SAMPADA DESHPANDE

Horror

3  

SAMPADA DESHPANDE

Horror

चकवा

चकवा

12 mins
291


आज जवळ जवळ तीस वर्षांनी ते पाच मित्र एकत्र भेटले. सगळे पन्नाशीच्या घरातले. आपापल्या आयुष्यात स्थिरस्थावर झालेले. मुलेही शिक्षण पूर्ण होऊन आपापल्या मार्गाला लागलेली. पती-पत्नी यांनी एकत्र फिरण्याचे दिवसही आता संपले होते. दोघेही आपापल्या जगात रमले होते. असा हा आयुष्याचा उंबरठा. धड म्हातारेही नाही धड तरुणही नाही. आपण तरुण राहिलो नाही हे समजत होतं. आयुष्यातला कठीण टप्पा. एक दिवस संजय गोखलेला काय वाटलं कोणास ठाऊक त्यानी सगळ्याशी संपर्क साधला आणि भेटायचं ठरवलं. खरंतर सगळेच मुंबईमध्ये होते. तरीही गेल्या पंचवीस- तीस वर्षात भेटीगाठी बंद झाल्या होत्या. मग दिवेश कुलकर्णीच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने सगळे एकत्र भेटले आणि सगळ्यांनाच कॉलेजच्या दिवसांची आठवण झाली. यापुढे आपण नक्की भेटायचं असं नक्की करून ते आपापापल्या घरी गेले. संजय ने सगळ्यांचा व्हाट्स अप ग्रुप बनवला होता. मग सगळ्यांनी जेवायला भेटायचे ठरले. सगळ्यांचे बाहेरच्या जगात खूप मित्र मैत्रिणी होत्या पण शाळेतल्या मैत्रीची सर कशाला येणार ! सगळे महिन्यातून एकदा भेटू लागले. संजय, दिवेश, योगेश, चेतन, मधुकर, असे पाचजण. त्यांना एकत्र आणण्यात आणि बांधून ठेवण्यात संजयनेच पुढाकार घेतला होता.

एका भेटीत संजय ने सगळ्यांनी कुठेतरी चार दिवस फिरायला जाऊ अशी गळ घातली. तसे सगळेच शहराच्या धकाधकीला कंटाळले होते. मग सगळ्यांनीच त्यासाठी होकार दिला. आता मग प्रश्न आला कुठे जायचं ! तोही प्रश्न संजयनेच सोडवला. पाचगणीजवळ त्याने एक छोटासा प्लॉट घेऊन डेव्हलप केला होता. संजय हॉटेल व्यवसायात असल्याने त्याने तिथे छोटंसं रिसॉर्ट बनवलं होतं. आता पावसाळी दिवस असल्यामुळे पर्यटक कमी होते. आपण माझ्या रिसॉर्टला जाऊ असं त्यानी सुचवलं. "अरे! पण तिकडे याची सोय आहे का ?" अंगठा तोंडाजवळ नेऊन चेतन म्हणाला. "अरे म्हणजे काय ! तू चल तर खरा." संजय हसत म्हणाला. 

ठरल्याप्रमाणे ते निघाले चेतन गाडी चालवत होता. सगळेच पिकनिकच्या मूडमध्ये होते. गाणी म्हणत,गप्पागोष्टी करत ते चालले होते. इतक्यात दिवेशला आठवलं," अरे पाचगणीच्या आधी सात किलोमीटरवर एक फाटा फुटतो तिकडे जंगलात एक सुंदर दत्ताचं देऊळ आहे. दहा वर्षांपूर्वी मी आलेलो तेंव्हा गेलो होतो तिकडे. जाऊयात आपण तिकडे. खूप रमणीय स्थान आहे." चेतन वैतागून बोलला," साल्या तुझं झालं चालू देव देव. जराही बदलला नाहीस." दिवेश दत्तगुरुंचा भक्त होता. त्याची दत्तभक्ती सगळ्यांच्या थट्टेचा विषय होता. मग संजय म्हणाला," इतकं बोलतोय तर जाउया कि! ज्यांना देवळात जायचं नाही ते आसपासच्या निसर्गाचा आनंद घेतील." सगळ्यांनी होकार दिला कारण जायची घाई कोणालाच नव्हती.  

मग संध्याकाळी पाचच्या सुमारास ते पाचगणीच्या आधी असलेल्या फाट्यावरून आत आले आणि आसपासचे निसर्गसौंदर्य पाहून हरखले. जसे जसे ते आत जात होते तसा तसा रस्ता अधिक रमणीय होत गेला. अर्ध्या तासाने ते दत्त मंदिराजवळ गेले. दिवेश आणि संजय देवळात गेले बाकीचे बाहेरच थांबले. दिवेशने मनोभावे दत्तात्रयांना हात जोडले. नकळतपणे त्याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या. जुन्या आठवणींचं काहूर माजलं. हे असंच व्हायचं. देवापुढे हात जोडल्यावर त्याला आपल्या हातून झालेल्या चुकीची जाणीव होऊन डोळ्याला धारा लागायच्या. आज या मित्रांच्या एकत्र येण्याने त्या आठवणींवरची खपली निघाली आणि जखम परत भळाभळा वाहू लागली. इतक्यात त्याच्या खांद्यावर संजयचा हात पडला. दिवेश संजयला मिठी मारून ढसाढसा रडला. त्याने संजयसमोर आणि दत्तगुरुंसमोर आपल्या अपराधाची कबुली दिली.

 थोड्या वेळाने ते निघाले. एवढ्यात त्यांच्या गाडीजवळ एक वृद्ध ब्राम्हण आला. चेतनने चिडून त्याला शिवी हासडली," ए मरायला दुसरी गाडी शोध ना ! माझीच कशाला हवे तुला?" तो ब्राम्हण म्हणाला, "माफ करा पोरांनो मी या देवळाचा पुजारी, आज पूजा करून निघालो तर उशीर झालाय. थोड्याच वेळात पाऊस येण्याची चिन्ह आहेत. मला मुख्य रस्त्यापर्यँत सोडलेत तर तुमचे उपकार होतील. चेतन खरंतर त्यांना उडवून लावणार होता पण संजय म्हणाला," असे सोडूयाना त्यांना ! बघ खरंच पाऊस भरून आलाय." मग तो मागचं दार उघडत म्हणाला," या बाबा." ते गुरुजी दिवेश आणि संजयच्या मध्ये बसले. गाडी चालू झाली. काळोख पडला होता आता पाऊसही जोर धरू लागला होता. मग थोड्याच वेळात हे मुख्य रस्त्याला लागले. त्या गुरुजींनी गाडी थांबवायला सांगितली. रस्त्यात संजय आणि दिवेश सोडून बाकी तिघे त्या गुरुजींची चेष्टा करत होते. तेही शांतपणे ऐकून घेत होते. मग त्यांनी एका बाजूला गाडी लावायला सांगितली. उतरण्याच्या आधी ते म्हणाले," मुलांनो ! हा दत्त मंदिरातला अंगारा आहे. तो सर्वांनी लावून घ्या. मी लावतो तुम्हाला ! हा अंगारा वाटेत येणाऱ्या संकटापासून तुमचं रक्षण करेल." दिवेश आणि संजय सोडून कोणीही अंगारा लावून घेतला नाही. ते गुरुजी उतरून निघून गेले.

उशीर झाला होता त्यामुळे सगळ्यांनीच वाटेत एका हॉटेलमध्ये जेऊन घेतले. मग ते रस्त्याला लागले. आता योगेश गाडी चालवत होता. पाचगणीपासून दहा किलोमीटरवर संजयचे रिसॉर्ट आहे असे संजयने त्यांना सांगितले होते. थोड्याच वेळात पाचगणी येणार होते. रात्रीचे साडेदहा वाजले होते. पाऊस मी म्हणत होता. रस्त्याला एकही वाहन दिसत नव्हते. इतक्यात ते एका तिठ्यावर आले. योगेशने पहिले तर उजव्या बाजूला एक चौथा छोटा रस्ता दिसत होता. त्यावर लिहिलं होतं "पाचगणी बायपास वडाची वाडी ५ किलोमीटर " त्यांना वडाची वाडीलाच जायचं होतं. योगेश सगळ्यांना म्हणाला, इकडून जाऊ म्हणजे लवकर पोहोचू." संजय म्हणाला," माहितीच्या रस्त्याने जाऊ, इकडून नको आता रात्र झाली आहे. उगाच अनोळखी रस्त्यानी कशाला जायचं?" चेतन म्हणाला," संज्या ! अरे लवकर पोहोचू पाऊस बघ किती वाढलाय. नाहीच सापडला तर परत याच रस्त्यानी मागे येऊ. पाच किलोमीटरचा तर प्रश्न आहे. संजयला पटलं नाही तरी तो गप्प बसला. मग ते निघाले. आधी छोटा असलेला रस्ता आता पुढे मोठा होत गेला. आपण इकडून कधीच कसे आलो नाही याचे संजयला आश्यर्य वाटले. वाटेत त्यांना एकही गाडी दिसली नाही. दोन्ही बाजूंना किर्र झाडी होती.अर्धा तास झाला तरी वस्तीचं काहीच चिन्ह दिसेना. मग मात्र आपण चुकलो असे सगळ्यांना वाटायला लागले. मग सर्वानुमते परत फिरायचे असे ठरवले.     

गाडी संजयची होती. खरंतर त्याला योगेशचा राग आला होता अनोळखी रस्त्यावरून गाडी नेली याचा. त्याला लवकरात लवकर त्याच्या रिसॉर्ट वर जायचे होते. तिकडे त्याने सगळी सोय करून ठेवली होती. या सर्वांचा काटा काढायची. म्हणूनच त्याने स्वतःची गाडी घेतली होती.

त्याला आजही आठवत होते ते दिवस. हे पाच जण शेवटच्या वर्षाला होते. सगळे श्रीमंत कुटुंबातले, हातात पैसे खेळत असायचे. त्यामुळे अनेक मुली त्यांच्यावर फिदा असायच्या. मुलींना खेळवून सोडून देणे हे तर त्यांचे नेहेमीचेच होते. संजय मध्यमवर्गीय घरातला होता. तो जीव तोडून शिकत होता. आईवडिलांसाठी आणि आपल्या लहान बहिणीसाठी. 'शामला' त्याची लहान बहीण म्हणजे त्याचा जीव होती. तिला शिकवून स्वतःच्या पायावर उभे करायचे आणि एखाद्या चांगल्या घरात तिचे लग्न लावून द्यायचे स्वप्न तो पाहत होता. शामला अतिशय सुंदर होती. साहजिकच संजयकडे येणाऱ्या दिवेश, योगेश, चेतन, मधुकर यांची नजर तिच्यावर होती. पण मित्राची बहीण म्हणून ते गप्प होते. शामलाला आपल्या सौंदर्याची पुरेपूर जाणीव होती. आपल्या दादाचे मित्र आपल्यावर लट्टू आहेत ही गोष्ट तिला खूष करायची. तिला मात्र या सगळ्यांमधला दिवेश फार आवडायचा. हळूहळू त्यांच्या भेटीगाठी चालू झाल्या. दिवेश आणि शामला एकमेकांच्या प्रेमात पडले. संजयला याची काहीच कल्पना नव्हती. बाकीचे तिघे मित्र मात्र शामला हातची गेली म्हणून चरफडत होते. ते शमालासाठी वेडे झाले होते. इतके कि ती आपल्या एका मित्राची बहीण आहे आणि दुसऱ्याची प्रेयसी हेही ते विसरले. अशातच एक दिवस त्यांनी एक कट रचला. शामला आणि दिवेश यांना त्यांच्या रिलेशनशिप बद्दल पार्टी द्यायचे असे त्यांनी दिवेशला सांगितले. शामलाला तिच्या घरात या सगळ्या गोष्टी मिळत नसत. तिचे वडील तिला महागडे गिफ्ट हॉटेलमध्ये जेवण या गोष्टी देऊ शकत नसत. दिवेश मात्र तिची सगळी हौस पुरवत असे. तिलाही त्याची चटक लागली होती त्यामुळे ती सहज पार्टीला जायला हो म्हणाली. रात्री मैत्रिणीकडे अभ्यासाला जाते, तिकडेच राहीन असे सांगून ती दिवेशबरोबर गेली. ते सगळे मधुकरच्या फार्म हाऊस वर आले. सगळे ड्रिंक करू लागले. शामला नको म्हणत असताना तिलाही घ्यायला लावले. मग दिवेशला एका खोलीत नेऊन आपण सगळे तिच्याबरोबर मजा करू असे सांगितले. दिवेशने स्पष्ट नकार दिला. माझे तिच्यावर प्रेम आहे आणि आम्ही लग्न करणार आहोत असे त्याने सांगितले.

दिवेश ऐकत नाही असे लक्षात आल्यावर त्या सगळ्यांनी दिवेशला एका खुर्चीला घट्ट बांधून ठेवले. धुंदीत असलेल्या शामलाला तिकडे फरपटत आणून सगळ्यांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. एकदा नाही तर अनेकवेळा. दिवेश हे सगळं उघड्या डोळ्यांनी पाहत होता. शामला मदतीसाठी त्याला हाका मारत होती. पण तो सुटू शकत नव्हता. चिडलेल्या शामलानी त्या सगळ्यांना पोलिसात जायची धमकी दिली तेंव्हा घाबरून त्यांनी तिला गळा दाबून मारून टाकले. त्याच फार्महाउस बाहेर असलेल्या एका पडीक जमिनीत तिला पुरून टाकले. जर का कोणाला सांगितलं तर तुही आंमच्याइतका गुन्हेगार आहेस हे आम्ही सांगू अशी दिवेशला धमकी दिली. दुसऱ्या दिवशी संजयच्या घरी गहजब उडाला. शामला परत आली नव्हती. ती केवळ अठरा वर्षांची होती. मग शोधाशोध सुरु झाली. सगळ्या मित्रांनी यात त्याला खूप मदत केली. खूप शोध घेऊनही शामला सापडली नाही. मग आठ वर्षांनी ती केस पोलिसांनी बंद केली.

संजय एक क्षणही तिला विसरू शकत नव्हता. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी त्याला शामलाची मैत्रीण भेटली. ती शामला नाहीशी झाली त्याआधीच दुसऱ्या गावात राहायला गेली होती. मग तिच्याकडून संजयला दिवेश आणि शामलाच्या नात्याबद्दल समजले. तसेच त्याचे इतरही मित्र तिच्या मागे होते हेही समजले. मग काय झालं असेल त्याच्या लक्षात आलं. आपण ज्यांना आपले मित्र समजत होतो तेच आपले वैरी निघाले. याचे त्याला वाईट वाटले. हळूहळू सगळ्यांनी त्याच्याशी संबंध तोडले होते. मग सगळ्यांना एकत्र आणून त्यांचा बदला घ्यायचा त्याने ठरवले पण ते त्याची भेट टाळत होते.. खूप प्रयत्नांनी तो सगळ्यांना एकत्र आणण्यात यशस्वी झाला होता. आज दत्तगुरूंच्या देवळात दिवेशने त्याला सगळे खरे सांगितले होते. तोही इतकी वर्षे हा बोजा स्वतःवर वागवत होता. त्याने लग्नही केले नव्हते. हे समजल्यावर संजयने त्याला माफ केले होते. त्याने रिसॉर्टवर पूर्ण तयारी केली होती. त्यांना मारून दरीत ढकलून द्यायचे असे त्याने ठरवले होते. त्यामुळेच रहदारी नसल्या रस्त्याने तो त्यांना नेत होता. पण अचानक हा कोणता रस्ता आला ज्यावर ते चुकले होते. बराच वेळ गाडी चालवूनही ते परत त्या फाट्यावर येत नव्हते. इतक्यात मधुकर म्हणाला," अरे ते बघा ते झाड ! जे मघाशीपण दिसले होते." मग त्यांनी लक्ष ठेवले आता त्यांच्या लक्षात आले कि आपण पुढे किंवा मागे जात नाही आहोत त्याच त्याच रस्त्यावरून फिरत आहोत. दिवेश घाबरून म्हणाला," आपल्याला चकवा लागला बहुतेक. आपण एकाच मार्गावरून फिरत आहोत." सगळ्यांना चकवा या शब्दाचा अर्थ समजला. सगळे घाबरले. "आता काय करायचं रे संज्या?" चेतन म्हणाला. "मला काय सवय आहे या गोष्टींची ? फक्त आता पेट्रोल संपलं तर काय हा मोठा प्रश्न आहे " संजय वैतागून म्हणाला. चकव्यात सापडलेले लोक बाहेर पडू शकत नाहीत असे त्याने ऐकले होते . आपण इथेच मरणार बहुतेक असे त्याला वाटू लागले. दिवेशने मनात दत्तगुरुंचा धावा चालू केला. तेच आपल्याला या संकटातून तरतील ही त्याला खात्री होती. मग योगेशला उजव्या बाजूला झाडीत एक दिवा लुकलुकताना दिसला, तो ओरडला," तिकडे बघा ! बहुतेक एखादे घर आहे. " सगळेच खूष झाले. मग योगेशने त्या दिव्याच्या दिशेने गाडी वळवली तिकडे जायला नीट रस्ता नव्हता. खाचखळग्यातून जावे लागत होते. तो दिवा पण जवळ आल्यासारखा वाटे मग दूर जाई. नजर फसत होती. आपण असेच भरकटून मरून जाणार कि काय असे वाटून सगळेच बिथरले होते. ते गाडी चालवणाऱ्या योगेशला वेगवेगळे सल्ले देत होते. त्यामुळे तो वैतागला होता. आता मुख्य रस्ता सोडून ते खूप आत आले होते. ही जागा अजून भयाण होती. पाऊस तर ओतल्यासारखा कोसळत होता. फक्त हातभर अंतरावरचे जेमतेम दिसत होते. आपल्याला दिवा कसा दिसला याचे सगळ्यांना आश्यर्य वाटत होते. मग हळूहळू एक मोठे घर नजरेच्या टप्प्यात आले. ते एक जुन्या बांधणीचे कौलारू घर होते. योगेशने गाडी त्या घरापुढे थांबवली. मग एक एक करून सगळे उतरले. पुढे गेले मधुकरने दार वाजवले. थोड्या वेळाने दार उघडले गेले. घराचा मालक अगडबंब देहाचा होता. तो या सगळ्यांकडे बघत होता. मग चेतन पुढे येऊन म्हणाला," आम्ही रस्ता चुकलोय. प्लिज आम्हाला आजची रात्र या घरात थांबू द्याल का ? बघताय ना पाऊस किती पडतोय. कृपा करून आम्हाला आत घ्याल का ? " चेतन त्या माणसाशी बोलेपर्यंत दिवेश आणि संजयनी घरात डोकावून पहिले. तो एक मोठा दिवाणखाना होता. तिथे एक कंदील लावला होता. त्या उजेडात सोफ्यावर बसलेली अनेक माणसे दिसली. इतकी माणसे असूनही त्यांची जराही हालचाल दिसत नव्हती. एखाद्या पुतळ्याप्रमाणे बसली होती. दिवेश संजयला म्हणाला,' संज्या काहीतरी विचित्र वाटतंय. ती माणसं बघ ना काहीच हालचाल करत नाहीयेत. एवढी माणसं आहेत एकमेकांशी बोलायला तरी हवेत ना ? मला तर गडबड वाटतेय. हा माणूस लोकांना हिप्नोटाईझ करून लुटत तर नसेल ! आपण इथे नको जायला." इतक्यात चेतनचं त्या माणसाशी बोलून झालं. तो माणूस इतक्या वेळात एक अक्षरही बोलला नव्हता. त्याने फक्त या सगळ्यांना आत या अशा अर्थाची खूण केली. ते संजय चेतनच्या कानात म्हणाला," थांब चेतन ! काहीतरी गडबड वाटतेय नको जायला आत. हा माणूस काहीतरी वेगळाच वाटतोय. बघ अंधारात त्याचे डोळे कसे चमकत आहेत. मागे चल परत आपण रस्ता शोधू." हे ऐकणारा मधुकर म्हणाला," या पावसाळी रात्री कुठे फिरत बसणार ? चला आत. असा निवारा मिळणार नाही. उद्या सकाळी रस्ता शोधू. फक्त चार-पाच तासांचा प्रश्न आहे. मग संजय आणि दिवेशची चलबिचल झाली. फक्त एका शंकेपायी मोठ्या मुश्किलीने मिळालेला निवारा कसा सोडायचा! ते हा विचार करेपर्यंत चेतन, योगेश आणि मधुकर आत गेलेसुद्धा. मग या दोघांनीही उंबऱ्याच्या दिशेने पाय टाकला इतक्यात दोघांच्याही कपाळातून जोरात कळ आली. दोघेही बाहेर थांबले. असं काय झालं ? दोघांचाही हात कपाळावर गेला आणि एकदम त्यांच्या लक्षात आले त्या पुजाऱ्याने दोघांच्या कपाळावर अंगारा लावला त्याच ठिकाणी त्यांना दुखले होते. म्हणजे इथे काहीतरी 'वेगळं' आहे. त्यांच्यावर संकट येईल ही गुरु दत्तात्रेयांना कल्पना आली होती. म्हणूनच त्यांनी त्यांच्या पुजाऱ्याला पाठवले होते. इथे आत गेलो कि आपण बाहेर येऊ शकणार नाही याची दोघांना खात्री पटली. काही झालं तरी आत जायचं नाही हे त्यांनी ठरवलं. मग दिवेशने आपल्या मित्रांना हाका मारायला सुरवात केली. पण ते आत गेले होते. आता हे बाहेर येणार नाहीत याची त्यांना समजले. बाहेरचे आणि आतले जग वेगळे होते. त्यांच्या मित्रांपर्यंत त्यांचा आवाजही पोहोचत नव्हता. तो माणूस दिवेश आणि संजय आत यायची वाट बघत होता. हे दोघे मागे फिरताच तो मागे गेला आणि दार लावून घेतले. दिवेश आणि संजय गाडीत येऊन बसले. दिवेश हादरला होता,"संजय ते तिघे आता परत येणार नाहीत असंच वाटतंय. दत्तगुरूंनी आपल्याला जसं वाचवलं तसं त्यांना का वाचवलं नाही ?" संजय म्हणाला," देवासाठी सगळे सारखे असतात. त्यांनाही देवाने संधी दिली होती. ते पुजारी त्यांना अंगारा लावत होते त्यांनी लावून घेतला नाही. बरं झालं त्यांना त्यांच्या पापांची शिक्षा मिळाली. आयुष्याच्या शेवटच्या क्षणी तरी त्यांना आपल्या कर्माचा पश्चताप झालेला असू दे .चल आपण अजून या घराच्या आवारात आहोत धोका टळला नाही. त्या घरमालकाचं क्षेत्र कुठपर्यंत पसरलं आहे माहित नाही." मग ते निघाले संजयने गाडी चालू केली. थोड्या अंतरावर गेल्यावर त्यांना रस्ता लागला. येताना झालेला त्रास आठवून आता इतका पटकन कसा रस्ता सापडला याचे दोघांनाही आश्यर्य वाटले. साधारण चार किलोमीटरवर गेल्यावर त्यांना तो तिठा लागला. त्यांनी पाचगणीकडे जायचे रद्द करून परत मुंबईकडे जायचे ठरवले. आता हळूहळू उजाडू लागले होते. तिठ्याजवळच एक छोटंसं हॉटेल दिसलं. दोघांनी तिकडे जाऊन चहाची ऑर्डर दिली. हॉटेलचा मालक बडबड्या होता. त्याने संजयला कुठून आलात वगैरे विचारतच संजयने त्याला त्या चौथ्या रस्त्याबद्दल सांगितले. ते ऐकल्यावर त्याचे डोळे भीतीने विस्फारले. तो म्हणाला," तुम्ही त्या रस्त्याने जाऊन आलात ?" दिवेश म्हणाला," हो. हे काय आता तिकडूनच येतोय.पण आमचे मित्र त्या घरात गेले " तो हॉटलमलक घाबरून म्हणाला," साहेब याबद्दल फक्त ऐकलं होतं. खोटं वाटत होतं पण आता तुम्ही ते पाहून आलात म्हणजे ते खरंच असेल." "काय खरं असेल ?" दिवेश म्हणाला. हॉटेल मालक विचारात पडून म्हणाला," कधीतरी एखाद्या  दिवशी हा रस्ता प्रकट होतो असे म्हणतात. तो रस्ता नाही तर चकवा आहे. ज्यात तुम्ही सापडला. माझे आजोबा सांगायचे तेंव्हा खरं वाटायचं नाही. तिथे जो माणूस गेला तो परत कोणाला दिसायचा नाही. ते घर म्हणजे मृत्यूचा सापळा आहे. त्या ठिकाणी एक सुंदर असं गाव होतं. त्या गावाचा हा जमीनदार होता. तो अतिशय लालची होता. पैशासाठी तो वाटेल ते करायला तयार व्हायचा. त्यासाठी तो काळ्या शक्तीची उपासना करू लागला. अमरत्व आणि पैसे मिळवण्यासाठी त्याने माणुसकीच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या. त्याने अनेक माणसांचे बळी दिले. सर्व लोक त्याला अतिशय घाबरत असत. मग एक दिवस त्या गावात एक पुजारीबाबा आले. गावातल्या लोकांनी त्यांना त्या जमीनदाराबद्दल सांगितले. आपण एकटे इथे पुरे पडू शकणार नाही यांची त्यांना कल्पना आली. त्यांनी गावातल्या लोकांना गाव खाली करून निघून जायला सांगितले,कारण त्यांना निष्पाप लोकांचे अजून बळी जायला नको होते. त्यांची आणि जमीनदाराची काय लढाई झाली माहित नाही. पुजारीबाबा जिंकले कि नाही माहित नाही. पण तेंव्हापासून जमीनदाराच्या गावाचा परिसर सामान्य लोकांसाठी नाहीसे झाले. ते पुजारीबाबाही कोणालाच दिसले नाहीत. असे म्हणतात कि एखाद्या अभद्र दिवशी ते जमीनदाराचे घर आणि आसपास चा परिसर पुजारीबाबांच्या मंत्राच्या प्रभावातून बाहेर येते आणि ज्याचे मरण जवळ आले त्यांच्यासाठी घराकडे जाण्याचा रस्ता प्रकट होतो, रस्त्यावर जाणाऱ्या लोकांचा बळी जातो. ते पुजारीबाबाही त्या दिवशी लोकांना दिसतात, त्यांना वाचवायचा प्रयत्न करतात. ज्याचे नशीब असते तो वाचतो ज्याचे नसेल तो त्या जमीनदाराच्या चकव्यात अडकतो. कित्येक पिढ्यांपासून या चकव्याची कथा सांगितली जाते. तुमच्या मागे देव होता म्हणून सुखरूप परत आलात." तो माणूस असे म्हणल्यावर दोघांनीही नकळतपणे आपल्या कपाळावर हात लावला. त्यांना अंगारा लावणारे पुजारीबाबा आठवले. ही त्या पुजारीबाबांचीच कृपा. आपले तीन मित्रही वाचले असते जर त्यांनी तो अंगारा लावून घेतला असता तर. आज ते जिवंत असते. संजयने जरी त्यांना मारायचा प्लॅन केला होता तरी ते इतक्या भयानक सापळ्यात सापडून गेले याचे त्यालाही वाईट वाटले. जाताना ते थांबून त्या दत्तमंदिरात गेले. देवाचे मनापासून आभार मानले.

ते मुंबईला परत आले. दिवेशने संजयला शामला पुरलेली जागा दाखवली. तिथून तिचा सांगाडा बाहेर काढून त्यावर संजयने विधिवत अंत्यसंस्कार केले. चेतन, योगेश, मधुकर हे आपल्याबरोबर आलेच नाहीत असे त्यांनी त्यांच्या घरच्यांना सांगितले. जसे शामलाला शोधायला त्या तिघांनी मदत केली होती तशीच संजय आणि दिवेशनेही त्यांच्या घरच्यांना केली. ते कधीच परत येणार नाहीत. हे या दोघांनाच माहित होते.  

समाप्त

टीप - ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. जर सत्याशी संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा ही नम्र विनंति. 



Rate this content
Log in

Similar marathi story from Horror