Sunita madhukar patil

Tragedy Inspirational Thriller

4.5  

Sunita madhukar patil

Tragedy Inspirational Thriller

वाघीण

वाघीण

3 mins
990


" अगं आये, तुला जरा आधी सांगाय काय झालतं. आता बघ दिसं मावळाय आलाय. ह्या वक्ताला वाटवरं चिटपाखरुबी नसतंय ", म्हणत संगीने कुऱ्हाड उचलली आणि पाय आपटत खोपटाबाहेर पडली.

" आरं ये सच्या!!! त्या आक्कीसंग जा बरं आन चुलीसाठी जळणाला चार काटक्या घेऊन या मळ्यांतन. बापू कामावरनं येत असलं तवर मी सैपाकाची तयारी करती." कमलीने आपल्या दोन्ही लेकरांना जळण आणण्यासाठी मळ्यात पाठवलं.

कमली आणि वसंता यांचा गरिबीचा संसार एका छोट्याश्या खोपटात मांडलेला. पदरी दोन मुलं संगीता आणि सचिन. चौदा पंधरा वर्षाची संगी जिल्हा परिषदेच्या शाळेत नववीत शिकत होती तर सच्या दहा वर्षाचा.. चौथीत शिकत होता. एकरभर जमिनीचा तुकडा, तोच काय तो त्यांच्या उदरनिर्वाहाच साधन. स्वतःच्या मळ्यात राबत राबत ते दोघही दुसऱ्याच्या मळ्यातसुद्धा रोजगाराने कामाला जायचे तेंव्हा कुठे सगळ्या गरजा पूर्ण व्हायच्या.


कमलीला कामावरून यायला आज जरा उशीरच झाला होता. वसंताची घरी परतायची ही वेळ झाल्यामुळे तिने संगी आणि सच्याला जळण आणायला मळ्यात पाठवलं होतं.

संगी आणि सच्या दोघे हात पकडून मळ्याकडे निघाले. रोजचीच वाट, पायाखालची म्हणून कमलीला तशी चिंता नव्हती. संगीने नुकताच तारुण्याचा अल्लड उंबरठा ओलांडला होता. आतापर्यंत अल्लडपणे, उनाडपणे या बांधावरून त्या बांधावर सैराटपणे पडणारी तिची पावले हल्लीे जरा सावकाश पडत होती. 


सूर्यनारायण देखील आता परतीच्या वाटेवर होता. तांबूस, केशरी,जांभळट रंगाच्या वेगवेगळ्या छटा तो त्या मावळतीच्या नभावर उधळत होेता. थोडा शिणला होता, दिवसभर काम करून तोही दमला होता. मध्येच कधीतरी ढगांआड लपल्यामुळे शिरवाळ पडत होतं. अंधार पडेल म्हणून संगीचे हात भराभर चालत होते. बाभळीच्या सुकलेल्या लाकडावर, फांद्यावर कुऱ्हाडीने सपासपा वार करत एक-एक काडी, तुकडा जुळवत ती सरपणाची मोळी तयार करत होती.

" अगं ए, आक्के!!! आवरलं का नाही तुझं, आवर की पटकन. आता अंधार पडाय लागलाय बघ. मला भ्या वाटतयं. चल लवकर घरला." सच्या घरी जायची घाई करत होता. त्याला अंधाराची जाम भीती वाटायची.

" जरा थांब रं सच्या, झालंच माझं. हा जळणाचा भारा बांधते मग लगीच निघू आपण घराकडे. संगीने जळणाचा भारा बांधत बांधत सच्याकडे एक प्रेमळ कटाक्ष टाकला. तिने कुऱ्हाड जळणाच्या भाऱ्यात खोचली आणि त्याला डोक्यावरच्या चुंबळीवर व्यवस्थित ठेवत, " चल, झालं " म्हणत सच्याकडे वळली.


दोघे घराकडे निघालेच होते की इतक्यात एक फटफट... फटफट करत मोटरसायकल येऊन त्यांच्याजवळ थांबली. मोटरसायकल वर तिशीच्या आसपासचे दोन तरुण होते. संगीला पाहताच त्यांचे डोळे विस्फारले होते. दारू पिल्यामुळे तोंडातून दारूचा उग्र वास येत होता तर पाठीमागे बसलेला तरुण सिगारेटच्या धुराचा मारा तिच्या तोंडावर करत होता. सच्या खूप भेदरला होता. "आक्के चल लवकर घरला." म्हणत होता.


आतापर्यंत संगीला सोबत करणाऱ्या सूर्याने देखील पाठ फिरवली होती. धरतीच्या कुशीत त्याने आपलेे तोंड लपवले होते. त्यामुळे काळोख दाटून येत होता. तोच काळोख आता संगीच्या जीवनावरही दाटून आला होता.

तिने त्यांच्याकडे दुर्लक्ष करत झपाट्याने आपली वाट चालू लागली. सच्या तिच्या पाठीमागे पळत होता.

" एवढी कसली घाई हाय, आमी सोडतू की तुला घरी फटफटीवरनं." म्हणत त्यातल्या एकाने गाडीवरून उतरून तिचा हात पकडला. दारू बरीच चढली होती त्याला. तो चालताना लटपटत होता.


संगीला त्याचा मनसुबा समजला आणि तिने मदतीला नकार दिला. ती पुढे पुढे चालू लागली. पण तो लंपट आता तिच्याशी झोंबाझोबी करू लागला होता. लहानग्या सच्याला काहीचं उमगत नव्हतं, तो रडकुंडीला आला होता. तितक्यात दुसराही त्याला सामील झाला. दोन लांडग्याच्या तावडीत एक नाजूक हरिणी सापडली होती. त्यांनी तिला ओढत ओढत शेजारील पिकात नेले. सच्या, " सोडा माझ्या आक्काला... सोडा माझ्या आक्काला ", म्हणत ओरडत होता. त्यांच्यावर बुक्क्याने वार करत होता पण नऊ-दहा वर्षाचं लहानगं लेकरू त्याच बळ ते किती असणार. डोक्यापेक्षाही उंच पिकात ते तिला घेऊन जाऊ लागले.


ते दोघेही चांगलेच दारूच्या अमलाखाली होते. याचाच फायदा संगी घेते. त्यांना जोरात धक्का देऊन जळणाच्या भाऱ्यातील कुऱ्हाड ती ओढून काढते. काही क्षणातच त्या पिकातून दोन किंचाळ्या ऐकू येतात आणि नंतर भयाण शांतता... सच्या आवाजाच्या दिशेने पाहतो. संगी पूर्णपणे रक्ताने माखलेली असते, जणू तिने रक्ताचा अभिषेकच केला होता. लालबुंद तिचे डोळे आग ओकत होते. ती हातातल्या कुऱ्हाडीने त्यांच्यावर सपासपा वार करत होती. तिने हातातील कुऱ्हाड त्या दोघांवर उगारून महाकालीचं रूप धारण केलं होतं.

एक नाजुक अल्लड, चंचल हरिणीने आज वाघिण बनून दोन लांडग्यांची शिकार केली होती. द्रौपदीच्या लज्जा रक्षणार्थ कृष्ण अवतरला होता पण संगीने आज तिच्यातील कृष्णाला जाग करून स्वतःचं शील रक्षण स्वतः केलं होतं.


© copyright

© all rights reserved.

या कथेच्या प्रकाशनाचे आणि वितरणाचे सारे हक्क लेखिकेकडे राखीव. कथेत अथवा कथेच्या नावात किंवा कथा लेखिकेच्या नावाशिवाय आढळून आल्यास तो कॉपी राईट कायद्याचा भंग मानला जाईल. कथा जशीच्या तशी शेअर करण्यास काहीही हरकत नाही.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy