Turn the Page, Turn the Life | A Writer’s Battle for Survival | Help Her Win
Turn the Page, Turn the Life | A Writer’s Battle for Survival | Help Her Win

SAMPADA DESHPANDE

Drama Horror

2.5  

SAMPADA DESHPANDE

Drama Horror

ती लाल खोली - भाग २

ती लाल खोली - भाग २

8 mins
2.6K


महाराज राजकुंडच्या सफरीवर जाऊन आले... आल्यावर त्यांच्या वागण्यातील पडलेला फरक पाहून सगळेच अवाक झाले होते... महादेवशास्त्रींचा वृत्तांत...

त्यानंतर मला युवराजांबरोबर राहणे भाग होते. ते हुशार होतेच तरीही त्यांचे राजगुरू तसेच सल्लागार म्हणून मला काम पाहावे लागत असे. एकीकडे महाराजांची चिंता सतावत होती काय करू समजेनासे झाले होते. मग एकदा राणीसाहेबांच्या विनंतीवरून मी अरण्यातील महालाकडे गेलो. संपूर्ण महाल पालथा घातला तरी महाराज कुठेही दिसेनात. काय करावे ते सुचत नव्हते. मग त्या लाल दरवाजाजवळ गेलो. त्या दरवाजात एक जिवंतपणा वाटत होता जो अतिशय भीतीदायक वाटत होता. जणू काही आताच उघडणार आहे. परत येऊन राणीसाहेबांना सांगितलं की महाराज सफरीवर गेले आहेत. येताच त्यांना येऊन भेटतील. आता कोणाला न सांगता हा शोध मलाच घ्यायचा होता. त्यासाठी मला राजकुंडला जाऊन दुर्वासनाथांना भेटायचे होते. तेच या सगळ्याचं मूळ आहेत याची जाणीव मला झाली. महाराजांना नक्की राजकुंडला तेच भेटले असणार असे मला वाटू लागले होते. मग त्यांचे येणे हा एक ठरवलेल्या गोष्टीचा एक भाग होता याची जाणीव मला झाली. त्या लाल दरवाजाचे रहस्य नक्कीच राजकुंडला होते. तरीही मी परत अरण्यातील महालात गेलो. तिथे महाराजांचा विश्वासू सेवक धर्मा भेटला. तोही महाराजांच्या नाहीसे होण्याने चिंतेत होता. महाराज महालात राहायला गेल्यापासून तो सावलीसारखा त्यांच्यासोबत होता. त्यांनी सांगितलं की महाराज सफरीवरून आले तेव्हा त्यांनी सोबत एक मोठा आरसा किंवा त्यासारखी काच आणली होती. त्याचा रंग लाल होता. त्याच्यावर नक्षीच्या जागी माणसांची मुंडकी लटकलेली होती ती जरी खोटी असली तरी पुरेशी भयानक होती. काही दिवस महाराजांनी तो आरसा त्याला लपवून ठेवायला सांगितला होता. नवीन महालाचे बांधकाम होताच ते आलेले कामगार तो आरसा घेऊन गेले. धर्मा म्हणाला की तो लाल खोलीचा दरवाजा आहे ना! अगदी तसाच तो आरसा होता. मला काहीच समजत नव्हते. महाराज त्या दरवाजापलीकडे गेले की काय? गेले असतील तर तिकडे काय आहे. आम्ही त्या लाल खोलीची मागची बाजू पाहण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्हाला काहीच शोध लागला नाही. देवा ! महाराजांना कोणत्या संकटात अडकवलंस!

 

मग मी काही विश्वासू सेवक घेऊन राजकुंड या स्थळी जायचे ठरवले. ते ठिकाण एक बेट होतं महासागराच्या मधोमध. मला त्या ठिकाणाचा नकाशा महाराजांनी सांगितला होता. त्याबरहुकूम आम्ही निघालो. मजल-दरमजल करत महासागराच्या काठी आलो. पुढील प्रवासासाठी नाव हवी होती. त्याचा शोध घेऊ लागलो. अनेक नावाडी होते परंतु कोणालाही ते ठिकाण माहित नव्हते. काहींचे तर आयुष्य नावाडी म्हणून गेले होते ते जमिनीवर कमी सागरात जास्त राहिले होते त्यांनाही राजकुंड बद्दल माहिती नव्हती. आम्ही सगळे बुचकळ्यात पडलो. शेवटी एक नावाडी म्हणाला, "महाराज, इकडे एक १०० वर्षांचा बाबा आहे. यवन आहे तो, त्याचा सगळा जलम दर्यावर गेला, तो सांगेल तुम्हाला. सेवकांना तिथेच विश्राम करायला सांगून मी बाबाच्या झोपडीकडे निघालो. त्याची झोपडी नाविकांच्या गावच्या शेवटच्या टोकाला होती. दार वाजवल्यावर त्यांनी आत येण्यास सांगितले. मी आत गेल्यावर एका खाटेवर एक खूप वयस्कर माणूस बसला होता. त्यांनी मला सलाम केला. मी जास्त वेळ न घालवता त्यांना माझा मनोदय सांगितला. तो म्हणाला, अजूनपर्यंत अनेक आले ज्यांना तिथे जायचा मोह पडतो. शहाणे असाल तर जाऊ नका. त्या बेटावर खजिना नाही खूप मोठा धोका आहे. मी त्यांना सांगितलं की मला एक कंदर्पीही नकोय मी फक्त महाराजांना शोधायला आलोय. काही वेळ तो मला न्याहाळत होता. बहुतेक माझ्या हेतूबद्दल त्याची खात्री झाली असावी. मग तो म्हणाला,"ठीक आहे. सांगतो तुम्हाला. तुम्हाला नाव घेऊन स्वतःच जावे लागेल. कोणी नावाडी येणार नाही. नावेत सूर्योदयाच्या वेळेस बसून निघा. थेट पूर्वेकडे. न थांबता गेलात तर बरोबर सूर्यास्ताच्या वेळेस त्या जागी जाल. बरोबर एक आरसा न्या. तो आरसा अशा कोनात ठेवा की सूर्यास्ताचे किरण बरोबर तिरके त्यावर पडतील मग त्या आरशात तुम्हाला ते बेट आणि त्यावर जायचा मार्ग दिसेल. त्यावर तुम्ही एकटेच जाऊ शकता. तिथे एकावेळी एकच माणूस जाऊ शकतो. लक्षात ठेवा जर आरशाचा विशिष्ट कोन साधला गेला तरच ते बेट दिसेल. तुम्हाला बेटापर्यन्त नाव नेता येणार नाही पोहत जावे लागेल. तुमच्याजवळ दुसऱ्या दिवशी सूर्यास्तापर्यंत वेळ असेल. या वेळातच तुम्ही शोध घ्यायचा आहे. तुमच्या नावेतील सहकाऱ्यांनी परत त्याच कोनात आरसा ठेवला की ते बेट प्रकट होईल व तुम्ही नावेपर्यंत येऊ शकाल. कोन साधला गेला नाही तर तुम्ही बेटावर अडकून पडाल. त्या बेटावर एक दिवसापेक्षा जास्त कोणी जिवंत राहू शकत नाही. तुम्ही जर खजिन्याच्या मोहाने आले असाल तर विनंती करतो परत जा. तिथे कोणताही खजिना नाही. संपूर्ण जग धोक्यात येईल अशी गोष्ट तिथे आहे. ते आहे तिथेच राहू द्या." माझा जाण्याचा निश्चय पक्का होता. जीवाला कितीही धोका असला तरी. कारण महाराजांचे जीवित धोक्यात होते. मी त्या माणसाला विचारले, "या सर्व गोष्टी तुम्हाला कशा माहित?" तो गूढपणे हसला आणि म्हणाला,"हुजूर जेव्हापासून या जगाची निर्मिती झाली तेव्हापासून हे रहस्य आहे. माझ्या पूर्वजांकडे ही परंपरा कधी आली माहित नाही, आम्ही या रहस्याचे रक्षक आहोत. जर कोणी त्या बेटावर जायचा मार्ग विचारला तर आम्हाला तो सांगावाच लागतो. हे आमच्यावर बंधन आहे. इतकंच सांगीन. यापेक्षा जास्त काही सांगू शकत नाही. या आपण. सलाम!"


मी समुद्राच्या दिशेने निघालो. एक नाव मिळवली मग किनाऱ्यावरच विश्राम केला. सूर्योदयापूर्वी तयार होऊन सूर्योदयाच्या वेळेस निघालो. थेट पूर्व दिशा धरून निघालो. नाव मोठी होती. माझी माणसे आलटून-पालटून चालवत होते. काहीजण भोजन बनवत होते. मी त्यांना सगळे सांगितले होते. माझे त्या बेटावरून परत येणे त्यांच्या हातात होते. आम्ही एक मोठा आरसा सोबत घेतला होता. सूर्यास्त जवळ येत चालला होता. आरसा तयार ठेवला होता. सूर्याचे किरण आरशावर ठीक तिरके पडत होते. मी समोर नजर ठेऊन होतो. त्या माणसाने सांगितल्याप्रमाणे मी आरशाचा कोन ठेवला होता. मी आरशावर बारीक नजर ठेऊन होतो. इतक्यात अचानक आरसा धूसर दिसू लागला. मी समुद्राकडे पाहिले तर मावळत्या सूर्याचे किरण आरशात परावर्तित होऊन समोर एक बेट दिसू लागले होते. माझे सहकारी डोळे ताणून पाहत होते. हा दृष्टीभ्रम नाही ना असे त्यांना वाटत होते. मीही परत खात्री करून घेतली. माझ्या सहकाऱ्यांना आरशाचा कोन समजावून मी पाण्यात सूर मारला. पोहत पोहत बेटाकडे निघालो. सूर्य पूर्णपणे मावळायच्या आत मला तिकडे पोहोचायचे होते. कसातरी बेटावर पोहोचलो. मी सुखरूप आलो हे सहकाऱ्यांना सांगण्यासाठी मागे वळून पाहिलं तर मागे ना समुद्र होता ना माझी नाव ना माझे सहकारी. परतीचा रस्ता बंद झाला होता. हे बेट एका वेगळ्या मितीत होतं, ती आता माझ्यापुढे साकार झाली होती. ते बेट पूर्णपणे खडकाळ होते. ते प्रचंड खडक म्हणजे वेगवेगळे भयानक चेहेरे होते. इतके प्रचंड खडक कोरून काढणारा कोण अगम्य कलाकार होता? जरी खडकाचे असले तरी त्या चेहऱ्यांवरचे भयानक भाव पाहून अंगाचा थरकाप होत होता. त्या ठिकाणी एकही वृक्ष दिसत नव्हता, ना पक्षांचे आवाज, जिवंतपणाची एकही खूण तिथे नव्हती. मी त्या बेटावर फिरू लागलो. त्याचा विस्तार फार नव्हता. तरीही प्रचंड खडकांमुळे दमछाक होत होती. रात्र झाली असली तरी या बेटावर स्वच्छ चंद्रप्रकाश होता. काय शोधायचं आहे हे समजत नव्हतं. तरीही बेटाचा कानाकोपरा शोधणार होतो. उद्या सूर्यास्तापर्यंतचा वेळ होता. हळूहळू उजाडायला लागले. दिवसाच्या उजेडातही काही सापडेना. महाराज नक्की कुठे गेले असतील? विचार करून थकलो. हळूहळू वेळ कमी होत होती. निघायला थोडाच अवधी उरला होता. इतक्यात एक सपाट जागा दिसली. इतक्या खडकाळ बेटावर ही सपाट जागा कशी? तिच्यावर माती साठली होती जरा साफ करताच आश्चर्याचा धक्का बसला. महाराजांच्या खोलीतल्या लाल दाराची ती प्रतिकृती होती. ते एक दार होतं आणि तेही जमिनीला समांतर. त्यावर काही लिहिलेले होते. तो एक लेख होता. मी ती अक्षरे नीट लक्षात ठेवली. मी एखादी गोष्ट पहिली कि विसरत नसे. माझ्या या गुणावर महाराज प्रेम करत असत. माझी बुद्धिमत्ता पाहून तर त्यांनी मला राजगुरू नेमले होते. मी ते दार उघडण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु मला यश आले नाही. वेळ संपत आली होती. मी घाईने जिथून पोहत आलो तो खुणेचा कातळ मी लक्षात ठेवला होता. त्यावर एक क्रूर चेहरा कोरला होता. मी तिथे जाऊन थांबलो. पलीकडचे काहीच दिसत नव्हते. संपूर्ण धुके होते. इतक्यात त्यात काहीतरी चमकू लागले. सागराच्या गर्जनेचा आवाज येऊ लागला. माझी नावही दिसू लागली. मी पोहत नावेकडे गेलो. माझ्या सहकाऱ्यांनी मला नावेत घेतले. मी मागे वळून पहिले तर बेट अदृश्य झाले होते. आम्ही आमच्या राज्याकडे निघालो. परत येताच मी तो दारावरील लेख ताम्रपत्रावर लिहिला. हे मला माझ्या एकट्यानेच करायचे होते. याबद्दल मी कोणाशीही बोललो नाही. मी तो लेख उतरून काढला परंतु ती वाणी माझ्या परिचयाची नव्हती. मग परत शोध घेणे आली. अनेक पुरातन ग्रंथ माझ्या संग्रहात होते. त्यातील एका ग्रंथामध्ये फक्त एक ओळीचा उल्लेख होता. 'दुर्मिळवाणी' मग ती कशी वाचायची याबद्दल उल्लेख आढळला. मग खूप मेहनतीने ती शिकून घेतली. मग उत्सुकतेने तो लेख वाचू लागलो. वाचून पूर्ण झाल्यावर हादरून गेलो. तो लेख शब्दशः पुढे देतो आहे.


"पृथ्वीच्या मध्यापासून खाली ७ लोक आहेत. त्यातील सर्वांत खालचा लोक नरकलोक. ज्यांनी आयष्यात खूप पापे केली आहेत असे जीव तिथे शिक्षा भोगत असतात असा सामान्य जनांचा समज आहे परंतु तो मुद्दामच करून दिला आहे. या जगात आहेत ते जीव जे विष्णूच्या शापामुळे पाताळ लोकात अडकून पडले आहेत. हे जीव नित्यासूर नावाच्या असुराने स्वतःच्या रक्तापासून घडवले हे अविनाशी आहेत. मनुष्यापेक्षा प्रचंड असून अतिशय बुद्धिमान आहेत. आपल्या बळावर त्यांनी इंद्राचे राज्य जिंकून घेतले. सर्व देवांना भूतलावर हीन-दिन होऊन वावरावे लागले, तेव्हा ते विष्णूला शरण गेले. विष्णूने या जीवांशी युद्ध पुकारले. त्यात त्यांचा पराजय झाला. मृत्यू नाही. विष्णूने त्यांना पातळ लोकातील सर्वांत खालच्या स्तरावर पाठवून दिले. त्या ठिकाणी त्यांच्या शक्ती काम करत नाहीत. हे मानवा ! जर तू आम्हाला बाहेर काढलेस तर तुला आम्ही या भूतलावरील सर्वांत मोठ्या खजिन्याचे मालक करू. तुला अमरत्व प्रदान करू. पुढील तिथीवरच तू आम्हाला बाहेर काढू शकतोस..."


लेख पूर्ण झाला होता आणि धक्कादायक गोष्ट अशी होती की ती तिथी आजपासून ठीक दहा दिवसांनी होती. त्या जीवांचे पुजारी नक्कीच बाहेरच्या जगात असणार. तो दुर्वासनाथ त्यातीलच एक असणार. काही ठराविक तिथीला जन्मलेले लोकच हे द्वार उघडू शकतात, म्हणूनच त्यांनी महाराजांकरवी हे नरकद्वार महालात बसवून त्या जीवांना बाहेर काढण्याचा खटाटोप चालवला होता. हे असे होता कामा नये. महाराज स्वतःच्या क्षुल्लक मोहापायी संपूर्ण जगाला धोका निर्माण करत होते. नाही हे थांबलेच पाहिजे. मी परत राजकुंडवर जाणार आहे. नक्कीच तिथे तो दरवाजा बंद करण्याविषयी माहिती असणार, मला त्या वृद्ध यवनाला भेटले पाहिजे. हे सर्व थांबवले पाहिजे. या कार्यात माझा मृत्यू झाला तरी चालेल. ही सर्व माहिती धर्माच्या हवाली करून मी निश्चिंत मनाने जाईन.“


महादेवशास्त्रींचा वृत्तांत इथे संपला होता. तुषारने वाचून ती ताम्रपत्रे खाली ठेवली. ज्याअर्थी आपण आज सुखरूप आहोत म्हणजे महादेवशास्त्रींना ते द्वार बंदच ठेवण्यात यश आलेलं दिसत होतं. परंतु त्यांचा स्वतःचा यात बळी गेला असावा. कारण यापुढचा वृत्तांत त्यात नव्हता. तुषारकडे नेहेमीच पंचांग असायचे , वृतान्तात ते द्वार उडण्याची तिथी दिली होती, ती हजारो वर्षांपूर्वीची होती मग त्यांनी सर्व हिशोब मांडला. तीच तिथी आणि सर्व ग्रह नक्षत्र पुन्हा त्या स्थितीत येणार होते, आजपासून एक महिन्याने? हे वास्तव जाणून तो घाबरला. ते उघडण्यासाठी योग्य माणूसही लागणार होता... तो कोण? लगोलग त्याच्या मनातून उत्तर आले "निलय" म्हणूनच निलय इथे आला होता. या योगायोगाच्या गोष्टी नव्हत्या. नियतीने ठरवलेली एक चाल होती आणि तुषार ती यशस्वी होऊन देणार नव्हता, कधीच!

(क्रमशः)


Rate this content
Log in

More marathi story from SAMPADA DESHPANDE

Similar marathi story from Drama