रश्न आठवत नाहीत, मनात अजून तीच भीती थैमान घालत होती.
जे कोणी माझ्या मागून आलेले, ते आता दिसेनासे झालेले.
ताई ने आधी मला पाणी दिले, दोन मिनिटं बसलो तेव्हा कुठे जाऊन मी ह्या जगात आल्या सारखं माझं पुनर्जन्म झाल्या सारखं भासलं.
आमच्या बाजूचे गाडीवाले सुद्धा आमच्या जवळ आले, भाऊंकडून कळालं की आपली गाडी बंद पडलेली, तेव्हा ही गाडी इकडून पास होत होती त्यांनी काय प्रॉब्लेम आहे ते सांगितलं, पण त्यांच्याकडे देखील पाणी नव्हतं, मग ते मी येईपर्यंत सोबत थांबले.
मला जरा हायसं वाटल्या नंतर मी सुद्धा घडलेली हकीगत त्या सगळ्यांना ऐकवली. सगळ्यांचे चेहरे एकदम पिवळे पडल्यासारखे झाले, आणि मी सुखरूप परत आलो म्हणून देवाचे आभार देखील मानले.
माझी हकीगत ऐकून त्या गाडीमधले जोडपे म्हणाले, अश्या घाटांवर खास करून रात्रीचे असे प्रसंग घडतच असतात, म्हणून आम्ही तुमच्या बरोबर थांबलो.
मी आणलेले पाणी कार्बोरेटर मध्ये टाकून गाडी चालू केली, २-३ स्टार्टरच्या प्रयत्नांनी गाडी एकदाची चालू झाली.
मी गाडी चालवायच्या मनस्थिती मध्ये नव्हतो, भाऊंनी हे ओळखले आणि पुढे घरी जाईपर्यंत त्यांनी ड्रायव्हिंग करण्याचे ठरवले.
आम्ही त्या बाजूच्या गाडी मधल्या जोडप्याचे आभार मानले मी मनोमन देवाचे देखील आभार मानले आणि घरी जाण्यास निघालो.
घरी सुखरूप पोहोचल्यावर आधी घरी आई वडिलांकडे एक वचन दिलं, की परत रात्रीचे अनोळखी भागात प्रवास करणार नाही.