Sunita madhukar patil ( मधुनिता )

Tragedy Inspirational Thriller

4.0  

Sunita madhukar patil ( मधुनिता )

Tragedy Inspirational Thriller

कृष्णा

कृष्णा

5 mins
247


दारावरचा लाल दिवा बंद झाला. डॉक्टर बाहेर आले, तशी कृष्णाबाई आपलं हिरवंगार लुगडं सावरत उठून उभी राहिली. भेदरलेल्या प्रश्नार्थक नजरेने ती त्यांच्याकडे पाहत होती. बाहेर येताच डॉक्टर तिला म्हणाले, "गडबड करून लौकरात लौकर तुम्ही त्यांना इथे घेऊन आलात म्हणून बरं...! नाहीतर सगळं अवघड होतं. त्यांना वाचवता आलं नसतं. पण आता सगळं ठीक आहे. काही काळजीचं कारण नाही, काकू...! उद्या सकाळपर्यंत आराम पडेल त्यांना."

डॉक्टरांचे धीराचे शब्द कानी पडले आणि कृष्णाबाईंनी आतापर्यंत मोठ्या हिंमतीने थोपवून ठेवलेला भावनांचा बांध फुटला. आणलेलं उसनं अवसान गळून पडलं आणि म्हातारीच्या डोळ्यातून आसवांची धार वाहू लागली. तिथेच बाहेर भिंतीचा आधार घेत ती मटकन खाली बसली.

घाई करून म्हाताऱ्याला लवकरात लवकर घरातून हलवला नसता तर आज काय प्रसंग ओढवला असता याचा विचार करताच तिच्या अंगावर सरसरून काटा आला आणि सकाळपासूनचा सगळा घटनाक्रम तिच्या नजरेसमोर तरळून गेला.

सकाळी कृष्णाबाई पहाटे तांबडं फुटायच्या आतच जागी झाली. उठून शेरड-करडं, म्हसराखालचं झाडून काढलं. सडा सारवण करून अंघोळ केली. चुलीवर म्हाताऱ्याच्या आंघोळीसाठी पाणी गरम करायला ठेवलं. तोपर्यंत म्हाताराही जागा झाला. बैलांना वैरण,पाणी दाखवलं. बाकीची किडुक मिडुक काम आटोपून अंघोळीला गेला. त्याची अंघोळ आटोपेपर्यंत म्हातारी गरमागरम चहा पितळीत ओतून त्यांची वाट पाहू लागली.

चहा पित पित कुशाबा, "किस्ने, तुझ्या हातचा चा म्हंजी... हा हा हा...अमृत गं अमृत...!" म्हणताच कृष्णाबाई गोड लाजली. मस्त फुरके मारत दोघांचाही चहा झाला.

न्याहरी करून दुपारसाठी चार भाकरी थोडं कालवण एका फडक्यात बांधून दोघेही मळ्याला निघाले. सुगीचे दिवस असल्यामुळे रानात भरपूर काम होती. मळ्यात जाताच दोघे आपापल्या कामाला लागले. मळ्यात कामाला आलेल्या आयाबायांशी गप्पा मारत कृष्णाबाई कामात गुंतून गेली.

दोघांनाही मळ्यात येऊन चार पाच तास होत आले होते. दुपारच्या जेवणाची वेळ झाली. एवढं हातातलं काम आटोपलं की निवांत झाडाच्या सावलीत बसून चार घास पोटात ढकलावे, या विचारात असतानाच कुशाबाला पायाला काहीतरी चावल्यासारखं वाटलं म्हणून त्याने खाली पाहिलं तर त्याच्या पायापासून काहीतरी वळवळत गेलेलं त्याला दिसलं. त्यांच्या पायाच्या करंगळीजवळ दात रुतलेल्या खुणा होत्या. ते पाहताच तो घाबरला आणि "किस्ने ssss... ए किस्ने sss… अगं, लांबड चावलं... लांबड...!" म्हणत त्याने मोठयांदा बोंब मारली.

कृष्णाबाई त्यांच्यापासून थोडया लांब होती, म्हणून कुशाबा काय म्हणतोय ते तिला नीट ऐकू गेलं नाही पण आजूबाजूला काम करणाऱ्या मजुरांनी त्याची हाक ऐकली आणि ते कुशाबाच्या दिशेने धावले. सगळेजण कुशाबाच्या दिशेने धावताना कृष्णाबाईंनी पाहिलं आणि तिच्या काळजाचा ठोका चुकला.

गोळा झालेल्या लोकांपैकी कोणीतरी फडक्याचा एक तुकडा करकचून कुशाबाच्या पायाच्या घोट्याजवळ बांधला. कुशाबा घाबरून बेशुद्ध झाला होता. त्याला लोकांनी उचलून घरी आणला. कृष्णाबाईने डोळे गाळायला सुरवात केली. शेजारच्या आयाबाया तिला समजावत होत्या.

सारी भावकी दारात गोळा झाली. लोकांनी म्हाताऱ्या वरून लिंबु ऊतरवुन टाकला, कोणीतरी म्हसोबाचा अंगारा आणून म्हाताऱ्याच्या कपाळाला लावला. काहींनी जाऊन वाडीतल्या देवऋष्याला बोलावून आणलं. त्याने काही मंत्र, अंगारा कुशाबावरून फुंकला. या सगळ्या उपचारांमध्ये बराच वेळ निघून गेला. सूर्य मावळतीकडे झुकला होता. लांबड चावुन बराच वेळ झाला होता. आता कुशाबाचं अंग निळं पडायला लागलं होतं. सगळेजण सुतकी चेहरे घेऊन कुजबुजत म्हाताऱ्याच्या आजूबाजूला घेराव करून बसले होते.

गावच्या दवाखान्यातला डाक्टर पेशंट जास्त नसल्यामुळे संध्याकाळी लौकरच घरी गेला होता. कोणालाच काय करावं काही कळत नव्हतं. सरकारी दवाखाना तालुक्याच्या ठिकाणी होता. वाडीतली जाणती माणसं आता काय करायचं याचा विचार करत होती, आपापसात कुजबुजत होती.

शेजारचा सदा आणि गणपत आपापसात बोलत होते, " म्हातारं काय आता दम काढायचं दिसत नाय. आंग बघा कसं निळं पडाय लागलंय. ह्याच्या लेकीला सांगावा धाडून घ्या लवकर बोलवून, आन कालिजात शिकणाऱ्या तेच्या लेकाला सागऱ्याला बी फोन करून घ्या बोलावून...! शेवटच्या वक्ताला त्वांड तरी नदरं पडलं, पोरांना."

भिंतीच्या आधाराने कपाळाला हात लावून बसलेल्या कृष्णाबाईच्या कानात हे शब्द पडताच ती ताडकन उठून उभी राहिली आणि चवताळून म्हणाली," तुमचा मुडदा बसवला...! उठता का इथनं... तुम्ही घालवायाचं टपलाय म्हाताऱ्याला... त्याला काय बी हुणार नाय... मी हाय अजून खमकी...!". तिने आलेल्या सगळ्यांना शिव्यांची लाखोली वहायला सुरवात केली. कुशाबाच्या आजुबाजुला घेराव करून बसलेल्या लोकांना तिने हाकलून लावलं. लोकानां वाटलं, म्हातारीनं धसका घेतलाय आणि म्हणून ती अशी बिथरल्यासारखी वागत आहे.

कृष्णाबाईच्या जिवाची घालमेल तिच्या चेहऱ्यावरील सुरकुत्यांमध्ये स्पष्ट दिसत होती. चेहऱ्यावरून घामाचे थेंब ओघळत होते. कपाळावरचा मोठा लालभडक कुंकवाचा टीळा त्या घामाच्या थेंबांमध्ये मिसळून हनुवटीपर्यंत पोहचला होता.

लोकांची गर्दी थोडी कमी झाल्यानंतर कृष्णाबाई चटकन उठली. बैलांना सोडून गाडीला जुंपलं. बैलगाडीत एक चादर अंथरली. पाण्याची छोटी कळशी गाडीत ठेवली. उतरंडीच्या गाडग्यात ठेवलेलं पैशाचं पुडक लुगड्याच्या कमळात खोचलं आणि शेजारच्या दोन तीन बायकांच्या मदतीने कुशाबाला उचलून गाडीत घातला. तिच्या हालचालींना आता गती आली होती. एकीला आपल्या सोबत घेतली आणि एका हाताने बैलांचा कासरा आणि दुसऱ्या हातात चाबूक घेऊन गाडी तालुक्याच्या रस्त्याला वळवली. ती हवेच्या वेगाने गाडी हाकत होती. बैलगाडीला आता चांगलीच गती मिळाली होती. तिच्या भीतीवर चाळीस वर्षाच्या प्रेमाने मात केली होती. एक सावित्री आपल्या सत्यवानाचे प्राण यमाच्या तावडीतून परत आणायला निघाली होती.

गाडी थेट तालुक्याच्या सरकारी दवाखान्याच्या आवारातच जाऊन थांबली. सरकारी दवाखाना असल्यामुळे दवाखान्यात डॉक्टर हजर होतेच. गाडीतल्या चादरीच्याच झोळीत तसंच कुशाबाला उचलून दवाखान्यातील कर्मचारी कुशाबाला घेऊन पळत आत गेले.

डाक्टरांनी कुशाबाला तपासलं. नाका तोंडातुन नळ्या टाकल्या गेल्या आणि योग्यवेळी उपचार सुरू झाले. बराच वेळ डॉक्टर आणि नर्स आतबाहेर करत होते. प्रत्येक वेळी ती उठून म्हाताऱ्याची चौकशी करत होती. शेवटी वैतागून नर्सने रागावून कृष्णाबाईला गुपचुप बाकड्यावर बसायला सांगीतलं. ती गरीब गोगलगाय सारखी पाय पोटात घेऊन चुपचाप बाकड्यावर बसून राहिली आणि डॉक्टरांची वाट पाहू लागली. थोड्याच वेळात डॉक्टर बाहेर आले आणि कुशाबा सुखरूप असल्याची बातमी त्यांनी कृष्णाबाईला दिली.

औषधांची ग्लानी असल्यामुळे तो बेशुद्धच होता. सकाळी कुशाबाला शुद्ध आली. समोर कृष्णाबाईला पाहून तो गोड हसला. तिला पाहताच " किस्ने... तुझ्या हातचा चहा." कुशाबा तिच्याकडे पाहत बोलला.

" आधी घरला चला, मग प्या पितळीभरून तुमचं अमृत. पण त्या आधी मला एक सांगा. मला एकटीला सोडून कुठं निघाला हुता. म्या रागावलीया तुमच्यावर. मी एक सबुद बी तुमच्यासंग बोलणार नाय." कृष्णाबाई तोंडाचा चंबू फुगवून बसल्या.

" ए किस्ने...! अगं, अशी कावतीया कशाला. तु माझा पिच्छा अशी थोडीच सोडणार हायस. माझी गुणाची बाय ती." म्हणत कुशाबाने कृष्णाबाईचा हात हातात घेतला.

" व्हय... व्हय...! म्या बरी जाऊ दिन तुमास्नी." म्हणत कृष्णाबाईने हळूच पदराने डोळे टिपले.

समाप्त.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy