जोगळेकर बाई
जोगळेकर बाई
आज जवळ जवळ पंचवीस वर्षांनी १९९५ च्या दहावीच्या बँच नि गेटटुगेदर चा प्लॅन केला. मुलींनीच पुढाकार घेऊन कार्यक्रमाची आखणी केली. सर्वानी शिक्षकांनाही बोलवायचं अस ठरवलं. मग दहावीच्या वर्गात शिक्षकांनी त्यावेळी घ्यायचे तसेच तास आताही घ्यायचे असे ठरले. शिक्षकांनीही अगदी आनंदाने मान्यता दिली. मग झाल गावात राहणारे मुलं-मुली कामाला लागले . हयात शिक्षक, मुले मुली यांचे पत्ते फ़ोन नंबर शोधून संपर्क साधला गेला. बरेच जण परदेशात राहत होते. त्यांनी आपण ऑनलाईन कार्यक्रमाला हजर राहू असे आवर्जून सांगितले.
मग ठरलेला दिवस आला. मुंबई पुणे इथे राहणारे आदल्या दिवशीच आले होते. ज्यांची घरे होती ते आपापल्या घरी आणि ज्यांची नव्हती ते नातेवाईकांकडे असे येऊन राहिले होते. कार्यक्रमाचा दिवस उजाडला. गावातल्या मुलांची गडबड उडून गेली . यजमान होते ना ते ! सगळे विध्यार्थी चाळीशीकडे झुकलेले. आपापल्या क्षेत्रात सगळे स्थिर
स्थावर झालेले. या कार्यक्रमासाठी सर्वानी भरभरून सढळहस्ते मदत केली होती . ज्यांना शक्य नव्हते त्यांनी ती उणीव कष्टानी भरून काढली होती .परदेशातूनही सर्वानी या कार्यक्रमासाठी देणग्या दिल्या होत्या . शाळेतले सभागृह रंगीबेरंगी कपड्यामधल्या मुलांनी भरून गेले होते . सर्वानाच काय बोलू नि काय नको असे झाले होते. काही जण तर दहावी नंतर आताच भेटले होते. सगळे जण एकमेकांना त्याच जुन्या नावाने हाक मारत होते.
“ए! जाड्या, ए काठी, काळ्या अशी मित्र मैत्रिणींकडून प्रेमाची हाक आल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलत होता. भले तो जाड्या आज फिटनेस एक्स्पर्ट का झालेला असेना! आणि काठी आज गरगरीत भोपळा का झालेला असेना. एकेकाळची नाजूक चिमणी आज काकू झालेली असली तरी त्या जुन्या नावाने तिच्या चेहऱ्यावर हास्य फुलत होतं. शिक्षक आपल्या यशस्वी विद्यार्थ्यांकडे कौतुकाने बघत होते. त्यांच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर अभिमान ओसंडून वहात होता.