We welcome you to write a short hostel story and win prizes of up to Rs 41,000. Click here!
We welcome you to write a short hostel story and win prizes of up to Rs 41,000. Click here!

Ajay Nannar

Horror Inspirational Thriller


4.6  

Ajay Nannar

Horror Inspirational Thriller


स्वप्नार्थ - एक गूढ कथा

स्वप्नार्थ - एक गूढ कथा

5 mins 1.0K 5 mins 1.0K

अरुण अचानक झोपेतून दचकून उठला. खिडकीतून गार वाऱ्याची झुळूक त्याच्या अंगाला चाटून गेली. घामाने डबडबलेल्या त्याच्या शरीरावर त्या गारव्याने काटा आला. त्याचं अंग थंड पडलं होत मात्र घसा कोरड्या विहीरीच्या भिंती सारखा झाला होता. अरुण पलंगावरून उठायच्या प्रयत्नात होता पण त्याचे शरीर जसे त्याची साथच देत नव्हते. थोडावेळ तो तसाच बसून राहिला. काही क्षणांपूर्वी छातीफाडून बाहेर पडेल अशी त्याच्या हृदयाची धडधड आता कमी झालेली होती.


अरुणने डोळे चोळले आणि जीव एकवटून अंथरूणातून उठला. रात्रीचं निळ चांदणं खोलीभर पसरलं होतं. अरुण दबक्या पावलाने खिडकीजवळ गेला आणि दोन्ही हाताने खिडकी अलगद बंद करून वळाला. त्याच्या छातीत पुन्हा एकदा धस्स झालं. समोर शिल्पा पलंगावर बसलेली त्याच्या कडेच पाहत होती.


“अगं का उठलीस तू? झोप परत !”, अरुण घसा गिळत म्हणाला.

“अरुण, तुला पुन्हा एकदा तेच वाईट स्वप्न पडलं का रे?”, शिल्पाने चिंताग्रस्त आवाजात विचारले.

अरुण ने टेबलावरच्या पेल्यातुन गटागटा पाणी पिले आणि अंगातल्या सदऱ्याने तोंड पुसत शिल्पाकडे आला.

“हो ! तेच स्वप्न पुन्हा पडले शिल्पा..कळत नाहीये कि का कोण जाणे राहून राहून तेच स्वप्न पडत आहे?”

“अरुण, आपण इथे आल्यापासूनच हे चाललंय ..आता मला नको नको ती शंका यायला लागली आहे.. तू साहेबांशी बोलून इथलं काम सोड..आपण परत शहरी जाऊ..तू तिथलं काम संभाळ..”


“नाही शिल्पा ! मी स्वतःच्या मर्जीने हे काम हाती घेतले आहे..मागे वळण्यात काहीच अर्थ नाही..

आणि विचार कर, जर आपण परत शहरी गेलो आणि ह्या स्वप्नाचा फेरा काही संपलाच नाही तर मग मी काय करू? जाऊ दे ! जो पर्यंत याचे उत्तर मिळत नाही तो पर्यंत मी माझ्या रोजच्या जीवनात काहीच बदल करणार नाही. कदाचित असच एका दिवशी याचे उत्तर मिळेल.चल झोप आता. मला सकाळीच साईटवर जायचे आहे. आज पुढच्या टप्प्याचे काम सुरू होईल.”


“सुप्रभात अरुण साहेब.. काय म्हणता?”

“तुम्हीच सांगा चव्हाण साहेब.. खोदकाम कुठं पर्यंत आले ते. तुम्हाला माहीत आहे ना तेरा तारखे पर्यंत अख्खा बुरुज खोदायचा आहे. एकदा पाया पुन्हा भरला कि तुम्हाला मी कामासाठी तीन चार महिने तरी त्रास देणार नाही. हा किल्ला फक्त परत एकदा नवरीसारखा नटला पाहिजे . मंत्री साहेबांनी इथलं पर्यटन वाढवण्यासाठी खूप जोर लावलाय. एकदा की किल्ल्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले की आपण दोघे ही मोकळे होऊ पण शेवटी तुमच्या या कामाच्या गुणवत्तेवरच पुढच्या टेंडरचे आपण बोलू.”

“हो..हो..अरुण साहेब त्याची तुम्ही काहीही चिंता करू नका..दुप्पट गडी लावतो पण काम तुमच्या मनासारखेच करून देतो. पुढे जाऊन हा किल्लाच तर आजूबाजूच्या ८ खेड्यांची पोटं भरणार आहे. मी कोणत्या प्रकारचीही हलगर्जी होऊ देणार नाही.”

“आनंद झाला असे ऐकून..तुम्ही व्हा पुढे.. मी येतोच ऑफिसातून थोडे कागदपत्रे आटपून.

“संदीप, ती कालची फाईल आण जरा इकडे..

संदीप ..संदीप..कुठे आहेस रे बाबा..”

“साहेब, संदीप मगाशीच किल्ल्याच्या पलीकडच्या बुरुजाकडे गेलाय..”, शिपाई नथु लगबगीने येत म्हणला.

“नथुकाका, का अचानक इतक्या सकाळीच..आणि ते पण न सांगता?

“साहेब, मी काय सांगू ? तुम्हीच जाऊन बघितलं तर बरं होईल”.

“का काय झालं? काही अपघात वगैरे झाला का?”

“तसेच समजा..”

“नथुकाका, मग तुम्ही हे मी आल्याआल्या का नाही सांगितलं?”

“साहेब, तुमचं आणि चव्हाण साहेबांचं बोलणं चाललं होतं म्हणून…”

“बरं बरं.. ठीक आहे..मी जाऊन पाहतो..तुम्ही इथेच ऑफिसात थांबा..मला भेटायला जर कोणी आलंच तर त्याला इथेच बसवा..”


किल्ल्याच्या बुरुजाजवळ खोद काम करणाऱ्या दहा बारा गडी माणसांचा घोळका उभा होता. चव्हाण साहेब दोन तीन जणांना सोडून बाकी सगळ्यांना आपापल्या कामाला लागायला सांगत होते. त्यांची पांगापांग सुरूच होती की इतक्यात अरुण तिथे पोहचला.गडी माणसं बाजूला सरकताच समोरचं दृश्य बघून अरुणच्या पायाखालची जमीन सरकली.


“चव्हाण साहेब, हे काय चाललंय.. तुम्ही मला काहीच कसं नाही सांगितलं?”

अरुणने एक रागावलेली नजर चव्हाण साहेबांच्या बाजूला उभ्या असेलेल्या संदीपकडे ही टाकली.

“अरुण साहेब..या बद्दल काहीच नका बोलू ..हे प्रकरण बाहेर कुठं कळालं तर काम सुरु होण्याआधीच संपेल..”

“पण चव्हाण साहेब..हे कुणाचे आहे आणि याचा सुगावा लावायला नको का?” त्यांचं बोलणं सुरू असतानाच संदीप मधी बोलला..

“सॉरी सर, पण हे मिळाले आहे इथे.” संदीपने एक मळलेला कागद अरुणच्या हातात दिला.


अरुणने त्याच्याकडे नजर टाकली आणि त्यावर काय लिहलंय ते वाचू लागला.


“मागच्या उन्हाळयात आम्ही गावाकडच्या समुद्र किनाऱ्यावर गेलो होतो. खूप मजा आली पण या वर्षी मी बाबांना हट्ट केला कि मला किल्ला पाहायचा. आई बाबा दोघे मला खूप प्रेम करतात त्यांनी लगेच माझा हट्ट कबुल केला आणि ह्या वर्षी शाळेला सुट्टी लागताच आम्ही थेट हा किल्ला पाहायला आलो. आई मला सांगत होती कि तिचा हात सोडून कुठे जायचे नाही पण माझेच चुकले, किल्ला इतका भव्य आणि छान होता कि मी एकटेच चालत निघाले. बघता बघता मी आई बाबांपेक्षा खूप लांब निघून आले आणि अश्या ठिकाणी पोहचले की जिथून बाहेर यायला मला रस्ताच दिसेना. आई बाबांनी मला खूप आवाज दिला. मी पण परत त्यांना ओ दिली पण ते मला कुठेच दिसले नाहीत. आमचा आवाज किल्ल्याच्या भिंतींवर आदळून नुसता घुमत राहिला.


आईचा आवाज देखील माझ्यासारखाच रडवेला झाला होता. दिवसाची संध्याकाळ आणि संध्यकाळची रात्र होऊ लागली. मी कशीबशी किल्ल्याच्या एका टोकाकडे जाऊन पोहचले. अचानक माझा पाय एका पायरीवरून घसरला आणि मी खूप खोलवर जाऊन पडले. जाग आली तेव्हा मी किल्ल्याच्या कोणत्या एका आडजागी होते. मी जीव एकत्र लावून आई बाबांना खूप आवाज दिला पण काहीच उत्तर आले नाही. शेवटी मी सकाळ होण्याची वाट पाहू लागले. सकाळ झाली तेव्हा शेजारच्या मंदिराची घंटा ऐकू आली. मी परत मदतीसाठी आवाज दिला.


तरीही कोणी उत्तर दिले नाही. उंचीवरून पडल्यामुळे मला चालता ही येईना. भुकेमुळे आता मला सारखी चक्कर येत आहे..अधून मधून पाऊस झाला तर भिंतीवरून ओघळणारे थेंब थेंब पाणी मी पीत आहे. दिवस कसाबसा निघून जातो पण रात्री मला खूप भीती वाटते. वटवाघूळ यांचा घोळका आणि उंदीर दोन्ही एकत्रच बाहेर निघतात. मी भीतीने अशीच एका कोपऱ्यात सकाळ होण्याची वाट बघत बसते. मला बिलकुल नाही राहायचा इथं. मला घरी जायचं..आई बाबांकडे..”

 

वाचता वाचता अरुणच्या डोळ्यातून अश्रूचा एक थेंब त्या कागदावर पडला. बुरुजाच्या खोदकामात सापडलेला तो मानवी सांगडा अरुणच्या डोळ्यासमोर होता. कदाचित हा त्याच लहान मुलीचा होता जी इतक्या दिवस अरुणच्या स्वप्नात येऊन मदतीसाठी विव्हळून ओरडत होती.


(ही कथा इडिलिया डब नावाच्या एका १७ वर्षीय स्कॉटिश मुलीचा संदर्भ घेऊन लिहिली गेलेली आहे. इडिलिया डब १८५१ मध्ये जर्मनीच्या सुट्टीवर असताना एका किल्ल्यात फिरताना हरवली होती. पुढे तब्ब्ल नऊ वर्षांनी किल्ल्याच्या एका खोदकामात कामगारांना तिने लिहिलेली डायरी तिच्या कुजलेले सांगड्या सोबत सापडली होती.)


Rate this content
Log in

More marathi story from Ajay Nannar

Similar marathi story from Horror